गांधी, मार्क्स, आंबेडकर: परस्परपूरकता शोधू या

गांधी, मार्क्स, आंबेडकर, परस्परपूरकता
—————————————————————————–
मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखून आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आव्हान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे कसे आवश्यक आहे ह्याची अभिनिवेशहीन मांडणी
—————————————————————————–

गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने तर आंबेडकर-मार्क्स वादाला नवी फोडणी बसली. या सगळ्या चळवळीकडे सजगपणे पाहणारा व त्यात सक्रिय सहभाग घेणारा एक कार्यकर्ता म्हणून या वादाकडे पाहताना मला काही केल्या कळत नाही की, आजच्या टप्प्यावर या वादाचे प्रयोजन काय? हे वाद ऐतिहासिक आहेत. ते तीव्र आहेत. त्यांचा निरास होण्याची सुतराम शक्यता नाही. मग तरीही या तिघांना एकत्र गुंफण्याचे कारण काय? हो. कारण आहे. या तिघांच्या उद्दिष्टांत सामायिक असणाऱ्या काही महत्त्वाच्या उद्दिष्टांना जोरदार धडका देणारी त्सुनामी सध्या उसळली आहे. जे सामाईक आहे, त्याच्या रक्षणासाठी या तिघांच्या वारसदारांनी एकजुटीत येणे ही काळाची गरज आहे. यात प्रत्येकाने आपल्या वैचारिक भूमिका पातळ करण्याचा, सोडण्याचा प्रश्न येत नाही. तसेच जे सामायिक आहे, त्यासाठी या तिघांच्या तत्त्वज्ञानाचा, वैचारिक भूमिकांचा समन्वय करत बसण्याचीही गरज नाही. गरज आहे ती केवळ परस्परपूरकता शोधण्याची. हा शोध मात्र प्रामाणिक व पारदर्शी असायला हवा. त्यात कोण कोणाला आपल्याकडे खेचते आहे, फशी पाडून आपल्या गोटात आणते आहे, असे वाटता कामा नये. खरं म्हणजे, आपल्याला खेचले जाते आहे, फशी पाडले जाते आहे, ही भावना आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्येच प्रकर्षाने आहे. आणि ती निराधार नाही.

बाबासाहेबांचे भारताच्या राजकीय क्षितिजावर आगमन झाले, त्यावेळी गांधीजींचा सूर्य मध्याह्नी तळपत होता. बाबासाहेबांनी या सूर्याला आह्वान देणे, हे प्रचंड धाडसाचे व पराकोटीचे दडपण आणणारे होते. ते त्यांनी केले. वर्णाश्रमधर्माचे पाठीराखे महात्मा गांधी अस्पृश्यता नष्ट करून हिंदुधर्म स्वच्छ करू पाहत होते. स्वातंत्र्य चळवळीतील आपल्या अन्य सहकाऱ्यांची प्राधान्यक्रमाविषयी नाराजी असतानाही अस्पृश्यताविरोधी जागरण हे राजकीय लढ्याचे अभिन्न अंग त्यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी अपार कष्टही घेतले. बाबासाहेबांनी हिंदू धर्मावरच आघात चढवले. हिंदुधर्मातील जातिव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यांना मुक्ती नाही, अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच, सार्वजनिक तळी, मंदिरे खुली करण्याच्या सत्याग्रहांनंतर जोवर हिंदुधर्म आहे, तोवर जाती असणार, जाती असणार तोवर अस्पृश्यता असणार या निष्कर्षाला ते आले. हिंदुधर्म त्यागणे हाच त्यांना उपाय वाटला. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसहित बौद्ध धम्म स्वीकारला.
गांधी-आंबेडकरांतील या वादाचा त्यांच्या काळात त्यांनी निरास केला नाही, तो त्यांच्या मृत्यूनंतर कसा करायचा? हे त्यांच्यातील वैचारिक मतभेद होते. ते आजही कबूल करावेच लागतील. त्यांच्या वारसदारांतही ते राहतील. ते तसेच व तेवढेच तीव्र राहतील असे नाही. गांधींची वर्णाश्रमधर्माची व जातिव्यवस्थेबाबतची मते आजच्या गांधीवाद्यांना मान्य आहेत, असे नव्हे. पण गांधीजींना अभिप्रेत उन्नत मूल्यांवर आधारलेला सनातन हिंदुधर्म हा कट्टर हिंदुत्वाची घोडदौड रोखण्यासाठी पर्याय आहे, असे त्यांना वाटू शकते. या दोन्ही बाबी आंबेडकरी कार्यकर्त्यांना अमान्य असू शकतात.

पुणे करार: एक अपरिहार्यता
काही ऐतिहासिक बाबींचे मात्र आज मापन करून कोण बरोबर कोण चूक हे ठरवता येणे कठीण असते. त्यातील एक पुणे करार. तेव्हा मी असतो तर कोणाच्या बाजूने उभा राहिलो असतो? अर्थात बाबासाहेबांच्या बाजूने. याचे कारण मी दलित आहे. आपल्या अवनत अवस्थेला राजकीय अधिकारांच्या साहाय्याने नष्ट करण्याची‘आता नाही तर कधीच नाही’ अशा कोटीतली ती संधी होती. ही संधी घेणे म्हणजे ब्रिटिशांचे पाठीराखे होणे नाही. आम्हालाही देश स्वतंत्र होणे हवे आहे. पण देशाला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही पारतंत्र्यात राहणे आम्हाला मंजूर नाही.

पण मी सवर्ण व स्वातंत्र्य-चळवळीतील एक कार्यकर्ता असतो तर? नक्कीच गांधीजींच्या बाजूने असतो. आधीच मुस्लिम लीगने मुस्लिमांना अलग करून स्वातंत्र्य-चळवळीत खिंडार पाडलेले असताना अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाद्वारे हे दुसरे खिंडार पाडणे म्हणजे स्वातंत्र्याचा लढा कमजोर करणे होय, ही माझी भूमिका असती. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देऊनही दलितांचे उत्थान साधता येईल. आणि देश स्वतंत्र झाल्यावर तर आपण हे सगळे करूच. आज आपली जूट टिकविणे कळीचे आहे. दलित म्हणून माझा जो अनुभव पारतंत्र्यातील इंग्रजांच्या कायद्याच्या राज्यात भोवतालच्या सवर्णांबाबत होता, तो पाहता याच सवर्णांच्या हातांत सगळी सत्ता आल्यावर आमचे काय होईल, ही बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहणाऱ्या माझी भीती होती.

अशा वातावरणात बाबासाहेब व गांधीजी या दोहोंच्या अनुयायांना परस्परांच्या नेत्यांविषयी चीड येणे हे अगदी स्वाभाविक आहे, हे मात्र काळाच्या या टप्प्यावर समजून घेणे शक्य आहे. गांधीजींसारख्या देशाचे आराध्य असलेल्या नेत्याचे उपोषणाद्वारे प्राण गेल्यास होणारा देशभरच्या दलितांवरील परिणाम लक्षात घेऊन बाबासाहेबांनी माघार घेणे, स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा कबूल करणे यापेक्षा प्राप्त स्थितीत उत्तम निर्णय कोणता असू शकला असता, हे मला कळत नाही.

या निर्णयाविषयी बाबासाहेब म्हणतात- ‘हिंदूंना करार आवडला नाही आणि अस्पृश्यांना तो अनुकूल नव्हता. असे असतानाही दोन्ही पक्षांनी पुणे कराराला मान्यता दिली.’

ही दोन्ही बाजूंची माघार व सन्मान्य तडजोड असली तरी दलितांना हा पराभव वाटणे व त्यातही दलित म्हणून या पराभवाची वेदना अधिक जाणवणे हे स्वाभाविक आहे. काहींना हा पराभव आजही बोचत राहणे हेही मला समजू शकते. पण वर्तमानाच्या आजच्या टप्प्यावर त्यातच अडकून पडणे व गांधीजींना शिव्या देणे हे गैरवाजवी आहे. या शिव्या देण्यात हा करार करणाऱ्या बाबासाहेबांचाही आपण उपमर्द करतो, हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. या बाबी ऐतिहासिक संदर्भात पाहणे नाकारल्याने मित्रशक्ती गमावून आपणच आपली ताकद खच्ची करत असतो.

स्वातंत्र्यानंतर बदललेल्या भूमिका
गांधीजींशी बाबासाहेबांचे मतभेद काय होते, ते किती तीव्र होते, हे आपण पाहिले. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य काँग्रेसला मिळालेले नसून देशाला मिळाले आहे आणि म्हणून पहिल्या मंत्रिमंडळात देशातील विविध राजकीय प्रवाहांचे प्रतिनिधित्व असायला हवे ही भूमिका घेण्यात गांधीजींचा पुढाकार होता. बाबासाहेबांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्याची सूचना गांधीजींची होती, असे काही इतिहासकारांनी नोंदवले आहे. घटना-समितीत बाबासाहेब निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यावर दुसऱ्यांदा ते निवडून आले ते मुंबई इलाख्यातून. यासाठीचे सहकार्य काँग्रेसने दिले होते. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब निवडले गेले. यामागेही गांधीजी होते, असेही हे इतिहासकार म्हणतात. लखलखीत गुणवत्तेमुळेच बाबासाहेबांना हा बहुमान मिळाला, हे उघडच आहे. तथापि, राष्ट्रीय हिताचा विचार करताना मतभेद आड येऊ देता कामा नये, या गांधीजींच्या भूमिकेचा यथोचित आदरही करायला हवा.

ज्या मूल्यांवर आधारित संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेब हवे असे गांधीजींना वाटत होते, ती मूल्ये या दोघांची समान होती. संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद झालेली ती हीच दोहोंची सामायिक मूल्ये. जर त्या काळात तीव्र मतभेद असतानाही या सामायिक मूल्यांसाठी ते एकमेकांना सहकार्य करत होते, एकत्र काम करत होते, तर आज ही मूल्ये धोक्यात आलेली असताना त्यांच्या वारसदारांनी परस्परांत तसेच सहकार्य का करू नये? बाबासाहेबांनी जर त्यावेळी गांधीजी किंवा नेहरू यांच्या सगळ्या भूमिका पटल्या तरच मी घटना लिहीन अशी अट ठेवली नाही किंवा गांधी-नेहरूंनी बाबासाहेबांकडून ठेवली नाही, तर आपण तरी ती आज का ठेवावी? ते जसे परस्परपूरक राहिले, तसेच आपणही राहू शकतो.

काठमांडूचे बाबासाहेबांचे भाषण ‘बुद्ध आणि मार्क्स’ यात बाबासाहेबांनी मार्क्स व बुद्धाचे लक्ष्य एक असले तरी मार्ग वेगळे आहेत, मार्क्सचा मार्ग हिंसेचा आहे, बुद्धाचा अहिंसेचा आहे, म्हणून तो अधिक योग्य आहे, अशी मांडणी केली आहे. मूळ मार्क्सने काय म्हटले यापेक्षाही मार्क्सवादी क्रांत्यांतील रक्तरंजित व्यवहार बाबासाहेबांना आक्षेपार्ह वाटतो. देशातील कम्युनिस्टांनी जातीच्या लढ्याला दुय्यम लेखणे, जातिव्यवस्था ही फक्त श्रमाची नव्हे, तर श्रमिकांची विभागणी आहे हे लक्षात न घेणे यावर बाबासाहेबांचा आक्षेप आहे. ५२ च्या निवडणुकीतील ‘मते कुजवा’ या डांगेंच्या आवाहनाने बाबासाहेबांच्या पराभवाला जो हातभार लागला, त्याने कम्युनिस्ट व बाबासाहेब यांच्यातली दरी अधिकच रुंदावली.

बाबासाहेब संसदीय लोकशाहीचे भोक्ते, तर कम्युनिस्टांनी आपद्धर्म म्हणून तीस मान्यता देणे (काही कम्युनिस्ट गटांना तर हा आपद्धर्मही मान्य नाही.) हा मोठा तात्त्विक मतभेद दोहोंत होता. आजही तो आहे. पण कम्युनिस्टांकडून आंबेडकरी जनतेशी संबंध जोडताना त्याबाबत स्पष्ट व पारदर्शक मांडणी होताना दिसत नाही. मतभेद स्पष्ट नोंदवून स्वतंत्र मजूर पक्षकाळातील बाबासाहेबांचे सर्व कष्टकऱ्यांना एकवटणाऱ्या आंदोलनाच्या स्मृती जागवून त्यावर एकत्र येणे म्हणजेच दोघांतले सामायिकत्व शोधणे होय. हे होत नसल्याने सतत संशयाचे भुंगे आंबेडकरी कार्यकर्त्यांचे मन कुरतडत राहतात.

बरे, यात काहीजण चलाखीने बाबासाहेब व गांधीजींच्या मतभेदाचा वापर करतात. गांधीजींची अहिंसा बाबासाहेबांना मान्य नव्हती, असे म्हणत वर्गशत्रूचा निःपात करताना हिंसा आवश्यकच असते, याला जणू बाबासाहेबांची संमतीच आहे, असे भासवतात. आपल्या प्रचारसाहित्यात बाबासाहेबांची एका हातात घटना व दुसऱ्या हाताचे बोट उंचावलेली प्रचलित प्रतिमा किंचित बिघडवतात. उंचावलेल्या बोटाच्या जागी वळलेली मूठ दाखवतात. यातून सनदशीर लोकशाहीऐवजी व्यवस्था उलथवणाऱ्या विद्रोहाचा संदेश बाबासाहेबच देत आहेत, असा आभास तयार होतो. यांच्या कलापथकाचा वेश निळा असतो, पण गाणी मात्र जहाल क्रांतीची असतात. कष्टकऱ्यांच्या, पीडितांच्या न्यायासाठी त्यागपूर्वक लढणाऱ्या या जहाल कम्युनिस्टांकडे आंबेडकरी समूहातील कोवळी तरुण मुले आकर्षित होत असतात. बाबासाहेबांच्या मूळ साहित्याचा परिचय नसल्याने व एकूण आंबेडकरी चळवळ विशीर्ण-विदीर्ण झालेली असल्याने या जहाल मंडळींबाबत समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या आंबेडकरी युवकांना आपलेपणा वाटणे स्वाभाविक आहे. या मुलांतील काहींचा प्रवास मग अधिक जहाल कारवायांकडे होतो. काही क्रमात जाणते होऊन तो मार्ग पकडतात. काहींना फसगत झाल्याचे उशीरा कळते. काही परततात. काहींचा परिस्थितीनेच परतीचा मार्ग बंद होतो. भल्या उद्दिष्टासाठी का होईना पणमाणसाच्या माणूसपणाला कमी लेखून त्याला साधन म्हणून वापरण्याची ही रीत मला क्रूर व अनैतिक वाटते.

‘भीम पुतळ्यात बंद केला बाई!’
मार्क्स, गांधी, आंबेडकर ही माणसे होती. त्यांच्या मांडणीला कमीअधिक काळाच्या मर्यादा पडू शकतात. त्यांच्या मांडणीतील जे आता गैरलागू असेल ते सोडणे, उपयुक्त असेल ते टिकवणे व काहींचा विकास करणे यातूनच वर्तमान आह्वाने पेलण्याचा विचार व कार्यक्रम मिळू शकतो. ही ऐतिहासिक दृष्टी व संदर्भ हरवले की महामानवांना देवत्व व पावित्र्य येणे सुरू होते. त्यांच्या मांडणीवर कोणी टीका केली की त्यांचे अनुयायी (एव्हाना ते भक्त झालेले असतात) खवळून उठतात. गांधी या बाबत सुदैवी आहेत. त्यांच्यावर कोणीही कशीही टीका करू शकतो. त्यांचे विडंबन करू शकतो. मार्क्सही टीकेला-चिकित्सेला पात्र होतो, त्यामुळे तोही तसा भाग्यवान आहे. बाबासाहेब मात्र अत्यंत दुर्दैवी आहेत. विचारवंताला त्याच्या आयुष्यातच चांगला टीकाकार मिळणे, हे भाग्याचे असते, असे मानणाऱ्या बाबासाहेबांना हे भाग्य त्यांच्या समाजाने मिळू दिलेले नाही. पर्यायाने, त्यांच्या मांडणीचा विकास होऊ दिलेला नाही. संभाजी भगतांच्या गाण्याचा आधार घेऊन म्हणायचे तर ‘भीम पुतळ्यात बंद केला बाई!’

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतरची आंदोलने व कन्हैयाच्या संदर्भातली आंदोलने यांत निळा-लाल सहकार्याची मांडणी होऊ लागल्यावर आंबेडकरी समुदायातील एका शिक्षित विभागात अस्वस्थता पसरू लागली. (उदित राज व आठवले हे आंबेडकरी बाण्याचे नेते भाजपला मिळाले व खासदार झाले यामुळे येणारी अस्वस्थता ही या तुलनेत अगदीच मामुली.) काहींना हे नेहमीप्रमाणे ‘बामणी कारस्थान’ वाटले. त्यासाठी कन्हैयाच्या जातीचा खरा-खोटा शोध घेतला गेला. काहींना संघपरिवाराचा धोका लक्षात घेता कन्हैयाने दिलेले आह्वान आश्वासक वाटले. पण त्याच्या घोषणेतील ‘जयभीम-लाल सलाम’ ही संयुक्तता त्यांना रुचली नाही. कम्युनिझम हा निकामी (काहींच्या मते धोकेदायक) आहे, तो सोडून कन्हैया आंबेडकरवादाकडे येत असेल तरच आम्ही त्याचे स्वागत करू. इथे आंबेडकरवाद हीच जगाला तारणारी एकमेव विचारसरणी आहे, तिच्याकडेच सगळ्यांनी आले पाहिजे, अन्य पुरोगामी विचारधारांशी तिची जूट बांधणे हा बाबासाहेबांच्या विचारांशी द्रोह आहे, हे गृहीत आहे. खरे म्हणजे, आपले तेच श्रेष्ठ मानणारी ही भूमिका हाच आंबेडकरवादाशी द्रोह आहे.
ही अहंता व हा कर्मठपणा यापासून आजादी, मार्क्स, गांधी, आंबेडकर तसेच अन्य महामानव यांच्या वैचारिक समन्वयाचा आग्रह न धरता त्यांच्यातील परस्परपूरकत्व शोधणे व त्या पायावर व्यापक एकजुटीचा कार्यक्रम आखणे आणि आपल्या संविधानातील प्रगत मूल्यांना आह्वान देणाऱ्या शक्तींना पराभूत करणे हा संकल्प बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने आपण करायला हवा. कन्हैया कशाकशापासून आजादी हवी आहे, त्याच्या घोषणा देतो आहे. ही आजादी प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या वाटेवर असा हा संकल्प एक सशक्त पाऊल नक्की ठरेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.