विवेकवादाच्या मर्यादा

[गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे यांनी नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयात ‘भारतीयांचा पुरुषार्थ विचार’ व ‘विवेकवादाच्या मर्यादा’ या दोन विषयांवर दोन व्याख्याने दिली. प्रा. रेगे यांची गणना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखिल भारतीय अग्रगण्य विद्वानांत केली जाते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांचा पाश्चात्त्य आणि भारतीय दोन्ही तत्त्वज्ञानांचा व्यासंग अतिशय विस्तृत आणि सखोल असून व्याख्यानांच्या विषयांवरील त्याचा अधिकार निर्विवाद आहे. त्यांनी केलेले विवेकवाद आणि त्याच्या मर्यादा यांचे विवेचन ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना उद्बोधक वाटेल, म्हणून ते व्याख्यान येथे उद्धृत करीत आहोत. – संपादक]

रॅशनलिझमचे (rationalism) ‘विवेकवाद’ हे भाषांतर आहे अशी कल्पना मी करतो. ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा त्याचा दुसरा पर्याय आहे. विवेक म्हणजे जी दोन भिन्न वस्तूंत भेद करते ती शक्ती. रीझन (reason) ही संकल्पना पाश्चात्त्य तत्त्वज्ञान-परंपरेत विकसित झालेली संकल्पना आहे. तिच्यासारखी संकल्पना भारतीय परंपरेत नाही. रीझन ही संकल्पना पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातच एकार्थी आहे. एक प्लेटो, अरिस्टॉटल ह्यांनी विकसित केलेली संकल्पना. तिचे स्थूल वर्णन असे करता येईल की, जी तत्त्वे अनुभवातून आपल्याला लाभत नाहीत, ज्यांचे प्रामाण्य ऐंद्रिय अनुभवाच्या निकषावर सिद्ध होत नाही आणि करावे लागतही नाही, पण जी माणूस स्वतः ग्रहण करू शकतो, ती ग्रहण करण्याची एक शक्ती माणसाच्या ठिकाणी आहे. हे सार्वत्रिक आणि अनिवार्य (necessary), ऐंद्रिय अनुभवाच्या पलिकडे असलेले ज्ञान ह्या विवेकशक्तीच्या वापरातून माणसाला लाभते. ही जी विवेकासंबंधीची संकल्पना आहे त्या प्रकारची ज्ञानमीमांसा आपल्याकडे नाही. ही संकल्पना विशेषतः गणितामध्ये आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाने स्वीकारली आहे.

ऐंद्रिय अनुभवाच्या माध्यमाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानापलिकडे असणारे सत्य (ज्ञान) ग्रहण करणारी शक्ती म्हणजे विवेकशक्ती आहे असे जे मानतात त्यांना रॅशनलिस्ट (rationalist) म्हणजेच विवेकवादी म्हणतात. आणि (यावरून) मग अशी शक्ती आहे का असा एक कूटप्रश्न उत्पन्न होतो. हा प्रश्न ज्ञानमीमांसेत उत्पन्न होतो तसा सत्ताशास्त्रातही उत्पन्न होतो.

रॅशनलिझमचा दुसरा अर्थ १८व्या शतकापासून मान्य व्हायला लागला आहे, हळूहळू स्थिर होत आहे. पहिल्या अर्थाने विवेक या शक्तीचा विरोध अनुभवाशी होता. दुसऱ्या अर्थाने या शक्तीचा विरोध श्रद्धेशी, धार्मिक श्रद्धेशी आहे. ही दुसरी विवेकाची कल्पना जेव्हा आपण रँग्लर परांजपे रॅशनलिस्ट होते असे म्हणतो किंवा इंग्लंडमध्ये रॅशनलिस्ट असोसिएशन होती असे म्हणतो, त्या बोलण्यातून व्यक्त होते. ही रीझनची संकल्पना प्लेटॉनिक रीझनच्या संकल्पनेहून अत्यंत वेगळी आहे. आम्ही श्रद्धेने कोणतेही तत्त्व स्वीकारणार नाही, अनुभवावर म्हणजे ऐंद्रिय अनुभव आणि सुसंगत तर्क या प्रमाणांवर जे सत्य ठरेल तेच आम्ही स्वीकारू अशीही भूमिका आहे. ह्याला (फारतर) लोकांमध्ये पसरलेले तत्त्वज्ञान असे आपण म्हणू. म्हणजे आता रीझन हा तांत्रिक तत्त्वज्ञानाचा विषय राहिला नाही. असे हे एक वैचारिक आंदोलन युरोपमध्ये सुरू झाले. ज्याला आपण Enlightenment म्हणतो – १८व्या शतकातले प्रबोधन – त्याचा हा वारसा आहे. हे तत्त्वज्ञान किंवा ही दृष्टी १८व्या  शतकात बरीचशी स्थिर झाली आणि बरीचशी युयुत्सु बनली. श्रद्धेने आणि परंपरेने स्वीकारल्या गेलेल्या अनेक सत्यांचा, त्याचबरोबर सामाजिक संस्थांचा, सामाजिक रचनांचा स्वीकार करणे म्हणजे असत्याला आणि अन्यायाला शरण जाणे आहे. म्हणून आता विवेकावर आधारलेले आणि विवेकाने प्राप्त करून दिलेले सत्, त्यावर आधारलेल्या सामाजिक संस्था – सामाजिक रचना आपण इथे आणल्या पाहिजेत असे प्रखर वैचारिक आंदोलन युरोपात उभे राहिले. त्यामुळे युरोपीय समाजात बऱ्याच प्रमाणात अंतर्बाह्य वैचारिक आणि सामाजिक क्रांती झाली. हे क्रांतीचे लोण आपल्याकडे आले ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे असे मी मानतो. ह्या क्रांतीमागची प्रेरणा काय होती? आधुनिक विज्ञानाचा उदय साधारणपणे १५व्या शतकापासून सुरू झाला. या स्वरूपाचे ज्ञान मानवी संस्कृतीत पूर्वी कधी नव्हते. त्याचे धागेदोरे ग्रीक विज्ञानाशी आपण जोडू शकू – आर्किमिडीज किंवा यूक्लिडपर्यंत. चिनी, भारतीय, ग्रीक इत्यादी संस्कृतीही प्रगत संस्कृती होत्या. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची तंत्रकौशल्ये होती. अनुभवावर, चिकित्सेवर अधिष्ठित संकल्पना व्यूहांचा वापर करणारी विज्ञाने होती. आपले वैशेषिकदर्शन हे या प्रकारचेच विज्ञान आहे. आयुर्वेदात या दोघांचाही उपयोग केला आहे. आयुर्वेद हे एका दृष्टीने तंत्र आहे तर एका दृष्टीने विज्ञान आहे. पण जे निखळ आधुनिक असे विज्ञान आहे त्याची जी पद्धती आहे, जी अंतर्गत घडण (structure) आहे, तशा प्रकारचे विज्ञान हे साधारणपणे १७व्या शतकाच्या पूर्वी कुठेही नव्हते. त्यामुळे ज्ञानाचा एक आदर्श येथे या विज्ञानाच्या रूपात माणसापुढे उभा राहिला हे स्वीकारले पाहिजे. एवढेच नव्हे तर हे एकमेव प्रमाण अशा प्रकारचे ज्ञान आहे. वैज्ञानिक ज्ञान हेच संपूर्ण ज्ञान, ज्ञानाचा एकमेव प्रमाण प्रकार आहे अशी एक धारणा निर्माण झाली. मी History of Ideas या दृष्टीने या दोन्ही प्रश्नांकडे पाहणार आहे. मानवी विचारांच्या प्रगतीच्या एका टप्प्याचे हे वर्णन आहे.

विज्ञानाचे स्वरूप काय आहे? एक तर ते अनुभवावर आधारलेले असते. याचा अर्थ असा की, ज्या दृश्य घटना आहेत त्यांचा उलगडा करण्यासाठी तुम्ही कोणत्याही अदृश्य अशा संकल्पनांची, पदार्थांची कल्पना करू शकता, पण एक पथ्य तुम्हाला पाळावे लागते, एक मर्यादा पाळावी लागते. ती अशी की, ज्या पदार्थांची तुम्ही कल्पना करता त्यांची नेमकेपणाने कल्पना केली पाहिजे. त्यांच्यापासून विशिष्ट परिस्थितीत कोणते निष्कर्ष तर्काला अनुसरून आणि गणिताला अनुसरून काढता येतात हे दाखवून दिले पाहिजे. ते अनुभवाने पडताळा घेता येतील असे असले पाहिजेत. ते दृश्य निष्कर्ष असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही (hypotheses) अभ्युपगम केले असतील किंवा ज्या इंद्रियातीत शक्तींची किंवा पदार्थांची कल्पना केली असेल ते पदार्थ खरोखर तेथे आहेत असे मानता येईल. हा अभ्युपगम (hypotheses) स्वीकारता येईल असे मानता येईल. ह्या स्वरूपाचे ज्ञान, या पद्धतीवर आधारलेले ज्ञानपूर्वी कुठेही नव्हते.

दुसरी एक गोष्ट वैज्ञानिक ज्ञानाच्या संबंधात सांगितली पाहिजे. ती अशी की भिन्न पदार्थ, भिन्न प्रकारच्या घटना (phenomena) यांचे या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नातून हळूहळू जे स्थिर होणारे अभ्युपगम (hypotheses) असतात किंवा उपपत्ती असतात त्यांचा एकमेकांशी संबंध जोडता येतो. या उपपत्तींपासून अधिक सामान्य असा निष्कर्ष (सिद्धान्त) तर्काने प्राप्त करून, या उपपत्तींची एक वीण तयार होते. त्यांच्यामध्ये भौतिक पदार्थ, रासायनिक पदार्थ, जैव पदार्थ, ज्याच्यामध्ये मानसिक घटना घडतात अशाप्रकारचे जीव, या सर्वांविषयीच्या घटनांचे एक सुसंगत, तपशीलवार, ज्यांचे प्रामाण्य सिद्ध केले पाहिजे अशातऱ्हेचे वर्णन आपल्याला मिळते. त्यामुळे असा विश्वास माणसाला वाटतो की, मला जे वरवर दिसते त्याच्यामागे जे खरोखर आहे, ज्याच्याकडे मी केवळ अनुभवाने पोचू शकत नाही असे सूक्ष्म पदार्थ, सूक्ष्म शक्ती ह्यांचे ज्ञान मिळविण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. आणि हे जे ज्ञान मिळालेले आहे ते स्थिर ज्ञान नाही. पुढे विज्ञानाचा विकास होईल तेव्हा त्याच्यात काही बदल होतीलच. पण ते बदल अशा स्वरूपाचे असतील की, आज जी सत्ये आहेत त्यांचे एका वेगळ्या रीतीने अर्थ लावणारे अशाप्रकारचे अधिक व्यापक उपपत्तींचे व्यूह आजच्या मर्यादित उपपत्तींच्या जागी माणसाला प्राप्त झालेले असतील.

अशारीतीने संबंध विश्वाला आपल्या आवाक्यात घेणारे असे वैज्ञानिक ज्ञान तेथे निर्माण होईल. तेव्हा मग जे काही आहे ते – त्याच्यामध्ये जशी इतर माणसे आहेत तसा मीही आहे – हे जे अंतर्बाह्य सर्व (काही) आहे त्याचे संपूर्ण स्वरूप जेव्हा विज्ञान संपूर्ण होईल तेव्हा आपल्याला लाभेल. आज आपण त्यादिशेने वाटचाल करत आहोत आणि करत असले पाहिजे. ही विचारसरणी या रॅशनलिझमचे एक अंग आहे. त्यामुळे जे ज्ञान म्हणून आतापर्यंत चालत आलेले आहे ते जर वैज्ञानिक ज्ञानाशी सुसंगत असेल तर ते त्याचा भाग बनू शकते. नसेल तर मग ते ज्ञान नव्हे. आपण उदार दृष्टीने हे माणसाच्या हिताचे विश्वास आहेत असे समजू शकतो. ज्याला History of Ideasमध्ये रस असेल तो त्यांचा अभ्यास करील. पण ते ज्ञान म्हणून मान्य होऊ शकत नाही. मग श्रद्धेने जी सत्ये स्वीकारली असतील ती स्वीकारणे अशक्य होईल. अतीत असे काही तत्त्व असणार नाही. अतीतसुद्धा एक भ्रम ठरेल. ह्या भ्रमाचासुद्धा वैज्ञानिक उलगडा देता येतो. म्हणजे जे अतीत मानतात तसे अतीत नाही हे सिद्ध होते. त्यांचा तो भ्रम आहे हे सिद्ध होते. अतीताचीसुद्धा एक वैज्ञानिक कारणमीमांसा मिळते.

रॅशनलिझमचा दुसरा भाग असा की, जसे ज्ञानाच्या बाबतीत प्रमाणज्ञान मिळविण्याची एक प्रमाणपद्धती आहे तिला अनुसरूनच ज्ञान मिळाले पाहिजे (म्हणजे) ते वैज्ञानिक ज्ञान होते, तसे माणसाचा जो व्यवहार आहे, जे आचरण आहे, वर्तन आहे त्यांचे नियमन करणारी तत्त्वेही विवेकावर आधारलेली असली पाहिजेत. पूर्वापार स्वीकारली गेलेली जी तत्त्वे होती ती श्रद्धेने स्वीकारलेली होती. जसे ख्रिश्चननीती होती. तिला ख्रिश्चन धर्मग्रंथाचे बायबलसारखे अधिष्ठान होते; आणि विशिष्ट प्रसंगी जर आपल्याला काही प्रश्न पडला तर त्यांचे उत्तर देणारे अधिकारी फादर्स होते. पण आचरण, व्यक्तीचे वर्तन, त्याची कृती हीसुद्धा विवेकावर आधारित असली पाहिजे हा या विवेकवादाचा दुसरा अर्थ आहे.

कृती विवेकावर आधारलेली असली पाहिजे म्हणजे काय? ज्ञानाच्या बाबतीत आपण समजू शकतो की सर्व ज्ञान एका विशिष्ट पद्धतीने प्राप्त करून घ्यायचे. पण कर्माच्या क्षेत्रात विवेकाची तत्त्वे कोणती? ह्यात दोन तत्त्वे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पारलौकिक कल्याणाचा प्रश्न बाजूला पडला. याचे कारण हे की अतीत तत्त्व नाही. ते श्रद्धेने स्वीकारावे लागते. ज्याला हवे त्याने ते स्वीकारावे. त्याचे त्याला स्वातंत्र्य असेल. परंतु ते ज्ञान म्हणून काही प्रमाण नाही. मग दोनच तत्त्वे राहतात.

एक तत्त्व असे की, माणूस कृती करतो ती काहीतरी साधायला करतो. अमुक परिस्थितीला विशिष्ट वळण द्यायला, काहीतरी घडवून आणायला तो कृती करतो. तेव्हा योग्य कृतींचा एक स्वाभाविक निकष लाभतो. तो असा की, जे आपले साध्य असेल ते सिद्ध करण्याचा परिणामकारक मार्ग असे जे कृत्य असेल ते कृत्य योग्य होईल. माणसाला आपल्या इच्छांचे समाधान पाहिजे असते. तेव्हा ज्या कृत्यांच्या योगे माणसाच्या इच्छांचे समाधान होते ते कृत्य योग्य. त्याला नैतिक म्हणायचे असेल तर ते कृत्य नैतिक. पण माणसाच्या इच्छा मर्यादित असत नाहीत. जन्मापासून मरणापर्यंत त्यांचा प्रवाह चालू असतो. तेव्हा त्याच्या इच्छांचे जास्तीतजास्त समाधान ज्याने होईल आणि हे होत असताना त्याच्या कमीतकमी इच्छा विफल होतील अशी जी कृत्ये असतात ती योग्य कृत्ये. हा उपयुक्ततावादी निकष, नियम किंवा तत्त्व विवेकवादाचा हा वेगळा अर्थ आहे. पण पहिल्याला पूरक आहे.

परत असा प्रश्न आहे की, माणूस समाजात राहतो. एखादे कृत्य आपले साध्य परिणामकारक रीतीने सिद्ध करण्याचे साधन असेल तर ते योग्य कृत्य आहे हा जसा निकष, त्याप्रमाणे जर समाजात राहून माणसानेही कृत्ये करायची असतील तर त्याचे नियमन करण्यासाठी न्याय हे तत्त्वही विवेकाचे तत्त्व म्हणून घेतले पाहिजे. जे कडवे उपयुक्ततावादी आहेत ते न्याय हे तत्त्व उपयुक्ततावादी तत्त्वाचा एक उपनियम (corollary) मानतात. पण आपण जरा उदारपणे न्यायाचे तत्त्व हे विवेकाचे तत्त्व मानू. या दृष्टीने पाहिले तर हे तत्त्व खरेतर समतेचे तत्त्व आहे. ते असे की कोणाही दोन व्यक्तींचे समान सुख असेल तर त्याला कृतींचे साध्य म्हणून समान महत्त्व दिले पाहिजे. बेन्थमचे असे वचन आहे की, Everyone is to count for one and nobody for more than one. म्हणजे कोणाचीही गणना एकाहून अधिक अशी करता कामा नये. जमीनदाराच्या सुखाला शूद्राच्या सुखाच्या दुप्पट महत्त्व असणार नाही. याप्रमाणे सर्वांच्या समान सुखाला समान महत्त्व हे विवेकाचे दुसरे तत्त्व आहे.

वैज्ञानिक ज्ञान आणि समान व्यक्तींच्या आचरणाचे नियमन करणारे उपयुक्ततावादी तत्त्व ही दोन तत्त्वे मिळून आधुनिक विवेकवाद १८व्या शतकापासून विकसित होत. १९व्या शतकात याप्रमाणे व्यक्त होतो. तो आपल्या विवेकवादी तत्त्ववेत्त्यांनी, उदा. जोतिबा फुले, आगरकर, इत्यादींनी स्वीकारला. ह्याच्यातून एक सामाजिक कार्यक्रम निर्माण होतो. तो असा की, ज्या पारंपरिक संस्था आहेत आणि जे (पारंपरिक) वर्तनाचे नियम आहेत त्यांची, आणि जे आचरणाचे दंडक आहेत त्यांची, जसे पारंपरिक ज्ञानाची चिकित्सा वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरूपाच्या निकषावर करून ग्राह्य-अग्राह्य याचा हिशोब मांडावा लागतो आणि जे त्याज्य आहे – त्याचा त्याग करावा लागतो, तसे पारंपरिक नीतीची – सामाजिक आणि वैयक्तिकसुद्धा – तिची चिकित्सा करून या तत्त्वांच्या आधारावर तिची फेररचना करावी लागते. सर्व व्यक्ती-व्यक्तीमधील संबंधाच्या या समतेच्या आणि सुखोत्पादक कर्तव्याच्या निकषावर त्यांची चिकित्सा करून जी ह्या दोन तत्त्वांशी सुसंगत असते अशी नीती समाजात रूढ करणे, अशा संस्था समाजात उभारणे, पूर्वीच्या संस्थांचे विसर्जन करून किंवा त्यांचे विघटन करून त्यांना बाजूला सारूनसुद्धा – हा एक कार्यक्रम युरोपमध्ये सुरुवातीला स्वीकारला गेला आणि बऱ्याच प्रमाणात पार पाडला गेला. भारतातही तो आपल्या तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारला. अनेक सुशिक्षितांनीही तो स्वीकारला. आजच्या सभेत स्त्रियांची जी उपस्थिती दिसते तिची कारणमीमांसा जर आपण पाहायला गेलो तर ती तिथपर्यंत पोचते. हा विवेकवाद आधुनिक संस्कृतीने मानवजातीला दिलेली एक अतिशय मूल्यवान देणगी आहे असे मी मानतो. हा विवेकवाद एका धार्मिक समाजाच्या विकासाचा एक विशिष्ट टप्पा आहे. हा धार्मिक समाज म्हणजे ख्रिस्ती समाज. ज्या ख्रिस्ती धर्मातून, आध्यात्मिक तत्त्वज्ञानातून, आध्यात्मिक व्यवहारातून त्या समाजाची परंपरा विकसित होत गेली, तिच्यात ग्रीक तत्त्वज्ञानाचाही महत्त्वाचा वाटा आहे. ख्रिश्चन थिऑलॉजीमध्ये ग्रीक संकल्पना आणि सिद्धान्त कसे स्वीकारले आहेत, आणि जीझसच्या साध्याभोळ्या एका दर्शनाला एका तात्त्विक दर्शनाचे कसे रूप दिले आहे हे आपल्या ध्यानात येते. हा व्यवहार होताना युरोपमध्ये अनेक आततायी प्रकार झाले. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये अरिस्टोक्रॅट लोकांबरोबर अनेक निरपराधी लोकसुद्धा मारले गेले. एक प्रकारचा पिसाटपणाही त्या आंदोलनांमध्ये झाला. आपल्याकडेही असा प्रकार झाला नाही असे नाही. पण त्याबरोबरच दीर्घ दृष्टिक्षेप टाकला तर तुम्हाला असे आढळेल की, युरोपीय समाजाची समतेच्या तत्त्वावर, न्यायाच्या तत्त्वावर, जीवन अधिक सुखी करणारी जी तत्त्वे असतील, तीच नैतिक (तत्त्वे), या निकषाला अनुसरून बरीच प्रगती झाली. ही इष्ट अशी गोष्ट आहे असे मी मानतो. त्या प्रकारची प्रगती इथे आपल्याला करावी लागेल. आणि हे सर्व केवळ साधारण धर्माच्या दृष्टीने करावी लागेल असे माझे म्हणणे आहे. त्यादृष्टीने हे जे वैचारिक आंदोलन आहे त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. पण जसे एका धार्मिक समाजात हे तत्त्वज्ञान निर्माण झाले म्हणून त्याचे जे उपयोजन झाले त्याच्यामागे धार्मिक प्रेरणा, आध्यात्मिक प्रेरणा राहीलच, त्याप्रमाणे जी भारतीय परंपरा आहे तिच्याशीसुद्धा हे जे वैचारिक आंदोलन आहे त्याचा सांधा जुळवला पाहिजे. इथे आपल्याला त्यासाठी अधिक प्रयास पडतील. तिथे ते एका अर्थाने स्वाभाविक झाले. आपण ही देणगी पश्चिमेकडून स्वीकारली आहे. तिचा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा सांधा जोडला पाहिजे आणि तो जोडता येतो असे मला वाटते. तो जोडण्याचा खरा मार्ग म्हणजे साधारण धर्म. या संकल्पनेला आपण नैतिक, सामाजिक जीवनात मध्यवर्ती स्थान देणे होय असे मला वाटते. मी याच्यावर भर देतो आहे की, हा जो विवेकवाद आहे तो एका आध्यात्मिक समाजात, काही धारणांवर आधारलेल्या समाजात निर्माण झालेला विचारपंथ आहे. म्हणून तो आपल्या ठिकाणी प्रमाण असला तरी त्याला मर्यादा आहेत. या मर्यादा मी स्पष्ट करतो. हे माझे विवेचन व्यवहाराच्या, नीतीच्या क्षेत्रापुरते मर्यादित आहे.

मी असे सुचवितो की, आपल्याला नेहमी जे दिसते ते जग आणि वैज्ञानिक उपपत्तीमध्ये जी जगाची कल्पना केलली असते ते जग एकच आहे काय? त्यांचा संबंध काय आहे हा एक मोठा कूटप्रश्न, तत्त्वज्ञानातला प्रश्न आहे मी एका पर्वतशिखरावरून न्याहाळतो तो आजूबाजूचा प्रदेश, त्या दऱ्याखोरी, एखादा पाण्याचा प्रवाह, झाडे, प्राणी, आणि एक उल्हास माझ्या मनात आहे आणि तो आसमंतातसुद्धा भरून राहिला आहे असा माझा अनुभव आहे. निळे आकाश मला दिसते आहे. हा जो सबंध अनुभव, जे मला दिसते आहे ते आणि विज्ञानाने प्रकट केलेले जे जग आहे ते यांचा काय संबंध आहे. मला एखादी गाय दिसते, ती इतकी गोजिरवाणी आहे, निष्पाप आहे की जे वत्सल आहे, सौम्य आहे, निरुपद्रवी आहे, सहनशील आहे त्याचे प्रतीक म्हणून मला ती दिसते. हा माझा अनुभव विज्ञानाने प्रकट केलेले जे जग आहे त्याच्याशी कसा मिळताजुळता आहे? हे प्रश्न वैज्ञानिक उपस्थित करत नाहीत हे ठीक आहे. हे प्रश्न तत्त्ववेत्त्याने उपस्थित केले पाहिजेत. पण ते बिचारे त्यांना विज्ञान येत नसल्यामुळे त्यांना विज्ञानाची इतकी दहशत असते की, त्यांच्याकडून या प्रकारचे प्रश्न गंभीरपणे उपस्थित केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही जर (Phenomenological) परंपरा घेतली तर तिच्यात या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यांचा गंभीर विचार होतो. पण त्यांच्यात आणि आमच्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला आहे. तो दुर्दैवी आहे.

नीतीच्या दृष्टीने असे म्हणता येईल की, मी काही मूल्यांचा विचार करतो. त्यांतील एक मूल्य म्हणजे सर्व पंथांतून, आध्यात्मिक पंथांतून दिसणारी तापसवृत्ती (asceticism), म्हणजे अशा रीतीने जगायचे की, माझ्या ज्या इच्छा आहेत त्या शक्य तितक्या कमी करायच्या. विशेषतः सुख असावे, स्वास्थ्य असावे – शरीराचे, मनाचे – ही जी माझी अतिशय खोल गरज सतत असते ती मी काबूत आणीन. मी हे स्वातंत्र्य मिळवीन. मी कोणाच्याही आधीन नाही. रसेलने हे म्हटले आहे की, दोन तऱ्हेचे अॅसेटिसिझम (asceticism) आहेत. त्यात एक स्पार्टन अॅसेटिसिझम आहे. स्पार्टन हे लढवय्ये लोक होते. क्षत्रियाला आपल्या इंद्रियांशी निगडित असलेल्या मोहांवर खराखुरा काबू ठेवावा लागतो, कारण त्याला शरीराने आणि मनाने कणखर असावे लागते. त्याला शरीराला त्रास द्यावा लागतो. त्रास सहन करण्याची ताकद वाढवावी लागते. यासाठी त्याला एक अॅसेटिक ट्रेनिंग देतात. हे त्याच्या प्रशिक्षणाचे अंग असते. तसे दुसरे एक आध्यात्मिक अॅसेटिसिझम आहे. मी माझ्या सर्व इंद्रियांवर असा विजय मिळविला पाहिजे की मी त्यांच्या अधीनच होणार नाही. हे मूल्य कसे आले? हे माणूस का निर्माण करतो? हे कसे निर्माण होते? आणि हे मूल्य एखाद्या विशिष्ट समाजात निर्माण झालेले ज्याचा आपण अचंबा करावा – असे हे मूल्य नाही. हे जगाच्या संस्कृतीत अनेक पंथांतून निर्माण झालेले मूल्य आहे. पण आपण आधुनिक दृष्टीने पाहिले तर त्यात विक्षिप्तपणा आहे. समाजात अनेक प्रकारचा आचरटपणा चालतो तसा हाही आहे असे हवे तर म्हणा.

पण आत्मजाणिवेवर आधारलेल्या नैतिकतेत, मूल्य निर्माण करण्याच्या माणसाच्या सामर्थ्यात, या अतीत तत्त्वाची चाहूल आपल्याला लागते. काही विशिष्ट संकल्पनांच्या माध्यमातून ती नेमकी पकडता येते, निर्णायकरीतीने ती पकडता येते, अशी ती आहे. आणि म्हणून इथे माणसाविषयीची, माणसाशी निगडित असलेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या संकल्पनांची, अशी अनेक प्रकारची रचना तुम्हाला आढळते. हासुद्धा मानवी नीतीचा अनिवार्य भाग आहे. ही मानवाची सान्तता (finitude) आहे. त्याची ही सान्तता आहे की त्याला अतीताची जाणीव आहे आणि त्याला हे अतीत ज्ञानामध्ये ग्रहण करता येते, आणि ह्याच तणावातून मानवी श्रद्धा निर्माण होते. ही जी श्रद्धा आहे तिचा आविष्कार बौद्धिक रचनांमधून केवळ अनुषंगाने होतो. तिचा खरा आविष्कार जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीतून होतो. गेल्या पिढीतले – आपल्या किंचित् अगोदरचे – महान रॅशनलिस्ट म्हणजे बट्रँड रसेल. त्यांचा A Free Man’s Worship हा निबंध आपण अवश्य वाचावा. अनेकजण तो हिस्टेरिकल समजतात. तो काहीसा हिस्टेरिकल आहेही. त्यात रसेल म्हणतो की, हे जे भौतिक विश्व आहे त्यात माणूस एकटा आहे आणि सर्व सृष्टीच्या नियमांप्रमाणे त्यातील घडामोडी होत असतात. आणि मी माणूस, हा अल्पकाळ इथे जगणार. पण मी माझी निष्ठा (integrity) सांभाळत जगणार. मी विश्वातल्या दुर्दम्य अशा शक्तींपुढे वाकणार नाही. जे सत्य आहे, जे सुंदर आहे त्याची उपासना मी करणार. ही श्रद्धा नाही. हे माझे आत्मदर्शन आहे असे म्हणण्याची मुभा आहे. हे आत्मदर्शन एका प्रकारचे आध्यात्मिक दर्शन आहे. आणि अन्य प्रकारची आध्यात्मिक दर्शने अशी विकसित झालेली आपल्याला माहीत आहेत. हा आता जो विचार मी मांडला त्याचा उगम कांटमध्ये आहे. अन्य दृष्टींनी ही त्याचा विस्तार त्याने केला आहे.

रसेल म्हणतो की हा माणसाचा अहंकार आहे. म्हणजे या माणसाला विश्वात एक काहीतरी खास स्थान आहे असे तुम्ही मानता. विज्ञानाच्या दृष्टीने असे कोणाला काही खास स्थान नाही. सर्व वैज्ञानिक पदार्थ आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रचना आहेत. त्या कमीअधिक गुंतागुंतीच्या आहेत. माणूस त्यातलाच एक आहे असा विनय माणसाने बाळगणे अयोग्य आहे असे मला वाटते. कारण ती सत्याशी प्रतारणा आहे, असे मला वाटते. माणूस हा प्रश्न उपस्थित करू शकतो की विश्वात माझे स्थान काय आहे? हा प्रश्न तो उपस्थित करू शकतो ह्याच्यातच त्याला एक स्थान आहे असे दिसून येते. इथे जे अनन्त आहे आणि जे सान्त आहे त्याचे क्षितिज माणसात आहे. ह्या त्याच्या सामर्थ्यातून, ज्याचा आविष्कार मूल्यांच्या निर्मितीतून, जगण्याच्या पद्धतींचा विकास करण्यातून, जीवनाला अर्थ देण्याच्या शक्तीतून होतो. त्याचे हे जे सामर्थ्य आहे त्याचा उलगडा करणे विवेकवादाच्या पलिकडचे आहे असे मला वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.