त्रुटित जीवनी..

जनतेच्या मनावर नियंत्रण मिळवण्याकरिता दरवर्षी हजारो कोटी खर्ची पडत असतात. काय घडत आहे यापासून सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते आणि याची त्यांना जाणीवदेखील नसते.”

– नोम चोमस्की

व्यक्ती व नाती दोन्हींचं वस्तुकरण झाल्यामुळे आपल्याला कुणाशीही जोडून घेण्यासाठी (कनेक्ट) उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. बाजारपेठेत आपल्या मूल्यात वृद्धी कशी होईल, या काळजीनं सगळे ग्रासून गेले आहेत. घरापासून दारापर्यंत, संस्थेपासून यंत्रणेपर्यंत उदारतेची हेटाळणी, सहिष्णुतेची नालस्ती व करुणेची अवहेलना वृद्धिंगत होत आहे. जिव्हाळा आटत जाऊन वरचेवर परिपूर्ण शुष्क (सॅच्युरेटेड ड्रायनेस) होत चाललेल्या वातावरणात संवेदनशीलतेची ससेहोलपट होत आहे. अशा परिस्थितीत सभोवतालच्या असंख्य घटनांचा अन्वय लावणं हे अतिशय यातनादायक असतं. कारण त्यातून आगामी काळाची चाहूल लागते आणि ती जीवघेणी असते. नंदा खरे यांनी कमालीच्या अस्वस्थेतून वर्तमानाचा वेध घेत ‘उद्या’ या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी विशाल पट सादर केला आहे. ललित, वैचारिक, कथा, कादंबरी हे सारे भेद पुसून त्यांचा संगम घडवला आहे.
‘उद्या’ हा आजपासून अगदी तीनशे वर्षे पुढे एवढा सैल आहे. या कालावधीत सुदीप जोशी, अरुण सन्मार्गी, सच्चिदानंद भाकरे, सानिका धुरू या प्रमुख पात्रांच्या आयुष्यावर आळीपाळीने झोत टाकला जातो.
आयआयटी, एमआयटी, यूपीएससी मार्गे सायबर क्राइम आयुक्त झालेला अरुण सन्मार्गी अभिव्यक्ती व वर्तन विश्लेषक आहे. राग आणि ताण याविषयी अभ्यासाच्या विशेष गटात राहून त्यांनी चेहरेपट्टीत होणारे बदल ओळखणारे संगणक प्रोग्रॅम तयार केले. त्यांची बायको अनू वर्तणूक अर्थशास्त्रज्ञ असून दोघेही झपाटय़ानं वरच्या श्रेणीत जात आहेत.
सुदीप जोशी हा महिकादळ या मुंबईतील एका प्रमुख पक्षाच्या संघटनेच्या दादाचा लेखनिक आहे. शिकलेला असल्यामुळे त्याला दांडगाई जमत नाही. मांडवली करण्यात मात्र तो तरबेज होतो.
सच्चिदानंद भाकरे, अमरावती जिल्ह्य़ातील तीनखेडा गावात मुख्याध्यापक होता. नायब तहसीलदार, गावातील आमदाराचा दलाल, नगरसेवक आणि सच्चिदानंद यांनी मिळून २०-२० ही संघटना काढली. युवकांना रोजगार मार्गदर्शन करण्यापासून सुरुवात झाली. मग टीपीएल (तीनखेडा प्रीमियर लीग) भरवणे, वधुवर सूचक मंडळ, ओळखपत्र काढणे, ज्यूडो-कराटे शिकवत अश्रुधुराचे डबे व तिखट विक्री अशा नानाविध सेवा सुरू झाल्या. मध्यमवर्गीय र्पाश्र्वभूमी असलेली सानिका धुरू ही Round & About या ई-वृत्तपत्राची वार्ताहर आहे. उच्चपदस्थांशी सलगी, सत्तावर्तुळातील संपर्क आणि प्रचारार्थ (लॉबिइंग) लिहून पदांच्या शिडीवर कुठेही उडी घेता येते. अशा काळात सानिका एकोणिसाव्या शतकातील ध्येयवादी पत्रकारिता जपण्याची आकांक्षा बाळगून आहे. प्रचारकांचा उद्देश ओळखून त्यांची बातमी तशी होऊ न दिल्यामुळे सानिकाला वाळीत टाकलं आहे. नक्षलवादी भागात जाण्याची शिक्षा मिळाली आहे. अतिशय खडतर जीवन असूनही निसर्गसान्निध्यातील साध्या, सरळ लोकांत सानिका रमून जाते.
प्रमुख पात्रांमुळे पोलीस यंत्रणा व शाही नोकर, कंत्राटदार व राजकीय पर्यावरण, माहिती व जैवतंत्रज्ञांची दुनिया, कॉर्पोरेट विश्व, स्वयंसेवी जगत यामधील संबंध लक्षात येतात. बारकाव्यानिशी ग्रामीण व आदिवासी भागातील जीवन समजते. एकंदरीत गावापासून महानगरांपर्यंत, शेतीपासून हॉटेलपर्यंत, शिक्षणापासून विजेपर्यंत, कोणत्याही मार्गाने कुठेही गेलं तरी, देशाचा बहुतांश अर्थव्यवहार काबीज केलेल्या ‘भरोसा’ व ‘विकास’ या दोन उद्योगसमूहांपर्यंत आपण जाऊन पोहोचतो. वाहतूक, बांधकाम, ऊर्जा असे महत्त्वाचे सगळे उद्योग दोघांच्याच ताब्यात आहेत. या दोन उद्योगांची आपसांत अजिबात स्पर्धा नाही. भरोसा आणि विकास यांनी मुंबईमधील वाहतूक-वसाहत योजना बनवली. सर्व स्टेशन्सची वाटणी करून घेतली. प्रत्येक स्टेशन्सभोवती ४० मजली इमारती झाल्या. रस्त्यावर बस आणि मोटारगाडय़ांसाठी वेगळी सोय झाली. सत्ताकेंद्राभोवती फिरणाऱ्या विविध कक्षातील सर्व तऱ्हेच्या प्रवृत्तींना प्रसन्न करून घेतलं. ”सगळे केंद्र-राज्य मंत्री, संसद, विधानमंडळ, विद्यापीठं, चॅनेलवाले, पेपरवाले, एनजीओज, युनियन्स, चेंबर्स, कुत्री, मांजरं सगळ्यांना खूश केलं. मग दादर-विकास, दादर भरोसा, सक-सँक चर्चगेट अशी नावं झाली आहेत,” असं मर्म नंदा खरे सांगतात.
आता पाच कोटींच्या महामुंबईत केवळ दोन कोटी महिला आहेत. स्त्री जातीच्या आबालवृद्धेस संध्याकाळी एकटय़ानं बाहेर पडणं अशक्य आहे. नोकरदार महिलांना स्टेनगनधारी रक्षक सोबत द्यावा लागतो. तरीही रोज दहा-पंधरा बलात्कार होतात. संघटित टोळ्यांनी जागांचे सुभे वाटून घेतले आहेत. त्यांना व पोलिसांना योग्य ती किंमत मोजून शांतता व सुरक्षितता विकत घ्यावी लागते.
समस्त नागरिकांचं खासगीपण पूर्णपणे संपुष्टात आलं आहे. सर्वत्र कॅमेऱ्यांची नजर आहे. मोबाइल, संगणकावरील संभाषणांवर पाळत ठेवली जात आहे. असंख्य सर्वेक्षणातून ग्राहक स्वत:हूनच त्यांची आवडनिवड सांगून टाकतात. (विविध प्रकारांनी माहिती मागण्याला लेखक ‘तंबूतील उंट’ संबोधतात.) समस्त ग्राहकांनी दिलेल्या माहितीचं आणि दुकानातील हालचालींचं कसून विश्लेषण करण्यासाठी अनेक ज्ञानशाखांचे शास्त्रज्ञ तयार असतात. दूरचित्रवाणीवरील जाहिराती, मालिका व चित्रपटांतून नकळत मतं तयार केली जातात. अधिक वावर असणाऱ्या ठिकाणी महाग वस्तू ठेवाव्या तर पसे देणाऱ्या रांगेजवळ अनावश्यक व माफक किमतीच्या जिनसा असाव्यात. सवलतीच्या दराला भुलवून गरज नसलेल्या वस्तू खपवाव्यात, याची चोख व्यवस्था मॉलवाले करीत आहेत. सरकार व कॉर्पोरेट्स लोकांच्या आयुष्यात सहज डोकावत आहेत. तेलंगण, विदर्भ, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या जंगलांनी व्यापलेल्या भागातच अमाप खनिजसाठे असल्यामुळे सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना ताबा हवा आहे. पर्यावरणवादी, आदिवासी व उद्योग असा संघर्ष चालू आहे. ”सच्ची अमिरी तीन चीजों से आती. मिनरल्स, लॅण्ड अँड गव्हर्नमेंट काँट्रॅक्ट्स! टाटाज, अंबानीज, मित्तल, डी-बिअर्स ऑल आर हंग्री फॉर सबसॉइल. ताजमहलच्या खाली तेल सापडलं तर .. द बगर्स विल डिस्ट्रॉय द ताज ” भूगर्भशास्त्राचा अभ्यासक व टाकून दिलेला पत्रकार सानिकाला सांगतो. चारगाव, गोविलगड, नागोठणे या गावांतील आदिवासींमध्ये राहून त्यांचं जीवन सानिका समजून घेतेय. त्यांचं वनस्पतींचं ज्ञान, हातमागावरील सुंदर वस्त्रनिर्मिती, कुशल धातूकाम हरखून पाहतेय.
जगातील शेती संशोधन ते धान्य वितरण हा भार दोन-तीन कंपन्या उचलत आहेत. ‘मोन्सागिल’ ही जगातील सगळ्यात मोठी शेती संशोधन करणारी कंपनी बियाणं, खतं, कीटकनाशकं, तणनाशकं, पक्ष्यांना दाणे आवडू नयेत यासाठीची औषधं तयार करीत आहे. कोणत्याही गावात वापरलेलं बियाणं ‘मोन्सागिल’चं नाही हे सिद्ध करण्यासाठी त्या गावावर दबाव येतो. तसा तो चारगाववर आहे. त्याला न जुमानल्यामुळे ‘मोन्सागिल’ व चारगाव हे सतत हातघाईवर येत आहेत. मूठभर आदिवासी त्यांची राहणी जगतात. नक्षलवादी त्यांच्या भागात सरकारला येऊ देत नाहीत. सशस्त्र चकमकी चालू राहतात. या खनिजसंपन्न भागात सानिका आली आहे. त्यासंबंधी खरे भाष्य करतात- ”खनिज संसाधनांमधून शासक-प्रशासकांच्या हातात सहज श्रीमंती येते. विपुल नसíगक साधनं असणं हा त्या प्रदेशाला शाप ठरतो. सुबत्तेमधील शासक आणि गरीब प्रजेमधील दुरावा व ताण वाढतो. प्रशासनातील वेगवेगळी खाती व विभाग यांच्यात श्रीमंतीच्या वाटपावरून वाद होतात. दुर्बळ सहजश्रीमंत देश शेजारच्या बलवान देशांना भक्ष्यणीय वाटू लागतो. आफ्रिकेतील संघर्ष, इराकभोवतीची युद्धे या स्वरूपाची आहेत.” लेखक, विविध प्रसंगांमागील नेमके अर्थ-राजकारण व भू-राजकारण स्पष्ट करतात.
कादंबरीत सातत्यानं अनेक पात्रांच्या तोंडून मूल्यवृद्धीचा धोषा ऐकायला मिळतो. आर्थिक मूल्यवृद्धीभोवती अवघं जग फिरत आहे. नीतीवाचक मूल्यं कधीच अडगळीत गेली आहेत. मला अधिकाधिक स्वातंत्र्य हवंय. हा सर्वाचा बाणा आहे. समता आणि बंधुता यापासून कधीच फारकत घेतली आहे, हे खरे वारंवार अधोरेखित करतात. परंतु, सध्या लहानपणापासून ‘जबरदस्त संपत्ती मिळते ते उत्कृष्ट करिअर’ हेच बोधामृत कानी पडत जाते. आता हे समीकरण यच्चयावत तरुणांच्या मनामध्ये घट्ट रुतून बसले आहे. शिक्षण, नोकरी असो वा व्यवसाय, कोटी कोटींनी घर भरावे हेच एकमेव लक्ष्य असते. महिन्याला पगार सहा आकडी, परंतु कामाचे तास २४x७x७! या फेऱ्यांतून समाधान, शांतता मिळणार तरी कशी? कामातून सर्जनशीलतेचा आनंद नाही. नावीन्यतेचा लवलेश नाही. नालस्ती, उखाळ्यापाखाळ्या हेच रंजन! काव्य, शास्त्र, विनोद, गप्पा, सामाजिक कणव या कशालाच वेळ नसणाऱ्या आयुष्याला सुसंस्कृत म्हणता येईल? असा मूलभूत प्रश्न खरे यांनी उपस्थित केला आहे. कादंबरीतील अरुण, सुदीप, सच्चिदानंद या सगळ्यांनाच झपाटय़ानं मूल्यवृद्धी करून घ्यायची आहे. ती सहजासहजी होत नाही. त्यासाठी किंमत मोजावी लागते. सर्व जाती-जमातींमधील सर्व स्तरांवरील रहिवाशांची ‘किंमत’ चुकवायला भरोसा-विकास सदासर्वकाळ तयार आहेत. भरोसा-विकासाच्या कामांमुळेच शिक्षण, रोजगार, नियोजन कोणत्याही मंत्रालयाचा कार्यालयीन खर्च भागवला जातो. भारत सरकारच्या कार्यालयातील ६०-७० टक्के लोक थेट किंवा आडून भरोसा वा विकासाचे लाभार्थी असतात. सरकारी खाती आणि कॉर्पोरेशन्स यांच्यात फिरते दरवाजे आहेत. आज संरक्षण खात्यातील सहसचिव उद्या विकास-हांडात दक्षिण आशियाचा निदेशक होतो. आज भरोसा जनरल मोटर्सचा डेव्हलपमेंट मॅनेजर उद्या संरक्षण सचिव होऊ शकतो. भाषा असो वा विज्ञान, मानव्यशास्त्र असो वा खगोलशास्त्र, सर्व क्षेत्रांतील बुद्धिमंत त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. देश-परदेशातील विविध कार्यशाळा ‘तेच’ घडवून आणतात. म्हणेल तेवढा पगार, सर्व सुविधा, वाटेल तिथे वास्तव्य, मुलांच्या शिक्षणाची सोय थोडक्यात ‘जे जे वांछील ते ते’ देण्याची ‘त्यांची’ तयारी असते. सर्व सुखे पायाशी लोळण घेतात, त्यावेळी तुमचा आत्मा मात्र काढून घेतलेला असतो. फाऊस्टच्या ‘मेफिस्टोफेलिस’सारखी अवस्था होते. पण त्याला इलाज नाही. ‘त्यांच्याशी’ भांडणं अशक्य आहे. ‘त्यांना’ टाळताही येत नाही. जेथे जातो तेथे ‘ते’ सज्ज आहेत.
कधी तरी पुसटशा एकांतवासात आपण टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे अस्तित्वाचे मूलभूत प्रश्न आपल्याला घायाळ करतातच. आयुष्यावर स्वत:चं नियंत्रण काहीही नाही, आपण आपल्यापासून तुटल्याची जाणीव गुदमरवून टाकते. मी कोण? मी कुणाचा? मी कुठे चाललोय? या यक्षप्रश्नांनी घुसमट अजूनच गहिरी होते. वरवरची, तोंडदेखली नाती त्रासदायक होतात. कोण, कुणाचा, कसा उपयोग करून घेतंय, हे समजेपर्यंत हातात काही उरत नाही. ‘भरोसाच्या गगनशेटसाठी अरुण हा मासा आणि अनू ही त्याला पकडण्यासाठीचं गांडूळ झाली.’ याची जाणीव झालेली अनू आत्महत्या करते. कोणी व्यसनाधीन तर कुणी उदासीनतेच्या विळख्यात सापडतात. चारगावजवळ खनिज असल्याची खात्री करून दिल्यावर ‘वरच्या आदेशानुसार’ पोलीस हल्ला करतात. ”जंगलाकडे पळत जाणाऱ्या नक्षली महिलांना थांबण्याचे आवाहन करूनही त्या थांबत नव्हत्या. नाइलाजाने रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडस् वापरावे लागले. मृतदेहात सानिका धुरूचा देह होता.” अशी नोंद होते. ”पुरेशा लोकांना ही ‘पुढय़ातील’ परिस्थिती घाबरवायला लागली तर ती टाळायला धडपडतील. पण आज जे ‘डिफॉल्ट ऑप्शन’ दिसतंय ते आहेच.” असं मनोगतात सांगून कादंबरी अखेरीस खरे इशारा देतात, ”आज आता वाचालही, उद्या.. ” अनेक विषयांचा व्यासंग असल्यामुळे खरे, जगभरातील असंख्य घटनांचा अन्वय लावतात. अतिविस्तार टाळून संयमाने परिस्थितीची भीषणता सखोलपणे समजून सांगतात. मिथ्यकथा, चित्रपट, ग्रामीण म्हणी, इंग्रजी पुस्तके यातून इतिहास, अर्थव्यवहार, राजकारण यांची उकल करतात. कोळी, नागपुरी, हैदराबादी, दख्खनी हिंदी पंजाबी अशा अनेक ढंगाच्या बोलीभाषांचा वापर हे ‘उद्या’चं वैशिष्टय़ आहे.
बिल गेट्स व वॉरन बफे यासारख्यांच्या अतिश्रीमंतीमागील इंगित सांगताना थकियाडिस या ग्रीक इतिहासकाराचा ”बलवान त्यांना जमेल ते करतात आणि दुर्बल त्यांना भोगावे लागते ते भोगतात.” या सिद्धांताचा दाखला देतात. जोसेफ स्टिग्लित्झ यांची ‘विषमतेची किंमत’ या मीमांसेवरून ‘केवळ दहा हजार अतिश्रीमंतांच्या मर्जीनुसार ९९० कोटींचे जग चालते,’ हे दाखवून देतात. मराठी भावविश्वाला प्रगल्भ करण्याचं सामथ्र्य असणारी ही कादंबरी प्रत्येकानं वाचणं अनिवार्य आहे.

‘उद्या’
नंदा खरे,
मनोविकास प्रकाशन, पुणे.
पृष्ठे- २८४, किंमत- रु. ३००.

‘लोकसत्ता’च्या सौजन्याने

deulgaonkar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.