लेखकाचा मृत्यू

सगळी माणसं मरणाधीन असतात, लेखकसुद्धा माणूस आहे म्हणून तो मरणाधीन आहे. हे लॉजिक आज सांगायचं कारण म्हणजे सध्या साहित्यक्षेत्रात लेखकाचं मरण ह्या विषयावर चर्चा सुरू आहे. मीडिया, मार्केट आणि मनी ह्या साहित्यबाह्य प्रभावांचा साहित्यावर कसा प्रभाव पडतो, हे ह्या पूर्वी आपण बघितलं आहे. अखेरीस मरणाची हूल आणि साहित्याचा परस्परसंबंध काय असू शकतो हे बघू या.
श्री. पेरुमल मुरुगन ह्या तमिळ कादंबरीकाराने ७ जानेवारी २०१५ रोजी स्वतःचा लेखक म्हणून मृत्यू जाहीर केला. ह्यापुढे आपण फक्त एक शिक्षक म्हणून जगू, लेखक म्हणून नाही अशी मुरुगन ह्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवरून घोषणा केली. ही बातमी व्हायरल झाली आणि कालपर्यंत अनोळखी असलेले मुरुगन प्रकाशात आले. मुरुगन ह्यांच्या कादंबरीमुळे गावाची बदनामी झाली, असं त्यांच्या गाववाल्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी मुरुगन ह्यांनी गाववाल्यांना माफीपत्र लिहून दिलं.
बदललेल्या राजकीय वातावरणात अतिसांस्कृतिकतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले, अशी भीती आज साहित्यिकांना भेडसावतेय. त्यात मुरुगन प्रकरणाने भर घातली. जो समाज आपल्या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि राजकीय परंपरेची निर्भय चिकित्सा करत नाही, तो गोठून जातो. जो करतो त्याचं नागरी जीवन झऱ्यासारखं वाहतं, हे पाश्चात्य देशांनी सिद्ध केलं. म्हणून तिथे उठसूट पुस्तकांविरुद्ध फतवे निघत नाहीत आणि लेखकांना ‘मरावं’ लागत नाही. युरोप-अमेरिकेत परंपरानिष्ठांची संख्या नगण्य नाही, पण तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना रुजली आहे.
मुरुगन ह्यांचा माफीनामा मीडियात शोभेल असा नाटकी वाटतो. शरणागतीचा त्यांचा पवित्रा तमिळ चित्रपटात शोभेल, असा अतिरंजित आहे. ‘ह्या पुढे मी कधीच लिखाण करणार नाही, माझी पूर्वीची सगळी पुस्तकं जाळून टाका’ अशी भडक भाषा ते वापरतात. कोणी दरडावलं की चूप बसणं हे साहित्यिकाला शोभत नाही. त्यामुळे मुरुगन ह्यांचा उद्देश नेमका माफी मागणं आहे, स्वतःसाठी सिंपथी वेव्ह निर्माण करणं आहे की आपल्या विरोधकांना एक्स्पोज करणं, हे कळत नाही.
हे प्रकरण समजावून घेताना सर्वव्यापी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आजच्या जगण्यातलं स्थान मान्य करावं लागतं. मुरुगन ह्यांच्यावर रोष दाखवणारे अतिसांस्कृतिकतावादी गट आणि ह्या रोषासमोर नांगी टाकणारे मुरुगन, दोघंही मीडियाच्या प्रभावक्षेत्रात येतात. ह्यापुढे मुरुगन म्हणतात तसं खरोखरच लोक त्यांची पुस्तकं जाळतील की त्यांची विक्रमी खरेदी करतील, हे बघावं लागेल. मीडियातून जाहीर केलेलं हे मरण मुरुगन ह्यांना कदाचित, एक लेखक म्हणून संजीवनी देऊ शकेल. हाच मीडियाचा गमतीदायक विरोधाभास आहे.
मीडियातून मरणाची हूल दिलेले मुरुगनसारखे लेखक नव्या जोमाने जगतात, तर जोमदार लेखक मीडियामुळे मरू शकतात. ह्याचं एक उदाहरण म्हणजे ‘तेहेलका’चे पूर्व संपादक, ‘द अल्केमी ऑफ डिझायर’ ह्या खळबळजनक इंग्रजी कादंबरीचे लेखक श्री. तरुण तेजपाल. सेक्युलर-लिबरल विचारधारा मानणारे, आपल्या वृत्तपत्रातून उजव्या विचारसरणीचा सातत्याने विरोध करणारे तेजपाल जगण्याची ईर्षा असलेले महत्त्वाकांक्षी भारतीय इंग्रजी लेखक आहेत. त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप होताच त्यांचा मूळ मानवी स्वभाव उसळी मारून वर आला आणि त्यांच्यातला लेखक जायबंदी झाला. स्वतःच्या बचावासाठी त्यांनी जे केलं ते त्यांच्या अंगलट आलं. ज्या मीडियाने त्यांना मोठा लेखक केलं, त्याच मीडियाने त्यांना शेवटी मारलं.
मुरुगन मरणाची घोषणा करून जिवंत आहेत, तर लढवय्ये तेजपाल एक लेखक म्हणून आज मरणोन्मुख झाले आहेत. उद्या जर सुनंदा पुष्कर केसमध्ये नवं काही उघडकीस आलं, तर ‘द ग्रेट इंडियन नॉव्हेल’सारखी पोस्टमॉडर्न कादंबरी लिहिणारे शशी थरूरसुद्धा लेखक म्हणून मरून जाऊ शकतात. तरुण तेजपाल काय किंवा शशी थरूर काय, दोघंही अत्यंत प्रभावी वक्ते आहेत. त्यांचा मीडियावरचा वावर अजिंक्य वाटायचा. आज ते ह्याच मीडियामुळे पुरते गारद झालेले वाटतात. मीडियामुळे अप्रसिद्ध लेखक प्रसिद्ध होतात आणि प्रसिद्ध लेखक कुप्रसिद्ध. मीडिया न्यूट्रल आहे. तिला लेखकात नाही तर, बातमीत इंट्रेस्ट आहे.
मुरुगन ह्यांची स्वतःच्या मरणाची केलेली घोषणा आणि १९८९ साली इराणी धर्मगुरू आणि अध्यक्ष अयातुल्ला खोमेनी ह्यांनी सलमान रश्दी ह्या लेखकाच्या मृत्यूदंडाचा प्रसारित केलेला फतवा ह्यात मोठा फरक आहे. मुरुगन ह्यांच्या घोषणेला रूपकात्मक आत्महत्या म्हणता येतं, तर रश्दींविरुद्धच्या खोमेनींच्या फतव्याला खुनाची सुपारी म्हणता येईल. ह्या सुपारीमुळे रश्दींवर सुमारे दहा वर्षं उंदरासारखं बिळात लपून राहण्याची पाळी आली, आणि रश्दींच्या विवाद्य पुस्तकाशी संबंधित असलेल्या एकूण ६० व्यक्तींना मरण पत्करावं लागलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी इतक्या जास्त माणसांना मरावं लागण्याचं, हे पहिलंच उदाहरण असावं. ‘शार्ली हेब्दो’साठी मेलेली माणसं त्यापेक्षा कमी आहेत.
फतव्याच्या काळात रश्दींच्या जीवाचं बरंवाईट होऊ नये, म्हणून ब्रिटिश सरकारने रश्दींना चोवीस तास ‘झेडप्लस’ सिक्युरिटी दिली होती. हा खर्च ब्रिटिश सरकारने का करावा? असा प्रश्न तेव्हा काही ब्रिटिश लोकांनी विचारला होता. व्यक्तिवादी लेखकाच्या कल्पना विलासाची किंमत समाजाने का चुकवावी? असा प्रश्नकर्त्यांचा रोख होता. रश्दींच्या ‘जोसेफ अंतोन’ ह्या फतव्याविषयीच्या आठवणींच्या पुस्तकात रश्दींना सुनावल्या गेलेल्या देहदंडाचा जागतिक राजकारणावर कसा प्रभाव पडला हे कळतं. आज रश्दी जिवंत आहेत ह्याचं एक कारण म्हणजे तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना पूर्ण दहा वर्षे पूर्ण चोवीस तास संरक्षण दिलं हेच आहे. रश्दींसारख्या एका लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारने अक्षरशः लाखो पाऊंड्स खर्च करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत मोजली आहे.
मुरुगन ह्यांची स्वतःच्या प्रतीकात्मक मृत्यूची घोषणा किंवा रश्दींना सुनावलेला मृत्यूदंड ह्या तुलनेत सफदर हश्मी ह्या भारतीय लेखकाचा त्याच्या विरोधकांनी केलेला खून अधिक भयंकर आहे. हश्मी हे मार्क्सवादी पक्षाचे सभासद, पथनाट्यकार आणि लेखक होते. १ जानेवारी १९८९ रोजी दिल्लीजवळ एका गावात पथनाट्य करताना त्यांच्यावर काँग्रेस विरोधकांनी सशस्त्र हल्ला केला. त्यात सफदर हश्मींचा प्राण गेला. ह्या हल्ल्यात हश्मींसोबत रामबहादूर नावाचा सामान्य कामगारसुद्धा मारला गेला होता. पण ह्याची दखल फार कोणी घेतली नाही. सामान्य माणसांच्या तुलनेत लेखकाचा प्राण अधिक मोलाचा असतो का? हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. आजही ह्या प्रश्नातली बोच कमी झालेली नाही.
पूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी माणसं प्रतीकात्मकतेने आपला निषेध नोंदवत असत. तेंडुलकरांच्या नाटकांमुळे क्षुब्ध झालेले कर्तारसिंग थत्ते ऐंशीच्या दशकात हातात छडी घेऊन तेंडुलकरांना छडीचा प्रसाद देऊन आले होते. सनातन्यांनी तेंडुलकरांना घेरलं होतं, पण त्यामुळे, मुरुगनसारखा त्यांनी स्वतःचा मृत्यू जाहीर केला नाही. उलट एका प्रसंगी त्यांनी बंदूक घेऊन त्यांच्या शत्रूला मारण्याची गोष्ट केली होती!
ज्या हिंसक रीतीने परंपरावादी समाज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतात ते बघता छडीचा प्रतीकात्मक प्रतिसाद देणारे कर्तारसिंग थत्ते आज परवडले असते असं वाटतं. बहुसंपर्कशील समाजात संपर्कयंत्रणा वाढते. मीडियाचं जाळं तयार होतं. प्रत्येक व्यक्तीला आणि गटाला स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य मिळतं आणि वादप्रतिवादाचा गदारोळ सुरू होतो. पण हा गदारोळ अमर्त्य सेन ज्याला ‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ म्हणतात अशा भारतीयांचा नसतो, तर तो माझंच खरं, दुसऱ्याचं खोटं हा अट्टाहास करणाऱ्या अतिसांस्कृतितावाद्यांचा असतो.
लेखकाच्या जीवावर उठणारा सांस्कृतिक दहशतवाद हा फक्त वर्षा-सहा महिन्यातला ट्रेंड नाही. परंपराप्रिय भारतात तो शेकडो वर्षांपासून नीट रुजलेला आहे. धर्म-श्रद्धेची कुठलीही चिकित्सा मान्य नसलेल्या धर्मप्रिय, कर्मकांडनिष्ठ, परंपराभिमानी भारतात चिकित्सक विचार मरणोन्मुख अवस्थेत आहे. इथे अंधश्रद्धा, भोळीभक्ती, कौटुंबिक परंपरेची दहशत आणि पोथीनिष्ठा इतकी खोल रुजलेली आहे की त्यांची चिकित्साच अशक्य वाटावी. त्यात भर म्हणजे बहुतेक भारतीय लेखक परंपरेच्या चिकित्सेपेक्षा तिचं रोमँटिक वर्णन करत सुटतात. हा गर्दीचा अनुनय खूप लेखक करतात. जे करत नाहीत, त्यांना मरणाच्या धमक्यांना तोंड द्यावं लागतं. काहींना छड्या खाव्या लागतात. काहींना स्वतःचं मरण घोषित करावं लागतं. सफदर हश्मींसारख्या लेखकाला प्रत्यक्ष मरावं लागतं.
भारतासारख्या उतरंडप्रिय देशात केवळ माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मोठ्या लोकसंख्येला नाकारलं गेलं आहे. दलित, आदिवासी, भटक्या आणि विमुक्तांचे मानवी अधिकार जिथे नाकारले जातात तिथे लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किती महत्त्व द्यायचं? हा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारणं आवडतं. ह्याचं एक उत्तर: भटक्या विमुक्तांना जसं प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व, तसं लेखकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व. कारण दोन्ही घटक मानवी समाजाचा भाग आहेत, आणि दोन्हींची प्रतिष्ठा जपणं संस्कृतीचं काम आहे. एरवी कोणी अमर नाही. सगळी माणसं मरणाधीन असतात, लेखकसुद्धा माणूस आहे म्हणून तो मरणाधीन आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने

contactus@sangath.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.