धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग २)

ख्रिश्चन धर्म, रोमन कॅथॉलिक, पोप फ्रान्सिस
—————————————————————————-
प्रत्येक धर्मातील परंपरा व परिवर्तन ह्यांच्यातील संघर्षाचा वेध घेणाऱ्या लेखमालेतील कॅथॉलिक पंथातील ह्या प्रक्रियेचे चित्रण करणारा व त्यातील पोप फ्रान्सिस ह्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारा हा लेख..
—————————————————————————–

हिंदू धर्माच्या मोकळ्याढाकळ्या रचनेमुळे, अनेकेश्वरी उपासनापद्धतींमुळे व सर्वसमावेशक लवचिकतेमुळे त्यात परंपरा आणि परिवर्तन ह्यांमधला लढा दीर्घकाळ चालत राहू शकला. इंग्रजी राजवट आल्यावर येथील सामाजिक-राजकीय -आर्थिक संरचनांना मुळापासून हादरे बसले व त्यातूनच हिंदू धर्मीयांनी आपल्या धर्माच्या चिकित्सेला प्रारंभ केला. भक्तिसंप्रदायाचा वारसा मानणारे गांधी-विनोबा-साने गुरुजी, अन्य पुरोगामी परंपरांतून आलेल्या अरविंद –विवेकानंद-कृष्णमूर्ती प्रभृतींनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाची व आचाराची पुनर्मांडणी केली. फुले-आगरकर-पेरियार-राममोहन रॉय इ. विवेकवादी सुधारकांनीही सुशिक्षित हिंदूंचे मानस परिवर्तनासाठी अनुकूल बनविले. ह्या साऱ्यामुळे विसाव्या शतकात इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्म हा अधिक गतिमान, परिवर्तनशील, व विज्ञानाभिमुख राहू शकला.
त्या तुलनेत ख्रिश्चन धर्माची स्थिती कठीण होती. युरोपमध्ये प्रबोधनाला (renaissance) प्रारंभ झाला व विज्ञानाने धर्माला अतिशय अवघड प्रश्न विचारले तेव्हाच बायबलमधील सृष्टिनिर्मिति- सिद्धान्ताला हादरे बसू लागले. पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे, ईश्वराने सहा दिवसांत सृष्टीची निर्मिती केली, मानवप्राणी ही खुद्द ईश्वराची निर्मिती आहे, ह्या साऱ्या कल्पना मोडीत निघाल्या. पण अनेक शतके जगातील बहुतेक प्रदेशांवर राज्य केल्यामुळे तसेच ‘आपणच ईश्वराचे लाडके पुत्र’ अशी स्वतःची समजूत करून घेतल्यामुळे विज्ञान व जगातील बदलती राजकीय-आर्थिक समीकरणे ह्यांनी उभे केलेले प्रश्न ह्यांच्या आरशात पाहून स्वतःला बदलण्याऐवजी ख्रिश्चनधर्माच्या अध्वर्यूंनी ग्रंथप्रामाण्याची व हटवादीपणाची भूमिका घेतली.
ख्रिश्चनधर्मदेखील एकसंध नाही. रोमन कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट हे त्यातील दोन मुख्य पंथ व अनेक उपपंथ आहेत . (भारतात तर जातीनिहाय वेगळी चर्चेसही आहेत.) त्यांपैकी रोमन कॅथॉलिक पंथ हा अधिक जुना व कट्टर. प्रॉटेस्टंट पंथाचा जन्मच मुळात रोमन कॅथॉलिक चर्चच्या कट्टरतेविरुद्ध बंड पुकारण्यातून (protest) झाला असल्यामुळे त्याला परिवर्तनाचे थोडेतरी वारे लागलेले आहे. पण रोमन कॅथॉलिक चर्च म्हणजे सनातन्यांचा बालेकिल्ला. त्याचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनला स्वतंत्र राज्याचा (देशाचा) दर्जा आहे. ह्या चर्चची – धर्माचे नियमन करणाऱ्या संस्थेची – बांधणी चिरेबंदी पद्धतीने करण्यात आली आहे. येथील धर्मसत्ता व राज्यसत्ता आधी एकच होती, नंतरही त्या हातात हात घालूनच चालल्या. त्यामुळे चर्चचे संघटन स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत श्रेणीबद्धतेने उभे राहिले. विविध पातळ्यांवरील धर्मोपदेशकांची निवड, प्रशिक्षण, धर्माचा प्रचारप्रसार, नित्य-नैमित्तिक धार्मिक सोहळे ह्यांचे आयोजन, अर्थकारण, राजकारण व व्यवस्थापन ह्या साऱ्यांची एक सुनिश्चित पद्धत लावण्यात आली. चर्च हे केवळ ह्या पंथाच्या अनुयायांचे प्रार्थनास्थळ नाही, तर ते त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचे व राजकीय शिक्षणाचेही केंद्र असते. अशा रीतीने चिरेबंदी रचना, उपासनापद्धतीचे ठाशीव स्वरूप व अमर्याद राजकीय सत्ता/राज्याश्रय लाभल्यामुळे आलेला अहंकार ह्यांमुळे काळानुसार प्रवाही राहणे ख्रिश्चन धर्माला, विशेषतः रोमन कॅथॉलिक पंथाला शक्य झाले नाही.
विसाव्या शतकात रोमन कॅथॉलिक चर्चची विचारसरणी व आचारपद्धती ह्यांच्यावर अनेक हल्ले झाले, पण चर्चने आपले ‘मूळ धोरण’ काही सोडले नाही. त्याचा आपल्या अनुयायांच्या मनावरील पगडा काही अंशी कमी झाला, तरी कोट्यावधी लोकांवरील प्रभाव मात्र टिकून राहिला. ह्या चर्चवर कधी धर्मगुरूंनी लहान मुलग्यांचे ( व कधी स्त्रियांचे) लैंगिक शोषण केल्याचा, कधी चर्चने वसाहतवादास खतपाणी घातल्याचा, युरोपियन देशांच्या साम्राज्यवादास बळ पुरविल्याचा आणि करुणा हा ख्रिस्ताच्या उपदेशाचा गाभा विसरून तख्त-तिजोरी-तलवार ह्यांचे आश्रित बनल्याचा आरोप झाला. एकीकडे विज्ञानाचे, त्यातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाचे लाभ घ्यायचे, पण दुसरीकडे विज्ञानाला , वैज्ञानिक विचारपद्धतीला विरोध करायचा ह्यात चर्चला काही विसंगती वाटत होती असे दिसत नाही. अगदी २०१६ सालात, डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्ताला दीडशेहून अधिक वर्षे उलटून गेल्यावरही, अमेरिकेतील अनेक शाळा-कॉलेजांत उत्क्रांतीच्या सिद्धान्ताऐवजी बायबलमधला नवनिर्मितीचा सिद्धान्त कसा बरोबर आहे हे शिकविण्यात येते. त्यामागे रोमन कॅथॉलिक चर्चचे जबरदस्त राजकीय लॉबिंग आहे. ह्यावरून हा मुद्दा स्पष्ट व्हावा.
विसावे शतक उजाडले तेव्हा युरोपियन देशांच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नव्हता अशी स्थिती होती. जित राष्ट्रे ही असंस्कृत, रानटी आहेत; त्यांना अंकित करून उलट आम्हीच त्यांच्यावर कृपा केली आहे; कारण ह्या सर्वाना ‘आपल्याप्रमाणे’ नीट माणूस बनविणे हे गोऱ्या ख्रिश्चन माणसाचे सांस्कृतिक उत्तरदायित्व (white man’s burden) आहे, असे जे राज्यकर्त्यांना वाटत असे, त्यामागे चर्चची फार मोठी प्रेरणा होती. पण हे शतक अर्धे उलटेपर्यंत जगात प्रचंड उलथापालथ झाली. धर्म न मानणाऱ्या साम्यवादाने निम्म्या जगावर झेंडा रोवला. त्या विचारसरणीचा पाडाव झाल्यावरही निरीश्वरवादी विचारसरणी जगभरात, विशेषतः प्रगत पाश्चात्त्य देशांत मान्यता पावली. आशिया व अफ़्रिकेतले परतंत्र देश स्वतंत्र झाले. दलित-शोषितांना स्वतःचा आवाज सापडला. इंग्रज-पोर्तुगीज-फ्रेंच राज्यकर्ते हे मुक्तिदाते नसून शोषक होते, असे त्यांनी स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली. गर्भपाताविरुद्ध भूमिका घेणारे चर्च पुरुषी स्वैराचार व दमन ह्यांच्याविरुद्ध , धर्मगुरूंच्या अनैतिक वर्तनाविरुध्द भूमिका घेत नाही, चर्चच्या रचनेत स्त्रियांना कोठेच स्थान नाही ह्याचा निषेध करणारी स्त्री-चळवळ ह्याच काळात उदयाला आली. स्वतःला स्त्रीवादी धर्मशास्त्रज्ञ (feminist theologist) म्हणविणाऱ्या काहींनी तर ईश्वर हा केवळ पिता कसा असेल, तो तर माताही असला पाहिजे असे प्रतिपादन केले. १९७०-८० मध्ये लॅटिन अमेरिकेत आलेल्या मुक्तीचे धर्मशास्त्र (liberation theology) ह्या विचारसरणीने तर देव, धर्म आणि चर्च ह्यांच्याविषयी अत्यंत मूलभूत प्रश्न उभे केले. त्यांच्या मते येशू हा मुळात गोरगरिबांचा, दीन-दुबळ्यांचा मुक्तिदाता. तो सामान्य माणसांप्रमाणे, त्यांच्यातला एक होऊन, त्यांची सेवा करीत जगला व त्यांच्याच उद्धारासाठी मेला. त्यामुळे गरीब-दलित लोकांसाठी काम करणे, त्यांच्या व्यथा दूर करणे, त्यांच्या हक्कांसाठी लढणे ही सर्व धर्मकार्येच आहेत. किंबहुना अन्याय, शोषण, पृथ्वीचा संहार, युद्ध, विनाश ह्यांच्या विरोधात उभे राहणे हेच चर्चचे खरे काम असायला हवे, असे नवे धर्मशास्त्र ते मांडू लागले. ह्या विचारांचे धर्मगुरु जोवर हालअपेष्टा सहन करत सेवा कार्य करीत होते, तोवर चर्चला काही प्रश्न नव्हता. पण जेव्हा त्यांनी विकासाच्या नावावर होणारे विस्थापन, युद्धखोरी, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेले शोषण व प्रदूषण ह्या सर्वांविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली, तेव्हा सनातनी चर्चला ते अर्थातच मान्य झाले नाही. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस रोमन कॅथॉलिक चर्चची प्रतिमा ही स्त्री-पुरुषसमतेची विरोधक, विज्ञानविरोधी, अहंमन्य, आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी अशीच होती. तिसरे जग, स्त्रिया, गरीब, समलैंगिक,वंचित इ. समूह त्यांच्या विचारकक्षेत येत नाहीत, असे चित्र होते. अर्थात ह्या सर्व बाबींवर पुरोगामी भूमिका घेणारे प्रवाहदेखील चर्चमध्ये अस्तित्त्वात होते, पण ह्या संघर्षात परंपरा निःसंशय वरचढ ठरली होती. मात्र पोप फ्रान्सिस ह्यांनी अडीच वर्षांपूर्वी पोपपदाची सूत्रे ग्रहण केली आणि कोणाच्या ध्यानीमनी नसताना परिवर्तनाचा झंझावात सुरू झाला. आजही त्याचा जोर ओसरला नाही, उलट परिवर्तनाच्या विविध पैलूंविषयी अधिकाधिक सुस्पष्ट भूमिका घेत, आतापर्यंत झालेल्या बदलांना स्थैर्य देत, साऱ्या जगातील वंचितांशी, परिवर्तन इच्छिणाऱ्या समूहांशी नाते जोडत तो पुढेच जातो आहे. ह्या लेखातून त्याची धावती ओळख करून घेऊ .
पोप फ्रान्सिस हे लॅटिन अमेरिकेतून निवडले गेलेले पहिलेच पोप होत. ते ह्या जागी आल्या क्षणापासून त्यांचे वेगळेपण लोकांच्या मनावर ठसू लागले. त्यांनी त्या पदासोबत येणार सारा डामडौल नाकारला. व्हॅटिकनच्या बुरुजांवरून अधून मधून आध्यात्मिक प्रवचने देणारा हा धर्मगुरु नसून, लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणारा, कोणत्याही प्रश्नावर न्याय्य भूमिका घेण्यास न कचरणारा ‘कर्ता सुधारक’ आहे , हे लवकरच दिसून आले. कारण त्यांनी सर्वप्रथम हात घातला तोच सर्वांत कठीण व नाजुक प्रश्नाला. (सक्तीच्या) ब्रह्मचर्यातून मर्यादातिक्रमण घडते हा जगाचा अनुभव आहे, पण कोणताही धर्म ते मान्य करीत नाही. एखाद्या धर्माच्या अधिकारी पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याचे मान्य करणे म्हणजे जणू त्या धर्माची बेअब्रू झाल्याची जाहीर कबुली देणे. म्हणून, अशा बातम्या दडपणे, ‘हा आमच्या धर्माच्या बदनामीचा कावा आहे’ असे म्हणून संबंधित धर्मगुरूला पाठीशी घालणे इ. प्रकार आजवर सर्व धर्मांचे लोक करीत आले व त्यात निरपराध मुले व स्त्रियांचा हकनाक बळी जात राहिला. पोप फ्रान्सिस ह्यांनी प्रथमच असे गैरप्रकार घडल्याची जाहीर कबुली देऊन त्यासाठी संबंधितांची माफीही मागितली. त्यापुढे जाऊन असे प्रकार भविष्यात घडू नयेत ह्यासाठीची उपाययोजना त्यांनी जाहीर केली व त्वरित अंमलातही आणली. घडल्यास त्या घटनेची चौकशी करण्यासाठी त्यांनी सर्व स्तरांवर एक कायमस्वरूपी यंत्रणा तयार केली. सर्व पातळ्यांवरील धर्मोपदेशकांच्या प्रशिक्षणात ‘लैंगिक हिंसा व त्याबद्दलचा चर्चचा दृष्टिकोन’ ह्या विषयाचा समावेश केला. मुख्य म्हणजे ह्या सर्व तक्रारींची दाखल घेऊन तिची चौकशी करण्यासाठी त्यांनी एक पारदर्शक प्रणाली तयार केली व त्याची सूत्रे अशा हिंसाचाराची शिकार झालेल्या व त्याविरुद्ध काम करणाऱ्या (survivors of sexual violence ) स्त्रियांच्या गटाकडे दिली. ह्या एका विषयावरील कृतीने पोप फ्रान्सिस ह्यांच्या असामान्य धैर्य , सत्यनिष्ठा व कार्यकुशलता ह्या गुणांचा सर्वाना प्रत्यय आला.
त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. समलैंगिकता, अन्यधर्मीय व ख्रिश्चन ह्यांचे नाते, वसाहतवाद, कम्युनिझम, गरिबी, शोषण, पर्यावरणसंहार, ग्लोबल वॉर्मिंग, गर्भपात, स्त्रियांचे हक्क, स्त्रियांचे धर्मातील स्थान, विस्थापन व निर्वासित, पाप-पुण्य, आस्तिक-नास्तिक, स्वर्ग-नरक … जगातील असा कोणताही विषय नसेल ज्यावर पोप फ्रान्सिस ह्यांनी बेधडक, स्वच्छ व स्पष्ट भूमिका घेतली नाही. चर्चने निषिद्ध मानलेल्या अनेक गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक केल्या, अप्रवेश्य मानल्या गेलेल्या स्थानांना आवर्जून भेटी दिल्या. उदा. रशियातील orthodox church व व्हॅटिकन ह्यांचा गेली अनेक शतके उभा दावा होता. तो बाजूला सारून पोप फ्रान्सिस ह्यांनी रशियात जाऊन orthodox churchच्या प्रमुखांची भेट घेतली. ‘साम्यवादी’ बोलिव्हियाचा दौरा केला. त्यांच्या भाषणानंतर बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष ईव्हो मोराल्स ह्यांनी त्यांना लाकडावर कोरीव काम केलेली एक भेटवस्तू दिली – तिच्यावर कम्युनिझमचे प्रतीक असलेल्या विळा-हातोड्याची प्रतिकृती कोरली होती व येशू ख्रिस्त त्यातील हातोड्यावर विसावलेला दाखवला होता. गेल्या दोन वर्षांत त्यांनी व्हॅटिकनच्या व्यासपीठावर जगभरातील जनआंदोलनांच्या दोन परिषदा आयोजित केल्या, ज्यांत गरीब, जमिनीपासून वंचित झालेले शेतकरी व बेरोजगार ह्यांचा समावेश होता. ह्यांतील दुसऱ्या परिषदेत सन्माननीय वक्ता म्हणून ईव्हो मोराल्स ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या प्रसंगी क्युबातील ख्यातनाम क्रांतिकारक चे गव्हाराचे चित्र असलेले जाकीट मोराल्स ह्यांनी परिधान केले होते. (नागपूरच्या संघकार्यालयात सरसंघचालकांनी किंवा शृंगेरी पीठात शंकराचार्यांनी कन्हैया कुमारला किंवा एखाद्या जहाल स्त्रीवादी कार्यकर्तीला बोलावून त्यांचे भाषण आयोजित केले आहे, आणि वक्त्याने ‘देवीची पूजा करणाऱ्यांना स्त्रीचा विटाळ कसा काय होतो?’ असे लिहिलेला कुडता घातला आहे, अशी कल्पना करून पाहा.) खाली मी विविध विषयांवर पोप फ्रान्सिस ह्यांची काही उद्धरणे देत आहे, त्यावरून रोमन कॅथॉलिक चर्चमधील प्रस्थापितांना किती जबरदस्त धक्का बसला असेल ह्याची कोणालाही कल्पना करता येईल-
“मी तुम्हाला अतिशय दुःखाने हे सांगत आहे: देवाच्या नावाखाली आफ्रिकेतील स्थानिक रहिवाशांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची पापकृत्ये करण्यात आली . .. मी अतिशय नम्रपणे तुम्हा सगळ्यांसमोर क्षमायाचना करीत आहे – केवळ चर्चने केलेल्या अपराधांसाठी नव्हे, तर अमेरिकेचा तथाकथित पाडाव करताना येथील मूळ रहिवाशांच्या विरोधात जे कोणते अत्याचार करण्यात आले असतील, त्यांच्याबद्दलही … ते सर्व पाप होते, अमर्याद पाप !”
“ही (जागतिक) व्यवस्था आता असहनीय झाली आहे: शेतमजुरांना वकामगारांनाही ती असह्य वाटते, तिला सहन करणे समुदायांना अशक्य झाले आहे, लोकांना ती नकोशी झाली आहे .. खुद्द पृथ्वीला, पृथ्वीमातेलाही ती असह्य झाली आहे. .. (कारण) जगातील कोणत्याही प्रत्यक्ष किंवा प्रस्थापित सत्तेला सामान्य जनांना त्यांच्या स्वायत्ततेचा पूर्ण वापर करण्यापासून वंचित करण्याचा अधिकार दिलेला नाही. जेव्हा जेव्हा असे प्रयत्न केले जातात, तेव्हा तेव्हा वसाहतवादाची नवी प्रारूपे निर्माण होतात व त्यातून शांती व न्याय ह्यांना गंभीर धोका उद्भवतो. .. हा नवा वसाहतवाद विविध चेहऱ्यांनी आपल्यासमोर येतो. कधी तो बड्या कॉर्पोरेशन्स, (आंतरराष्ट्रीय) पत संस्था, ‘मुक्त व्यापारा’चे करार अशी निनावी रूपे घेतो, तर कधी ‘काटकसरीच्या उपायांचे’ रूप घेऊन तो गरिबांचे आणि कामगारांचे खपाटीला गेलेले पोट आणखी कसून बांधतो….(म्हणून ) आपण हे निर्भयपणे सांगितले पाहिजे की आम्हाला परिवर्तन हवे आहे- खरेखुरे परिवर्तन, व्यवस्था बदलणारे परिवर्तन . ज्या व्यवस्थेने कोणत्याही किमतीवर नफा मिळविण्याची मानसिकता निर्माण केली आहे, ज्या व्यवस्थेला लोकांच्या सामाजिक बहिष्काराचे किंवा निसर्गाच्या संहाराचे सोयरसुतक नाही, अशी व्यवस्था आपल्याला बदलायलाच हवी.”
“आम्हाला नम्रता, आत्मशोध व प्रार्थनापूर्वक केलेले चिंतन ह्यांतून काही प्रश्नांचा नवा अर्थ गवसला आहे. चर्च आता असे मानत नाही की जेथे (पापी) लोकांना यातना दिल्या जातात, असा नरक खरोखर कोठे अस्तित्वात आहे. कारण असा विचार हा परमकारुणिक ईश्वराच्या अमर्याद प्रेमाच्या संकल्पनेशी विसंगत आहे. ईश्वर हा मानवतेचा परीक्षक नसून तिचा मित्र व प्रिय सखा आहे. ईश्वर तुमचा धिक्कार करण्यासाठी नाही तर तुम्हाला मिठीत घेण्यासाठी आतुर आहे. आदम आणि ईव्हच्या गोष्टीप्रमाणे नरक हादेखील कल्पनेचा भाग आहे. नरक म्हणजे काय, तर अशी स्थिती ज्यात आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होऊ शकत नाही, तो ईश्वराशी अखेर एकरूप होणारच आहे, पण जेव्हा तो त्याच्यापासून दुरावतो, एकाकी पडतो, ती स्थिती म्हणजे नरक.”
“सर्व धर्म सच्चे आहेत, कारण त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तींच्या हृदयात ते खरोखर वास करतात. ह्यापेक्षा दुसरे सत्य ते काय? भूतकाळात चर्च त्यांना अनैतिक किंवा पापी समजत असे, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेत असे. आम्ही आता न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून लोकांचा न्यायनिवाडा करणे बंद केले आहे. एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे, आम्ही आमच्या बालकांचा कधीही धिक्कार न करता कायम त्यांच्यावर वात्सल्याचा वर्षाव करतो. आमचे चर्च व्यापक आहे. तिथे भिन्नलैंगिक व समलैंगिक (संबंध ठेवणारे), गर्भपाताचे समर्थक व विरोधी, सर्वांना जागा आहे. येथे पुराणमतवादी व उदारमतवादी दोघांसाठीही अवकाश आहे. अगदी कम्युनिस्टांचेही आम्ही स्वागत करतो व ते आमच्यात सामील झाले आहेत. आम्ही सर्व एकाच देवावर प्रेम करतो व त्याची आराधना करतो.”
“कॅथॉलिक पंथ हा आता आधुनिक व विवेकनिष्ठ धर्म आहे. आम्ही कालानुरूप उत्क्रांत झालो आहोत. आता सर्व प्रकारची असहिष्णुता त्यागण्याची वेळ आली आहे. धर्मातील सत्य हे काळानुसार उत्क्रांत होते, बदलते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अंतिम किंवा पाषाणात खोदून ठेवलेले असे कोणतेही सत्य नसते. अगदी नास्तिक माणूस झाला तरी तो प्रेमाच्या व परोपकाराच्या कृत्यातून देवाच्या अस्तित्वाला मान्यता देतच असतो. आपल्या चांगल्या वर्तणुकीतून तो स्वतःच्या आत्म्याची मुक्ती साधतो व त्याचबरोबर मानवतेच्या मुक्तीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होतो.”
“बायबल हा अतिशय सुंदर ग्रंथ आहे, पण इतर सर्व महान प्राचीन ग्रंथांप्रमाणे त्यातील काही भाग कालबाह्य झाला आहे. त्यातील काही भाग तर असहिष्णुतेला किंवा इतरांचा न्यायनिवाडा करण्यास प्रोत्साहन देतो. हा भाग बायबलमध्ये मागून घुसडण्यात आला आहे हे जाहीर करण्याची वेळ आली आहे. कारण संपूर्ण ग्रंथातून जो प्रेमाचा व सत्याचा संदेश प्रक्षेपित होतो, त्याच्याशी तो पूर्णपणे विसंगत किंवा विरोधी आहे. आम्हाला जे भान आले आहे, त्यानुसार आम्ही लौकरच स्त्रियांना धर्मोपदेशकाच्या विविध पदांवर- कार्डिनल, बिशप, प्रीस्ट – नियुक्त करू. मला अशा वाटते की भविष्यात पोपचे पदही स्त्री भूषवू शकेल. पुरुषांसाठी उघडा असणारा कोणताही दरवाजा स्त्रियांसाठी बंद राहता कामा नये.”
कॅथॉलिक पंथात इतके आमूलाग्र परिवर्तन इतक्या कमी काळात घडवून आणण्याची प्रेरणा पोप फ्रान्सिस ह्यांना कोठून मिळाली? त्यांनी सुचविलेले बदल किती काळ टिकून राहतील? बहुराष्ट्रीय कंपन्या, डोनाल्ड ट्रंपसारखे राजकीय नेते, चर्चमधील पुराणमतवादी ह्या सर्वांच्या एकत्रित विरोधाला व चर्चमधील अंतर्गत राजकारणाला ते किती काळ तोंड देऊ शकतील? असे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत. मला ह्या लेखमालेतून फक्त येवढेच सूचित करावयाचे आहे की कालबाह्य धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धा ह्यांविरुद्धचा विवेकवादाचा लढा केवळ निरीश्वरवादी /नास्तिक ह्यांच्या विचार-आचारांतूनच साकार होतो, असे नसून प्रत्येक धर्मात परंपरांचा व नवतेचा हा संघर्ष अविरत सुरूच असतो. ही लढाई कधीच निर्णायक स्वरूपाची नसते, म्हणून विवेकाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम प्रत्येक पिढीला प्रत्येक पातळीवर – देवघरात, रीतीरिवाज स्वीकारण्यात किंवा नाकारण्यात, कुटुंबात, समाजात, न्यायालयीन लढाईत – करावेच लागते.
सरतेशेवटी आपल्या सर्वांना पडायला हवा असा एकच प्रश्न –
विसाव्या शतकात तत्त्वज्ञान व आचार ह्या दोन्ही पातळ्यांवर स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून काळाच्या व विज्ञानाच्या प्रवाहाशी सुसंगत राहिलेला हिंदुधर्म आज त्या तुलनेत कोठे आहे? विवेकानंदांसारख्या बंडखोर संन्याशाला आम्ही आज ‘हिंदुत्ववादी’ बनवून टाकले आहे. अशा वेळी जागतिकीकरणाची आह्वाने पेलू शकेल, अशा विज्ञानाभिमुख नूतन हिंदू धर्माच्या उदयासाठी हिंदू धर्माला एखाद्या पोप फ्रान्सिसची गरज आहे का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.