संपादकीय

‘आजचा सुधारक’चा ‘विचारभिन्नता विशेषांक’ वाचकांसमोर ठेवताना आम्हांला आनंद होतो आहे. तात्त्विक दृष्टिकोनापासून ते रोजच्या जगण्यापर्यंत आपल्याला विचारभिन्नतेला सामोरं जावंच लागतं. या भिन्नतेला बरोबर घेऊनच आपण आपल्या जगण्याची चौकट आखत असतो. विशेषतः राजकीय-सामाजिक संदर्भात प्रामुख्याने भारतीय समाजाचा विचार करत असताना आज जे चित्र समोर दिसत आहे त्यावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी एक विशेषांक काढावा अशी कल्पना पुढे आली आणि सगळ्यांनीच ती उचलून धरली.

माणूस आणि सृष्टी हे नातं जसं द्वंद्वात्मक आहे, तसंच माणूस आणि माणूस हेही नातं द्वंद्वात्मक आहे. माणसाची वाटचाल एकरेषीय नाही आणि त्यामुळे त्याच्या विचारांची वाटचालही एकरेषीय नाही. इंग्रजीत ज्याला ‘वर्ल्ड व्ह्यू’ म्हटलं जातं त्या ‘जगाविषयीच्या दृष्टिकोना’तील फरकामुळे विविध विचारधारा निर्माण होतात, त्यांचे अनुयायी निर्माण होतात आणि त्यांच्यात संघर्षही होतो. धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांत विचारधारांचा प्रभाव असतो.

माणूस एका विचारधारेकडे का झुकतो याचा मानसशास्त्रीय खुलासा करता येऊ शकतो. त्याचबरोबर एखादा माणूस कायम एकच विचारधारा घेऊन जगतो आणि एखाद्याच्या विचारात बदल कसा होतो याचाही मानसशास्त्रीय खुलासा करता येऊ शकतो. माणूस जो विचार करतो त्यातून त्याचं प्रत्यक्षातील जगणं आकारास येतं. समूहाने जगत असताना विचारांमधील फरकामुळे प्रत्यक्षातील जगण्यात फरक निर्माण होतो आणि त्यामुळेही माणसांमध्ये संघर्षही होतो. माणसाची विचारांची दिशा माणसांच्या एकत्र जगण्यावर सतत परिणाम करत असते.

एकत्र राहण्याकरता अनेक लहान-मोठ्या व्यवस्थांनी उभी केलेली एक मोठी व्यवस्था आकाराला येते, नियम तयार होतात आणि त्यांचं पालन करायचं बंधन येतं. परंतु व्यवस्थेचं एकक माणूस आहे. व्यवस्थेमधील सुधारणा माणूसच करू शकतो. प्रस्थापित व्यवस्थेमधील त्रुटी माणूसच लक्षात आणून देऊ शकतो. आधुनिक मानवी समाजव्यवस्थेत व्यवस्थाविरोधाला, मतभेदाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं आहे कारण यातूनच व्यवस्था ‘प्रवाही’ राहायला, तिच्यात कालसुसंगत बदल व्हायला मदत झाली आहे. परंतु प्रवाहाविरुद्धच्या विचाराचं जेव्हा दमन होऊ लागतं तेव्हा व्यवस्थेतील सुधारणेच्या शक्यता कमी होऊ लागतात.

भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात (या विविधतेचा पल्ला ‘रोजच्या जेवणापासून तात्त्विक मतभिन्नतेपर्यंत’ असा लांब आहे) विचारांचं वैविध्य असणं यात काहीच आश्चर्य नाही. प्राचीन भारतीय दर्शनांमध्येही आस्तिक (वैदिक) आणि नास्तिक (अवैदिक) हे दोन मुख्य प्रवाह दिसतात. (अर्थात या दोन्हीमधल्या विविध दर्शनांत संपूर्णपणे नास्तिक असे चार्वाकदर्शनच आहे). भारताचा संपूर्ण इतिहास मतभिन्नतेने, दृष्टिकोनातील वैविध्याने संपृक्त आहे आणि त्याचे हिंसक/अहिंसक दोन्ही आविष्कार प्राचीन काळापासून आत्तापर्यंत या देशाने अनुभवले आहेत.

माणसं मतभेद व्यक्त करतात तेव्हा ‘मतभेद व्यक्त करण्याचं माध्यम’ याला एक विशेष महत्त्व प्राप्त होतं. समोरच्या माणसाचा राग आल्यावर त्याला मारून टाकण्याऐवजी त्याला शिवी दिली गेली तेव्हा संस्कृतीचा उगम झाला अशा अर्थाचं एक वचन आहे. यातला गमतीचा भाग सोडला तर यात खरोखर तथ्य जाणवेल. आज आपण असभ्य भाषेत केली जाणारी टीका ‘चिकित्सा’ नाही हे आपल्याला समजतं कारण आपला तेवढा विकास झाला आहे. परंतु तरीही विचारभिन्नतेच्या प्रारंभिक अवस्थांमधील ती एक अवस्था होतीच.

भारतामध्ये गेल्या दोन दशकांतविचारभिन्नतेचा प्रवास कसा झाला आहे? भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून येथील चर्चाविश्वात गांधी-काँग्रेसप्रणीत सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि हिंदुत्ववादी आक्रमक दृष्टिकोन हे दोन दृष्टिकोन कार्यरत आहेत. आज इंटरनेट, टेलीव्हिजन आणि फेसबुक-ट्विटर-व्हॉट्सअ‍ॅपसारखी समाजमाध्यमं यांचा समाजमानसावर प्रचंड प्रभाव आहे आणि या माध्यमांचा चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थांनी प्रभावी वापर होताना दिसतो आहे. यातली नकारात्मक बाजू वरचढ आहे कारण इतिहासाचा विपर्यास, प्रश्नांचं सुलभीकरण, अभ्यासाअभावी आलेला उतावीळपणा, व्यक्त व्हायची घाई अशा अनेक बाबींमुळे सामाजिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया फार वेगाने झाली आहे. भारतात १९९२ साली झी टीव्हीच्या माध्यमातून सॅटेलाईट टेलिव्हिजनने आपले पाय रोवले. २००४ साली फेसबुक, तर २००६ साली ट्विटर जन्माला आले. २०११ सालच्या लोकपाल आंदोलनापासून या माध्यमांचा सामाजिक-राजकीय वापर बळकट होऊ लागला. २०१४च्या लोकसभा-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वापर लक्षणीय प्रमाणात वाढला. आणि आज सत्तापालटानंतर दोन वर्षे झाल्यावरही सामाजिक-राजकीय वातावरण तप्त राहण्यात या माध्यमांचा हातभार लागतो आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, राष्ट्रवाद, राष्ट्रद्रोह, धर्मनिरपेक्षता या विषयांवर आज विशेष हिरीरीने वाद झडत आहेत. विचारधारेतील फरक ठळक स्वरूपात दृग्गोचर होतो आहे. एका अर्थी सार्वजनिक चर्चाविश्वात विविध विषयांवर वाद-चर्चा होणे ही आश्वासक गोष्ट आहे, परंतु या चर्चेला विधायक वळण लागण्याऐवजी विघातक वळण लागताना दिसतं आहे आणि प्रस्थापित व्यवस्थेकडून विरोधी विचार ऐकून घेण्यापेक्षा त्याचं दमन करण्यावरच भर दिला जातो आहे.
याबाबतचं सत्य काय आहे? विचारभिन्नतेबाबतचं आजचं चित्र आणि काही वर्षांपूर्वीचं चित्र यात काही फरक जाणवतो का? असल्यास कोणता? आज हिंदुत्वाची विचारधारा खरोखरच विचारभिन्नतेचं दमन करते आहे का? वैचारिक मतभेद, बुद्धिजीवी वर्ग आणि प्रत्यक्षातील प्रश्न याची सांगड कशी घालायची? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता यांबाबतभारतासाठी कोणती दिशा योग्य आहे? असे अनेक प्रश्न आज आपल्यासमोर आहेत.

सामाजिक घटनांबाबत निसर्गविज्ञानातील तर्कांप्रमाणे काटेकोर तर्क लावणे शक्य नसते. सामाजिक घटना, त्यांचे परिणाम, त्यांची कारणे अनेकपदरी असतात. तर्क आणि सुसंगत युक्तिवाद करावयाचा म्हटले तरी सामाजिक घटनांबद्दल वेगवेगळे आणि वेगळ्या निष्कर्षाप्रत नेणारे सिद्धांत मांडता येऊ शकतात. सामाजिक घटनांचा अर्थ लावणे हे केवळ समाजशास्त्रीय संशोधकांसाठीच महत्त्वाचे असते असे नाही. रोजच्या जगण्यात आपल्या सर्वांनाच एखाद्या गोष्टीबाबत मत ठरवण्यासाठी आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांचा अर्थ लावणे, त्या गोष्टीसंबंधी (किमान एका बाजूचा) इतिहास माहिती असणे, त्यांची संगती जुळवणे आणि त्यातून स्वत:चे मत बनवणे हे घडणे आवश्यक आहे. सामाजिक घटनांना अनेक बाजू असतात त्यामुळे त्यासंदर्भातील अभ्यासू मतांबाबतीतसुद्धा स्वाभाविकच मत-मतांतरे असतात. आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य हे लोकशाहीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. लोकशाही आचरणात आणण्यासाठी इतरांच्या मताचा आदर आवश्यक आहे. विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या ‘आजचा सुधारक’ची याबाबतची भूमिका नेमकी हीच आहे.

या अंकात वरील प्रश्नांचा ऊहापोह करणारे, विचारभिन्नतेचा वेध घेणारे विविध लेख आपल्याला वाचायला मिळतील. एक गोष्ट मात्र नोंदवली पाहिजे. नियोजित लेखांपैकी काही लेख या अंकात येऊ शकले नाहीत. आगामी अंकांमध्ये ते समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवाय विचारभिन्नता इतक्या विविध क्षेत्रांत कार्यरत असते की सर्वच क्षेत्रांविषयी एका अंकातून बोलणं शक्य नाही. विचारभिन्नता केंद्रस्थानी ठेवून विविध क्षेत्रांबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न यापुढेही करता येईल. आणि आजचा सुधारकच नव्हे तर इतरही नियतकालिकांनी हा प्रयत्न करायला हरकत नाही.
सध्याच्या राजकीय वातावरणावर, सोशल मीडियाच्या प्रभावावर आणि विशेषतः त्याच्या समाजमनावर झालेल्या परिणामांवर टिप्पणी करणारी रामचंद्र गुहा यांची मुलाखत थोडक्यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारी आहे. त्यांच्या इतर निरीक्षणांबरोबरच भारतीय-इतिहासलेखनावर डाव्यांच्या प्रभावाविषयी आणि काँग्रेसच्या घराणेशाहीविषयीची त्यांची मते महत्त्वाची आहेत. श्रीनिवास हेमाडे यांनी आपल्या लेखात भारतीय चर्चापद्धतीच्या ऐतिहासिक स्वरूपाविषयी विवेचन केले आहे. या लेखाचे पुढचे भागही आगामी अंकांतून प्रकाशित होणार आहेत. वाद-चर्चेच्या मुळाशी जात त्याला संवादाची बैठक द्यायचा पद्धतशीर प्रयत्न आपल्याकडे झाला होता आणि सध्याच्या विखारी वातावरणात अशा ‘पद्धतशीर वादांची’ नितांत गरज आहे. याच भूमिकेशी साधर्म्य सांगणारा देवदत्त पट्टनाईक यांचा छोटा लेख वादातील जय-पराजय याला नाकारत ज्ञानवृद्धीला अग्रक्रम देण्याच्या भूमिकेचा पुरस्कार करतो. साहित्यिकांनी केलेल्या पुरस्कार-वापसीच्या पार्श्वभूमीवर मराठीतील प्रतिभावान तरुणलेखक अवधूत डोंगरे यांनी त्यांच्या ‘एक रेघ’ या ब्लॉगवर लिहिलेली पोस्ट आणि युवा साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना त्यांनी केलेलं भाषण हे दोन्ही आपल्याला नवी दृष्टी देणारं आहे. अभिजीत रणदिवे यांचा ‘बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा’ हा लेख नवतेचा ध्यास घेतलेल्या युरोपातील काही व्यक्तिविशेषांची ओळख करून देतो आणि मध्ययुगीन युरोपातील स्थित्यंतरावर प्रकाश टाकतो. दिलीप करंबेळकर यांचा लेख डाव्या उदारमतवादी विचारसरणीच्या लोकांची वर्तमान परिस्थितीत चिकित्सा करणारा आहे. ‘उजवा प्रतिक्रियावाद’ म्हणून अनेक गोष्टींना मोडीत न काढता स्वतःमध्ये बदल करण्यासाठी डावे उदारमतवादी तयार आहेत का हा त्यांचा प्रश्न मननीय आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया याने आज किमान शहरी-निमशहरी भागातील तरी बहुतेकांचं जगणं काबीज केलं आहे. या विश्वात मराठी संकेतस्थळंही आपले पाय रोवून उभी आहेत. इथल्या गतिमान पर्यावरणाचा स्त्रीवादी दृष्टीने धांडोळा घेणारा संहिता अदिती जोशी यांचा लेख वाचकांना या विश्वाच्या महत्त्वाच्या पैलूंशी ओळख करून देईल. हिंदुत्ववादी राजकारणाची चिकित्सा करणारा श्याम पाखरे यांचा लेख ‘राष्ट्रवाद विरुद्ध राष्ट्रद्रोह हा आजचा लढा नसून धर्मनिरपेक्षता विरुद्ध सांप्रदायिकता हा खरा लढा आहे’ असे ठाम प्रतिपादन करतो.

आधी म्हटल्याप्रमाणे विचारभिन्नतेच्या अनुषंगाने इतरही अनेक विषयांचा परामर्श घेता येऊ शकेल. वैचारिक घुसळणीचे असे प्रयत्न वारंवार व्हायला हवेत. आपलं विचारविश्व एकसंध असणं शक्य नाही, परंतु ते एकांगी नसावं यासाठी ही नियमित घुसळण आवश्यक आहे. या विशेषांकाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या चर्चांची सुरुवात होईल अशी आशा आहे.

हा अंक तयार होण्यासाठी संपादकीय बाजूने रवींद्र रु.पं, धनंजय मुळी, सुकल्प कारंजेकर, श्याम पाखरे या सगळ्यांचे हात लागले आहेत. त्यांचे मनापासून आभार. अंक वाचून आपल्याला काय वाटलं हे समजून घ्यायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.