पर्यावरणीय दृष्टिकोणातून कोविडजन्य स्थिती (भाग ३)

भाग ३ : इकॉलॉजी, विषाणू आणि आरोग्य

करोना विषाणूची उत्पत्ती आणि रोगाचा प्रसार बघता पर्यावरणाचे आणि जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. कसे ते समजून घेऊ. करोनासारखे विषाणू प्राण्यांकडून माणसाकडे संक्रमित (Zoonotic) होतात. जगातील ६०% साथीचे रोग हे प्राण्यांकडून येतात. यातले ७२% जंगली प्राण्यांकडून येतात. हे प्रमाण गेल्या शतकात बरेच वाढलेले दिसते. सार्स, मर्स, इबोला, निपा, झिका, एच.आय.व्ही. ही सगळी अशीच पिल्लावळ. साहजिक प्रश्न येतो की हे सगळे जीव माणसाच्या आरोग्यासाठी कधी, कुठे, केव्हा, कसे आणि का घातक ठरत आहेत? ह्याची उत्तरे म्हणजेच विषाणूची आणि रोगाची इकॉलॉजी. जागतिकीकरणाच्या युगात संसर्ग थांबविता येणे कठीण आहे परंतु असे विषाणू तयार होऊ नयेत, किंवा झाले तरी यातून टोकाचे संसर्ग होऊ नयेत, किंवा संसर्ग झाले तरी रोगाचे नियंत्रण करता यावे अशा विविध पातळींवर काम करता येणे शक्य आहे असे अनेक तज्ज्ञ म्हणत आहेत.

सुरुवातीला आपण कोविड-१९ हा रोग करोना विषाणूपासून नक्की कसा पसरतो आहे, त्याचे जीवशास्त्र, उत्पत्ती, होस्ट-विषाणू यांच्यातल्या परस्परक्रिया इत्यादी गोष्टी थोडक्यात जाणून घेऊ. ‘करोना’ हे बोलीभाषेतील नाव आहे. त्याचे पूर्ण नाव ‘सार्स कोवी – २’ (SARS CoV – 2 = SARS Corona Virus – 2) असे आहे. यामुळे होणारा रोग म्हणजे ‘कोविड-१९’ – CoViD-19 म्हणजे Corona Virus Disease 2019 याचे संक्षिप्त रूप. ह्या विषाणूचा आकार साधारण बोथट काटेरी चेंडूप्रमाणे आहे. सूर्याच्या सर्व बाजूंना फाकणाऱ्या किरणांना Corona म्हणतात त्यावरून याचे नाव आले. कोणताही विषाणू म्हणजे केवळ प्रथिनाच्या आवरणांतर्गत असणारी जनुके! (RNA किंवा DNA, करोनात केवळ RNA आहे). सजीव आणि निर्जीवाच्या सीमारेषेवरचा एक जीव. तो स्वतःहून पुनरुत्पादित होऊ शकत नाही. पुनरुत्पादन करण्यासाठी त्याला होस्ट म्हणजेच यजमान गाठावा लागतो. पण अशा पाहुण्याला कोण घरात घेणार? त्यामुळे यजमानाने आपल्या शरीरातल्या बहुसंख्य पेशींवर प्रथिनयुक्त कुलुपे लावलेली असतात. हीच कुलुपे उघडण्यासाठी विषाणू त्यावर चपखल बसतील अश्या किल्ल्या तयार करतो. यांना अँटीजेन, मराठीत प्रतिजन, म्हणतात. आपल्या नव्या करोना विषाणूवर हे जे किरणांसारखे स्पाईक आहेत, त्यांच्यावरच्या टोप्या म्हणजे ‘पेप्लोमर’ नामक एक प्रोटीन आहे.

ह्या आहेत किल्ल्या, मानवी शरीरातील पेशींवर स्वार होऊन ते कुलूप उघडण्यासाठी. एकदा ह्या किल्लीला कुलूप सापडले की विषाणूचे आवरण आणि यजमानपेशीचे आवरण एकमेकांशी संयोग पावतात. यजमानपेशीला हा विषाणू म्हणजे अन्न किंवा तत्सम घटक वाटून ती त्याला नेहमीच्या प्रक्रियेने आत घेते. आत शिरल्यावर पेशीतल्या काही एन्झाइम्समुळे विषाणूचा कोट विरघळतो. त्यातली न्यूक्लिक सामग्री लगेचच केंद्रकाचा ताबा घेते. यजमानपेशीची शत्रूला ताब्यात घेण्याची सर्व शस्त्रे वा यंत्रणा निकामी केल्या जातात. किंवा त्यांना विशिष्ट संदेश पाठवून स्वतःच्या कामाला लावले जाते. विषाणूचा आर.एन.ए. स्वतःच्या प्रती काढायला सुरुवात करतो. एम-आर.एन.ए. म्हणजेच मेसेंजर आर.एन.ए. बनविला जातो आणि तो पेशीतल्या इतर प्रथिने बनविणाऱ्या रायबोझोम्स, गोल्गी अशा घटकांना अपहृत करतो. यापुढे जी प्रथिने बनतात ती नवीन विषाणू बनविण्यासाठी वापरली जातात. प्रथिने आणि आर.एन.ए.च्या प्रती यांपासून नवनवीन विषाणू बनत राहतात. आणि पेशीबाहेर पडून इतर नवनव्या पेशींना ताब्यात घेणे सुरू राहते. संसर्ग वाढत जातो. दरम्यानच्या काळात यजमानपेशीची नेहमीची कार्ये बंद पडतात. नेहमीची शस्त्रेही नाकामी झाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय हे पण पटकन समजून घेऊ. आपल्या शरीरात किंवा रक्तात ५-७ प्रकारच्या विशिष्ट पेशी असतात, ज्या शरीरात शिरणाऱ्या कोणत्याही घटकांवर हल्ला चढवतात आणि त्यांना निकामी करतात किंवा मारून टाकतात. न्युट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, लिम्फोसाईट्स, मोनोसाईट्स अश्या या विविध पेशी. यांत अजून उप-प्रकारदेखील आहेत.ही नावे आपण रक्ततपासणीच्या रिपोर्टमध्ये वाचली असतील. हे कोणत्याही परजीवाला चक्क सर्व बाजूंनी वेढतात, मारतात, खाऊन टाकतात, पचवतात. प्रत्येकाची रणनीती काही अंशी वेगवेगळी आहे. आणि सगळ्यांचा कार्यभाग महत्त्वाचा आहे. परंतु येथे आपण यातल्या लिम्फोसाईट्सचा उप-प्रकार असलेल्या बी पेशींचा रोल समजून घेऊ. ह्या पेशी प्रतिपिंड (ॲंटीबॉडीज्‌) तयार करतात. ॲंटीबॉडीज्‌ टेस्ट हा शब्द सध्या मोठ्या प्रमाणात वापरला जातो आहे. ॲंटीबॉडीज्‌ म्हणजे काय, तर ॲंटीजेनवर म्हणजेच विषाणूच्या किल्लीवर चपखल बसणारी कुलुपे, केवळ कुलुपे. ही कुलुपे या विषाणूच्या किल्ल्यांवर स्वार होऊन ती निकामी करतात. निकामी झालेल्या किल्ल्या वापरून विषाणूंना पेशीत घुसता येत नाही आणि संसर्ग होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे असे आपण म्हणतो त्याच्या शरीरात ह्या ॲंटीबॉडीज्‌ इतर सर्व यंत्रणेसह उत्तम काम करत असतात. या बी पेशी अजून एक महत्त्वाची क्रिया करतात म्हणजे शत्रू आला आहे असा संदेश त्या काही रसायनांच्या रूपाने पेशीच्या बाहेर पाठवतात. यामुळे इतर पेशी सतर्क होतात आणि विषाणू घुसला तरी त्याचे फार काही चालत नाही. परंतु या दरम्यान या रसायनांमुळे आपल्या शरीरचे तापमान वाढते, किंवा एक ना अनेक शारीरिक बदल दिसू लागतात. हळूहळू आजार बरा होतो. आणि या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही बी पेशी या परजीवाचा ठसा साठवून ठेवतात, भविष्यात ओळखता यावा म्हणून. त्यांना मेमरी पेशी असेच म्हणतात. त्या ठशाशी जुळणारा कोणताही परजीव भविष्यात पुन्हा शरीरात शिरला तर ह्या स्मृतीच्या आधारे त्याला लगेच ओळखले जाते आणि त्याने पेशीत घुसायच्या आत रोगप्रतिकारकशक्ती कार्यरत होते.

परंतु करोनासारखे काही विषाणू ह्या प्रतिकारकशक्तीला पुरून उरतात. आणि मनुष्य मृत्यूकडे खेचला जातो. अर्थात लागण होणारे सगळेच मरतात असे नाही. काहींची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम काम करते. बरोबरीने विषाणूची उत्क्रांती होते आणि यातून समाजाची सामूहिक रोगप्रतिकारकशक्ती (Herd / Social Immunity) वाढत राहते. ही शक्ती कशी वाढते तेही आपण समजून घेऊ. गुणबदल किंवा उत्परिवर्तनाच्या (Mutation) प्रक्रियेतून एखाद्या विषाणूचे ‘कमी विषारी’ (less virulent) ते ‘जास्त विषारी’ (more virulent) असे आणि अधले मधले विविध प्रकार (strains) तयार होत राहतात. गुणबदल म्हणजे काय, तर नवीन विषाणूच्या प्रती तयार होण्यामधल्या चुका. ज्या चुका दुरुस्त करता येत नाहीत. जसे माणसात जन्मतः काही व्यंग तयार होणे. यातल्या ‘अधिक विषारी’ची लागण झाली तर माणूस मृत्यूकडे खेचला जाणार हे आपण पाहिलेच परंतु ‘कमी विषारी’ विषाणूची लागण माणसाला टोकाचे आजारी करत नाही. कारण आपली रोगप्रतिकारकशक्ती त्यांच्यावर उत्तम काम करते आणि आपण त्यापासून सुरक्षित (immune) होतो. ही माणसे लक्षणविरहित राहतात. त्यामुळे त्यांना लागण झाली आहे हे लक्षातदेखील येत नाही. अशी अनेक माणसे समाजात असू शकतात. हे सगळेच लक्षणविरहित वाहक (asymptomatic carrier) बनतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांना या ‘कमी विषारी’ विषाणूची लागण होत राहते. भविष्यात ‘अधिक विषारी’ विषाणू जरी शरीरात शिरला तरी मेमरी पेशी अनुभवाने सज्ज राहतात. रोगप्रतिकारकशक्ती व्यवस्थित काम करते आणि आजार बळावत नाही आणि समाजात त्याचे प्रमाण अत्यल्प राहते. अश्या पद्धतीने काम करणारी सामूहिक रोगप्रतिकारकशक्ती हा निसर्गानेच योजलेला उपाय आहे. उत्क्रांतीतील नैसर्गिक निवड बघतादेखील ‘कमी विषारी’ विषाणू ‘अधिक विषारी’ला मागे टाकणार. कारण यजमानाला मारून टाकून स्वतः संपण्यापेक्षा यजमानाला जिवंत ठेवून, स्वतः दीर्घकाळ अस्तित्वात राहणे हीच पद्धत पुढे जाणार. परंतु विषाणू हे जाणीवपूर्वक करत नसल्याने ह्याचा वेग मंद किंवा नैसर्गिक राहतो.

मेमरी पेशींना आधीच कामाला लावले तर त्या तयार राहू शकतात आणि विषाणूला निष्प्रभ करू शकतात. हीच गोष्ट साधली जाते ‘लस’ अर्थात वॅक्सिनच्या माध्यमातून. लस म्हणजे प्रयोगशाळेत निकामी केलेले विषाणू. शरीरात अशा विषाणूंच्या केवळ किल्ल्या पाठवल्या जातात. प्रत्यक्षात ते विषाणू निरुपद्रवी असतात; परंतु बी पेशी मात्र त्यांना शत्रू समजून ॲंटीबॉडीज्‌ तयार करायला सुरुवात करतात. परिणामी संसर्ग न होता रोगप्रतिकारकशक्ती सुसज्ज होते आणि प्रत्यक्ष विषाणू शरीरात शिरला तरी त्याला तत्काळ निष्प्रभ केले जाते. समाजातील बहुतांश लोकांनी लस घेतली तर समाजाचीसामूहिक रोगप्रतिकारकशक्ती तयार होते आणि विषाणूपासून होणारे आजार दूर राहतात. तर आपल्या नवीन विषाणूसाठी अशी ही लस बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अर्थात लस तयार झाली तरी या विषाणूच्या गुणबदलांमुळे उद्भवणाऱ्या सर्वच उप-प्रकारांवर ती काम करेल असे नाही. त्यामुळे एक तर अशी लस दर काही काळाने बदलत राहावी लागेल. किंवा आपण फ्लू, मलेरिया या परिचित ‘व्हायरल’ रोगांसोबत जगत आहोत तसे जगावे लागेल. विषाणू सौम्य होत आहे हे आपण पाहिलेच. त्यामुळे बहुतांश लोकांना मरणाची भीती नाही असे अनेक शास्त्रज्ञ सांगत आहेत. ‘काळजी घेत’ आयुष्य सुरू ठेवणे आपल्या हातात आहे.

इकॉलॉजी आणि विविधतेचे महत्त्व

हे विषाणू वटवाघळे, उंदीर, माकड किंवा काही पक्ष्यांमध्ये असतात. यातले काही विषाणूला बळी पडतात, पण सामूहिक पातळीवर त्या परजीवांशी त्या त्या प्राण्याने जुळवून घेतलेले असते. अशा प्राण्यांना रिझर्वोयर (reservoir) जाती – नैसर्गिक साठा असणाऱ्या जाती असे म्हटले जाते. ह्या जाती आणि हे विषाणू एकमेकांबरोबर सह-उत्क्रांत (co-evolution) झालेले असतात. परंतु बरेचदा हा विषाणू थेट माणसाला संसर्ग करू शकत नाही. तो एका वेगळ्या प्राण्यात शिरतो. याला स्पिल ओवर (spill over) म्हणतात. कारण यानंतर पुढे या नवीन प्राण्यात होणार्‍या गुणबदलामुळे तो माणसाला संसर्गकारक आणि हानिकारक ठरतो. विद्यमान करोना विषाणू वूहानमधल्या एका वटवाघळाकडून पाळीव प्राण्यात संक्रमित झाला अशी एक शक्यता वर्तविली जाते आहे. परंतु त्याला कोणताही पुरावा नाही. कारण या वटवाघळातील विषाणूची जनुके विद्यमान करोनाशी ९४% तर जुळतात; परंतु त्याचे स्पाइक प्रोटीन म्हणजेच ॲंटीजेन म्हणजेच पेशीत घुसण्याची किल्ली वेगळी आहे. माणसाच्या शरीरात घुसू शकणारे ॲंटीजेन हे मध्यस्थ प्राण्यात तयार होते. नेमकी ही स्पिल ओवरची घटनाच माणसाने नियंत्रणात ठेवावी अशी आहे. हे नेमके ॲंटीजेन कोणात आणि कसे तयार होते हे समजून घेणे प्रतिबंधात्मक उपायांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा स्पिल ओवर नक्की कशामुळे होतो हे खात्रीने सांगणे अवघड दिसते. परंतु बहुतेक शास्त्रज्ञ त्याचा संबंध बदलत्या इकॉलॉजीशी लावत आहेत. जंगलामध्ये किंवा संरक्षित परिसंस्थेमध्ये साधारण एकसारखी परिस्थिती असल्याने स्पिल ओवर मर्यादित स्वरूपात राहतो. परंतु जमीन वापर बदलला तर वेगळी नवीन परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, जंगले कापून खाणी केल्या किंवा प्राण्यांची पैदास केली किंवा व्यापारी लागवड केली की विविध जंगली जाती (biodiversity), त्यांची संख्या, घनता यांवर मोठा परिणाम होतो आणि नवीन परिस्थिती निर्माण होते. नवीन परिस्थिती म्हणजेच विषाणूंना गुणबदलाची आणि पर्यायाने स्पिल ओवरची संधी मिळते आणि नवीन यजमान मिळाला की त्यांचा गुणाकार सुरू होतो. हा यजमान एकच प्रकारचा जीव असेल तर विषाणूचे काम अधिक सोपे होते. येथे संख्या महत्त्वाची आहे. जितकी ‘एका’च प्राण्याची संख्या जास्त, तितका विषाणूचा गुणाकार वेगाने व्हायला आणि गुणबदलाला अधिक वाव मिळतो. डार्विनच्या ‘नैसर्गिक निवडी’च्या सिद्धांतानुसार विषाणू ‘अधिकाधिक यशस्वी’ होण्यात भर पडते. यातूनच काही अधिक विषारी संसर्गकारक फेनोटाईप (phenotype) तयार होतात असे अनुवंशशास्त्र सांगते. यावरून एका प्रकारच्या प्राण्यांची संख्या आणि घनता जितकी जास्त, तेवढी संसर्ग होण्याची शक्यता किंवा संवेदनशीलता (susceptibility) वाढते. नैसर्गिक परिसंस्थांची घडी मोडून किंवा त्या जागी मोनोकल्चर आणून आपण अशा संवेदनशील प्राण्यांमध्ये भर घालतो.

शेतीत किडीच्या बाबतीत जे घडते तेच येथेही घडते. एखाद्या शेतात अनेक पिके असतील तर विविध प्रकारचे कीटक दिसतात. कोणाही एकाला भरपूर खाद्य नसल्याने कोणाचीही संख्या खूप जास्त वाढत नाही. वाढली तरी विविधतेपैकी एखाद्याच पिकाला धोका निर्माण होतो. परंतु अख्ख्या शेतात जर एकच पीक असेल तर किडीला भरपूर खाद्य मिळते आणि संपूर्ण शेताचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर जंगलात राहणारे आदिवासी वर्षानुवर्षे जंगली प्राण्यांच्या म्हणजेच विषाणू बाळगणाऱ्या रिझर्वोयर जातींच्या सहवासाने सुरक्षित (immune) होतात का हा संशोधनाचा विषय असू शकतो.

या चढाओढीमध्ये सामूहिक रोगप्रतिकारकशक्ती वाढणे – वाढवणे शक्य असले तरी धोका असणाऱ्या विषाणूंची उत्पत्ती शोधणे, प्रसारातल्या पायऱ्या शोधणे आणि त्या टाळणे हे माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. वरील सर्व इकॉलॉजी बघता संभाव्य विषाणूंना असे मध्यस्थ उपलब्ध करून देणे म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ म्हणण्यासारखे आहे. जंगले कापून तेथे पाळीव जनावरांची औद्योगिक पातळीवर पैदास करणे हे म्हणजे भविष्यातील अशा सर्व विषाणूंना आमंत्रण देण्यासारखे आहे. प्राणी खाणारे लोक ह्या स्पिल ओवरची शक्यता वाढवत आहेत असे म्हटले जात आहे. परंतु हे केवळ प्राणी खाणारे लोकच करत आहेत असे नाही. हे थेट उदाहरण झाले. परंतु, आपण जर कोणतेही औद्योगिक उत्पादन वापरत असू, उदाहरणार्थ स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, तर आपणदेखील अप्रत्यक्षरीत्या ह्या विषाणूला आमंत्रण देत आहोत. कारण ही उपकरणे बनविण्यासाठी लागणारे बरेचसे साहित्य खाणींमधून उपसून काढावे लागते. जसे की धातू, कोलटनसारखे दुर्मिळ धातू संयुग, तांबे, निकेल, चांदी, कोबाल्ट, इत्यादी. यातल्या बहुतांश कच्च्या मालाच्या खाणी जंगलात आहेत. तेथे औद्योगिकीकरणाला सुरुवात म्हणजे आधीचे जंगल हटवून अधिवास नष्ट करणे. जमीनवापर बदलला की विविध जंगली जाती, त्यांची संख्या, घनता यावर मोठा परिणाम होतो. जीविधता कमी झाली की रिझर्वोयर जाती पण कमी होतात. पुन्हा नवी परिस्थिती, अर्थात विषाणूंसाठी गुणबदलाची आणि पर्यायाने स्पिल ओवरची संधी! नवीन यजमान मिळाला की त्यांचा गुणाकार सुरू झालाच समजा. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या निवडीचा सजगतेने विचार करायला हवा. आपण काय खातो, काय पितो, काय वापरतो, ते कुठून येते, त्याचा निसर्गावर काय परिणाम झाला इत्यादी प्रश्न विचारणे जबाबदारीचे आहे. गेल्या शंभर वर्षांचा विचार करता साथींमधील मनुष्यहानी कमी झाली असेलही मात्र अश्या साथी येण्याची वारंवारिता पूर्वीपेक्षा वाढली आहे.

ह्याचा ताळमेळ औद्योगिकीकरणाशी आणि बदलत्या जीवनशैलीशी सहजच लावता येतो. तसेच लोकसंख्येशीदेखील! परंतु केवळ लोकसंख्येपेक्षा वाढती लोकसंख्या आणि वाढते उपभोग यांचा गुणाकार निसर्गावरचा ताण वाढवत आहे. पृथ्वीवरील काही लोक आदिवासी जीवनशैलीने जगतात. त्यांचा निसर्गावरील ताण अगदीच कमी आणि मर्यादित असतो. याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे अत्यंत उच्चभ्रू युरोपियन-अमेरिकन जीवनशैली जगणारे लोक आदिवासी माणसापेक्षा हजारो पटीने जास्त संसाधने वापरतात. या दोन टोकांच्या अधे-मधे कुठे ना कुठे आपल्यापैकी प्रत्येक जण चपखल बसतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येकालाच आकांक्षांच्या पायऱ्या चढून दुसरे टोक गाठायचे आहे. जगातील असा सगळा ओघ बघता अनेक गोष्टी उलट्या फिरवणे अवघड आहे. लोकसंख्यावाढीचा दर जरी आटोक्यात ठेवू शकलो तरी उपभोग कमी होतील अशी शक्यता दिसत नाही.उदाहरणार्थ,स्मार्टफोनसारख्या साधनांचा वापर थांबवणे जवळजवळ अशक्यप्राय आहे. संसाधने वापरूनच संसाधने कमी वापरण्याचा संदेश लोकांना देणे हा मोठाच अंतर्विरोध आहे आणि तो दूर करणे कठीण आहे. तो केवळ कमी करता येणे शक्य आहे. औद्योगिकीकरणावर अनेक मजुरांच्या किंबहुना समाजातील मोठ्या भागाच्या उपजीविका अवलंबून आहेत हे नाकारता येणार नाही. या परिस्थितीत संसाधनांचा वापर जबाबदारीने करणे आणि उपसा पूर्ण झाल्यावर त्या नैसर्गिक संस्था पूर्वस्थितीत आणणे एवढेच शक्य होऊ शकते. दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संसाधनांचा वापर केवळ गरजेच्या वस्तूंसाठी जबाबदारीने आणि काटकसरीने केला तर निसर्गाची जी टोकाची हानी होते आहे ती कमी करणे शक्य आहे. परंतु ‘गरजेच्या’, ‘काटकसरीने’ ह्या संज्ञा तौलनिक आहेत. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीनुसार त्या बदलतात. गरज म्हणजे नक्की काय, कुठे थांबते, याचे सर्वांना सामाईकपणे वापरता येईल असे लिखित प्रमाण नाही. सरकारचे याबाबतीत काही धोरण नाही. धोरण सोडाच, पण या दिशेने विचारही नाही. यामुळे संसाधनांचा वापर नियंत्रित राहणेदेखील कठीण दिसते. मग राहतो केवळ पुनरुज्जीवनाचा मार्ग! संसाधनांचा उपसा, वापर पूर्ण झाल्यावर नैसर्गिक प्रदेश पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू करणे. हे करता करता जो अवधी मिळेल त्यात वर उल्लेख केलेल्या इकॉनॉमीतील स्थित्यंतराचे नियोजन करता येऊ शकेल. थोडक्यात सांगायचे तर उत्पादन जबाबदार असणे, उत्पादनाचा कार्बन-फूटप्रिंट आणि जल-फूटप्रिंट कमीत कमी ठेवणे, चैनीच्या विविध वस्तूंचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात नियंत्रित करणे, परदेशातील पुरवठा यंत्रणांवरचे अवलंबित्व हळूहळू कमी करणे, बरोबरीने स्थानिक संसाधनांच्या वापरावर आणि उत्पादनावर भर देणे, स्थानिक ऊर्जास्रोतांना किंवा कमीत कमी कार्बन फूटप्रिंट असणाऱ्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य देणे, चक्रीय (circular) इकॉनॉमी कार्यरत करणे, वस्तूंऐवजी सेवा विकणे (सर्विटायझेशन ऑफ प्रॉडक्ट्स), उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील पारदर्शकता वाढवणे, त्यांच्यातील माहितीचा असमतोल काढून टाकणे इत्यादी पद्धती वापरून औद्योगिकीकरणाला आणि वाढत्या लोकसंख्येच्या उपभोगांना निसर्गस्नेही मार्ग दाखवणे शक्य आहे.

जेव्हा जेव्हा लोकसंख्येचा विस्फोट होतो तेव्हा निसर्ग ती जाती आपसूक आटोक्यात ठेवतो, ते विषाणू – जीवाणूंच्याच जोरावर. उदाहरणार्थ, एकाच प्रकारचे कीटक मोठ्या प्रमाणत वाढले की ते काही दिवसांत कमी होतात. कारण जास्त संख्येमुळे विषाणू सक्रिय होतो, अधिकाधिक विषारी होत जाऊन संख्या आटोक्यात ठेवतो. (या संपूर्ण लेखात जरी विषाणू असे करतो, तसे करतो अशी भाषा वापरली असली तरी तो स्वतःहून काहीही करत नाही. ह्या प्रक्रिया उत्क्रांतीच्या ओघात घडत असतात.) अर्थात मानवजातीची लोकसंख्या जास्त असली म्हणून काही हा विषाणू तिला संपवू शकणार नाही. याचे कारण आपल्या वर्तनातील वेगवेगळेपणा (behaviour heterogeneity). प्रत्येक माणूस किंवा माणसांचा समूह ह्या विषाणूशी वेगवेगळ्या प्रकारे टक्कर देतो. प्रत्येक देश, समूह विविध प्रकारे त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. शिवाय विषाणूच्या उत्क्रांतीमुळे विषारीपणा कमी होतो हे आपण पाहिलेच. परंतु हीच गोष्ट जेव्हा जंगलातल्या एखाद्या कीटकाबाबत घडते तेव्हा मात्र ते सगळे त्या विषाणूशी जवळजवळ एका प्रकारेच सामोरे जातात, त्यामुळे विषाणूचे काम सोपे होते आणि तो जिंकतो. माणसाला मात्र कार्यक्षम संपर्क, वर्तन, तंत्रज्ञान इत्यादीच्या हाय्याने टोकाची हानी होण्यापासून बचाव करणे शक्य आहे. आपण sapiens sapiens आहोत!

बदलती जीवनशैली, वाढते शहरीकरण – घटती जीविधता आणि रोगप्रतिकारक शक्ती

शहरीकरण वाढते आहे त्यामुळे रानवा असलेले जीविधतायुक्त प्रदेश आता नाहीसे होत आहेत. जीवनशैलीदेखील बदलते आहे. या दोहोंचा परिणाम रोगप्रतिकारकशक्तीवर होतो आहे. यात शरीरातले ‘आंतरिक पर्यावरण’ आणि ‘बाह्य पर्यावरण’ असे दोन्ही महत्त्वाचे आहेत. वैद्यकीय आरोग्यक्षेत्रात आंतरिक पर्यावरणाचे महत्त्व विविध सिद्धांतांतून मांडले गेले आहे जसे की – ‘स्वच्छता सिद्धांत’ (the hygiene hypothesis), ‘जुने मित्र सिद्धांत’ (old friends hypothesis), ‘जीविधता सिद्धांत’ (biodiversity hypothesis). काय सांगतात हे सिद्धांत ते थोडक्यात बघू. बदलत्या जीवनशैलीमुळे स्वच्छता (hygeine) वाढली, त्वरित उपचार घेणे वाढले आणि प्रतिकारकशक्ती कमी झाली. स्वच्छतेचे महत्त्व कमी लेखायचा उद्देश नाही; परंतु या टोकाच्या स्वच्छतेमुळे आणि उपचारांमुळे काही वेगळे परिणाम होत आहेत. आपल्या शरीरातील पर्यावरण बदलते आहे. शेकडो वर्षे ज्या पर्यावरणासोबत आपली रोगप्रतिकारकशक्ती सह-उत्क्रांत झाली आहे; ते बदलल्याने गोंधळ होतो आहे. काही तज्ज्ञांच्या मते अर्भकांवरचे उपचार ही तर बरीच घातक गोष्ट आहे. यावर बरेच अभ्यासदेखील आहेत. बाळाला प्रतिजैविके दिल्याने त्याच्या पोटातल्या, आपल्या शरीरातच राहणाऱ्या, उपयुक्त जीवाणूंच्या साठ्यावर मोठाच दुष्परिणाम होतो. त्याचा दुष्परिणाम प्रौढ वयातल्या अनेक आजारांत भोगावा लागतो. हे लक्षात घ्यायला हवे. जोवर हे जीवाणू – विषाणू आपल्याबरोबर आपल्या शरीरात सह-उत्क्रांत होत असतात तोवर ते त्रासदायक ठरत नाहीत. कारण आपण त्यांना आधार दिलेला असतो. ते आपल्याला मारून न टाकता आपले दीर्घकालीन मित्र बनून शरीरात राहत असतात. यातूनच ‘जुने मित्र सिद्धांत’ आला. परंतु आपण आंतरिक म्हणजे आपल्या शरीरातले पर्यावरण बदलले तर ते वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देणार यात शंका नाही.

बाह्य पर्यावरण म्हणजे परिसर बदलला तरी त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आजूबाजूला जीविधता नसेल तर अॅलर्जी (सर्दी, दमा, त्वचारोग इत्यादी) वाढते हे दाखवणारी अनेक संशोधने आहेत. त्यातली पोलंडची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. २००४ साली पोलंड युरोपिअन युनियनचा सदस्य झाला आणि त्यांची शेतीविषयक धोरणे बदलली. काही संशोधकांनी २००३ ते २०१२ या वर्षांत लोकांचे दमा आणि इतर काही अॅलर्जीचा प्रादुर्भाव अभ्यासला. यात ८ ते १८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले. याचे मुख्य कारण शेतीपासून फारकत आणि गायी किंवा इतर प्राण्यांचा घटता संपर्क. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊन आजार बळावले. विषाणूची साथ आणि अॅलर्जी हे दोन वेगळे आजार असले तरी दोन्हींत रोगप्रतिकारकशक्ती महत्त्वाची आहे. याच कारणाने रोगप्रतिकारकशक्ती टिकवण्यासाठी घराभोवती जीविधता असणे गरजेचे आहे. शिवाय येथे सरकारी किंवा राजकारणी धोरणे किती महत्त्वाची आहेत हे अधोरेखित करावेसे वाटते.

ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता उत्तम आहे ते लोक लक्षणेविरहित वाहक होतात हे आपण पाहिले. म्हणजे विषाणू त्यांच्या शरीरात शिरतो; परंतु त्यामुळे ते आजारी पडत नाहीत. ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. रोगप्रतिकारकशक्ती जरी आनुवंशिक असली तरी काही गोष्टींनी ती वाढवता येते. यावर भर देणे गरजेचे आहे. भारतात अनेक वेगवेगळ्या संस्कृती आहेत आणि ही विभागणी मुख्यतः इकॉलॉजी, माणसाची धाटणी, क्षमता इत्यादी गोष्टींनुसार आकार घेते.

प्रत्येक संस्कृतीत जीवनशैली, आहार-विहार-आचार कसे असावेत यावर काही ना काही भाष्य केलेले आढळते. नियम बनवलेले आढळतात. जागतिकीकरणाच्या रेट्यात या सगळ्याचे सपाटीकरण होते आहे. मुख्यतः अन्नाचे! माणसाच्या दृष्टीने अन्न ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. औद्योगिकीकरण आले तशी पिके बदलली, पारंपरिक अन्नाचे प्रकार बदलले, पर्यायाने पोषण बदलले. मैद्यापेक्षा ज्वारी पौष्टिक हे माहीत असूनही आपण मैद्याचे केक, बिस्किटे आवडीने खातो कारण आपण कमकुवत झालो तरी मरणार नाही हे आपल्याला ठाऊक आहे. कारण आपल्याला वैद्यकीय क्षेत्राचा आधार आहे. नैसर्गिक निवडीचे तत्त्व गुंडाळून ठेवत औषधे, इस्पितळे सर्व अशक्त लोकांनादेखील उत्तम जगवत आहेत. आहारात बदल झाला आणि इतर घटकही बदलले तर, हळूहळू संपूर्ण समाजाची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती खालावते. अशा अशक्त समाजाची एकत्रित रोगप्रतिकारकशक्ती खालावणार हे उघड आहे. करोनामुळे निर्माण झालेली सद्य:परिस्थिती आरोग्याचे महत्त्व पटवून देत आहे. यामुळेच जाता जाता आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा किंवा उपचारांचा पुरस्कार करणे गरजेचे वाटते. पारंपरिक आणि आधुनिक या दोहोंचा समन्वय साधून आपण आपले शरीर अशा साथीच्या रोगात, महामारीत पूर्वतयारीत ठेवू शकू.

सारांश

सारांश काय तर माणूस वाढत्या आकांक्षामुळे, अनियंत्रित उपभोगांमुळे, पर्यावरणाचा चेहरामोहरा बदलून स्वतःवरच विविध संकटे ओढवून घेत आहे – स्थानिक, जागतिक हवामान बदलापासून ते विषाणू जवळ ओढण्यापर्यंत! विषाणूला टक्कर देणे तसे सोपे आहे परंतु त्यामुळे जे भय निर्माण झाले आहे ते कधी ओसरणार हे सांगणे अवघड आहे. अर्थव्यवस्था कशी मार्गी लागणार, कंपन्यांची, सरकारची यातली नीती काय असेल, घरातून काम करण्याचा प्रघात पडणार का, इ-शिक्षण मुख्य प्रवाहात येणार का, लस नक्की कधी येणार, परिस्थिती कधी सुरळीत होणार असे अनेक प्रश्न आहेत. काही उत्तरे म्हणजे केवळ शक्यता आहेत, काही गोष्टी स्पष्ट आहेत. दुसरी बाजू अशी की, जसे आत्तापर्यंतच्या इतिहासात इतर साथींच्या वेळी घडले, तसे निसर्गकृपेने हे अल्पकाळात संपुष्टात आले तर, या तात्पुरत्या धक्क्यातून लोक सावरतील आणि सगळे पूर्ववत होईल. तरीदेखील या करोना प्रकरणात आपण (मी, कुटुंब, समाज, सरकार यांनी) जे निर्णय घेतले, त्याचे परिणाम दीर्घकाळ राहणार. माणसाला पर्यावरण-संवर्धन, जबाबदार वर्तन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर इत्यादीच्या साहाय्याने भविष्याला दिशा देणे शक्य आहे. ही शक्यता खरी ठरणार की खोटी हे केवळ काळच सांगू शकेल! आपण खरेच sapiens sapiens असू तर ही शक्यता खरी ठरावी! लॉकडाऊनमुळे घरात बसून अनेकांचे अनिवार्यपणे आत्मपरीक्षण होणार अशी दाट शक्यता वाटते. यातून किमान, समाजाच्या जाणिवा तीव्र व्हाव्यात आणि त्यातून सजग नागरिक निर्माण व्हावेत हीच सदिच्छा! आमेन!

संपर्क : ketaki@oikos.in

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.