मनोगत

ज्या माणसाला म.गांधींच्याविषयी अतीव श्रद्धा आणि आदर आहे त्या माणसाने गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांच्याहीविषयी आपल्या मनात अत्यंत आदर आहे, हे सांगणेच आपल्याला प्रथमत: पटत नाही. कारण आपण मनातल्या मनात दोन गोष्टींची सांगड घालून टाकलेली आहे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात आदर असणे आणि त्या व्यक्तींची मते, निदान प्रमुख मते अजिबात मान्य नसणे या दोन गोष्टी एकत्र संभवतात, हेच आपण विसरून गेलेलो आहोत. वर्तमानकाळातील लोकांना ज्या व्यक्ती परस्परांच्या विरोधी उभ्या राहिलेल्या दिसतील, त्या व्यक्ती खरोखरीच भविष्यकाळातल्या मंडळींना एकमेकांच्या विरोधी वाटतील असे नाही. लो.टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून या दोन पुरुषांकडे पाहणे जितके आवश्यक आहे, तितकेच दोघांच्या भूमिकांमधील फार मोठे साम्य पाहणेही आवश्यक आहे आणि दोन परस्परविरोधी भूमिका कालांतराने परस्परपूरक ठरल्या हेही पाहणे आवश्यक आहे. आज आम्ही स्वतंत्र भारतात लोकशाही नांदवीत आहोत. या लोकशाहीत संसदेतील सभासद कसा असावा, असे जर मला कुणी विचारले तर त्याबद्दल ’आदर्श’ म्हणून सांगताना टिळक आणि गांधीजी यांची नावे मला सांगता येणे कठीण आहे. टिळक आणि गांधी यांच्याविषयी मला कितीही आदर असला, तरी त्यांना कुशल संसदसदस्य होणे कुठवर जमले असते याविषयी मला दाट शंका आहे. कुशल संसदसदस्याचा आदर्श म्हणून जी नावे आपण घेऊ, ती घेताना गोखले या मवाळपक्षीयाचे, किंबहुना श्यामाप्रसाद मुखर्जी या जनसंघाच्या पक्षनिर्मात्याचे नाव घेण्यास संकोच वाटण्याचे काही कारण नाही. किंबहुना निष्णात कायदेपंडित म्हणून नाव घेताना मरहूम जीना यांचे नाव घेण्यास लाज वाटण्याचे कारण नाही.

नरहर कुरुंदकर (व्यक्तिपूजा: एक चिकित्सा या लेखातून)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.