भारतीय चर्चापद्धती (भाग ६)

वादपद्धती: उच्च, उदात्त पण वर्णग्रस्त, पक्षपाती!

कौटिल्यीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, वादविद्या, चातुर्वर्ण्य

——————————————————————————–

         भारतीय चर्चापद्धतीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या लेखमालेच्या ह्यापूर्वीच्या भागांमध्ये आपण आन्वीक्षिकीचा परिचय करून घेतला. ह्या पद्धतीचे उपयोजन तज्ज्ञ मंडळींमध्ये मानवी आरोग्यविषयक चर्चा घडविताना प्रभावी पद्धतीने कसे केले जात होते ह्याचे दाखले चरकसंहितेत अनेक ठिकाणी मिळतात. त्यांतील वादांचे स्वरूप व परिभाषा ह्यांचा परिचय ह्या अंतिम लेखात करून दिला आहे.

——————————————————————————–

         “तत्त्वज्ञानाचा निष्कर्ष म्हणून आणि सुफल परिणाम म्हणून विज्ञानाचा जन्म होतो; तात्त्विक अधिष्ठानाअभावी विज्ञान जिवंत राहू शकत नाही. तत्त्वज्ञानाचा नाश झाला तर नाश होण्याची पाळी विज्ञानाची असते.’‘

            – आयन रँड (For the New Intellectual, १९६४, पान ४४ )

        अक्षपाद गौतमाची न्यायसूत्रे आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र ह्यांतून आन्वीक्षिकी ह्या विद्याचर्चेच्या लोकशाहीस्वरूपाची प्रचीती येते हे जरी खरे असले तरी ही एकूण प्राचीन ज्ञानव्यवस्था, तिचा आधार असणारी गुरुशिष्यपरंपरा हीच वर्ण-जाति-लिंगभेदग्रस्त असल्यामुळे आन्वीक्षिकी आणि चरकसंहिता यांच्यातही तिचे प्रतिबिंब पडले, यात नवल नाही.

         सर्व भारतीय तत्त्वचिंतनाचे एकमेवाद्वितीय उद्दिष्ट म्हणजे मानवाला दुःखमुक्त करणे आणि सुखप्राप्ती करून देणे एवढेच नसून या दोहोंच्या पलिकडे जाऊन त्याला अंतिम मुक्ती (त्या त्या दर्शनानुसार मोक्ष-निर्वाण-अर्हतपदी पोहोचविणे) हे आहे. दुःखमुक्ती आणि सुखप्राप्ती प्राण्यांनासुद्धा द्यावी, हा या उद्दिष्टाचा विस्तार आहे. या दुःखमुक्तीचा मार्ग आत्मविद्या हा आहे, म्हणजे माणसाने ‘स्व’रूप ओळखले की त्याला दुःखमुक्तीचा मार्ग उपलब्ध होतो, असे वैदिक-अवैदिक दर्शने सांगतात. म्हणून दोहोंच्याही व्यापक अर्थाने आत्मविद्या; मग ती मोक्षवादी इत्यादी असो व इहवादी, ही माणसाची मुक्तिविद्या आहे.

पक्षपाती उपयोजन 

         आन्वीक्षिकी आणि आयुर्वेद या दोघांचेही हेच उद्दिष्ट आहे. प्राथमिक स्तरावर माणसाला दुःखमुक्ती देणे आणि त्याद्वारे त्याला मोक्ष देणे हे उद्दिष्ट येथेही आढळते. आन्वीक्षिकीची आत्मविद्या केवळ राजासाठी आहे तर चरकसंहितेची आत्मविद्या प्रत्येक माणसासाठी आहे. त्याचे तत्त्वज्ञान चरकाचार्य जनपदोध्वंसनीय विमान या अध्यायात जास्त स्पष्टीकरण देतात.पण हे ज्ञान मुख्यतः ब्राह्मण वर्णासाठी आहे, हे ते निक्षून सांगतात.

         तेच न्यायदर्शनाचे आहे. वृक्षाच्या काटेरी फांद्या त्या जश्या वृक्षाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या संरक्षणासाठी वादातील जल्प आणि वितंड ही आवरणासमान आहेत, असे न्यायदर्शनात म्हटले आहे, हे डॉ. सतीशचंद्र विद्याभूषण आणि दि एनसायक्लोपेडीया ऑफ इंडियन फिलॉसॉफीज या खंडांचे संपादक आणि तत्त्ववेत्ते कार्ल पॉटर, डॉ. सुरेंद्र बारलिंगे अधोरेखित करतात. (तत्त्वाध्यवसायसंरक्षणार्थं जल्पवितण्डे वीजप्ररोहसंरक्षणार्थं कण्टक-शाखावरणवत्ताभ्यां विगृह्य कथनम् .. न्यायसूत्रे ४.२.४९,५०)

विशेषतः आयुर्वेदाचे उद्दिष्ट कितीही चांगले आणि उद्दात्त असले तरी त्याचे समाजातील उपयोजन मात्र पक्षपाती ठरले आहे. आयुर्वेदाचे उद्दिष्ट आणि त्याची सिद्धी यात वर्णभेद, जातिभेद आणि लिंगभेद यांचा मोठा अडसर असल्याने आयुर्वेदाचे ज्ञानवितरण मोठ्या प्रमाणावर होऊ शकले नाही.

अर्थशास्त्राचा हेतू

         कौटिल्यकालीन समाज हा एक सार्वभौम समाज होता. तो मानवतावादी आणि जनवादी मानता येईलही, पण मुख्यतः आन्वीक्षिकी त्रयी, वार्ता ह्या विद्या मुख्यतः राजाला उद्देशून होत्या. त्याचवेळी राजसत्तेचा हेतू केवळ प्रजेचे सुख आणि हितसंवर्धन व संरक्षण हाच असावा, प्रत्येक दिवशी शासकाला प्रजेचे सर्वांगीण, मुख्यतः आर्थिक उत्थान कोणत्या प्रकारे होईल, एक मजबूत अर्थव्यवस्था कशी निर्माण होईल आणि टिकेल, याचाच विचार केला पाहिजे, हाच हेतू होता. अर्थशास्त्राचे पहिले प्रकरण ‘विनयग्रहणाविषयी’ मध्ये राजाची आणि प्रजेची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत. तसेच राजाने प्रजेकडून वर्णाश्रमधर्म कडकपणे पाळला जाईल, असे पाहावे, असा नियम केला आहे. कौटिल्य वर्णाश्रमधर्माचा म्हणजे वर्णभेदाचा पुरस्कार करतो.

आयुर्वेदाचा हेतू :

         चरकसंहितेत आयुर्वेदाचा हेतू स्पष्ट केला आहे. तो असा :        

            हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितम् ।

            मानं च तच्च यत्रोक्तं आयुर्वेदः स उच्यते ॥ (सूत्रस्थान १.४१)

         अर्थात् हितायु, अहितायु, सुखायु आणि दुःखायु; अशा चार प्रकारच्या आयुष्याचे हित आणि अहित (पथ्य आणि अपथ्य) आयुचे प्रमाण तसेच त्या आयुष्याचे स्वरूप ज्यात स्पष्ट केले आहे त्यास आयुर्वेद म्हटले आहे. अध्ययनविधि, अध्यापनविधि, शिष्यपरीक्षा आणि आचार्यपरीक्षा इत्यादी अटी पाहाता ब्राह्मण प्राथम्याने, नंतर क्षत्रिय आणि मग शक्य झाल्यास वैश्य, पण शूद्र नाही ! (विमानस्थान ८. ४ ते १४) अध्ययन, अध्यापन आणि तद्विद्यासंभाषा हे तीन  शास्त्र जाणण्याचे उपाय आहेत. (अध्ययनम्, अध्यापनं, तद्विद्यसंभाषा चेत्युपाया.. विमानस्थान ८.६) या प्रक्रियेत चरकाचार्यांकडून घडलेला पक्षपात समजावून घेण्यासाठी आयुर्वेदज्ञ यांची लक्षणे पाहू.

आयुर्वेदज्ञलक्षण

         आयुर्वेदतज्ज्ञ कुणाला म्हणावे ? तर “वेगवेगळी वाक्ये, वाक्यार्थ आणि अर्थावयव याद्वारे तंत्र (आयुर्वेद), स्थान (सर्व माहिती), चरकसंहितेचे सर्व अध्याय आणि या सर्वांशी संबंधित प्रश्नांचे समाधान करण्याची ज्याची बौद्धिक क्षमता आहे; या सर्वांविषयी अधिकारवाणीने जी व्यक्ती बोलू शकते, ज्ञानदान करू शकते त्या व्यक्तीस आयुर्वेदविद् समजले पाहिजे. (तत्रायुर्वेदविद्स्तन्त्र-स्थानाध्याय पृथक्त्वेन वाक्यो वाक्यशोऽर्थावयवशश्च प्रवक्तारो मन्तव्या … सूत्रस्थान, ३०.१६)

         ह्या आयुर्वेदविद् व्यक्तीने तंत्रकारांनी (चरकाचार्यांनी) जसे सांगितले आहे ते आणि तसेच म्हणजे आर्षतंत्र (आर्ष = पहिले) शिष्यांना प्रदान करावे. ज्ञानदान हा तज्ज्ञतेचा पुरावा आहे. हे कसे करावे, याचे तन्त्र स्पष्ट केले आहे. चरकसंहितेत जसे स्पष्ट केले आहे तसे पूर्ण रूपात अध्ययन करणे म्हणजे ‘वाक्यांश’. तो वाक्यांश त्रिविध शिष्यांना म्हणजे मंदबुद्धि, मध्यमबुद्धि आणि तीक्ष्णबुद्धि अशा तीन प्रकारच्या विद्यार्थांना विस्ताराने किंवा संक्षेपात सांगणे म्हणजे ‘वाक्यार्थाशः ‘ म्हटले आहे. कठीण शब्दाचा अर्थ पुनःपुन्हा सांगून परिभाषा घटवून घेणे म्हणजे ‘अर्थावयवतः’. (तन्त्रमार्षकात्स्न् र्येन यथाम्नायमुच्यमानं वाक्यशो भवत्युक्तम् सूत्रस्थान, ३०.१७ )

आप्त कुणाला म्हणावे ?

         आप्त म्हणजे ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवता येतो ती व्यक्ती. तपोबल आणि ज्ञानबल यामुळे जी व्यक्ती रजोगुण आणि तमोगुणापासून पूणर्तः मुक्त आहे, यामुळे ज्यांना त्रिकाळाचे संपूर्ण व विशुद्ध ज्ञान प्राप्त झाले आहे; असे महापुरुष हे आप्त, शिष्ट आणि विबुध ज्ञानयुक्त असतात, त्यांचे वचन म्हणजे बोलणे विश्वासार्ह मानावे. (सूत्रस्थान ११.१९) मनुस्मृतीने विश्वासू व्यक्तींच्या यादीत केवळ ब्राह्मणांना अग्रस्थान, चिरंतन दर्जा दिल्याने उरलेले सारे आप्त ठरत नाहीत. आयुर्वेदतज्ज्ञ हा केवळ आप्त असावा, त्याने आप्ताकडून ज्ञानग्रहण करावे, आप्तालाच ज्ञान दान करावे, हेच यातून सूचित होते.

वैद्यांचे दोन भेद : रोगाभिसर व प्राणाभिसर

         चरकसंहिता मूलतः मूर्ख आणि विद्वान, असा आणि नंतर त्यात्या विषयाच्या विवरणाच्या ओघात छद्म, वर्जनीय आणि पूज्य वैद्य असा, त्यानंतर मूर्ख आणि विद्वान परीक्षक असा भेदही करते. मूर्ख, पाखंडी वैद्याची निंदा केली असून त्यास उपदेशही केला आहे. अध्ययन आणि अध्यापनपात्रता यासंबंधात चरकाचार्य आणखी एक महत्त्वाचा भेद करतात, तो सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

         रोगाभिसर व प्राणाभिसर असे वैद्यांचे दोन भेद आहेत. रोग नष्ट करून प्राणास सहाय्यक ठरणारे जे चिकित्सक त्यांना ‘प्राणाभिसर’ म्हटले जाते. रोगाला सहाय्यभूत व प्राणास विनाशाप्रति नेणारे असतात त्यांना ‘रोगाभिसर’ म्हटले जाते (द्विविधास्तु खलु भिषजो भवन्त्यग्निवेश! प्राणामिकेऽभिसरा हन्तारो रोगाणां, रोगाणांमेकेऽकेभिसरा हन्तारः प्राणानामिति। सूत्रस्थान, अध्याय २९.५)

         प्राणाभिसर वैद्याची लक्षणे अशी : ‘जो कुलीन (जो चांगल्या कुळात जन्माला आलेला) असेल, ज्यास शास्त्राचे निर्भ्रांत ज्ञान असेल, ज्याने चिकित्सा आणि औषधनिर्माण पाहिले असेल वा स्वतः केले असेल, जितहस्त (शस्त्र, क्षार, अग्नि आदि प्रयोगांत जो सिद्धहस्त) असेल, जितेंद्रिय असेल, ज्याच्या जवळ आवश्यक ती सर्व साधनसामुग्री उपलब्ध असेल, ज्याची सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये कार्यक्षम असतील, जो रोग आणि रोगी प्रकृति जणू शकतो आणि जो प्रतिपत्ति (रोगांची उत्पत्ति वगैरे कारणे) जाणतो त्यास रोगनाशक वैद्य किंवा प्राणाभिसर वैद्य म्हणावे.’ (य इमे कुलीना: पर्यावदातश्रुता: परीदृष्टकर्माणो दक्षा: शुचायो जितहस्ता जितात्माना: …. सूत्रस्थान, अध्याय २९.७)

         संक्षेपात, प्राणाभिसर वैद्याच्या विपरीत लक्षणे असलेला तो रोगाभिसर वैद्य. रोग वाढविणारा आणि चुकीची औषधे देऊन रोग्याचा जीव घेणारा असे संक्षेपात म्हणता येईल. चरकसंहितेत ‘राजवैद्य’ ही संकल्पना मांडलेली आहे.

आयुर्वेदाचे अध्ययन कोणी करावे ?

         आयुर्वेदाचे अध्ययन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनीच केले पाहिजे. प्राणिमात्रांवर कृपा करण्यासाठी ब्राह्मणांनी, आत्मरक्षा व प्राणिमात्रांचे रक्षण करण्यासाठी क्षत्रियांनी तर उपजीविकेसाठी वैश्यांनी हे अध्ययन करावे. सामान्य दृष्टीने पाहता धर्म, अर्थ, काम यांच्या प्राप्तीसाठी सर्वांनीच या शास्त्राचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अध्यात्मज्ञानी, धर्ममार्गस्थित, धर्मसंस्थापक, माता, पिता, भाऊबंद, गुरुजन यांना होणाऱ्या रोगशान्तीसाठी जो प्रयत्नशील असतो, आयुर्वेदोक्त अध्यात्माचे दर्शन व मनन जो करतो, या शास्त्राचा उपदेश दुसऱ्यांना करतो आणि स्वतः त्यानुसार वर्तन करतो अशा पुरुषाचा आयुर्वेदाध्ययन हा परम धर्म आहे (स चाध्येताव्यो ब्राह्मणराजन्यवैश्ये:। तत्रानुग्रहार्थं प्राणिनां ब्राह्मणै:, आरक्षार्थं राजन्यै:, वृत्त्यर्थ वैश्ये:; सामान्यतो वा धर्मार्थकामपरीग्रहार्थसर्वै:। तत्र यदध्यात्मविदां धर्मपथस्थानां …., सूत्रस्थान : ३० :२९) आयुर्वेद शूद्रांसाठी नाही. पण सुश्रुताने मात्र किंचित सौम्य भूमिका घेतली आहे.

सुश्रुतसंहितेची सौम्य भूमिका

         सुश्रुतसंहितेच्या ‘शिष्योपनयन’ या दुसऱ्या प्रकरणात (सुश्रुतसंहिता/ सूत्रस्थानम्/अध्याय ०१-१५) शूद्राला थोडेसे झुकते माप दिले आहे खरे पण तेही पक्षपाती म्हणावे लागेल असेच आहे.

ब्राह्मणक्षत्रियवैश्यानामन्यतममन्वयवयः शीलशौर्यशौचाचारविनयशक्तिबल

मेधाधृतिस्मृतिमतिप्रतिपत्तियुक्तं तनुजिह्वौष्ठदन्ताग्रमृजुवक्त्राक्षिनासं प्रसन्नचित्तवाक्चेष्टं क्लेशसहं च भिषक् शिष्यमुपनयेत्

अतो विपरीतगुणं नोपनयेत् ॥३॥

         म्हणजे : ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांपैकी कोणत्याही वर्णातील विद्यार्थी, जो कूळ, वय, शील, वीरवृत्ति, शुचिर्भूतपणा, शुद्धाचरण, नम्रपणा, कर्तृत्वशक्ती, बळ, धारणाशक्ती, धारिष्ट, स्मरणशक्ती, बुद्धी, चातुर्य इत्यादी गोष्टीने युक्त आहे, त्याचप्रमाणे ज्याची शरीराची ठेवण, जीभ, ओठ, दातांचा अग्रभागही सरळ व्यवस्थित आहेत, तोंड, डोळे, नाक ही सरळ आहेत, ज्याचे मन प्रसन्न आहे, तसेच बोलणे व वागणे हे समाधानकारक आहेत आणि जो कष्ट सोसणारा इत्यादी सर्व बाजूंनी योग्य आहे; असे पाहून अशा विद्यार्थ्यास पसंत करून वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी त्याचे उपनयन करावे. ह्याच्या उलट ज्याचे गुण आहेत असा शिष्य वैद्यकशास्त्र शिकण्यास घेऊ नये व त्याचे उपनयनही करू नये.

ब्राह्मणस्त्रयाणां वर्णानामुपनयनं कर्तुमर्हति राजन्यो द्वयस्यवैश्यो वैश्यस्यैवेति

शूद्रमपि कुलगुणसंपन्नं मन्त्रवर्जमनुपनीतमध्यापयेदित्येके ॥५॥

         म्हणजे : ब्राह्मणाने ब्राह्मण इत्यादि तीन वर्णाचे, क्षत्रियाने क्षत्रिय व वैश्य या दोन वर्णाचे व वैश्याने केवळ वैश्याचे उपनयन करावे. शूद्रदेखील कुलशीलादिकांनी संपन्न असा पाहून मंत्र वर्ज करून त्यालादेखील या शास्त्राचे शिक्षण द्यावे असेही काही ऋषींचे मत आहे .

जनपदोध्वंचे महत्त्व

         आयुर्वेदात अर्थशास्त्राशी जुळणारे, त्याच्या सुरात सूर मिसळणारे प्रकरण म्हणजे ‘विमानस्थान’. या प्रकरणातील ‘जनपदोध्वंसनीय विमान’ हा तिसरा अध्याय. जनपदोध्वंस म्हणजे विविध साथीचे रोग. राजाने समाजस्वास्थ्यासाठी काय करावे, हे यात स्पष्ट केले आहे. कर्तव्य करण्यात राजाची कसूर झाली, तो भ्रष्ट झाला की वायू, जल, देश व राजा अस्तित्वात असण्याचा काल हे चार घटक दूषित होतात. त्यामुळे भ्रष्टाचार, रोगराई आणि युद्धे ओढवून राज्याचा विनाश होतो, असे चरकाचार्य बजावतात. या सामाजिक विध्वंसाचे कारण म्हणजे अधर्म. अधर्म यांचा अर्थ आधी व्यक्तीने ‘प्रज्ञापराध’ करणे आणि नंतर समाजाने आणि नंतर राज्यकर्त्याने ‘प्रज्ञापराध’ करणे. धर्मपालन म्हणजे प्रत्येकाने आपापले काम समाज, राज्य आणि धर्म स्थिर राहील, असे नैतिक वर्तन करणे.

         अर्थशास्त्रात मात्र हा जनपदोध्वंस होऊच नाही याची दक्षता राजाने कशी घ्यावी, याच्या स्पष्ट आदेश आहेत. हा या दोन आयुर्वेद आणि अर्थशास्त्र-विषयातील महत्त्वाचा दुवा आहे.

प्रज्ञापराध : रोगाचे कारण

         धीधृतिस्मृतिविभ्रष्ट: कर्मयत् कुरुत्ऽशुभम्।

         प्रज्ञापराधं तं विद्यातं सर्वदोष प्रकोपणम्॥

                                                            (चरकसंहिता शरीरस्थान १.१०२)

         अर्थात् धी (बुद्धि), धृति (धैर्य) आणि स्मरणशक्ति भ्रष्ट झाल्याने माणूस अशुभ कर्म करतो तेव्हा सर्व शारीरिक आणि मानसिक दोषप्रकोप होतो. या अशुभ कर्मांना ‘प्रज्ञापराध’ म्हटले आहे. जो प्रज्ञापराध करेल त्याचे शरीर आणि स्वास्थ्य यांची हानि होते, तो रोगग्रस्त होतो.

चरकसंहितेचे महत्त्व

         येथे एक लक्षात ठेवले पाहिजे की “चरकसंहितेला केवळ वैद्यकाच्या दृष्टिकोनातूनच महत्त्व आहे आणि तो केवळ आयुर्वेदाचार्य (बी.ए.एम.एस.) आणि त्यातील इतर उच्चपदव्या मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे’‘, हा गैरसमज काढून टाकला पाहिजे. हजारो वर्षे हाच गैरसमज पसरला आहे.

         चरकसंहितेतील वैद्यक हा विषय वगळून अन्य कोणताही विषय त्याजागी आणला तर हा ग्रंथ त्या विषयाचे स्वरूप धारण करणारा ग्रंथ होईल, अशी क्षमता या ग्रंथात आहे.  हा गंथ कोणत्याही विषयाची संशोधनपद्धती होऊ शकेल अशी वैज्ञानिक क्षमता धारण करणारा आहे. म्हणूनच त्यास ‘भारतीय विज्ञान’ म्हटले आहे. भारतीय तत्त्वज्ञान, संभाषण- कौशल्य, संज्ञापन व पत्रकारिता, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र इ. विषयांचे विद्यापीठीय अभ्यासक्रम,  वादविवादक, प्राध्यापकांचे संशोधनपद्धतीविषयक अभ्यासक्रम आणि ओरिएन्टेशन, रिफ्रेशर कोर्सेस येथे हा ग्रंथ संपादित स्वरूपात लावणे शक्य आहे.  हे दोन्ही ग्रंथ वस्तुतः भारतीय तत्त्वज्ञानाचे उपयोजित ग्रंथ आहेत, म्हणजे ही प्रात्यक्षिकेच म्हणता येतील, इतक्या  उच्च दर्जाचे तार्किक आकार (Logical Forms) आहेत. त्या Forms मध्ये कोणताही विषय भरता येतो. शिवाय या form मध्ये समाविष्ट नसलेली , पण आवश्यक अशी माहिती देण्यासाठी एक मोकळा अवकाशही ज्यात आहे, असे या दोन्ही ग्रंथांचे स्वरूप आहे.

         हा ग्रंथ शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ पातळीवर नेमला गेला पाहिजे. त्यावेळी त्या त्या पातळीनुसार त्यातील योग्य तेवढाच भाग संपादित करून स्वतंत्र ग्रंथनिर्मिती केली पाहिजे. यासाठी तज्ज्ञमंडळीची आणि सुजाण वैद्यांची गरज आहे. हे आंतरविद्याशाखीय काम आहे.

         अर्थात उपयोजनाच्या बाबतीतच हे साम्य आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. दोहोंचा उपयोग मात्र सर्वांसाठी असला तरी त्यांतील वर्ण-जाती-लिंग भेद अगदी लक्षणीय आहे.

पक्षपात आणि पुरुषप्रधानता !!

         चरकसंहितेत वर्णभेद अगदी स्पष्ट आहे. यात उल्लेखलेल्या पहिल्या ऋषिपरिषदेत ऋषिकेचा (स्त्रीऋषीचा – ऋषीची मुलगी, पत्नी, आई यांचा) उल्लेख आहे पण पुढे कुठेही स्त्रीऋषीचा मागमूसही नाही. स्त्रीने शिकावे, अशी कुठेही शिफारस नाही. कारण स्त्रिया या वर्णव्यवस्थेत शूद्रातिशूद्र असल्याने त्यांना कुठेच अवकाश दिलेला नाही. एवढेच नव्हे तर गर्भाधानविधीत मुलगा कसा होईल ? याचेही विधी स्पष्ट केले आहेत. ही पुरुषप्रधानता आहे.

         हेच पक्षपाती धोरण कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही आढळते. राजपदावर क्षत्रिय असावाच, ब्राह्मण असला तरी बिघडत नाही, पण वैश्य आणि शूद्र नसावेत, हे यात आग्रहाचे प्रतिपादन आहे. राजनीती ही केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांची मिरासदारी आहे, त्यात शूद्र आणि शूद्रातिशूद्र स्त्रीला अवकाश नाही, हा स्पष्ट आदेश आहे. कौटिल्य स्त्रीचा उपयोग राजकारणासाठी आणि महसुलासाठी कसा होईल, याची सविस्तर माहिती देतो. पण वैश्य, शूद्र आणि स्त्री ज्ञानाच्या केंद्रभागी असावी, असा आग्रह धरत नाही.

नुकसान

         चरकाचार्यांनी ज्ञानदानात पक्षपात केल्याने केवळ उच्चवर्णीय वैद्य निर्माण झाले, त्यातूनच राजवैद्यही निर्माण झाले. क्षत्रिय आणि वैश्य वर्णातून आयुर्वेदतज्ज्ञ निर्माण झाले, असा इतिहास उपलब्ध नाही. ज्यांना साथीचे रोग होऊ नयेत, असे चरकाचार्यांना वाटते त्या बहुसंख्य असणाऱ्या शूद्रांमध्ये वैद्य निर्माण होऊ शकले नाहीत, त्यांना योग्य उपचार मिळू शकले नाहीत, पण त्यांच्यात अंधश्रद्धा, जडीबुटी, जारणमारण इत्यादी अथर्ववेदीय कर्मकांडे घुसली. “आपण प्रज्ञापराध करू नये’‘ याचे भान शूद्रांमध्ये विकसितच झाले नाही, जे झाले ते नशीब, कर्मकांड, पापपुण्य, भोग इत्यादी. ज्या उच्च वर्णीयांमध्येही हे भान विकसित व्हायला हवे होते, ते वेदांच्या अपौरुषेयत्व इत्यादीचे बौद्धिक बळी बनल्याने शोषणव्यवस्था मजबूत ठरली.

         विद्यमान जागतिक स्तरावर आयुर्वेदाला प्रचंड संघर्षाला तोंड द्यावे लागते. कारण आयुर्वेद हे विज्ञान असले तरी इतर विज्ञाने जशी लोकांमध्ये पसरली, प्रसारित, प्रचारित झाली आणि उपयोगी पडली, तसे आयुर्वेदाचे झाले नाही. ते केवळ मूठभर उच्चवर्णीय ब्राह्मण आणि राज्यकर्ते यांच्यापुरते राहिले. त्याचा उपयोगही मर्यादित राहिला.

         कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथाबाबतचे भारतीयांचे दुर्दैव असे की हा ग्रंथ लिहिला गेल्यानंतर दोन हजार वर्षांनी सापडला ! दरम्यान ह्यांतील अनेक महत्वाच्या विषयांवरील कौटिल्यीय मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने देशाचे खूप मोठे नुकसान झाले. आज ते उपलब्ध असल्याने राज्यकर्ते त्याचा योग्य उपयोग करतील, असे नाही. पण सिद्धान्तन उपलब्ध असेल तर चळवळ योग्य मार्गाने जाऊ शकते.

         विचार करणे, हाच मुळात प्राचीन भारतात प्रज्ञापराध होता. कारण सारे विचार वेदांतून आलेले आहेत, असा समज होता. विचार केला तरी तो वेदाला पूरक असावा, नास्तिक नसावा, अश्रद्ध नसावा, ही जबरदस्त बंधने वर्ण-जाती-लिंगभेद यांतून करकचून आवळलेली होती. मुक्तविचार, इहवादी विचार हा गुन्हा होता. परिणामी न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, चार्वाक ही दर्शने इहवादी दर्शने असूनही चार्वाक वगळता इतर सारी वैदिकांच्या ज्ञानाच्या राजकारणाला बळी गेली. अर्थशास्त्र, चरकसंहिता ह्यांसारखी ज्ञाने स्वरूपाने सामाजिक, इहवादी असूनही पक्षपाती बनल्याने युगानयुगाचे राष्ट्रीय नुकसान झाले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.