वृक्षारोपणाचा ज्वर

सध्या महाराष्ट्रात तरी वृक्षप्रेमाच्या भावनेचा महापूर आला आहे. भारतीय मनोवृत्ती मुळातच भावनेच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष फायदा- तोटा यांचा विवेक हरवून बसण्याची आहे. त्यात विविध प्रसारमाध्यमांची भर पडल्यामुळे सर्व समाजाला वृक्षप्रेमाचा ज्वर चढला आहे. त्यामुळे अवास्तव खर्च, वाया जाणारे श्रम, वाढती गैरसोय, भूगर्भातील पाणी कमी होणे व काही वेळा हकनाक मृत्यु हे सर्व दोष निर्माण होत आहेत. त्यापैकी काही पैलूंकडे ह्या लेखात लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.

झाडे व पाऊस

झाडांमुळे, जंगलामुळे पाऊस वाढतो अशी एक समजूत समाजमनात घर करून आहे. पण ह्या समजुतीला काहीही शास्त्रीय आधार नाही! हे मात्र खरे की जेथे पाऊस मुळातच जास्त पडतो, तेथे साहिजकच जंगले असतात किंवा नंतर वाढू शकतात. येथे वनीकरणाचे प्रयत्न अधिक यशस्वी होतात. जेथे पाऊस फारच कमी पडतो, तेथे वाळवंट असते. वाळवंटात अजिबात झाडे नसतात असे नाही. तेथेपण तुरळक, खुरटी, कमी पाण्यावर जगू शकणारी झाडे असतातच. त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस असतो तेथे नैसर्गिक गवताळ प्रदेश असतो. तेथील माणसे शेतीपेक्षा मेंढ्या, शेळ्या पाळतात. त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस असतो तेथे गवत व थोडी झाडेपण असतात. तेथे थोडी शेती व त्याबरोबर गाई, म्हशी पाळल्या जातात. अगदी कमी पावसाच्या प्रदेशातपण बाहेरून कालव्यांनी पाणी नेऊन चांगली शेती करता येते. गुजरातच्या दुष्काळी भागात नर्मदा धरणाचे पाणी पोचल्याने चांगली शेती होऊ लागली आहे.

चीनने १९७८ पासून गोबी वाळवंट पसरू नये यासाठी लक्षावधी झाडे लावून एक प्रचंड मोठी हिरवी भिंत तयार करणे चालू ठेवले आहे. २०५० पर्यंत ती मोहीम सुरू राहील. अजूनतरी त्यामुळे पाऊस वाढलेला नाही. तेथे बरीच थंडी असूनही झाडे जगण्याचे प्रमाण १५ टक्के आहे. गरम हवामानाच्या प्रदेशात झाडे जगण्याचे प्रमाण अधिकच कमी असते. ही मोहीम यशस्वी होते की फसते ह्याचा निर्णय अजून लागलेला नाही.

झाडे आणि भूगर्भातील पाणी

पावसाचे पाणी जमिनीत मुरते व त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा निर्माण होतो. हलका पाऊस पडला तर झाडामुळे पावसाचे पाणी जमिनीपर्यंत पोहोचतच नाही. बरेच पाणी पानांवर राहते व नंतर वाफ होऊन उडून जाते, जमिनीपर्यंत पोचतच नाही. मधून मधून ऊन पडले, वारा जास्त असला तर ही अडवणूक वाढतेच. जमिनीवर साठलेला पाला पाचोळा ह्यामुळेपण असाच अडथळा येतो व पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. जोराचा व सतत पाऊस पडला तर मात्र ह्या अडथळ्यांना न जुमानता पावसाचे पाणी जमिनीत मुरते. पण कमी पावसाच्या प्रदेशात सतत जोराचा पाऊस सहसा नसतोच. तेथे झाडांमुळे भूगर्भात पाणी साठणे कमीच होते.

जेथे जमिनीला उतार बराच आहे तेथे जोराचा पाऊस पडला, व झाडे नसली तर पाणी जमिनीत फार न मुरता भराभर वाहून जाते व मातीची धूप करते. तेथे झाडे असली तर पाणी थोडे बेताने जमिनीवर पडते. मुळांमुळे व वर साठलेल्या पानांमुळे जमीन भुसभुशीत झाल्यामुळे पाणी जमिनीत जास्त मुरते. बरीचशी सपाट जमीन असेल तर झाडांमुळे पाणी जमिनीत पोचण्यास अडथळाच जास्त होतो. सपाट जमिनीवर पाऊस पडला तर तेथे झाडे नसली तरीदेखील पाणी जमिनीत मुरते, वाहून जात नाही. झाडे आपल्या चयापचयक्रियेमध्ये जगण्यासाठी, वाढण्यासाठी जमिनीतील पाणी उचलून पानांद्वारे हवेत सोडत असतात. त्याशिवाय त्यांना जगताच येणार नाही. पाणथळ प्रदेशातील सदाहरित झाडे खूपच पाणी हवेत सोडतात. वाळवंटी प्रदेशातील खुरटी, काटेरी, निवडुंगासारखी, किंवा पानझडी झाडे किमान पाणी हवेत सोडतात, पण सोडतातच! एक मोठे झाड वर्षाकाठी १५०००० लिटर पाणी हवेत सोडते.

भूगर्भातील मातीची खोली किती, मातीची निचरा क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती, भूगर्भातील खडकाची सच्छिद्रता व पाणी साठवण्याची क्षमता किती, पाऊस एकदम जास्त पडतो की हळूहळू बरेच दिवस पडत राहतो, अशा गोष्टींवर भूगर्भातील पाण्याची पातळी ठरते. शिवाय उपसा किती हेही महत्त्वाचे. आणि हा उपसा फक्त माणूसच करतो असे नाही, तर झाडेदेखील बराच उपसा करत असतात! उलटपक्षी पाऊस किती आणि भूगर्भातील पाण्याची पातळी किती ह्यावर झाडे जगणार की वाळून जाणार, की खुरटलेली राहणार, ठराविक क्षेत्रफळात किती झाडे चांगली जगू शकणार, हे ठरते. कोकणात, घाटामध्ये, दर चार-पाच फुटांवर झाडे जगून दाट जंगल तयार होईल, तर विटा, माण अशा दुष्काळी प्रदेशात निसर्गत:च दर शंभर दोनशे फुटांवर एक झाड असेल, आणि बाकी प्रदेश गवताळ असेल. असा दुष्काळी प्रदेश जर सपाट असेल, तर तेथे पावसाचे पाणी फारसे वाहून जात नाही, बरेचसे जमिनीत मुरते, मग तेथे झाडे नसली आणि फक्त खुरटे वाळके गवत असले तरी! अशा ठिकाणी अट्टाहासाने झाडे लावून ती जगविल्यास, त्यांच्यामुळे जमिनीतील पाणी कमीच होते, वाढत नाही! बहुतेक वेळा, खास काळजी घेणे बंद केल्यानंतर ही झाडे आपोआपच मरून जातात किंवा खुरटलेली, केविलवाणी कशीतरी जगतात. त्यासाठी केलेले श्रम व खर्च केलेले पैसे वाया जातात. गवताळ प्रदेश हाही पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सर्वत्र शेती करावी, किंवा जंगले वाढावी असा अट्टाहास कशासाठी? अशा ठिकाणी झाडे लावून पाऊस तर वाढत नाहीच पण जमिनीतील पाण्याची पातळी कमी होण्याचीच शक्यता जास्त असते. चीबड (वॉटर लॉग्ड) जमिनीतील पाणी काढून टाकण्यासाठी अर्थातच दाट झाडे लावली तर उपयोग होतो.

झाडे आणि हवेचे प्रदूषण

हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी शहरांमध्ये सगळीकडे मोठी झाडे लावा असे सांगितले जाते. हवेचे प्रदूषण मुख्यतः पुढील प्रकारचे असते:- १. धूळीचे, मातीचे सूक्ष्म कण, अपुर्‍या ज्वलनामुळे तयार होणारे कार्बन कण, परागकण, कापसाचे व इतर प्रकारच्या धाग्यांचे सूक्ष्म कण, वगैरे. २. सल्फर डायॉक्साईड. ३. कार्बन मोनॉक्साइड. ४. नायट्रोजन ऑक्साईड ५. ओझोन. ६. डायॉक्सिन्स. ७. बेन्झीन. ८. शिसे, पारा, आर्सेनिक वगैरे.

ह्यांपैकी कोणतेही प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे महत्त्वाची कामगिरी करत नाहीत. ह्याचे साधे कारण असे की झाडे प्राण्यांप्रमाणे श्वासाबरोबर मोठ्या प्रमाणात हवा आत घेत नाहीत. त्यांच्या पर्णरंध्रांतून नुसत्या वायूविकरणाने (डिफ्युजनने) जेवढे प्रदूषक आत शिरतील, त्यांचाही अल्पभाग पानांत शोषला जातो. त्यामुळे प्रदूषण शोषून घेण्यामध्ये झाडांचे योगदान अगदीच क्षुल्लक असते. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी माणसांची व प्राण्यांची फुफ्फुसेच प्रदूषण शोषून घेण्याचे काम झाडांपेक्षा खूपच जास्त कार्यक्षमतेने करतात. अर्थात, त्यासाठी मानवी आरोग्याचा बळी द्यावा लागतो हे खरेच. मानवी किंवा अन्य कोणत्याही प्राण्याचा श्वसनमार्ग लांब असतो व काही लिटर हवा त्यातून दर मिनिटाला आत बाहेर करत असते. सर्व श्वसनमार्ग ओला व चिकट द्रव्याने माखलेला असतो. त्याला धुळीचे वा अन्य कण सहज चिकटून बसतात.ह्या चिकट द्रव्याचा म्हणजेच म्युकसचा प्रवाह सतत फुफ्फुसांकडून घशाकडे चालू असतो. घशात आल्यावर आपण ते नकळत गिळून टाकतो व आतड्यात त्यांची नैसर्गिक विल्हेवाट लागते. मातीचे कण, परागकण, बुरशीचे बीजाणू वगैरे नैसर्गिक कणांची विल्हेवाट ह्या रीतीने अत्यंत कार्यक्षमतेने होते.

पण, मानवी उद्योगांनी निर्माण होणारे कण एकतर फार मोठ्या प्रमाणावर हवेत असतात व रासायनिक दृष्ट्या वेगळे असतात. ह्यांमध्ये प्रामुख्याने पेट्रोलच्या, डिझेलच्या अपुर्‍या ज्वलनामुळे तयार होणारे कार्बनचे आणि हाइड्रोकार्बनचे कण, खडीच्या किंवा सिमेंटच्या कारखान्यात व बांधकाम चालू असताना तयार होणारे कण, तसेच कापसाचे व ॲस्बेस्टॉसचे बारीक तंतू मोडतात. त्यांची कार्यक्षम विल्हेवाट माणसाच्या श्वसनमार्गाला लावता येत नाही व त्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात. पण झाडे मात्र हे कण वातावरणातून बाजूला काढण्यात पूर्णपणे निरुपयोगी असतात. फर्निचरवर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर बसतील तेवढेच कण पानांवर बसतात. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन (ओझोनचा थर फार उंचावरील वातावरणामध्ये अल्ट्रावायलेटचे किरण शोषून घेतो व पृथ्वीचे त्यांच्यापासून रक्षण करतो. पण पृथ्वीजवळच्या हवेच्या थरात असल्यास तो विषारी असतो) डायऑक्सिन व बेंजीन ही प्रदुषके वायूरूपात असतात. हे वायू रासायनिकदृष्ट्या जलद प्रक्रियाकारक आहेत. फुप्फुसांमध्ये अत्यंत पातळ व वायूची सहज देवघेव करू देणार्‍या श्वसनपडद्यांमार्फत (रेस्पिरेटरी मेंब्रेन) ह्या प्रदूषकवायूंची गाठ जलद वाहणार्‍या रक्ताशी व त्यातील हिमोग्लोबिनशी व इतर प्रोटीनशी पडते व हे वायू अत्यंत कार्यक्षमतेने रक्तात शोषले जातात व त्यांचा विषारी आणि रोगकारक परिणाम घडवून आणतात. फुफ्फुसे दिसायला लहान असली तरी ह्या श्वसनपडद्याचे क्षेत्रफळ प्रचंड असते. त्यामुळे हवेतील हे वायू शोषून घेण्याची त्यांची क्षमता प्रचंड असते. त्यामानाने हे वायू शोषून घेण्याची झाडांच्या पानांची क्षमता दुर्लक्षणीय असते. फार मोठ्या प्रमाणावर झाडे लावल्यास शहरातील वायूप्रदूषण फार तर दहा टक्के कमी होते. थोडक्यात प्रदूषणापासून सुटका मिळवण्यासाठी प्रदूषण करणेच थांबवावे, त्यासाठी झाडे लावणे हे अज्ञानाचे लक्षण आहे.

वरील चर्चेमध्ये हवेतील कार्बन डायऑक्साइडचा समावेश केलेला नाही. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, किंवा रेफ्रिजरेशनसाठी वापरले जाणारे वायू हे रूढ अर्थाने प्रदूषक नाहीत. मानवी आरोग्यासाठी ते सरळ सरळ हानिकारक नाहीत.त्यांच्या अतिरेकामुळे पृथ्वी तापणे हा परिणाम मात्र मानवी अस्तित्वावरच घाला घालू शकेल. त्याकडे जरा पाहू.

पृथ्वी तापणे (ग्लोबल वॉर्मिंग)

पृथ्वीवर वनस्पती सृष्टीचा उदय होईपर्यंत पृथ्वीवरील वातावरणात ऑक्सिजन नव्हताच. पूर्णपणे नव्हता. कार्बन डायऑक्साईड मात्र भरपूर होता. वनस्पतींनी सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने कार्बनडायऑक्साईडमधील कार्बनचे ग्लुकोज, सेल्युलोज, लिग्निन अशा सेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतर करून त्यांचा उपयोग आपल्या वाढीसाठी केला, तर त्यातील ऑक्सिजन हवेत सोडून दिला. असे कोट्यावधी वर्षे चालल्यावर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण आजच्या इतके म्हणजे वीस टक्केपर्यंत वाढले तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दशलक्ष भागात २५० भाग (पीपीएम) इतके कमी झाले. कोट्यावधी वर्षे मृत वनस्पतींमधील सेंद्रिय पदार्थ जमिनीवर किंवा सागराच्या तळाशी साठत गेले व भूगर्भातील हालचालींनी किंवा त्यांच्यावर गाळ साठल्याने भूगर्भात गाडले गेले. तेथील प्रचंड दाब व उष्णता व ऑक्सिजनच्या अभावामुळे ह्या वनस्पती अवशेषांचे रूपांतर दगडी कोळसा, लिग्नाइट, तेल आणि नैसर्गिक वायू, मुख्यत: मिथेन, ह्यांच्यामध्ये झाले.

साधारण सोळाव्या शतकापासून औद्योगिक युग सुरू झाले. त्यासाठी लागणारी ऊर्जा प्रथम भूगर्भातील दगडी कोळसा मग तेल व अलीकडे वायू ह्यांच्या ज्वलनापासून मिळविण्यात आली. ह्या ज्वलनापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळतो व त्याचे वातावरणातील प्रमाण औद्योगिकपूर्व काळातील २५० पीपीएम पासून सध्याच्या ४१० पीपीएमपर्यंत वाढले आहे. एवढी वाढ माणसाला कळतही नाही किंवा त्याच्या किंवा इतर सजीवांच्या आरोग्याला धोकादायक नाही. मग काय परिणाम होतो? तर वातावरणातील वाढलेल्या कार्बन डायऑक्साईडचे दोन मुख्य परिणाम होतात. एक म्हणजे पृथ्वी तापणे व दुसरा म्हणजे समुद्राचे आम्लीकरण.

झाडे व पृथ्वी तापणे

कार्बन डायऑक्साईडमध्ये असा गुणधर्म आहे की तो सूर्यकिरणांनी तापलेल्या पृथ्वीतील उष्णता किरणांद्वारे अंतराळात निघून जाण्यास प्रतिबंध करतो. ह्या गुणधर्माला ‘ग्लासहाऊस इफेक्ट’ म्हणतात. ह्या गुणधर्मामुळे सूर्याकडून मिळालेली ऊर्जा पृथ्वीवर धरून ठेवली जाते. कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण २५० पीपीएमपासून ४१० पीपीएमपर्यंत वाढल्यामुळे हा ग्लासहाऊस परिणाम वाढला आहे व त्याने धरून ठेवलेल्या उर्जेमुळे पृथ्वीचे तापमान १९६० सालापासून आजपर्यंत १.५ सेंटिग्रेडने वाढले आहे. त्याचे परिणाम आपण ठिकठिकाणी होणारी ढगफुटी, अतिवृष्टी, तीव्र धुळीची वादळे, महिन्याभराचा पाऊस दोन दिवसात पडणे, विजा पडण्याचे प्रमाण वाढणे, गारपीटीचे प्रमाण काही प्रदेशात खूप वाढणे, समुद्री तुफानांची तीव्रता व संख्या वाढणे, अश्या अतिरेकी हवामानाच्या विविध दुर्घटनांद्वारे भोगत आहोत.

माणूस भूगर्भातील इंधने जाळून जो कार्बन डायऑक्साईड तयार करतो, त्यातील निम्मा दरवर्षी जंगले, जमिनीवरची इतर वनस्पतीसृष्टी व समुद्रातील वनस्पती ह्यांच्यामार्फत काढून घेतला जातो. पण उरलेला कार्बन डायऑक्साईड वातावरणात शिल्लक राहतो व तेथे किमान एक हजार वर्षे राहतो. आहे ही परिस्थिती कायम राहिल्यास एकविसशे सालापर्यंत पृथ्वीचे तापमान औद्योगिकपूर्व काळापासून विचार करता ४.५ सेंटिग्रेडने वाढेल व त्याचे भयावह परिणाम होतील. म्हणून ही वाढ दोन डिग्री सेंटीग्रेडपर्यंतच रोखावी ह्यादृष्टीने शास्त्रज्ञांचे व बहुतेक देशांचे प्रयत्न चालू आहेत. ह्या प्रयत्नांचे दोन भाग आहेत. एक म्हणजे भूगर्भातील इंधनांचे ज्वलनच कमी करून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे. दुसरा म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड झाडांद्वारे शोषून घेऊन त्याचे वातावरणातील प्रमाण मर्यादेत ठेवण्याचे प्रयत्न करणे. ह्या कामी झाडे लावणे कितपत परिणामकारक आहे ह्याचा थोडा विचार करू.

एक झाड साधारण दरवर्षी २२ किलो कार्बन डायऑक्साईड वापरते. सर्वसाधारण जंगलात दर एकर चारशे ते पाचशे झाडे असतात व ती वर्षाकाठी एक टन कार्बन डायऑक्साईड वापरतात. गेली काही वर्षे भारताच्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात दरवर्षी दहा कोटी टनांनी वाढ होत आहे. ही दरवर्षीची कार्बन डायऑक्साईडची वाढ फक्त शोषून घेण्यासाठी प्रतिटन एक एकर ह्याप्रमाणे दहा कोटी एकर, म्हणजेच चार कोटी हेक्टर किंवा चार लाख चौरस किलोमीटर जमिनीवर नवे जंगल वाढवावे लागेल. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख चौरस किलोमीटर आहे हे लक्षात घेतले तर हे काम अशक्य कोटीतील आहे हे लक्षात यावे. आपण सध्या ज्या प्रमाणात झाडे लावून जगवत आहोत त्याचा परिणाम नगण्य होणार आहे हे लक्षात घ्यावे. झाडे जरूर लावावी. सर्वच आघाड्यांवर प्रयत्न आवश्यक आहेत. पण झाडे लावण्याचे आपण अगदी शथीर्ने प्रयत्न केले, खूप खर्च केला, मोहिमा हाती घेतल्या तरी होणारा परिणाम अत्यंत अत्यल्प असणार हेही लक्षात घ्यावे. साधारण चार मोटरगाड्या एक वर्षात जेवढा कार्बन डायऑक्साईड तयार करतात तेवढा संपवण्यासाठी दरवर्षी एक एकर जंगल लावावे लागेल.

झाडे लावण्यावर जेवढा पैसा, जेवढे श्रम, जेवढी मानसिक शक्ती खर्च होते तेवढाच ह्या गोष्टींचा खर्च कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यावर केला तर तो खूपच अधिक परिणामकारक ठरेल. वीज काटकसरीने वापरणे, जरूर नसलेली विजेवरची उपकरणे बंद करणे, अधिक कार्यक्षम दिवे, पंखे, पंप वापरणे, विजेवर चालणारी वाहने, सायकली किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे, कोळशाऐवजी नैसर्गिक वायूवर किंवा अणूउर्जेवर वीज निर्माण करणे, किंवा पवनउर्जेचा वापर वाढवणे अश्या गोष्टींवर पैसा, वेळ, श्रम आणि मानसिक ऊर्जा खर्च करणे, हे झाडे लावण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक परिणामकारक आहे. झाडे लावू नयेत असे अजिबात नाही. पण प्राथिमकता ही उत्सर्जन कमी करण्यास द्यावी.

देशाची ३३ टक्के भूमी जंगलाखाली असावी हा आदर्श आहे. भारतातील सर्वसाधारण माणूस गरिबीतून बाहेर पडून हळूहळू थोडा थोडा जास्त श्रीमंत होत आहे. त्याच्या सर्वच गरजा वाढत आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी वस्ती, कारखाने, सेवा, उद्योग, रस्ते, विमानतळ वगैरेंसाठी जास्त जास्त जमीन लागणार आहे. भारताची लोकसंख्यादेखील २०५० पर्यंत तरी वाढतच जाणार आहे. बर्‍यापैकी पाऊस पडणारी व चांगली माती असणारी जमीन शेती व इतर कारणांसाठी वापरली जाईल, जंगलांच्या वाढीसाठी उपलब्ध होणार नाही. कमी पावसाच्या प्रदेशातील माळरानाची (उदाहरणार्थ माण तालुका, खटाव तालुका, मराठवाडा) किंवा वाळवंटाची जमीन फक्त वृक्षारोपणासाठी उपलब्ध असेल. तेथे झाडे लावण्याचा हट्ट धरल्यास खर्चही खूप येईल आणि तरीसुद्धा झाडे जगण्याचे व त्यांचे मोठे वृक्ष होण्याचे प्रमाण अगदीच कमी असेल. त्यातील यश बेताचे आणि अल्पजीवी असेल. कारण मोठ्या प्रमाणावर झाडांची कायमची काळजी घेणे, देखभाल करणे अशक्य असते. तसे नसते तर तेथे आपोआपच जंगल तयार झाले असते. झाडे लावावी लागली नसती.

झाडे आणि गारवा

झाडे जमिनीतील पाणी उचलून पानांपर्यंत नेतात आणि तेथे त्या पाण्याची वाफ होऊन ती हवेत निघून जाते. त्यामुळे माठातले पाणी जसे बाहेर झिरपणारे पाणी उडून गेल्यामुळे गार होते, तसेच झाडांच्या आसपासची हवा गार होते. शहरात भरपूर झाडे असली की शहरातली हवा एक-दोन डिग्री सेंटीग्रेडने गार होते. त्यासाठी जरूर झाडे लावावी.

आर्थिक स्थिती सुधारल्याने व शासनाच्या मदतीने खेडोपाडीदेखील स्वयंपाकाचा गॅस आला आहे. त्यामुळे सरपण म्हणून झाडे तोडण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. तसेच मोठ्या संख्येने पाळलेली भाकड किंवा अत्यंत कमी दूध देणारी जनावरे पोसत राहणे हे परवडेनासे झाले आहे. काही खेड्यांतील माणसे शहरात राहायला गेल्यामुळे खेड्यातील लोकवस्ती कमी कमी होत आहे. त्यामुळे रानोमाळ भटकून चरणार्‍या गाईगुरांची व शेळ्यांची संख्या कमी झाली आहे, होत आहे. नवीन वाढणार्‍या रोपांचे त्यामुळे नुकसान होत नाही. त्यामुळे मध्यम पाऊस, चांगला पाऊस पडणार्‍या भागांमध्ये आपोआपच जंगल-झाडोरा वाढत आहे. त्यामध्ये निसर्गाने निवडलेली, तेथील जमीन व हवामान ह्यांच्याशी जुळणारी झाडे, आपोआप वाढत आहेत व तेच टिकाऊ वनीकरण आहे. तेथे माणसाने मुद्दाम हस्तक्षेप करून वृक्षारोपण करण्याने काही फायदा नाही. त्यावर खर्च करण्यापेक्षा तो खर्च उत्सर्जन कमी करण्यासाठी करणे अधिक फलदायी ठरेल. वरील विवेचनात खर्चांचा उल्लेख येतो तो मुख्यतः शासकीय खर्चांबद्दल आहे. कारण राज्य व केंद्रशासन, जिल्हापरिषद, नगरपालिका ह्यांनी वृक्षारोपणावर केलेला खर्च हा भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार ह्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाया जातो. युद्धपातळीवर वृक्षारोपणाची मोहीम घेतली जाते. कोट्यवधी रोपे लावण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कोठेही कितीही दाटीने रोपे लावली जातात. फोटो घेतले जातात. समारंभ होतात. नंतर सगळ्याचा विसर पडतो. रोपे जगून त्यांचे मोठे वृक्ष होण्याचे प्रमाण अत्यल्प असते. झाडे लावा, पैसा जिरवा, अशी वस्तुस्थिती आहे. ह्याउलट स्थानिक लोकांनी जवळपासच्या जागांवर स्वप्रयत्नांनी केलेले वृक्षारोपण खूपच यशस्वी होते व अल्प खर्चात होते. असे वृक्षारोपण नेहमीच स्वागतार्ह आहे!

झाडे आणि वाहतूक अपघात आणि हमरस्ते

भारतात रस्त्याशेजारी झाडे लावण्याची सुरुवात बहुतेक करून मोगलांच्या पूर्वीच्या शेरशहा सुरी ह्याने केली. त्यावेळी बहुतेक वाहतूक पायी, घोड्यावरून किंवा बैलगाड्यांमधून होत असे. झाडांच्या रस्त्यावर पडणार्‍या सावलीचा खूपच उपयोग होत असे. हल्ली शहरांना जोडणार्‍या रस्त्यांवरील वाहतूक मुख्यतः बसेस, मोटारी ह्यांमधून होते व त्यांचा वेग ताशी ८० ते १२० किलोमीटर असतो. झाडे देत असलेल्या सावलीचा त्यांना काहीच उपयोग नसतो. पण चालकाच्या चुकीमुळे, डुलकी लागल्यामुळे, गाडीतील बिघाडामुळे किंवा अन्य अपघाताचा परिणाम म्हणून काहीवेळा गाडी रस्ता सोडून बाजूला जाते. अश्यावेळी गाडी झाडावर आपटून एकाएकी थांबली तर मोठी प्राणहानी होते व अनेक जण जखमी होतात. तसे न होता ती गाडी हळूहळू थांबली किंवा कलंडली तर सहसा प्राणहानी होत नाही व होणार्‍या जखमांची तीव्रता कमी असते. त्यामुळे रस्त्याशेजारी निदान शंभर फुटांपर्यंत बलदंड झाडे असू नयेत किंवा अन्य कोणतेही मैलांचे दगड, दगडी/ कॉंक्रिटचे खांब/ कमानी/ पाट्यांचे लोखंडी खांब असे मजबूत अडथळे असू नयेत. मानवी जीवनाबद्दल आस्था बाळगणार्‍या पाश्चात्य देशांत व यूएसएमध्ये हायवे शेजारी शंभर फूटांपर्यंत असला कोणताही बलदंड अडथळा असू नये असा कायदाच असतो. शहराच्या सीमेच्या आत मात्र वाहतूक कमी वेगाने चालावी अशीच अपेक्षा असल्याने रस्त्याशेजारी झाडे असतात. भारतात मात्र काळाबरोबर नियम बदलत नाहीत. मानवी सुरक्षेपेक्षा रूढी, परंपरा ह्यांना जास्त महत्त्व आहे. त्यामुळे हायवेच्या शेजारी मोठी झाडे लावण्याची प्रथा अजून चालूच आहे. झाडांबद्दलचे प्रेम उतू जात असते. हायवे शेजारच्या मोठ्या झाडावर आपटून वाहनातील माणसे मरण पावली तरी त्याबद्दल वाईट वाटत नाही किंवा त्याबद्दल काही करावे वाटत नाही. मानवी जीवनाची क्षणभंगूरता व असारता ही भारतात सर्वमान्य आहे. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने खालील मुद्दे नमूद करणे भाग आहे.

१. झाडांमुळे रस्त्यावरचे किंवा रस्त्याशेजारचे सूचनाफलक झाकले जाऊन त्यावरील मजकूर दिसणे बंद होऊ नये.

२. रस्त्यावरचे इतर वापरकर्ते, पादचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहने, जनावरे ह्या गोष्टी वाहनचालकाला दिसणे बंद होऊ नये.

३. पादचारीमार्ग शेजारील झाडांच्या फांद्यांमुळे बंद किंवा गैरसोयीचे होऊ नयेत.

४. ज्यांच्यावर आदळल्याने घातक अपघात होतील अशी झाडे रस्त्याशेजारी असू नयेत. साधारण तीन इंच व्यासाच्या झाडावर वाहन आदळल्यास झाड मोडते किंवा वाकते, पण वाहनांचे नुकसान होत नाही. अशी कमी व्यासाची अनेक झाडे शेजारीशेजारी असल्यास गाडी त्यांच्यावर आदळल्यास स्पंजवर आपटल्याप्रमाणे अलगद थांबते व वाहनाचे व त्यामधील प्रवाशांचे नुकसान होत नाही व प्राणहानी होत नाही. म्हणून रस्त्याशेजारील झाडे तीन इंच व्यासाची झाल्यास ती लगेच तोडून, नवीन फूट आल्यावर ती तीन इंचाची होईपर्यंतच वाढू द्यावी.

५. झाडांच्या मुळांमुळे रस्ते, पदपथ, नाले आणि ड्रेनेजचे नळ खराब होऊ नयेत इतक्या अंतरावर झाडे असावीत. झाडे रस्त्यावर पडून अपघात होऊ नयेत, वाहतूक बंद होऊ नये इतक्या लांब अंतरावर असावीत. आंध्रमधील वादळानंतर वादळग्रस्त भागात मदत पोहोचण्यात महत्त्वाचा अडथळा हा रस्त्यांवर किंवा रेल्वेमार्गांवर पडलेल्या अवाढव्य वृक्षांचा होता. म्हणून रस्ते आणि रेल्वेमार्ग ह्यांच्यापासून मोठी झाडे किमान शंभर फूट दूर अंतरावर असावीत.

६. रस्त्यावर वाढलेल्या व झुकलेल्या फांद्यांमुळे ट्रक्सना व बसेसना कडेपर्यंतचा रस्ता वापरताच येत नाही. त्यांना रस्त्याच्या मध्यभागातूनच जावे लागते. त्यामुळे अपघात होतात. तसे होऊ नये म्हणून रस्ता जमिनीवर जेवढा रुंद आहे, तेवढीच रुंद जागा त्याला वरपर्यंत म्हणजे २५ फूट उंचीपर्यंत वाहतुकीसाठी उपलब्ध असावी व ह्या जागेत फांद्या वाढू देऊ नयेत.

७. रस्ता जेथे वळतो तेथे कोपर्‍यावरची जागा मोकळी ठेवावी. म्हणजे वाहनचालकांना वळणापुढचा रस्ता नीट दिसू शकेल.

८. रस्त्याशेजारील झाडे, खांबावरील फोन, वीज वगैरे तारांना उपद्रव देणार नाहीत इतकीच उंच जाणारी असावी. रस्त्याशेजारच्या झाडांना अनिर्बंध वाढू देणे धोक्याचे आहे. झाडांची सर्व कामे झुडपे, गवत, वेली करू शकतात. मोठ्या झाडांबद्दलचे पक्षपाती प्रेम नुकसानकारक आहे.

९. वाहतुकीला अडथळा आणणारी, रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी झाडे तोडल्यास त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान वाहतूक सुलभ व जलद झाल्यामुळे सहज भरून निघते. तेव्हा अशा रस्त्यांशेजारच्या वृक्षांचे व्यवस्थापन करण्यास वृक्षप्रेमींनी विरोध करू नये. ह्याचा अर्थ असा नाही की पर्यावरण रक्षणासाठी मोटारींच्या संख्येवर बंधन घालू नये किंवा अनावश्यक मालवाहतूक थांबवण्याचा प्रयत्न करू नये किंवा पेट्रोल-डिझेलऐवजी विजेवर व गॅसवर चालणारी वाहने वापरण्यास उत्तेजन देऊ नये.

१०. रस्त्याचा डांबरीकरण/ कॉंक्रीटीकरण केलेला भाग जेथे संपतो, तेथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईडपट्टी असते. ह्या साईडपट्टीला थोडा उतार असतो व तो उतार रस्त्याशेजारच्या नाल्यांपर्यंत जातो. ही रचना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असते. ह्या साईडपट्टीवर गवत, झुडपे वगैरे उगवल्यास त्यांच्या मुळांमुळे जमीन उचलली जाऊन ही साईडपट्टी मुख्य रस्त्यापेक्षा उंच होते. तसेच हे गवत, झाडेझुडपे व त्यांची मुळे यांच्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुंना पावसाळ्यात पाणी साठते व ह्या पाण्यामुळे वाहनांचे ब्रेक नीट लागत नाहीत, म्हणजे हायड्रोप्लेनिंग होते व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच मुख्य रस्त्याच्या खालची जमीन पाण्याने संपृक्त होते व त्यामुळे मुख्य रस्त्याची ताकद कमी होऊन भेगा पडणे, खड्डे पडणे सुरू होते. त्यामुळे ह्या साईडपट्टीवर आणि नाल्यांमध्ये गवत, झाडे व झुडपे वाढू देऊ नयेत.

११. आजारी व रोगग्रस्त झाडे रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता असते. पाने कमी झाल्याने किंवा खोड विद्रूप झाल्यामुळे आजारी रोगट झाडे ओळखू येतात. अशी झाडे व रस्त्यावर झुकलेली झाडे जमिनीसपाट काढावी. म्हणजे ती रस्त्यावर पडल्यामुळे होणारे अपघात टळतात.

हायवेशेजारी उंच झाडे लावायची असल्यास ती जितकी उंच वाढू द्यावयाची असतील तितकी ती रस्त्याच्या कडेपासून लांब असणे आवश्यक आहे. उदा. ५० फूट उंच झाडे ही ५० फूट अंतरावर असावी. म्हणजे दोन्ही बाजूंना निदान ६०-६० फूट जागा मोकळी सोडावी लागेल, जे खूप महाग पडेल व तेवढा त्या रुंदीकरणाला जनतेचा विरोधही वाढेल. म्हणून तशी रांगेने झाडे न लावता दर १०-१५ किलोमीटर अंतरावर चांगली एकरभर जागा घेऊन तेथे विविध प्रकारची झाडे लावून अनिर्बंध वाढू देता येतील. ह्या जागेचा पार्किंग, विसावा, स्वच्छतागृहे, खानपान सेवा, विक्री केंद्र, चार्जिंग स्टेशन ह्यांसाठी करून ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पण करता येईल. झाडे एकाच ठिकाणी असल्याने पाणी घालणे, संरक्षण, देखभाल ह्या गोष्टी स्वस्त व सोप्या होतील. अशा वनस्थळी निर्माण करण्याची कल्पक व मौल्यवान सूचना अतिशय योग्य वेळी आलेली आहे. कारण महामार्गांचे विस्तारीकरण आता हिरिरीने चालू आहे. आत्ताच ही सूचना स्वीकारून तसे शासकीय धोरण बनवल्यास नवीन महामार्ग अधिक सुरक्षित, सोयीचे व स्वस्त होतील.

शहरातील व गावातील झाडे

रस्त्यावरील झाडे :- सर्व शहरांत किंवा गावांत वाहने खूप वाढल्याने वाहतुकीला रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे जेथे शक्य आहे तेथे रस्त्याशेजारच्या खासगी किंवा सार्वजनिक आवारामध्ये झाडे असावीत. रस्त्यावर नसावी. रस्त्यावरील झाडांमुळे अनेक तोटे होतात. उदाहरणार्थ वाहतुकीला अडथळा, गटारांना अडथळा, स्टॉर्मवॉटर ड्रेन्सना अडथळा व त्यामुळे रस्त्यावर पाणी साठून रस्ते जलद खराब होणे,इत्यादी. झाडांवरून ठिबकणारे पावसाचे पाणी बर्‍याच वेळा काही ठिकाणीच ठिबकते व त्याजागी खड्डे तयार होऊन त्यात पाणी साठून ते खड्डे वाढत जातात. हल्ली बंगलेवाल्यांमध्ये कंपाउंडच्या बाहेरील रस्त्यांवर अतिक्रमण करून तेथे फ्लॉवरबेड तयार करण्याची फॅशनच आली आहे. ह्यासाठी म्युनिसिपालिटीची परवानगी अर्थातच लागत नाही. ह्या फ्लॉवरबेडमुळे गटारे बंद होतात. रस्त्याच्या बाजू रस्त्यापेक्षा उंच होऊन पावसाचे किंवा गाडी धुण्याचे पाणी रस्त्यावरच रहाते व त्यामुळे रस्ते खराब होतात.

झाडांच्या मुळांमुळे फूटपाथ वेडेवाकडे होतात. मुळे ड्रेनेज लाईनमध्ये प्रवेश करतात. पाण्याचे पाईप, विजेच्या किंवा फोनच्या तारा ह्यांची देखभाल करणे झाडांच्या मुळांमुळे अवघड होते. झाडांच्या फांद्या विजेच्या तारांना स्पर्श करतात व त्यामुळे आग लागू शकते. तसेच टेलिफोनच्या तारांना स्पर्श केल्यामुळे टेलिफोन बंद पडतो.

बर्‍याच वेळा फारसा विचार न करता प्रचंड वाढणारी व सहज पडू शकणारी झाडे रस्त्यावर लावली जातात. वादळी वार्‍याने किंवा बर्‍याच वेळा निव्वळ जमीन भिजल्यामुळे ही झाडे उन्मळून पडतात किंवा मोडतात. गाड्यांवर किंवा माणसांच्या अंगावर झाडे पडल्याने माणसे मरतात किंवा जखमी होतात. आडवे पडलेले झाड काढेपर्यंत वाहतूक बंद पडते. म्हणून पर्जन्यवृक्ष, गुलमोहर, वड, पिंपळ अशी आडवीतिडवी किंवा प्रचंड वाढणारी झाडे रस्त्याशेजारी लावू नयेत. शोभिवंत, पण लहानच राहणारी झाडे उपलब्ध आहेत. तीच रस्त्याशेजारी लावावी. जुनी लावलेली झाडे कापून मर्यादित आकाराची ठेवावी.

महत्त्वाच्या इमारतींसमोर मोठे वृक्ष लावून त्यांचे सौंदर्य झाकून टाकू नये. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये रंकाळ्याच्या शेजारी शालिनी पॅलेस नावाचा सुंदर राजवाडा आहे. पिढ्यानपिढ्या चित्रकार आणि फोटोग्राफर रंकाळ्याच्या अलीकडच्या काठावरून रंकाळा आणि त्यामागील राजवाडा व आकाश अशी चित्रे आणि फोटो काढत असत. रंकाळ्यासमोरच्या बागेत त्यावेळी फक्त चार किंवा पाच फूट उंचीची फुलझाडे असल्याने शालिनी पॅलेस झाकला जात नसे. आता कोणीतरी अरसिक वृक्षप्रेमीने शालिनी पॅलेस व रंकाळा ह्यांच्यामध्ये नारळ व इतर मोठे उंच वृक्ष लावले आहेत. त्यामुळे शालिनी पॅलेसचे सौंदर्य लुप्त झाले आहे. समजा उद्या ताजमहालसमोर प्रचंड वृक्ष लावून झाकून टाकला तर कसे वाटेल? बर्‍याच वास्तूंचे सौंदर्य ती पूर्ण वास्तू लांब अंतरावरून पाहिली तरच खुलून दिसते!

तीच गोष्ट पन्हाळ्यासारख्या पयर्टन स्थळाची आहे. ह्या उंचावरील पयर्टनस्थळाभोवती फिरताना लांब अंतरावरील डोंगररांगा, दर्‍या, त्यातली झाडी, वरचे आकाश असे विहंगम दृश्य दिसणे आवश्यक आहे. नाहीतर इतक्या उंच डोंगरावर जायचेच कशाला? आता पन्हाळ्याला कड्यापर्यंत इतकी झाडे लावली आहेत की फिरताना फक्त झाडेच दिसतात. अगदी वाकडी वाट करून तटावर गेल्यासच विहंगम दृश्य दिसते.

थोडक्यात, झाडे लावताना सुरक्षितता, सोय, सौंदर्य, भूगर्भातील पाणी, गारवा, प्रदूषण व पैशांचा परिणामकारक उपयोग (कॉस्ट इफेक्टिव्हनेस) वगैरे गोष्टींचा विचार व्हावा. वृक्षप्रेमाच्या भावनेच्या पुरात वाहून जाऊ नये. गवताळ माळ, खुरटे जंगल ह्यांदेखील नैसर्गिक व पर्यावरणपूरक उत्पादकव्यवस्था (इकोसिस्टीम्स) आहेत. सर्वत्र जंगल होऊ शकत नाही. तसा हट्टाग्रह नुकसानकारक आणि निसर्गविरोधीपण असतो. पण प्रत्येक गावात जश्या आखीवरेखीव शोभिवंत बागा असतात, तशी मोठ्या झाडांना अनिर्बंध वाढू देणारी उपवने किंवा मिनी-जंगलेपण असावी.

परदेशी झाडे आणि देशी झाडे :- इंग्रजांचे किमान दीडशे वर्षे राज्य, त्यांचा जगभर संचार, त्यांची बागांबद्दलची आवड आणि वनस्पतीशास्त्रीय कुतूहल ह्यांचा परिणाम झाला व भारतात जगभरातली विविध झाडे लावली गेली आणि रुजली. त्यांचे मूळ देश मादागास्कर, द. अमेरिका, द. आफ्रिका असे होते. त्यातली बरीचशी सुदंर फुले पाने असलेली किंवा जलद वाढणारी होती. त्यांच्यावर वाढू शकणारे किडे किंवा अन्य रोग भारतात नसल्याने व आपली जनावरे त्यांना तोंड लावत नसल्याने त्या झाडांची येथे चांगली वाढ होते. गुलमोहर, जकरंडा, टॅबूबिया अशी झाडे आपल्याला रस्त्याकडेला किंवा बागांमध्ये पाहण्याची इतकी सवय झाली आहे की ती परदेशी आहेत हे कळल्यावर आश्चर्य वाटते. त्यापेक्षा जास्त आश्चर्य मिरची, पेरू, चिकू ह्या वनस्पती मुळात परदेशी आहेत हे कळल्यावर वाटते. त्यामुळे एखादी वनस्पती भारतात येऊन रुजल्यानंतर कितीशे वर्षांनी किंवा किती हजार वर्षांनी तिचा आपण देशी म्हणून स्वीकार करणार, ह्याचाही निर्णय एकदा घ्यायला हवा. गव्हाच्या व तांदळाच्या बर्‍याच जातीदेखील सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी बाहेरूनच आल्या असा पुरावा आहे!

आपण कोणती झाडे लावायची ह्याचा निर्णय आपला झाडे लावण्याचा उद्देश काय आहे व त्यासाठी कोणत्या गुणधर्माची झाडे आवश्यक आहेत ह्यांवर अवलंबून असायला हवा. काही झाडे इतक्या चढाईखोरपणे पसरतात व इतर झाडांना जगणे कठीण करून टाकतात की ती नष्ट कशी करायची हीच डोकेदुखी ठरली आहे. उदा. जलपर्णी, काँग्रेस गवत, रानमोडी, घाणेरी, वेडी बाभूळ (Prosopis juliflora) वगैरे. त्यामुळे नवीन झाडे देशात येऊ देण्यापूर्वी खूपच दक्षता घेतली पाहिजे. पण निलगिरी, सुबाभळ, जंगली सुरू, ऑस्ट्रेलियन बाभूळ, अशा जलद गतीने वाढणार्‍या व ओळखीच्या झालेल्या झाडांचा ऊर्जा वनीकरणासाठी किंवा निकृष्ट जमीन सुधारण्यासाठी किंवा देशी वनीकरण करताना सुरुवातीचा आधार (स्टार्ट सपोर्ट) म्हणून वापर करण्यास काहीच हरकत नसावी. बागेमध्ये किंवा रस्त्याकडेला योग्य गुणधर्म असलेली ओळखीची आता देशी होत आलेली परदेशी झाडे लावायला देखील काही हरकत नाही.

विदेशी झाडे ऑक्सिजन सोडत नाहीत, फार पाणी संपवतात वगैरे आरोप अशास्त्रीय आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. पक्षी विदेशी झाडांवर घरटी बांधत नाहीत हा आरोप बर्‍याच अंशी खरा आहे, पण आता हळूहळू त्यांना सवय होऊन ते ह्या झाडांवर घरटी बांधू लागले आहेत.

जंगले आणि झाडे

जंगले म्हणजे फक्त मोठे वृक्ष हे समीकरण चुकीचे आहे. जंगले म्हणजे तेथील झाडे, झुडपे, वेली, गवत, पशू, पक्षी, किडे, मुंग्या आणि वनवासी माणसेसुद्धा. हे सर्व घटक त्यांच्या जगण्यामरण्यामधून तेथील पर्यावरणाचा समतोल साधत असतात. बहुतेक वेळा बाहेरील माणसांनी शिकार किंवा अन्य काही ढवळाढवळ केल्यामुळे, पण काहीवेळा नैसर्गिक कारणांनी देखील, हा समतोल बिघडतो. त्यावेळी माणसालाच काही दुरुस्ती, व्यवस्थापन करावे लागते. उदा. सर्वत्रच मोठी झाडे वाढली, तर त्यांच्या सावलीमध्ये गवत नीट वाढत नाही. मग तृणभक्षी प्राणी कमी होतात, मग त्यांच्यावर जगणार्‍या मांसाहारी प्राण्यांची संख्या कमी होते. ह्यावर उपाय म्हणून जंगलातील काही भागातील झाडे कापून, जरूर तर जाळून, तेथे गवत वाढेल अशी दक्षता घ्यावी लागते. तसेच काही प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर जंगलाचे नुकसान होते. ह्यावर उपाय म्हणून त्या प्राण्यांच्या मर्यादित शिकारीला काही काळ परवानगी देऊन त्यांची संख्या प्रमाणात ठेवली जाते. जंगलाच्या अशा व्यवस्थापनाला निसर्गप्रेमी संस्थांनी अज्ञानाने विरोध करू नये. आफ्रिकेतील जंगलांमध्ये अशा मर्यादित शिकारीला परवानगी देण्यात येते. ह्यासाठी ‘परवानगी फी’ म्हणून मोठी रक्कम वसूल करण्यात येते व ती रक्कम तेथील रहिवाशांच्या कल्याणासाठी वापरली जाते. भारतातदेखील काही ठिकाणी हरणे, गवे, वाघ, हत्ती ह्यांची अतिसंख्या होऊन, खाद्य-पाणी मिळवण्यासाठी त्यांना जंगल अपुरे पडत आहे, व त्यामुळे जंगलाबाहेर पडावे लागत आहे, मनुष्य व वन्यप्राणी ह्यांचा संघर्ष होत आहे. त्यात दोघांचेही नु्कसान होते आहे. येथे योग्य प्रमाणात शिकारीला परवानगी देणे हाच एक उपाय आहे, पण भावनात्मक कारणांनी त्याला विरोध होत आहे.

बायोस्फिअर रिझर्व जंगलाच्या ह्या प्रकारात मात्र कोणत्याही मानवी हस्तक्षेपाला परवानगी नसते. माणसाने फक्त साक्षीदारांचे, निरीक्षणाचे, नोंदी ठेवण्याचे काम करायचे. माणूस सोडून सर्व जीवांना तेथे निर्बंधरहित जगता येते. मग तेथील परिस्थितीला योग्य तेच जगतात, बाकीचे नष्ट होतात. आपल्याकडे हजारो वर्षांपासून असलेल्या देवरायांमध्ये काही थोड्याच प्रजाती (ॲपेक्स व्हेजिटेशन) शिल्लक राहतात, जैवविविधता कमी होते! आगी, वणवे लागणे, ज्वालामुखीचे उद्रेक किंवा मानवी हस्तक्षेप (डिस्टर्बड फॉरेस्ट) ह्यांच्यामुळे जंगलातील जैवविविधता वाढतेच! सध्याची ज्वलंत समस्या असलेल्या वातावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंग ह्यांच्यामुळे बाकी निसर्गावर, झाडांवर, जंगलांवर अखेर काय परिणाम होतील, ते माणसाला कधीच कळणार नाही. कारण तोपर्यंत मनुष्यजात नष्ट झालेली असेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.