रॅट रेसचा विळखा!

तुम्हाला आपण फार असहाय आहोत, अगतिक आहोत असे वाटते का? कुणीही आपली दखल घेत नाही अशी भावना अधूनमधून येत असते का? या जगात आपला निभाव लागणार नाही हा विचार येत असतो का? अस्तित्वासाठीची स्पर्धा, स्पर्धेतून स्वार्थ, भीती, व इतरांचा दुस्वास इत्यादीमुळे आपण मानसिक स्वास्थ्य हरवून बसलो आहोत असे वाटत असते का?
असे काही वाटून घेणारे तुम्ही एकटेच नाही. हे जे वाटणे आहे ते मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे असेही वाटून घेण्याचे कारण नाही. आताची बदलत असलेली परिस्थितीच या मानसिकतेचे, असमाधानीवृत्तीचे प्रमुख कारण असावे असे काही तज्ञांचे मत आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यातील नवउदार भांडवलशाही (neo-liberal capitalism) व त्यातून होत असलेले बाजारीकरण तुम्हा – आम्हाला हद्दपार करण्याच्या बेतात आहे. या गोंधळलेल्या परिस्थितीतून मार्ग शोधणे – किंवा निदान त्याबद्दल विचार करणे – यात गैर काही नाही. स्वतःची आयडेंटिटी जोपासण्याचे प्रयत्न करणे यातही काही चूक नाही.
मुळात आपण सामाजिक प्राणी आहोत. पिढ्यान पिढ्या जोपासलेल्या अनेक गोष्टीतून व जीवनमूल्यामधून आपल्याला एक आयडेंटिटी प्राप्त झालेली असते. समाज आपल्या आयडेंटिटीला आकार देत असतो. आपण normal आहोत की abnormal हे समाज ठरवत असते. तरीसुद्धा समाजाबरोबर जावे की त्याच्याशी फटकून वागावे या निवडीचे स्वातंत्र्य आपल्याला असते.
यापूर्वीच्या समाजातील बदल फारच संथगतीचे होत गेल्यामुळे काही अपवाद वगळता मागच्या पिढीतल्यांना स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल फारसे विचार करण्याची गरज पडली नसेल. परंतु गेल्या 30 – 40 वर्षात समाज स्थितीत फार मोठा बदल झाल्यामुळे आपण नेमके कुठे आहोत हेच कळेनासे झाले आहे.
आजच्या समाजाच्या सर्व व्यवहारावर बाजारीकरणाची गडद सावली आहे. बाजारीकरणाच्या आक्रमकतेमुळे एकामागून एक असे सर्व क्षेत्र भांडवली व्यवस्थेत बंदिस्त होत आहेत. बाजारीकरणातच सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्यांची उत्तरं दडलेली आहेत असे त्याच्या पुरस्कर्त्यांची खात्री आहे. राज्यकर्ते जितके नियंत्रण कमी करू शकतील, जितके कर कमी करू शकतील, तितक्या प्रमाणात समाजविकास होत राहील असे त्यांना वाटत आहे. सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण व्हावे, सार्वजनिक हितासाठीच्या कामांना कात्री लावावी, उद्योगव्यवस्थेला पूर्णपणे नियंत्रण मुक्त करावे, रोकडसुलभता असावी, भांडवलाच्या अंतरराष्ट्रीय हस्तांतरणाला नियमांच्या चौकटीतून मुक्त करावे ही मानसिकता व त्याकडे वाटचाल प्रबळ होत आहे. मार्गारेट थॅचर व रोनाल्ड रीगन यांच्या काळापासून हे लोण पसरत असून कुठल्याना कुठल्या स्वरूपात ती जगभर पाय पसरत आहे. या बाजारीकरणाला अपवाद असलेला एकही देश या पृथ्वीवर नसावे अशी आताची स्थिती आहे.
खरे पाहता बाजारीकरणाचा डोलारा प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या मूल्ये जन्मजात असतात या तत्वावर व मानवजात स्वार्थी व अप्पलपोटी असणार या क्रिश्चियन गृहितकावर उभा आहे. व आतापर्यंतची समाज-व्यवस्था या गोष्टींचे नियंत्रण करत असल्यामुळे त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांची झळ सामान्यापर्यंत पोचली नव्हती. आता मात्र या (अव)गुणांचे उदो उदो होत आहे. नियंत्रणाऐवजी प्रोत्साहन मिळत आहे. स्वयंप्रेरित अनिर्बंध स्पर्धेतूनच व भांडवली नफेखोरीतूनच नवीन शोध, इनोव्हेशन्स, आर्थिक वाढ, होत होत शेवटी मानवाचे कल्याण होणार असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.
`लोक आपल्या अवस्थेला स्वतःच कारणीभूत आहेत. गरीबीत रहायचं की नाही हे त्यांनीच ठरवायचं आहे. वर यायचं असेल तर त्यांनी शासनाच्या आधाराची अपेक्षा करता कामा नये.’
बाजारीकरणात अमाप भांडवलाबरोबर मेरिटचेही फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असते. बौद्धिक क्षमता, परिश्रमातील सातत्य, व इनोव्हेटिव्ह माइंड ज्याच्यांकडे आहे त्यानाच कुठल्याही स्पर्धेतील यशाची किल्ली मिळू शकते, याबद्दल कुणाचेही दुमत नसते. त्याचप्रमाणे या गोष्टी असणाऱ्यांना वाटेल ती किंमत देऊन विकत घेता येते याचीसुद्धा सोय येथे होत असते. याचा परिणाम जीवघेण्या स्पर्धेत होत आहे व बहुतेकांना या रॅट रेस मध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळते वा जे संधीच्या शोधात आहेत त्यांचेच हे जग आहे. आणि इतरांना येथे स्थान नाही.
परंतु वास्तव फार वेगळे आहे. ही रॅट रेस सर्वांना समान संधी देऊ शकत नाही. काही (मोजके चाणाक्ष) स्मार्ट अगोदरच या शर्यतीच्या विनिंग लाइनजवळ उभे आहेत. व शिट्टी वाजवली की तेच सर्वांच्या अगोदर पोचतात व शर्यत जिंकतात. बाजारावरील नियंत्रण दूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तेंव्हापासूनच समान संधी नाकारली गेली हे विसरता येत नाही. उत्कर्षाच्या शिडीच्या खालच्या पायरीपाशीच बहुतेक जण घुटमळत आहेत, एकमेकाचे पाय ओढत आहेत. व यातूनही काहींना वरच्या पायरीवर जाणे शक्य झाले तरी त्यांना वर येऊ न देण्यासाठी काही अडथळे उभे करणारे ठिकठिकाणी आहेत. रशियातील कम्युनिस्ट राजवट संपल्यानंतरसुद्धा त्या देशातील सर्वांना समान संधी उपलब्ध नव्हती. कारण काही मूठभर लोकांच्या हातात अमाप संपत्ती एकवटली होती व त्यांचे केजीबीशी लागेबांधे होते. व हेच मूठभर लोक बाजारीकरणाचे गोडवे गात होते. खरे पाहता उदारीकरणाच्या सिद्धांतानुसार विलक्षण बुद्धीमत्ता, सर्जनशीलता किंवा अविश्रांत परिश्रम असलेल्यांच्याकडेच संपत्ती हवी. परंतु यापैकी कुठलेही गुणविशेष या श्रीमंतांच्या जवळ नव्हते.
बुद्धीमत्ता वा परिश्रमांची फळंसुद्धा फार काळ टिकत नाहीत. पहिल्या पिढीतील उद्योजकांनी स्वतःच्या हिकमतीवर व इनोवेशनच्या जोरावर उद्योगधंदे उभारून संपत्ती गोळा केली असली तरी नंतरच्या कालखंडात स्पर्धेची झळ लागणार नाही याची शाश्वती देता येत नाही. इनोवेशन्स सतत होत असतात. त्यामुळे नवीन उद्योग धंदे उदयास येत काही उद्योग धंद्याना कालबाह्य ठरवतात. त्यामुळे बापाच्या पैशाच्या जोरावर उद्योजकांची पुढली पिढी टिकून राहील याची खात्री देता येत नाही. कुठल्याही कालखंडात नाविन्यतेला, त्याच्या उपयुक्ततेला अग्रक्रम दिला जातो. अमेरिका वा ब्रिटन सारख्या प्रगत भांडवली देशातसुद्धा याचा प्रत्यय येत असतो.
नवउदार भांडवलशाहीच्या पुरस्कर्त्यांनी आणि त्यांनी पाळलेल्या तथाकथित विचारवंत व विशेषज्ञांनी मेरिटच्या जोरावर समाजहित साधण्यासाठी, सर्वांना समान पातळीवर आणण्यासाठी व समान संधीसाठी प्रयत्न करावेत. केवळ पैशाच्या जोरावर आपापल्या मुलाबाळांना अत्याधुनिक शिक्षण देवून आपण किती इनोवेटिव्ह आहोत असे शेखी मिरवण्यात हशील नाही. परंतु हे विधान त्यांना अजिबात पटण्यासारखे नाही. म्हणूनच सर्व उद्योगधंद्यांना भाडोत्रीपणाचे स्वरूप येत आहे.
या गोष्टींना एक वेळ दुर्लक्ष केले तरी बाजारीकरणाच्या अपयशाला व्यक्तीच्या नाकर्तेपणाला जबाबदार धरले जाते. श्रीमंतांचे सगळे बरोबर व गरीबांचेच काही तरी चुकते, आर्थिक व नैतिक दृष्ट्या त्यांच्यातच उणीवा असल्या मुळे प्रगती रखडत आहे, असे दोषारोप गरीबावर केले जातात. त्यांच्या दृष्टीने गरीब जनता या आधुनिक समाजाला लागलेली कीड आहे, ते सर्व बांडगुळं आहेत, ही मानसिकता जोपासली जात आहे.
बाजारीकरण माणसांना स्वायत्तता व स्वातंत्र्य देत त्यातून मानवजातीचे कल्याण होत राहणार, अशी स्वप्नं दाखवत होत होती. परंतु त्या अपेक्षा फोल ठरत आहेत. त्याऐवजी माणसांना कस्पटासमान लेखण्यातच धन्यता मानले जात आहे. त्यामुळे संवेदनशील माणूस बाजूला फेकला जात आहे. एकाकी ठरत आहे. कामाच्या ठिकाणी असेसमेंट, मॉनिटरिंग, मेजरिंग इत्यादींचा अतिरेक होत असून नियोजनाची सर्व सूत्रे लांब असलेल्या कुठल्यातरी अनामधेयाकडून हलत असल्यामुळे रॅट रेसमध्ये यशस्वी होत असलेल्यांना सर्व सोई-सुविधा, सवलती, उत्तेजनार्थ बक्षीस, पदोन्नती व मागे राहिलेल्यांना शिक्षा, दंड, पदावनती किंवा प्रसंगी पदच्युती यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारच्या धोरणामुळे कामाच्या ठिकाणी भीतीयुक्त वातावरणाची किंवा मॅनिप्युलेट करत पुढे पुढे राहण्यासाठीच्या वृत्तीची वाढ होत आहे. स्वायत्तता, उद्योजकता, नाविन्यतेचा शोध घेण्याची आकांक्षा, निष्ठा या गोष्टी हळू हळू नष्ट होत असून त्याऐवजी औदासीन्य, भीती, मत्सर, स्वार्थीपणा इत्यादी प्रकारच्या भावना रुजत आहेत. व्यवस्थापनाच्या शिस्तीच्या बडग्यामुळे वरिष्ठांना खुश ठेवणे, त्यांना आवडतील तसेच अहवाल, खोटे खोटे आकडेवारी सादर करणे यावर भर दिला जात आहे. अशा वेळी रशियाच्या भ्रष्ट राजवटीत सेंट्रल ब्युरोच्या अंदाजाप्रमाणे आकडे कमी जास्त केलेल्यांची आठवण येते.
हेच पाशवी बळ बेरोजगारांनासुद्धा छळत आहे. बेरोजगारीच्या तापदायक व्यथेबरोबरच यांना या वेगवेगळ्या पातळीवरील छक्के पंजे समजून घेण्यातही वेळ व श्रम खर्ची घालावे लागत आहे. मुळात नवउदारभांडवलवादातच comparison, evaluation व quantification अंतर्भूत आहेत. त्यामुळे कागदावर जरी आपल्याला हवे ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले तरी प्रत्यक्षात आपल्याकडे काहीही नाही. परिस्थिती आपल्याला निर्वीर्य व निःशक्त बनवत आहे. सर्व राजकीय पक्ष या प्रक्रियेत सामील झालेले आहेत. त्यामुळे बेरोजगारांना राजकीय पाठबळही मिळेनासे झाले आहे. स्वातंत्र्य आणि स्वायत्तता ऑटोनामीच्या मुखवट्याखाली दबलेले असून बिनचेहऱ्याच्या मनमानी करणाऱ्या नोकरशाहीच्या हातात समाज नियंत्रणाची सूत्रे दिलेली आहेत.
हा बदल व ही विदारक परिस्थितीच वैयक्तिक जीवनात अनेक मनोविकारांना जन्म देत आहे, असे तज्ञांचे मत आहे. स्वतःची हेटाळणी, विषण्णता, व्यक्तिमत्व विकृती, बेशिस्त जीवनशैली इत्यादींना ती जन्म देत आहे. व्यक्तिमत्व विकृतीत चिंता व समाजाविषयी भीती असल्यामुळे इतरांकडे सदोष दृष्टीने बघितले जाते. कारण इतर सर्वजण त्याच्याशी स्पर्धा करणारे किंवा त्याचे मूल्यांकन करणारे आहेत अशी भीती त्यांच्या मनात असते. त्याच्या दृष्टीने या इतरांना समाजात मान्यता असल्यामुळे आपण किस झाडकी पत्ती हा न्यूनगंड रुजत आहे.
एकलकोंडेपणा आणि विषण्णता यांना हैराण करत आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांचे स्वत्व पिळवटून टाकले जात आहे. जे शेवटच्या पायरीवर आहेत त्यांना अपराधीपणाने ग्रासले आहे. स्वतःबद्दल सांगण्यासारखे काहीही शिल्लक नसते. यश मिळाले की फुगवून जायचे व न मिळाल्यास स्वतःलाच दोष द्यायचे. गंमत म्हणजे या यशापयशात त्यांचा दूरान्वयानेही काडीचा संबंध नसतो.
जर या जगात तुम्हाला, आपण बाजूला सारले जात आहोत, आपले स्वत्व हरवत आहे, या जगात अयशस्वी ठरत आहोत असे टोचत असल्यास अजूनही तुमच्यात संवेदनशीलता शिल्लक आहे म्हणण्यास वाव आहे. खरे पाहता इतरांनी दुर्लक्ष केलेल्या काही मूल्यांना तुम्ही मानता यातच तुमचा मोठेपणा आहे. त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्यामुळे आपण गर्वाने ताठमानेने जगण्यालाच जगणे म्हणतात असे जगाला ओरडून सांगू शकतो.

संदर्भः Paul Verhaeghe, यांचा What About Me? हा लेख

pkn.ans@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.