घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच

इंदौरच्या `नई दुनिया’ दैनिकामध्ये २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित सोपान जोशी ह्यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद

अगदी सामान्य भारतीय नागरिकापासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच पाण्याविषयी एक महत्त्वाचे तथ्य माहिती आहे – पाणी निर्माण करता येत नाही. आधुनिक विज्ञानाने आज कल्पनातीत प्रगती केली आहे. रेणू ज्यापासून बनलेला असतो त्या सूक्ष्म अणूला भेदून त्यातील ऊर्जादेखील आपण काढू शकतो. अनेक नवनवीन रसायनांचा शोध तर लागलेला आहे, निसर्गात न आढळणारी मूलद्रव्येसुद्धा प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहेत. आणि तरीही, पाण्याची निर्मिती काही आपण करू शकत नाही.

पाण्याचे रासायनिक सूत्र अगदी मुलांनासुद्धा ठाऊक आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांनी मिळून एचटूओ (H2O) म्हणजेच पाणी तयार होते. ही दोन्ही मूलद्रव्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ब्रह्माण्डामध्ये तीन चतुर्थांश म्हणजेच 75 टक्के भाग हायड्रोजन आहे. मुबलकतेचा विचार केला तर ऑक्सिजनचा तिसरा क्रमांक लागतो. अशाप्रकारे पाणी तयार करण्याचा कच्चा माल आपल्या चहूबाजूला पुष्कळ प्रमाणात आहे. तरीही शुद्ध पाण्याच्या कमतरतेमुळे पाणी विकणे हा एक मोठा व्यवसाय झाला आहे. या व्यवसायात पाण्याचा भाव पेट्रोलच्या भावापेक्षा जास्तसुद्धा असू शकतो. मग प्रश्न असा की हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिसळून पाणी बनवण्याचे कारखाने आजवर सुरू का झाले नाहीत?

कारण ही दोन्ही मूलद्रव्ये केवळ एकमेकांत मिसळली की काम संपले असे होत नाही. हे करण्याकरिता प्रचंड प्रमाणात स्फोटक ऊर्जा लागेल. इतके मोठे स्फोट घडवून आणले तर इतर बरेच मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळेच खूप साऱ्या प्रयोगांतीसुद्धा पाण्याचे कारखाने काही उभे राहू शकलेले नाहीत.

अंतराळातील मोठमोठ्या ताऱ्यांच्या गर्भात उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मोजमाप तर सोडाच पण एवढ्या ऊर्जासाठ्याची कल्पनासुद्धा वैज्ञानिक करू शकत नाहीत. अवकाशातील या राक्षसी ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य खूप लहान आहे. तरीही एका संपूर्ण दिवसात त्याच्याकडून मिळणारी ऊर्जा एवढी प्रचंड असते जी एका वर्षाच्या अवधीतसुद्धा आपण बनवू शकत नाही. अशाच काहीशा ऊर्जेमुळे अंतराळात हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी निर्माण झाले असेल. वैज्ञानिकांचे असेही अनुमान आहे की सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळात हे पाणी गोठलेल्या बर्फाच्या रूपात उल्कांमार्फत पृथ्वीवर आले असेल.

आज पृथ्वीवर उपलब्ध असलेले पाणी तेव्हापासून आजतागायत आपल्या ग्रहावर आहे. आज आपल्या शरीरात रक्ताच्या रूपात वाहणारे थेंब कदाचित प्राचीन काळातील डायनॉसोरच्या शरीरातदेखील होते. तेच थेंब प्राण्यांच्या लघवीवाटे आणि घामावाटे नदीतून समुद्रापर्यंत पोहोचून वाफ बनून ढगांच्या साह्याने पृथ्वीवर परततात. कदाचित तेच पाण्याचे थेंब अंटार्क्टिकावरील हिमनगामध्ये असतील आणि कधीतरी भूमध्यरेषेच्या वरच्या भागातील एखाद्या फुलावरच्या दवबिंदूच्या स्वरूपात भ्रमंती करीत असतील. तुम्ही आज सकाळी प्यायलेल्या पाण्यात घोटभर अवकाशसुद्धा मिसळलेले असेल…

पाणी आपण बनवू शकत नाही. आणि म्हणूनच त्याचा वापर अधिक जबाबदारीने करणे गरजेचे आहे. गावागावांतील, खेड्यापाड्यांतील लोकांना पाण्याच्या अवकाशातील प्रवासाविषयी माहिती असेल नसेल, पण जबाबदारीची ही शिकवण त्यांना आधीपासूनच मिळालेली होती. पाण्याच्या स्रोतांना वेगळाच मान होता. पाण्यासाठी लोक नद्यांपर्यंत आणि विहिरींपर्यंत जायचे. कृतज्ञतेचा भाव मनाशी बाळगूनच ते पाण्याचा वापर करायचे. विकासाच्या ह्या युगात पाईप्सच्या माध्यमातून जलस्रोत थेट लोकांपर्यंत पोहोचले आहेत. आजच्या समाजातील एक मोठा वर्ग नद्या-तलाव-विहिरी यांच्यापर्यंत जातच नाही. नळाच्या रूपात पाण्याचे स्रोतच त्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. आज ह्यालाच आदर्श व्यवस्था मानले जाते. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा झाला पाहिजे ह्यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे. अशी सोय कोणाला नकोशी वाटेल म्हणा! स्वस्त आणि सोयीने मिळणाऱ्या पाण्याचा खरा पेच वेगळाच आहे.

वापरलेल्या एकूण पाण्यापैकी 80 टक्के पाणी मैलापाण्याच्या रूपात गटारांमध्ये वाहून जाते. असे पाणी स्वच्छ करण्याचा प्रपंच अतिशय महागडा आहे. पाणी मिळवण्यासाठी आपण वारेमाप खर्च करायला तयार असतो. आजकाल प्रतिष्ठित घरांमध्ये पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी महागडी यंत्रे बसवलेली दिसून येतात. करोडो रुपयांच्या विशाल पाईपलाईनच्या आणि पंपिंगस्टेशनच्या मदतीने दूर प्रदेशातील पाणी खेचून आपण शहरात आणतो. परंतु मैलापाणी साफ करण्यासाठी ना नागरिकांना पैसा द्यावासा वाटतो, ना नगरपालिकांना, ना सरकारला! कृतघ्न झालेला समाज एका विचित्र अशा पेचात अडकलेला आहे…

आपण निर्माण केलेली घाण मैलापाण्याद्वारे सरळ नद्यांमध्ये किंवा भूजलामध्ये मिसळली जाते. यामुळे देशभरातील नद्या आणि तलाव म्हणजे मोठी गटारे झाली आहेत. स्वच्छता अभियानातील स्वच्छतेची किंमत ह्या जलस्रोतांनाच चुकवावी लागते. खूपशा गावांच्या आणि शहरांच्या भूजलामध्ये मलमूत्राचे कण आढळू लागले आहेत. दिवसेंदिवस ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे. दुर्दैवाने, पाण्याच्या स्रोतांचे रूपांतर गटारात झाल्यानंतरच त्यांच्या स्वच्छतेच्या चर्चा घडायला लागतात. नद्यांच्या स्वच्छतेसाठी हजारोकोटी रुपये खर्चदेखील झालेले आहेत पण नद्या स्वच्छ झालेल्या नाहीत. कारण ‘कृतघ्न’ विकासाच्या नावावर ह्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च लाखांमध्ये-कोटींमध्ये केले जात आहेत.

गंगेचे आणि दिल्लीतील यमुनेचे रूपांतर गटारात होऊन बराच काळ लोटला आहे. धरणांनी वेढलेल्या नर्मदेमधील पाणी आटले आहे. वेगवेगळ्या परंपरांच्या/ धार्मिक कार्यक्रमांच्या नावाने ह्या नद्या स्वच्छ करण्याच्या शपथा घेतल्या जातात. ह्यांच्या किनाऱ्यांवर बांधण्यात येणारे सिमेंट-कॉंक्रिटचे घाट म्हणजे विकासात्मक कार्य आणि धार्मिक यज्ञकर्म असल्याचे सांगितले जाते. जणू काही नद्यांचे नाते पूर्वीपासून जमिनीशी आणि मातीशी नव्हे तर सिमेंट-कॉंक्रिटशीच होते. ह्या नद्या नसून नालेच असावेत जणू! विकासाच्या ह्या कृतघ्न नजरांना कदाचित भगीरथ ऋषीसुद्धा ठेकेदारच वाटत असणार!

सर्वांना माहिती आहे की 30 वर्षांपासून सुरू असलेल्या नदी स्वच्छता योजना आणि त्याविषयक कार्यक्रम हे एक ढोंग आहे. मोठ्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी ‘मॉडेल’ म्हणून लहान-सहान नद्यांच्या स्वच्छतेचे नमुने सादर केले जातात. नद्यांवर इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे हा अत्यंत सोयीचा विषय आहे. विविध संस्कृतींचा उदय नद्यांच्या काठाकाठाने होत गेला तो सोयीसुविधांसाठीच! आधुनिक संशोधनानुसार असे आढळून आले आहे की नदीकाठी वस्ती करणे हे मानवी इतिहासात अगदी अलीकडेच घडून आलेले आहे. पृथ्वीवरील एकूण अस्तित्वापैकी मानवाचा बराच काळ नद्यांपासून दूर व्यतीत झाला आहे. आपल्या धार्मिक परंपराच पाहूया. आस्तिक परंपरेनुसार ऋषींचे आश्रम जंगलांमध्ये असत. नास्तिक परंपरेतील तपस्वीसुद्धा तपश्चर्या करायला जंगलांमध्येच जात असत.

समाजामध्ये नद्या-तलावांची पूजा करण्याची प्रथा तर दिसून येते. पण त्याच्या नजरा मात्र ढगाकडे रोखलेल्या आढळून येतात. राजस्थानसारख्या शुष्क प्रदेशात ढगांची अनेक नावे प्रचलित आहेत. त्यातील 40 नावांचा उल्लेख तर सामाजिक पत्रकार अनुपम मिश्र यांनी त्यांच्या पुस्तकातच केलेला आहे. समाजाला कदाचित ह्याचे ज्ञान होते की जमिनीवर उपलब्ध पाणी समुद्राकडून ढगांच्या रूपानेच आलेले आहे. गोस्वामी तुलसीदास ह्यांनी म्हटले आहे, “सरिता जल जलनिधि महुँ जाई। होई अचल जिमि जिव हरि पाई॥”

जोवर आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती तोवर स्वतःच्या विकासाला निसर्गाच्या कलांप्रमाणे मर्यादित राखणे ही समज आपल्यात होती. अमर्यादित विकासाची बेलगाम वासना तेव्हा आपल्यामध्ये नव्हती. माणूस सोयीसुविधांच्या संमोहनाखाली नव्हता. उलट गैरसोयी किंवा सुविधांचा अभावसुद्धा आपलासा करण्याचा पुरुषार्थ आपल्याकडे होता. इच्छा असेल तर आपल्या पूर्वजांकडून आजही आपण शिकू शकतो. आधुनिक विज्ञानसुद्धा हेच तर सांगते आहे. पाणी आपल्याला तयार करता येत नाही. निदान पाण्याची लूट करणे आणि ते वाया घालवणे हे तरी आपण थांबवूया!!