भारतीय चर्चापद्धती (भाग १)

स्वरूप

वादविवादातील सहभागी घटक, वादाचे पद्धतिशास्त्र आणि खंडन-मंडनाचीप्रक्रिया यांचा निर्देश भारतीय परंपरेत मूलतः आहे. तिचे यथार्थ स्वरूपसमजावून घेणे ही विद्यमान लोकशाही स्वरूपाच्या भारतासारख्या बहुधार्मिक, संस्कृतिबहुल देशाची बौद्धिक गरज आहे. येथील विविध तऱ्हांच्या समस्यासार्वजनिकरित्या सोडविण्याच्या हेतूने अनेक विचारसरणीच्या अराजकीय, राजकीयआणि सामाजिक गटांमध्ये सुसंवाद होण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरणारी आहे.या पद्धतीचे अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या लेखाचा हा पहिला भाग. पुढील भागआगामी अंकांतून प्रकाशित होतील.
—————————————————————————–

‘वाद’ हा मराठी शब्द विविध अर्थांनी वापरला जातो.एक:इंग्लिशमधील’ism’ म्हणजेतत्त्वज्ञान, व्यवस्था किंवा विशेषतः राजकीयविचारसरणी हा अर्थ; जसे की मार्क्सवाद. दोन:भांडण आणि तीन: वैदिक परिभाषेत विधी-अर्थवाद. (वेदवाक्यांचेविधी, मंत्र, नामधेय, निषेधआणि अर्थवाद असेअर्थदृष्ट्यापाचविभागहोतात.वेदाचाअर्थ या पाचही विभागांचा एकत्रविचारकरूनचठरतो. कारण’प्रत्येक वेदवाक्याला काहीना काहीएक अर्थअसतो’, हे त्यामागील गृहीत आहे.) चार : इंग्लिशमधील thank you चेमराठी भाषांतर म्हणून आलेल्या ‘धन्यवाद’ मध्ये ‘वाद’ असला तरी ‘धन्यवाद’ हा निरर्थक शब्द आहे. दुसरे निरर्थक भाषांतर म्हणजे Journalism मधील ism चे मराठी भाषांतर ‘वृत्तपत्रवाद’ अथवा ‘पत्रकारितावाद ‘ असे केले तर ते चमत्कारिक होईल. (सुदैवाने तसे केले जात नाही. Journalism च्या यथार्थ भाषांतराची अडचण अद्यापि दूर झालेली नाही.) हे ‘वाद’ चे येथे अपेक्षित नाहीत. भारतीयपरिभाषेत’वाद’ही’खाससंज्ञा’असून ती स्वतंत्रपणे ‘एक चर्चेची तात्त्विक पद्धती’ म्हणून विकसित झालेली आहे. या पद्धतीचा वर उल्लेख केलेल्या ‘अर्थवाद’ शी संबंध जोडता येईल, तथापि तो संबंध आणि ‘अर्थवाद’ चे स्पष्टीकरण करणे हे प्रस्तुत लेखाचे विषयांतर होईल.
इंग्लिश भाषांतर
‘वाद’ या संस्कृत शब्दाचे इंग्लिश भाषांतर debate किंवा discussion असे करण्यात येते. संस्कृत भाषेतील विशिष्ट अर्थ असलेला हा शब्द त्या विशिष्ट मूळ अर्थानेच इतर भारतीय भाषांमध्ये झिरपला आहे.
व्युत्पत्ति
‘वाद’ हा पुल्लिंगी शब्द असून ‘वद्’ धातूला ‘घञ्’ प्रत्यय लागून ‘वाद’ बनतो. ( वद् + घञ् = वाद. घञ् – उच्चार ‘यं’.) त्याचा मूलार्थ “यथार्थबोधेच्छो- र्वाक्यम्” म्हणजे “ज्याने यथार्थ बोध होतो अशा वाक्याची इच्छा म्हणजे वाद” (महाजाल (अ)) नंतर कधीतरी यथार्थबोधाच्या अनेक विषयांमध्ये ‘ब्रह्म’ संकल्पनेची मिसळण झाल्यानंतर ‘ब्रह्मविषयक बोलणे म्हणजे वाद’ अशी व्युत्पत्ति बनली.
व्याख्या
संस्कृत तात्त्विक साहित्यात आढळणाऱ्या ‘वाद’ संकल्पनेच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे :
१. सर्वदर्शनसंग्रह: तत्त्वनिर्णयफलःकथाविशेषोवादः।……कथानामवादिप्रतिवादिनोःपक्षप्रतिपक्षपरिग्रहः। – तत्त्वासंबंधी निर्णय हे ज्याचे फळ आहे त्या कथेच्या प्रकाराला वाद असे म्हणतात. कथा म्हणजे वादी व प्रतिवादी यांनी पक्ष व प्रतिपक्ष यांची अनुक्रमे मांडलेली बाजू.(कंगले, पंडितर.प. श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर)पान २७२)
२. सर्वलक्षणसंग्रह : ‘तत्त्व बुभुत्सुना श कथा’ म्हणजे वाद जाणण्याची इच्छा करणाऱ्या व्यक्तीबरोबर संवाद म्हणजे ‘वाद’.(भारतीय संस्कृतिकोश, खंड ८, ‘वाद्विद्या’’, संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी, पान ५७४-६)
३. चरकसंहिता : तज्ज्ञांमधील संभाषा किंवा चर्चा म्हणजे वाद.
वरील पहिल्या दोन व्याख्यांमध्ये ‘वाद’ शब्दासाठी ‘कथा’ हा शब्द आला आहे. मराठीत ‘कथा’ हा शब्द ललित साहित्यातील ‘कथाकथन’ मधील ‘कथा’ (story) आणि ‘हरिकीर्तन’ या अर्थांनी रूढ आहे. न्यायदर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शनात ‘कथा’ हा शब्द ‘चर्चा’ या अर्थाने ‘वाद’ चा पर्यायी शब्द म्हणून वापरला गेला आहे. वात्स्यायनाने त्याच्या ‘न्यायभाष्य’ मध्ये “कथा” शब्द याच अर्थाने उपयोगात आणला. (“तिस्र: कथा भवन्ति वादो जल्पो वितण्डा चेति” : न्यायभाष्य १.२.१) म. म. डॉ. सतीशचंद्र विद्याभूषण यांनी ‘वाद’ चे इंग्लिश भाषांतर Debate/Discussion असे आणि ‘कथा’ चे इंग्लिश भाषांतर Discourse असे दिले आहे.
न्यायदर्शनातील ‘वाद’ संकल्पना : एक पदार्थ
‘वाद’ ही वैदिक षड्दर्शन परंपरेतील न्यायदर्शन या नावाने ओळखल्या जाणार्‍या तत्त्वज्ञानातील संकल्पना आहे. न्यायदर्शनास भारतीय तर्कशास्त्र, वादविद्या, प्रमाणविद्या म्हटले जाते. या दर्शनाचा मूळ ग्रंथ म्हणजे ‘न्यायसूत्रे’. ती मेधातिथी गौतम (अंदाजे इ.स. पू. ५५०) या ऋषींनी रचली असावीत. पण ती उपलब्ध नाहीत. आज उपलब्ध असलेली ‘न्यायसूत्रे’ अक्षपाद गौतम (इ.स. पू. १५०) या ऋषीने रचली असावीत. या ग्रंथातील पहिल्या सूत्रात ‘वाद’ हा शब्द येतो.
न्यायदर्शन हे ज्ञानात्मक वस्तूंची आणि त्यांच्या यथार्थ ज्ञानाची चर्चा करते. न्यायदर्शन ज्ञानवस्तूंना ‘पदार्थ’ म्हणते. पदार्थ म्हणजे पदाने किंवा शब्दाने ज्याचा बोध होतो तो (पदार्थ) (कोकजे, पंडित रघुनाथशास्त्री, ‘भारतीय तर्कशास्त्र प्रवेश’ पान२७३).साधारणतः आपण जगाचा जो अनुभव घेतो त्या अनुभवाचे आपण अनेक गोष्टींत वर्गीकरण, विभाजन करतो. त्यावेळी जगात विविध वस्तू आहेत, असे आपणास म्हणावयाचे असते. पण ते विश्लेषण अपुरे आहे. कारण आपला अनुभव केवळ भौतिक, मूर्त पदार्थांचाच असतो, असे नाही. कारण “विविध पदार्थांत अनुभवाचे विभाजन करणे याचा अर्थ जगातील वस्तूंची संख्या सांगणे किंवा विविध घटकात जगाची विभागणी करणे, असे नाही; तर आपण वापरतो ते शब्द किती प्रकारचे वाचक असतात, हे सांगणे म्हणजे पदार्थ सांगणे असते.”( बारलिंगे,सुरेंद्र शिवदास आणि पांडे, क्रांतिप्रभा, “भारतीय तर्कशास्त्राची रूपरेषा” , प्रकरण २ : वादप्रक्रिया पान१२) म्हणून ” (पदार्थ) हा शब्द जिला लांबी, रुंदी, रंग इत्यादी गुण आहेत अशा वस्तूस लावता येतोच पण जिला असे काही नाही अशा सूक्ष्म किंवा केवळ कल्पनेनेच जिचे अस्तित्व गृहीत धरता येते अशा वस्तूसही हा शब्द लावतात.” (कोकजे, पंडित रघुनाथशास्त्री, ‘भारतीय तर्कशास्त्र प्रवेश’ पान २७३) हे लक्षात घेतले पाहिजे. असे सोळा पदार्थ न्यायदर्शनाने स्पष्ट केले. ते सूत्र (१.२.१न्यायसूत्रे) असे आहे –

“प्रमाण-प्रमेय-संशय-प्रयोजन-दृष्टान्त-सिद्धान्तावयव-तर्क-निर्णय-वाद-जल्प-वितण्डा-हेत्वाभास-च्छल-जाति-निग्रहस्थानानाम्‌-तत्त्वज्ञानात् निःश्रेयसाधिगमः”

अर्थ : प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टान्त, सिद्धान्त, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितण्डा, हेत्वाभास, छल, जाति आणि निग्रहस्थान या तत्त्वांच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो.
न्यायशास्त्रात प्रमाण, प्रमेय आणि वादविद्या असे तीन मुख्य विषय आहेत. प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द ही ज्ञानाची चार साधने; प्रमेय म्हणजे आत्मा, ब्रह्म, ईश्वर, पुनर्जन्म इत्यादी विषय; वादविद्या म्हणजे संशय, प्रयोजन, दृष्टान्त, सिद्धान्त, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितण्डा, हेत्वाभास, छल, जाति आणि निग्रहस्थान यांचे ज्ञान. यातील छल, जाति आणि निग्रहस्थान हे तीन चर्चेचे दोष मानले जातात. या साऱ्याची माहिती घेणे ‘सुफल संपूर्ण’ आणि ‘युक्त व सत्य’ आकलन व चर्चेसाठी गरजेचे आहे, पण विस्तारभयास्तव ती टाळावी लागते.
भारतीय तर्कशास्त्रातील वादसंकल्पना
भारतीय तर्कशास्त्रात केवळ न्याय दर्शनाचाच समावेश होतो असे नाही तर बौद्ध, जैन आणि चार्वाक या दर्शनांनीही आपापले तर्कशास्त्र मांडले. या साऱ्यांनी ‘वाद’ चा विचार केला. प्राचीन काळी ‘वाद’ ही संकल्पना केवळ ‘चर्चा’ या अर्थाने उपयोजिली जात नव्हती तर विचारांचे नियम, तर्क या व्यापक अर्थाने हा शब्द वापरला गेला. ‘विचारसरणी’ हा अर्थ नंतर मिळाला. आत्मवाद, अनात्मवाद, शून्यवाद किंवा आज मार्क्सवाद या शब्दात ‘वाद’ हा शब्द विचारसरणी या अर्थाने येतो.
प्राचीन बौद्ध तत्त्ववेत्ता वसुबंधू (अंदाजे इ. स. पू. ३५० ) ने ‘वादविधी’चे आणि त्याचा भाऊ असंगाने ‘वादाचे नियम’ मांडले. गीयुसेप्पी तुस्सी (Giuseppe Tucci),ए. बी. कीथ (A. Berriedale Keith), एच. आर. रंगास्वामी अय्यंगार, डॉ. सतीशचंद्र विद्याभूषण, स्टीफन अनाकर (Stefan Anacker)इत्यादींनी ‘वाद’ व इतर चर्चा पद्धतीबाबत प्रचंड संशोधन केले आहे. ही सारी चर्चा सखोल तज्ज्ञांची आहे. ती सामान्य जनांशी संबंधित उरलेली नाही. या सर्वांत बलशाली व प्रभावी मानली गेली ती न्यायदर्शनातील ‘वाद’ ही संकल्पना.
न्यायदर्शनाच्या सोळा पदार्थांत ‘वाद’ हा एक पदार्थ मानला आहे. त्याच्या अनुषंगाने ‘खंडन-मंडन’ ही चर्चापद्धती जगाला परिचित झाली. याच र्चापद्धतीचे (१) वादाचे प्रकार (२) वादाचीप्रक्रिया (३) चर्चेचे ठिकाण व घटक असे तीन भाग करता येतील.
(१) वादाचे प्रकार: वाद, जल्प, वितंड
‘वाद’ हा एक पदार्थ असला चर्चापद्धती म्हणून वाद, जल्प, वितंड या तीन पदार्थांनी मिळून ही पद्धती बनते. म्हणून वाद, जल्प, वितंड हे वादाचे प्रकार मानले जातात. त्यांचे स्वरूप असे :
वाद :
न्यायसूत्रात वादाची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे:

” प्रमाणतर्कसाधनोपलम्भः सिद्धान्त-अविरुद्धः पञ्चवयवोपपन्नः पक्षप्रतिपक्षपरिग्रहो वादः।”

अर्थ : प्रमाण व तर्क या साधनांचा उपयोग करून पक्ष व प्रतिपक्ष यांच्यामध्ये सिद्धान्तावर लक्ष ठेवून पञ्चावयवी वाक्यांच्या मदतीने झालेली चर्चा म्हणजे वाद होय.(बारलिंगे, सुरेंद्र शिवदास आणि पांडे, क्रांतिप्रभा, “भारतीय तर्कशास्त्राची रूपरेषा” , प्रकरण २ : वादप्रक्रिया, पान२२) म्हणजेच ज्ञानाची साधने आणि तर्क यांच्या साह्याने केलेली आणि ज्या चर्चेत अनुमानाच्या पाच अवयवांची सुव्यस्थित मांडणी केलेली असते ती चर्चा म्हणजे वाद होय. (Chatterjee, Datta,pp. 167-68)चर्चेत जो सिद्धान्त स्वीकारलेला आहे, त्याविरोधात चर्चक जात नाहीत. ती केवळ एखाद्याविषयातीलतत्त्वकळावे,यानिरपेक्षहेतूनेसुरूकेलेलीचर्चा असते. (यातील पंचावयव म्हणजे काय ? या मुद्द्यात फार खोलात जाण्याचे येथे कारण नाही. त्यातील चर्चा कशी होते, त्याकडे लक्ष देणे आवश्यक राहील.)
इथे दोन मुद्दे आहेत. पहिला : एकदा निर्णय झाला की पुन्हाकुणीवादघालावयाचानसतो. समजा, पुन्हा वादकरावयाचाचअसेलतरज्यामुद्दय़ावरविजयमिळविलेलाअसतो, तोवगळूनत्यानंतरच्याइतर मुद्दय़ावरवादकरावयाचाअसतो. दुसरा : आधीच्या मुद्द्यावर त्याक्षणालातातडीनेउत्तरसुचलेनाहीकिंवावादप्रक्रियाचालूअसण्याच्याकालखंडात नंतर एखादा युक्त मुद्दा सुचला तरीचालू शकते. याचे मुख्य कारण ही तात्त्विक वादप्रकिया आहे, तेथे व्यक्तिगत जय-पराजयमहत्त्वाचानसून’तत्त्वाचे’ ज्ञानमहत्वाचेअसते.
तथापि एवढे स्पष्ट असूनही वादाला वेगळे वळण लागू शकते. तेव्हा काय केले असता अथवा काय झाले असता त्यास काय म्हणावे, याचेही मार्मिक वर्णन न्यायदर्शनाने केले आहे. त्यातूनच पुढील वादप्रकार अस्तित्वात येतात. ते असे :

जल्प
सत्यज्ञान हा वादाचा हेतू असला तरी त्या वादात होणाऱ्या चर्चेचा उद्देशच जर “येनकेन प्रकारे दुसर्‍याचा पाडाव करून स्वतः विजयी होणे” हा असेल तर काय ? .. तर अशा वादाला ‘जल्प’ म्हणतात. स्वतःकोणताहीपुरावाद्यावयाचानाही; पणदुसराकोठेचूककरतोत्यावरबारीकलक्षठेवूनत्याचुकीचेचभांडवलकरून “त्याचापराभवझाला”, अशीघोषणाकरणेआणिनंतरकाहीशीदांडगाईकरूनती चर्चाच बंदकरणे, म्हणजे ‘जल्प’. (बारलिंगे-पांडे, पान२२, कोकजे, पान २०३-४)दुसऱ्याला हरविणे आणि स्वतः जिंकणे हे दोन हेतू ठेवून हा वाद होतो.
वितंड :
वादाचा किंवा चर्चेचातिसराप्रकारम्हणजेवितंड (संस्कृत’वितण्ड’). केवळशब्दालाशब्दवाढविणे, निष्फळचर्चावाढविणे, कोणताहीनिर्णयस्वतनघेणेआणिदुसऱ्यालाहीघेऊनदेणे, शक्यझाल्यासदांडगाईकरूनचर्चाबंदकरूनस्वत:चाविजयघोषितकरणे, म्हणजे ‘वितंड’. ज्या मुद्द्यावर म्हणजे पराजयाचे कारण ठरणाऱ्या दोषाला ‘निग्रहस्थान’ म्हणतात. (बारलिंगे-पांडे, पान२२, कोकजे, पान २८४)
‘वितंड’ हा जल्पाचाच एक विशेष प्रकार आहे. (कोकजे, पान २०३-४) कारण’जल्प’मध्ये वाद घालणाऱ्या दोघांना आपापली मते तरी असतात. त्या आधारे ते दुसऱ्याला हरवू पाहतात. पण ‘वितंड’ मध्ये दुसऱ्यालाहरविणेहाहेतूसुद्धानसतो; फक्त समोरचा माणूस जे काही मांडेल ते खोडून काढणे हाच हेतू असतो, तेच धोरण असते. विनाकारण शब्दाला शब्द वाढवीत नेणे, कालापव्यय करीत राहणे हा हेतू असतो. प्रसंगी शारीरिक हातघाईही होते. धाकधापटशा होते. म्हणून त्यास ‘वितण्डा’ म्हणतात..थोडक्यात वाद शास्त्रोक्त पद्धतीने, नियमाप्रमाणे न होता, दुसऱ्याची उणीदुणी काढणे होते, आणि प्रसंगी ‘बा’चा’बा’ची होते तेव्हा त्यास ‘वितंडवाद’ म्हटले जाते.( बारलिंगे-पांडे, पान १३)

(२) वादाची प्रकिया: खंडन-मंडनपद्धती
वादाचे स्वरूप आणि वादाचे प्रकार लक्षात घेऊनच वाद करावयाचा असतो. तो करताना वादपद्धतीचे विशिष्ट स्वरूप असलेली प्रक्रिया समजावून घेतली पाहिजे. ती म्हणजे ‘पूर्वपक्ष – उत्तरपक्षपद्धती’. तिला ‘खंडन-मंडनपद्धती’ म्हणतात.
स्वतःची बाजू मांडणे हे मंडन आणि दुसऱ्याची बाजू खोडणे हे खंडन. ज्याचे खंडन करावयाचे तो ‘पूर्वपक्ष’ व ज्याचे समर्थन करावयाचे तो स्वतःचा पक्ष म्हणजे ‘उत्तरपक्ष’. जल्प आणि वितंडवाद न करता स्वतःचे मत मांडणे, योग्य ‘वाद’ करून उत्तरपक्ष मांडणे हा ‘सिद्धान्त’. या पद्धतीतून जो ‘निर्णय’ मिळतो तोच ‘न्याय’ असतो, हे वादविवाद पद्धतीतील मूलभूत तात्त्विक सूत्रआहे. सिद्धान्त आणि निर्णय हेही सोळापैकी दोन पदार्थ आहेत.
यात पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष तसेच खंडन-मंडन हे सापेक्ष शब्द आहेत. जो दुसऱ्याची बाजू खोडतो तो खंडन करतो आणि ज्याचे खंडन करतो तो पूर्वपक्ष असतो. ते झाल्यानंतर स्वतःची बाजू मांडतो ते मंडन असते आणि आपली बाजू मांडतो तो उत्तरपक्ष असतो. हे दोन्ही बाजूने घडते. त्यामुळे एकाच्या दृष्टिकोनातून दुसरा नेहमी उत्तरपक्ष असतो आणि तो स्वतः पूर्वपक्ष असतो.

(३) चर्चेचे ठिकाण व घटक : वादसभा
पहिला भाग म्हणजे ही चर्चा कशी चालावी, याचे प्रशिक्षण ज्या ठिकाणी होते तिला ‘तद्विद्य-संभाष-परिषद’ म्हणतात. तद्विद्य म्हणजे तज्ज्ञ आणि संभाषा म्हणजे चर्चा; परिषद म्हणजे सभा. तिला वादसभा म्हणता येईल. या सभेची रचना चार घटकांनी मिळून बनते. वादी, प्रतिवादी, सभापति आणि प्राश्निक. (कोकजे, पान २०८)
वादी: चर्चेचा मुद्दा उपस्थित करणारा, फिर्यादी प्रतिवादी : विरोध करून आपले मुद्दे मांडणारा, सभापती : वादाचा आरंभ करणे, त्यावर लक्ष ठेवणे आणि शेवटी निर्णय देणे ही कामे करणारी विद्वान अधिकारी व्यक्ति. ह्यालाच ‘मध्यस्थ’असेही म्हणतात. चौथा घटक म्हणजे प्राश्निक : अधूनमधून सूचक प्रश्न करणारे प्रेक्षक. यांनाच ‘सभ्य’ किंवा ‘सदस्य’ असे नाव आहे.
आजच्या न्यायालयीन परिभाषेत अनुक्रमे फिर्यादी, अशील, न्यायाधीश आणि साक्षीदार. किंवा टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत वादी, प्रतिवादी, सूत्रचालक अँकर हा (प्राश्निक आणि सभापती) तसेच पाहणारे ते प्रेक्षक म्हणता येईल.
कामकाज :
या वादसभेचे कामकाज असे चालते :
१. विप्रतिपत्ति : आधी सभापती विषय जाहीर करतो. (विप्रतिपत्ति = दोन परस्परविरोधी विधाने)
२. पक्ष-प्रतिपक्ष-परिग्रह : विषय ऐकून दोघेजण पुढे येऊन एकाने बाजूने (पक्ष) व दुसऱ्याने विरुद्ध (प्रतिपक्ष) बोलण्याची इच्छा सांगणे. त्यामुळे सभापतीस व प्रश्निकांना वादी व प्रतिवादी कोण, याचे ज्ञान होते. (परिग्रह = एकत्र आणणे, स्वतःजवळ ठेवणे)
३. स्थापना : सभापती आधी कुणाला एकाला त्याची बाजू मांडण्याची आज्ञा देतो. त्यानुसार वादी किंवा प्रतिवादी पाच वाक्यात (यास पंच अवयवी वाक्य म्हणतात) आपली बाजू मांडतो. त्यास विषयाची ‘स्थापना’ म्हणतात.
४. दोष : या स्थापनेवर, युक्तिवादावर दुसरा पक्ष आपला युक्तिवाद करून त्यातील दोष दाखवितो.

यात एकमेकांच्या दोषांचे निराकरण करणे, विषयाला धरून त्यातील सत्यज्ञानाकडे येणे अपेक्षित असते. युक्तिवादहानी होऊन चर्चेचे रूपांतर जल्प आणि वितंड यांच्यात होणार नाही, अशी काळजी दोघांनी घ्यावयाची असते. (टिपण २ पाहा) त्यांच्यावर सभापती लक्ष ठेवतो, प्राश्निक तिघांचे निरीक्षण करतात, सभापतीने परवानगी दिल्यास प्रश्न विचारतात, त्यांना चालना देतात. ही चर्चा पुढीलप्रमाणे होते :
चर्चेचे स्वरूप
वादी दुसऱ्याला आपली बाजू सांगतो तेव्हा त्या दुसऱ्याला आपले म्हणणे कळले आहे काय? हे वादी नीट विचारून घेतो. प्रतिवादीने ‘हो’ म्हटल्यास त्यास जे कळाले ते त्याच्याकडून वदवून घेतो. दोघांना एकच गोष्ट नीट कळले आहे, यावर शिक्कामोर्तब होते.
मग प्रतिवादीही हीच रीत वापरतो.
अशा रीतीने दोघांना समोरच्याची आणि आपली बाजू नीट कळते. हे दोन्ही पक्षांचे मंडन असते. हे आकलन पूर्ण झाले की मग वादविवाद सुरू होतो. खंडन सुरू होते. एकजण दुसऱ्याचे दोष दाखवितो. दुसरा तेच करतो. एका प्रक्षाने प्रतिपक्षाचे दोष दाखवून दिले की प्रतिपक्षाने ते मान्य करणे आणि भूमिकेत सुधारणा करणे आवश्यक असते. ती सुधारित भूमिका पुन्हा चर्चेसाठी खुली होते. त्यातीलही दोष शोधले जातात, त्यांचे निराकरण-सुधारणा होते, असे नेहमीच घडत राहाते. अशा रीतीने दोघेही एका निश्चित निर्णयाकडे येतात. अशा रीतीने पूर्वपक्ष-उत्तरपक्ष आणि खंडन-मंडन एकाचवेळी घडत राहाते.
आता, समजा वादी जे काही सांगतो ते प्रतिवादीस कळले नाही, असे प्रतिवादीने सांगितले तर वादी पुन्हा त्याचे म्हणणे सांगतो. त्याचवेळेस वादीचे म्हणणे प्रतिवादीला कळते की नाही, हे सभापती व प्राश्निक यांना कळत असते. पण समजा, प्रतिवादीला बाजू कळली नाही पण ती सभेला कळली तर; ‘सभेला कळले आहे पण प्रतिवादीला कळलेले नाही’, याची दोन्हीची खात्री सभापती करून घेतो. त्यावेळी “तुम्हाला का कळाले नाही? ” असे विचारून खात्री करून घेतो. आणि जर यावेळी “मूळ पक्षाने नीट मांडले नाही, म्हणून मला कळाले नाही” असे असे प्रतिवादी म्हणाला तर “मला आणि प्रश्निकांना कळाले आहे, तुम्हाला मात्र कळलेले नाही.” हे सभापती प्रतिवादीला लक्षात आणून देतो. ते त्याला पटवून देतो. जर प्रतिवादीला अद्यापिही कळले नाही की मग सभापती ‘प्रस्तुत प्रतिवादी हा अज्ञानी किंवा बुद्धिदुर्बल आहे’, हे सभेच्या लक्षात आणून देतो. यावेळी “मूळ पक्षाने नीट मांडले नाही, म्हणून मला कळाले नाही” असे म्हणण्यास प्रतिवादीला जागा उरत नाही.
हे सारे खुलेआम घडत असते. येथे ‘वाद’ या पदार्थाची पूर्ण व्याख्या लक्षात येते. ती अशी :

‘वाद’ ची पूर्ण व्याख्या

” प्रमाणतर्कसाधनोपलम्भः सिद्धान्त-अविरुद्धः पञ्चवयवोपपन्नः पक्षप्रतिपक्षपरिग्रहो वादः।”
अर्थ : प्रमाण व तर्क या साधनांचा उपयोग करून पक्ष व प्रतिपक्ष यांच्यामध्ये सिद्धान्तावर लक्ष ठेवून पञ्चावयवी वाक्यांच्या मदतीने झालेली चर्चा म्हणजे वाद होय. (बारलिंगे,पांडे, पान२२)
वादाचा काळ
साधारणपणे दोष दिग्दर्शन, दोषांचे निराकरण, त्यावर खुली चर्चा आणि अंतिम उभयमान्य सत्यनिष्ठा ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी, पक्ष-प्रतिपक्ष यांच्याकडून किमान आठवेळा व्हावी, अशी अपेक्षा असते. (ए. ऑ. फि. पान ४०७-१०) अर्थात चर्चेच्या फेरींच्या संख्येचे नियम नाहीत. शिवाय ही चर्चा एकाच दिवशी एकाच बैठकीत पूर्ण करावयाची, असाही नियम नाही. ही चर्चा अनेक दिवस चालू शकते. जोपर्यंत मांडलेल्या विषयातील सत्य सापडत नाही, तोपर्यंत चर्चा करावी, असा संकेत मात्र आहे. तो संकेत काटेकोरपणे पाळण्याची रीत आहे, आजही अशा दीर्घकालीन चर्चा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात चालतात.
—————————————————-

१. टिपण : नल-दमयन्ती स्वयंवराख्यान(नैषधचरित)’ हे महाकाव्य लिहिणाऱ्या श्रीहर्ष या बाराव्या शतकातीलप्रसिद्ध संस्कृत कवी आणि अद्वैतवेदान्तीदार्शनिकाने “खण्डन-खण्ड-खाद्य”नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने ‘ ‘शब्द’ हे ज्ञानाचे साधन वस्तूचा अर्थ किंवा थेट ती वस्तूच स्पष्ट करते’ या न्यायदर्शनाच्या भूमिकेचे खंडन केले. या खंडनाचे खंडन करण्यासाठी शंकर मिश्रा (पंधरावे शतक) ह्या तर्कपंडिताने ”वादीविनोद” हा ग्रंथ लिहिला. ”वादीविनोद’ हा वाद विषयक ग्रंथ असून शंकर मिश्रा यांनी ‘वाद’ या पदार्थाची प्रदीर्घ चर्चा केली आहे. तथापि ती बरीच पारिभाषिक आणि अनेक गृहीतकांवर आधारित आहे. त्यातील सहज समजेल अशी प्रस्तुत संदर्भात उपयुक्त माहिती पुढीलप्रमाणे : शंकर मिश्रांनी या ग्रंथात वादाशी संबंधित अनेक दोषांचे विवरण दिले आहे. त्याचे तीन प्रकार करता येतील.
(अ) युक्तिवादहानीचे सात प्रकार : प्रतिज्ञाहानी, प्रतिज्ञासमस्या, निरर्थक, अविज्ञातार्थ (one who is acquainted with any matter on the true state of a case ), अर्थान्तर आणि अपार्थक (apartment) हे सात प्रकार स्वतःची असमर्थता लपविण्यासाठी असून चर्चेत ते येणार नाहीत असे पहावयाचे असते.
(ब) चर्चेतील संदर्भयुक्त असूनही वापरावयाचे नाहीत असे सात दोष :प्रतिज्ञान्तर, हेत्वान्तर, अज्ञान, अप्रतिभा, विक्षेप, मतानुज्ञ आणि पर्यानुयोज्योपेक्षन.
(क) प्रसंगानुरूप गरज असेल तरच चर्चेत आणावेत असे सात दोष: विरोध, न्यून, अधिक, पुनरुक्त, अप्राप्तकाल, अननुभाषण आणि अपसिद्धान्त.

संदर्भ : (ए. ऑ. फि.) “एनसायक्लोपेडिया ऑफ इंडियन फिलॉसॉफी” : वादीविनोद : व्ही. वरदाचारी यांनी दिलेला सारांश (शंकर मिश्रा यांची वादविषयक भूमिका),: संपादक – कार्ल पॉटर आणि सबजीबन भट्टाचार्य, खंड सहावा, मोतीलाल बनारसीदास, दिल्ली, प्रत : संगमनेर महाविद्यालय, संगमनेर ४२२ ६०५, R(k).2/Potter K/ 42598, ISBN : 81-208-0894-4, रु. ९९५/-, पान ४०७-२२.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.