धर्म: परंपरा आणि परिवर्तन (भाग ३)

प्रत्येक धर्मात परंपरा व नवतेचा संघर्ष सुरू असतो व तो कधीही निर्णायक असत नाही. त्यामुळे धर्माला कालसंगत बनविण्याची लढाई प्रत्येक पिढीला विविध पातळ्यांवरून लढावीच लागेल असे प्रतिपादन करणाऱ्या ह्या लेखमालेत आतापर्यंत हिंदू व ख्रिश्चन धर्मांचा आपण विचार केला. ह्या लेखात मुस्लिम धर्मातील मूलतत्त्ववादी विरुद्ध उदारमतवादी ह्या ऐरणीवर आलेल्या लढ्याचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे.
—————————————————————————–
इतर कोणत्याही धर्माप्रमाणे मुसलमान धर्म एकजिनसी, एकसंध नाही. 1400 वर्षांहून दीर्घ इतिहास असणारा व जगभर पसरलेला धर्म तसा असूच शकत नाही, कारण त्यावर स्थलकालपरिस्थितीचे प्रभाव-आघात झाल्यामुळे त्याच्या बाह्यरूपात तसेच अंतरंगात बदल होणे स्वाभाविकच आहे. तरीही अलीकडच्या काळात इतर धर्मीयांच्या मनात मुसलमान धर्माची व धर्मीयांची एक विशिष्ट प्रतिमा तयार झाली आहे, हे नाकारून चालणार नाही. भारतीय संदर्भात विचार केला तर येथील जनमानसात मुस्लिम माणूस म्हणजे अल्पशिक्षित, मध्ययुगीन मूल्ये मानणारा (उदा. चार बायका करणारा व मर्जी फिरताच तलाक, तलाक, तलाक म्हणून त्यांना सोडचिठ्ठी देणारा), कडवा, हिंसक, धर्मासाठी मरण्या-मारण्यास सदैव तयार असणारा पुरुष अशी प्रतिमा आहे. ही प्रतिमा घडण्यात हिंदुत्ववादी शक्तींची कार्यक्षम प्रचारयंत्रणा व माध्यमे ह्यांची जशी भूमिका आहे तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचाही त्यावर मोठा प्रभाव आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. मध्यपूर्वेतील तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमेरिकेने तेथील मूलतत्त्ववादी शक्तींना पाठबळ पुरविले, लोकशाहीवादी शक्तींना शबल केले. कम्युनिझमचा पाडाव, जागतिकीकरणाचा प्रभाव अशा विविध ताणतणावातून निर्माण झालेल्या राजकीय पोकळीतून ओसामा बिन लादेन पासून आयसीसपर्यंतचे भस्मासुर अमेरिकेच्या समर्थनातून उदयाला आले व अखेरीस अमेरिकेवर उलटले. शह-काटशहाच्या ह्या राजकारणातून ११ सप्टेंबर 2001ची ट्विन टॉवर बेचिराख करण्याची घटना घडली. आपल्याला आह्वान देणाऱ्या शक्तींना नेस्तनाबूत करण्याच्या नावाखाली अमेरिकेने इराण, इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत मोठा भूभाग बेचिराख केला. आपल्या ह्या राजकीय कृतीचे समर्थन करण्यासाठी अमेरिकेला व तिची पाठराखण करणाऱ्या युरोपमधील शक्तींना त्यावर धार्मिक मुलामा चढविणे आवश्यक वाटले आणि त्यातूनच clash of civilizations सारखे सिद्धान्त जन्माला आले. त्यांनी एका व्यापक जनसमूहाला एका साच्यात कोंबले. त्याची परिणती म्हणजे मुसलमान समाजाची ही विपर्यस्त प्रतिमा!

भारतीय संदर्भात तर ह्या प्रतिमेवर काही अधिक पुटे चढली आहेत. फाळणी व त्यानंतरचा मानवी संहार, भारत-पाक सीमेवरचा तणाव व युद्धे, हिंदू-मुस्लिम दंगे, कॉंग्रेसने केलेले मुस्लिमांतील पुराणमतवादी प्रवाहाच्या तुष्टीकरणाचे व हिंदुत्ववाद्यांनी केलेले मुस्लिमद्वेषाचे राजकारण, शाहबानो, बाबरी मशीद, गुजरात इ. इ. त्यामुळे अन्य धर्मीयांप्रमाणे मुसलमान धर्मीयांतही परंपरा व परिवर्तनाचा संघर्ष कित्येक शतके सुरू आहे, हे समजून घेणे आपल्याला काहीसे जड जाईल. पण इतिहास व वर्तमान नीट समजून घ्यायचा असेल, तर पूर्वग्रह, प्रतिमा व विचारधारांची जळमटे आपल्याला बाजूला करावी लागतील. अर्थात जगभरातील जनमानसात मुस्लिम धर्म, समाज व तो धर्म मानणारी माणसे ह्यांच्या चुकीच्या प्रतिमा निर्माण होण्यामागे जसे राजकीय हितसंबंध (उदा. सीरिया व तुर्कस्थानातील विस्थापितांना युरोपमध्ये येण्यापासून रोखणे) आहेत, तसेच मुस्लिम धर्मातील पोथीनिष्ठा व शब्दप्रामाण्य हेदेखील त्यासाठी जबाबदार आहेत ह्याची नोंद आपल्याला घ्यावीच लागेल. आज मूलतत्त्ववादाविरोधातील संघर्षात जगभरात मुस्लिम उदारमतवाद्यांची जी कोंडी झाली आहे, त्यामागेदेखील हे महत्त्वाचे कारण आहे, हे विसरून चालणार नाही.

‘इस्लाम’चा जन्म झाला तो काळ व परिस्थिती आणीबाणीची होती. टोळीयुद्धे व त्यात होणारा संहार हा तेव्हाचा नियम होता, अपवाद नव्हे. आपला नवा विचार रुजविताना महम्मद पैगंबरांना ह्या सर्व परिस्थितीशी मुकाबला करावा लागला. प्रसंगी युद्धे करावी लागली. नवा मुलुख शोधावा लागला. इस्लाममधील तथाकथित आक्रमकतेचा, विस्तारशीलतेचा विचार करताना ही बाब ध्यानात घ्यावी लागेल. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती हा आहे, हेही आपण विसरून चालणार नाही. अरबस्थानात जन्मलेला हा धर्म नंतर जवळच्या भूप्रदेशात विस्तारला, स्थिरावला. एका अतिशय समृद्ध संस्कृतीला त्याने जन्म दिला. आशिया व युरोप ह्यांतील दुवा बनण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडत असतानाच त्या दोन्ही संस्कृतीतील श्रेयस्कर भाग त्याने वेचला. प्रख्यात अरब सुलतान हरून-अल-रशीद (तोच तो अरेबियन नाईट्स फेम!) हा आजारी पडला तेव्हा भारतीय वैद्यांच्या औषधोपचाराने त्याचा जीव वाचला, हे आमचे आयुर्वेदतज्ज्ञ मोठ्या अभिमानाने सांगतात. युनानी आरोग्यप्रणालीचा पाया आयुर्वेद आहे, असेही सांगण्यात येते. पण त्यासाठी सुलतानाने आपले अनेक तज्ज्ञ भारतात शिकायला पाठवले. त्यांनी आयुर्वेदाच्या मौलिक ग्रंथांचे संस्कृतातून भाषांतर करवून घेतले. पतंजलींच्या योगसूत्रांचाही अरबी भाषेत अनुवाद सुमारे हजार वर्षांपूर्वीच झाला आहे. हरून अल रशीदने त्यापुढे जाऊन अनेक आयुर्वेद- पंडितांना भरपूर बिदागी देऊन आपल्या राज्यात बोलावून घेतले व त्यांना प्रयोगासाठी सुसज्ज प्रयोगशाळा व वनौषधीउद्यान बनवून दिले, असाही इतिहास आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, स्थापत्य, युद्धशास्त्र ह्यांपासून खाद्य संस्कृतीपर्यंत आणि वस्त्रे-आभूषणांपासून संगीत व काव्यापर्यंत अनेक क्षेत्रांत ह्या संस्कृतीचा विकास झाला. कालांतराने ती भारतासह अनेक देशांत पसरली. हा इतिहास मुद्दाम सांगायला हवा, कारण साहित्य-संस्कृति-विज्ञान केवळ खुल्या वातावरणातच बहरू शकतात, हा निसर्गनियम आहे.

इस्लाम जिथे-जिथे गेला तिथल्या पर्यावरणातील रस-रंग-रूप-गंध त्याने आत्मसात केले, पण आपले वैशिष्ट्यदेखील कायम राखले. म्हणून भारतीय उपखंडातील इस्लाम अरब देशांतील इस्लामपेक्षा बराच वेगळा आहे. येथील सूफी परंपरेत हिंदू व मुस्लिम दोन्ही संकृतींचा हृद्य संगम आपल्याला दिसतो. अद्वैत तत्त्वज्ञान, परमेश्वराशी सख्यत्वाचे नाते व ह्या प्रेममय नात्यात बुडून जाण्याची कलंदर वृत्ती ह्या गोष्टी, ज्या आपल्याला मीरा व जयदेव यांच्या पदांत , ज्ञानोबाच्या विराणीत दिसतात, त्याच सूफींच्या कव्वालीमध्ये आढळतात. इंडोनेशिया ह्या मुस्लिमबहुल देशातील इस्लामवर हिंदू व बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे, तर युरोपच्या सान्निध्यातल्या मुस्लिमबहुल देशांत पश्चिमेतल्या आधुनिकीकरणाचा वरचष्मा आहे.

त्याला पहिला हादरा दिला तो वसाहतवादाने. विविध देश-परिस्थितीतल्या नागरिकांनी ह्या प्रक्रियेला वेगवेगळा प्रतिसाद दिला. भारतात ब्रिटिशांच्या संपर्कामुळे हिंदू समाजात एकीकडे समाजसुधारणेची आंदोलने उभी राहिली, तर दुसरीकडे पुनरुज्जीवनवाद बळावला. त्याचप्रकारे मुस्लिम समाजातही विविध प्रवाह निर्माण झाले. अठराव्या शतकात सुरू झालेल्या वहाबी म्हणविल्या जाणाऱ्या सनातनी विचारांचे वारे स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम लीग व त्यानंतर तब्लीग, जमाते-इस्लामीसारख्या संघटनांच्या रूपाने घोंघावत राहिले. दुसरीकडे सर सय्यदसारख्या उच्चभ्रू नेत्यांनी पाश्चात्त्यांच्या अनुकरणाची वाट चोखाळली. गांधींच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सरहद्द गांधी व मौलाना आझाद ह्यांसारखे नेते मात्र भारतीय समाजाशी एकजीव होऊनच मुस्लिमांना आपली प्रगती साधता येईल, ह्या दिशेने प्रयत्नशील होते. इतर देशांतही पाश्चात्त्य सत्तेमुळे एकीकडे आधुनिकीकरणाची ओढ तर दुसरीकडे स्वत्व टिकविण्याचा आटापिटा ह्या कात्रीत मुस्लिम समाज सापडला.

जागतिक पातळीवर इस्लाममध्ये कट्टरवाद बळावण्याच्या व त्याला झालेल्या विरोधाचे स्थूलमानाने चार टप्पे सांगता येतील. पहिल्या टप्प्याची सुरुवात इजिप्तमध्ये 1927मध्ये ‘मुस्लिम ब्रदरहूड’ ह्या संघटनेच्या स्थापनेपासून झाली.एकीकडे पाश्चात्त्य वसाहतवाद व दुसरीकडे कम्युनिझम ह्यांमुळे कात्रीत सापडलेल्या मुस्लिमसमाजातील एका समुदायाला त्यामुळे आपण आपल्या मुळांकडे परतत आहोत असे वाटू लागले. 1967च्या युद्धात इस्राएलने अरबांवर निर्णायक विजय मिळविला व त्यातून आलेल्या वैफल्यामुळे मुस्लिमांना आक्रमक होण्याची व राजकारणासाठी धर्माचा आधार घेण्याची गरज भासू लागली. 1979मध्ये पाश्चात्त्यांशी जवळीक असणाऱ्या इजिप्तच्या शहाची सत्ता उलथून मुस्लिम धर्मगुरू सत्तेवर आले आणि लोकशाहीला व साम्यवादाला धर्माधिष्ठित राज्याचा पर्याय आहे असा कट्टरपंथीयांना विश्वास वाटू लागला.

त्यानंतर वर्षभरात हिंसाधिष्टित मूलतत्त्ववादाने अनेक मुस्लिम देशांमध्ये मूळ धरले. 1983मध्ये बैरुत येथे अमेरिकन मरीन्सच्या बराकींवर आत्मघातकी ट्रकने हल्ला करून 243 सैनिकांना ठार करण्यात आले. त्यातून अमेरिकेला हादरा बसलाच, पण ‘धर्मासाठी कुर्बानी’ ह्या संकल्पनेला झळाळी मिळाली. आधी शियांमध्ये लोकप्रिय असलेली ही कल्पना नंतर सुन्नीपंथीयांमध्ये पसरली. लेबनॉन, अफगाणिस्तान व पॅलेस्टाईनमध्ये ‘परकीयांनी बळकावलेली भूमी मुक्त करण्यासाठी’ युवकांनी शस्त्रे हाती घेतली.

1990 च्या दशकात स्वतःला इस्लामिस्ट म्हणविणाऱ्या शक्तींनी शस्त्रांसोबत मतपेटीची कास धरली. येमेन, लेबनॉन, अल्जीरिया, इजिप्त अशा अनेक देशांत त्यांनी लोकशाही मार्गाने सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला व त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. ह्या सर्व प्रक्रियेला जबरदस्त धक्का बसला 11 सप्टेंबरच्या न्यूयॉर्कवरील हल्ल्याने. ह्या एका घटनेने जागतिक मानस संपूर्ण मुस्लिम जगताकडे संशयाने पाहू लागले. मुस्लिमजगतातला उदारमतवादी प्रवाह जो मूलतत्त्ववाद्यांच्या आक्रमकतेमुळे निष्क्रिय झाला होता, तो आता खडबडून जागा झाला. एकीकडे ह्या हिंसक हल्ल्याचा निषेध करत असताना असे करणारे हे आमच्या धर्माचे खरे प्रतिनिधी नाहीत असे तो ठासून सांगू लागला. परंतु ह्या घटनेमुळे मुस्लिम जनमानसात फारसे स्थान नसलेले ओसामा बिन लादेनसारखे नेते त्यांच्या आयकॉनच्या रूपात स्थापित झाले. मुस्लिम मानस नेमके कशामुळे प्रक्षुब्ध आहे हे न कळणाऱ्या माध्यमांनी ह्या प्रक्रियेत मोठा वाटा उचलला व त्याचा लाभ अर्थातच मुस्लिमातल्या कर्मठपंथीयांना मिळाला.

ह्यानंतर मुस्लिमातील जनमानस झपाट्याने बदलले. स्वतःला इस्लामिस्ट म्हणविणाऱ्या राजकीय पक्षांनी कालबाह्य कायद्यांचे पुनरुज्जीवन करून स्त्रियांना दुय्यम नागरिक बनविले व जनतेच्या लोकशाही हक्कांवर टाच आणली. त्याविरुद्धचा असंतोष विविध मार्गाने उफाळून आला. इजिप्तमध्ये शेख अब्दुल सत्तार अबू रिशा ह्या टोळीप्रमुखाने 90,000 सैनिकांची सेना उभारून अल कायदाला हाकलून लावले. इराणमध्ये धर्माधिष्ठित राज्याविरोधात व्यापक जनांदोलन उभे राहिले. ओसामा बिन लादेन, अल कायदा व मुस्लिम ब्रदरहूडच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. ह्या कालखंडाची सर्वांत सशक्त अभिव्यक्ती म्हणजे ‘अरब स्प्रिंग’ ह्या नावाने ओळखले जाणारे अल्पजीवी पण आशा जागविणारे आंदोलन. संपूर्ण अरब जगतात तेव्हा लोकशाहीच्या समर्थनार्थ व धर्मांध शक्तींच्या विरोधात जनता रस्त्यावर आली. त्यात स्त्रिया व युवक ह्यांचा लक्षणीय सहभाग होता.इजिप्त व ट्युनिशिया येथील सरकारांना त्यामुळे राजीनामा द्यावा लागला. पण अर्थसत्ता, राजकीय सत्ता, लष्कराची ताकद आणि धर्माचा प्रभाव ह्यांच्या एकत्रित, घट्ट व दीर्घकालीन समीकरणापुढे परिवर्तनवादी फार काळ टक्कर देऊ शकले नाहीत.

आता तर मुस्लिम धर्मातील ह्या अंतर्गत संघर्षाने भीषण रूप धारण केले आहे. तथाकथित बाह्य शत्रू — अमेरिका व इस्राएल — ह्यांच्याशी यशस्वी संघर्ष करणे ह्या धर्मवादी शक्तींना शक्य नाही. अशावेळी दहशतवादाचा उपयोग करून आपले उपद्रवमूल्य कायम ठेवणे व त्याचा वापर करून ‘अंतर्गत’ शत्रूंचा खात्मा करणे ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. द्वेषावर आधारित कोणत्याही राजकारणाचा शेवट हाच होतो. कारण असे राजकारण ‘आपण’ व ‘ते’ ह्या द्वंद्वावर आधारित असते. ‘ते’ आपले शत्रू आहेत व त्यांनी आपल्याला नष्ट करण्यापूर्वी आपण त्यांना संपवायला हवे असा युक्तिवाद करूनच हिंसेचे समर्थन करता येते. द्वेषाची आग भडकती ठेवण्यासाठी सतत नवे शत्रू शोधावे लागतात. म्हणून ख्रिश्चन सभ्यता (ह्यात अमेरिकन साम्राज्यवाद ते लोकशाही सर्व काही येते) हा शत्रू टप्प्याबाहेर असला, तर सुन्नी, अहमदिया, जीन्स घालणाऱ्या, बुरखा न घेणाऱ्या स्त्रिया, सेक्युलर विचारवंत, लेखक, कार्यकर्ते, समलैंगिकतेचे समर्थक — हे सर्व शत्रूच्या परिभाषेत येऊ शकतात. त्यामुळे आपण पाळलेल्या सेनेला काम मिळते, तसेच आपली दहशतही टिकून राहते. गेल्या 3-4 वर्षांतील मुस्लिमजगतातील घडामोडीतून हाच अर्थ निघतो.

ह्याचा अर्थ मुस्लिमातील उदारमतवादी, सुधारणावादी प्रवाह लढाई हरला आहे असा घ्यायचा का? ह्या लेखमालेत ह्या पूर्वीच मांडलेल्या मुद्द्याची पुनरुक्ती करून असे म्हणावेसे वाटते की हा लढा कधीही निर्णायक पातळीवर जात नाही. त्यातील काही प्रवाह कमजोर होतात, पडते घेतात व योग्य वेळ येताच पुन्हा उसळी मारून संघर्षात उतरतात, हा आजवरचा इतिहास राहिला आहे. मध्यपूर्वेचा परिसर मुस्लिम समाजातील लढ्याचे केंद्र आहे व त्याचे पडसाद जगभरातील मुस्लिम समाजावर व जनमानसावर कोरले जात आहेत. इस्लाममधील परिवर्तनवादी प्रवाह सध्या तरी बचावात्मक पावित्र्यात आहे, एवढे नमूद करून आपण पुढे जाऊ या.

मुस्लिम धर्मातील ह्या संघर्षात परिवर्तनवादी प्रवाहाची सरशी होणे हे केवळ त्या धर्मासाठीच नव्हे, तर जागतिक शांततेसाठी आवश्यक आहे हे वेगळे सांगायला नकोच. एका धर्मात कट्टरपंथीयांची सरशी झाली तर अन्य धर्मातील तशा विचाराला प्रोत्साहन मिळते व त्याची किंमत प्रत्येक धर्मातील स्त्रियांना व वंचित समूहांना चुकवावी लागते, हादेखील इतिहास आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील खुल्या विचारसरणीशी परिचय करून घेणे व त्यांच्यापुढील आह्वानाचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. स्वतःला प्रगतिशील मुस्लिम म्हणवून घेणारे विचारक-कार्यकर्ते सर्व मुस्लिम देशांत सक्रिय आहेत. त्यांच्या विचारांत मतभिन्नता असली, तरी खालील मुद्द्यांवर त्यांचे एकमत आहे –
 त्यांच्यासाठी इस्लामवरील श्रद्धा व परिवर्तनावरील निष्ठा परस्परविरोधी बाबी नाहीत. त्या दोन्ही त्यांच्यासाठी समान महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच त्यांना इस्लामच्या चौकटीतच परिवर्तन अपेक्षित आहे.
 त्यांचा उद्देश कुराणात सुधारणा किंवा बदल करण्याचा नसून कुराणाचा जो अर्थ लावला जातो, त्यात बदल/सुधारणा करण्याचा आहे. त्यांना इस्लाममधली इज्तिहाद (स्वतंत्र विचार किंवा तर्कनिष्ठता)ची परंपरा मान्य आहे. तक्लीद (अंध परंपरानुकरण) त्यांना अमान्य आहे.
 त्यांच्या दृष्टीने इस्लामची खरी ओळख ही मानवी मूल्ये व नैतिकता ह्यांच्या जोपासनेत आहे, रूढी पाळण्यात नाही. धर्माच्या नावर केली जाणारी हिंसा, दहशतवाद ह्यांना त्यांचा सक्त विरोध आहे.
 त्यांच्यापैकी अनेकांना धार्मिक मूलतत्त्ववाद व पाश्चात्त्य बाजारवाद हे दोन्ही समान शत्रू वाटतात.
 स्त्रिया व अल्पसंख्य ह्यांना समान हक्क असणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. लोकशाहीत अनुस्यूत असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी हक्क व समता, तसेच साम्राज्यवादाला विरोध, पर्यावरण-संरक्षण ह्या बाबी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. अमेरिका हा त्यांच्यासाठी आदर्श होऊ शकत नाही.

धर्माच्या चौकटीबाहेर अजिबात पडता न येणे ही मुस्लिमधर्मीयांची सर्वांत मोठी गोची आहे. ख्रिश्चनधर्मीयांच्या सार्वजनिक आयुष्यावरही धर्माचा मोठा पगडा आहे. पण तरीही लोकशाही व्यवस्था व त्यासोबत येणारे कायदे घडविताना ख्रिश्चनबहुल देशांनी कधी बायबलला प्रमाण मानले नाही. हिंदू धर्म प्रामुख्याने भारतात वसलेला आहे. येथील परिस्थिती १८व्या शतकापर्यंत फारशी चांगली नव्हती. पण (लेखमालेतील पहिल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे) 19-20व्या शतकात चाललेल्या धर्मसुधारणेच्या व समाजसुधारणेच्या चळवळींमुळे त्यात व्यापक व सखोल विचारमंथन झाले. म्हणूनच निधर्मी राज्यघटना, लोकशाही राज्यप्रणाली व धर्माधारित नसलेले कायदे स्वीकारण्यात हिंदू धर्मीयांनी फारशी खळखळ केली नाही. पण जगभरातील मुस्लिम समाजात हे घडले नाही. धर्मचिकित्सा करणे हे त्यात धर्मबाह्य कृत्य मानले गेले. भारतातील मुस्लिमांच्या प्रबोधनाचा विचार करायचा तर हमीद दलवाई हे येथील मुस्लिम समाजासाठी नेहमी ‘आउटसायडर’ राहिले, त्यांची चळवळ ह्या भूमीत रुजली नाही. आताही भारतातील व अन्य देशातील प्रागतिक मुस्लिम कुराणातील आयतांचा उदारमतवादी अर्थ लावण्यापलीकडे जाऊ शकत नाहीत. पण त्या मर्यादेत राहून ते नेटाने लढा देत आहेत, हे महत्त्वाचे आहे. बांगलादेशी मुस्लिम स्त्रिया बंगाली पेहराव सोडून बुरखा घालण्यास विरोध करीत आहेत. भारतात जबानी तलाक विरोधात मुस्लिम स्त्री-पुरुष न्यायालयीन व जमिनीवरील लढाई लढत आहेत. हाजी अली ह्या सूफी संताच्या मजारवर स्त्रियांना जाण्यास पूर्वी परवानगी होती. आता वहाबी विचारसरणीचा जोर वाढल्यामुळे त्यांना ती नाकारण्यात आली. त्याविरोधात मुस्लिम स्त्री-पुरुष एकत्र लढा देत आहेत. भारतातील मुस्लिम मशिदीत एक दिसत असला तरी सामाजिक जीवनात तो जातीनुसार विभागला गेला आहे. हे ध्यानात घेऊन मुस्लिम ओबीसी संघटना आम्हाला जातीनुसार आरक्षण हवे, धर्माधारित नको, कारण धर्म ही केवळ उपासनापद्धती आहे, तर जात हे सामाजिक संरचनेचे एकक आहे, अशी भूमिका घेऊन काम करीत आहे. मुस्लिमस्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे. सुशिक्षित तरुण नवा विचार करू लागले आहेत. ह्या सर्वांना बळ देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
मुस्लिमधर्मातील प्रागतिक विचारांची दुरवस्था व ख्रिश्चनधर्मात पोप फ्रान्सिस घडवीत असलेले मूलभूत परिवर्तन ह्या दोन्हींपासून हिंदू धर्माला खूप शिकण्यासारखे आहे. हिंदू धर्माचे मोकळेढाकळे स्वरूप, बहुदैवकता व विविधता आत्मसात करण्याची परंपरा ह्यामुळे कालाभिमुख राहणे त्याला कठीण जात नाही. त्यात आलेले साचलेपण दोन शतकांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणांमुळे बऱ्याच प्रमाणात दूर झाले होते. आता परिवर्तनाची गती वाढवून अंधश्रद्धा, जातिभेद व कालबाह्य रूढींचे ओझे झुगारून 21व्या शतकाचे आह्वान स्वीकारण्यास त्याला सक्षम बनविणे आजही शक्य आहे. भक्तिमार्ग चोखाळणाऱ्या संतांपासून गाडगेबाबा-तुकडोजी महाराजांपर्यंतची परंपरा ह्यात आपल्याला मदतच करेल. पण आपल्या धर्मात दुसरीही एक परंपरा आहे- परिवर्तन नाकारणारी, रूढी-परंपरा, बाह्योपचार ह्यात धर्माचे सार शोधणारी. तिने सतीचे समर्थन केले, आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली, दलितांना पाणवठ्यांवर व मंदिरांत प्रवेश नाकारला, गांधींचा सातत्याने द्वेष केला. धर्माचा बाजार मांडणाऱ्या माता-बापू-महाराज-महंत ह्यांना ती डोक्यावर घेते व दाभोलकर-पानसरे-कलबुर्गीना धर्मद्वेष्टे ठरवून त्यांना मार्गातून दूर करते.

त्यांच्या वाटेने जाऊन हिंदू तालिबान निर्माण करायचा की विवेकानंदांच्या मार्गाने जाऊन मस्तिष्कात अद्वैत व आचारात समता असणारा नवा हिंदू निर्माण करायचा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. आपल्याजवळ वेळही फारसा उरलेला नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.