‘पब्लिक’ विचारवंतांचे महत्त्व : रोमिला थापरांच्या तोंडून

आणीबाणीच्या काळात भाजपचे लाल कृष्ण अडवानी माध्यमांबाबत म्हणाले, ‘‘त्यांना वाकायला सांगितले तर ते रांगू लागले”. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या माध्यमांनी आपले स्वातंत्र्य आणि सचोटी कसे घालवले, यावरचे अडवानींचे भाष्य भाजपेतरांना आणि विचारवंतांनाही कौतुकास्पद वाटले होते.
आज माध्यमेच नव्हे तर शिक्षण, सांस्कृतिक व्यवहार, आरोग्यसेवा, विधिव्यवस्था वगैरे क्षेत्रांतील मान्यवरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे रांगू लागले आहेत; आणि त्यांना कोणी वाकायलाही सांगितलेले नाही.
१२ ऑक्टोबरला रा.स्व.संघाच्या दिल्ली प्रांत प्रमुखांनी साठ मान्यवरांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत दुपारच्या जेवणासाठी बोलावले. जागा होती, दिल्ली-पंजाब-हरियाना चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. आमंत्रितांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष वेद प्रकाश, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु दिनेश सिंग, AIIMS चे संचालक एम. सी. मिश्र, अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, हृदयांवर शल्यक्रिया करणारे नरेश त्रेहान व के. के. अगरवाल, नृत्यांगना सोनल मानसिंग वगैरे लोक होते. अनेक जण ‘फक्त ऐकायला गेलो/गेले’ असे सांगत होते. माध्यमांत मात्र त्या जेवणाला हजेरी लावणे हा उगवत्या सूर्याला नमस्कार होता असे सुचवले गेले. सत्ताधारी पक्षाच्या जनक संघटनेच्या अ-निर्वाचित प्रमुखापुढचे हे लोटांगण या सर्वांच्या पदांच्या व कर्तव्यांच्या संदर्भात तर अशोभनीय होतेच, शिवाय ते लोकशाही संकेतांच्याही विरोधात होते.
आश्चर्य म्हणजे माध्यमे, राजकीय पक्ष, कोणीही या प्रकरणाबाबत हूं का चूं केले नाही. २००० साली मात्र काऊन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रीसर्चचे संचालक माशेलकर आग्रा येथे संघाच्या प्लॅटिनम महोत्सवात सामील झाले तेव्हा गदारोळ उठला होता.
आज संघ आणि भाजप शासकीय धोरणांत मूलभूत बदल करू पाहत आहेत. संघ परिवार आणि मंत्रिगण यांच्यात याबाबतच्या दोन प्रदीर्घ आणि सुरचित बैठका झाल्या आहेत. संघ परिवाराला अपेक्षित बदलांची एक प्रमुख दिशा आहे ती शैक्षणिक अभ्यासक्रमांना हिंदुत्वाकडे वळवण्याची. यात सेक्युलरवादी ‘चुकीची आकलने’ बदलणेही आले. NCERTचे तत्त्वनिष्ठ संचालक परवीन सिंक्लेअर, यांना राजीनामा द्यायला बाध्य केले गेले आहे.
आर्य मुळात भारतातलेच होते, इतिहासज्ञ मानतात तसे बाहेरून आलेले नव्हते, असे सांगण्याची मोहीम दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने चालवली आहे. यामागील संस्कृतज्ञांना भारताचा इतिहास ‘वैदिक काल’ आणि ‘आर्य संस्कृती’ यापलिकडेही असण्याची जाण नाही. ‘वैदिक गणित’ नावाच्या १९६५ साली भारती कृष्ण तीर्थ यांनी लिहिलेल्या वेदांशी कोणताही संबंध नसलेल्या प्रकरणाच्या, शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे (यातील फोलपणा दाखवणारा सी.के. राजू यांचा लेख http:/www.thehindu.com/opinion/of-ed/nothing vedic-in-vedic-maths/article 637389.ecc या संकेतस्थळी भेटेल).
दिनानाथ बत्रा या संघ परिवारातल्या माणसाने काही प्रकाशकांना घाबरवून काही अभ्यासू पुस्तके ‘आपणहून’ रद्द करायला लावली. याने उत्तेजित झालेले संघ परिवारातले लोक अ-हिदुत्ववादी पुस्तकांवर बंदी आणण्याच्या मागण्या करू लागले आहेत. विद्यालये, पुस्तकांची दुकाने, कलादालने, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, साèयांवर धाडी घालून आपल्यापेक्षा वेगळी मते दडपायचे प्रयत्न होत आहेत. वेगळ्या व विरोधी मतांच्या लोकांना ‘अ-भारतीय’(भाषांतर : देशद्रोही!) ठरवून त्यांची राजकीय मते, सांस्कृतिक भूमिका, व्यक्तिगत नीतिमत्ता, साऱ्यावर हल्ले केले जात आहेत.
भिन्न मते, विरोधी मते यांबाबतच्या या असहिष्णुतेला सर्व थरांवर, सर्व प्रदेशांमध्ये उत्तेजन मिळत आहे. सत्ताधारी पक्ष व थेट सरकारही याला आधार देत आहे. ह्यातून इतर पक्षही सुटत नाहीत. काँग्रेस, जात्याधारित व प्रादेशिक पक्ष, डावे पक्ष, सारेच कमीजास्त प्रमाणात भिन्नमताचा अवमान करत सेन्सॉरवजा धोरणे राबवत आहेत. पण त्यांचा भिन्नमतविरोध भाजप-संघ परिवाराच्या विरोधाइतका आतपासूनचा व विखारी नाही. संघ परिवार मात्र वेगळे मत हा द्रोह मानून त्याला कठोरपणे दाबायच्या प्रयत्नात आहे. हे संघातील लोकशाहीविरोधी संस्कृतीला साजेसेच आहे. संघाने ‘अंतर्गत लोकशाहीला अडथळे आणणारा बकवास’ मागेच त्यागला, व त्या जागी एकचालकानुवर्तित्व उर्फ ‘फ्यूरर-प्रिन्झिप’ (नाझी पक्षातील पद्धत) आणून ठेवले.
पण रूढ विचारांपेक्षा वेगळी, विरोधी मते असणे व ती व्यक्त करायला वाव असणे जर आपण गमावले, तर आपण आपसूकच दरिद्री बहुमतवाद आणि हुकूमशाहीकडे जातो. येवढेच नव्हे तर नव्याने ज्ञान मिळवणेही दुरापास्त होते. नैसर्गिक व सामाजिक ज्ञानशाखांमधली प्रगती भिन्नमताच्या अधिकाराखेरीज अशक्य आहे. तशी मते शिक्षणातून दिली जाणे, संवाद व वादविवादांतून सिद्ध-असिद्ध ठरणे, हे निरामय सार्वजनिक क्षेत्रासाठी अत्यावश्यकच आहे.
हा मुद्दा प्रा. रोमिला थापर यांच्या तिसèया निखिल चक्रवर्ती स्मृती व्याख्यानात कळीचा होता.
(निखिल चक्रवर्ती स्वातंत्र्योत्तर भारतातील वार्ताहरांपैकी एक ज्येष्ठ पत्रकार होते. ते कित्येक वर्षे ‘मेनस्ट्रीम’ या साप्ताहिकाचे संपादक होते. ते कित्येक वर्षे कम्युनिस्ट पक्षात होते, पण त्या पक्षाचे धोरण त्यागून त्यांनी आणीबाणीवर कठोर टीका केली. परिणामतः ते नियतकालिक काही काळ बंदही पडले. प्रो. थापरांचे व्याख्यान हे तिसरे निखिल चक्रवर्ती स्मृतिव्याख्यान होते. आधीची दोन व्याख्याने अमर्त्य सेन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्री आणि एरिक जे. हॉब्सबॉम (इतिहासकार) यांनी दिली.
(प्रा. थापर जवाहरलाल नेहेरू विद्यापीठाच्या निवृत्त इतिहास-प्राध्यापक आहेत.)
थापर यांचे व्याख्यान अनेक भौगोलिक खंड व कालखंड यांत विहरणारे होते. त्यात गेल्या दोन हजार वर्षांत सटीक बौद्धिक परंपरा कशाकशा उत्क्रांत झाल्या याचा अप्रतिम आढावा होता. विवेक, साशंकभाव, ‘बाबावाक्या’ला आह्वान देण्याची परंपरा, यांतूनच सत्य शोधा, असा स्पष्ट संदेश व्याख्यानात होता. नेमक्या याच परंपरांवर आज हल्ला होत आहे.
पाश्चात्त्य जगात सॉक्रेटीसपासून गॅलिलिओपर्यंत, आणि भारतात बौद्ध व चार्वाकांमध्ये भिन्नमतांच्या अभिव्यक्तीतून विज्ञान कसे विकसित झाले हे थापरांनी तपासले. तत्त्वे, परंपरा व पद्धती, या तीन्हींच्या पातळ्यांवर विज्ञान कसे संस्कृतिनिरपेक्ष आहे. हे त्यांनी एथेन्स, अरबस्तान, भारत, चीन इत्यादींच्या इतिहासातून दाखवून दिले. भारतात बुद्धाने देव ही कल्पना अज्ञेयवादातून तपासली. अनेक इहवादी विचारप्रणालींनी कर्मविपाक, पुनर्जन्म व आत्म्याचे अमरत्व नाकारून पशुबळी व वैदिक कर्मकांडांना धिक्कारले. गॅलिलिओच्या हजार वर्षे आधी आर्यभट्टाने राजज्योतिष्यांना विरोध करून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे दाखवून दिले, व पृथ्वीकेंद्री आकलन खोटे पाडले.
या सर्वांत श्रद्धा व धार्मिक रूढींऐवजी तर्क आणि विवेक यांना सर्वोच्च स्थान देणे कळीचे होते. घटना व त्यांमागील संभाव्य कारणे यांबद्दल संभाव्य तत्त्वे सुचवणे, प्रयोग व अधिक निरीक्षणांच्या कसोटीवर ही तत्त्वे तपासणे, व अखेर भाकिते वर्तवण्याची क्षमता असलेली तत्त्वे घडवणे, अशी ही पद्धत.
इतिहासाच्या विहंगमावलोकनातून थापरांनी विवेक व तर्कनिष्ठता यांचे वेगवेगळ्या जागांमधील व कालखंडांमधील सातत्य दाखवून दिले. या परंपरेला वेळोवेळी धर्मांधांनी विरोधच केला. ब्राह्मणी रूढींनी बौद्धमताला ‘भ्रम’ मानले. होता होता अनेक ब्राह्मण्यविरोधी पंथ घडले : श्रमण-परंपरा (बौद्ध व जैन), चार्वाक, आजीविक, नास्तिक, इहवादी, विवेकवादी. आणि ‘अपौरुषेय’ वैदिक मत नाकारणारे, जातिवर्णव्यवस्था नाकारणारे, हे सर्व पंथ ‘नास्तिक’ या एकाच श्रेणीत कोंबले गेले.
थापर म्हणाल्या की आजचे हिंदुत्ववादी जसे सर्व भिन्नमताच्या लोकांना ‘मार्क्सिस्ट’ म्हणतात, त्याची आठवण व्हावी अशी ती कोंबाकोंबी होती!
प्राचीन व मध्ययुगीन काळात भारतात अनेकानेक विचारधारा होत्या. त्यांपैकी काही धर्मपीठे व राजसत्ता यांच्या विचारधारांवर शंका घेणाèया होत्या. ‘‘अंदाल, अक्कमहादेवी, मीरा वगैरे लोक जातिभेद नाकारत असत, आणि सामान्य जन त्यांचे म्हणणे आदराने ऐकत असत.’’ अमीर खुश्रो कवी आणि संगीतकार तर होताच, पण सूर्यकेंद्री ग्रहमालेची संकल्पना स्वीकारणारा ज्योतिर्विदही होता, व त्यामुळे ‘‘कर्मठ इस्लामपासून तो दूरही राहिला.’’
यानंतर राजा राममोहन रॉय, म. फुले, शाहू महाराज, पेरियार, सय्यद अहमद खान, डॉ. आंबेडकर इत्यादी आधुनिक उदारमतवादी भारतात सुधारणा करून गेले. भारतीय समाजात मोठाले फेरबदल होत आहेत, आणि ते समजून घ्यायला नव्या मर्मदृष्टीची गरज आहे. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम समजून घेण्यासाठी हे आवश्यक आहे. थापर म्हणाल्या की विचारवंतांनी (Public intellectuals) हे सांधे तपासून‘‘आपल्या बौद्धिक वारशातल्या विवेकवादी विचाराच्या परंपरा उकलून लोकांपुढे मांडायला हव्या आहेत.’’
‘‘अनेक पेशांमधील विशेषज्ञ बरेचदा आपापल्या विशेष अभ्यासाच्या क्षेत्राबाहेरील जगाबद्दल असंवेदनशील असतात.’’ थापरांच्या मते असे विशेषज्ञ विचारवंत या पदाला पोचत नाहीत. आज कधी नव्हते तेवढे अकादमीय विद्वान आहेत. पण ते सत्तेच्या विचारधारेशी भिडायला अनुत्सुक असतात, आणि याने मुक्त विचाराची वाट खुंटणेही ते मान्य करतात.’’
विचारवंतांनी सत्ताधाऱ्यांशी जुळत्या भूमिका घेणे टाळायला हवे. त्यांच्या भूमिका स्वायत्त असायला हव्या, व त्या तशा आहेत हे उघडपणे दिसायलाही हवे. वादग्रस्त वाटणाèया भूमिका, मग त्या कोणी का घेत असेना, प्रश्न विचारून तपासल्या जायलाच हव्या. विशेषज्ञांच्या तज्ज्ञतेचे क्षेत्र तर स्पष्ट हवेच, पण नागरिकांचे हक्क काय आहेत याबाबत विचारवंत म्हणून स्पष्ट आणि संवेदनशील भूमिका घेतल्या जायला हव्यात. सामाजिक न्याय कोणत्या कृतीत आहे हे ओळखून त्या कृती सामूहिक धोरणांचा भाग करवण्यास विचारवंतांनी झगडायला हवे.
असे ‘पब्लिक’ विचारवंत भारतात का मागे पडत आहेत याचे विश्लेषण करून त्यांनी जास्त परिणामकारक व ठोस भूमिका कसा घ्याव्या, ते थापर यांच्या भाषणात स्पष्ट केले गेले. (त्यांचे पूर्ण भाषण http://sacw.net/article 9874 html या संकेतस्थळावर भेटेल).

(प्रफुल्ल बिडवईंचा वरील लेख त्यांनी अग्रेषित केला त्याच सुमारास ‘डॉन’ (Dawn) या पाकिस्तानी दैनिकाचे दिल्लीतले वार्ताहर जावेद नकवी यांचा ‘हॅव इंटेलेक्चुअल्स बीन को-ऑप्टेड?’ हा लेखही इंटरनेटवर उपलब्ध झाला. त्याची मजेदार सुरुवातच फक्त देत आहोत :-
‘‘सम्राट अकबराच्या आग्य्राजवळील कबरीजवळचा एक शासकीय फलक सांगतो की ‘‘(अकबराने) एका जमावातून एक राष्ट्र घडवले.’’ गेल्या काही काळात प्रा. रोमिला थापरांना जास्तजास्त प्रमाणात अकबराची ही भूमिका घ्यावी लागत आहे. उजव्या हिंदुत्वनिष्ठांनी चुराडा न केलेल्या मूठभर पब्लिक विचारवंतांमध्ये प्रा. थापर अचलपणे उभ्या आहेत.’’)
prafulbidwai@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.