झळ…

मानवी जंगल पेटते तेव्हा…

राज्य, देश, आणि जग हे सर्वार्थाने वेगवेगळ्या नियमांच्या निकषांवर आधारलेले असले तरी काही प्रमाणात मानवी मनाच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या हव्यासी आणि स्वार्थी भावना बरेचदा एकाच पातळीवर स्थिरावलेल्या असतात. यामध्ये अपवाद चौकट सोडली तर ना सामान्य नागरिकांमध्ये काही फरक जाणवतो ना राज्यकर्त्यांमध्ये. अगदी जमिनीत वाळूची धडी निघावी तशी जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे सामान्य माणूसही आपल्या सामान्य जगण्याच्या आधारावर हातापाय पसरवत असतो गडगंज संपत्तीच्या हव्यासापायी. याच्यापुढची गोष्ट म्हणजे आणखी दोन पावले पुढे असणारा राज्यकर्ता तर आपल्या कार्याचा परीघ कोणत्याही थराला जाऊन वाढवत असतो. त्यामुळे काय परिणाम होतील, कुठले संकट समोर उभे राहील आणि कुणाचे जगणे नामोहरम होईल याचा कोणताच विचार तो करत नाही. याच पद्धतीने जेव्हा जगाची वाटचाल सुरू असते तेव्हाच मानवी जात अंताच्या काठावर येऊन ठेपली आहे असे म्हणण्याला वाव निर्माण होतो. हाच वाव निर्माण झालाय तो ब्राझीलमधील ऑमेझॉन जंगलाला लावलेल्या आगीने…

या जंगलाचा परीघ, जगाला मिळणारा त्याचा आधार आणि त्याच्या आडोशाला जगणारे जीव, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मानव आपल्या जगण्याचा परीघ किती क्रूर विचारांवर उभारतो आहे हे सांगायला कुठल्याच तज्ज्ञाची गरज नाही. हे जंगल आहे ५५ लाख किलोमीटर क्षेत्रात व्यापलेले, ब्राझील, पेरू, कंबोडिया, व्हेनेझुएला, इक्वाडोर, बॉलिव्हिया, गुयाना, सुरीनाम, फ्रान्स (फ्रेंच गुआना) इत्यादी सुमारे १० देशांत विस्तारलेले! याचा सर्वाधिक, म्हणजे १३ टक्के भाग ब्राझीलमध्ये येतो, पेरूत १० टक्के भाग येतो आणि उरलेला कंबोडियासह इतर काही देशांत येतो. यासोबतच ४० हजार प्रकारच्या वनस्पती, ३० हजार प्रकारची झाडे, २ हजार प्रकारचे पक्षी, २ हजार २०० प्रकारचे मासे, ४२८ प्रकारचे उभयचर आणि शेकडो प्रकारच्या सरपटणाऱ्या प्रजातींसह २५ लाख प्रकारचे कीटक या जंगलाच्या आश्रयाला आहेत. दुर्दैवाने या असंख्य जीवांना जाळतोय आणि जळताना पाहतोय तोही सजीवच आहे. या आगीचा भडका आज चार-दोन नाही, तर तब्बल ७५ हजार ठिकाणी उडाला आहे. सध्या ब्राझीलच्या अर्ध्या आकाशात धुराचे लोट आणि फक्त अंधार इतकेच काय ते नजरेसमोर आहे…

कुठे चाललंय जग? काय हवंय आपल्याला? मानवी मनाची क्रूरता इतक्या वेगाने का वाढते आहे? याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? हव्यासापायी तुटण्याची तमा न बाळगता ओढत राहणे आणि फरकच पडत नाही म्हणून सतत टोचत राहणे हे एक दिवस तोडणारे आणि मोडणारेही ठरू शकते याचा विचार करायला हवा की नको? १९ ऑगस्टला लागलेली ही आग अजूनही त्याच आवेशात आणि वेगात धुमसत आहे. हे पाहून आणि ऐकून खंत वाटते की याच जंगलाला जगाची ‘फुफ्फुसे’ म्हटले जायचे, ज्यांना आज आग लागली आहे. ज्या फुफ्फुसातून वातावरणातील कार्बनडायऑक्साइड शोषला जातो, ग्लोबल वॉर्मिंग कमी होते, हवा कायम शुद्ध राहते, जमिनीचा ह्रास थांबतो आणि पाण्याचे शुद्धीकरण होते. हे सगळे मानवाला जगवण्यासाठी सतत कार्यरत असणारे ॲमेझॉन नावाचे जंगलरूपी फुफ्फुस आज याच मानवाकडून आगीच्या विळख्यात लोटले गेले आहे. किती हा दैवदुर्विलास…

नुकतीच एक लाजिरवाणी आणि उद्धटपणाचा कळस गाठणारी घटना घडली. ही घटना घडली पर्यावरणाचे वलय असणाऱ्या ‘जी-७’ जागतिक परिषदेमध्ये. यामध्ये ही आग थांबविण्यासाठी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना २० दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याची तयारी संबंधित देशांनी दाखवली. मात्र बोल्सोनारो यांनी ती नाकारली. ही मदत नाकारली त्याचे फार वाईट वाटले नाही, मात्र त्यावेळी त्यांनी बोललेले शब्द कानाखाली लगावल्याचा आवाज करून गेले. त्यांचे शब्द होते “आम्हाला मदत करायचे सोडा आणि आपापल्या देशांतील जंगलांची अवस्था बघा काय आहे ते” हे बोलले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो! त्यांचे हे बोल नक्की उद्धटपणाचे आहेत, मात्र ते अदखलपात्र नाहीत हेही तितकेच खरे आहे. त्यांच्या या शब्दाने मला लगेच भारत देश आणि त्यामध्येही प्रामुख्याने महाराष्ट्र आठवला. काय अवस्था आहे भारताची जंगलांबाबतीत? भारतात सद्यस्थितीत फक्त २४ ते २६ टक्के जंगलाचे प्रमाण आहे. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात फारच नगण्य. दुर्दैवाने भारतात लोकसंख्या वाढीचा आणि जंगलतोडीचा वेग सारखा झालाय. त्यात महाराष्ट्र रसातळाला गेला आहे आणि मराठवाडा तर पूर्णार्थाने आता वाळवंट झाला आहे. शेवटी इतकेच म्हणायचे आहे की, हे असेच चालू राहिले आणि मानवी मन इतक्याच झपाट्याने विनाशाच्या मार्गावर घेऊन जाण्याऱ्या गोष्टीकडे आकृष्ट होत गेले तर, ॲमेझॉन जंगलाला तर आग लावली, मात्र एक दिवस मानवाला आग न लावताच मानवी साखळीची पूर्णतः राखरांगोळी झालेली असेल हे नक्की…