संपादकीय

आजचा सुधारक चा हा नवा अंक आपल्यासमोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी मी घेत आहे.
मराठीत नियतकालिकांची कमतरता नाही. त्यांपैकी वैचारिक नियतकालिकांची स्थिती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून चिंताजनक म्हणावी अशी आहे व ती दिवसेंदिवस ढासळताना दिसते आहे. मुळात मराठी भाषेतील व्यवहारालाच ओहोटी लागली आहे. वैयक्तिक संवादापासून गहन विमर्शापर्यंत सर्व व्यवहारांत इंग्रजीशिवाय आपले पानही हलू शकणार नाही अशी समजूत येथील अभिजनांनी (व त्यांचे अनुकरण करणाऱ्या बहुजनांनी) करून घेतली आहे. समाजात असहिष्णुता वाढीला लागली आहे, किंवा सुप्तावस्थेतील अनुदार वृत्ती सामाजिक माध्यमे व प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने उसळून बाहेर येत आहे. भालचंद्र नेमाडेंसारख्या मराठीतल्या ‘सुपरस्टार’ लेखकाला ‘हिंदू’ शब्दाची वेगळी व्याख्या केल्याबद्दल पोलीस संरक्षणात वावरावे लागते व आमिर खानला जे तो बोललाच नाही त्याबद्दल देश सोडून जाण्यास फर्मावले जाते, ह्या दोनच घटना पुरेश्या बोलक्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित मानसिकतेच्या विरोधात सातत्याने एक भूमिका घेऊन उभे राहणाऱ्या आजचा सुधारक सारख्या नियतकालिकाला काही भविष्य आहे की नाही, असा प्रश्न उभा राहणे स्वाभाविक आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर विवेकवादाविषयी आस्था बाळगणाऱ्या आपल्यासारख्या वाचकांच्या हातात (व वृत्तीत) आहे, म्हणून हा संवाद मला खूप महत्त्वाचा वाटतो.सध्या मराठी, व एकूणच भारतीय समाजात भीषण संवादहीनतेची स्थिती दिसते आहे. मतमतांतरांचा गलबला वाढला आहे. प्रत्येकच विचारसरणीचे पुरस्कर्ते आपापल्या पूर्वग्रहांना चिकटून आपल्या विचारांचा आग्रही व कंठाळी पुरस्कार करताना दिसत आहेत. परस्परांना प्रतिक्रिया देत हातघाईवर येत आहेत. अशा वेळी स्थिर चित्ताने व सम्यक् दृष्टीने आपल्या पर्यावरणाचा वेध घेणे, समोरच्या भ्रामक व परस्परविरोधी वास्तवाचा योग्य अर्थ लावून तो इतरांपुढे मांडणे, आणि असे करीत असताना आपल्याला अंतिम सत्य गवसलेले नाही, ह्याचे भान राखणे अत्यावश्यक आहे. विवेकवाद तरी ह्याहून वेगळे काय सांगतो?
विचारसरणीचा अंत झाला आहे अशी द्वाही ज्या काळात व परिस्थितीत फिरवली जात आहे, त्यात सर्वच विचारांना आपापली प्रस्तुतता सिद्ध करणे आता अनिवार्य झाले आहे. त्यात विवेकवादाचाही अपवाद तरी कसा करता येईल? म्हणजे विवेकवादाशी निष्ठा टिकवून ठेवणे आणि त्यासोबतच त्याची व आजच्या काळाशी सुसंगत पुनर्मांडणी करणे अशी दुहेरी जबाबदारी आपणा सर्वांवर येऊन पडली आहे. विवेकवाद म्हणजे केवळ निरीश्वरवाद व निधर्मी वृत्ती अशी भूमिका घेतल्यास आपण ह्या देशातील 0.1% इतके अभिजन आहोत व इतर बापडे जोपर्यंत ह्या स्थितीला येऊन पोहचत नाहीत, तोपर्यंत ह्या देशाचे कठीण आहे अशा समाधानाच्या कोशात आपण राहू शकू. पण आपला युगधर्म आपण पाळला नाही हेच त्यातून सिद्ध होईल. देवधर्म मानणारे, न मानणारे किंवा त्याविषयी उदासीन असणारे, अंधश्रद्धा जोपासणारे किंवा कोणत्याही विचारावर श्रद्धा नसणारे, अशा सर्व जनसमूहांच्या मतमतांतरांच्या गलबल्यात संवाद साधणे व तो टिकवून ठेवणे केवळ विवेकवादालाच शक्य आहे. आजचा सुधारक ची ही मुख्य ताकद आहे असा आमचा नम्र दावा व विश्वास आहे. म्हणूनच आजच्या प्रतिकूल परिस्थितीत हे विचारपीठ टिकले पाहिजे, नव्हे वाढले पाहिजे, असे आम्हाला वाटते.
मराठीतील वैचारिक नियतकालिके प्रतिकूल परिस्थितीतही आपले कार्य निष्ठेने करीत आहेत, ह्यात वाद नाही. पण त्यांच्या वैचारिक बांधिलकीमुळे ती एकाच रिंगणात फिरताना दिसतात. त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारांपेक्षा अन्य प्रतिपादनास तेथे अवकाश मिळत नाही. आपली विचारप्रणाली व कार्यशैली ह्यांच्याबद्दल परखड आत्मटीका करण्याची गरजही त्यांना बहुतेक वाटत नसावी. ह्या पार्श्वभूमीवर आजचा सुधारक ने आपला विवेकवादी बाणा कायम ठेवून विविध विचारांच्या घुसळणीचे व्यासपीठ अशी आपली ओळख निर्माण केली आहे. ह्या व्यासपीठावरून अलीकडच्या काळात एक आंबेडकरवादी व एक सावरकरवादी ह्यांचा संवाद सुरू झाला व तो त्याबाहेरही अनेक महिने चालत राहिला ही बाब आम्हाला लक्षणीय वाटते. आजच्या काळात अशा संवादाचे काय महत्त्व आहे, हे वेगळे सांगायला नको.
आजचा सुधारक ची गेल्या पंचवीस वर्षांची वाटचाल ही वैश्विकीकरण व हिंदुराष्ट्रवादाचा उदय ह्या दोन ऐतिहासिक घटनांच्या सोबतीने झाली आहे. ह्याच काळात जगभरात तंत्रज्ञानाची अफाट प्रगती झाली व त्यामुळे अनेक सामाजिक-नैतिक पेचप्रसंगही निर्माण झाले. ह्यापूर्वीच्या संपादकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बदलत्या वास्तवाची नोंद घेत अनेक महत्त्वाचे प्रश्न ह्या अंकांतून उपस्थित केले, कधी त्यांची उत्तरे सुचवली, तर कधी प्रचलित उत्तरांमधील भ्रामकता वाचकांसमोर मांडली. ही त्यांची कामगिरी अतिशय मोलाची आहे. पूर्वसूरींची परंपरा पुढे चालवताना प्राप्त परिस्थितीनुसार मी अंकाच्या अंतरंगात व बहिरंगात काही बदल करणार आहे. अंकातील आशय पातळ न करता हे मासिक अधिक लोकांपर्यंत, विशेषतः तरुणांपर्यंत कसे पोहचेल ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्या दमाच्या तरुणांची चमू मला साथ देत आहे. आशय व अभिव्यक्ती ह्या दोन्ही अंगांनी आम्ही करत असलेल्या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटते, हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. हा संवाद वाचकांच्या बाजूनेही सातत्याने चालत राहील, अशी आम्ही आशा करतो. मधल्या काळात वाचकांकडून वर्गणी घेणे थांबविले होते. आता आजीव वर्गणीदार सोडून इतरांनी आपली वर्गणी लवकरात लवकर पाठवावी, असे त्यांना नम्र आवाहन आहे. विविध शहरांत आजचा सुधारक चे वर्गणीदार व सहानुभूतिदार ह्यांचे मेळावे आयोजित करून संपादक-वाचक संवाद अधिक बळकट करण्याची आमची इच्छा आहे. येत्या 20 डिसेंबरला नाशिक येथे अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याविषयी अंकात अन्यत्र अधिक माहिती दिली आहे.
आपल्या प्रतिसादातून व सक्रिय साह्यातून आजचा सुधारक नव्या जोमाने फोफावेल, अशी आशा व्यक्त करून थांबतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.