आपण विद्यापीठे घडवतो, विश्वविद्यालये नाही!

जे एन यु, उच्च शिक्षण, विचारस्वातंत्र्य
—————————————————————————–
प्रचंड राजकीय मरगळ असण्याच्या ह्या काळात एखादा कन्हैया कुमार कसा तयार होतो, ह्याचा माग घेतल्यास आपण थेट जेएनयुच्या प्रपाती, घुसळणशील वातावरणापर्यंत जाऊन पोहचतो. तिथल्यासारखे विद्रोही, प्रश्न विचारण्यास शिकविणारे वातावरण उच्च शिक्षणाच्या सर्वच केंद्रांत असणे का आवश्यक आहे, हे सांगणारा हा लेख.
—————————————————————————–
“रस्त्याने चालताना किंवा बागेतल्या बाकांवर बसून जर दोन माणसे वाद घालत असतील तर त्यांपैकी विद्यार्थी कोण, डॉन (= प्राध्यापक) कोण, हे ओळखणे सोपे आहे. जास्त आक्रमक तो विद्यार्थी आणि पडेल, मवाळ तो डॉन.” केंब्रिज युनिव्हर्सिटीतल्या स्थितीबद्दलचा हा शेरा आहे. का घडते असे?

मॅक्स बीरबॉम सांगतो, “विद्यार्थ्यांमधला जो उन्मादी वेडेपणा शाळा ठोकूनपिटून काढून टाकतात, तो ऑक्सफर्ड-केंब्रिजमध्ये हलक्या हाताने पुन्हा त्यांच्यात भरला जातो.” म्हणजे प्राध्यापकांना, एकूणच ‘सत्ताधीशांना’ घाबरू नका, हे प्रयत्नाने शिकवले जाते!

माझा एक मित्र (सुबोध जावडेकर) माणसांचे व प्राण्यांचे मेंदू कसे वयासोबत विकसित होतात, कसे काम करतात, वगैरेंचा अभ्यास करत असतो. माणसाचे मेंदू वयाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत विकसित होत असतात. वयात येणे, म्हणजे लैंगिकदृष्ट्या सक्षम होणे मात्र सुमारे दहाबारा वर्षे आधीच घडते. एका अर्थी ही ‘उन्मादी वेडेपणा’ने लैंगिक प्रयोग करण्याची दशकभराची संधीच असते. कारण माणसे प्रयोगक्षम असतात पण परिपक्व नसतात. माझ्या मित्राला वाटते की यात काहीतरी परिस्थितीशी अनुरूपता वाढवणारे, म्हणजे जीवजातीच्या उत्क्रांतीला पूरक अंग असावे.

मुळात एकपेशीयांच्या पेशीविभाजनातून लिंगभेद आणि लैंगिक प्रजनन उद्भवले ते उत्क्रांतीला पूरक म्हणून, असे लिन मार्गलिस या शास्त्रज्ञ स्त्रीचे म्हणणे आहेच, एका अर्थी गुणावगुणांचे पत्ते पिसले जात असतात आणि परिस्थितीशी जुळते गुणसंच टिकत असतात, तर फटकून असणारे गुणसंच बाद होत असतात. या पत्ते पिसण्याचा वेग लैंगिक व्यवहाराने वाढतो.

आणि जे लैंगिक व्यवहाराबद्दल शक्य आहे तेच सामाजिक-राजकीय वागणुकीबद्दलही शक्य आहे. अपरिपक्व प्रयोगशीलतेने नवनवे पर्याय घडवून त्यांपैकी परिस्थितीशी अनुरूप वागणे विकसित होत असते, हे शक्य आहे.

प्रथमा बॅनर्जींचा ‘थँक गॉड फॉर जेएनयू’ हा लेख (इंडियन एक्सप्रेस, १८ फेब्रु. २०१६) हेच सुचवताना दिसतो. बॅनर्जी ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ या संस्थेत संशोधक म्हणून काम करतात, आणि त्यांचे शिक्षण जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत (JNU त) झाले आहे, विद्यार्थिदशेतल्या अनुभवांबद्दल त्या लिहितात, “माझ्यासाठी जेएनयू ला प्रवेश हे प्रचंड स्वातंत्र्य होते. आपले पंख पसरायला मला मोठा अवकाश मला मिळाला. रात्रीबेरात्री वसतिगृहाबाहेर भटकायचे स्वातंत्र्य (विशेषतः तरुण मुलींना!)वाचनालयातीलव मेसमधील चर्चासत्रे, वर्ग-जात-देश अशा सीमा भेदून केलेल्या मैत्र्या…”

बॅनर्जी नोंदतात की वंचितांना जेएनयूत प्रवेश मिळणे आवर्जून सोपे केले जाते. प्रांत, जात, घरात शिक्षण किती पिढ्या घेतले जात आहे, साऱ्या बाबींमधून वंचितांचे विशेष स्वागत केले जाते.

स्वातंत्र्य केवळ मैत्रीचेच नव्हते, हे त्या सांगतात, “आणि सर्वांना महत्त्वाचे म्हणजे सर्व सामाजिक भेदरेषा ओलांडून प्रेमात पडण्याचे स्वातंत्र्य”. म्हणजे त्यांना लैंगिक व्यवहारातील उन्मादी वेडेपणाही जाणवतो! पण तेवढाच मात्र नाही.

शिक्षकांशी असलेल्या संबंधांबद्दल त्या लिहितात, “त्यांना नावाने एकेरीत संबोधायची परवानगी असे.चर्चांमध्ये वेळेची मर्यादा नसे. वर्गात उपस्थित राहणे, परीक्षा वगैरेंचे नियम सैल असत. फारकशाला, चहा-सिगारेटींमध्येही ते साथ देत.”

पुढे त्या लिहितात, “जर आपल्याला हे फालतू, (trivial) वाटत असेल तर समजावे, की आपण बंधने तोडणे किती महत्त्वाचे असते हे विसरण्याइतके म्हातारे झालो आहोत. बंधने गळून पडल्याशिवाय आपण जबाबदार तरुण-प्रौढ होऊ शकत नाही. प्रयोग करण्याचे, चुका करण्याचे, त्या सुधारून नव्याने चुका करण्याचे स्वातंत्र्य, अगदी नको तितके स्वातंत्र्य, हे आवश्यकच असते.”

आणि हे सारे करून शिकायचे काय? “जेएनयू त आम्ही सर्व साहसे-दुस्साहसे करून एक महत्त्वाचा धडा शिकत असू. भौतिक(ऐहिक) व सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र अवकाशातच मन मुक्त होऊ शकते. लोकशाही, मतवैविध्य आणि समता यांतूनच बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता घडू शकते. हे खरे तर नसले तर पोथीबद्धता, कंटाळा आणि मठ्ठपणा उद्भवण्याचा प्रचंड धोका संभवतो.”!

बॅनर्जीचा लेख प्रकाशित व्हायच्या आदल्याच दिवशी ‘हिंदू’ वृत्तपत्राने अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचे शिकागो युनिव्हर्सिटीचे मत प्रकाशित केले. “युनिव्हर्सिट्यांचे काम व्यक्तींना नावडत्या किंवा तीव्रतेने क्लेशदायी संकल्पनांपासून व मतांपासून सुरक्षित ठेवण्याचे नाही. संकल्पना कितीही नावडत्या असल्या तरी संवादाची सभ्यता, परस्परांबद्दल आदर, असली कारणे देऊन त्यांच्यावरील चर्चा थांबवता येत नाही.”

एकेकाळी ‘युनिव्हर्सिटी’ या शब्दाला भारतीय प्रतिशब्द ‘विश्वविद्यालय’ हा होता. विद्यार्थी व शिक्षक यांनी विद्या देण्याघेण्यासाठी घडवलेले विश्व, (universe)म्हणजे विश्वविद्यालय. मग कधीतरी युनिव्हर्सिटीसाठी ‘विद्यापीठ’ हा शब्द वापरला जाऊ लागला. मुक्त, व्यापक विश्वाची जागा अधिकारावर बेतलेल्या पीठाने घेतली. जी संस्था विद्येखेरीज कशालाही महत्त्व न देणारी, श्रेणी आणि विषमता नकारणारी हवी; तिचे रूप बदलले. पीठ आले की पीठाधीश, पीठाधिपती आले. वरचे आणि खालचे असा श्रेणी आल्या. ‘आलय’ही गेले आणि ‘विश्व’ही. उरले केवल डुढ्ढाचार्य पीठाधिपती आणि त्यांचे लष्कर-ए-होयबा!

विज्ञानक्षेत्रात भारतीय माणसाला एकच नोबेल पारितोषिक आहे, तेही स्वातंत्र्य मिळण्याआधीचे. ‘भारतीय वंशा’च्या तिघांना विज्ञान-नोबेल्स आहेत, आणि तिघेही सांगतात की ते भारताबाहेर पडले, आणि मगच खऱ्या अर्थी संशोधन करू शकले. लोकसंख्येच्या प्रमाणात शोधनिबंध किती, लोकसंख्येच्या प्रमाणात पेटंट्स किती, लोकसंख्येच्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय ज्ञान-पुरस्कार किती, एकूण एका निकषावर विद्यापीठे उणी ठरतात आणि उलट (परदेशी) विश्वविद्यालये भारी पडतात.

वयस्कांचा आदर करणे, प्रस्थापित मतांना आह्वाने न देणे, पुराणकथांना शब्दशः सत्य मानणे; आणि अशा साऱ्याला ‘भारतीय मूल्ये’ मानणे, ती न पाळणाऱ्यांना देशद्रोही, संस्कृतिद्रोही मानणे, हे सारे पीठासीनतेतून येते. जर विश्वविद्यालय हा शब्द आणि त्याच्याशी ईमान राखणारी वृत्ती जोपासली तरच हे चित्र बदलू शकते.

JNU त नेमके काय घडले हे तुकड्या-तुकड्याने बाहेर येतच आहे. आणि प्रत्येक तुकडा सत्तापीठाधीशांच्या बुद्धिमर्यादा अधिकाधिक संकुचित होत आहेत, हेच ठसवतो आहे.

१९७२ सालची एक घटना आठवते. ते स्वातंत्र्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. दलितपँथरचे राजा ढाले यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली. तिच्यात ते जे म्हणाले त्याचा मथितार्थ असा : स्वातंत्र्य मिळाल्यावर पंचवीस वर्षांनीही दलितांची स्थिती सुधारता येत नसेल, तर त्या स्वातंत्र्याला अर्थ नाही. तो राष्ट्रध्वज म्हणजे एक फडकेच ठरते.

यानंतर ढाल्यांनी एक बीभत्स सूचना केली, जी तथाकथित देशभावनेशी द्रोही ठरणे शक्य होते. पण तसा कोणताही एफायार-चार्जशीट दाखल झाला नाही. एस.एम.जोशी व वसंत बापट ढाल्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले, असे आठवते. दोघांचेही म्हणणे होते, की ढाल्यांची भाषा ‘असांसदीय’ असेल, पण त्यांचे म्हणणे खरे आहे आणि त्यांचा संताप समजण्याजोगा आहे.

आज स्वातंत्र्याचे एकोणसत्तरावे वर्ष सुरू असतानाही ढाल्यांचा त्रागा खरा ठरेल. त्यांचा ज्या शासकीय-सामाजिक मुर्दाडपणावर राग होता, त्या सरकारचे, समाजधुरीणांचे वागणे खरे देशद्रोही आहे. पण आज ढाले सुटले नसते. त्यांना पोलिसांनी पकडले असते, कोर्टात वकिलांनी मारले असते, ती क्रिया पोलिसांनी हात बांधून पाहिली असती, आणि डझनावारी शासक-मंत्री गळा काढून “लोकभावना दुखावल्याचा नतीजा पाहा!” असे म्हणाले असते. कारण?

कारण आपण विद्यापीठे घडवतो, विश्वविद्यालये नाही!

अभिप्राय 2

  • म्हणण्यावर चर्चा झालीच पाहिजे त्यातून बरेच काही कळते आणि म्हणून असे लेख प्रश्न निर्माण करतात आणि त्यातून उत्तरे मिळतात

  • इथे विषय आधी पक्का करून मग लेख आणि लेखाचा भवताल तयार केला गेलाय . त्त्यामुळे डेफ्थ किंवा आशयघनता या लेखाला यायला हवी होती ती आली नाही . बालिश पातळीवर हा लेख राहिला.
    आणि predefined राजकीय काॅमेंटवर संपला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.