इकॉलॉजी आणि इकॉनॉमी

(जवळजवळचे वाटणारे आणि असणारे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी (इंग्रजी) हे शब्द परस्परांपासून दुरावल्याची ‘आपत्ती’ )

इकॉनॉमी हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. eco म्हणजे घर, परिसर आणि nomy म्हणजे व्यवस्थापन. या पार्श्वभूमीवर पृथ्वीचे, निसर्गाचे ज्ञान म्हणजे इकॉलॉजी आणि निसर्गाचे व्यवस्थापनशास्त्र म्हणजे इकॉनॉमी. या दोन्ही शब्दांचे जवळचे नाते ग्रीक भाषेत सहजपणो मांडले गेले आहे.

इतकेच नाही तर भारतामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी कौटिल्याने लिहिलेले अर्थशात्रही हेच सांगते. कौटिल्य म्हणतो, ‘अर्थशास्त्र म्हणजे भूमीचे किंवा पृथ्वीचे अर्जन, पालन आणि अभिवर्धन कसे करावे हे शिकविणारे शास्त्र’.

परंतु आज विकासाच्या प्रचलित संकल्पनांमध्ये आपण नेमके इकॉनॉमी आणि इकॉलॉजी यांना एकमेकांपासून अलग करून ठेवले आहे. कधी कधी विकास आणि परिसरशास्त्र हे एकमेकांचे शत्रू असल्याचेही मानले जाते. परंतु ह्या दोन्ही शास्त्रांना जवळ आणून त्यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे. नेपाळमधील भीषण भूकंपाच्या घटनेने, या नैसर्गिक आपत्तीपोटी माजलेल्या हाहाकाराने हा मुद्दा पुन्हा एकवार ठळकपणो समोर आणला आहे.

पूर्वी नैसर्गिक आपत्ती कोसळत नव्हत्या का? या आपत्तींचे प्रमाण आत्ताच वाढले आहे असे आहे का?

– तर नाही.

पूर्वीही एवढ्याच स्वरूपात नैसर्गिक आपत्ती होतच असणार. आणि तसे पुरावेही जागोजागी सापडतात. असे असले तरी नैसर्गिक आपत्तींचा मानवी जीवनावर जो परिणाम होतो, त्याच्या मात्रेत आणि भीषणतेत मात्र कमालीचा बदल झाला आहे. पूर्वीपेक्षा हे परिणाम अधिक गंभीर झाले आहेत. याची कारणे जशी निसर्गातील बदलांमध्ये आहेत तशीच ती गेल्या काही शतकातील मानवी व्यवहार आणि वर्तनाशीही संलग्न आहेत. पृथ्वीवरची मानवी संख्या वाढल्यामुळे आणि ह्या सतत वाढत्या लोकसंख्येच्या आवश्यक तसेच काही अनावश्यक गरजा पूर्ण करण्याच्यामागे मानव लागल्यामुळे परिसरावर होणारे परिणाम काही काळ दुर्लक्षित झाले होते. ते आता सामोरे येऊ लागले आहेत. गेल्या पाचशे वर्षांमध्ये झालेला महत्त्वाचा आणि मोठा बदल म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवनिर्मित वसाहतींचे वाढलेले प्रमाण. पूर्वी माणूस निसर्गाच्या सानिध्यात राहात असे, तो निसर्गाचा एक घटक म्हणून, निसर्गावर मात करून नाही. निसर्गाशी तादात्म्य साधत, संवाद ठेवत, समन्वय साधत आणि त्यातील बदलांना सामोरे जात जात मानव अधिक कृतिशील झाला. निसर्गातील संकटांपासून बचाव करीत धडपडत जगणारा माणूस हळूहळू निसर्गापासून दूर गेला.

आणि अलीकडे तर निसर्गाची चर्चा होते ती जेव्हा अशी एखादी आपत्ती उद्भवते तेव्हाच. नैसर्गिक आपत्ती कितीही दूर प्रदेशात घडली तरी सध्याच्या विकसित तंत्रज्ञानामुळे त्याची चलतचित्रे, दृष्ये, छायाचित्रे आणि सविस्तर वर्णने त्वरित जगभरातल्या घराघरात पोहोचतात. शिवाय ही आपत्तीची भीषणता दाखवणारी दृश्ये अशी काही सादर केली जातात की, त्यामुळे निसर्गाबद्दल लोकांच्या मनात भीतीच जास्त निर्माण होते.

खरे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने, संवादसाधनांच्या माध्यमातून लोकांच्या मनातील निसर्गाबद्दलची, नैसर्गिक आपत्तींबद्दलची भीती दूर व्हावी हा खरा विविध प्रसारमाध्यमांचा हेतू असणे आवश्यक आहे. या परिस्थितीत माध्यमांची भूमिका लोकजागृती करून लोकांच्या मनातील भीती कमी करणे, आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती माहिती पोहोचवणे हीच असायला हवी, मात्र तसे घडताना दिसत नाही. सध्या भूकंपाने जमीनदोस्त झालेल्या काठमांडूमध्ये पडझड झालेल्या घरांच्या दृश्यांचा भडीमार तासन्तास सुरू आहे. परंतु काठमांडूमध्ये नेमके कोणते विभाग बाधीत आहेत, त्यातील कोणती घरे पडली आहेत, का पडली आहेत ही माहिती आणि विश्लेषण लोकांना दिले जात नाही. त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या, त्यांचे चित्रण हे फक्त सनसनाटी निर्माण करण्याच्या स्तरावरच राहते. आपत्ती कोसळल्यावर सुरुवातीच्या काही तासात असे तुलनात्मक वार्तांकन शक्य नसेलही कदाचित, पण नंतरही ते होत नाही. अशावेळी आपले राजकर्ते तर अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी लोकांना सक्षम करण्याएवजी त्यांच्या मनातील भीती अधिकच बळकट करून आपल्या राजकारणाची पोळी शेकून घेण्याचे काम करताना दिसतात.

त्सुनामी आल्यावर आणि आता नेपाळमध्ये भूकंप झाल्यावर आपल्याकडे जैतापूरचा अणुवीज प्रकल्प नको, असा राग पुन्हा आळवण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या राजकीय नेतृत्वामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळेच हे होत असावे. भूकंपप्रवण क्षेत्रात वा किनारा प्रदेशात ऊर्जानिर्मिती केंद्रे नकोतच, अशी अतिरेकी भूमिका त्यामुळेच घेतली जाते. परंतु लोकांचा सर्वांगीण विकास करायचा, तर अर्थव्यवस्था निर्माण करणे आवश्यकच असते; मात्र नवीन उद्योगांचा विचार करतानाही इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण नाकारूनही चालत नाही. भूकंपप्रवण क्षेत्रतही निसर्गनियम समजून त्या संबंधात काळजी घेऊन प्रकल्प उभारता येतात. पण हे समजून न घेताच आपल्याकडे तो प्रकल्पच नको असा सूर आळवला जातो; मात्र अशा राजकारणातून ना लोकांचे भले होते ना निसर्गाचे.

जैतापूरच्या नावाने गेली इतकी वर्षे राजकारण करणाऱ्या शिवसेनेने त्यांच्या मागच्या कार्यकाळात मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधले. त्याने निसर्गाला, पर्यावरणाला नुकसान तर झालेच, परंतु त्यामुळे बहुसंख्य नागरिकांचा प्रवास काही सुकर झाला नाही. उलट उड्डाणपुलांमुळे खासगी गाड्यांच्या (वाढत्या) वापराला प्रोत्साहनच मिळाले. प्रदूषण, गोंगाट, धूळ, अपघात अशा नाना संकटांची मालिकाच सुरू झाली. तेव्हाच मेट्रो किंवा सार्वजनिक वाहतुकीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक होते. त्यामुळे मुंबईचे आणि मुंबईकरांचे आरोग्यही जपले गेले असते. पण त्यावेळी फक्त इकॉनॉमीचा विचार झाला, इकॉलॉजीचा नाही. पर्यावरणाचा असा आपल्या सोयीनुसार वापर आणि विचार करणे हा संधिसाधूपणाच होता.

एखादा परिसर धोकादायक आहे हे दाखवून देण्यात राजकारणी पुढाकार घेतात. परंतु त्यापलीकडे जाऊन धोक्याला तोंड देण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण करणे ही जबाबदारी ते मानत नाहीत. त्यामुळेच मुंबईत आपत्तीकाळात लोकांनी काय करायला पाहिजे, याचे भान देणारे एखादे लोकजागृती केंद्र उभे करण्याची कल्पना त्यांना सुचत नाही.

जपानमध्ये सतत भूकंप होत असतात. पण मोठ्या प्रमाणात जीवित किंवा वित्तहानी होत नाही, कारण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटाला सामोरे जाण्याच्या उपाययोजना तयार केल्या आहेत, त्याबद्दल लोकांना सक्षम केले आहे. नैसर्गिक आपत्तींवर आपले संपूर्ण नियंत्रण नसले तरी आपल्या सामाजिक-मानसिक वृत्ती आणि प्रवृत्ती आपण डोळसपणे घडवू शकतो.

याशिवाय आपल्याच पारंपरिक दृष्टिकोनामुळे आणि वृत्तीमुळे आपण अनेक संकटांना आमंत्रणे देत असतो. सिंहस्थासाठी लाखो भाविक एकेठिकाणी जमतात. त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि एकूणच गर्दी व्यवस्थापनासाठी करावा लागणारा शासकीय खर्च ह्या दोन्हीमुळे आपलेच नुकसान होते. पंढरपूरचे नदीप्रदूषण थांबवण्याचा कोर्टाचा आदेश आपल्याला गैर वाटतो. केदारनाथ, बद्रीनाथ या हिमालयातल्या धार्मिक तीर्थस्थानांना पूर्वी (मोजके) भाविक पायी जात. आता तिथे गाड्यांनी, घोड्यांनीच नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून लाखो लोक जाऊ लागले आहेत. त्या तीर्थयात्रा न राहता मोठ्या अर्थयात्राच बनल्या आहेत. त्याचे दुष्परिणाम आपण गेल्या वर्षी अनुभवले आहेत. व्यापारी आणि धार्मिक वृत्तींचे प्रमाण अतोनात वाढल्यामुळे निसर्गाचे शोषण वाढले आहे. अशा वृत्तींनाही आवर घालण्याची नितांत आवश्यकता आहे.

इकॉलॉजीकडून ज्ञान, शहाणपण घेऊन इकॉनॉमी तयार करणे आवश्यक झाले आहे ते म्हणूनच! या दोहोंचे परस्परावलंबन आपल्या जाणिवांचा, विचारांचा, मानसिकतेचा भाग बनणे आवश्यक आहे. निसर्गाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायला हवी. त्याच्या सोबतीने आपले अर्थकारणही बदलणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याची सक्षमता लोकांमध्ये विकसित होणे आवश्यक आहे. मानव आणि निसर्ग यांच्या विकासाची मूलतत्त्वे आपण समजावून घेतली तरच खात्रीशीर आणि टिकाऊ अर्थव्यवस्था आपण निर्माण करू शकू.

लोकमतच्या सौजन्याने

sulakshana.mahajan@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.