मूठभर माती

शालेय विज्ञान, आयआयटी, उच्च शिक्षण
—————————————————————————–
आयआयटी म्हणजे अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांना तंत्रज्ञ-व्यवस्थापक पुरविणाऱ्या शिक्षणसंस्था हे गृहितक तितकेसे बरोबर नाही. आयआयटीच्या खुल्या वातावरणातून स्वतंत्र विचार करण्यास शिकलेल्या व गरीब वंचित मुलांना विज्ञान शिकविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या एका सच्च्या वैज्ञानिकाची जडणघडण व कार्य उलगडून दाखविणारे हे प्रांजळ आत्मकथन …
—————————————————————————–

“आणि कुठेतरी असे अभियंते आहेत,
जे इतरांना ध्वनीहून अधिक वेगाने उडायला मदत करतात.
पण जमिनीवर राहणे भाग असणाऱ्यांना साह्य करणारे
अभियंते कुठे आहेत?”
(ऑक्सफॅम संस्थेचे एक पोस्टर)

माझे आईवडील कधी शाळेत गेले नाहीत. माझ्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता आणि ते कायम कर्जात बुडालेले असत. माझी आई त्यांच्या धंद्यातील अडचणी ऐकून त्यांना योग्य सल्ला देई, जो त्यांनी कधीच मानला नाही. पण तिच्या शहाणपणाचा मला खूप फायदा झाला. तिच्यामुळे मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला व स्वतःचे मोल ओळखण्यास मी तिच्यामुळे शिकलो.
माझी आई एका उच्चशिक्षित कुटुंबातून आली होती. तिच्या सर्वात मोठ्या भावाने पन्नासच्या दशकात स्वित्झर्लंडमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. धाकटा भाऊ रॉकफेलर स्कॉलरशिप मिळवून उत्तर भारतातील पहिला पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिद्धी पावला होता. आग्रा मेडिकल कॉलेजातील तिन्ही सन्मान पटलांवर – सन्मान्य विद्यार्थी, सन्मान्य शिक्षक व सन्मान्य प्राचार्य- त्याचे नाव कोरलेले आहे.
माझ्या आईला शिक्षणाचे मोल माहीत असल्यामुळे आम्हा सर्व भावंडांना तिने बरेली (उ. प्र.) येथील सर्वोत्कृष्ट इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये टाकले. आम्हाला उत्तम शिक्षण मिळावे ह्याविषयी ती इतकी आग्रही होती की कर्जाचा बोजा वाढला तसे तिने आपले सर्व दागिने एकेक करत विकले, पण आमच्या अभ्यासात खंड पडू दिला नाही. मी अभ्यासात चांगली प्रगती केली व इंटरमीजिएटच्या परीक्षेत मी जिल्ह्यात पहिला आलो. बारावीनंतर मी आय आय टीची प्रवेश परीक्षा दिली व त्यात भारतात २१८वा (व उत्तर विभागात २८वा) क्रमांक मिळवून मी आय आय टी कानपूरमध्ये दाखल झालो. कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा ह्याबद्दल मला काहीएक कल्पना नव्हती. म्हणून मी माझ्याआधीच्या २७ विद्यार्थ्यांना त्याबद्दल विचारले. त्या सर्वांनी विद्युत-अभियांत्रिकीची निवड केली होती. अशा रीतीने ह्या शाखेत माझा प्रवेश झाला.
एका लहान गावातून आलेल्या माझ्यापुढे आय आय टी कानपूरच्या रूपाने माझ्यासाठी जादूची एक नवी दुनियाच उघडली. तिथल्या सुसज्ज इमारती, अचंबित करणाऱ्या सुविधा, ज्ञानी व सजग प्राध्यापक व उच्चभ्रू मित्रगण ह्यांमुळे मला कधी कधी त्या सर्व गोष्टींबद्दल भीतियुक्त आदर वाटे आणि त्यापासून एक विलगतेची भावनाही निर्माण होई. पण त्यामुळे शिकण्याच्या अनेक नव्या संधी
मला प्राप्त झाल्या. एकदा फिरायला गेल्यावर अखिलेश अग्रवाल ह्या माझ्या मित्राने पूर्ण तीन तास भाषण ऐकवून भारत-चीन युद्धाच्या असंख्य पैलूंशी माझा परिचय करून दिला. त्याचे ह्या विषयातील ज्ञान पाहून मी तर भारावून गेलो. आय आय टीत येण्यापूर्वी अखिलेशने ह्या विषयावरील सातही पुस्तके वाचली होती! अखिलेश हा कसबी बोटांचा माणूस होता. आम्ही दोघांनी मिळून त्या काळात बरेच उपद्व्याप केले- कॉम्प्रेस्ड एअर इंजिन किंवा वँकल इंजिन बनविणे, एरोमॉडेलिंगचे इंजिन दुरुस्त करणे इ. आम्ही दोघांनी मिळून मोजून तीन वर्षे आय आय टीत एरो मॉडेलिंग व ऑटो क्लब चालविला. लहानपणी मी फारसे वाचन केले नव्हते. आमच्या घरी वाचायला फारशी पुस्तके नव्हती. त्या काळात मी वाचलेले पुस्तक म्हणजे मॅक्सिम गॉर्कीची ‘आई’ ही कादंबरी. ती वाचून मी खूप रडलो होतो.
आय आय टी कानपूरमधील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिथले वाचनालय ! ते सकाळी ८ पासून मध्यरात्रीपर्यंत उघडे असे आणि आम्हाला त्यातून एका वेळी दहा पुस्तके घेता येत. मी तिथे भरपूर वाचन केले . मी रोज ६ वृत्तपत्रे वाचत असे. तिथे मला इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली (ईपीडब्ल्यु) वाचण्याचे व्यसन लागले. त्यातील अशोक मित्रांचे ‘Calcutta Diary’ हे सदर तर माझ्या भलत्याच आवडीचे. त्यामुळे मला माझे अनुभव वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास मदत मिळाली. आय आय टी च्या पाचही वर्षी मला मेरिट-कम-मीन्स शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे, माझ्या आईवडिलांना मला घरी ठेवण्यापेक्षा आय आय टीत धाडणे अधिक स्वस्त पडले!
१९७०चे दशक राजकीयदृष्ट्या अतिशय उलाथापालथीचे होते. पॅरिसमध्ये राज्यकर्त्यांना आव्हान देत विद्यार्थी रस्त्यांवर उतरले होते. अमेरिकेत व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ तसेच विविध नागरी चळवळी उत्पात घडवीत होत्या. रॅशेल कार्सनच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ ह्या पुस्तकाने पर्यावरणवादी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती. युद्धविषयक संशोधनात सहभागी न होण्याची शपथ बुद्धिजीवी घेत होते.
वातावरणात क्रांतीचा सुगंध होता. साचलेल्या समाजात ‘बहुधा गाळ वर तरंगतो’, पण राजकीय घुसळण होते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर सामाजिक ऊर्जा उत्पन्न होत असते.
मी पहिल्याच वर्षात राजकीय आंदोलनाच्या कामाकडे ओढलो गेलो. माझ्या प्रयोगशाळेतील शिक्षक व्ही जी जाधव ह्यांनी मला सांगितले की संस्थेच्या संचालकांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून आलेले विख्यात भौतिकशास्त्रज्ञ प्रा. ए पी शुक्ला ह्यांना त्यांच्या कर्मचारी संघातील सहभागामुळे नोकरीतून बडतर्फ केले आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी विद्यार्थ्यांनी एका मोच्याचे आयोजन केले होते. मी त्यात सहभागी होण्याचे ठरविले. मी बहुधा मोर्च्यातील वयाने सर्वांत लहान विद्यार्थी असेन, बाकीचे बहुतेक सारे एम टेक किंवा पी एच डी करणारे होते. आम्ही एका होस्टेलपासून दुसऱ्यापर्यंत फलक घेऊन मोर्चा काढला. मी अगदी नवखा होता आणि म्हणून मी एकटाच “कॉम्रेड्स्, बाहेर या” अशी घोषणा देत होतो. आमच्यातील काही वरिष्ठ विद्यार्थी ती घोषणा ऐकून अस्वस्थ झाले व त्यांनी मला गप्प बसविले. माझ्या दृष्टीने ‘कॉम्रेड’ शब्दाचा अर्थ मित्र, साथीदार एव्हढाच होता, त्यामुळे त्यांचे वागणे मला कळू शकले नाही. आम्ही मोर्च्याचा शेवट संचालकांच्या घरासमोर लघुशंका करून केला. ही बहुधा माझी पहिली राजकीय कृती असावी!
आय आय टी कानपूरमधील काही बुद्धिवंतांना नक्षलवादी आंदोलनाबद्दल सहानुभूती होती. अनेक कप चहा पीत व अनेक चारमिनार सिगारेट्स ओढत ते ‘वर्ग संघर्ष‘ आणि ‘राज्यशक्ती हिसकावण्या’बद्दल अखंड चर्चा करीत. तशा पोकळ गप्पा मला कधी आकर्षित करू शकल्या नाहीत. मला ते सर्व निरर्थक वाटे. मी म्हणे- “त्याऐवजी ते मेसमधल्या नोकरांसाठी काही काम का करत नाहीत? पहाटेपासून रात्रीपर्यंत ते आपली सेवा करतात तरी त्यांच्या मुलांना केंद्रीय विद्यालय किंवा कॅम्पस स्कूलमध्ये प्रवेश मिळत नाही.” आमच्यातल्या काहींना छोटी विधायक कृती करण्यात अधिक रुची होती. म्हणून मी सहयोग नावाच्या समूहात सहभागी झालो. आम्ही मेसमध्ये काम करणाऱ्या नोकरांच्या मुलांना शिकविण्याचे काम करीत असू. आम्ही एकेका खोलीवर जाऊन ह्या कामासाठी महिना पाच रुपये वर्गणी जमवीत असू, ज्यायोगे ‘एका गरीब मुलाला शाळेत जाता येईल.’ काहीजण दयाळू होते व ते मदत करत, काहीजण आमच्या तोंडावर दार आपटून आम्हाला घालवून देत. मी बराच काळ वंचित मुलांसाठी एका टाईप २ क्वार्टरमध्ये चालविलेल्या शाळेत शिकविण्याचे काम केले. त्याला आम्ही ‘ऑपॉर्च्युनिटी स्कूल’ असे नाव दिले होते.
टी ए- २०४ कोर्सअंतर्गत आम्हाला प्रकल्प करणे आवश्यक होते. आम्ही ठरविले की इतर लोक करतात तसा अखेरीस धूळ खात पडणारा ‘मूर्ख’ प्रकल्प आम्ही करणार नाही; उलट समुदायाला उपयुक्त ठरेल असेच काहीतरी आम्ही करू. म्हणून, मी व अखिलेश अग्रवालने ‘ऑपॉर्च्युनिटी स्कूल’साठी ‘सी सॉ’ बनविली. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून दोन खड्डे बनविले आणि अखेरीस आम्ही सी सॉ जमिनीत पक्की केली. आम्ही रोज संध्याकाळी ह्या मुलांना गृहपाठ करण्यात मदत करत असू. मी अखेरची तीन वर्षे हॉल ५ मध्ये काढली, जिथे मी नानकारी गावातील डझनभर मुलांना शिकवीत असे. त्या सर्वांनी शालान्त परीक्षा यशस्वीरीत्या पार केली.
१९७०च्या सुमारास डॉ मनमोहन चौधरींनी ‘ला मोन्ताज’ नावाने फिल्म क्लब सुरु केला. पाच वर्षात आम्ही कुरुसावा, बर्गमन, फेलिनी, डी सिका आणि सत्यजित रे ह्यांचे बहुतेक चित्रपट पाहिले. ‘वेजेस ऑफ फिअर’ आणि ‘द बायसिकल थीफ’ आम्ही किमान तीन तीन वेळेस पहिले असतील. आम्ही जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाहिले आणि देशातील सर्वोत्तम संगीतकारांच्या कलेचा आस्वाद घेतला. त्यांनी आमच्या संवेदनांना खूप प्रभावित केले. बहिःशाल व्याख्यानमालेअंतर्गत आम्ही डॉ अनिल सद्गोपाल, नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ गुन्नार मिर्डल आणि हिंदी साहित्यिक भीष्म साहनी अशा दिग्गजाना ऐकले. चांगली संस्था तुमच्या नकळत तुम्हाला प्रभावित करते. तुमच्यावर होणारे संस्कार तुमच्या नकळत तुमच्या त्वचेच्या रंध्रांतून तुमच्या शरीर-मनात प्रवेश करतात , तिथेच ठाण मांडून बसतात.
मला पहिल्या सेमिस्टरला इंग्रजी शिकवायला प्रख्यात विचारवंत-साहित्यिक सुझी तारू ह्या होत्या व ‘द लिट्ल प्रिन्स’ हे आमचे पाठ्यपुस्तक होते! आम्ही सामाजिक शास्त्रातील अनेक अभ्यासक्रम शिकलो- तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्यांनी आम्हाला कोणत्याही समस्येकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन पुरविले व एकाच संकुचित ‘तांत्रिक’ दृष्टीने सर्व प्रश्नांकडे पाहण्यातून आमची सुटका झाली. आय आय टीमुळे आम्हला सर्वंकष दृष्टी मिळाली, ह्यात शंकाच नाही.
त्या दशकाची व्याख्या करणारी घोषणा अशी होती-
“लोकांकडे जा,
त्यांच्यासोबत राहा, त्यांच्यावर प्रेम करा,
ते जे जाणतात, तेथून सुरुवात करा
त्यांच्याजवळ आहे, त्यावर उभारणी करा.”

प्रा. डी. बालसुब्रमण्यम ह्यांनी १९७२मध्ये डॉ. अनिल सद्गोपाल ह्यांना मध्य प्रदेशातील खेड्यातल्या मुलांना विज्ञान शिकविण्याचे त्यांचे अनुभव सदर करण्यासाठी आमच्या कॉलेजात आमंत्रित केले. त्यांच्या भाषामुळे मी बराच आंदोलित झालो. १९७५मध्ये मी पुण्यात टेल्को (सध्याची टाटा मोटर्स) येथे प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालो. दोन वर्षांनी मी ह्या निर्णयावर आलो की “ मी काही ट्रक बनविण्यासाठी जन्मलो नाही”; म्हणून मी १९७८ मध्ये एक वर्षाची रजा काढली आणि होशंगाबाद विज्ञानशिक्षण कार्यक्रमात काम सुरू केले. तेव्हा गावातील शाळांमध्ये प्रयोगशाळा नव्हत्या व विज्ञान केवळ घोकंपट्टी करून शिकविले जाई. स्थानिक, स्वस्त साधनांचा वापर करून, प्रत्यक्ष कृतीद्वारे विज्ञानशिक्षण रंजक बनविणे हा आमच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. पहिल्याच महिन्यात मी सायकलची व्हॉल्व ट्यूब व आगपेटीच्या काड्या ह्यांच्या मदतीने त्रिमिती आकार बनविणारा काडेपेटी मेकॅनो बनविला. त्यातून शालेय विज्ञान ह्या विषयाशी माझे नाते जे जुळले, ते आयुष्यभरासाठी!
कॉलेज जीवनात माझे आदर्श होते लॉरी बेकर! गरिबांच्या आयुष्याला ज्यांनी स्पर्श केला असे ते माझ्या माहितीतील एकमेव जीवित वास्तुविशारद होते. त्यांनी स्थानिक सामग्री व डिझाईन्सचा वापर करून गरीब मच्छिमारांसाठी त्यांना परवडणाऱ्या किंमतीत चांगली घरे बांधली. बेकर हे एक अजब रसायन होते- ते सतत हसत, विनोद करत, व्यंगचित्रे काढत; पण कामाच्या बाबतीत ते अतिशय गंभीर असत. मी ह्या महान माणसासोबत चार महिने काम केले.
मी टेल्कोत फार टिकू शकलो नाही. अनेक प्रश्न माझा पिच्छा पुरवीत असत. उदा.; “सर्वांत जास्त मेहनत करणाऱ्या माणसांना सर्वांत कमी पगार का मिळतो?” म्हणून मी १९८० साली टेल्को सोडली व ‘विदुषक कारखान्या’त सामील झालो. दुनु रॉय, सुधींद्र शेषाद्री आणि संजेव घाटगे ह्यांसारख्या संवेदनशील आयआयटीयन्सनी सुरू केलेले हे एक कम्युन होते. इथे आम्ही अतिशय साधे आयुष्य जगत होतो – आम्ही एकत्र जेवणे व जगणे, वर्कशॉप चालविणे, आणि साऱ्या जगातील समस्यांवर चर्चा करून त्यांची चिरफाड करणे हे आमचे आयुष्य होते. “जे जे व्यक्तिगत, ते ते राजकीय” ह्या घोषणेचा अर्थ मला तेव्हा उलगडला आणि माझ्या मनात खोल दडलेल्या प्रश्नांचा मागोवादेखील मला ह्याच काळात घेता आला.
१९८१-८३ ह्या काळात मी छत्तीसगढ येथील खाणकामगारांच्या संघटनेसोबत काम केले. तोपर्यंत ‘कंत्राटी कामगार’ आणि ‘शोषण’ हे माझ्यासाठी केवळ पोकळ शब्द होते. त्यांचा आशय जाणून घेण्यासाठी परिघावरील जीवन जगणाऱ्या कामगारांपैकी एक होऊन त्यांच्याचसारखे जगणे आवश्यक आहे असे मला वाटले. माझ्या आयुष्यातील ही तीन वर्षे अतिशय कठीण पण मला समृद्ध करणारी होती. अनेकदा मीठभात हे आमचे जेवण व युनियन ऑफिसची फरशी हा आमचा बिछाना असे. मी ‘मितां’ (मित्रहो!) नावाचे संघटनेचे मुखपत्र काढीत असे आणि ते खाणींच्या गेटवर विकत असे. त्यासोबतच मी ट्रक दुरुस्तीचे एक गॅरेज चालविण्यात युनियनला मदत करत होतो व त्यांच्या शाळेत शिकवीत होतो. ह्या सर्व गोष्टींतून मला गरिबांच्या आयुष्यातील गहन संघर्षाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
एकोणीसशे चौऱ्यांयशीत मी पुण्याला परतलो. आईवडिलांच्या आकांक्षांचे कोठलेही बंधन नसल्यामुळे मी आपल्या आयुष्याचा मार्ग आखण्यास स्वतंत्र होतो. तेव्हापासून आतापर्यंत मी स्वतःच्या आयुष्यातील श्रेयसाचापाठपुरावा केला आहे- विज्ञान शिक्षणासाठी स्वस्त साधने बनविणे आणि प्रयोगातून विज्ञान शिकविणारी डझनांनी पुस्तके लिहिणे. ‘बिमारू’ राज्यातून आलो असल्यामुळे हिंदीत चांगल्या साहित्याची किती कमतरता आहे, हे मला नीट माहित आहे. गेल्या काही वर्षांत मी शिक्षण, शांतता, विज्ञान, गणित आणि बालसाहित्य ह्या विषयांवरील शंभराहून अधिक पुस्तकांचा हिंदीत अनुवाद केला आहे. त्याशिवाय मी ‘एन्सीईआरटी’साठी १२० हून अधिक चित्रपट प्रस्तुत केले आहेत, जे अनेकदा दूरदर्शन वरून दाखविण्यात आले आहेत. माझी सर्व पुस्तके आणि वैज्ञानिक खेळणी माझ्या http://arvindguptatoys.com ह्या संकेतस्थळावरून विनामूल्य डाऊनलोड करता येतील.
मला देशभरातील ३०००हून अधिक शाळांमध्ये कार्यशाळा घेण्याचे सौभाग्य लाभले आहे, ज्यांत प्रामुख्याने नगरपालिकांच्या व गरीबांच्या शाळांचा समावेश होता. प्रत्येक कार्यशाळेनंतर मी मुलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य व डोळ्यात चमक पाहिली आहे. माझ्यासाठी हे आयुष्यातील सर्वाधिक कृतार्थतेचे क्षण आहेत.
आपल्या देशातील शिक्षणाची भूमी अतिशय प्रतिकूल- जवळजवळ नापीक– आहे. चांगली माती नसेल तर उत्तम बीजही कोमेजून जाते. आपल्या देशातील तरुण मनांची मशागत करण्यासाठी आपल्याकडे खूपच थोडी माती आहे. परिस्थिती कशीही असो, आपल्यातील प्रत्येकाने मुठभर माती ‘पिकवली’ पाहिजे. इतिहासाने आपल्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी आहे आणि उद्याची आशाही त्यातच दडली आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.