बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य काय असू शकते याचा विचार करताना आपल्याला चार गोष्टींचा विचार करावा लागतो: बुद्धी, प्रामाण्य, आस्तिक्य; आणि या तीनही गोष्टींना पायाभूत असणारी चौथी संकल्पना, म्हणजे ज्ञान.

यांपैकी आस्तिक्य आपण तात्पुरते बाजूला ठेवू आणि उरलेल्या तीन गोष्टींचा प्रथमतः अगदी थोडक्यात परामर्श घेऊ. या तीन संकल्पनांचा परामर्श घेणारे शास्त्र म्हणजे ज्ञानशास्त्र किंवा प्रमाणशास्त्र. याचा भारतीय दर्शनांच्या चौकटीत विचार करायचा झाल्यास इंद्रियांद्वारे आणि मानसप्रक्रियेने आपल्याला जे काही ‘समजते’ ते सर्व ज्ञान. आता यात ‘इंद्रिये’ आणि ‘समजणे’ हासुद्धा मानसप्रक्रियेचाच भाग झाला.

*१. दृष्टी, ध्वनी, स्पर्श, स्वाद, गंध यांचा अनुभव देणारी पाच ज्ञानेंद्रिये. अंतःकरण हेसुद्धा भावना, बुद्धी, स्मरण, अहं या चार प्रकारे ज्ञानेंद्रिये (cognitive drivers), कर्मेंद्रिये (conative drivers), आणि मन (affective drivers) यांच्या साहाय्याने एकत्रित अनुभव देणारे इन्द्रिय मानले जाते.

ही चक्रापत्ति (problem of circular reasoning) वेदान्तपरंपरा, अंत:करणाचे प्रक्रियानुरूप चार एकमेकांना जोडलेले कप्पे – बुद्धी, चित्त, मनस्‌, अहं – मानून सोडवायचा प्रयत्न करते. यात ‘विचार करून निश्चित करणे’ हा बुद्धिगम्य ज्ञानाचा भाग होतो. यात पुन्हा प्रमिती (निश्चिती व्हायच्या अगोदरचे ज्ञान) आणि प्रमा (निश्चितीनंतरचे ज्ञान) अशी विभागणी सोयीसाठी केली जाते. पण वेदांतात किंवा माध्यमिक (बौद्ध) ज्ञानशास्त्रात, अंतिमतः सर्व इंद्रियजन्य ज्ञान – यात अंत:करण किंवा मन आले – हे संबंधमूलक (relational, relative) असल्यामुळे ते मिथ्या (unreal, not absolutely real) किंवा अनिश्चित-अनिर्वचनीय (indeterminate) मानले जाते. किंबहुना सार्वकालिक निश्चित असे कोणतेच ज्ञान व्यवहारात वेदांत मानत नाही. मात्र संकल्पनारहित (anti-conceptual, attributeless) त्रिकालाबाधित ज्ञान किंवा सत्य म्हणून काही एक आहे असे वेदांती, आध्यात्मिक (spiritual-mystical) पातळीवर मानतो – तत्त्वत: अनुभवतो. या सत्याच्या संकल्पनारहित संकल्पनेतला शाब्दिक विरोधाभास (oxymoron), वेदांती भाषेची मर्यादा म्हणून मान्य करतो. एवढेच नव्हे तर हा ‘त्रिकालाबाधित अनुभव’ अनुभवातीत (मानसप्रक्रियेच्या बाहेरचा) आहे असे सांगून या विरोधाभासाची पुष्टीही करतो! बौद्ध (माध्यमिक) ज्ञानशास्त्रांत मात्र ‘प्रतीत्यसमुत्पादित’ अंतिम ज्ञान म्हणजे शून्य (nothingness, emptiness) असे मानले जाते. वेदांताच्या संकल्पनारहित अंतिम ज्ञानात (नेति नेति ब्रह्म) आणि माध्यमिक शून्यात फरक दाखवणे तसे कठीणच, म्हणून आपण ते संबंधित शाखेतील विद्वानांच्या चर्चेसाठी सोडून देऊ. मात्र ‘इंद्रियांद्वारे आणि मानसप्रक्रियेने आपल्याला जे काही ‘समजते’ किंवा उपलब्ध होते ते सर्व ज्ञान’ ही व्याख्या व्यवहाराच्या सोयीसाठी मान्य करू.

ज्ञानाची वैधता (प्रामाण्य) किंवा अवैधता (अप्रामाण्य) ठरवण्याच्या पद्धतीनुसार भारतीय प्रमाणशास्त्र चार प्रकारचे वर्गीकरण करते :(अ) स्वत: प्रामाण्य (intrinsic validity), परत: अप्रामाण्य (extrinsic invalidity) – जसे की मीमांसा आणि वेदांत (आ) परत: प्रामाण्य, परत: अप्रामाण्य – जसे की न्याय-वैशेषिक (इ) स्वत: प्रामाण्य, स्वतः अप्रामाण्य – जसे की सांख्य-योग (ई) परत: प्रामाण्य, स्वत: अप्रामाण्य – जसे की बौद्ध. याविषयीचे वादविवाद भारतीय दर्शनांत भरपूर आहेत. ते बाजूला ठेवून आपल्याला एवढेच म्हणता येईल की परत: प्रामाण्य, ज्यामध्ये सफलप्रवृत्तिसामर्थ्य (उदा. प्रयोगसिद्धता) किंवा प्रापकत्व (उदा. उपयोगिता) आहे, त्या शाखा (उदा. न्याय, वैशेषिक, बौद्ध) आधुनिक ज्ञानशास्त्राच्या (epistemology) जास्त जवळ आहेत. हे प्रयोग-उपयोगसिद्ध प्रामाण्य आधुनिक विज्ञानाला पसंत आहे; त्याला प्राधान्य देणे योग्य.

*२. इतर भारतीय दर्शने, विशेषतः अद्वैत वेदांत, प्रयोग-उपयोग मानत नाहीत असे नव्हे पण अतींद्रिय अनुभवाच्या संदर्भात त्यांचा भर शब्दप्रामाण्यावर असतो ज्याला प्रत्यक्ष अनुभवाचा दर्जा दिला जातो.

आता प्रमा किंवा व्यावहारिक ज्ञानाची वैधता (validity) कशाने साध्य होते? प्रमाची साधने (प्रमाणे) सहा होत – प्रत्यक्ष (cognition), शब्द (texts, textual evidence), अनुमान (inference), उपमान (analogy), अर्थापत्ति (postulation), अनुपलब्धि (non-cognition). सामान्यत: ‘प्रत्यक्ष आणि सार्वत्रिक अनुभव’ या अर्थाने प्रत्यक्ष प्रमाणाची महत्ता व्यवहारात सर्वाधिक मानली जाते. त्याचबरोबर अतींद्रिय ज्ञानासाठी शब्दप्रामाण्य सर्वोत्तम मानले जाते.

अनुपलब्धि हे अभावाची उपलब्धि करून देणारे प्रमाण सहसा फक्त वेदांतात आणि पूर्वमीमांसेत वापरले (मानले) जाते. आपण यांपैकी कोणतीही प्रमाणे एकमेकांच्या सहयोगाने वापरू शकतो. भारतीय दर्शने यांतील काही किंवा सर्व प्रमाणे मानतात.

आधुनिक विज्ञानाचे प्रमाणशास्त्रसुद्धा या ना त्या प्रकारे या प्रमाणांचीच चर्चा करते. विज्ञानातील प्रामाण्य हे पुनरावर्ती (iterative) रचनात्मक प्रयोग-प्रक्रियेतून होते. हा प्रक्रियात्मक फरक भारतीय प्रमाणशास्त्र आणि आधुनिक (वैज्ञानिक) प्रमाणशास्त्र यांच्यांत आहे. अतींद्रिय ज्ञानसंदर्भात जी महत्ता भारतीय दर्शनांत शब्दप्रामाण्याला आहे ती महत्ता विज्ञानाच्या प्रमाणशास्त्रात नाही. आधुनिक विज्ञानातील आकृतिबंध (models) हे अंतिम सत्य म्हणून स्वीकारले जात नाहीत. त्यांची वैधता ही तात्कालिक किंवा जरूरीपुरती (provisional) असते.

*३. Karl Popper’s falsificationist methodology in The Logic of Scientific Discovery (1932, 1959). qui a तत्त्वज्ञांना सरसकट मान्य होईल असे नव्हे. (उदा. Thomas Kuhn, The Structure of Scientific Revolutions, 1962)

आकृतिबंधाला छेद देणारा पुरावा मिळाला तर त्यांची वैधता समाप्त होते. या बाबतीत किमान ‘व्यावहारिक पातळीवर’ भारतीय प्रमाणशास्त्र आणि वैज्ञानिक प्रमाणशास्त्र यांच्यांत एकवाक्यता व्हायला हरकत नाही.

आता आस्तिक्य-नास्तिक्य हा काय प्रकार आहे ते पाहू. आस्तिक हा शब्द दर्शन परंपरेत अनेकार्थी वापरला जातो: १. तथाकथित अतींद्रिय (आध्यात्मिक) ज्ञानाच्या संदर्भात शब्दप्रामाण्य (वेदप्रामाण्य) सर्वतोपरी आहे असे मानणारी दर्शनें, २. ज्ञान हे स्वत:सिद्ध आहे असे मानणारी दर्शनें, ३. एक किंवा अनेक हेतुप्रधान, लक्ष्यवेधी शक्ती सृष्टीचे निर्माण आणि नियंत्रण करतात असे मानणारी दर्शने किंवा लोक. सृष्टिनियंत्रणात बहुतेक सर्व भारतीय दर्शनांनी मानलेला कर्मसिद्धांतही येतो. ह्या तिसऱ्या पर्यायाला आणखी काही पदर आहेत. त्यातला एक महत्त्वाचा लोकप्रिय पदर म्हणजे ही शक्ती व्यक्तिसदृश किंवा व्यक्तिसापेक्ष असणे (म्हणजेच सगुण ईश्वराचे किंवा देवांचे अस्तित्व मानणे).

भाषेच्या सोयीसाठी आपण हेतुपुरस्सर लक्ष्यवेधी शक्तीला फक्त लक्ष्यवेधी शक्ती, तत्त्व, किंवा प्रक्रिया असे मानू. तसेच नास्तिक असणे म्हणजे आस्तिक नसणे हे या तीन पर्यायांना लागू आहे असे तात्पुरते समजू. नंतर आस्तिक-नास्तिक हे शब्द नेहमी द्विध्रुवी (विरुद्धार्थी) असायची आवश्यकता नाही हे आपल्याला ओघाने समजून येईल.

भारतीय दर्शनशास्त्रात तिसरा पर्याय हा आस्तिक शब्दाशी सर्वात कमी जोडला गेला आहे, पण हाच पर्याय सामान्यपणे लोकांच्या मनात आस्तिक किंवा नास्तिक या शब्दाशी जोडला जातो. त्याचाच आपण विचार करू.

नास्तिक्य हे बुद्धिप्रामाण्य मानणारे, विचारपूर्वक निश्चिती करणारे असेलच असे नाही. पण तसे जर ते असेल तर नास्तिक्यामागचा विचार काय असू शकतो हे आपल्याला पहायचे आहे. हा विचार करताना बुद्धिप्रामाण्य मानणारी आस्तिकता असू शकते ही शक्यता आपल्याला मानायला हवी आणि त्यामागचा विचारही समजून घ्यायला हवा. या सर्वांचा आढावा रिचर्ड्स डॉकिन्स या ब्रिटिश शास्त्रज्ञाने त्याच्या ‘God Delusion’ (2006) या पुस्तकात घेतला आहे. पण विज्ञानाच्या मर्यादा त्यात पुरेशा अधोरेखित झाल्या नाहीत. त्या मर्यादांच्या बाहेर जो अवकाश आहे त्यात आस्तिक्य अजून पाय रोवून उभे आहे आणि त्याची डॉकिन्स यांना कल्पना आहे. भौतिक मर्यादांबाहेरील अवकाशरूपी ईश्वराची, डॉकिन्स ‘त्रुटींचा ईश्वर’ (God of the gaps) अशी संभावना करतात. पण सध्या दिसणाऱ्या विज्ञानाच्या (natural sciences) काही मर्यादा आधी पाहू.

विज्ञानाच्या मर्यादा

(१) नैसर्गिक विज्ञानाच्या कक्षेत फक्त मोजमाप होऊ शकणाऱ्या भौतिक वस्तू येतात. मात्र भौतिक वस्तूंच्या मोजमापाला तत्त्वत:च वैज्ञानिक मर्यादा आहेत. या मर्यादा मोजमाप घेणाऱ्या उपकरणांमुळे आलेल्या नसून त्या विज्ञानाच्या मूलभूत मर्यादा आहेत. या मर्यादांच्या पलीकडे काय आहे हा प्रश्न विज्ञानाच्या दृष्टिकोनातून निरर्थक आहे.

(२) (अ) गणितीय किंवा शुद्ध बौद्धिक आकृतिबंध, (आ) भौतिक प्रक्रिया आणि (इ) जीवसृष्टितील (मनुष्य प्राण्यातील) मानसप्रक्रिया यांच्यातील अन्योन्यसंबंधांचे स्पष्टीकरण विज्ञान सध्यातरी देऊ शकत नाही.

(३) कोणताही गणितीय आकृतिबंध हा अपूर्ण असतो. याचा पुढचा भाग म्हणजे कोणताही गणितीय आकृतिबंध हा स्वत:ची तर्कशुद्धता तपासू शकत नाही (गोडेल प्रमेये ). गणित आणि भौतिक जग यांचा अन्योन्यसंबंध लक्षात घेता ही मर्यादा महत्त्वाची ठरते.

(४) (अ) पृथ्वीवरील जीवसृष्टी, विशेषत: गर्भजन्य प्रक्रिया (morphogenetic processes) DNA/RNA वर आधारित सूचनाप्रणालीनुसार आणि संगणकीय उपमानाप्रमाणे का चालतात यांचे उत्तर सध्याचे विज्ञान देऊ शकत नाही. (आ) DNA/RNA रेणू नैसर्गिकरीत्या कसा बनला किंवा कुठून आला आणि तो जीवसृष्टीचे आदिम पूर्वज मानल्या गेलेल्या पेशींमध्ये कसा बंदिस्त झाला याचे समाधानकारक (प्रयोगसिद्ध) उत्तर आस्तिकांना हवे असते.

(५) कित्येक रासायनिक प्रक्रियांद्वारे बनणाऱ्या नव्या पदार्थांमध्ये त्या प्रक्रियांत भाग घेणाऱ्या मूळ पदार्थांमध्ये न दिसणारे गुणधर्म उद्भवतात (रासायनिक उद्भव). विज्ञान त्याचे स्पष्टीकरण देते, किंवा देण्याचा प्रयत्न करते. मात्र मेंदूत किंवा मज्जासंस्थेत जे अस्तित्वाचे भान (चित्, चिद्भान, Consciousness) उद्भवते, त्या अद्भुत उद्भवाला (radical or strong emergence) आपण ‘चिदुद्भव’ म्हणूया – त्याचे स्पष्टीकरण विज्ञान देऊ शकत नाही.

(६) पुंजवादात ‘संभव तरंग फलन’ (Schrodinger’s Probability Wave Function) फलित (collapse) झाल्यावर त्या क्षणाला ज्ञान किंवा अवलोकन होते. हे ज्ञान कशाचे आणि कुणाला होते? जर निर्जीव उपकरणांना हे ज्ञान होणार नसेल तर अवलोकन करणारा सजीव ज्ञाता – म्हणजे त्याचे चिद्भान – हेच तरंग फलनाच्या फलिताला कारणीभूत होते असे का म्हणू नये?

(७) विश्वाच्या उत्पत्तीनंतर (post Big Bang) पसरलेला ‘खगोलीय पार्श्व सूक्ष्मतरंगी किरणोत्सर्ग’ (CMBR: Cosmic Microwave Background Radiation) हा अधिकतम ‘प्रावस्था समष्टी’ (phase-space) असलेल्या आणि अधिकतम विस्कळ (entropy) असलेल्या औष्णिक समतोलातून आल्याचे दिसते. मात्र याच्या उलट ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमानुसार विश्वाची आदिम स्थिती ही न्यूनतम विस्कळाची असायला हवी. हा विरोधाभास आजचे विज्ञान समाधानपूर्वक दूर करू शकत नाही.

यांपैकी १, २ आणि ३ मध्ये सांगितलेल्या मर्यादा किंवा त्यांत उपस्थित केलेल्या प्रश्नांची वैधता आधुनिक विज्ञान आणि गणित (तर्क) शास्त्रांनी मान्य केल्या आहेत. सामान्य सापेक्षतावादातील आणि पुंजवादातील (quantum theory) काही असमानके (inequalities) भौतिक गुणधर्मांच्या कमाल आणि किमान मर्यादा ठरवतात. उदाहरणार्थ, पुंजवादात किमान क्रिया (minimum action); विशिष्ट सापेक्षतावादात कमाल गती (maximum speed); आणि सामान्य सापेक्षतावादात कमाल बल (maximum force) किंवा कमाल शक्ती (maximum power) या मर्यादा आता सर्वमान्य होत आहेत. या मर्यादा वापरून पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची गणितीय मांडणीही करता येते. कुर्त गोडेलच्या गणिती आकृतिबंधातील अपूर्णता (incompleteness) आणि अनिश्चितता (inconsistency, indeterminacy) फक्त गणितातच नव्हे, तर त्याहीपेक्षा जास्त, एकमेकांशी संलग्न आणि परस्परपवलंबी अशा गणितीय, भौतिकी, आणि मानसिक बाजू असलेल्या विश्वातही (पहा.. प्रश्न-२) दिसून येते. आस्तिकांच्या मते ही अपूर्णता आणि अनिश्चितता आस्तिकांच्या लक्ष्यवेधी वैश्विक तत्त्वाला अवकाश आणि संदर्भ पुरवते. नास्तिक हे मानत नाहीत. केवळ अवकाश हे संदर्भ, हेतू, किंवा लक्ष्य पुरवू शकत नाही. शिवाय ‘लक्ष्य कोणते?’ हा प्रश्न आहेच! अनेक बुद्धिवादी आस्तिकांच्या म्हणण्यानुसार हे लक्ष्य म्हणजे सजीवांची निर्मिती किंवा चिदुद्भव हे असते. आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ ते ४, ५, आणि ६ या मर्यादांचा उल्लेख करतात.

बुद्धिगत अधिरचना (Intelligent Design)

वर उल्लेख केलेल्या ४, ५, आणि ६ या मर्यादांच्या अनुषंगाने आस्तिक अधिरचनेचे गृहीतक मांडतात. ते काय ते पाहू. DNA/RNA चा सूचनापट (code) आणि संगणकाचा सूचनापट (program) यांतील साधर्म्य ते दाखवून देतात. संगणकातील सूचनापट हा मानवीय बुद्धीतून आलेला असतो. सजीवातील प्रत्येक पेशीत असलेला DNA/RNA हा सुद्धा उत्पत्तिकालिक (आदिम पूर्वज) पेशींत अतिमानवीय बुद्धीतून आलेला आहे असे आस्तिकांचे म्हणणे असते. संगणकाची रचना मानवीय असल्यामुळे त्यातील संरचनेची आणि त्यातील संगणनेची कारणमीमांसा ज्या प्रकारे माणूस मुळापासून करू शकतो त्या प्रकारे सजीवांतील गर्भजन्य आणि वृद्धिवर्ती प्रक्रियांची कारणमीमांसा माणूस करू शकत नाही. हे विशेषतः मेंदू, मज्जासंस्था, आणि चिदुद्भव या बाबतीत खरे आहे. सजीवांतील अनुभव (qualia या अर्थाने) आणि चिद्भान (Consciousness) पदार्थविज्ञानाला आणि जीवशास्त्राला अतर्क्य आहे. चिद्भानलक्ष्यी प्रक्रियेखेरीज त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही. मुळात DNA सारखा विकट (complex) रेणू हा नैसर्गिकरीत्या तयार होऊन पेशींच्या आवरणात येऊन बसण्याची संभाव्यता शून्यगामी (जवळ जवळ अशक्य) आहे. सजीवांच्या उत्पत्तीचा विचार करता DNA चे आणि पेशींचे नैसर्गिकरीत्या बनणे, आणि असंख्य जनुकीय अपघातांच्या साखळ्यांमधून ‘उत्क्रांतिवादा’च्या आधारे चिदुद्भव झालेल्या प्राण्यांच्या जाती तयार होणे हे असंभाव्य दिसते. ह्या अपघातांची साखळी थेट १४ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या तथाकथित महास्फोटाशी (BB: big bang) जोडली जाते. या तथाकथित महास्फोटानंतर लगेच जे वैश्विक, भौतिक नियत (universal physical constants) तयार झाले ते थोडे जरी वेगळे असते तर चिदुद्भव झालेल्या प्राण्याच्या उत्क्रांतीला पोषक अशी परिस्थिती तयार झाली नसती. ही परिस्थिती वरकरणी विशृंखल (chaotic) किंवा यादृच्छिक (random) प्रक्रियांद्वारे पृथ्वीसारख्या ग्रहांवर उत्पन्न होत असली तरी त्यामागे हेतुप्रधान किंवा लक्ष्यवेधी तत्त्व असले पाहिजे असे आस्तिक मानतात. किंबहुना उत्क्रांतिवाद हाच मुळी लक्ष्यवेधी असला पाहिजे असा तर्क केला जातो! हा अन्योन्याश्रय असतो आणि म्हणूनच निरर्थक. यदृच्छया प्राप्त झालेल्या स्थितीला लक्ष्य म्हणायचे, ते साध्य झाले म्हणून एखाद्या प्रक्रियेला लक्ष्यवेधी म्हणायचे आणि त्याच वेळेस ती प्रक्रिया लक्ष्यवेधी आहे म्हणून लक्ष्य साध्य झाले म्हणायचे असा हा प्रकार असतो. मात्र आस्तिक याला अन्योन्याश्रय मानत नाहीत. चिदुद्भव ही त्यांच्यामते एवढी असंभव आणि असाधारण घटना आहे की लक्ष्यवेधी प्रक्रियात्मक तत्त्वाशिवाय किंवा निर्मात्याशिवाय ती साध्य होऊ शकत नाही. या प्रकारच्या तर्काला नास्तिकांचे शेवटी एकच उत्तर असते ते म्हणजे ‘मानव सिद्धांत’ (anthropic principle): चिदुद्भवाची शून्यगामी शक्यता प्रत्यक्षात मानवरूपात सिद्ध झालेली आहे; त्यामुळे विश्वाची प्रारंभिक स्थिती, वैश्विक भौतिक संयतांची संख्या आणि त्यांचे सूक्ष्म परिष्करण (fine balance) वगैरे गोष्टींचा अन्वयार्थ या संदर्भातच लावायला हवा. या गोष्टींचा उद्देश मानवाची निर्मिती आहे असे म्हणण्याऐवजी मानवासारख्या चिद्भान (conscious ness) आणि मतिमान (intelligence) असलेल्या माणसाच्या उत्क्रांतीमुळेच हे प्रश्न महत्त्वाचे होतात असे नास्तिकांना वाटते. उत्क्रांतीच्या ‘नैसर्गिक निवडी’नुसार (natural selection) आणि विज्ञानाच्या सध्याच्या किंवा नवीन संशोधित नियमांनुसार आणि गणिती आकृतिबंधानुसार विश्वाचा शोध घेतला जावा अशी त्यांची अपेक्षा असते. केवळ विज्ञानाच्या अभावात्मक अवकाशात (epistemic gap) ईश्वर किंवा लक्ष्यवेधी तत्त्व घुसवणे त्यांना मान्य नसते.

बुद्धिगत अधिरचनेच्या संदर्भात प्रश्न ६ चा रोख असा आहे: तरंग फलन परिस्थितीचे यथार्थ वर्णन करते, की तो एक सत्य परिस्थितीशी संबंध नसलेला केवळ गणिती आकृतिबंध आहे? तरंग फलन आणि त्याचे फलित (reduction of the wave function) गंभीरतेने घ्यायचे म्हटले तर फलित कोण घडवून आणतो याचाही विचार करावा लागतो. हे फलित मापनामध्ये वापरलेले उपकरण घडवून आणू शकत नाही कारण ते पुंज जगताचा भाग बनते. मापनाची प्रक्रिया आकलनापर्यंत आणण्याचे काम चिद्भान करते. त्यामळे व्यक्तिसापेक्ष चिद्भान – वेदांताच्या भाषेत जीवसाक्षी – हाच फलितक (reducer) असतो. व्यक्तिसापेक्ष मापनाचा आणि त्या योगे व्यक्तिसापेक्ष जगाचा तो निर्माता बनतो. ही निर्मिती खरे पाहिल्यास अर्थसत्तेची असते (semanticization). मग सर्व विश्वाचा फलितक किंवा अर्थसत्ता प्रदाता कोण? तो असतो व्यक्तिनिरपेक्ष चिद्भान – वेदांताच्या भाषेत सर्वसाक्षी किंवा ईश्वर. इथे ईश्वर हे अंतिम सत्य नसते. ती असते केवळ एक उपमानात्मक संकल्पना. विश्वाची एकमेकांशी संलग्न असलेली गणिती (platonic), भौतिकी (physical) आणि मानसिक (psychological) अंगे जर आपण पाहिली तर ईश्वराची मानसिक आणि गणिती-सैद्धांतिक सत्यता मानायला बुद्धिवादी आस्तिक आणि नास्तिक या दोघांची बहुतांशी हरकत नसते, पण या सत्याचे अंतरंग दोघांसाठी वेगवेगळे असते. आस्तिक ईश्वराची केवळ मानसिक आणि सैद्धांतिक सत्यता मानतो असे नाही तर त्याचा भौतिकाशी कारणात्मक संबंध जोडतो आणि त्यात भौतिक रंग भरतो. नास्तिकासाठी ईश्वराची सैद्धांतिक सत्यता ही मानसिक असते. त्याचा भौतिकाशी कारणात्मक संबंध नसतो. असलाच तर केवळ अर्थाअर्थी, अर्थसत्ता प्रदाता या नात्याने. हा अर्थाअर्थी संबंध जेव्हा अधिष्ठातानात्मक, सर्वव्यापी चिद्भानवाद (panpsychism) किंवा ब्रह्मवाद (pantheism) या स्वरूपात समोर येतो तेव्हा आस्तिक्य आणि नास्तिक्य यांतला फरक अस्पष्ट होतो आणि आस्तिक्य-नास्तिक्य हे तत्त्वज्ञानाच्या आणि आधुनिक विज्ञानाच्या जवळ येते. त्या दृष्टीने आपण आस्तिकांच्या एका प्रश्नाचा विचार करू. जर, (अ) जीवसृष्टी निर्माण हे ईश्वराचे कार्य असेल, किंवा (आ) तात्त्विक दृष्टीने चिदुद्भाव झालेल्या प्राण्यांची उत्क्रांती ही लक्ष्यवेधी प्रक्रिया असेल तर माणूस या प्रक्रियेवर ताबा मिळवू शकतो का? म्हणजेच आस्तिकांच्या भाषेत माणूस प्रतिईश्वर होऊ शकतो का? या प्रश्नातून आपण पदार्थनिर्मिती बाजूला काढू. नवीन पदार्थाची निर्मिती होत नाही, फक्त वस्तूचे रूपांतर ऊर्जेत आणि ऊर्जेचे रूपांतर वस्तूत होते आणि विश्वातील एकूण वस्तु-ऊर्जा (ज्याला आपण प्रकृति म्हणू) कायम रहाते हे लक्षात ठेवू.

चिदुद्भव

वरील जोडप्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपल्याला आणखी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. (इ) शुक्राणु (sperm) आणि अंडाणु (ovum) यांचे उत्पादन, संयोग आणि संयुगवृद्धी मनुष्य शरीरातील आणि गर्भाशयातील जैविक प्रक्रियांशिवाय, संपूर्णतः प्रयोगशाळेत होऊ शकेल का? (ई) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चिद्भान असलेला यंत्रमानव किंवा संगणक मानवाला बनवता येईल का? या दोन प्रश्नांचे संक्षिप्त उत्तर ‘आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाला अजूनतरी हे साध्य झालेले नाही’ असे आहे. मात्र ‘अनुवंशिक अभियान्त्रिकी’ (genetic engineering) तंत्रांनी आणि जैविक प्रक्रियांचाच वापर करून माणूस जीनोममध्ये बदल घडवू शकतो आणि नवीन किंवा सुधारित जाती निर्माण करू शकतो. याचाच अर्थ ईश्वराच्या तथाकथित प्रदेशात प्रवेश करणे मानवाला अशक्य नाही.

प्रश्न (ई) चा रोख ‘नैसर्गिक (जैविक) प्रक्रिया बाजूला ठेवून चिदुद्भव होऊ शकेल का’ हे विचारण्याचा आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही मूलभूत प्रश्न चिद्भानाच्या संदर्भात विचारावे लागतील. (उ) चिद्भान हे ‘पदार्थविज्ञानात समानेय’ (reducible in physics) आहे का? (ऊ) चिद्भान हे कलनवैध (computable, algorithmic) आहे का?

पहिल्या प्रश्नाचा (प्रश्न उ) अर्थ प्रथम समजावून घेऊ. पदार्थविज्ञानाची व्याप्ती आणि महत्ता सर्वाधिक. सर्व व्यवहार पदार्थांमध्ये (प्रकृतीमध्ये) घडतात. प्रकृतीच्या नियमांची व्याप्ती वैश्विक असते. मन, चिदुद्भव, आणि रासायनिक प्रक्रिया प्राकृतिक आहेत असेच समजले जाते. या अर्थाने जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या शाखा पदार्थविज्ञानात समानेय आहेत असे अनेकांना वाटते. हे तात्त्विकदृष्ट्या खरे असेलही पण चिदुद्भव आणि मन हे पदार्थविज्ञानाच्या नियमांनुसार समजून घेता येत नाहीत. चिदुद्भव पदार्थात होत असला तरी पदार्थविज्ञान ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने अपुरे पडते आणि आस्तिकांना अवकाश पुरवते. तात्त्विक दृष्टीने चिद्भान सजीवांना परिभाषित (define) करते पण जीवशास्त्रीय दृष्टीने प्रजनन (reproduction) आणि स्वानुरक्षण (self maintenance) सजीवांना परिभाषित करते (autopoiesis). मज्जासंस्थेतील जैविक प्रक्रिया चिदुद्भवाला कारण होतात आणि चिदुद्भव पदार्थविज्ञानाला अनाकलनीय असल्यामुळे जीवशास्त्र पदार्थविज्ञानात समानेय समजले जात नाही. (अनाकलनीय या नेहमीच्या वापरातल्या शब्दाचा कलनवैध या तांत्रिक शब्दाशी काय संबंध आहे हे नंतर पाहू). आस्तिकांच्या मते भविष्यातही चिदुद्भव समानेय असणार नाही आणि ज्ञानाचा अभावात्मक अवकाश (epistemic gap) तसाच रहाणार. नास्तिक हा अवकाश मानतात पण आधी सांगितल्याप्रमाणे त्याचा ईश्वराशी किंवा वैश्विक लक्ष्यवेधी प्रक्रियेशी कोणताही संबंध त्यांना मान्य नसतो. जैविक प्रक्रियेने मज्जासंस्था बनते आणि त्यात चिदुद्भव होतो; केवळ एवढ्याच अर्थाने आस्तिक जैविक प्रक्रियांना लक्ष्यवेधी म्हणणार असतील तर नास्तिकाच्या मते ते निरर्थक सत्य (tautology) असते.

आता प्रश्न (ऊ) पाहू. कलनवैधता (Computability) ही संकल्पना केवळ संगणकशास्त्रातच नव्हे तर तर्कशास्त्रात आणि ज्ञानशास्त्रातही महत्त्वाची आहे. एखादे फलन (function) जर संगणकावर कार्यान्वित होत असेल तर आपण त्याला कलनवैध म्हणू. जे कलनवैध आहे ते ज्ञेय (आकलनीय) आहे. पण याचा व्यत्यास खरा असेलच असे नाही. संग्रहित सूचनाप्रणाली असलेल्या संगणकाचे सादृश्य (analogy) आपल्याला जीवशास्त्रात जैविक प्रक्रियांमध्ये दिसून येते. या प्रक्रिया शुक्राणु, अंडाणु बनवतात, गर्भधारणा, गर्भवृद्धी, आणि शरीरवर्धनही करतात. या सर्व DNA च्या सूचनाप्रणालीनुसार अचूक काम करतात; पण क्वचित चुका होतात ज्यामुळे जीनोममध्ये बदल घडून येतो. आपण अशा यादृच्छिक बदलांना जनुकीय उत्परिवर्तन म्हणतो. हे उत्परिवर्तन उत्क्रांतीचा आधार बनते आणि चिदुद्भव झालेल्या प्राण्यांची निर्मिती होते. जैविक प्रक्रिया आणि संगणकाची प्रक्रिया यांमध्ये असे साम्य (साधर्म्य) असले तरी केवळ त्यामुळे जैविक प्रक्रियांप्रमाणे जसा सजीवांत चिदुद्भव होतो तसा संगणकांत चिदुद्भव होईल ही अपेक्षा करता येणार नाही. कसे ते पाहू.

गणिती आकृतिबंधातील अपूर्णता, अनिश्चितता, आणि संगणकशास्त्रातील कलनवैधता (किंवा अवैधता) यांचा जवळचा संबंध आहे. एखादे फलन (function, mapping) ‘पूर्वग प्रत्यावर्ती’ (primitive recursive) असते जेव्हा ते प्राथमिक फलनांपासून प्रत्यावर्तन (recursion) आणि संयोजन (composition) या प्रक्रियांपासून मिळू शकते. प्राथमिक फलने प्राथमिक संगणकीय सूचनांद्वारे कार्यान्वित होतात आणि म्हणून ती कलनवैध असतात. पूर्वग प्रत्यावर्ती प्राथमिक फलनांपासून प्रत्यावर्तन आणि संयोजन प्रक्रियांद्वारे पुनरावर्ती (iterative) पद्धतीने मिळत असल्यामुळे तीही कलनवैध समजली जातात. आपण प्रत्येक पूर्वग प्रत्यावर्ती फलनाच्या संगणनाला (program) एकेक विशिष्ट पूर्णांक (गोडेल-अंक, ग-अंक) निर्दिष्ट करू, उदा. #(फलन ख) = ग. तसेच एक द्विधेय फलन (binary valued predicate function) थांब(ख, ग) पुढीलप्रमाणे परिभाषित करू:

थांब(ख, ग) = ज्ञेय, जर ग-अंक असलेले ख फलन कलनवैध असेल, आणि

थांब(ख, ग) = अज्ञेय, जर ग-अंक असलेले ख फलन कलनवैध नसेल.

थोडक्यात, थांब(ख, ग) चे संगणन (program), ‘थांब’ फलन कलनवैध असेल तर थांबेल आणि ‘थांब’ फलन कलनवैध नसेल तर थांबणार नाही.

आता, ‘थांब’ हे भागशः कलनवैध फलन आहे असे मानले तर पुढील परिभाषित केलेले फलन पूर्ण कलनवैध असेल :

*४. पूर्णांकांच्या उपसंचावर परिभाषित झालेल्या फलनाला भागशः फलन म्हणतात आणि पूर्णांकांच्या पूर्ण संचावर परिभाषित झालेल्या फलनाला पूर्ण फलन म्हणतात. सर्वसाधारणपणे फक्त फलन असा उल्लेख येतो तेव्हा ते भागशः समजले जाते.

क(क्ष) = १, जर थांब(क्ष, क्ष) हे कलनवैध नसेल, आणि

क(क्ष) = थांब(क्ष, क्ष) + १, जर थांब(क्ष, क्ष) हे कलनवैध असेल.

आता क(क्ष) चा ग-अंक आपण य मानला तर क(य) हे पूर्ण कलनवैध असल्यामुळे थांब(य, य) हे कलनवैध असेल आणि क(य) = थांब(य, य) +१ = क(य) + १, हे समीकरण तर शक्य नाही! याचाच अर्थ ‘थांब’ हे फलन कलनवैध नाही. थोडक्यात, एखादे संगणन (program) आणि त्याचा निवेश (input) दिला असेल तर ते संगणन त्या निवेशावर थांबेल असे सांगणारा कलनविधि (algorithm) अस्तित्वात नाही. हेच ते ‘थांब प्रमेय’ (halting problem). रॉजर पेनरोजसारखे गणिती वैज्ञानिक याचा अर्थ असा लावतात: ज्याअर्थी एखाद्या कलनवैध नसलेल्या पूर्वग प्रत्यावर्ती फलनाचे अस्तित्व आपण मनाने समजू शकतो, पण संगणकाला समजावू शकत नाही (आणि म्हणून संगणन ‘थांबू’ शकत नाही), त्याअर्थी मनोव्यापार हे कलनवैध नाहीत. चिद्भान मनात उद्भवत असल्यामुळे चिदुद्भव कलनवैध नाही.

अनेक तत्त्वज्ञ मात्र हे मानत नाहीत. त्यांच्या मते ‘थांब’ प्रमेय किंवा इतर प्रमेये कलनवैध नसण्याचा आणि मन किंवा चिदुद्भव कलनवैध नसण्याचा संबंध नाही. हा संबंध नाही असे जरी वादासाठी मानले तरी आजचे किंवा उद्याचे अतिसूक्ष्म प्रौद्योगिकी (nano or pico technology) वापरून आजच्या संगणकामध्ये आपण जैविक मज्जा प्रक्रिया अनुसरू (emulate) किंवा अनुररूपू (simulate) शकू का? आणि करू शकल्यास त्याचा कलनविधी काय असेल? जसा निसर्गात पडणारा पाऊस केवळ नैसर्गिक प्रक्रियेने शक्य होतो; संगणकामध्ये अनुरूपण (simulation) केलेला पडद्यावरचा पाऊस त्याची जागा घेऊ शकत नाही तसेच सजीवांमध्ये होणारा चिदुद्भव हा फक्त जैविक प्रक्रियांद्वारेच होऊ शकतो असे अनेक तत्त्वज्ञ मानतात. त्यामुळे वरील प्रश्नांची उत्तरे देणे सध्या असंभव दिसते. जरी हे संगणकीय अनुरूपण भविष्यात शक्य होईल असे मानले तरी आस्तिकांना अभिप्रेत असलेला ज्ञानावकाश नाहीसा होईल का? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. कारण साधे आहे. मानवनिर्मित अधिरचना सोडा, आजच्या मज्जासंस्थेतील जैविक प्रक्रिया जरी संपूर्ण समजून घेतल्या तरी त्यामुळे चिदुद्भव का आणि कसा होतो हे समजण्याची शक्यता दिसत नाही. चिदुद्भव करणार्‍या उद्याच्या अतिसूक्ष्म प्रौद्योगिकीमधील कलनविधि (algorithm) काही अपघाताने जरी आपल्या हाती आला तरी त्याचा अर्थ लागणे असंभव, अगदी तसेच जसे की आताच्या मज्जा-जैविक प्रक्रियांचा अर्थ आपल्याला चिदुद्भवाच्या संदर्भात लागत नाही आणि लागू शकत नाही. (यासंबंधीचे युक्तिवाद आपल्याला qualia, knowledge argument वगैरे शब्द वापरून गूगलच्या मदतीने महाजालावर शोधता येतात). नास्तिक मात्र या ज्ञानावकाशाला फारसे महत्त्व देत नाहीत.

तत्त्वावकाश (metaphysical vacuum) आणि ज्ञानावकाश (epistemic vacuum) हे एकमेकांशी जोडलेले आहेत. खरे तर हे दोन्ही अवकाश ज्ञानावकाशाचा भाग म्हणून पहाता येतात. नास्तिकांना त्यांचे मत बदलायला हे अवकाश भाग पाडू शकत नाहीत. या अवकाशांत हेत्वार्थी आणि लक्ष्यवेधी वैश्विक प्रक्रिया किंवा ईश्वर अध्यारोपित करणे त्यांना मान्य नसते हे आपण पाहिलेच आहे. ज्ञानावकाश (आणि तत्त्वावकाश) भरण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.

चिदुद्भवाच्या संदर्भात तीन प्रकारचा तत्त्वावकाश आता मान्य आहे: १. असमानेयता (irreducibility), २. कलनावैधता (non-computability) आणि ३. मज्जासंस्थेचे रचनात्मक वैशिष्ट्य (structural specificity).

याचे स्पष्टीकरण देऊ पहाणारे काही वाद (theories) मांडले गेले आहेत. यातला एक म्हणजे ‘समन्वित ज्ञानवाद’ (Integrated Information Theory – IIT). कोणत्याही तत्त्वज्ञानात्मक वादावर जशी टीका होते तशी यावरही झाली आहे आणि होत आहे.

५,६. https://plato.stanford.edu/entries/qualia-knowledge/ https://royalsocietypublishing.org/doi/10.1098/rstb.2014.0167 मज्जासंस्थेचे विशेषज्ञ Giulio Toloni आणि Chrisof Koch यांचा हा पेपर Philosophical Transactions of The Royal Society (B: Biology).

विशेषतः हा वाद अखिलमानसवादाजवळ (panpsychism) जातो असे समजले जाते. IIT चे वैशिष्ठ्य असे:

(१) यात चिद्भान लक्षणार्थाने मूलभूत मानले जाऊ शकते. मात्र ‘अधिकतम असमानेय समन्वित ज्ञान’ (maxima of irreducible integrated information) ही IIT तील मुख्य प्रातिनिधिक संकल्पना आहे; याला आपण संविद किंवा जाणीव म्हणूया.

(२) समष्टि (aggregate) मध्ये संविद नसते; फक्त व्यष्टिगत अधिकतम समन्वित ज्ञान असते.

(३) IIT मध्ये अनुभवाचा समन्वय (integrity) आणि गुणवत्ता (qualia) मोजले जाऊ शकतात! (४) IIT, रचनात्मक संगणन (structural computation) सुचवते. यात ‘विशिष्ट प्रकारच्या संरचने’मध्येच (in specific structure) संविद उद्भवू शकते.

(५) IIT, ‘संविद नसलेली वस्तू किंवा व्यक्ती ही संविद असलेल्या व्यक्तिचे संपूर्णपणे अनुसरण (emulation) किंवा अनुरूपण (simulation) करू शकते’ ही शक्यता मानते. याला यांत्रिक बुद्धिमत्तेची पहिली परिकल्पना (first hypothesis of ‘Artificial Intelligence’ – Weak AI) समजायला हरकत नाही.

(६) IIT, ‘यांत्रिक बुद्धिमत्तेची दुसरी परिकल्पना’ (second hypothesis of AI – Strong AI) सुद्धा नाकारत नाही! यांत मानवनिर्मित चिद्भान असलेला यंत्रमानव शक्य असतो. पण ज्ञानावकाश तसाच रहातो. ज्ञानाचा (प्रमाचा, बुद्धीचा) वापर करून ज्ञानाचाच शोध घ्यायचा असतो. ह्या चक्रापत्तिमुळे ज्ञानावकाश रहाणार याची बुद्धिवादी नास्तिकांना कल्पना असते (किंवा असावी).

हे सर्व लक्षात घेऊन IIT हा आस्तिकांना चिदुद्भव आणि तत्संबधीचा ज्ञानावकाश आणि तत्त्वावकाश या संदर्भात उत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे असे मानायला हरकत नाही.

(IIT मध्ये परिभाषित होणारे संविद किंवा जाणीव हे वेदांतातील संबंधरहित, मूलाधार चिद्भान नव्हे. IIT, हा संरचनेमधील असमानेय ज्ञानाचा समन्वय करण्याची पात्रता आणि गुणवत्ता यांचे आकलन आणि मापन करू पहाणारा वाद आहे. तो CRUM: Computational Representation & Understanding of Mind या प्रकारात मोडतो).

प्रश्न ७: महास्फोटाची मर्यादा

‘महास्फोट विश्व’ (Big Bang Cosmos – BBC) हा आस्तिकांचा आवडता सिद्धान्त आणि विश्वाची निर्मिती हा त्यांचा आवडता विषय. BBC ला चर्चची मान्यता आहे. या वादाला ‘महास्फोट’ (Big Bang) हे नाव खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचे मित्र-गुरु, प्रसिद्ध ब्रिटिश शास्त्रज्ञ Fred Hoyle यांनी काहीसे उपरोधाने दिले आणि मग तेच रूढ झाले. हा तथाकथित महास्फोट का, कसा, कशासाठी झाला आणि त्याच्या आधी काय होते या प्रश्नांना आस्तिकांच्या दृष्टीने (ईश्वराखेरीज) उत्तर नसते. यादृच्छिक (random) हे उत्तर त्यांना मान्य नसते. मात्र वैज्ञानिकांत (खगोलशास्त्रज्ञांत) सुद्धा या सिद्धांताला सर्वात जास्त मान्यता आहे. यांतले कित्येक वैज्ञानिक नास्तिक असू शकतात कारण यात निर्वात ऊर्जेपासून (vacuum energy) यादृच्छिक विश्वाची निर्मिती नाकारलेली नसते. या वादात काही प्रश्न अनुत्तरित रहातात. उदा. गुप्तशक्ती (dark energy), गुप्तपदार्थ (dark matter), कृष्णविवराचे केंद्र (black hole singularity) आणि ठिगळ लावल्यासारखे, काल्पनिक, पण कित्येक प्रश्नांचे उत्तर देऊ शकणारे ‘अतिवृद्धीचे गृहीतक’ (rapid inflation hypothesis) वगैरे. महास्फोटानंतरचा विस्कळ (entropy) हा त्यातला एक प्रश्न. महास्फोटातून पसरलेला किरणोत्सर्ग हा अधिकतम प्रावस्था-समष्टी (phase-space) असलेल्या आणि अधिकतम विस्कळ (entropy) असलेल्या औष्णिक समतोलातून येतो. मात्र याच्या उलट ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमानुसार विश्वाची आदिम स्थिती ही न्यूनतम विस्कळाची असायला हवी.

या प्रश्नाचे उत्तर शोधण्याअगोदर बुद्धिवादी नास्तिकांचे BBC कडे पहाण्याचे दृष्टिकोन काय असू शकतात ते पाहूया :

(१) BBC हा विश्वाच्या उत्पत्तीचा वाद नसून तो विश्वाच्या उत्पत्तीनंतरच्या उत्क्रांतीचा वाद आहे.

(२) विश्वाची उत्पत्ती आणि उत्क्रांती ही निर्वात ऊर्जेपासून यादृच्छिकरीत्या निर्माण झालेली विश्वे आणि त्यातून ‘नैसर्गिक निवडी’नुसार ‘जगलेली’ आपल्या विश्वांसारखी एक किंवा अनेक विश्वे यांमधून झाली. या जगलेल्या विश्वांत भौतिक नियतांची जुळणी योगायोगाने अशा प्रकारे झाली की ज्यामुळे मानवासारख्या चिद्भान असलेल्या प्राण्यांची उत्क्रांती होऊ शकली. ही डॉकिन्स आणि ली स्मॉलिनसारख्या शास्त्रज्ञांची आवडती संकल्पना आहे. यांत उत्क्रांतीवादातला नैसर्गिक निवडीचा नियम केवळ सजीवांच्या उत्क्रांतीलाच नव्हे, तर जगोत्पत्तीला आणि जगोत्क्रांतीला लावला जातो.

(३) विश्वनिर्माता ईश्वर ही संकल्पना निरर्थक ठरेल असे चक्रीय वैश्विक आकृतिबंध (cyclic models of Universe) असू शकतात. जर महास्फोट एकदा होणार असेल तर तो दोनदा किंवा अनेकदा का होऊ शकणार नाही याला तार्किक उत्तर नसते. सध्याच्या BBC मध्ये काही बदल करून चक्रीय आकृतिबंधाची मांडणी होऊ शकते. प्रश्न ७ चे उत्तर शोधताना किंवा इतर अनेक कारणांनी कित्येक शास्त्रज्ञांनी चक्रीय अनुबंध बांधले आहेत. यांमध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ Fred Hoyle आणि भारतीय शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचाही एक सुधारित आणि महत्त्वाचा आकृतिबंध आहे. नंतरच्या चक्रीय आकृतिबंधांतल्या काही संकल्पना यात बीजरूपाने सापडतात. मात्र आपण यांपैकी रॉजर पेनरोज आणि त्यांचे सहकारी यांनी केलेली एक मांडणी आता पाहूया. त्याचे कारणही पुढे स्पष्ट होईल.

अनुकोण चक्रीय विश्व (Conformal Cyclic Cosmos – CCC)

CCC मागची संकल्पना साधी पण क्रांतीकारी आहे. त्याचे मुख्य मुद्दे असे :

(१) यात गणिती पद्धतीने, अनुकोण सुरक्षित ठेवून BBC चे मापीय कालावकाश (metric time-space of BBC) अनादि-अनंत अनुक्रमाने जोडले जातात. एका BBC कालावकाशात (महायुग) महास्फोट आणि त्याचा अनंत भौतिक विस्तार असतो. अनुक्रमातल्या प्रत्येक महायुगाची ‘अनुमापित भूतसीमा’ (past-conformal boundary) ही त्याच्यामागील ‘अनुमापित भविष्यसीमे’शी (future-conformal boundary) जोडली जाते. ही गणिती प्रक्रिया एका विशिष्ट परिस्थितीत, जेव्हां कालावकाशाचा भौतिक मापीय (metric) हरवलेला असतो तेव्हां, भौतिक स्वरूप धारण करते; किंबहुना भौतिकविश्व आणि गणितीविश्व हा फरक त्या कालावकाशात रहात नाही. CCC मध्ये भौतिक मापीय (metric) अनुकोणीय (conformal) होतो. ज्यांना पेनरोज यांचा (आणि त्या आधी कार्ल पॉपर यांचा) त्रिविध विश्वाचा तत्त्वात्मक-रूपकात्मक दृष्टिकोन माहीत आहे त्यांना या गणिती-भौतिक प्रक्रियेचे आश्चर्य वाटणार नाही. या त्रिविध विश्वाच्या गृहीतकात भौतिक जग (physical world), मानसिक जग (psychological world) आणि गणितीय जग (platonic world) यांचा एकमेकांशी घनिष्ठ आणि रहस्यमय संबंध आहे आणि ही तीनही जगे एकाच विश्वाचे तीन पैलू आहेत असे पेनरोज मानतात. गणित पदार्थविज्ञानाला परिभाषित करते, एवढेच नव्हे तर पेनरोज यांचा कल गणितीय शुद्ध बौद्धिक जग स्वायत्त आहे आणि ते इतर जगांच्या चलन-वलनाला कारणीभूत होत असावे असे मानण्याकडे दिसतो. आस्तिक या गणितीय जगाला ईश्वर-सृष्टी असे म्हणू शकतात. पण या गणिती सृष्टीचा कोणी निर्माता नाही, निदान पेनरोज किंवा पॉपर हे दोघेही तसे म्हणत नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल. आस्तिकांचा कल मानसिक जगाला स्वायत्त मानण्याकडे असतो. बाकीची दोन जगे ही वैश्विक मानसिक जगातल्या कल्पना असतात. अनादि-अनंत अनुकोण चक्रिय विश्व (CCC) जगन्निर्मात्याची संकल्पना निरर्थक बनवते. CCC ला गणिती आधार असला तरी त्याबरोबर सध्याच्या पदार्थविज्ञानाचा काही आधार सापडतो का ते पाहू.

(२) BBC आणि CCC च्या सध्याच्या मानक आकृतिबंधात महास्फोटानंतर विश्व अनंत काळ प्रसरण पावते आणि फार दूरच्या भविष्यात (> 10^100 वर्षे) फक्त किरणोत्सर्ग तेवढा उरतो. हे कसे होत असावे? ज्याला आपण वस्तुमात्र (made of Fermions) म्हणतो ते सर्व कृष्णविवरांत (Black Holes) गडप होते. नंतर कृष्णविवरे स्वतःच स्वतःच्या किरणोत्सर्गाने नष्ट होतात आणि उरतो फक्त विद्युत चुंबकीय किरणोत्सर्ग आणि कृष्णविवरांच्या टक्करीतून निघालेले गुरुत्वतरंग. हा किरणोत्सर्ग अनुकोणीय रक्षित (conformally invariant) आणि मापीयमुक्त (without space-time metric) असतो. पेनरोज यांच्या मते हाच उत्सर्ग आपण आज CMBR च्या रूपात पहात असतो. थोडक्यात, CMBR महास्फोटातून आलेला नसतो तर महास्फोट CMBR मधून आलेला असतो. विश्व हे महास्फोटाच्या आधीच समदेशिक (uniform, isotropic) बनलेले असते. BBC च्या अतिवृद्धी गृहीतकाचे (rapid inflation hypothesis) CCC मध्ये अशा प्रकारे अर्थांतर होते. पूर्वीच्या विश्वचक्रातील (महायुगातील) किरणोत्सर्गाच्या आणि गुरुत्वतरंगाच्या खुणा आपल्याला आजही CMBR पहाता येतील असे पेनरोज आणि त्यांच्या सहकार्यांना वाटते. तसा काही पुरावा २०१८ ला मिळाल्याचा त्यांचा दावा आहे.

(३) कृष्णविवरे नष्ट होताना त्यांच्या गुरुत्वीय मिती आणि तत्संबंधित प्रावस्थासमष्टीसुद्धा नष्ट होतात आणि न्यूनतम विस्कळ पुनर्स्थापित होतो (> 104100 वर्षे). याला पेनरोज ऊष्मागतिकीच्या नियम-२ चे उल्लंघन मानीत नाहीत कारण यात प्रावस्थासमष्टीसुद्धा न्यूनतम झालेली असते. हे प्रावस्थासमष्टीचे नष्ट होणे आजच्या पदार्थविज्ञानाच्या बाहेरचे आहे. CMBR चे अवलोकन करताना आज आपल्याला हा उत्सर्ग अधिकतम विस्कळाचा निर्देशक वाटतो, पण ‘प्रत्यक्षात’ तो न्यूनतम प्रावस्थासमष्टीचा निर्देशक असतो. विस्कळ आणि प्रावस्थासमष्टी यांच्या पुनर्स्थापनेमुळे (reset) हे शक्य होते. CCC च्या अनुमापित, अनुक्रमित, भूत आणि भविष्य यांच्या सीमा जोडल्या जाण्याची प्रक्रिया तेव्हांच शक्य होते.

(४) विस्कळ आणि प्रावस्थासमष्टी यांचे न्यूनतम मूल्य स्थापित झाल्यावर CCC महास्फोटासाठी पुनः सज्ज होते. नवीन CCC विश्वचक्र BBC विश्वचक्रासारखेच असते; फक्त त्यात महास्फोटानंतरची अतिवृद्धी (rapid inflation) गृहीत धरलेली नसते; कारण वर दिल्याप्रमाणे ती महास्फोटाच्या आधीच झालेली असते. गुरुत्वमिती पुन्हा प्रकट होतात आणि प्रावस्थासमष्टीचे आयतन (phase-space volume) आणि विस्कळ (entropy) ऊष्मागतिकीच्या नियम-२ नुसार पुन्हा वाढते. गणिती जगाचे बुद्धिप्रामाण्य CCC मध्ये एका वेगळ्याच प्रकारे अधोरेखित झालेले दिसते!

ईश्वर (God) आणि नास्तिक्य (atheism)

आपण आधी पाहिल्याप्रमाणे CCC मध्ये ईश्वराला विश्वनिर्माता म्हणून स्थान नाही हे जरी खरे असले तरी आस्तिकांना आवडणारा दिव्यत्वाचा किंवा अद्भुताचा स्पर्श त्याला आहे. बुद्धिवादी-सौंदर्यवादी आस्तिकांना जीवसृष्टीचा शोध घेणारा, तो शोध घेताना आनंदित, अचंबित होणारा, सांस्कृतिक-ऐतिहासिक दृष्टीने धर्म शाळेत शिकवला जावा असे सांगणारा रिचर्ड डॉकिन्ससारखा नास्तिक हा आस्तिकच वाटतो. अशा आस्तिकांना CCC जवळची वाटते कारण त्यात गणितीअवकाश भौतिक होतो. विश्वाच्या गुरुत्वमिती शून्य होतात (विश्वाचा मृत्यू?) आणि महास्फोटानंतर नवीन गुरुत्वमिती परत चलनात येतात (विश्वाचा पुनर्जन्म?) असे मानण्याची सोय असते. सर्व विश्वालाच ईश्वर मानणार्‍या सर्वेश्वरवादी (pantheist) आस्तिकाला CCC मधल्या गणिती-भौतिक अद्वयाविषयी काही वावगे वाटत नाही. ऊर्जा-वस्तुमानाच्या अविनाशित्वाचा सिद्धांत, विस्कळाचा नियम, गुरुत्वाचा नियम, पुंजवादाचे तरंग फलन वगैरे सर्व प्रक्रिया (deterministic या अर्थाने) लक्ष्यवेधी आहेत पण त्यांचा लक्ष्यस्वरूप एकत्रित परिणाम आपल्याला वैश्विक कालावकाशात माहीत होईल असे नाही. आस्तिक हा एकत्रित परिणाम हेतुपुरस्सर होतो असे मानतात आणि नास्तिक तसे मानीत नाहीत. आस्तिक लक्ष्य आणि हेतू यांचा अद्वय मानतात; नास्तिक तसे मानत नाहीत.

बुद्धिप्रामाण्य मानणारा नास्तिक, वेद किंवा इतर धर्मग्रंथ काय म्हणतात यापेक्षा प्रयोगी-उपयोगी विज्ञान काय म्हणते याचा विचार करतो. ज्ञानाचा अभाव म्हणजे ईश्वर हे समीकरण तो मान्य करत नाही. तो प्रयोगसिद्ध पुरावे मागतो आणि त्याची चिकित्सा करतो. ईश्वर ही त्याच्यालेखी केवळ निरुपयोगीच नव्हे तर समाजहिताच्या दृष्टीने हानिकारक संकल्पना असते. ईश्वराच्या आणि धर्माच्या नावाने इतिहासात झालेली युद्धे आणि हिंसा याचा दाखला नास्तिक देतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत फारसा फरक नास्तिक करत नाही. मात्र यात हातघाईवर येण्याची आवश्यकता नसते. कित्येकदा आस्तिक्य आणि नास्तिक्य यांतील सीमारेषा अस्पष्ट होते. वस्तुनिष्ठ सत्याची ओढ दोघांना असू शकते. सहिष्णु मानवतावाद दोघांना मान्य असतो. आस्तिक जेव्हां विश्वातल्या एकूण ऊर्जा-वस्तुमानाला ईश्वरप्रकृति मानतो, किंवा चिद्भानाला मूलाधिष्ठान मानतो, किंवा मूल्यव्यवस्थेलाच ईश्वर मानतो तेव्हा आस्तिक्य आणि मूल्यव्यवस्था मानणारे नास्तिक्य यातला बहुतेक फरक फक्त पारिभाषिक (terminological) एवढाच उरतो. स्वतःची अशी नैतिक मूल्यव्यवस्था आस्तिकांना आणि नास्तिकांना एकमेकांच्या जवळ आणते किंवा दूर करते.

भारतीय अध्यात्मात कर्मसिद्धांत – पेराल तसे उगवेल (पुण्य: पुण्येन कर्मणः भवति, पापः पापेनेति) – मूल्यव्यवस्थेचा पाया आहे. या पायावर आस्तिक स्वतःची अशी लौकिक मूल्यव्यवस्था उभी करू शकतात. दर्शनपरंपरेमध्ये जीवनमुक्ती, निर्वाण, साधनचतुष्टय, निष्काम कर्म, सम्यक ज्ञान, यम संयम, आर्य सत्य वगैरे संकल्पनांनी ही मूल्यव्यवस्था प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मविपाकात कर्म आणि त्याचे फल यांना जोडणारे पारलौकिक तत्त्व म्हणजे ईश्वर. कधी ते अदृष्ट या नावाने येते. कधी अपर्व नावाने येते. तर कधी बौद्ध प्रज्ञप्ती बनून निनावी येते. हे तत्त्व एखाद्या भौतिक सिद्धांतासारखेच आंधळे, म्हणजेच नि:पक्ष मानले जाते. वेदांताने त्याला ईश्वर मानले आहे हे खरे; पण ते नावापुरते. कर्माला कर्ता नसतो; फक्त करणे (instruments) असतात. ईश्वर आणि कर्ता-कर्म हा अध्यारोप असतो आणि कर्माची गती गहन असते!

भारतीय दर्शनपरंपरेत जगन्निर्मात्याला किंवा जगन्नियंत्याला विशेष स्थान नाही. विश्वनिर्माता ईश्वर असल्याचा दावा फक्त न्यायशाखा करते आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, बाकी शाखा स्वायत्त जगन्निर्माता मानत नाहीत. वेदांतामध्ये किवा उपनिषदांत ईश्वर हे अंतिम सत्य नाही. तीच गोष्ट बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानांमध्ये आहे. ‘निर्मात्याशिवाय निर्मिती’, ‘रचनाकाराशिवाय रचना’, ‘विधिकाराशिवाय विधी’ किंवा ‘कर्त्याशिवाय कर्म’ हे अद्वैत वेदांतात, सांख्यदर्शनात किंवा माध्यमिकांत वैश्विक परिमाणाच्या संदर्भात मानले गेले आहे. लोकायत किंवा चार्वाक यांचा निरीश्वरवाद आणि पदार्थवाद (materialism) प्रसिद्ध आहेच!

बहुतेक नास्तिकांसाठी नैतिक मूल्ये ही उत्क्रांत आणि संक्रमणशील (मीम या अर्थाने) असतात. पारलौकिक न्यायावर नास्तिकांचा विश्वास नसतो. मात्र लौकिक न्यायव्यवस्था कार्यक्षम नसेल, किंवा ती अस्तित्वातच नसेल तर सामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागावा याला सोपे उत्तर नसते. सत् (चांगले) आणि असत् (वाईट) यांमध्ये फरक करू शकणारी आणि चांगल्याचा आग्रह धरणारी सदसद्विवेकबुद्धी (conscience) समाजात विकसित करणे हा त्यावरचा दूरगामी उपाय मानता येईल. या अर्थाने विवेकवादाला मानणारी भारतीय दर्शनेच नव्हेत तर सदसद्विवेकबुद्धी असलेले नास्तिकसुद्धा आस्तिकच असतात असे समजायला हरकत नाही.

संदर्भ:
Philosophy

 1. Methods of Knowledge: Sw. Satprakashananda, Advaita Ashrama (1965)
 2. भारतीय तत्त्वज्ञान, लेखक: श्रीनिवास हरि दीक्षित, फडके प्रकाशन, बारावी आवृत्ति, २०१५ (मराठी)
 3. भारतीय दर्शन – आलोचन और अनुशीलन: डॉ. चन्द्रधर शर्मा, मोतिलाल बनारसीदास, २०१० (हिन्दी)
 4. भारतीय दर्शन: डॉ. उमेश मिश्र, प्रकाशन ब्यूरो, उत्तर प्रदेश सरकार, १९५७ (हिन्दी)
 5. Arditu gafarrach sfers: SŤ. GRIGT 741 d. Paart, fagairt 347, 3840 (9-4)
 6. A New History of Western Philosophy: Anthony Kenny (Oxford University Press, 2012)
 7. Central Philosophy of Buddhism: T. R. V. Murty; Unwin 1960
 8. The Logic of Scientific Discovery: Karl Popper, Routledge Classics (1959)
 9. The Structure of Scientific Revolutions: Thomas S. Kuhn, Univ. of Chicago Press (1970)
 10.  The Two Fundamental Problems of the Theory of Knowledge: Karl Popper, Routledge (2009)
 11.  Mind and Cosmos: Thomas Nagel, OUP (2012)
 12.  Mystery of Consciousness: John Searle, NYREV 1997
 13.  The Blackwell Companion to Consciousness: Ed. Schneider and Velmans, Willy Blackwell (2017)
 14.  Mind: Introduction to Cognitive Science, Paul Thegard, MIT Press (2012)
 15.  Advaita: A Contemporary Study – 2nd Ed : Shashikant Padalkar, Createspace (2017)
 16.  Advaita Vedanta: A Student’s Note – 2nd Ed : Shashikant Padalkar, Createspace (2013)

Formal, Natural, & Social Sciences

 1. Computability, Complexity, and Languages: Davis, Sigal, and Weyuker; AP (1994)
 2.  Algorithmic Randomness and Complexity: Downey, and Hirschfeldt, Springer (2010)
 3.  Probability and Information: David Applebaum, CUP (2008)
 4. The Road to Reality: Roger Penrose, Jonathan Cape, London (2004)
 5.  Motion Mountain (Physics 5-vol. book): https://www.motionmountain.net/
 6. Cycles of Time: Roger Penrose, Vintage (2011)
 7. Artificial Intelligence, A Modern Approach: Russell and Norwig, Pearson (2009)
 8. Life: Science of Biology, Sadava + 3H, W. H. Freeman & Co. (2016)
 9. Molecular Biology of the Gene: Watson, Baker, Bell, Gan et al, Pearson (2014)
 10. The Long Evolution of Brain and Mind: Gerhard Roth, Springer (2013)
 11. Darwin’s Black Box (1996); and The Edge of Evolution (2007): Michael Behe, Free Press
 12. The Logic of Chance: EV Koonin, Pearson (2012)
 13. On Math Matter and Mind: Hut, Alford, and Tegmark (2005), arxiv.org/abs/physics/0510188
 14. Theory of Justice: John Rawls, HUP (1999)
 15.  A Natural History of Human Morality: Michael Tomesello, HUP (2016)
 16. Hinduism and Evolution: Shashikant Padalkar, https://ssrn.com/abstract=3298891 (2018)

अभिप्राय 5

 • प्रिय शशी,
  भाषा माझ्यासाठी फारच अवघड होती. त्यामुळे लक्ष राहिलं नाही, या विषयात रस असूनही. सामान्यांसाठी नेहेमी वापरल्या जाणाऱ्या शब्दात लिहिशील का?
  अजित पडळकर

 • अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. पण समजण्यास कठीण आहे. अजित म्हणतो तस जरा सोपे करता येईल का?

 • दोन्ही पडळकरांना मनापासून धन्यवाद. प्रयत्न करतो, पण त्यातल्या तांत्रिक मुद्द्यांमुळे या सोपे करण्याच्या प्रक्रियेला मर्यादा आहेत. माझा God, Science, and Advaita हा SSRN वरचा पेपर साधारणपणे याच विषयावर आहे. तो इंग्रजीत असला तरी समजायला जास्त सोपा जावा. वाचून पहा. https://papers.ssrn.com/sol3/papers.cfm?abstract_id=3056908

 • अतिशय क्लिष्ट भाषेतील हा प्रदीर्घ लेख रोखठोकपणे देवाचे आस्तित्व नाकारु शकलेला नाही. उलट सुलट उड्या मारून शेवटी आस्तिक्य आणि नास्तिक्य यांत भेद करणे शक्य नाही असाच लेखाचा समारोप झालेला आहे असेच दिसून येते. वादासाठी वा द असेच या लेखाचे एकूण स्वरूप दिसून येते. महा स्फोटाची चर्चा करूनही आस्तिकांची ईश्वरा संबंधी किंवा या स्रुष्टीच्या निर्मात्या संबंधीची संंकल्पना खोडता आलेली नाही असेच दिसून येते. संपूर्ण लेख ग्रुहितावरच आधारित आहे.

 • श्री वेदक यांची प्रतिक्रिया वाचून गंमत वाटली. त्यांचे निरीक्षण सर्वसाधारणपणे बरोबरच आहे. पण समजुतीचा घोटाळा दिसतोय.

  देवाला रोखठोक नाकारणं हा माझा हेतू नाही. या प्रकारची नास्तिकता मला शाळकरी – शाळेत शिकणाऱ्या मुलांवर विवेकवादाचे संस्कार करणे या अर्थानं – वाटते. हे संस्कार महत्त्वाचे आहेत. पण ते वेगळ्या प्रकारे हाताळायला हवेत. इथे माझा उद्देश बुद्धीप्रामाण्य आणि नास्तिकता (आणि आस्तिकता) यांची चिकित्सा ही तर्क, विज्ञान, आणि तत्त्वज्ञान – विशेषतः भारतीय तत्त्वज्ञान – यांच्या चौकटीत करणं हा आहे. ही चिकित्सा बहु-विषयक (multidisciplinary) आहे आणि ती समजण्यासाठी बहुविषयक पृष्ठभूमिची आणि पूर्वग्रहरहित वृत्तीची आवश्यकता आहे. ती नसेल तर विषय क्लिष्ट वाटू शकतो, पारिभाषिक संज्ञा अपरिचित होतात, आणि दोन्ही बाजूंची मांडणी म्हणजे उलटसुलट उड्या वाटू लागतात. तत्वज्ञानांत, विशेषतः सत्ताशास्त्रात, गृहितके आवश्यक असतात याचा विसर पडतो.

  याचा अर्थ माझ्या लेखात सुधारणा होऊ शकत नाहीत असे नव्हे. काही कीबोर्डच्या चुका (typos) असू शकतात; क्वचित मांडणीमध्ये संदिग्धता असू शकते. अशा जागा माझ्या माहितीप्रमाणे फार थोड्या आहेत.

  आस्तिक्य – नास्तिक्य या विषयीची चर्चा शेवटी मूल्य-व्यवस्थेवर (axiology, ethics वर) येऊन थांबते आणि त्याचाच भाग बनून पुढे जाते. भारतीय दर्शनांत देव महत्त्वाचा नाही, पण देवत्वाला.. म्हणजेच मूल्यांना महत्त्व आहे. माझा निबंध हेच सांगू पहातो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.