उंबरीच्या लीला

इंटरनेट आणि विशेषतः मराठी संकेतस्थळांवर सहिष्णुता नांदते आहे का? या प्रश्नाचा या जगाशी चांगला परिचय असणाऱ्या एकीने घेतलेला हा शोध. लेखिका ’ऎसी अक्षरे’ या संकेतस्थळाच्या एक संपादक आहेत.
——————————————————————————–

‘युनेस्को’ने भावना दुखावणं हा रोग जगातला सगळ्यात भयंकर रोग असल्याचं जाहीर केलं आहे; अशी पोस्ट फेसबुकवर दिसण्याची मी रोज वाट बघते.

थोडा श्रॉडिंजरी विचार करायचा तर – (श्रॉडिंजरचा सिद्धांत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात — श्रॉडिंजरी विचार म्हणजे ‘नरो वा कुंजरोवा’ पण त्यात दोन्ही अश्वत्थामे जिवंत आहेत किंवा दोन्ही जिवंत नाहीत.) एक बाजू ही की, चहाटळ लोकही अशी पोस्ट लिहिणार नाहीत. कारण त्यात ‘मी, माझं’ ह्याची टिंगल करणारा साधा उल्लेखही नाही. उदाहरणार्थ, माझ्या घरची मांजर ‘सगळ्यात खेळकर मांजर’ असल्याचं युनेस्कोने जाहीर केलं आहे. पण तरीही भावना दुखावणं ह्याचं मूळ मी पवित्र मानलेल्या कोणत्यातरी विचारावर, देवतेवर, व्यक्तींवर अशारीर हल्ला होण्यात असतं. फक्त शाब्दिक हल्ला असंच नव्हे, तर टिंगल करणारे व्हिडीओ, गाणी, चित्रंसुद्धा भावना दुखावण्यासाठी चालतात. सहसा माझ्या घरच्या मांजरीला नावं ठेवण्याच्या फंदात (मी सोडून) कोणी पडत नाही; माझ्या भावना दुखावतील ह्याची बूज इतर लोक ठेवतात. पण माझा धर्म, भाषा, वेष, संस्कृती, देव, राजकीय विचारधारा ह्या (व्यक्तीपेक्षा) समूहाला प्रेमादर वाटतात अशा गोष्टींबद्दल, कशावरही टीका करताना भावना दुखावण्याचा विचार करणार नाहीत. दुसरी बाजू अशी की भावना दुखावतात कारण मुळातच ‘मी, माझं’ ह्यावर टीका असते. त्यामुळे कशावर टीका केलेली आहे हे महत्त्वाचं नाही.

ह्या भावना ‘प्रागांतरजालीय काळात’ दुखावत नसत असं नाही; पण आता त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू शकते. आंतरजालावर (इंटरनेटवर) काही लिहिलं, बोललं की ती गोष्ट दोन-चार दिवसांत जगभर प्रसिद्ध होण्याच्या अनेक घटना आहेत. ‘अरब स्प्रिंग’ नावाने प्रसिद्ध असलेले राजकीय उठाव असोत, ‘आखमेद द डेड टेररिरस्ट’ची फीत असो, वा ‘गंगनम’ गाणं. जगाच्या टोकाला कोणीतरी माझ्या भावनांना विरोध दर्शवला, त्यांची टिंगल केली की माझ्या भावना दुखावण्याची पूर्वतयारी पूर्ण. माझ्या भावना दुखावण्याचं महत्त्व किती हे माझ्या उपद्रवमूल्यावर आधारित आहे. कोणाचं उपद्रवमूल्य फार तर चार मैत्रांच्या आंतरजालीय आरड्याओरड्यापुरतं मर्यादित असतं; कधी कोणाच्या व्हिडीओमुळे निरनिराळ्या देशांमध्ये दंगली घडू शकतात.

‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात ह्या संदर्भात एक लेख प्रकाशित झाला – The Muzzle Grows Tighter. जगभर निरनिराळ्या यंत्रणांकडून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी वाढत चालली आहे हा ह्या लेखातला मुद्दा. जुलै २०१२ मध्ये सॅम बॅसिल नावाच्या माणसाने एक व्हिडीओ यूट्यूबवर प्रसृत केला. ह्यात प्रेषित मोहम्मद अनेक स्त्रियांशी संग करताना, लढाया करताना आणि भडकाऊ भाषण करताना दाखवला आहे; “प्रत्येक मुस्लिमेतर माणूस पाखंडी आहे. त्यांच्या जमिनी, स्त्रिया आणि मुलं ही आपली लूट आहे”, असं त्यात तो म्हणतो.

हा व्हिडीओ ‘कच्चरपट्टी आहे’, ह्या शब्दांत सलमान रश्दीने त्याची संभावना केली. दोन महिन्यांनी, ह्या व्हिडीओचं अरबी भाषेत डबिंग होऊन, इजिप्तमधल्या एका वाहिनीने तो दाखवेस्तोवर त्याला कोणीही विचारत नव्हतं. त्यापुढे मात्र ह्या व्हिडीओमुळे लोकांच्या भावना दुखावल्या; भारतासह अनेक मुस्लिमेतर आणि मुस्लिम देशांमधूनही त्याचा निषेध केला गेला. पुढे उसळलेल्या दंगलींमध्ये ५० लोकांना जीव गमावावा लागला.

अमेरिकेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे उच्च मूल्य मानलं जातं; ज्याचा उल्लेख ‘पहिली घटनादुरुस्ती’ असाही केला जातो. बराक ओबामाने ह्या व्हिडीओचा निषेध केला; तरीही अभिव्यक्ति-स्वातंत्र्यसैनिकांना भाषण/लेखनबाँब बनवण्याची गरज वाटली नव्हती. पण अमेरिकन सैन्यप्रमुखांचा अध्यक्ष जनरल डेंप्सी ह्याने फ्लोरिडातल्या टेरी जोन्स नावाच्या धर्मप्रसारकाला ह्या व्हिडीओची जाहिरात न करण्याची विनंती केली. त्याबद्दल ‘फ्री स्पीच’ ह्या पुस्तकात टिमथी गार्टन अॅश म्हणतो की, जगातल्या सर्वांत ताकदवान सैन्याचा सगळ्यात वरिष्ठ अधिकारी एका य:कश्चित धर्मप्रसारकाकडे, त्याने एका भुक्कड व्हिडीओची जाहिरात करू नये, म्हणून विनंती करतो. सगळे एकत्र जोडलेले आहोत अशा आजच्या जगात सत्तेच्या असमतोलाचा झोल असा विचित्र आहे की सैन्याधिकाऱ्याला धर्मगुरूचं उपद्रवमूल्य दुर्लक्षून चालत नाही.

भारताच्या बाबतीत दोन उदाहरणं द्यायचीच तर सलमान रश्दीचंच नाव पुन्हा घेता येईल. रश्दीच्या पाखंडाविरोधात (‘द सॅटनिक व्हर्सेस’ नावाचं त्याचं पुस्तक) १९८९ मध्ये अयातोल्ला खोमेनीने त्याच्या विरोधात फतवा काढला होता; तरीही भारतात, आपल्या जन्मदेशात तो सहज येऊ-जाऊ शकत होता. रश्दीने २०१२ साली जयपूर लिटफेस्टमध्ये चर्चेचं निमंत्रण नाकारलं. कारण राजस्थान पोलिसांनी त्याच्या जिवाला भीती असल्याचं कळवलं होतं. भारतात ‘द सॅटनिक व्हर्सेस’वर बंदी आहे हे निराळंच. दुसरं उदाहरण तस्लिमा नसरीनला व्हिसा नाकारण्याचं.

उपरोल्लेखित यादीत ‘शार्ली एब्दो’ ही महत्त्वाची घटनाही आली पाहिजे. अमेरिका आणि भारतासंदर्भात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील म्हणून प्रेषित पैगंबर, कुराण आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या इतर काही पवित्र गोष्टींविरोधात काही बोलू नये, त्यांची टिंगल करू नये अशा प्रकारची बंधनं आणि दबाव लोकांवर असल्याचं दिसतं. घाऊक प्रमाणात समूहाच्या भावना दुखावणं, त्यातून लोकांच्या जिवावर बेतणं (आणि स्थावर-जंगम मालमत्तेचं नुकसान) महत्त्वाचं की अभिव्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचं असा विचित्र प्रश्न पडतो. कोणीतरी आपली मतं मांडल्यामुळे आपला, आपल्या पवित्र स्थानांचा अपमान होण्याएवढ्या ह्या गोष्टी स्वस्त असू नयेत हे योग्यच.

‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये लेख प्रकाशित झाल्यावर पुढच्या आठवड्यात त्या लेखावर टीका करणारी पत्रंही त्यांनी छापली. टीका होण्याचा सूर मला परिचयाचा वाटला. हल्ली मराठी आंतरजालावरही ‘शांततेचा पाईक असलेला धर्म’ असं वर्णन फार वेळा (= माझा मर्यादित संयम संपून कंटाळा येईस्तोवर) वाचनात येतं. भावना दुखावणं ही गोष्ट तशी मराठी आंतरजालाला अपरिचित नाही. अर्थात, मराठी आंतरजालावर लिहिलेल्या गोष्टींमुळे कोणावर शारीरिक हल्ला झाल्याचं मला माहीत नाही. पण आपापल्या पवित्र स्थानांवर हल्ला झाल्याचं दिसल्यावर मराठी आंतरजालावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात?

(इथे एक कबुलीजबाब – मराठी आंतरजाल असं म्हटल्यावर त्यात मायबोली, मनोगत, मिसळपाव आणि ऐसी अक्षरे अशी खुली मराठी संस्थळं, ब्लॉग्ज आणि फेसबुकवर मराठीत लिहिणारे असंख्य लोक ह्या सगळ्यांचा समावेश करता येईल. माझा वावर, पर्यायाने निरीक्षणं मर्यादित ठिकाणी केलेली आहेत. फेसबुकवर मराठीत लिहिणारे शब्दशः हजारो लोक असतील; मी फारतर २०-२५ लोकांच्या भिंतींचा, म्हणजे फेसबुक वॉलचा, (अ)नियमितपणे मागोवा घेते.)

मिसळपाव.कॉम ह्या संस्थळावर ‘नडगीफोड कॉर्पोरेटर’ असं एक सदस्यनाम होतं. सिंहगडावर शारीर-प्रेमालाप करणाऱ्या युगुलांना फटके देणारा – त्यांच्या नडग्या फोडणारा – नडगीफोड कॉर्पोरेटर, असा त्या सदस्यनामाचा अर्थ. हा एक अपवाद वगळता बाकी आंजाशी (आंतरजालाशी) संबंधित शारीर हिंसेची उदाहरणं मला माहीत नाहीत. भावना दुखावून घेण्याची संस्थळांवर घाऊक प्रमाणात दिसणारी लक्षणं म्हणजे सामान्य सदस्यांनी व्यक्तिगत प्रकारची गरळ ओकणं. मुद्द्याचा प्रतिवाद गुद्द्यांनी, प्रसंगी शिवीगाळ करूनही करणं. वेगवेगळ्या वेळी, काही संस्थळचालक आणि व्यवस्थापकांच्याही भावना दुखावण्याची उदाहरणं दिसतात; त्यातून विरोधी विचार मांडणाऱ्या सदस्यांचं लेखन अप्रकाशित करणं, ते असं लेखन सातत्याने करणाऱ्या सदस्यांचं सभासदत्व रद्द करणं, अशा गोष्टी घडतात. भावना दुखावणं आंतरजालावर मुबलक प्रमाणात सापडतं; चित्रकार एम. एफ. हुसेन ह्यांच्या मृत्यूनंतर ‘मरणान्तानि वैराणि’ असं म्हणणाऱ्या रामाच्या आणि हिंदू संस्कृतीच्या भक्तांना ह्या वचनाचा सोयीस्कर विसर पडला होता.

ह्या भावना दुखावण्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये एक गोष्ट समान आहे – विनोदबुद्धीचा अभाव. अगदी शाब्दिक हाणामाऱ्या करतानाही विनोदी खवचटपणा करण्याऐवजी आरडाओरडा करणं, आपण कसे उपेक्षित आहोत ह्याबद्दल गळे काढणं हे सातत्याने दिसतं. पंतप्रधान मोदींच्या आफ्रिकन शर्टावरून ट्विटरवर लोकांनी बरेच विनोद केले; ह्याबद्दल आलेली बातमी एकाने शेअर केली तरीही काहींच्या भावना दुखावलेल्या दिसल्या. चार जोक्स (शेअर) केले म्हणून मोदींचं स्थान डळमळीत होणार का काय, अशी भीती हल्ली मला वाटायला लागली आहे. (त्यातून लेख लिहीत असताना तुर्कीमधल्या लष्करी उठावाची आणि त्यात जवळजवळ २०० लोकांचा जीव गेल्याची बातमी आली. उद्या ट्विटर-विनोदी उठाव होऊन भारतात राजकीय अस्थिरता आली; त्यामुळे लोकांवर सत्संस्कार करण्यासाठी आलोकनाथवर कोणी हिंदी, व्यावसायिक चरित्रपट काढला; त्यात तरुण तरीही १८ व्या शतकातली आदर्श, आज्ञाधारक मुलगी वाढवत असल्यासारखं सतत वागणाऱ्या आलोकनाथचं काम कपिल शर्माला करावं लागलं तर काय, असा भयभीषण विचार मला चाटून गेला.)

दुसऱ्या प्रकारच्या बातम्या मात्र मोठ्या प्रमाणावर लिहिल्या गेल्या तरीही वाचनात येत नाहीत. (त्यामागचं दुय्यम कारण समजण्यासाठी गूगल, फेसबुक कसे चालतात ह्याबद्दल अंतर्ज्ञान आवश्यक आहे. आपण ज्या प्रकारच्या बातम्या वाचतो त्याच प्रकारच्या बातम्या, अपडेट्स आपल्याला गूगल, फेसबुककडून पुरवले जातात. कन्फर्मेशन बायस वाढवण्याचं काम सोशल मिडीयाकडून सातत्याने होतं.) ह्या बातम्यांचं पृथक्करण पहिल्या पानावर दिसणं कठीणच. (बहुतेकांना ह्या प्रकारांची संवेदनशीलता नाही; त्यात कन्फर्मेशन बायसची भर.) ह्या बातम्यांचा प्रकार म्हणजे नावडत्या पत्रकारांचं, लेखिकांचं चारित्र्यहनन, त्यांना येणाऱ्या बलात्काराच्या धमक्या, आणि कमी-अधिक प्रमाणात, गर्दीत पत्रकारांचा होणारा प्रत्यक्ष लैंगिक छळ. राजदीप सरदेसाई आणि बरखा दत्त ही दोन नावं सामान्यांचं ध्रुवीकरण करणारी; दोघांचेही फॅन्स मोठ्या प्रमाणात आणि हे दोन लोक नावडणारे लोकही मोठ्या प्रमाणात. राजदीप जिगोलो असल्याचं कधी वाचनात आलेलं नाही, मात्र ‘barkha dutt rape threats’ असं गूगल केल्यावर १८७०० वेबपेजेस आली; तिचा फोन नंबर, पत्ता, इमेल जाहीर करून, तिला त्रास देण्याचं कँपेन सुरू असल्याबद्दल तिनेच ट्विटरवर तक्रार केली आहे. ह्याची बातमी माझ्या वाचनात आली ती एरवी मला जिचं नावही माहीत नव्हतं अशा वेबसाईटवर (qz.com). “R**di TV ki R**d Anchor…” अशा फुकट प्रसिद्धीचा फायदा पुरुष पत्रकारांना मिळत नाही; पण स्त्रिया पत्रकार असोत वा नसोत, बरखाएवढ्या प्रसिद्ध असोत वा नसोत, इंटरनेटवर आवर्जून मतं मांडायला लागल्या की बक्कळ प्रसिद्धीचा फायदा मिळतोच.

ही गोष्ट फक्त भारतापुरती मर्यादित नाही. जगभरातच स्त्रियांचं सार्वजनिक आयुष्यातलं स्थान वाढतं आहे; इत्यादी, इत्यादी (बऱ्याच गोष्टी मांडता येतील पण तो लेखाचा विषय नाही;) खरं असलं; स्त्रिया मुक्तपणे संचार, संवाद करत असल्या तरीही स्त्रियांनाही बुद्धी, मतं असतात हे सहन करू न शकणाऱ्या पुरुषांचं प्रमाण शून्यवत झालेलं नाही. स्त्रियांचे फोन नंबर्स, पत्ते, इमेल पत्ते जाहीर होणं, सोशल मीडियावर त्यांच्या चारित्र्याबद्दल मानहानिकारक मजकूर पसरवणं, त्यांना बलात्काराच्या धमक्या देणं हे प्रकार सातत्याने होत आहेत. ह्यावर ट्विटर, फेसबुक इत्यादींकडून कठोर कारवाई होत नाही; स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली तरीही तक्रारकर्तीला सुरक्षित वाटेल ह्यासाठी काहीही हालचाल होत नाही, असा अनुभव जगभरातल्या (पत्रकार आणि सोशल मिडीयावर नियमितपणे लिहिणाऱ्या) स्त्रियांना येतो.

गेल्या वर्षी एका कलाकाराने, आपल्या ट्रॅकपँटवर पडलेल्या पाळीच्या डागाचा फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारित केला. (हा फोटो कलात्मक पद्धतीनेच काढला गेला होता; त्यात लैंगिक-शिक्षणाचा आव नव्हता किंवा ‘चला, सगळ्यांनी म्हणा – योनी, योनी, योनी’ अशी परिणामशून्य कल्पकताही त्यात नव्हती.) इन्स्टाग्रामने तो फोटो काढून टाकला. पुरुषांना (एरवी हिंसाचाराच्या रक्तापासून वाचवलं नाही तरीही स्त्रीच्या निरामय शरीराचं सूचक दर्शन असणाऱ्या) रक्ताच्या डागापासून संरक्षण मिळालं. इंटरनेटवर ह्या सेन्सॉरशिपचा निषेध झाल्यावर तो फोटो पुन्हा प्रकाशित करण्यात आला.

सोशल मीडियावर बोलक्या स्त्रियांना कितपत आणि कशापासून संरक्षण मिळतं? बलात्काराच्या धमक्या आल्याची तक्रार केली तर बरेचदा ’आम्ही ते वाचून बघितलं आणि त्यात आमच्या धोरण-नियमांचा भंग होत नाही” अशा प्रकारची प्रतिक्रिया मिळते. ‘twitter action against rape threats’ असं गूगलल्यास अशा प्रकारची बरीच उदाहरणं सापडतील. ह्यांतलं प्रसिद्धी मिळालेलं प्रकरण ब्रिटीश खासदार जेस फिलिप्सचं; ती  म्हणते, ‘मला येणाऱ्या हजारो धमक्यांकडे दुर्लक्ष करून ट्विटर ह्या लोकांशी घातक युती करत आहे’. बहुतेकदा ह्या स्त्रिया व्हिडीओ गेम्स, चित्रपट, सरकारी आणि गैरसरकारी संस्थांची धोरणं, विकिपीडिया, फ्री-सॉफ्टवेअर बनवणारे गट आणि अनेक इतर ठिकाणच्या पुरुषप्रधानतेचा निषेध करणाऱ्या असतात हे विशेष उल्लेखनीय. बलात्काराच्या आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या इंटरनेट ट्रोल्सवर कारवाई होणं ही अतिशय वेळखाऊ प्रक्रिया आहे, असं मत ट्विटरच्या वकील विजया गड्डे यांच्याकडून आलेलं आहे हे विशेष. बिझनेस इनसायडरच्या सर्वेक्षणानुसार ट्विटरवर अशा ट्रोल्सचं प्रमाण सर्वाधिक, ८८% आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फेसबुकवर हे प्रमाण ८% आहे.

मराठी आंतरजाल ह्या बाबतीत तसं सौम्य आहे. मला (दोनच लोकांकडून का होईना) काही वेळा ‘फेमिनाझी’ ही पदवी मिळालेली आहे, पण बलात्कार, खून हे तर सोडाच, कोणत्याही प्रकारची धमकी मला आजतागायत मिळालेली नाही. कदाचित माझा vitriol कमी पडत असेल (vitriol हा शब्दही त्यातल्याच एका आंजा पुरुषाने माझ्यासाठी वापरलेला) असा न्यूनगंड मला कधीमधी येतो. त्यामुळे संपादकांकडून ह्या लेखासाठी विचारणा झाली, तेव्हा ‘मराठी आंतरजाल सहिष्णू आहे का’ हा त्यांनी विचारलेला प्रश्न माझ्या डोक्यात अडकून राहिला.

एका बाजूने लोकांना आपापली मतं खुलेआम मांडता यावीत, त्यामुळे कोणीही भावना दुखावून घेऊ नयेत असं मी सुरुवातीला म्हणते आणि पुढे (नखं काढण्याजागी, अश्रू पुसण्यासाठी) रुमाल बाहेर काढते, हा विरोधाभास आहे का? भावना दुखावणं आणि बलात्काराच्या जालीय धमक्या येणं ह्यात काही फरक आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. भावना कधी दुखावतात, कोणाच्या भावना कशात अडकलेल्या असतील आणि त्या कशा दुखावतील ह्याचं काही वस्तुनिष्ठ मोजमाप नाही. आपल्या श्रद्धास्थानांवर कोणी टीका केली तरीही त्या ठिकाणी श्रद्धा बाळगण्याचा प्रत्यक्ष अधिक्षेप होत नाही. कोणा नास्तिकाने ‘देव अस्तित्वात नाही’ असं म्हटल्यामुळे कोट्यवधी श्रद्धाळू लोकांचा उपासनेचा हक्क काढून घेतला जात नाही. मात्र ‘तुझ्यावर बलात्कार करेन’ म्हणणं, एखाद्या व्यक्तीचा पत्ता, फोन नंबर जाहीर करणं ह्यांत त्या व्यक्तीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिक्षेप आहे; व्यक्तिगत हल्ला आहे. एखादी गोष्ट न आवडणं हे मत आहे आणि ते व्यक्त करण्याचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य इंटरनेटवर सर्वांनाच मिळालं पाहिजे. एखाद्या संस्थळाच्या मालक-व्यवस्थापक असोत किंवा देशाचे प्रमुख असोत, त्यांची मतं-विचार-उक्ती-कृतींवर केलेली टीका, बोचरी मतं सगळ्यांनीच सहन केली पाहिजेत; पण एखाद्या व्यक्तीची मतं पटली नाहीत म्हणून न्यायाधीश बनून व्यक्तीला ‘बलात्काराची शिक्षा’ फर्मावणं अयोग्य आहे. फिर्यादी, न्यायाधीश आणि शिक्षेची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांची अशा तिहेरी भूमिका स्वतःकडे घेऊन वागणं अक्षम्य आहे.

हुसेनची चित्रं असोत, किंवा LGBTQ लोकांना पाठिंबा दर्शवणं असो, अभिव्यक्तिस्वातंत्र्याला काही मर्यादा नकोत का, असा प्रश्न भावनादुःखी गटाकडून वारंवार विचारला जातो. ’माझं नाक जिथे सुरू होतं तिथे तुमचं हात फिरवण्याचं स्वातंत्र्य संपतं’, ह्याचा अर्थही नक्की कसा लावावा? ’माझं नाक फार लांब आहे’, असं म्हणून हुसेनच्या चित्रांवर बंदी आणणं शक्य असावं का? ताजं उदाहरण घ्यायचं तर पहलाज निहलानींना ‘उडता पंजाब’चा झगा मापात बेतता आला होता, असं दिसलं नाही. (खरं तर, हे काम चित्रपटाच्या संकलकांचं असावं. जेणू काम तेणू ठाय!) ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपलं मत प्रदर्शित करायला सगळ्यांना परवानगी असावी, पण धमकी देणं, अफवा किंवा घाऊक द्वेष पसरवणं, ह्यावर अंकुश असावा. उदाहरणार्थ ’मला बरखा दत्त अजिबात आवडत नाही, ती काहीही बोलते’, हे मत आहे. मात्र, न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल ’तुझ्यावर बलात्कारही करणार नाही’, असं म्हणणं अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या व्याख्येत बसत नाही; त्यात मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला फक्त ठराविक वय, वजन, आकार, वर्ण असणारी वस्तू म्हणून वागवणं आणि त्या वस्तूचं हिडीस मूल्यमापन आहे. ह्या प्रकाराचं सुलभीकरण करून म्हणायचं तर, भरलेल्या सभागृहात गोळ्या चालवणं हा जसा गुन्हा आहे, तसंच तिथे निष्कारण ‘आग, आग’ म्हणून ओरडणं, त्यातून गोंधळ, चेंगराचेंगरीला आमंत्रण देणं ही कृती अभिव्यक्तिस्वातंत्र्य ह्या नावाखाली स्वीकारली जाऊ शकत नाही. अर्थात, प्रत्यक्षात घडतं ते ह्या दोन उदाहरणांपेक्षा फार जास्त गुंतागुंतीचं असतं.

आंतरजालावर स्त्रियांचं प्रमाण खूप कमी आहे; समाजात ५०% असणाऱ्या मराठी स्त्रियांचं जालावर प्रतिनिधित्व फक्त २०% च्या आसपास आहे. अनेकदा स्त्रियांना स्वतःसाठी स्वतंत्र, सुरक्षित जागा बनवण्याची आवश्यकता वाटते. अनेक वर्षं आंजावर लिहून निबर झालेल्या, स्वतःला मुक्त समजणाऱ्या आणि/किंवा (आणखी) मुक्तता शोधणाऱ्या स्त्रियांनाही स्वतःसाठी स्वतंत्र, सुरक्षित जागा असण्याची आवश्यकता वाटते. फक्त विनोद प्रसृत करणारे फेसबुक गट असतात, तिथे इतर काहीही चर्चा घडत नाहीत त्यापेक्षा असे समूह निराळे आहेत. जन्मजात ओळखीमुळे जे ‘वेगळेपण’ लादलं जातं, ते विशिष्ट संदर्भांत नाकारलं तरीही इतर काही संदर्भांत जपण्याचीही गरज सुशिक्षित, सुजाण व्यक्तींना वाटते. किंबहुना, संदर्भानुसार हे वेगळेपण स्वीकारणं वा नाकारणं ही एक राजकीय भूमिका असू शकते. ‘ब्रेक्झिट’ किंवा मधुमेह्यांसाठी LCHF आहार असे अलैंगिक विषयही ह्या व्यासपीठांसाठी वर्ज्य नसतात.

मेरी बेअर्ड ही केंब्रिजमधली एक ज्येष्ठ प्राध्यापिका. ती ट्विटरवर(ही) लिहिते. २०१४ मध्ये तिच्यावर ‘न्यू यॉर्कर’मध्ये एक लेख आला होता – ‘द ट्रोल स्लेयर’. तिला बलात्काराची धमकी देणाऱ्या एकाला तिने जाब विचारला. यथावकाश ते दोघं भेटले, त्या तरुणाला तिने योग्य मार्गावरही आणलं. हे उदाहरण मुद्दाम लिहिण्याएवढं विरळा आहे. मराठी आंजावर ह्या आणि अशा विषयांची चर्चा फारशी होते असं दिसलेलं नाही. अगदी स्त्रियांच्या समूहांमध्येही नाही.

असे निराळे समूह बनवल्यामुळे मूळ प्रश्न – जालावरचं स्त्रीद्वेषमूलक लेखन – कमी व्हायला मदत होईल का? बहुदा नाही. एक शक्यता अशी आहे की, ह्या समूहांमध्ये सामील असणाऱ्या व्यक्तींच्या विचारांत वैविध्य असल्यामुळे त्यांतल्या निदान काहींना ट्रोल्सचा त्रास कमी होईल. अनेक विषयांवर खुलेआम चर्चा करणं आज अनेकींना शक्य नाही – उदाहणार्थ, पाळीच्या काळात वापरण्याचा कप किंवा सुकोमल त्वचेसाठी वापरण्याची मलमं. त्यावर चर्चा होऊन काहींचा त्यात फायदा होईल. पण मुळात मराठी आंतरजाल सध्यातरी फार उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय आहे. ज्या वर्गाला ‘दारुडा नवरा मारतो’ किंवा ‘कामाला जाते त्या सोसायटीतली लिफ्ट वापरता येत नाही’, अशा अडचणींना तोंड द्यावं लागतं, तो वर्ग तिथे उपस्थितच नाही. (पर्यायाने ह्या वर्गाला जाणवणाऱ्या प्रश्नांची चर्चाही आंतरजालावर होत नाही. आंतरजालावर स्त्रियांचं प्रमाण कमी आहे, हा प्रश्न दिसून त्याबद्दल विदा गोळा करण्याएवढ्या सुस्थित स्त्रिया आंतरजालावर आहेत. शहरी, सुस्थित गटापलीकडच्या लोकांचे प्रश्न आंजावर दिसतही नाहीत. त्यामुळे खैरलांजी, खर्डा, पाथर्डी इत्यादी प्रकार घडले तरीही त्याबद्दल मराठी आंतरजाल, पर्यायाने मराठी ट्रोलही उदासीनता दाखवतात. It’s better to have bad publicity than no publicity!

म्हणून शेवटी थोडं शीर्षकाबद्दल — मराठी आंतरजाल सध्या तरी एवढं लहान आहे की छोटं गाव आणि तिथल्या इकडच्या तिकडच्या गप्पा असं त्याचं स्वरूप आहे. भावना दुखावल्यामुळे ते कोणाच्या अंगाशी आलेलं नाही किंवा माझ्यासारख्या तोंडाळ बाईला कसल्याही धमक्या येत नाहीत. त्याचा पैसच खूप छोटा आहे. मात्र भविष्यात जेव्हा बहुतांश लोकांना आंतरजालावर बागडणं वेळ आणि पैसा दोन्ही बाजूंनी परवडेल, अनेक मुद्द्यांवरून समाजाचं ध्रुवीकरण झालेलं असेल तेव्हा मात्र मराठी आंतरजाल जगापेक्षा फार निराळं दिसेल असं वाटत नाही. मराठी आंतरजाल जगाच्या मानाने सध्या सहिष्णू दिसतं, पण एखाद्या मराठी संस्थळावरून बॅन झालेल्या आयडीधारकांचं मत बहुदा निराळं असेल!

अधिक वाचनासाठी –
१. The Muzzle Grows Tighter – http://www.economist.com/news/international/21699906-freedom-speech-retreat-muzzle-grows-tighter
२. “R**di TV ki R**d Anchor…”: Barkha Dutt, Trolls & Sexual Slurs
http://www.thequint.com/women/2016/05/18/randi-tv-ki-rand-anchor-barkha-dutt-trolls-and-sexual-slurs
३. Women, violence and Twitter in India – http://www.aljazeera.com/indepth/features/2014/01/women-violence-twitter-india-201413073633471881.html
४. The Troll Slayer
http://www.newyorker.com/magazine/2014/09/01/troll-slayer

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.