संपादकीय

दिवस चर्चांचे आहेत. शेकडो माध्यमांतून हजारो विषयांवर चर्चा झडत आहेत व लाखो लोक त्यांत हिरीरीने भाग घेतानाही दिसत आहेत. पण त्यातील बहुतेक चर्चा त्याच त्या रिंगणात अडकल्याचे आपल्याला जाणवते. दुष्काळासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलतानाही मुळात अवर्षण आणि दुष्काळ यांचा संबंध, माती व पाण्याचे नियोजन, समाजातील विविध घटकांचे परस्परसहकार्य व समन्वयन, पीकपद्धतीत बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे चर्चा सरकत नाही. लातूरला पाण्याची ट्रेन नेली जाते ह्याचे माध्यमांतून प्रचंड कौतुक केले जाते. पण अशी ट्रेन आपण किती ठिकाणी नेऊ शकतो, किती काळ असे पाणी पुरवू शकतो, कानाकोपऱ्यांत विखुरलेल्या खेड्यापाड्यांत पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठीच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था कशी करायची ह्या प्रश्नांची चर्चा घडतच नाही. ह्या वैचारिक साचलेपणाची चिकित्सा व्हायलाच हवी.

एकतर बहुतेक चर्चा ह्या बाजारशरण माध्यमांतून घडत असतात. त्यामुळे त्यांच्यावर बाजाराचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दडपण असते. आता बहुतेक सारीच माध्यमे बाजाराच्या प्रत्यक्ष दडपणाखाली येतील अशी चिह्ने दिसू लागली आहेत. पी साईनाथ ह्यांच्या मते येत्या पाच वर्षांत मुकेश अंबानी हे देशातील प्रत्येक पत्रकाराचे मालक झालेले असतील. अशा वेळी अंबानी, मल्या ह्यांच्या उद्योगांनी सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवल्याच्या बातम्या बाहेर येणे अशक्यच होऊन बसेल. त्याचबरोबर सरकार व उद्योग ह्यांच्यावर अवलंबून न राहता छोटे छोटे समूह स्व-प्रयत्नांनी, सामूहिकतेची कास धरून आपले प्रश्न कसे सोडवू शकतात ह्याची उदाहरणे लोकांसमोर येणेदेखील बंद पडलेले असेल. ह्या सर्व प्रक्रियेला केव्हाच सुरुवात झालेली आहे,

कितीतरी बातम्या आपल्यापर्यंत पोहचतच नाहीत. कारण व्यवस्थेचे ‘ते’ रूप आपल्यापर्यंत यावे ही माध्यमांची इच्छा नसते. स्मार्ट सिटी व बुलेट ट्रेनच्या बातम्यांच्या पुरात भूमिगत गटारांचे काम करताना दर वर्षी हजारो कंत्राटी सफाई कामगार (तेही विशिष्ट जातीचेच) मृत्युमुखी पडतात ही बातमी बाहेर येतच नाही. नदी जोडणी प्रकल्पाच्या कौतुकात सरदार सरोवर प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहार ह्या विषयावरील सरकारी आयोगाचा अहवाल झाकला जातो. राजकारण हे अर्थकारणाचे सर्वात संपृक्त रूप आहे, हे ध्यानात घेतले की आजच्या भीषण परिस्थितीत जुने-नवे राजकीय नेते ऊस लागवड व मद्य-उद्योग ह्यांना पाणी पुरवठा करण्याचे समर्थन का करतात हे लक्षात येऊ शकते.

‘आजचा सुधारक’च्या ह्या अंकात आमच्या ह्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसेल. संजय संगवई ह्यांच्या लेखमालेचा उत्तरार्ध शास्त्रीय संगीताच्या इतिहासाकडे, किंबहुना भारताच्या सांस्कृतिक इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी आपल्याला देईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात भरपूर लिखाण प्रकाशित झाले. पण त्यात ज्या प्रश्नांची चर्चा झाली नाही त्यांचा परामर्श सुरेश सावंत ह्यांनी आपल्या लेखात घेतल्याचे आपल्याला दिसेल. नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे ह्यांच्यातील महत्त्वाचे संशोधन व त्यांचे सामाजिक परिणाम ह्या विषयावरील लेखन सातत्याने प्रकाशित करण्याची आमची परंपरा धनंजय मुळी ह्यांच्या लेखातून पुढे जाताना आपल्याला दिसेल. सध्याच्या विमर्शातील डाव्या-उजव्या द्वंद्वाला छेद देणारा उत्पल व. बा. ह्यांचा लेख आत्मशोध व प्रतिवादाक्डून संवादाकडे केलेला प्रवास ह्यांचे मनोज्ञ दर्शन घडवितो. राजस्थानातील एक ग्रामवासी चतरसिंग जाम ह्यांचा लेख तर भल्या भल्या अर्थशास्त्रज्ञांची व कृषितज्ज्ञांची भंबेरी उडवेल असा आहे.

आम्हाला भोवतालच्या परिस्थितीहून अधिक चिंता आमच्या वाचकांच्या संवादहीनतेची वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.