पुरस्कार: स्वीकार आणि नकार

अलीकडे चर्चेत राहिलेल्या साहित्यिकांच्या पुरस्कारवापसीच्या पार्श्वभूमीवर एका तरुण लेखकाचे विचारप्रवृत्त करणारे हे मनोगत. युवा साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना त्याने केलेल्या भाषणासह. मराठीतील या नव्या दमाच्या लेखकाचे हे विचारमंथन आपल्याला आश्वस्त करणारे आहे. ‘एकरेघ’ या लेखकाने चालवलेल्या ब्लॉगवरून साभार.
—————————————————————————–
कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात दादरी इथं गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेली अखलाख या मुस्लीम व्यक्तीची हत्या, हे अगदी अलीकडचे प्रसंग. या व इतर काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी ‘साहित्य अकादमी’ या सरकारस्थापित स्वायत्त संस्थेचे पुरस्कार परत केल्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत. स्वतः कलबुर्गींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता; त्यामुळं अकादमीनं या संदर्भात काहीच भूमिका न घेतल्याची टीका झाली. मराठी वृत्तवाहिन्यांवर यासंबंधी चर्चा झाल्या का, ते कळलं नाही. पण कदाचित तशा चर्चा झाल्या असतील किंवा आता होतीलही. काही वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधी लेख वा वाचकांची पत्रं अशा प्रकारचा मजकूर आलेला दिसला. यामध्ये साधारण दोन बाजू ऐकू आल्या: ज्यांनी पुरस्कार परत केले ते ‘निवडक नैतिकता’ पाळतात किंवा ज्यांनी पुरस्कार परत केलेले नाहीत ते तर बहुधा प्राथमिक पातळीवरचेही ‘नैतिक’ नाहीत. रेघेच्या कानापर्यंत आलेल्या मतांवरून या दोन ढोबळ बाजू नोंदवल्या आहेत.

ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, त्यांनी आत्ताच का केले? आधी अमुकतमुक झालं असताना त्यांनी पुरस्कार परत का केले नाहीत? एखाद्या लेखिकेनं १९८४च्या शीखविरोधी दंगलींनंतर काँग्रेसचं सरकार असताना पुरस्कार स्वीकारला आणि आता ‘हिंदुत्ववादी’ मोदी सरकारचा निषेध करत पुरस्कार परत दिला, हा दुटप्पी नैतिकतेचा प्रकार नाही का? एखादी व्यक्ती साहित्य अकादमीतलं पद सोडते, पण अकादमीचा पुरस्कार परत करत नाही, हे कसं काय? एखादी व्यक्ती साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करते, पण सरकारने दिलेला ‘पद्मश्री’ सन्मान परत करत नाही, हे कसं काय?… असे अनेक प्रश्न पुरस्कार परत करणाऱ्यांवर टीका करताना काहींनी विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यायची की नाही हे ज्यांना उद्देशून प्रश्न विचारलेत, त्यांनी ठरवायचं आहे. ज्यांनी पुरस्कार परत केले त्यांना देशात सध्या घडणाऱ्या घडामोडींचा निषेध करण्यासाठी एक प्रतिक्रिया म्हणून अशी कृती करावी वाटली, त्यांनी ती केली- असं या घटनांबद्दलचं रेघेचं आकलन आहे. पुरस्कार परत करताना सन्मानचिह्नच नव्हे, तर पुरस्काराची रक्कमही परत करणार असल्याचं यांपैकी काहींनी म्हटलं आहे. पैसे परत करणं, ही गोष्ट ज्याच्यात्याच्या आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून आहे. तर ही कृती अशा पद्धतीनं करणं त्यांना योग्य वाटलं असेल, तर त्यांना तसं करायची मोकळीक असायला हवी- असं वाटतं. त्यांच्या कृतीविरोधात होणारी सरकारसमर्थकांची किंवा इतरही कोणाची आक्रस्ताळी टीका बरोबर नाही, असं वाटतं.

पण रेघेची नोंद पुरस्कार परत न करण्यासंबंधीची आहे.
‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन’, असं तुकाराम म्हणाले होते. यातलं युद्ध खरं म्हणजे कोणत्याही माणसाला लढावं लागू शकतं, पण आत्ता या नोंदीपुरतं आपण लेखकाच्या युद्धाचा विचार करू. तुकाराम म्हणतायंत तो युद्धाचा प्रसंग कोणी आपल्याला सांगितलेला नसतो. तो आतूनच वाटायला हवा. जगाशी नि मनाशी चालू असलेल्या या युद्धावरचा तोडगा म्हणून तुकोबांनी कविता लिहिली असेल. त्यांची ती कृती होती. ‘लिहिणं ही कृतीच अशा रोजच्या युद्धाच्या प्रसंगाशी संबंधित आहे’, हे वाक्य लिहिण्याची रेघेची लायकी आहे असं आपल्याला वाटत नाही, पण ते लिहिलंच नाही, तर ते बाहेर येईल कसं, त्यामुळं लिहिलं.

ही रेघ ओढणाऱ्या व्यक्तीचा अशा एक-दोन पुरस्कारांशी आपसूक संबंध आल्यामुळं त्यालाही साहजिकपणेच या संदर्भात काही लोकांनी काही गोष्टी विचारल्या, सल्ले दिले, कोणी अप्रत्यक्षपणे टीका केली. हे सगळं साहजिक आहे. यावर आता मनापासून वाटलं म्हणूनच आपण ही नोंद करतोय.

आत्ता देशात घडत असलेल्या काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार परत करणं ही लेखकाची नैतिक जबाबदारी आहे, आणि कोणी ती पार पाडत नसेल, तर त्याला जाब विचारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे– असा काही लोकांचा सूर दिसला. ज्याला त्याला आपला सूर लावायची मुभा आहे. त्यामुळं फेसबुक, किंवा व्हॉट्स-अॅप, किंवा ट्विटर, किंवा जिथं बोलायचा अवकाश आहे, तिथं सर्वसाधारणपणे नैतिक सूर लावले जातातच. हे सर्वसाधारणपणे सार्वजनिक पातळीवर, बाहेरच्या जगाशी संवादी किंवा विसंवादी अशा प्रकारचं चालू असतं. तिथं प्रचंड नैतिक बोलणं आवश्यक असतं बहुतेक. कुठल्याही समारंभात जसं औपचारिक चांगलंचुंगलंच वागलं जातं, तसं. मग कोणी व्यक्ती साहित्य अकादमी मिळालेल्या मराठी लेखकांची यादी देऊन असंही विचारू शकते की, ‘हे कधी परत करणार पुरस्कार?’ या यादीतले काही लेखक आता मेलेले आहेत, हेही अशी यादी प्रसिद्ध करणाऱ्याला माहीत नसलं तरी चालतं. कारण शेवटी त्याचा प्रश्न सगळ्यांना भिडणारा नि ‘नैतिक’ असतो!

हे आपण मराठीत लिहितोय, म्हणून फक्त मराठीचा संदर्भ घेऊ. मराठी भाषेत साहित्याला, लेखकाला मुळात किंमत काय आहे, हे कळण्यासाठी वरचं यादीचं प्रत्यक्षात घडलेलं उदाहरण दिलं. लेखक जिवंत असला किंवा मेलेला असला, तरी इथं फारसा फरकच पडत नाही. तुम्ही काय लिहिलंय, यावरून काहीच ठरत नाही. तुम्ही रोजच्या युद्धाच्या प्रसंगातून काही उभं करताय का, याची कोणाला फारशी पडलेली नाही. एखाद्या कादंबरीत, कवितेत, कथेत लेखकानं राज्ययंत्रणा, प्रस्थापित संस्कृती याबद्दल त्याच्या कुवतीनुसार काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कदाचित केला असेल, तर त्यावर इथं काहीच बोललं जाणार नाही. पण आता अमुकएक युद्धाचा प्रसंग सुरू आहे त्यात तुम्ही कसं लढावं, याचे तात्पुरते सल्ले मात्र दिले जातील.

रेघेला आपण नैतिक समजत नाही. या सगळ्या मुद्द्यावर बोलणारे लोक खरोखरच स्वतःच्या कृतीचा नि बोलण्याचा नि त्यातल्या विरोधाभासाचा विचार करतात का, याचा पत्ता नाही. पण करत असतील. ‘लोक’ असं म्हटल्यावर सरसकटीकरण होतं. त्यामुळं बहुतेक जण जेवढं नैतिक बोलतात तेवढं खरोखरच वागत असतील, असं मान्यच करू. नैतिकतेच्या पातळ्या काय असतील, राज्ययंत्रणेचे पुरस्कार म्हणजे काय, पुरस्काराची रक्कम ही पुरस्काराचाच भाग असेल तर ती परत द्यायची की कसं, ते परवडत नसेल तर मग फक्त सन्मानचिन्ह परत करणं कितपत बरोबर आहे, वगैरे मुद्दे मोठे आहेत. शिवाय, राज्ययंत्रणा ही गोष्ट लेखक-पुरस्कार वगैरेपलीकडे आपल्या सगळ्यांशी कशी जोडलेली आहे, हा त्यातला एक मुद्दा. हे सगळे विषय एका नोंदीचे नाहीत.

एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण करू शकत नाही. फक्त विषयांतर वाटेल असा एक मुद्दा इथं नोंदवू. रेघेवर दोन ऑक्टोबर रोजी आपण एक नोंद केली होती. बिहारमधली दलित हत्याकांडं, मध्यभारतातील आदिवासी भागातील हिंसा, या संदर्भात ही नोंद होती. सध्याच्या भारतीय जनता पक्षाचा व इतरही काही सरकारांचा संदर्भ त्यात होता. साधारण सहा हजार शब्दांची ही नोंद होती. एवढी मोठी नोंद ब्लॉगवर वाचणं अनेक वाचकांना सोयीचं नसणार, याची कल्पना असूनही आपण ती नोंद केली. त्यामागं काही नैतिक भूमिका नव्हती, त्यामागं अपराधभाव होता. आदिवासींपुरतं बोलायचं, तर हा एक समूह सध्याच्या प्रस्थापित व्यवस्थेत काय भोगतोय, याचा एक मामुली बिंदू त्या नोंदीत होता. ही ब्लॉगवरची फुटकळ नोंद होती. ती फारशी वाचली जाणार नसूनही करावी वाटली म्हणून केली. अशा विषयावर कोणाला मराठीत कादंबरी लिहावी वाटली, तरी ती फारशी वाचली जाणार नसूनही लिहायला लागेल. ही तक्रार नाही. पण जे जाणवतंय ते असं आहे.

तर, अशा पार्श्वभूमीवर पुरस्कार परत करणं ही कृती ज्यांना योग्य वाटली, त्यांनी ती केली. त्यांना एका विशिष्ट भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी हीच कृती योग्य वाटली. ती त्यांची निवड आहे. त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. पण अशी निवड नि नैतिकता असं थेट समीकरण मांडणं सोपं वाटलं तरी पुरेसं आहे असं वाटत नाही.

पण अलीकडच्या काळात कोणी कशावर नि काय भूमिका घ्यावी, हे प्रसारमाध्यमं-समाजमाध्यमं यांच्या तणावातूनच निश्चित होतं का? अशी शंका येते. लेखकाची भूमिका इतकी सोपी असू शकते, असं वाटत नाही. प्रसारमाध्यमांमधून गदारोळ उठणाऱ्या नैतिकतेचं माहीत नाही, पण तिथं उल्लेखही न होणाऱ्या अपराधभावाबद्दल मात्र आपण बोलू शकतो. त्यासाठी ब्लॉग हेच प्रसारमाध्यम त्यातल्यात्यात परवडणारं आणि कमी आडपडदा असलेलं आहे, म्हणून इथं ही नोंद. वास्तविक आता चाललेला गदारोळ असा झालाय की, मूळ मुद्दा दूर राहिला नि पुरस्कार परत देणं किंवा न देणं हाच चर्चेचा विषय होत जाईल.

आपण रेघेवर यापूर्वीही जमेल त्या नि शक्य असेल त्या प्रसंगांबद्दल काही नोंदी केलेल्या आहेतच. त्यामुळेच साहित्य अकादमीचा पुरस्कार घेत असताना आपल्याला अपराधी वाटलं. आदिवासी समूह खलास होत असतो, तेव्हा त्यात किंचित तरी आपलाही हातभार लागत असतो, याचंही आपल्याला अपराधी वाटतं. फाशीच्या दोन प्रसंगांसंबंधी रेघेवर आपण नोंदी केलेल्या, त्याही अपराधीभावामुळंच. अशा कित्येक गोष्टींबद्दल रोजच्यारोज अपराधी वाटतं. हे अपराधीपण, वरची नैतिक मतं देणाऱ्यांमुळं आलेलं नाही, तर रोजच्या युद्धाच्या संदर्भात आलेलं आहे. ते युद्ध फक्त लेखकाशीच संबंधित असतं असं नाही, न लिहिणाऱ्या लोकांमधल्याही काहींना ते लढावं लागतंच. ते युद्ध टिपण्याची रेघेची कुवत आहे का, माहीत नाही. तरीही आपण ही नोंद केली. आणि त्यासोबतच २०१४चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार स्वीकारताना केलेलं एक अपराधीपणाचं भाषण, इथून पुढं कोणाला वाचावं वाटलं तर जोडलं आहे. या भाषणात काही प्रसंगांचा उल्लेख आला आहे, त्या प्रसंगांमध्ये अलीकडच्या आणि पलीकडच्या अनेक भीषण प्रसंगांची भर टाकता येईल. त्या प्रसंगांचा निषेध करताना आपला त्यातला सहभाग विसरला जाऊ नये म्हणून अपराधभाव. (हा अपराधभाव हे काही लेखनाशी संबंधित एकमेव किंवा मूलभूत कारणही नसावं, पण लेखनानुभवाच्या काठावर तरी हात मारल्यासारखं).

प्रतिसाद न मिळालेलं पत्र (मेघालयची राजधानी शिलाँग इथे १०-११ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केलेलं भाषण.)–

लेखक म्हणूनचे माझे अनुभव मी सांगावेत, असं मला सुचवण्यात आलंय. अख्ख्या लेखनप्रक्रियेच्या खोलात जाणं बहुतेक माझ्या क्षमतेच्या बाहेरचं काम आहे. किमान आत्ता या क्षणी तरी तो शोध घेणं मला शक्य नाही. त्यामुळं मी काही काळापूर्वी साहित्य अकादमीलाच लिहून पाठवलेलं एक छोटं पत्र वाचून दाखवतो. त्यामुळं किमान माझ्या लेखनानुभवाच्या आजूबाजूला तरी हात मारून काही शोधता येईल, असं वाटतं.
पत्र असं होतं–

प्रिय श्रीमान/श्रीमती,
काही दिवसांपूर्वी ‘स्क्रोल’ या संकेतस्थळावर मी एक रिपोर्ट वाचला–‘साहित्य अकादमीच्या कार्यक्रमामध्ये एका दलित कवीची मुस्कटदाबी’ (हाउ ए दलित पोएट वॉज ब्राउबिटन इन्टू सायलेन्स अॅट ए साहित्य अकादमी इव्हेन्ट) असं त्याचं शीर्षक होतं. साहित्य अकादमीनं १६ नोव्हेंबर २०१४ रोजी नागरकोएल, तामिळनाडू इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तामीळ कवी एन.डी. राजकुमार यांच्याशी गैरवर्तणूक करण्यात आल्याचा घटनाक्रम या रिपोर्टमध्ये नोंदवला होता. हा रिपोर्ट एस. आनंद यांनी लिहिला होता. त्यांच्याच ‘नवयान’ या प्रकाशनानं राजकुमार यांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला आहे. ‘नवयान’च्या संकेतस्थळावर राजकुमार यांचा त्या कार्यक्रमातील अनुभव त्यांच्याच शब्दांत देण्यात आलाय, त्यात ते लिहितात–

‘‘१६ नोव्हेंबर २०१४ रोजी, राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहादरम्यान, मी राहतो त्याच ठिकाणी, नागरकोएलमध्ये, साहित्य अकादमीच्या पुस्तक प्रदर्शनादरम्यान बोलण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं होतं. विषय होता,‘माझी कविता आणि मी’. साहित्य अकादमीबद्दल मला प्रचंड आदर असल्यामुळं, मी निमंत्रण स्वीकारलं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. कार्यक्रमाचं निवेदन करताना आदरणीय आयझॅक सॅम्युअल नायगम (नागरकोएलमधल्याच स्कॉट ख्रिश्चन महाविद्यालयातील तामीळ विभागातील शिक्षक) यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की, ‘कन्नदसन, मु. मेहता, वैरमुथू, इत्यादींच्या परंपरेतील जादुई कवी एन. डी. राजकुमार आता आपल्यासमोर मनोगत मांडणार आहे.’ त्यानंतर ते त्यांच्या जागी जाऊन बसले.

मी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हणालो, ‘आदरणीय आयझॅक सॅम्युएल नायगम यांनी माझी ओळख करून देताना कन्नदसन, मु. मेहता व वैरमुथू (हे सर्व तामिळमधील आदरणीय आजी-माजी कवी आहेत) यांच्या परंपरेतच माझा उल्लेख केला. परंतु मी नम्रपणे हे सांगू इच्छितो की, मी स्वतःला त्याच साहित्यिक परंपरेतला मानत नाही. मी पूर्णपणे वेगळ्या साहित्यिक मार्गावरून चालतो आहे. मला त्यांच्या साहित्यिक कामाबद्दल काहीही मत द्यायचं नाही. असो. आता मी मला देण्यात आलेल्या विषयावर विचार मांडतो..’ तेवढ्यात प्रेक्षकांमधले पाच लोक उठले आणि त्यांनी अद्वातद्वा भाषेत माझ्या विरोधात घोषणा करत माझं बोलणं मधेच तोडलं. पाचांपैकी एकानं मला मूठ वळून दाखवली. धमकी दिल्यासारखं बोट रोखून धरत तो मला म्हणाला की, कन्नदसन यांचा ‘अपमान’ केल्यावर आता तू सभागृहातून सुरक्षितपणे बाहेर कसा जाशील.. त्याच्यासोबतचे इतर चौघेही उठले नि मला धमकावू लागले. परिणामी मला माझं व्याख्यान सुरू करता येईना.

मी कन्नदसन यांच्यावर टीका केली नाही. मी त्यांच्याबद्दल वेगळं काही बोललोही नाही. फक्त मी त्यांच्या परंपरेत बसत नाही एवढंच मत नोंदवलं. शिवाय मला देण्यात आलेल्या विषयावर मला बोलू द्यावं, अशी विनंती शांत सुरात मी केली. पण तरीही ते माझ्याविरोधात धमकावणीच्या सुरातच बोलत होते. मला बोलताच येऊ नये इतका गोंधळ ते घालत होते. त्यानंतर मी कार्यक्रमाच्या संयोजकांना विनंती केली की, त्यांनी मला बोलता येईल इतपत वातावरण कायम ठेवण्यासाठी उपाययोजना करावी. पण त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांकडं दुर्लक्ष केलं, उलट मंचावर येऊन मला धरून खाली बसवलं.’’

या कथनातील घटनाक्रमात तथ्य असेल तर– साहित्य अकादमीच्या मंचावरून राजकुमार यांना अशा प्रकारची गैरवागणूक मिळावी हे अतिशय दुःख देणारं आहे.

मी स्वतःला फारसा नैतिक माणूस मानत नाही. पण एक व्यक्ती जी नैतिकता पाळू शकणार नाही, ती पाळण्याची क्षमता एका संस्थेमध्ये असू शकते, असा विश्वास वाटतो. आणि इथं साहित्य अकादमीसारख्या संस्थेचा संदर्भ आहे. राजकुमार यांनीही तिच्याबद्दल मोठा आदर असल्याचं म्हटलं आहे. तर मग या घटनाक्रमाबद्दल साहित्य अकादमीनं स्वतःची वेगळी बाजू असल्यास ती मांडायला हवी, आणि त्यासंदर्भात राजकुमार यांच्याशी बोलायला हवं. ‘नवयान’च्या संकेतस्थळावर राजकुमार यांच्या कथनानंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात साहित्य अकादमीनं माफी मागावी अशी मागणी करण्यात आलीआहे.

साहित्य अकादमीतील कोणाशीही माझी व्यक्तिगत पातळीवर ओळख नाही किंवा नवयान प्रकाशन वा राजकुमार यांच्याशीही माझा व्यक्तिगत परिचय नाही, पण साहित्य अकादमीचा पुरस्कारार्थी म्हणून ही मेल पाठवणं ही मला माझी जबाबदारी वाटली.

माझं पत्र इथं संपतं. हे पत्र साहित्य अकादमीचे सचिव (२६ नोव्हेंबर २०१४) व अध्यक्ष (१९ डिसेंबर २०१४) अशा दोन्हींना अकादमीच्या संकेतस्थळावर दिलेल्या त्यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर मी पाठवलं. दरम्यानच्या काळात, ३१ डिसेंबर २०१४पूर्वी हे भाषण लिहून पाठवण्यासंबंधीची सूचना माझ्यापर्यंत आली, जेणेकरून अकादमी भाषण छापून घेऊन पुरस्कार सोहळ्याच्या वेळी (१०-११ फेब्रुवारी २०१५) त्याच्या प्रती वितरित करू शकेल. ती मेल इथं उपस्थित सर्वांना फॉरवर्ड करायचा हा प्रयत्न म्हणजे हे भाषण. समस्या सोडवण्याचा मार्ग शब्दांच्या वाटेवरून सापडू शकतो, यावर विश्वास ठेवण्यापलीकडं एका लेखकाकडं दुसरा कुठला पर्याय आहे! अक्षरांवरची नि शब्दांवरची श्रद्धा कायम राहावी या पलीकडं एक लेखक करतो तरी काय?

हे भाषण लिहून काढण्यापूर्वी मी राजकुमार यांचा मोबाइल नंबर वगैरे मिळतोय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावर काही नवीन घडामोड झाली आहे काय, हे विचारता येईल म्हणून. त्यासाठी मी ‘नवयान’ला संपर्क केला. या विषयावर पुढं काहीच झालेलं नाही, असं त्यांनी कळवलं, पण राजकुमार यांचा नंबर मिळवण्याचा माझा प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही (हे भाषण लिहेपर्यंत तरी. पण नंतर काही दिवसांनी ‘नवयान’कडून राजकुमार यांचा नंबर मिळाला. त्यावर त्यांना संपर्क साधला, पण आमच्या दोघांनाही कळेल अशी कुठलीच एक भाषा निघाली नाही, त्यामुळं फारसं बोलता आलं नाही). दरम्यान, ‘नवयान’च्या संकेतस्थळावरच्या माफीची मागणी करणाऱ्या निवेदनावर सही केलेल्यांपैकी एक, आणि मला ज्यांच्याबद्दल आदर वाटतो, अशा एका व्यक्तीला मी संपर्क साधला. या मुद्द्यावर आणखी तिसऱ्याच व्यक्तीकडून खातरजमा करून घ्यावी, एवढाच हेतू. हे सगळं करून झाल्यावर आता मी हे पत्र तुमच्यासमोर का वाचतोय, याबद्दल मी निश्चिंत झालोय.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात आपण राहतो. आपण राहतो त्या या देशातली ‘नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स’ एका कार्यक्रमात वीसेक भाषांमधल्या लेखकांना पुरस्कार देते. या देशाचा नुसता भौगोलिक पसारासुद्धा अचंबित करणारा आहे. आपण एकच इतिहास राखून आहोत का किंवा आपल्यामध्ये काही सांस्कृतिक साम्य आहे काय, याबद्दल मला खात्री नाही. काही प्रमाणात असेल, पण त्याबद्दल खात्रीनं काही सांगावं अशी माहिती माझ्याकडं नाही. पण, आपण हा भूगोल मात्र आपापसात वाटून घेतलेला आहे, एवढं नक्की. आपल्याकडच्या काही कागदपत्रांवरून आपण भारत नावाच्या देशाचे नागरिक आहोत, हे सिद्ध होतं, एवढ्यापुरतं तरी नक्की. पण मग यामुळं, या देशात होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अन्यायाबद्दलचा किंवा दडपशाहीबद्दलचा अपराधीपणा वाटून घ्यायची जबाबदारीही आपल्यावर येते का? भूगोल नि देशाची मर्यादा इथं नोंदवतोय त्याचं कारण एवढंच की हा भूगोल नि त्यावर पसरलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचा उत्सव साजरा करणाऱ्या एका राष्ट्रीय संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला ह्या उत्सवाचा आदर आहे आणि त्याचा भाग होण्याचा आनंदही वाटतोय, पण त्यासोबतच अपराधीही वाटतंय. आनंद कशाचा, तर अपराध भाव तुमच्यासोबत वाटून घ्यायला मला किमान शब्द तरी वापरता येतायंत, याचा. पण त्याच वेळी दुःखी पण वाटतं, कारण ह्या शब्दांना काही प्रतिसाद मिळत नाही.

वरती लिहिलेल्या पत्रामध्ये जो काही घटनाक्रम सांगितलाय त्याबद्दलचा अपराधीभाव मला जाणवला, म्हणून मुळात ते पत्र लिहिलं. पण असं स्वतःबद्दल अपराधी वाटावं अशी ती एकच घटना आहे असंही नाही. यापेक्षा अधिक गंभीर कित्येक घटना आहेत. आपण इथं शिलाँगमध्ये (मेघालय) साहित्याचा उत्सव साजरा करतोय आणि शेजारच्या मणीपूर राज्यात, शस्त्रांपेक्षा माणसांवर जास्त विश्वास दाखवावा, या मागणीसाठी ४२ वर्षांच्या इरोम शर्मिला गेली १४-१५ वर्षं उपोषण करतायंत. सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीला सहानुभूतीनं प्रतिसाद देण्याऐवजी आपण तिला जबरदस्तीनं अन्न भरवत राहतो. त्याच राज्यात दहाएक वर्षांपूर्वी मनोरमा देवी या तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणातले आरोपी सशस्त्र दलांमधले होते, त्यामुळं न्याय मिळाला नाहीच. इथं पण माणसांपेक्षा शस्त्रांवरचा विश्वास दिसून आला. या दोन उदाहरणांवरून आपली राज्ययंत्रणा कशावर विश्वास ठेवते हे कळून येतं. दुसरीकडं, काही काळापूर्वीच सत्तरेक आदिवासींना आसाममधल्या बंडखोरांनी मारून टाकल्याची घटनाही ताजी आहे, प्रस्थापित राज्ययंत्रणेवर विश्वास नसलेल्या या मंडळींनाही माणसांपेक्षा शस्त्रांना प्राधान्य द्यावंसं वाटतं. पण हे तर युद्ध सुरू आहे नि मग लोक मरणारच, असा युक्तिवाद करून प्रत्येक वेळी आपली सुटका होऊ शकत नाही. हा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केला जाऊ शकतो आणि प्रत्येक वेळी त्यात काही तथ्य असतंच असं नाही. आणि लोक जर मरायचेच असतील, तर मग उपोषणाला बसलेल्या एका स्त्रीला बळजबरीनं अन्न कशाला भरवायचं?

माझ्या माहितीतल्या या काही घटना सांगितल्या, पण अशी दुःखद उदाहरणं अर्थातच कित्येक असतील. शिवाय हे भाषण लिहीत असताना, आपल्या या उत्सवाचं ठिकाण आणि या घटनांची ठिकाणं जवळजवळ असल्याचं साहजिकपणे मनात आलं, म्हणून त्यांच्याबद्दल बोललं गेलं. पण अन्यायाला भूगोलाची मर्यादा असण्याचं कारण नाही. त्यामुळं भूतकाळातल्या नि वर्तमानकाळातल्या, जगाच्या कुठकुठल्या कोपऱ्यात अशा कित्येक घटना असतील, ज्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. पण अशा घटनांसंबंधीच्या माझ्या अपराधीपणाची तरी माहिती मला आहे. किंवा असं म्हणूया की, या अपराधभावातला माझा वाटा काय आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न मी करतोय.
साहित्य अकादमीच्या नागरकोएलमधल्या कार्यक्रमात जे काही झालं, त्यासंबंधीचा अपराधभाव- अकादमीच्या युवा साहित्य पुरस्काराचा स्वीकार करत असतानाच मी तुमच्यासोबत वाटून घेतोय. किमान आता तरी अकादमी त्या संदर्भात काही हालचाल करेल, अशी आशा आहे.

हा अपराधभाव,लेखकाचा अपराधभाव, फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही. अन्यायासारखाच तोसुद्धा भूगोलाच्या नि संस्कृतीच्या मर्यादा ओलांडतो. या अपराधभावामुळंच हा लेखक दुःखी होतो. आणि हा अपराधभाव व्यक्त करण्याची क्षमता असल्याचा त्याला आनंदही होतो. कारण ह्या क्षमतेमुळं कधी तरी हा अपराधभाव संपेल अशी शक्यता तरी राहते. पण त्यापूर्वी त्या अपराधभावामागचं कारण तपासायचा प्रयत्न करायला हवा. लिहिण्याचा पर्याय स्वीकारून मी अपराधभावामागचं कारण तपासायचा प्रयत्न करतो. हा पर्याय टिकावा अशी आशा करावी असं मला वाटतं, पण या पर्यायाला माणसासारखं जबरदस्तीनं अन्न भरवून तो जगेल काय, याविषयी शंका वाटते. सध्याच्या हायपर-कनेक्टेड नि माध्यमप्रेमी जगात, लेखकाचे शब्द ऐकलेच जात नसतील आणि त्यांना केवळ पुरस्कार मिळत असतील, तर मग ते बळजबरीनं अन्न भरवण्यासाखंच आहे. पण शब्दांच्या बाबतीत अशा बळजबरीच्या भरवण्याला मर्यादा पडते. हे शब्द, ही अक्षरं मरू नयेत, अशी मला आशा आहे.

हा अपराधभाव मी तुमच्यासोबत वाटून घेतोय, कारण आपण हे सगळं असणंच वाटून घेतोय आणि त्या दरम्यान आपल्याला काय वाटतं हे आपण भाषेचा वापर करून एकमेकांसमोर मांडू शकतो, व्यक्त करू शकतो. खरं तर, अक्षरांच्या नि शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या ह्या महान कलेचा उत्सव आपण इथं साजरा करतोय. पण ह्या वाटून घेण्यातून काही परिणाम होतो काय? व्हावा, अशी आशा मला वाटते. आशा वाटते, कारण मला लिहीत राहायचंय. आणि मी लिहितो, म्हणून मला आशा वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.