मुलं वाचवा – शिक्षक वाचवा – देशाचं भविष्‍य वाचवा

सॅनिटायझर लावू कुठे-कुठे?

सन्माननीय अधिकारी यांनी अजूनही विचार करावा. शाळा सुरू करण्याचा अट्टाहास करताना होणार्‍या इतर दुष्परिणामांचा शांतपणे विचार करा व माझ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या संकटातून मुक्तपणे जगू द्या.

मुले पेन, पेन्सिल तोंडात घालतात. अंगठा चोखतात. एवढेच काय, कपडेसुद्धा तोंडात घालतात. म्हणून म्हणतो सॅनिटायझर लावू कुठे-कुठे? किती वेळा?

शंभर मुलांत एकच मुतारी. चार पाण्याचे ग्लास. त्याची ओढाओढी.

एकमेकांच्या अंगावर उड्या मारणारी पोरे, आनंदाने एकमेकांना टाळ्या देणारी मुले, एकमेकांच्या कानात बोलणारी, मिळून-मिसळून राहणारी पोरे… पेन्सिल, पेन, वही, पुस्तके, पट्टी, पाण्याचा ग्लास, पाणी बॉटल्स, कंपासपेटी, एक ना अनेक गोष्टींची देवाणघेवाण सातत्याने करत असतात. म्हणून म्हणतो, सॅनिटायझर लावू कुठे कुठे? आणि दिवसातून किती वेळा?

हाच प्रश्न सतत सतावतो आहे. भेडसावतो आहे.

वाटतंय, शाळेत बोलावून भारताची भावी पिढी आपण मृत्यूच्या दाढेत तर देत नाही ना?

खूप विचार केला. नंतर वाटले, अरे चिमुकली कोवळी, निरागस लेकरे. शाळेच्या चार भिंतीच्या आत कोंडून कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाच्या दाढेत देण्यापेक्षा ती दोन-तीन महिने आपापल्या घरात सुरक्षित राहिली तर आयुष्यभर आनंदात, सुखात राहतील.

देशाच्या भवितव्याचा विचार करता आज तरी मला असे वाटते की इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची छोटी छोटी मुले आपापल्या घरी सुरक्षित राहिली तरच देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. मुलांचे जगणे म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे.

आज उत्तर सोलापूर तालुक्यातील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली. शाळा बंद असून अश्या घटना घडत आहेत. उद्या शाळा चालू झाल्यावर एक काय, शेकडो शिक्षक आणि हजारो विद्यार्थ्यांना कोरोना नावाचा महाभयंकर राक्षस कवेत घेईल. याची मनाला खूप भीती वाटते; आणि पुन्हा वाटते, शाळा सुरू करण्याची खरंच गरज आहे?

माझे मन तरी मला स्पष्ट सांगते – नाही. शाळा सुरू करण्याची अजिबात गडबड करू नये. ही वेळ शाळा शिकवण्याची नसून ही वेळ विद्यार्थ्यांना जिवंत कसे राहावे हे शिकवण्याची आहे.

कालपर्यंत आठ-दहा माणसांना जमावबंदीचा आदेश देणारे शासन आज शेकडो विद्यार्थ्यांना एकत्र का बोलावतेय तेच कळत नाही. खाजगी संस्थांचा व शिक्षणाचा बाजार मांडून आपापली पोटे भरणार्‍या आपल्याच देशातील काही लोकांचा स्वार्थासाठी!

हे लोक शाळा सुरू करतील. भरमसाठ पैसे गोळा करतील आणि पुन्हा कोरोना वाढला म्हणून सुट्टी देतील. मध काढला की पोळी फेकून देतील यात शंका नाही.

आज देशामध्ये कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. म्हणूनच सरकारने शाळा सुरू केल्या तरीही राज्यातील एकाही शिक्षकाने शाळेत जाऊ नये. शाळा सुरू करण्याला सर्वांनी सामूहिकपणे विरोध करावा. कारण मुलांइतकाच शिक्षकांचाही जीव महत्त्वाचा आहे. फक्त संघटना स्थापन करून आपल्याला पद मिळाले ह्या आविर्भावात वावरू नका. वेळ गंभीर आहे, विचार करा व या परिस्थितीला सर्वांनी सामूहिकपणे एकजूट होऊन विरोध दर्शवा. आपला शिक्षक अडचणीत येणार नाही यासाठी प्रयत्न करा. हीच अपेक्षा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *