वैकल्पिक माध्यमांसमोरील आह्वाने

(साम्ययोग साधना ह्या वैचारिक साप्ताहिकाचा हीरक महोत्सव जानेवारी २०१५ मध्ये धुळे येथे संपन्न झाला. येथे परिवर्तनवादी चळवळींतील नियतकालिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून चार परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच विषयांवर चांगले विचारमंथन व उद्बोधक चर्चा घडून आली. श्रोत्यांनीही चांगला सहभाग घेतला. अशा प्रकारे ह्या विषयावरील चर्चा महाराष्ट्रात तरी बèयाच वर्षानंतर झाली असावी. त्यातील एका चर्चासत्राच्या अध्यक्षपदावरून आ.सु. च्या माजी कार्यकारी संपादकांनी केलेले हे भाषण. -का.सं.)

  भौतिक ताळमेळ बसवताना जमिनी कार्यकर्त्यांना वाचन, लेखन, चिंतन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वैकल्पिक माध्यमे कमी पडत आहेत.  हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे.

रोजचे जीवन जगताना, दैनंदिन अडचणींना सामोरे जाताना, कार्यकर्त्यांनी वेळ काढून वाचन, लेखन, चिंतन करायला पाहिजे, पण त्यासाठी त्यांना वेळ व निवांतपणा मिळत तर  नाहीच, परंतु त्याहूनही, साहित्य मिळत  नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रे, रेडियो, टीव्ही, ही बातम्या म्हणजे माहिती देणारी माध्यमे आहेत. ती विचारास प्रवृत्त करीत नाहीत. विचार कशाचा, तर कार्यकर्त्यांनी आपले कार्य काय आहे, ते कसे साध्य करायचे, ते साध्य झाल्यावर आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, आपले गंतव्यस्थान कोणते आहे, मी आणि माझे काम ह्याचा माझ्या सभोवतालाशी संबंध कोणता ह्याबाबत वैचारिक स्पष्टता येण्यासाठी जे करायचे ते लेखन, वाचन व चिंतन.

  जमिनी कार्यकर्ते म्हणजे जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे असलेले कार्यकर्ते. ह्यात रा स्व संघ व नक्षलवादी ह्या दोहींना सोडून समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी व गांधीवादी विचारांचे, कामगार संघटना, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि चळवळी-आंदोलने ह्या सर्वांमध्ये काम करणारे कार्यकर्ते, ज्यांच्यासाठी ह्यानं‘तर आपण अशी संज्ञा वापरली जाईल.

  वैकल्पिक माध्यमे म्हणजे साप्ताहिक ‘साधना’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘नवभारत’  ‘आजचा सुधारक’, ‘मिळून साऱ्याजणी’, ‘आंदोलन’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘बायजा’, ‘’प्रेरक ललकारी’, व ‘सगुणा’ ह्यासारखी नियतकालिके.

कार्यकर्त्यांना लेखन, वाचन व चिंतनाची गरज ह्यासाठी आहे की वैचारिक   स्पष्टतेचा अभाव आज खरोखरीच आहे. आपल्या साध्यांवर व साधनांवर   आपली पकड राहिली नाही. आज आपल्यासमोर अस्तित्वाचेच संकट उभे राहिले आहे आणि तरी आपण बेसावधच आहोत. उजव्या शक्तींचे आह्वान आपण समजूच शकलेलो नाही. पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर आणखी पाच वर्षांनी आपण असे उभे राहून बोलू शकू की नाही ह्याचीही शंका वाटते. कारण चळवळी व विचारप्रसारासाठी सर्वात प्रभावी मानले गेलेले माध्यम म्हणजे वैचारिक नियतकालिके , ही त्यासाठी कमी पडत आहेत.

पहिली गोष्ट अशी की कोणता विचार द्यायचा ह्याबाबतच आपल्या मनात संभ्रम आहे. आत्ता मी ज्यांची नावे घेतली ती सर्वच मुखपत्रे आहेत.. म्हणजे एक विशिष्ट विचारधारा, एखादा वाद, एखादे राजकीय पक्षाचे धोरण ठामपणे लोकांपुढे ठेवण्यासाठी निर्माण झालेली आहेत (अपवाद फक्त ‘आजचा सुधारक’चा. कारण ते कोणत्याही एका विचराला व चळवळीला बांधून घेतलेले मासिक नाही.) पण त्यांच्यात त्याच्याबद्दल स्वतः कडे पूर्ण अभ्यास, आजच्या परिस्थितीत हीच विचारसरणी तारून नेईल ह्याबद्दल ठाम एकमत, मांडणीचे व युक्तीवादाचे कौशल्य हे असले पाहिजे. तरच वेगवेगळ्या संकटांना ती (विचारसरणी) कशी उत्तरे पुरवते हे शैलीदारपणे उलगडून दाखवता येईल.  दुसऱ्या विचाराचे वा टीका/विरोध करणारे लेख आवर्जून प्रकाशित करून त्यांना संयमाने उत्तरे दिली पाहिजेत. आजचा सुधारक ने हे काम सातत्याने व चिकाटीने अनेक वर्षेपर्यंत केले हे मला येथे अभिमानाने सांगावेसे वाटते. शंका वा प्रश्न विचारण्यास कार्यकर्त्यांना उद्युक्त केले पाहिजे. आपल्या विचाराच्या काही मर्यादा असल्या तर त्या (आतल्या गटात तरी) मान्य केल्या पाहिजेत. अशा रीतीने वाचकांचा परिघ वाढवत नेला तर convincing the non convinced हे आपल्याला करता येईल. नाहीतर आजच्या वैचारिक वाङ्मयाला जे अगदी मिळमिळीत स्वरूप आले आहे, त्यातून काहीही साध्य होणार नाही. तसेच आपल्याला जी विचारसरणी मांडायची आहे, तिच्यामधील वेगवेगळ्या छटांचे तरी प्रतिबिंब त्यात पडते का? उदा. सर्वोदयाचे मासिक असले तर विनोबा – जयप्रकाश वादाबद्दल त्यामध्ये काही बोलले जाते का, हे पाहिले पाहिजे. वैचारिक माध्यमांमध्ये काहीतरी रसरशीत, चैतन्यमय असले तरच ते कार्यकर्त्यांना आकर्षून घेईल. केवळ मोठ्या लोकांच्या निधन वार्ता व मृत्युलेख देऊन ते होणार नाही.

विचारानंतरचा पुढचा मुद्दा व्यवस्थापनाच्या धोरणाचा आहे. काही नियतकालिके – जसे की आजचा सुधारक किंवा डाव्या चळवळीची काही मासिके धोरणानुसार फक्त मूठभर बुद्धीजीवींसाठी सुरु केलेली असतात. पण बाकीची वैचारिक माध्यमे ही तशी नाहीत. ती खुली आहेत व तसे असलेही पाहिजे. धोरण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत  पोहोचण्याचेच असावे. कारण अनेक व्यक्तींमध्ये कार्यकर्ता दडलेला असू शकतो व त्याला ते वाचून प्रेरणा मिळू सकते.

व्यवस्थपकीय धोरणाबरोबरच नियतकालिकांसाठी  बळकट आर्थिक व्यवस्थाही गरजेची आहे. त्याचा पहिला मार्ग म्हणजे नियमितपणे व काटेकोरपणे पुरेशी वर्गणी जमा करणे, त्यासाठी वर्गणी जमा करण्याची सोपी पद्धतही असली पाहिजे. मिळून साऱ्या जणी’ व  ‘परिवर्तनाचा वाटसरु’ ह्यांनी प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधी नेमला आहे. हेही सर्वांना शक्य होणार नाही. ऑनलाइन भरण्याची सोय हे त्यावर उत्तर असू शकते.

पत्रकारितेत, निधी उभारण्यासाठीचा पहिला मार्ग म्हणून जाहिरातींकडे पाहिले जाते. त्यावरही वैचारिक माध्यमांमध्ये बरीच भवति चालू आहे. त्यावर मला असे वाटते की जाहिरातींना पूर्णपणे नाही म्हणू नये. जाहिराती नाकारण्याचे धोरण त्यातून मिंधेपणा येऊ नये ह्यासाठी होते. तेव्हा ते न येऊ देता जाहिराती घेता आल्या तर घ्याव्यात. वैकल्पिक माध्यमांना स्वत:चा असा एक सूर, एक मूड, एक पावित्र्य असते. त्याला धक्का न लावता जाहिराती छापायला हरकत नाही. परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यासारख्या कमी खपाच्या मासिकांना जास्त जाहिराती मिळणार नाहीत, कारण जाहिरातदारांना जाहिरातीतून त्यांच्या त्या उत्पादनाता खप होऊन त्यातून परतावा अपेक्षित असतो. एकूण काय, तर हा निर्णय व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाने तारतम्यानेच घ्यायचा आहे. जाहिरातींच्याशिवाय देणग्याही घेता येतील. त्या फारतर ‘देणगी देणाऱ्यावर टीका करण्याचा आमचा हक्क अबाधित ठेवून आम्ही हिचा स्वीकार करीत आहोत’ अशा अर्थाचा करार करून स्वीकारता येतील. असे करण्यास काहीच हरकत नाही व अशा मार्गाने पैसे उभारणे फार कठीण नाही असे मला वाटते.

अर्थव्यवस्था उभारताना छापील माध्यामाता एक गुण आपल्या कामी येणार आहे.  छापील प्रतींची संख्या वाढवल्यावर त्याच प्रमाणात खर्च वाढत नाही. काही अंकांची छपाई झाली की पुढे फक्त कागद आणि मुद्रण ह्यांच्याच खर्च, व तो अगदी कमी येतो. (कितीही प्रती काढल्या तरी त्याचा तेवढाच खर्च होणारे नवीन मुद्रण तंत्रज्ञान आले आहे,  परंतु त्याचा प्रसार झाला नसल्यामुळे तो विचार येथे केलेला नाही.) त्यामुळे वर्गणीदार वाढविणे हाच सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. त्यासाठी अनेक चांगले उपाय योजता येतील. एकमेकांच्या मासिकांमध्ये आपल्या जाहिराती करणे हा त्यापैकी एक असू शकेल. आजीव वर्गणीदार ही गोष्टही पुढील काळात अवघड आहे.

वैकल्पिक माध्यमे निस्तेज होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रातील आंदोलनांचा जोर ओसरला. आज अंधश्रद्धा निर्मूलन व नर्मदा बचाव हीच दोन आंदोलने क्षीण स्वरूपात चालू आहेत. बाकी शेतकरी आंदोलन, स्त्रीमुक्ती आंदोलन, पुरुष संवेदनशीलता आंदोलन, दारूबंदी-व्यसनमुक्ती, मिल मजूरांचे, शासकीय कर्मचाऱ्यांचे ही सर्व आंदोलने, ज्यांना 60 -70 च्या चळवळीत लोक चळवळीचे स्वरूप आले होते. ती आता दिसत नाही. ती दाहकता आता त्यांच्यात उरली नाही. त्यामुळे त्या चळवळींना शब्द, परिभाषा, शैली व साहित्य पुरवणाऱ्या मासिकांना उतरती कळा लागली आहे. आजच्या तरुणांना चळवळीचा इतिहास माहित नाही. आजची भांडवलशाही त्यांना वेगळी सुखाची स्वप्ने दाखवित आहे. ती स्वप्ने अगदी जवळ असल्याचा आभास निर्माण करीत आहे. त्यामुळे आपण कोणत्या व्यवस्थेचा भाग आहोत, ती आपल्यावर व इतरांवर – विशेषतः खालच्या वर्गावर कसा अन्याय करते आहे, आपण आपली तरुणाई पणाला लावून ती व्यवस्था बदलू शकतो, तसे करण्याचा अधिकार  आपल्या काळांनेच आपल्याला दिला आहे, ह्याची त्यांना कल्पना नाही. या तरुणांच्या विचार पद्धतीचा फटकाही आजच्या वैकल्पिक मासिकांना बसतो आहे.

वाचक वर्गाचे व्यवस्थापन – म्हणूनच शहरतील सवर्ण, सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित वर्ग – मग तो प्राध्यापक का असेना – जो आता आता पर्यंत आंदोलनांचा व वैचारिक मासिकांचा आश्रयदाता होता, तो याच्यानंतर तसा राहणार नाही. या उलट निमशहरी, तालुक्याच्या ठिकाणी असलेला नवसाक्षर वर्ग, तरुण वर्ग, जो परिवर्तन घडवून आणायला इच्छुक आहे, ज्याच्याकडे ती प्रेरणा आहे, तोच त्यांचा पुढील काळातील आश्रयदाता राहणार आहे. अर्थात, इथेही एक गोची आहे. ती अशी आहे की त्यांनाही आजची भांडवलशाही स्वप्ने दाखवित आहे, प्रलोभने दाखवित आहे, ती त्यांच्या फार जवळ नसली, तरी आवाक्यात आहे. ती हस्तगत करण्याचा मार्ग आपण ज्याला व्यवस्था बदल किंवा समाज परिवर्तन म्हणतो, त्यापेक्षा फार वेगळा, किंबहुना विरुद्ध दिशेचाच आहे. तरी देखील त्या तरुण वाचक वर्गाला – त्यातही विशेषतः तरुणींना – मोठ्या कौशल्याने व कष्ट पूर्वक आपल्याकडे वळवून घ्यावे लागणार आहे. ग्रामीण भागातील तरुणी हा येत्या काळातील फार महत्वाचा क्षम  वाचक वर्ग आहे. कारण त्या पुढील काळातील परिवर्तनाच्या वाहक आहेत. लक्ष्यित वाचक वर्ग म्हणून स्त्रियांचा विचार आजपर्यंत कोणत्याही नियतकालिकाने केलेला नाही.  वैकल्पिक माध्यमांनी तो जाणीवपूर्वक केला पाहिजे.

भाषा – वाचक वर्ग डोळ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोलावे लागणार आहे ते उघडच आहे. त्यांना समजेल, आवडेल, पचनी पडेल असे शब्द, अशी भाषा, अशी शैली जाणीवपूर्वक घडवून तिचा वापर करावा लागेल. याचा अर्थ भाषेचे सुलभीकरण नव्हे. मी मुळीच त्याच्या बाजूची नाही, उलट विरोधातच आहे. मुद्दा असा, की भाषेचा फापटपसारा न मांडता कमी शब्दात, ओघवत्या व निश्चितार्थक भाषेत मांडले, तर तिला भारदस्तपणा व डौल प्राप्त होतो. अशी भाषा विचारांना उत्तम प्रकारे वाहून नेऊ शकते. भोंगळ व ढिसाळ भाषा हे काम करू शकणार नाही. ती पैलू पाडलेली, सुंदर, सुघटित हवी. त्याचप्रमाणे व्याकरण व लेखन वाचनाचे नियम हे पाळलेच पाहिजेत. जेवढ्या प्रमाण भाषेत आपण लिहू, तेवढी वाचकांच्या वाचनाची गती वाढेल. व त्यांना वाचनाची सवय लागेल. तर, चांगली भाषा वाचण्याची सवय आपल्या वाचकांना लावणे हेही एक कठिण आव्हान आपल्यासमोर आहे. इंग्रजी लिहिताना स्पेलिंग व व्याकरण याबद्दल आपण जेवढे जागरूक असतो, तेवढे मराठीबद्दल असत नाही. यातून, “आम्हाला कसले आलेत नियम?”, असा न्यूनगंडच आपण व्यक्त करीत नाही का? हा गंड पुढील पिढीकडे संक्रमित होऊ नये म्हणून प्रमाण पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे. लेखन व मुद्रण हे लेखांकन (documentation) आहे, ते पुढे बराच काळ टिकून राहणार आहे, वाचले जाणार आहे, त्यामुळे ते प्रमाण भाषेत व उत्तम शैलीतच लिहिले गेले पाहिजे.

या माध्यमांचे लेखक हे थोर विद्वज्जन वा विचारवंतच नव्हे तर कार्यकर्ते व इतर सर्वसामान्यही राहणार आहे. तेव्हा त्यांचे अनुभव, त्यांच्या अडचणी व समस्या, त्यावर त्यांना सुचणारे उपाय  इ. गोष्टी त्यांच्याकडून लिहून घेतल्या पाहिजेत. पण त्याही चांगल्या भाषेतच लिहून घ्याव्यात, अन्यथा संपादकाचे काम फार वाढते. येथून आता आणखी एक मुद्याकडे वळावे लागेल. आजच्या वैचारिक मासिकांचे संपादन. अनेक मासिकांमध्ये आज मजकूर जसा आला तसाच, संपादकीय संस्कार न करता सरळ छापला जातो. हा शुध्द गलथानपणा आहे. ह्याने वाचकवर्ग कधीच आकर्षिला जाणार नाही. चिंतन व मनन तर दूरच राहीले. काही ठिकाणी तर इतकी ढिसाळ भाषा वाचनात येते की लेखकाला काय म्हणायचे आहे. तेच कळत नाही. आजची मराठी वर्तमानपत्रे, टिव्हीवरील मराठी शीर्षके ही गलथानपणात अग्रेसर आहेत. पण आपण तसे करू नये. महाराष्ट्राला उत्तम लेखक व पत्रकारांबरोबरच उत्तम संपादकांचाही परंपरा लाभली आहे. ती टिळक आगरकरांपासून सूरू होते. साने गुरूजी, श्री. पु. भागवत, अरूण टिकेकर हे सर्व त्या परंपरेचे पाईक आहेत. संपादन म्हणजे लेखकाकडून आपल्याला हव्या त्या विषयावर लिहून घेतल्यावर अलगद मायेचा हात फिरवून म्हणजे कमीत कमी वदल करून वाचकांना समजेल व नियतकालिकाच्या चौकटीत बसेल अशा रूपात मजकूर सादर करणे. हे एक वेगळे कौशल्यच नाही, तर कला आहे. आज त्याला प्रतिष्ठा राहिली नाही, अन्यथा आपली परंपरा इतकी विस्मृतीत जाती ना. पण आपण ती पुन्हा मिळवून द्यावी. काही कार्यकर्ते, आपण फक्त काम करणारे, लिहिणे हे दुसऱ्याचे काम असे मानतात. पण हा विचार योग्य नाही. डायरी हा कार्यकर्त्याच्या आयुष्याचा भाग असतो.

रंजकता – आपल्या माध्यमांमध्ये रंजकता कशी आणावी ह्याचाही विचार होणे आवश्यक आहे. तात्विक वा बौद्धिक चर्चा ही लांब तोंड करूनच करायची असते असा पूर्वी एक समज होता. आजचा सुधारकच्या सुरुवातीच्या काळात विवेकवाद्यांना हसताही येते का? अशा शीर्षकाचा लेख आला होता. आता तर काही तसा समज नाही, आणि असला तरी आपण तो बदलला पाहिजे. व्यंग्यचित्रे, रेखाचित्रे, छायाचित्रे, परिपूरके, मुखपृष्ठ ह्या सगळ्याकडे लक्ष देऊन रंजकतेचे मूल्य वाढवत नेले पाहिजे.

तंत्रज्ञान – इलेक्ट्रॉन माध्यम हे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम आहे. त्याच्या गतीशीलतेसाठी त्याचा वापर करायलाच पाहिजे. माहितीचे तुकडे भराभर इकडेतिकडे फिरवण्यासाठी व ते लोकापर्यंत पोहोचवून त्यांचे मत बनविण्यासाठी वा बदलण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. एकच गोष्ट वेगवेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा सांगून ठसा उमटविण्यासाठीही त्याचा उपयोग करतात. आपणही त्याचसाठी तो केला पाहिजे. कार्यकर्ता हा अनेकदा एकाकी असतो. त्याला कुटुंबाचा वा मित्रमंडळीचे पाठबळ असतेच असे नाही. हे इथे जमलेल्या आपणा सर्व कार्यकर्त्यांना माहित आहे. तेव्हा त्यांना कायदेशीर वा आवश्यक असेल अशी अन्य तांत्रिक माहिती देणे, अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याला सहानुभूती वा धीर देणे, वेगवेगळ्या संस्था-संघटना-गावामध्ये विखुरलेल्या कार्यकर्त्यांना  एका सूत्रात गोवून त्यांच्यात बंधुभाव निर्माण करणे ह्यासाठी इंटरनेट व सोशियल नेटवर्कचा उपयोग करून घेता येईल. त्यातूनच आपल्या पाठीशी अनेक लोक आहेत असा दिलासा कार्यकर्त्यांना वाटू शकतो आणि त्याने मन शांत होऊन तो लेखन-वाचन-चिंतनाकडे वळू शकतो. म्हणून प्रत्यक्ष वैकल्पिक माध्यम म्हणून नसले तरी त्याला पूरक म्हणून इंटरनेट व तत्सम माध्यमांचा वापर होऊ शकेल.

आजची वैकल्पिक माध्यमे, कार्यकर्त्यांना वाचन-चिंतन-मननास उद्युक्त करण्यास कमी पडत आहेत. त्यांनी अधिक चैतन्यपूर्ण बनून वाचकवर्ग कसा आकर्षित करावा यासंबंधीचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडले. कुठलीही जाहिरात न घेता वा कुठल्याही विचारसरणीस बांधून न घेता गेल्या पंचवीस वर्षापासून केवळ विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या आजचा सुधारक ह्या मासिकाचे मॉडेल एक पर्याय म्हणून आपल्यापुढे ठेवायचे आहे. ह्यात हेच सर्वोत्तम असल्याचा दावा नाही, पण ह्या मॉडेलचा विचार ह्वावा अशी इच्छा आहे. नागपुरातील एक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दि.य. देशपांडे ह्यांनी, आपल्या तेजस्वी लेखक व उच्चविद्याविभूषित पत्नी प्रा. म. गं. नातू ह्यांचा पहिल्या स्मृतिदिनी 1990 साली आजचा सुधारकची मुहूर्तमेढ रोवली. पहिली आठ वर्षे तेच संपादक होते. त्यानंतर मुख्यतः त्यांनी ठेवलेल्या ठेवीमधूनच आजवर आजचा सुधारकचा प्रपंच चालला आहे. आजीव वर्गणीदार सुरुवातीच्या काळात केले. वार्षिक वा त्रैवार्षिक वर्गणी स्वीकराली. लेखक संपादकांना मानधन नाही. आज हे कुणाला कालबाह्य वाटेल, परंतु अशा रीतीने ते चालले व आजही, वाचक वर्ग कमी असला तरी महाराष्ट्रातील वैचारिक मासिकांमध्ये निष्पक्षपातीमुळे त्याचा क्रमांक बराच वरचा लागतो. सुरुवातीच्या काळात धर्मादि विषयांचा तात्विक चिंतनावर भर होता. आता नैतिक  अनैतिकतेच्या योग्यायोग्यतेच्या चर्चेस प्रवृत्त करतील असा कोणत्याही विषयावर वादविवाद किंवा विमर्श केला जातो – मग तो शेती असो, शिक्षण असो वा भाषाव्यवहार. अशा रीतीने वैचारिक मासिक चालविणे सहज शक्य आहे हे मी संपादनकाळातील माझ्या अनुभवावरून आपणा सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते. तेव्हा पैसे, व्यवस्थापन, भाषाशैली ह्या सर्वांचा विचार अवश्य करावा, परंतु बाऊ करू नये. कारण मेंदूतील विचार व अंतःकरणातील तळमळ ह्या सर्वापेक्षा जास्त महत्वाची आहे. तेव्हा आपण सर्वांना सुयश चिंतिते व ह्या मासिकाकडून वैकल्पिक माध्यमांना प्रेरणा मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करून मी आटोपता घेते.

 (दि. 10 व 11 जानेवारी 2015 रोजी धुळे येथील साम्ययोग साधनाच्या हीरक महोत्सवप्रसंगी वरील विषयाचियी परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून केलेले भाषण.)

anumohoni@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.