Original Article Link
https://amp.ft.com/content/19d90308-6858-11ea-a3c9-1fe6fedcca75
Yuvan Harari is the author of ‘Sapiens’, ‘Homo Deus’ and ‘21 Lessons for the 21st Century’
मानवजात एका जागतिक संकटाला सामोरी जात आहे. कदाचित आपल्या हयातीतील हे सर्वात मोठे संकट असेल. येत्या काही आठवड्यांत लोकांनी आणि सरकारांनी घेतलेले निर्णय, पुढील काळात जगाला कलाटणी देणारे किंवा बदल घडवून आणणारे ठरतील. त्याचा प्रभाव केवळ आरोग्यव्यवस्थेवरच नव्हे तर आपली अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती यांवरदेखील पडेल. त्यामुळे आपल्याला त्वरेने आणि निर्णायकरित्या पावले उचलली पाहिजेत. मात्र त्याचवेळी, आपल्या कृतींचा होऊ शकणारा दीर्घकालीन परिणामदेखील विचारांत घेणे आवश्यक आहे. पर्यायांची निवड करताना केवळ आता समोर असलेल्या संकटावर मात करण्याचाच नाही, तर वादळ शमल्यावर जी परिस्थिती असेल त्याचा आणि जगाचा विचार आपण केला पाहिजे. होय, हे वादळ नक्कीच ओसरेल, मानवजात टिकून राहील, आपल्यातील बरेच लोकही जिवंत राहतील – परंतु आपण राहत असलेले तेव्हाचे जग मात्र वेगळे असेल.
आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या बर्याच अल्पकालीन उपाययोजना ह्या कदाचित आपल्या उद्याच्या जीवनाचा एक घटकच बनत जातील; हेच तर आणीबाणीचे वैशिष्ट्य असते. तिच्यामुळेच तर पूर्वापार चालत आलेल्या ऐतिहासिक प्रक्रिया अधिक गतिमान होतात. सर्वसामान्य परिस्थितीत, जे निर्णय घेण्यासाठी अनेक वर्षे विचारविनिमय करण्यात घालविली असती असे निर्णय आणीबाणीच्या काळात मात्र केवळ काही तासांत घेतले जातात. इतकेच नाही तर वेळप्रसंगी पूर्ण विकसित न झालेल्या, धोकादायक तंत्रज्ञानाचाही आधार घेतला जातो. कारण तसे न केल्यास उद्भवणारे दुष्परिणाम हे त्याहीपेक्षा जास्त मोठे असतात. असे विस्तृत सामाजिक स्तरावर प्रयोग करताना संपूर्ण देशच्या देश गिनीपिगसारखे वापरले जातात. जेव्हा प्रत्येकजणच घरून कामे करतो आणि दूरस्थपणे अप्रत्यक्ष संवाद साधतो तेव्हा नक्की काय होते? जेव्हा संपूर्ण शाळा आणि विद्यापीठे ऑनलाइन चालवली जातात तेव्हा काय होते? सर्वसाधारण परिस्थितीत कोणत्याही सरकारने, आस्थापनांनी आणि शैक्षणिक संस्थांनी असे प्रयोग करण्यास सहमती दाखवली नसती. पण आताची परिस्थिती मात्र सर्वसामान्य नाही.
या संकटसमयी आपल्यासमोर दोन महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे आपल्याला ठरवावे लागेल की आपल्याला नागरिकांवर निरंकुश पाळत ठेवायची आहे की नागरिकांचे सक्षमीकरण करायचे आहे? आपल्याला दुसरी निवड राष्ट्रीय विलगीकरण आणि विश्वबंधुत्व या दोन पर्यायातून करायची आहे.
जाचक पाळत
साथीला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनीच काही मार्गदर्शक प्रणाली अंगिकारणे गरजेचे आहे आणि त्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. सरकारने लोकांवर पाळत ठेवून नियम मोडणार्यांना शिक्षा करणे हा पहिला मार्ग तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवणे हा दुसरा पर्याय. आधुनिक तंत्रज्ञानाने मानवी इतिहासामध्ये असे लक्ष ठेवणे प्रथमच शक्य झाले आहे. कारण तुम्हांला आठवत असेल की पन्नास वर्षांपूर्वी रशियाच्या सुरक्षायंत्रणेला, KGB ला २४० दशलक्ष सोव्हिएत नागरिकांवर दिवसाचे २४ तास लक्ष ठेवायची इच्छा होती, पण ते शक्य नव्हते. त्याचप्रमाणे मिळालेल्या सर्व माहितीचे प्रभावीपणे विश्लेषण करणेही जवळजवळ अशक्य होते. त्यामुळे KGB संस्था मानवी एजंट्स आणि विश्लेषकांवर विसंबून होती. परंतु प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवण्यासाठी माणूस नेमणे केवळ दिवास्वप्न होते. आज सरकारांना हाडामासांचे हेर कामाला लावण्याऐवजी, सर्वव्यापी सेन्सर आणि शक्तिशाली अल्गोरिदमवर अवलंबून राहून हवी ती माहिती मिळवणे फार कठीण राहिलेले नाही.
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात अनेक सरकारांनी जनतेवर पाळत ठेवण्याची नवीन साधने यापूर्वीच तैनात केली आहेत. चीन हे त्याचे ठळक उदाहरण आहे. लोकांच्या स्मार्टफोनवर नजर ठेवून, चेहेर्यावरुन माणूस ओळखणार्या शेकडो लक्ष्यवेधी कॅमेर्यांचा वापर करून लोकांना त्यांच्या शरीराचे तापमान आणि तब्येत ह्याचा अहवाल देण्यास त्यांनी भाग पाडले. त्यामुळे चिनी अधिकारी संशयित कोरोना विषाणूबाधितांना तर त्वरीत ओळखू शकतातच पण त्यांच्या हालचालींचा मागोवाही घेऊ शकतात. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही ओळखून काढू शकतात. आज नागरिकांना त्यांच्या निकट कोरोनाबाधित रूग्ण असण्याबद्दल सावध करणार्या अनेक मोबाईल अॅप्सची एक शृंखलाच चीनमध्ये आहे.
परंतु या प्रकारचे तंत्रज्ञान केवळ चीनपुरते मर्यादित नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अलीकडेच इस्रायल सुरक्षा एजन्सीला कोरोनाविषाणू रूग्णांचा मागोवा घेण्यासाठी, दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अधिकृत मान्यता दिली. ज्यावेळेस संसदेतील संबंधित उपसमितीने हे अधिकृत करण्यास नकार दिला; तेव्हा नेतान्याहू यांनी आणीबाणीच्या विशेष हुकमी अधिकारात ते पारित करून घेतले.
आपण असे म्हणू शकतो की या सर्व गोष्टींमध्ये नवीन काही नाही. अलिकडच्या वर्षांत, अनेक सरकारे तसेच महानगरपालिकासुद्धा लोकांचा मागोवा घेण्यासाठी, देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांना चलाखीने कह्यात ठेवण्यासाठी नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञाने वापरत आहेत. परंतु जर आपण सावधगिरी बाळगली नाही, तर असे टेहाळणी करणारे तंत्रज्ञान इतिहासाला कलाटणी देणारे ठरेल. आत्तापर्यंत ज्या देशांनी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यास विरोध केला होता त्या देशांमध्येदेखील या तंत्रज्ञानाचा वापर करणे नियमीत तर होईलच पण त्याचबरोबर पाळत ठेवण्याच्या पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल होऊन तिचे स्वरूप फक्त बाह्य निरीक्षणापुरते मर्यादित न राहाता त्याचे पर्यवसान अंतर्गत निरीक्षणात होईल.
आजपर्यंत, जेव्हा आपण बोटाने आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श करून एखाद्या लिंकवर क्लिक करत असू, तेव्हा सरकारला आपण नेमके काय क्लिक करीत आहोत हे जाणून घ्यायचे असायचे. मात्र आता, कोरोना विषाणूमुळे सरकारचे लक्ष्य बदलले आहे. सरकारला आता त्या बोटाचे तापमान आणि रक्तदाब जाणून घेण्यात जास्त स्वारस्य निर्माण झाले आहे.
आणीबाणीचे पुडिंग
पाळत ठेवण्याच्या या प्रणालीमध्ये प्रमुख अडचण अशी आहे की आपले कशाप्रकारे निरीक्षण केले जात आहे हे कोणालाही कळत नाही. त्याचप्रमाणे पुढे काय वाढून ठेवले आहे हेदेखील समजत नाही. पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने विकसित होत आहे आणि १० वर्षांपूर्वी ज्या गोष्टी आश्चर्यजनक अथवा चमत्कार वाटायच्या त्यांचे आता नाविन्य राहिले नाही. एक वैचारिक प्रयोग म्हणून असे गृहित धरा की, एखाद्या सरकारने असे ठरवले की प्रत्येक नागरिकाने दिवसाचे २४ तास शरीराचे तपमान आणि हृदयगती नियंत्रित करणारे बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे आणि मिळणारी माहिती एकत्र करून त्याचे अल्गोरिदमद्वारे विश्लेषण करावे. तुम्ही आजारी आहात हे तुम्हांला जाणवण्याच्या आधी त्या अल्गोरिदमला समजेल. तसेच तुम्ही कुठे गेला होतात आणि कोणाला भेटलात हेही त्यांना कळेल. त्यामुळे संक्रमणाची साखळी संकुचित करून रोगाला पूर्णपणे रोखले जाऊ शकते. अशी प्रणाली काही दिवसांतच ह्या महामारीला थोपवू शकेल हे वादातीत असेल. ऐकायला छान वाटते, नाही का?
परंतु ह्याची नकारात्मक बाजू अशी आहे की ह्यामुळे एका वेगळ्याच सर्वेक्षण प्रणालीला मान्यता मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हांला कळले की मी CNN लिंकऐवजी फॉक्स न्यूजवर क्लिक केले, तर त्यातून माझ्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल आणि कदाचित माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही माहिती आपोआप समजेल. परंतु मी एखादी विडियो क्लिप पाहत असताना माझ्या शरीराचे तापमान, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके यांवर काय परिणाम होतो याचे निरीक्षण होऊ लागेल अथवा मला कशाने हसू आले, कशाने रडू आले आणि मी कशामुळे भयंकर चिडलो हेही या तंत्रज्ञानाने कळू शकेल.
आनंद, संताप, कंटाळा, प्रेम ह्यासुद्धा ताप आणि खोकल्यासारख्या जीवशास्त्रीय घटना आहेत हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या तंत्राने तुम्हांला खोकला झाला आहे हे ओळखले जाते त्यानेच हसणेदेखील ओळखले जाऊ शकेल. जर कंपन्यांनी आणि सरकारांनी आपल्या सर्वांचा बायोमेट्रिक डेटा हस्तगत करणे सुरू केले तर ते आपण स्वतःला जितके ओळखतो त्यापेक्षा बरेच जास्त ओळखू शकतील. त्याचा परिपाक म्हणजे ते केवळ आपल्या भावनांचा अंदाज लावतील असे नाही तर चतुराईने आपल्या भावनांमध्ये फेरफार घडवून आणून कोणतीही वस्तू आपल्या माथी मारतील – मग ते एखादे उत्पादन असो वा राजकारणी नेता. बायोमेट्रिक मॉनिटरिंगच्या ह्या तंत्रापुढे केंब्रिज ॲनालिटिकाची डेटा हॅकिंगची युक्ती अश्मयुगीन असल्यासारखी वाटेल. कल्पना करा, २०३०मध्ये उत्तर कोरियातील प्रत्येक नागरिकाला २४ तास बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे लागत असेल आणि तेथील महान नेत्याचे भाषण ऐकत असताना जर त्या ब्रेसलेटने एखाद्या व्यक्तीत उसळलेल्या संतापाच्या लहरी टिपल्या तर त्याचे काय होईल याचा फक्त अंदाजसुद्धा थरकाप उडवतो.
बायोमेट्रिक पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान, आपण आणीबाणीच्या परिस्थितीत घेण्यात आलेली तात्पुरती उपाययोजना म्हणून निश्चितपणे मान्य करू शकतो. आपत्कालीन परिस्थिती संपली की ती निघून जाईल. परंतु तात्पुरत्या उपायांना आणीबाणी संपली तरी कायम राहण्याची एक अतिशय वाईट सवय असते, विशेषतः नवीन आणीबाणीचे संकट क्षितीजावर घोंघावत असताना. उदाहरणार्थ, इस्रायल देशाने १९४८च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी आणीबाणी जाहीर केली, ज्यामध्ये प्रेस सेन्सॉरशिप आणि जमीन जप्त करण्यापासून ते अगदी पुडिंग बनवण्याच्या विशेष नियमांपर्यंतच्या (मी तुमची मस्करी नाही करत) तात्पुरत्या उपायांचे समर्थन केले गेले. स्वातंत्र्ययुद्ध जिंकल्याला बराच काळ होऊन गेला आहे, परंतु इस्त्रायलने कधीही आणीबाणी संपल्याचे जाहीर केले नाही. आणि १९४८चे बरेच “तात्पुरते” उपाय कधी रद्द करण्यातच आले नाहीत. (सुदैवाने आणीबाणीच्या पुडिंगचे नियम मात्र २०११मध्ये दयेपोटी रद्द केले.)
जरी कोरोना विषाणूचे संक्रमण शून्यावर आले तरी काही सरकारे ही बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित रहावी म्हणून असाही युक्तिवाद करतील की यापुढे कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आहे, किंवा मध्य आफ्रिकेत इबोलाची नवीन जात उदयास येत आहे, किंवा…. लक्षात आलेच असेल ना तुमच्या? येत्या काही वर्षांत आपल्या गोपनीयतेबद्दलचा लढा आणखीन प्रखर होत जाईल. कोरोनाचे संकट हा त्याचे निर्णायक गुरुत्वकेंद्र असेल कारण लोकांना जेव्हा गोपनीयता आणि आरोग्य यांमध्ये निवड करण्याचा पर्याय दिला जाईल तेव्हा ते बहुतांश वेळा आरोग्य निवडतील.
सोप पोलिस (Soap Police)
लोकांना गोपनीयता आणि आरोग्य यांपैकी पर्याय निवडण्यास सांगणे हेच खरे समस्येचे मूळ कारण आहे. कारण ही एक चुकीची निवड आहे. आपले आरोग्य आणि त्याचबरोबर आपली गोपनीयता या दोन्ही गोष्टींचा आनंद आपण घेऊ शकतो आणि तो आपल्याला घेता यायलाच हवा. आपण नागरिकांना सक्षम बनवून आपल्या आरोग्याचे रक्षण आणि कोरोना विषाणूची महामारी थोपवणे हे दोन्ही करू शकतो. त्यासाठी नागरिकांवर निरंकुश पाळत ठेवणारी यंत्रणा निर्माण करण्याची गरज नाही. अलिकडच्या आठवड्यांत, दक्षिण कोरिया, तैवान आणि सिंगापूर यांनी कोरोना विषाणूला आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वांत यशस्वी प्रयत्नांचे आयोजन केले. हे देश जरी ट्रॅकिंग ॲपचा उपयोग करीत असले, तरी मोठ्या प्रमाणावर विस्तृत चाचणी करण्याबरोबर त्याचे खरे अहवाल देणे आणि सुजाण लोकांनी स्वखुशीने केलेले सहकार्य यांवर अधिक अवलंबून होते.
हितकारक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन लोकांकडून करून घेण्यासाठी देखरेख ठेवणारी मध्यवर्ती यंत्रणा ठेवणे आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षा ठोठावणे हे दोनच मार्ग असू शकत नाहीत. जेव्हा लोकांना वैज्ञानिक सत्य सांगण्यात येते आणि जर लोकांचा या सत्य सांगणार्या सरकारी अधिकार्यांवर गाढ विश्वास असेल तर लोक आपसूकच आपली योग्य नागरी कर्तव्ये बजावतात आणि तेदेखील कुठच्याही ‘भाई’च्या करड्या नजरेशिवाय! स्वप्रेरणा घेतलेले सुजाण नागरिक हे केव्हाही अज्ञानी आणि नियंत्रणशील जनसमुदायापेक्षा कैक पटीने अधिक शक्तीशाली व प्रभावी असतात.
साधे साबणाने हात धुण्याचेच उदाहरण घेऊ. स्वच्छतेच्या संकल्पनेतली ही सर्वात मोठी प्रगती आहे. ही साधी सोपी क्रिया दरवर्षी लाखो प्राण वाचवते. आपल्या अंगवळणी पडलेल्या या क्रियेचे महत्त्व खरेतर शास्त्रज्ञांना १९व्या शतकात लक्षात आले. पूर्वीच्या काळी, नर्सच काय तर डॉक्टर मंडळीदेखील एका शस्त्रक्रिया करून हात न धुताच दुसरी शस्त्रक्रिया करण्यास सहज जात असत. आजच्या काळात मात्र, करोडो लोक नित्यनेमाने हात धुतात ते कुणा ‘सोप पोलिस’च्या भीतीने नव्हे तर त्यांना त्यातील तथ्य कळते म्हणून. मी माझे हात साबणाने धुतो कारण मी विषाणूंबद्दल आणि जीवाणूंबद्दल ऐकले आहे आणि मला ठाऊक आहे की हे सूक्ष्म जीव विविध रोग निर्माण करतात आणि साबण या सूक्ष्म जीवांचा नाश करतो.
परंतु सांगितलेल्या गोष्टींचे पालन व पूर्ण सहकार्य ही पातळी गाठण्यासाठी विश्वास असावा लागतो. लोकांचा विज्ञानावर, सरकारी अधिकार्यांवर व माध्यमांवर विश्वास असणे गरजेचे असते. गेल्या काही वर्षांमध्ये, बेजबाबदार राजकारण्यांनी सरकारी कामकाजामध्ये तसेच माध्यमांमध्ये जाणूनबुजून विज्ञानावरच्या विश्वासाला कमी महत्त्व दिले. आता हेच बेजबाबदार राजकारणी, “लोक योग्य वागतील याचा काही भरोसा नाही” अशी मल्लिनाथी करत हुकूमशाही पद्धतीचा मार्ग अवलंबण्यास मागेपुढे बघणार नाहीत.
वर्षानुवर्षे गमावलेला विश्वास खरे तर एका रात्रीत पुन्हा प्राप्त करता येत नाही; पण ही वेळ सर्वसाधारण नाही. संकटकाळी मानसिकता चटकन बदलू शकते. अनेक वर्षे आपल्याच भावंडांशी तुमचे कडाक्याचे भांडण व कटू वाद असला तरी, एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यावर तुम्हांला त्यांच्यात अचानकपणे एक विश्वासाचा व सौहार्दाचा झरा आढळून येतो आणि तुम्ही एकमेकांच्या मदतीस धावून जाता. लोकांवरती पाळत ठेवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल, सरकारी अधिकार्यांबद्दल व माध्यमांबद्दल विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यास फार उशीर झालेला नाही. आपण नवीन तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर केला पाहिजे, परंतु या तंत्रज्ञानाने सामान्य नागरिक अधिक सक्षम व्हायला हवेत. आपल्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब यांचे इतरांनी निरीक्षण करण्यास काहीच हरकत नाही. परंतु या माहितीचा उपयोग एखादे सर्वशक्तिमान सरकार स्थापण्यासाठी होऊ नये असे वाटते. त्याऐवजी, आपल्याला चांगले वैयक्तिक पर्याय शोधण्याची तसेच सरकारला त्यांच्या निर्णयाबाबत जबाबदार धरण्याची क्षमता या माहितीच्या आधारे मिळायला हवी.
जर मला माझी स्वतःची वैद्यकीय तपासणी दिवसाचे २४ तास करता आली तर मी इतरांच्या प्रकृतीला धोका पोहचवू शकतो आहे का हे तर मला समजेलच आणि इतकेच नाही तर माझ्या प्रकृतीला माझ्या कुठल्या सवयी कारणीभूत ठरतात हेही कळेल. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दलची विश्वासार्ह आकडेवारी जर आपल्याला मिळाली तर तिचे पृथक्करण करून सरकारने प्रसारित केलेल्या माहितीचा खरेखोटेपणा, तसेच या महामारीचा सामना करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची योग्यता पारखता येईल. जेव्हा जेव्हा पाळत ठेवण्याचा विषय निघतो, त्यावेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, जसे सरकार लोकांवर पाळत ठेऊ शकते तसेच लोकसुद्धा तेच तंत्रज्ञान वापरून सरकारवर पाळत ठेऊन निरीक्षण करू शकतात.
अशाप्रकारे, कोरोना विषाणूची साथ ही नागरिकत्वाची एक सत्त्वपरीक्षा आहे. येणार्या काळात, आपण प्रत्येकाने बिनबुडाच्या षडयंत्र कहाण्या आणि स्वमग्न राजकारण्यांपेक्षा शास्त्रीय माहिती आणि तज्ज्ञ आरोग्यसेवक यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपण जर योग्य निवड करण्यात चुकलो, तर मात्र आपल्या प्रकृतीचे संरक्षण करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे असे समजून आपण आपले सर्वात मौल्यवान स्वातंत्र्य गमावून बसू.
आपल्याला एका वैश्विक योजनेची गरज आहे
आपल्याला दुसरी महत्त्वाची निवड करायची आहे ती म्हणजे राष्ट्रीय विलगीकरण आणि विश्वबंधुत्व यांमध्ये. या रोगाची साथ आणि त्यामुळे येणारे वित्तीय संकट या दोन्ही जागतिक समस्या आहेत. त्यांचे निराकरण केवळ जागतिक सहकार्यानेच सक्षमपणे करता येईल. सर्वप्रथम, या विषाणूला हरवण्यासाठी आपल्याला जागतिक स्तरावर माहितीची देवाणघेवाण करावी लागेल. या विषाणूच्या तुलनेत मानवाकडे असलेला हा सर्वात मोठा फायदेशीर गुण आहे. चीनमधील कोरोना विषाणू अमेरिकेतील आपल्या भाऊबंधाशी म्हणजेच दुसऱ्या कोरोना विषाणूशी मानवाला कसे ग्रासता येईल याची चर्चा करू शकत नाही. परंतु चीन हा देश अमेरिका या देशाला कोरोना विषाणूबद्दल आणि त्याच्याशी कसा सामना करावा याच्याबद्दल अनेक महत्त्वाचे धडे देऊ शकतो. इटलीमधील एखाद्या डॉक्टरने मिलानमध्ये सकाळी लावलेला शोध संध्याकाळपर्यन्त तेहेरानमध्ये अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ब्रिटनमधील सरकार जर विविध धोरणांच्या अमंलबजावणीमध्ये निर्णय घेऊ शकत नसेल तर महिनाभरापूर्वी अश्याच परिस्थितीचा सामना केलेल्या कोरियन्सकडून त्यांना सल्ला मिळू शकतो. परंतु हे सर्व घडून येण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार्य व विश्वास यांची गरज असेल.
येणार्या काळात, आपण प्रत्येकाने निराधार षडयंत्रांना व स्वमग्न राजकारण्यांच्या भूलथापांना बळी न पडता, वैज्ञानिक सत्ये व तज्ज्ञ आरोग्यसेवक यांच्यावर विश्वास ठेवण्याचे ठरवले पाहिजे.
प्रत्येक देशाने माहितीची देवाणघेवाण करण्याची व इतरांकडून नम्रपणे सल्ला मागण्याची तयारी दर्शवली पाहिजे, तसेच मिळालेल्या माहितीवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे, आपल्याला चाचणी संच व व्हेंटिलेटर्स यांसारख्या वैद्यकीय सामग्रीचे उत्पादन व वितरण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयास करायची गरज आहे. प्रत्येक देशाने स्वतंत्रपणे स्थानिक पातळीवर याची निर्मिती करणे आणि मिळेल त्या सामग्रीचा अनावश्यक साठा करणे यांपेक्षा जागतिक पातळीवर समन्वय केले गेले तर उत्पादन जलद गतीने होईल आणि या जीवनरक्षक उपकरणांचे वितरण सर्वांना समान पद्धतीने करता येईल. युद्धकाळात अनेक देश जसे आपल्या अत्यावश्यक उद्योगांचे राष्ट्रीयकरण करतात, तद्वतच तमाम मानवजातीने कोरोना विषाणूविरुद्ध पुकारलेल्या या युद्धात आपल्याला आपल्या महत्त्वाच्या उत्पादन उद्योगांचे ‘मानवीकरण’ करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूच्या फार थोड्या रोग्यांची संख्या असलेल्या एखाद्या प्रगत, श्रीमंत देशाने कोरोनाविषाणूच्या रोग्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या एखाद्या गरीब, अप्रगत देशाला मौल्यवान वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा स्वेच्छेने करायला हवा आणि याची जाण ठेवावी की जेव्हा त्याला स्वतःला मदतीची निकड भासेल त्यावेळेस इतर राष्ट्रे त्याच्या सहाय्यास धावून येतील.
वैद्यकीय कर्मचार्यांचेही जागतिक स्तरावर एकत्रीकरण करण्याबद्दलदेखील आपल्याला विचार करावा लागेल. जे देश सध्या तुलनेने कमी ग्रासले गेलेत ते त्यांच्या वैद्यकीय कर्मचार्यांना तीव्रपणे प्रभावित झालेल्या जगाच्या इतर प्रदेशात पाठवू शकतात. त्यातून त्या प्रदेशांना त्यांच्या संकटकाळी मदत तर होईलच तसेच त्या कर्मचार्यांना मौलिक अनुभवदेखील मिळवता येतील.
आर्थिक आघाडीवरदेखील जागतिक सहकार्याची गरज आहे. अर्थकारणाचे व वितरण साखळ्यांचे जागतिक स्वरूप लक्षात घेता, जर प्रत्येक सरकार इतरांची तमा न बाळगता स्वतंत्रपणे काम करू लागले, तर त्यातून अनागोंदी आणि वाढत जाणार्या समस्या उद्भवू शकतात. आपल्याला त्वरित एका जागतिक कृतीयोजनेची गरज आहे.
आणखी एक आवश्यक बाब म्हणजे प्रवासाबद्दल जागतिक करार होणे. सर्वच आंतरराष्ट्रीय प्रवास अनेक महिन्यांसाठी स्थगित केला तर सर्वांना प्रचंड त्रास तर होईलच तसेच या कोरोना विषाणूविरुद्ध पुकारलेल्या युद्धात अडथळा निर्माण होईल. जगातील सर्व राष्ट्रांमध्ये सहकार्य व सामंजस्य होऊन त्यांनी किमान आवश्यक असलेल्या काही निवडक लोकांना – शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, पत्रकार, राजकारणी, व्यावसायिक, इत्यादिंना तरी प्रवास करण्याची व आंतरदेशीय सीमा ओलांडायची अनुमती द्यायला हवी. प्रवाशांच्या त्यांच्याच देशामध्ये स्क्रीनिंग चाचण्या घेण्याबद्दल जागतिक करार झाला तर हे साध्य होऊ शकते. कडक चाचणी केलेलेच प्रवासी एखाद्या विमानात बसवले गेलेत याबद्दल तुम्हांला खात्री असेल तरच तुम्ही त्यांना आपल्या देशात प्रवेश करून द्यायला जास्त इच्छुक असाल.
दुर्दैवाने, सध्या यांतील कुठलीही गोष्ट कुठलाच देश करत नाही आहे. आंतरराष्ट्रीय जनसमुदायाला जणू एखादा सामूहिक पक्षाघात झालेला आहे. प्रगल्भ विचार करणार्या प्रौढांची वानवा आहे. खरं तर एव्हाना सर्व प्रमुख जागतिक नेते एकत्र येऊन एक आणीबाणीची बैठक व्हायला हवी होती की ज्यातून एक सामायिक कृतीयोजना आखली जाईल. परंतु या आठवड्यात झालेल्या जी-७ नेत्यांच्या एका व्हिडिओ परिषदेपलीकडे आणखी काहीच झाले नाही आणि त्या परिषदेमध्येदेखील अशी काही योजना बनवली गेली नाही.
पूर्वी येऊन गेलेल्या जागतिक संकटांच्या काळात – उदाहरणार्थ २००८ची आर्थिक मंदी व २०१४मध्ये आलेली इबोला ची साथ – अमेरिकेने स्वतःला जागतिक नेत्याच्या भूमिकेत बसवले. मात्र सध्याच्या अमेरिकन प्रशासनाने या नेतृत्वाच्या भूमिकेचा त्याग केला आहे. मानवतेच्या भविष्यापेक्षा अमेरिकेच्या महत्तेची आपल्याला जास्त काळजी आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रशासनाने आपल्या सर्वांत जवळच्या सहयोग्यांनादेखील वार्यावर सोडून दिले आहे. जेव्हा त्यांनी युरोपमधून येणार्या प्रवाशांवर संपूर्ण निर्बंध आणले तेव्हा त्यांनी युरोपिय देशांना एक साधी आगाऊ सूचनाही केली नाही – त्यांच्याशी या कठोर निर्णयाबाबत चर्चा करणे तर दूरच. एका जर्मन औषध कंपनीला कोविद-१९च्या नवीन लस निर्मितीसाठीचे एकाधिकार विकत घेण्याकरिता १ बिलियन डॉलर्सचे आमीष देऊ करून या प्रशासनाने जर्मनीमध्ये खळबळ उडवून दिली होती. आत्ताच्या प्रशासनाने मार्ग बदलून जरी एखादी जागतिक कृतीयोजना अंमलात आणायचे ठरवले तरी फार थोडे लोक या नेत्याचे अनुकरण करतील. कारण हा नेता बेजबाबदार व आपल्या चुकांचा स्वीकार न करणारा तर आहेच पण त्याच बरोबरीने सर्व श्रेय स्वतःच लाटणारा व नेहेमी फक्त दुसर्यांनाच दोष देणारा आहे.
अमेरिकेने निर्माण केलेली ही पोकळी जर इतर देशांनी भरून काढली नाही तर ही रोगाची साथ थांबवणे अधिक कठीण तर होत जाईलच पण याचा वारसा पुढे अनेक वर्षे असाच चालू राहून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विष कालवण्याचे काम करीत राहील. तरीही, प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते. आपण आशा करूया की या रोगराईमुळे मानवजातीला जागतिक मतभेदांचे गंभीर धोके लक्षात येतील. मानवतेला एक निवड करायची आहे. आपण मतभेद आणि बेबनाव यांच्या अधोगतीकडे नेणार्या मार्गाने जायचे की आपण जागतिक एकात्मतेचा मार्ग अंगिकारायचा? आपण मतभेदांचा मार्ग निवडला तर या संकटातून मुक्ती मिळवणे लांबणीवर तर जाईलच, परंतु भविष्यात याहूनही भयंकर अरिष्टे आपल्यावर येऊ शकतील. परंतु आपण जर जागतिक एकात्मतेचा मार्ग निवडला, तर तो केवळ कोरोना विषाणूवर मिळवलेला विजयच नसेल तर २१व्या शतकात मानवजातीवर येणार्या अनेक संभाव्य रोगांवर आणि संकटांवर मिळवलेला तो विजय असेल.
अनुवादक : यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com