माझे मनोगत……

भारतीय वैदिक तत्त्वज्ञानात सहा प्रमुख दर्शने मानली आहेत. ती अशी :

(१) सांख्य, (२) वैषेशिक, (३) पूर्वमीमांसा, (४) न्याय, (५) योग आणि (६)वेदान्त (उत्तरमीमांसा हा वेदान्ताचाच भाग आहे.)

त्यांपैकी पहिली तीन संपूर्णपणे निरीश्वरवादी असून त्यांचे प्रणेते अनुक्रमे कपिल महामुनी, महर्षी कणाद, आणि आचार्य जेमिनी हे तिघेही महान तत्त्ववेत्ते आणि विचारवंत म्हणून गणले जातात. न्याय आणि योग ह्या दर्शनांचेविषय वेगळे असून “ईश्वर” हा त्यांच्या चर्चेचा विषय नाही. काही अनुषंगाने ईश्वराचा उल्लेख आला असेल तेवढाच. एका परीने न्याय आणि योग ही दोन्ही दर्शने ईश्वराच्या बाबतीत “उदासीन” आहेत.

परंतु सर्वसाधारण जनांमध्ये पहिल्या पाच दर्शनांची चर्चा सहसा होत नाही. बहुतेकांना तर त्या पाच दर्शनांची नावेसुद्धा ठाऊक नसतात. सहाव्या वेदान्त दर्शनाचा मात्र सगळीकडे खूप उदो उदो होतो. ब्रह्म, परब्रह्म, या संकल्पनांची वेदान्त दर्शनात विस्तृत चर्चा असून त्याचाच डांगोरा पिटला जातो. उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे (प्रस्थानत्रयी) हे शब्द ठाऊक नसलेला वैदिक मताभिमानी शोधूनही सापडणार नाही. ह्याचे प्रमुख कारण आहे प्रापंचिकांची ईश्वरविषयक मान्यता.

“ईश्वर” अथवा “देव” ही संकल्पना अनेक गोटांमधून, अनेक स्तरांवरून, अनेक दृष्टिकोनांतून चर्चिली जाते. जगात असंख्य संप्रदाय आहेत. प्रत्येक संप्रदायाचे लोक आपापल्या चष्म्यातून देवाकडे पाहातात आणि त्यांना जे रूप दिसते तेच खरे मानतात. वेगवेगळे तत्त्वज्ञ, विचारवंत, दार्शनिक, वेगवेगळ्या उपपत्ती मांडून ह्या संकल्पनेला आकळण्याचा प्रयत्‍न करतात.(त्यापैकी बरेचसे देवाचे असित्व नाकारतातही.) सृष्टीची निर्मिती वा उत्पत्ती, तिचे संचालन वा चरितार्थ हा सर्व विचारवंतांच्या तसेच प्रतिभावंत तत्त्ववेत्यांच्या (ह्यात वैज्ञानिकही आहेत.) नेहमीच कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे. सर्वच जण आपापल्या परीने निष्कर्ष काढून जगापुढे मांडीत असतात.

जैविक उत्क्रांतीसाठी पायाभूत असलेल्या , “आहार-निद्रा-भय-मैथुनं च।” ह्या नैसर्गिक चौकटीत वावरणार्‍या सर्वसामान्य मानवाला–जो समाजाचा सर्वात मोठा घटक आहे, किंबहुना तोच खरा समाज आहे– त्याला ह्या तात्त्विक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसते. प्रपंचाच्या रामरगाड्यात त्याला विचार करायला तेवढा वेळही नसतो. प्रपंचातील अस्थिरता आणि अनिश्चितता ह्यांना तोंड देता देता मेटाकुटीस आलेला सामान्य माणूस ह्या मूठभर द्रष्ट्या तत्त्वज्ञांना दुरूनच नमस्कार करतो. त्याचा जवळून नमस्कार घडतो तो त्याला कळणार्‍या “देवाला.” आणि हा देव आहे “उपासनेचा” देव. त्याचा भाबड्या समजुतीप्रमाणे हा देव त्याची प्रार्थना ऐकतो. पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, अभिषेक-अनुष्ठान, आदींनी प्रसन्न होतो. जप-तप, उपास-तापास इत्यादींनी संतुष्ट होतो. नवसाला पावतो. पापविमोचन करतो. थोडक्यात म्हणजे सर्व प्रकारचे चमत्कार घडवितो. भक्ताच्या प्रापंचिक अडचणी दूर करतो. संकटप्रसंगी पाठीशी उभा राहतो.संतती-संपत्तीचे रक्षण करतो. सामान्य प्रापंचिकास अशा-काल्पनिक का होईना-देवाचा मोठा आधार वाटतो. त्याच्या दृष्टीने असा देव खराच असतो.

वास्तविक जगातील सर्व व्यवहार निसर्गनियमांनुसार घडत असतात. प्रत्येक घटितामागे कुठला ना कुठला तरी निसर्ग नियम असतोच. ह्या नियमांचे उल्लंघन कुणीच करू शकत नाही. पण प्रापंचिकाची अशी एक मानसिकता बनलेली आहे. नित्याच्या व्यवहारात वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्राशासनिक कार्यालयांमध्ये जाण्याचे प्रसंग येतात. प्रत्येक प्रशासनाचे ठरलेले नियम असतात. त्यांचे उल्लंघन न होणे अपेक्षित असते. परंतु तरीही उल्लंघने होत असतात. प्राशासनिक नियम बाजूल सारून, रांग मोडून (आऊट ऑफ वे जाऊन ) व त्यासाठी काही मोबदला घेऊन अडलेली कामे करून देणारे “कुणीतरी” असते. प्रापंचिकांना ह्याची सवय झालेली असते. हीच ती बनलेली मानसिकता.

मानवी राज्याप्रमाणे निसर्गाच्या राज्यातही नियमांमध्ये अशी ढवळाढवळ करणारे, Out of the way जाऊन कामे करून देणारे “कुणीतरी” आहे असे ते गृहीत धरतात. हे कुणीतरी म्हणजे अर्थातच कल्पनेच्या विश्वातील देव. कसल्यातरी मोबदल्यात तोही आपल्या सांसारिक अडचणी दूर करील , सर्व इच्छा ,सर्व मन:कामना पूर्ण करील अशी त्यांची ठाम धारणा असते. पूर्वापार “चालत” आलेल्या परंपरा, चालीरीती रूढी, संस्कार ह्यांमुळे ही धारणा अधिकाधिक दृढ होत जाते. आणि पुढे तर अढळ होऊन बसते.

सर्वसामान्य प्रापंचिक हा एक प्रकारच्या वैचारिक आळसामुळे चिकित्सक वृत्तीला पारखा झालेला असतो. तर्कबुद्धीशी त्याचा संबंध आलेला नसतो. त्यामुळे तो परंपरेने चालत आलेल्या गोष्टी तशाच, म्हणजे विचार न करता चालू ठेवतो. कल्पनेने गृहीत धरलेल्या देवाला “हाताशी ” ठेवण्यासाठी पूजा-अर्चा, जपतप, उपास-तापास, इत्यादि नित्य, तर अडीअडचणीच्या वेळी हाक मारण्यासाठी व्रत-वैकल्ये , अभिषेक-अनुष्ठाने, ग्रहशांती, वास्तुशांती, नवस-सायास, इत्यादि नैमित्तिक कर्मकांडे करीत असतो. हे सर्व असेच चालत असते हे त्याच्या मनात ठसलेलेच असते. उलट कुणी शंका घेतली तर त्याचा त्याला विस्मय वाटतो.

पण त्यांच्यातील काही विचारवंतांना मात्र कुठेतरी “खटकते.” परंपरेने चालत आलेले हे सर्व सोडण्याचे धैर्य त्यांच्या ठिकाणी नसले तरी त्यांच्या मनात खोल कुठेतरी एक सल असते.आपण आपल्या सहायकर्त्या देवाला वेठीस धरीत आहोत, त्याला कार्यालयातील एका बाबूच्या पातळीवर आणून त्याचे अवमूल्यन करीत आहोत, त्याच्याबरोबर विनिमय करीत आहोत अशी अपराधाची भावना खात असते. एक खंत मनात घर करून असते. असे लोक मग आपल्या ईश्वराला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी वेदान्ताचा आधार घेतात. त्यांचा देव आता विश्वनिर्माता, जगच्चालक, चराचर व्यापणारा, विश्वंभर होतो. वेडा कुंभार, अदृश्य विणकर, इत्यादि लडिवाळ विशेषणांनी त्याला गौरविले जाते. मानवी भावविश्वात कुठे काही “उत्तम, उदात्त, उन्नत” आढळले की ते “दैवी” ठरविले जाते. “मातृदेवो भव।, पितृदेवो भव।, देश हा देव असे माझा।, ” अशी भावस्पर्शी विधाने रूढ होतात. तर कांही प्रतिभावंत तत्त्ववेत्ते ह्या ईश्वराला आणखी उच्चस्तरावर नेऊन ब्रह्म, परब्रह्म, निर्गुण, निराकार, पूर्णब्रह्म, चित् शक्ती, इत्यादि शब्दांच्या फुलोर्‍याने सजविलेल्या मखरात प्रतिष्ठित करतात. वेदान्तदर्शनामधील श्लोकांचे सोयीप्रमाणे अर्थ लावून लोकांपुढे मांडतात. कीर्तन-प्रवचनांतून शब्दांचा गदारोळ उठवितात. सामान्य माणसाला यातले काही कळत नसते. त्याच्यासमोर उलगडलेल्या सर्वच अर्थांना तो आपला भाबडेपणाने मान डोलावतो. बुद्धिमान आणि प्रतिभावंत तत्त्ववेत्ते मग अशाप्रकारे परमेश्वराच्या ऋणातून मुक्त झाल्याच्या, अपराध पुसून टाकल्याच्या भावनेने कृतकृत्य होत्साते फिरून मूळपदावर येऊन ,”केशवाय नम:। माधवाय नम:।” करायला मोकळे होतात. सामान्य प्रापंचिक तर या शब्द सरितेत न्हाऊनही कोरडेच राहातात. असे हे वेदान्तदर्शनाचे माहात्म्य!

bhalchandra.kalikar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.