गोहत्या बंदी कायदा: एक पाऊल मागे!

गेली दोनशे वर्षे सामाजिक व राजकीय सुधारणा करण्यात अग्रभागी असलेल्या आणि सतत प्रगतिपथावर चालणार्‍या महाराष्ट्राने आता एक पाऊल मागे टाकले आहे. हे नकळत घसरलेले पाऊल नसून हा बुरसटलेल्या विचारांचा एक मोठा दुष्परिणाम आहे. गोहत्याबंदीचा कायदा आणून आणि गाय मारणार्‍याला शिक्षा फर्मावून महाराष्ट्राने काय मिळवले? या एका फटक्याने भारतीय धर्मनिरपेक्षतेला आणि शास्त्रीय तर्काधिष्ठित विचारांना फाटा दिला! ‘हिंदूधर्माचे रक्षण केले’ असेही म्हणता येत नाही, कारण हिंदूंच्या (माझ्या) धर्मशास्त्रामध्ये कोठेही ‘गोमांस खाऊ नये’ असे सांगितलेले नाही. कुठलेही “श्रुति-स्मृति-पुराणोक्त” वचन असे म्हणत नाही की गाय मारू नका व गोमांस खाऊ नका. गाय या प्राण्याला पवित्र मानणे व गोमांस न खाणे ही एक रूढी आहे, परंपरा आहे. ही रूढी पाळावी की नाही हे ठरवायचे स्वातंत्र्य व्यक्तीचे आहे, ही धर्माची सक्ती नाही. असे असूनही इतर धर्मीयांनी देखील गोहत्या करून गोमांस खाऊ नये असा कायदा करणे राष्ट्रहितासाठी – अगदी हिंदुराष्ट्रासाठी – आणि समाजहितासाठी अयोग्य, असमर्थनीय व अनर्थकारी आहे.

धर्माचे अधिष्ठान नाही

विसाव्या शतकाच्या मध्यावर घडलेल्या एका घटनेला उजाळा देऊ या. श्री अ.भि. शहा या पुण्यातील प्रखर बुद्धिवादी गृहस्थाने पुरीच्या शंकराचार्यांना आह्वान दिले. हिंदूधर्मपरंपरेचे उत्तम प्रतीक असणार्‍या वाद-प्रतिवादप्रक्रियेनुसार समोरासमोर बसून इतर अनेकांच्या उपस्थितीत नक्की करूया की आपल्या हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध आहे की नाही. उभयपक्षी केवळ शास्त्रग्रंथांचा (श्रुति-स्मृति-पुराण यांचा) संदर्भ आपापले म्हणणे सिद्ध करण्यासाठी द्यावयाचा. इतर कुठलाही नाही. शंकराचार्यांनी आह्वान स्वीकारले. अ.भि.शहांनी एक उपयुक्त सूचना केली, ”आपण हा सर्व संवाद ध्वनिमुद्रित करूया. असे केल्याने कुठल्याही पक्षाला ‘मी असे म्हटलेच नव्हते’ असे सांगता येणार नाही व हा महत्त्वाचा संवाद सर्व जनतेपर्यंत पोहोचविता येईल.” शंकराचार्यांनी चक्क माघार घेतली! अ.भि.शहांनी एक सुंदर पुस्तक लिहून या प्रश्नाला निर्णायक उत्तर दिले. ‘On the Horns of a Dilemma’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी गोहत्याबंदीचा सर्व बाजूंनी विचार केला व दाखवून दिले की सामाजिक व आर्थिक दृष्टीने गोहत्याबंदी करणे अयोग्य आहे.

रामायणकाळात चारही वर्णांचे स्त्री-पुरुष केवळ मांसाहारीच नव्हते, तर गोमांस खाणारेदेखील होते याला पुरावा वाल्मिकी रामायणात मिळतो. वल्कले नेसून वनवासाला निघालेले राम-लक्ष्मण-सीता जेव्हा होडीत बसून सरयू नदी ओलंडत होते, तेव्हा सीतेने केलेली नदीची प्रार्थना पहा, “माते, आज आम्ही वनवासास निघत असल्यामुळे तुला योग्य असे अर्घ्य मी देऊ शकत नाही याबद्दल क्षमा असावी. परंतु जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा मी तुला मांसाचे आणि भाताचे मोठे दान करीन.” रामाने वालीची बाण मारून हत्या केली, त्यावेळी मरण्यापूर्वी वाली रामाला हत्या करण्याचे कारण विचारतो. चार-पाच संभाव्य कारणांपैकी एक असे आहे, “मला मारून खाता यावे हे कारणही असू शकत नाही, कारण ब्राह्मणांना व क्षत्रियांना निषिद्ध असे पाचच प्रकारचे मांस आहे. त्यांत ‘नखे असलेले प्राणी’पण आहेत, आणि मी वानर हा तर नखे असलेला प्राणी आहे.” या पांच प्रकारच्या मांसांमध्ये खूर असलेल्या प्राण्यांचा समावेश नाही; म्हणजेच गोमांस निषिद्ध नव्हते. जे ब्राह्मणांना, क्षत्रियांना निषिद्ध नव्हते ते अर्थातच वैश्यांना आणि शूद्रांना पण निषिद्ध नव्हते.

भगवद्‌गीतेमध्ये सात्त्विक, राजस व तामस आहाराचा उल्लेख आहे तो अत्यंत वाचनीय आहे. सात्त्विक आहार हा सौम्य व स्निग्ध इत्यादी असतो, तर तामसिक हा तीक्ष्ण, कडू, तिखट इत्यादी असतो. कुठेही मांसाहार राजस अथवा तामस असतो असे भगवान श्रीकृष्णाने पण म्हटले नाही. मनुस्मृतीमध्ये स्पष्ट श्लोक आहे, “मांस खाणे, दारू पिणे आणि संभोग करणे यात काहीही दोष नाही; कारण ही सर्व प्राणिमात्राची साहजिक, नैसर्गिक प्रवृत्ती आहे.”

नीतिकल्पनेत बसत नाही

सुसंस्कृत समाजात व्यक्तींनी परस्परांशी कसे वागावे, काय करावे व काय करू नये हे नीतिमत्ता ठरवते. नीतिमत्तेची भिन्न पण परस्परसंबंधित अशी तीन अंगे आहेत : सद्वृत्त (ethics), सदाचार (morals) व कायदा (laws). सद्वृत्ताची व्याख्या सरळ व सोपी आहे. समजा ‘अ’ या व्यक्तीने स्वतःच्या सुखासाठी ‘क’ ही कृती केली, की जिचा व्यक्ती ‘ब’वर काही परिणाम होतो. हीच कृती ‘क’ जर व्यक्ती ‘ब’ने केली, तर व्यक्ती ‘अ’ सुखी राहील का? उत्तर ‘हो’ असल्यास कृती ‘क’ ही सद्वृत्ताला धरून आहे, ‘चांगली’ आहे. उत्तर ‘नाही’ असल्यास कृती ‘क’ ‘वाईट’ आहे. उदाहरण : मी तुमचे रु. १००० चोरले तर मी खुष, पण तुम्ही माझे घेतलेत तर मी नाखूष म्हणून ‘चोरी’ सद्वृत्त नाही. सदाचाराची व्याख्या आणखीनच सोपी आहे. जे जे करू नये अथवा करावे असे व्यक्तीच्या मनावर लहानपणापासून ठसविले जाते त्या सर्वांची बेरीज म्हणजे सदाचार. जेव्हा समाजाला/ राष्ट्राला काही संकेत सक्तीचे करावे असे वाटते तेव्हा ते राष्ट्र तसा कायदा करते. कायदा मोडणारा शिक्षेस पात्र ठरतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे सद्वृत्त सर्व जगभर कालनिरपेक्ष लागू असते, सदाचार, संस्कृति सापेक्ष असतात व कायदा हा राष्ट्र अथवा प्रांत यावर अवलंबून असतो.

‘माणसाने वागावे कसे’ याचे उत्तर ‘सद्वृत्ताला धरून’ असे आहे. वेगवेगळ्या धर्मांचे ‘सदाचार’ वेगळे असतात हे आपण सर्वच जाणतो. यांतील बरेच सदाचार सद्वृत्तात मोडत नाहीत: काही सद्वृत्ताविरुद्ध असतात तर काही तटस्थ असतात. हिंदू धर्मातील ‘स्पृश्य-अस्पृश्यता मानणे ’ हा सदाचार आपण हजारो वर्षे पाळत आलो होतो, पण तो सद्वृत्ताला धरून नसल्याने आपण तो सोडून दिला आहे, होय ना? केवळ परंपरेने, रूढीने, काहीच सिद्ध होत नाही, समर्थनीय होत नाही. जैन मंडळी बटाटे व कांदे खात नाहीत, कारण त्यांच्या धर्माचा तो सदाचार आहे. सद्वृत्ताच्या दृष्टीने ‘बटाटे खाणे’ हे तटस्थ आहे. (व्यक्ती ‘अ’ ने बटाटे खाल्ले, तर व्यक्ती ‘ब’वर काहीच परिणाम होत नाही!) ‘माणसाने माणूस खाणे’ सोडल्यास बाकी सर्व ‘खाणे’ हे सद्वृत्ताने तटस्थ आहे. जो नियम बटाट्याला, तोच गोमांसाला पण लागू होतो, नाही का?

धर्मनिरपेक्षता तुटते

धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकारने कुठल्याही धर्माला (religion या अर्थी) शासनात स्थान न देणे, कुठल्याही एका धर्मानुसार कायदे न करणे, व आपापल्या धर्मानुसार वागण्याचे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य देणे. अर्थात, एखाद्या धर्माचा ‘सदाचार’ जर सद्वृत्ताला सोडून असेल तर तो कायद्यानुसार निषिद्ध ठरवणे हेपण धर्मनिरपेक्षतेत अंतर्भूत आहे. म्हणूनच तर ‘अस्पृश्यता पाळणे’ हा गुन्हा ठरवला गेला आहे. ‘गोमांस न खाणे’ हा हिंदूंचा सदाचार आहे; मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी इत्यादींचा नाही. आणि हा हिंदू सदाचार सद्वृत्ताच्या दृष्टिकोनातून तटस्थ आहे. अशा तटस्थ प्रकाराबाबत कायदा करणे हे चूक आहे. अशा कायद्यामुळे इतर धर्मीयांच्या स्वातंत्र्यावर कारण नसताना, त्यांच्या गोमांस खाण्याने हिंदूंचे काहीही बिघडत नसताना, अंकुश घातला जातो; हे धर्मनिरपेक्षित नाहीच नाही.

अंधश्रद्धेला खतपाणी

आपण गायीचे दूध पितो म्हणून गाय जर पूजनीय, तर म्हैस का नाही तशीच पवित्र? गाय आपली माता, तर म्हैस का नाही? आणि कोणी जर बकरीचे अथवा उंटिणीचे दूध पीत असेल तर बकरी आणि उंटीण पण पूज्यच नाही का? ‘गाय’ वंदनीय आहे हे ‘सिद्ध’ करायला किंवा या रूढीचे समर्थन करायला जे जे सांगितले जाते ते इतके लटके असते की ते सांगणारापण कसाबसा त्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करीत असतो हे ऐकणार्‍याला कळते. ‘पाल अंगावर पडली की काहीतरी वाईट होते’ ह्यावर विश्वास ठेवणे ही जशी अंधश्रद्धा, तशीच गाय वंदनीय मानणे ही पण आहे हे लक्षात घ्यावे.

प्रजातंत्रावर आघात

लोकशाही म्हणजे प्रजातंत्र; लोकांसाठी लोकांनी निवडलेले सरकार लोकांसाठी चालवायचे असते. आणि राजधर्म असे सांगतो की सर्व प्रजानन एकाच मापात तोलावयाचे असतात. कोणालाही वरचढ ठरवून त्यांच्या वागण्याच्या पद्धतीप्रमाणे इतर कोणालाही वागावे लागू नये. अर्थात, कुठेही सद्वृत्ताचे उल्लंघन न होऊ देता सर्वांना समान लागू पडणारे कायदे करावयाचे असतात. गोहत्याबंदी कायद्यामुळे भारतातील जवळपास २५-४० टक्के लोकांनी (इतर धर्मीय ४-५%, हिंदूमधील अनेक जाती-जमाती १५-२०% आणि अश्रद्ध १०-१५%) ‘काय खावे’ या साध्या गोष्टीवर निर्बंध येतो. असे होऊ नये.

व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा

व्यक्तिस्वातंत्र्याच्या अनेकविध संकल्पनांसाठी सर्व धर्माच्या भारतीयांनी गेली २०० वर्षे मोठा लढा दिला आहे. जातीमुळे नक्की ठरलेला व्यवसाय आता मोकळा झाला आहे; स्त्रीने शिकावे आणि पाहिजे तो व्यवसाय करावा हे सांगावे लागत नाही. स्त्री-पुरुष समानता व समान संधी इत्यादि स्वातंत्र्ये आता अंगवळणी पडत आहेत. अश्यावेळी ‘काय खावे’ या फुटकळ विचारासाठी ‘धर्म-रक्षणाचा दावा’ करत निर्बंध घालणे हा व्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ला प्रजेने मंजूर करू नये. जर असे कायदे गुळमुळीतपणे मन मारत मानू लागलो, तर उद्या ‘लाल आहेत म्हणून टोमाटो खाऊ नयेत’ असा जैनधर्मरक्षणाचा कायदा पण मानावा लागेल! ज्यांना गोमांस खाऊ नये असे वाटते, त्यांनी ते खाऊ नये. ज्यांना खावेसे वाटते, त्यांनी खावे: मात्र न खाणार्‍याने स्वतःला ‘श्रेष्ठ’ मानू नये व खाणार्‍यांना दोष देऊ नये हेच खरे व्यक्तिस्वातंत्र्य. ‘खाणे’ सद्वृत्ताने तटस्थ आहे म्हणून येथे व्यक्तिस्वातंत्र्य योग्य आहे.

आर्थिक नुकसान

गोहत्या व गोरक्षण यामुळे राष्ट्राचे तीन प्रकारे आर्थिक नुकसान होते. निर्यातीत घट, धंदा कमी व भाकड गायी मरेपर्यंत पाळण्यावर होणारा अनाठायी खर्च. गोमांस (beef) निर्यातीत भारत जगात प्रथम क्रमांकावर (१७% भाग) आहे हे सत्य बहुतेकांना माहीतच नसते. मात्र येथे नमूद करणे जरूर आहे की बीफ या शब्दात म्हशी-रेडे यांचे मांसपण असते. जसा कोंबडी पाळण्याचा धंदा भारतात फोफावला आहे, तसाच गायी व बैल पाळून त्या मांसाचा व्यापार करण्याने अनेकांना काम मिळेल व राष्ट्रीय संपत्तीत वाढ होईल. बैल हा शेतीसाठी उपयुक्त प्राणी हळूहळू टांग्याला वापरात येणार्‍या घोड्यांप्रमाणे नाहीसा होत चालला आहे. यांत्रिक शेती वाढतच जाणार, कारण ती कमी खर्चिक होत आहे. त्यामुळे जन्माला आलेले सर्व बैल व दूध न देऊ शकणार्‍या सर्व गाई पाळण्याचा खर्च करावा लागेल. हा खर्च तुम्ही आम्ही दिलेल्या करांतून होणार! का? तर बहुजन समाजाची अंधश्रद्धा!

अनाथांची उपेक्षा

हा गोरक्षणाचा खर्च खरे पाहता ‘मानव’ रक्षणासाठी केला गेला पाहिजे. अनेक अनाथ बालके, अनेक गरीब म्हातारे-म्हातार्‍या व अनेक गरीब रुग्ण जगण्यासाठी धडपडत असताना त्यांच्या उपयोगी पडू शकणारा पैसा गायी-बैलांवर खर्च करण्यात काय ‘माणुसकी’ आहे? “दया धर्मस्य मूलम्” हे लक्षात घेऊन आधी माणूस व नंतर जनावरे रक्षावीत हेच योग्य, नाही का?

परदेशात अवगणना

सर्व धर्माचे भारतीय आज जगभर पसरलेले आहेत आणि साहजिकच त्यांत बहुतांशी हिंदू आहेत. या सर्वांना असे कायदे बुचकळ्यात पाडतात. त्यांचे समर्थन करणे अयोग्य तर वाटतेच, पण केले तरी ते तार्किक दृष्ट्या लंगडे पडते. भारताची प्रतिमा सर्व बाजूंनी उजळत असताना अशा ‘धार्मिक’ कायद्यांमुळे ती डागाळली जात आहे. असे होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी सावध राहिले पाहिजे.

समारोप

विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदू संस्थांनी ‘गोमाता पुजावी, गोमांस खाऊ नये’ ही रूढी पाळावी असे हिंदूना सांगणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र हिंदुमहासभा स्थापन करणार्‍या वि. दा. सावरकर या विज्ञाननिष्ठ विवेकवाद्यांनी “वेदांचा आदर करा, पण समाजव्यवस्था मात्र आधुनिक विज्ञानानुसार करा” असे स्पष्ट सांगितले होते. प्रखर हिंदुत्ववादी असूनही सावरकर यांचा हिंदूंच्या गोमांस भक्षणाला विरोध नव्हता हे पण लक्षात घ्यावे.

भारतीय जनता पक्षाला हिंदूंना गोरक्षण करावयास सांगावयाचे असेल, तर हा त्यांचा पण अधिकार आहेच. आणि असे ते सर्व धर्मीयांना पण सांगू शकतील. असा सल्ला अमलात आणावा की नाही, हा अधिकार मात्र व्यक्तीचा. हिंदू असो वा इतर धर्मीय, त्यांना कायद्याचा बडगा दाखविणे हे धार्मिक आततायीपणाचे लक्षण आहे. अंधश्रद्धा नाहीशा करण्यासाठी भारतात अनेक संस्था काम करीत आहेत. एक दिवस ही गायीविषयीची अंधश्रद्धापण नाहीशी होईल. मात्र जोपर्यंत लोकसभेतील निदान ६८% टक्के विधायक भारतीय राज्यघटनेतील एकमेव धर्मसापेक्ष कलम –गोरक्षणाचे – काढून टाकीत नाहीत, तोपर्यंत भारत २१ व्या शतकात, तर्काधिष्ठित शास्त्रीय विचारसरणीत, संपूर्णपणे शिरला आहे असे मानता येणार नाही.

हा लेख महाराष्ट्र टाईम्स व दिव्य मराठी या दोन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाला होता.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.