श्रद्धांजली:अनिल पाटील सुर्डीकर

अनिल पाटील सुर्डीकर, गावगाडा- शतकानंतर, शेती

दशावतारांच्या गोष्टींपैकी वामनाची गोष्ट मला नेहेमीच अस्वस्थ करत आली आहे. एरवी देव पाप्यांना शिक्षा देतो, तर बळीचं पापच मला दिसत नाही. एरवी देव दुर्बलांचा घात करतो. हो;
घोडा नको, हत्ती नको, वाघ तर नको रे बाबा
बकरीच्या पोराचा बळी दे,
असा देव दुर्बलांचा घात करतो!
वामन मात्र बळीचा दडपून वर टर्रेबाजी करतो! आणि बळीही हसतखेळत वामनाला झेलून आपले महत्त्व अबाधित ठेवतो. एक वर्षारंभ आपल्या नावाशी जोडून घेतो. इडा-पिडा टळून आपले राज्य येवो, अशी प्रार्थना लोकांना करायला लावतो. आजही वामन आठवला जातो तो बळीला निष्फळ छळणारा म्हणूनच.
पण बळीराजा, शेतकरी, हा नेहेमीच अन्यायाखालून हसत पुन्हा उसळी मारून जगाचं ‘अन्नशरीर’ घडवत आला आहे. वामन वेगवेगळी रूपं घेतो. कधी ‘शेतकरी हो! तुमच्यासाठी’ म्हणत बळीराजांना धरणाखाली बुडवून पाणी मात्र नगरे आणि उद्योगांना देतो; तर कधी ‘सेझ’ आणि वेगवेगळे ‘कॉरिडॉर्स’ घडवत बळीराजाला बेदखल करतो. बळीराजा मात्र, दरेक अन्यायानंतर, “ओके! यह भी मंजूर! चल, जेवून घे!”असे म्हणत राहतो. आणि हे मिष्किल हसत करतो, कारण बंधुभाव हे मूल्य त्याला अंतर्बाह्य पटलं आहे!
मला भेटलेले बळीराजाचे रूप म्हणजे अनिल सुर्डीकर पाटील, गाव सुर्डी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. खरे तर अनिल माझा उशिरा मित्र झालेला. त्याचे वडील (आबासाहेब) आणि माझे श्वशुर (रा.रा.मालेगावकर) हे बालमित्र. त्यांच्या मैत्रीतले तिसरे टोक बुवाजी सहस्रबुद्धे हे कम्युनिस्ट स्वातंत्र्यसैनिक. ओळख सुमारे सत्तर सालची, आणि मैत्री त्यानंतर तीन वर्षांनी माझ्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी झालेली. घडले असे —
बाहत्तरच्या दुष्काळात ‘वरलक्ष्मी’ नावाचे कापसाचे संकरित बियाणे कर्नाटकात घडवले गेले. ते कर्नाटकाबाहेर न्यायला बंदी होती, पण ते महाराष्ट्रात हजार रुपये किलोने चोरून आणले जात असे आणि काही वृत्तपत्रांत चर्चाही होती. माझ्या घरात सात पिढ्या तरी शेती नाही, पण माझे मामा दोघेही शेतकरी. तर त्र्याहत्तरमध्ये मामाचे मला पत्र आले, “दोनशे रुपये किलोने दोन क्विंटल वरलक्ष्मी बियाणे मी देऊ शकतो. गिऱ्हाईक शोध.” मी त्यावेळी उजनी धरण बांधत होतो, बार्शीच्या जवळचे. अनिलला ‘ऑफर’ दिली, तर त्याचे उत्तर आले, “एकशे ऐंशीच्या दराने मी तीन क्विंटल वरलक्ष्मी देऊ शकतो!”! मी हादरलो. मी कंत्राटदार. ठरीव दराने कामे करणारा. मला एका वर्षी हजार रुपये किलो, पुढच्या वर्षी एकशे ऐंशी, हे अनाकलनीय!
तर अनिलशी दोस्ती वाढली, की या विक्षिप्त ‘बिझनेस मॉडेल’मध्ये लोक कसे जगतात हे कळावे. पण लवकरच काही कारणांमुळे मी उजनी सोडून मध्ये टप्पे घेत नागपुरात स्थिरावलो. सणासमारंभांना अनिल भेटत असे, कारण मालेगावकरांकडील कार्ये सुर्डीकरांशिवाय होत नसत. हळूहळू अनिलशी मैत्री दाट होत गेली.
अनिलच्या वडलांच्या योजनेत अनिलने शेती करणे नव्हते. त्याचा मोठा भाऊ शेतकीशास्त्र शिकून शेती करणार, तर अनिल माझ्यासारखाच सिव्हिल एंजिनीयर होऊन ठेकेदारी करणार अशी योजना होती. पण मोठा भाऊ परदेशवासी झाला आणि अनिलकडे शेतीही आली. तो, मी, दोघेही वृत्तीने समतावादी, त्यामुळे त्याला ठेकेदारी मोहवत नव्हतीच. शेती मात्र रक्तातच होती. श्रीपाद दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली अनिलने त्याची पारंपरिक शेती आधुनिक केली.
2000 सालानंतर मी “आसु’च्या संपादनात ओढला गेलो. माझे एंजिनीयर गुरु व मित्र डॉ. चिं.मो.पंडित एंजिनीयरिंगमधून निवृत्त होऊन शेती, पर्यावरण वगैरेंच्या अभ्यासात शिरले होते. त्यांच्या अतिथिसंपादकत्वाखाली ‘आसु’चा शेती विशेषांक काढायचे ठरले. त्याचाच भाग म्हणून पंडित व मी बार्शीला अनिलकडे गेलो. त्याचा शेतीबाबतचा दृष्टिकोण (Perspective) मला आवडला. त्या विशेषांकानंतरही अनिलने शेती व ग्रामीण अर्थसामाजिक रचनेवर लिहावे, असा पंडितांचा व माझा आग्रह होता. अनिल ‘आसु’चा नियमित लेखक झाला.
प्रासादिक लेखनशैली, अत्यंत हलका नर्मविनोद आणि आपल्या विषयाचेसंपूर्ण आणि स्वानुभवातून आलेले ज्ञान ही अनिलच्या लेखनाच्या गाभ्याशी आहेत. त्याच्या पहिल्यादुसऱ्या लेखानंतर “तुला कुठे सापडतात असले लेखक?” असे कौतुकाचे प्रश्न मित्रांकडून येऊ लागले. यात सर्वांत मोठे प्रशस्तिपत्र होते कुमुदिनी दांडेकरांचे. त्र्यंबक नारायण आत्रेंच्या ‘गांव-गाडा’ या 1915 च्या पुस्तकाचे एक अद्ययावत रूप ‘गावरहाटी’ या नावाने अर्थतज्ज्ञ वि.स.दांडेकर व शेतकरी श्री जगताप यांनी घडवले होते. त्या कामाचे महत्त्व जवळून जाणणाऱ्या सौ. दाडेकरांनी अनिलच्या लिखाणाचे मुक्तपणे कौतुक केले. अनिलने ‘गांव-गाडा’ व ‘गावरहाटी’ वाचले, आणि त्यातून त्याच्या लेखमालेचे ध्येय स्पष्ट झाले. अर्थात, आत्र्यांची समाजशास्त्रीय दृष्टी अनिलकडे नव्हती. पण एका शाहण्या, वैध दृष्टिकोणातून अनिलचे ‘गावगाडा : शतकानंतर’ हे लेखन पूर्ण झाले. मनोविकास प्रकाशनाने 2012 साली ते प्रकाशित केले. कृषिजनसंस्कृतीचे अभ्यासक राजन गवस यांनी सुंदर प्रस्तावनाही दिली. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.
या सर्व काळात अनिल गंभीर आर्थिक ताणात होता. आश्चर्य म्हणजे याचा त्याच्या लेखनात मागमूसही नाही! आर्थिक ताणामुळे अनिल सहज तुच्छतावादी, Cyrical होऊ शकला असता, पण तसे मुळीच झाले नाही.
“शेतकऱ्यांची मानसिकता हा आजकालचा शब्दप्रयोग आहे”, अशी सुरुवात करून अनिल बरेचदा शहरी, मध्यमवर्गी उद्योगक्षेत्र व सेवाक्षेत्राच्या ‘मानसिकते’वर बोलत असे. शेती करायला बुद्धी फारशी लागत नाही, तर सेवाक्षेत्र ज्ञानावर बेतलेले आहे; या आणि असल्या मतांची तो (आणि मागे उभे राहून पंडित आणि मी!) यथेच्छ चिरफाड करत असे. पण सेवाक्षेत्रातले पंडित, उद्योगक्षेत्रातला मी, यांच्या दुखऱ्या नसांना कधीही धक्का लागत नसे. एखादेवेळी पंडित व मीच जास्त जहाल बोलत असू! याचे कारण म्हणजे समतेसोबतच खराखुरा बंधुभाव अनिलच्या नसानसांत मुरलेला होता. त्यातून ‘चुकतो तो, पण माझा समाजबंधूच आहे, माफ करूया, जरा चिडवून!’ ही वृत्ती घडली होती; पूर्णपणे विवेकी आणि ऋजुतापूर्ण.
16 ऑक्टोबर 2015 ला अनिलचे निधन झाले. पंडित तर आधीच गेले. आता अनिलचा दृष्टिकोण आठवून, त्यावर ‘पंडिती’ समीक्षा करून आपल्याला कोण शाहणे करणार?