धर्म आणि हिंसा

आज ‘धर्म’ ह्या शब्दानं अत्यंत शक्तिशाली अशा स्फोटकाची जागा घेतली आहे. हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन…. हे शब्दोच्चारही मनात दहशत निर्माण करताहेत. धर्माच्या नावाखाली जगभर चाललेला उच्छाद केवळ उद्विग्न करणारा आहे. 

घरापासून रस्त्यापर्यंत चाललेल्या हिंसेला धर्मच जबाबदार ठरावा…. धर्माचं आपलं आकलन इतकं तोकडं असावं……. बिनदिक्कतपणे गलिच्छ राजकारणासाठी….. सत्ताप्राप्तीसाठी…. स्त्रीच्या उपभोगासाठी…. दलितांच्या खच्चीकरणासाठी तो वापरला जावा…. आणि आपण फक्त हतबलतेनं बघत राहावं! धर्म अशी राखरांगोळी करून टाकतो का माणसाची? की धर्माची ढाल करत वेगळंच काही राजकारण जगभरात चालू आहे? ह्या सगळ्या विध्वंसामागे सत्तालालसेची प्रेरणा कार्यरत आहे का? सत्तालालसेपोटी माणूस धर्मालाच ओलिस ठेवत असेल तर त्यासारखं मोठं दुर्दैव नाही. ह्या दुर्दैवाची अखेर व्हायची असेल तर जन्मानं प्राप्त होणारे हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान हे धर्म नामशेष व्हायला हवेत. 

जगभराचा इतिहास आणि आजचं वर्तमानही हेच सांगतं की माणसानं सत्तालालसेपोटी धर्माला ओलिस ठेवलेलं आहे. इस्लामांनी, ज्यूंनी आणि ख्रिश्चनांनी अगदी धर्मस्थापनेच्या काळापासून शतकानुशतकं आपापसात घनघोर युद्धं का केली याचं उत्तर त्यांच्या धर्माज्ञांमध्येच सापडतं. युद्धकाळातल्या त्यांच्या भूमिका त्यांच्या धर्मानं त्यांना तसे आदेश दिल्याचं स्पष्ट करतात. हिंसेच्या अशा आदेशांचा समावेश करणारे धर्मग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष देवानं पाठवलेल्या दूताच्या, प्रेषिताच्या तोंडची वचनं! 

धर्मपोथ्यांमध्ये परमेश्वराच्या तोंडचे आदेश म्हणून कोणते आदेश घालावे आणि कोणते घालू नयेत हे ठरवणारा प्रेषित प्रत्येक धर्मात शिरोधार्य होता आणि आजही तो नसला तरी त्याचे आदेश शिरोधार्य आहेत. हे आदेश हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे आहेत. म्हणूनच साऱ्याच धर्मांचे इतिहास आणि वर्तमानही रक्तलांच्छित आहेत. असे हिंसेला प्रोत्साहन देणारे देव आणि आणि ‘सत्ता हेच सर्वस्व’ मानणारे त्यांचे प्रेषित नाकारायलाच हवेत. 

‘परमेश्वरानं प्रेषिताच्या तोंडून वदवलेली वचनं’ असं म्हणत त्याआधारे जेव्हा धर्मशास्त्रं लिहिली गेली तेव्हा त्यांचं उपद्रवमूल्यच अधिक असणार हे उघड होतं. हे उपद्रवमूल्य स्पष्ट शब्दांत मांडण्याचं धाडस गेल्या काही शतकातल्या तत्त्वचिंतकांनी दाखवलं. विशेषत: एकोणिसाव्या, विसाव्या आणि आज एकविसाव्या शतकातही पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनी धर्माच्या आणि ईश्वरकल्पनेच्या विरोधात आघाडी उघडलेली दिसते. ईश्वर आणि धर्म आज हिंसेला जे प्रोत्साहन देत आहेत ती हिंसा थांबवायची असेल तर मुळात तर्कशास्त्राला आणि विवेकवादाला धरून नसलेल्या या देव-धर्माच्या कल्पनांनाच एका विशिष्ट मर्यादेपलिकडे मनुष्यजीवनात हस्तक्षेप करू देता कामा नये ही भूमिका त्यांनी घेतली.

अन्यायानं दुसऱ्याचं राज्य हरण करणारे आणि कपटानं दुसऱ्याच्या राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित करणारे लोक आपल्या दुष्कृत्यांना धर्मवचनांची अनुकूलता आहे असं भासवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. या प्रयत्नात निर्वैरता आणि अहिंसा या धर्माच्या मूळ वैशिष्ट्यांनाच ते खोडून काढत असतात. धर्मसंबंधात म्हणूनच सामान्यत: जे चित्र दिसतं ते असं की, सामान्य लोक धर्मा आणि देवावर भोळेपणानं विश्वास ठेवतात. शहाणे, ज्ञानी लोक यातला खोटेपणा समजून असतात आणि स्वार्थी राज्यकर्ते राज्यविस्तारासाठी असलेली धर्माची उपयुक्तता ओळखून असतात. 

यात सगळ्यात हानिकारक आहे तो राजकारणासाठी केला जाणारा धर्माचा वापर! सत्ताकांक्षा माणसाला राक्षस बनवते. संपूर्ण जागतिक पटलावर आज सत्तेसाठी, सार्वभौमत्वासाठी चाललेली हिंस्त्र स्पर्धा आणि हजारो निरपराधांचा बळी घेणाऱ्या आतंकवादी कारवाया याला साक्ष आहेत. अल्लाह हे परमेश्वराचं एकमात्र रूप आहे आणि सर्वांनी ते स्विकारलंच पाहिजे हा इस्लामचा अट्टाहास जगभर क्रौर्याची परिसीमा गाठताना दिसतो आहे तो म्हणूनच! 

धर्म ही संकल्पना माणसाचं नुकसान करते कारण माणसं धर्मसंकल्पनेला व्यापून राहिलेल्या परमेश्वराच्या आधीन होतात. मरणोत्तर स्वर्गप्राप्तीसाठी त्याच्या आज्ञेनंच मनुष्यसंहार घडवून आणणारं अनैतिक वर्तनही ती बिनदिक्कतपणे करतात. परमेश्वर जर असेलच तर क्रौर्य हे त्याचं वैशिष्ट्य असू शकत नाही. पण ज्याअर्थी त्याच्या प्रेरणेनं जगात क्रौर्य घडून येतं त्याअर्थी हा काही माणसाचं हित करणारा परमेश्वर नाही. पाश्चात्य तत्त्वज्ञ ‘धर्माला आणि परमेश्वरा’ला नकार देतात तो ह्या दोन्ही कल्पना हिंसेला आश्रय देणाऱ्या आहेत म्हणूनच! तीन हजार वर्षांपूर्वी चार्वाक, जैन, बौद्ध, सांख्य, पूर्वमीमांसा ह्या प्रमुख सहा भारतीय दर्शनांनीसुद्धा परमश्वेर कल्पना नाकारलेली आहेच.

ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात वर्धमान महावीरानं स्थापन केलेला जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे दोन्ही अहिंसा आणि भिन्नमतसहिष्णुता बाळगणारे धर्म. हे दोन्ही धर्म ईश्वरकल्पना नाकारतात. जैनधर्मीय सृष्टीकर्ता ईश्वर तर मानत नाहीतच पण त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्यांना ते अनेक प्रश्न करतात. उदा. मुळात परमेश्वरानं जग का निर्माण केलं असेल? केवळ लहर म्हणून असेल तर त्यात एवढी सुसंबद्धता कशी? ईश्वर करुणेनं प्रेरित झाला होता हे कारण असेल तर जगात एवढे दु:ख का? तो करुणामयी परमेश्वर त्या दुःखांचं निराकरण का करत नाही? केवळ लीला म्हणून ही सृष्टी त्यानं निर्माण केली असेल तर असा पोरखेळ करणारा ईश्वर न मानलेलाच बरा. शिवाय मानायचाच असेल तर मग एकच ईश्वर का मानायचा? अनेक मानायचे तर ते मानण्यावरून माणसां-माणसांत कलह निर्माण होणार. म्हणूनच ज्या कल्पनेत फक्त संकटांचीच चाहूल आहे ती ईश्वरकल्पना मानावीच कशाला? असे तर्कशुद्ध प्रश्न जैन धर्म करतो. 

पूर्वमीमांसा हे दर्शनही ईश्वरकल्पनेस नकार देते. उदा. सृष्टी उत्पन्न करण्यात परमेश्वराचा हेतू काय? ही सृष्टी निर्माण करण्यामागे ‘निर्मितीतला आनंद’ हे प्रयोजन मानायचे तर अशा दु:खपूर्ण मनुष्यसृष्टीची निर्मिती तो स्वत:च्या आनंदासाठी करेल हे संभवत नाही. ‘करुणा’ ही जर त्याची सृष्टीनिर्मितीची प्रेरणा मानावी तर आधी सृष्टीची निर्मिती, नंतर मानवनिर्मिती, नंतर त्यांना दु:खात टाकणं आणि मग करुणा दाखवणं, एवढा खटाटोप परमेश्वर कशासाठी करेल? तेव्हा हा सारा मनुष्याच्या कल्पनेतून साकार झालेला खेळ आहे, ह्याच दृष्टीनं परमेश्वराकडे बघावे लागेल असं प्रतिपादन ते करतात. 

चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य ही भारतीय दर्शनं सृष्टीच्या निर्मितीमागे परमेश्वर नावाची कोणतीही अरुपात्मक शक्ती नाही असं तर्कशुद्धपणे सिद्ध करू पाहतात. सृष्टीची व्यवस्था लावताना जे ‘प्रत्यक्ष प्रमाण’ म्हणून समोर येत नाही ते नाकारणं ही भूमिका ते घेतात. 

ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात जन्माला आलेल्या एपिक्युरस नावाच्या पाश्चात्य विचारवंतानंही परमेश्वराविषयी भय आणि त्याची केली जाणारी पूजा याबाबतीत जे काही तर्कशुद्ध प्रश्न केले आहेत ते भारतीय दर्शनांना समांतर जाणारे आहेत. एपिक्युरसनं परमेश्वराच्या अस्तित्वाला शह देणारे काही प्रश्न केले आहेत. एपिक्युरस म्हणतो, “परमेश्वराला जगातली दुष्टता रोखण्याची इच्छा आहे पण त्यासाठी आवश्यक असलेलं सामर्थ्य त्याच्याजवळ नसेल तर तो षंढ, दुबळा आहे. त्याच्याकडे सामर्थ्य आहे पण त्याची इच्छा नसेल तर तो दुसऱ्याचं वाईट चिंतणारा आहे. तो समर्थही असेल आणि त्याची इच्छाही असेल तर मग जगात एवढी दुष्टता का दिसते? तो समर्थही नाही आणि त्याला इच्छाही नाही तर मग त्याला परमेश्वर का म्हणायचं?” एपिक्युरसनं हे जे प्रश्न केले आहेत त्यात जो परमेश्वर माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या कामी त्याला कसलीही मदत करत नाही, जगात घडणाऱ्या कुठल्याही घटनेवर ज्याचं नियंत्रण नाही, तो आहे किंवा त्याला मनुष्यजातीविषयी कळवळा आहे हे कसं मानावं, त्यापेक्षा असल्या परमेश्वराला नाकारावं हेच बरं हा अर्थ सूचित आहे. 

व्होल्टेअर, मिल, स्पेन्सर, नित्शे, मार्क्स, सार्च, काम्यू, फॉईड, रसेल हे पाश्चात्य तत्त्वचिंतक कट्टर निरीश्वरवादी होते. आणि आज विसाव्या शतकातही रिचर्ड डॉकिन्स, डॅनियल डेनेट, ख्रिस्तोफर हिचेन, जॉन ग्रे, सॅम हॅरिस यांसारखे तत्त्वज्ञ हीच निरीश्वरवादी भूमिका घेताना दिसतात. 

विचारवंतांचा परमेश्वराकडे बघण्याचा दृष्टिकोन तितकाच चिकित्सक असणार यात शंका नाही. म्हणूनच परमेश्वर कल्पनेसंबंधी निरुत्तर करणारे अनेक प्रश्न त्यांनी केलेले आहेत. परमेश्वर मानण्यामागे माणसाच्या मनात असलेला धाक अर्थशून्य कसा आहे याचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. पण अशी चिकित्सा सर्वसामान्य लोकांना रुचत नाही आणि सर्वसामान्य लोकांचा हा भाबडा श्रद्धाभावच कट्टर धर्मांधांना साऱ्या जगावर आपला वचक बसवण्यासाठी उपयोगी पडतो आहे. बहुतांश माणसं कार्य-कारण मीमांसा न करता आंधळेपणानं परमेश्वरावर विसंबतात. सर्व बाबतीतलं श्रेय-अपश्रेय त्यालाच देऊन टाकतात. मंदिर, मशीद आणि चर्च या तिन्ही जागा माणसाची विचारशक्ती मारून टाकतात यात कोणताच संदेह नाही. जगात आजवर झालेली सगळी धर्मयुद्धं आणि त्यातून घडलेला मानववंशसंहार या नुकसानीचा ढळढळीत पुरावा आहे. 

जागतिक पातळीवर हे असं चित्र आहे. वैयक्तिक पातळीवरही भाबड्या श्रद्धाभावानं नुकसानच झालं आहे. शिवाय परमेश्वर नुसता आहे एवढंच नाही तर तो आपला रक्षणकर्ता आहे हे आणखी एक असत्य लोकांच्या मनावर सत्य म्हणून बिंबवलं गेलं आहे. परमेश्वरानं माणसाला जन्माला घातलं आहे त्यामुळे माणसाच्या चरितार्थाची चिंताही तोच करणार, माणसावरच्या प्रत्येक संकटात, अगदी रानावनातून एकटं जात असतानाही तो त्याच्या सोबत असणार, जागेपणीच नव्हे तर माणसं झोपेत असतानाही तो त्यांची काळजी घेणार अशा दाट श्रद्धेनं जगणारी माणसं मग सदैव चिंताग्रस्त का असतात? परमेश्वरावर ज्यांच्या अथांग विश्वास असतो आणि त्याच्या नामस्मरणाशिवाय ज्यांचा दिवस जात नाही अशा माणसांवर मग मुळात संकटे कोसळतातच कशी? चांगलं वागणाऱ्याला देव मरणोत्तर स्वर्गाचं बक्षीस देणार असेल आणि जिवंत असताना मात्र त्याला नरकयातना भोगायला लागणार असतील तर अश्यावेळी परमेश्वराच्या असण्याचा काय उपयोग? दारिद्र्यापोटी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला मरणोत्तर स्वर्ग घेऊन करायचंय काय? परमेश्वर असेलच आणि काही बक्षीस देणार असेलच तर ते जगतानाच का मिळत नाही? फक्त विचारवंतांनाच हे प्रश्न का पडावेत? आपण सारेचजण आपापल्या कुवतीनुसार ह्या निराशाजनक अनुभवांकडे डोळसपणानं पाहणार आहोत की नाही? 

प्रत्यक्षात ‘परमेश्वर’ या कल्पनेनं माणसाचं फायद्यापेक्षा नुकसानच अधिक झालं आहे हे सत्य आहे. परमेश्वर आहे म्हणून आपण आहोत हे एकदा लोकांच्या मनावर पुरतं बिंबलं की मग आपल्या ह्या रक्षणकर्त्याविषयीची आपली कृतज्ञता त्याच्या नावाचा प्रसार करून व्यक्त करायची, तो आपला रक्षणकर्ता आहे ह्या आपणच निर्माण केलेल्या समजाचा विसर पडून कधी त्याच्या रक्षणाचा आव आणत पण आतून आपले स्वार्थ साधत परस्परांच्या विरोधात तलवारी उपसायच्या, त्याच्या साऱ्या आज्ञा आपल्याला प्रमाण आहेत असं दर्शवत कनिष्ठ जात-वर्णांवर, स्त्रियांवर, मजुरांवर अत्याचार करायचे, शस्त्रास्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करत मिळतील तितके भूप्रदेश आपल्या अंकित करायचे, तसे अधिकार परमेश्वरानंच आपल्याला दिले आहेत असं भय गोरगरीबांच्या मनात निर्माण करायचं, त्याला मानणाऱ्याला बक्षीस आणि न मानणाऱ्याला शिक्षा असा धाक त्याच्या संदर्भात निर्माण करायचा आणि अंतिमत: आपली सत्ताकांक्षा पूर्ण करायची. देवाच्या अस्तित्वाचा वापर असा सत्ताकांक्षेच्या पूर्तीसाठी केला जातो ही वस्तुस्थिती आहे. 

धर्म हा अस्मितेचा विषय बनवत जेव्हा अनन्वित हिंसाचार घडतो तेव्हा त्या हिंसाचारात दुर्दैवानं ‘परमेश्वर’ ह्या कल्पनेचा वाटा मोठा असतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. साऱ्याच जगाच्या ह्या अराजकाच्या वाटेनं सुरू झालेल्या प्रवासाचं मूळ माणसानं मानलेल्या परमेश्वराच्या अस्तित्वकल्पनेत असावं हा मोठा दुर्दैवाचा भाग आहे.

त्यामुळे धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली चालणारी हिंसा थांबवायची असेल तर मुळात ह्या दोन्ही गोष्टींचं समाजमनातून उच्चाटन झालं पाहिजे. जगातली काही निरीश्वरवादी, विचारवंत मंडळी परमेश्वर ही कल्पना किती भ्रामक आहे, त्यावर विश्वास ठेवण्यानं माणसं तर्कशुद्ध विचार करू शकत नाहीत आणि परिणामी परमेश्वर त्यांच्या प्रगतीतला अडथळा बनतो, नुसताच अडथळा नव्हे तर त्यांना परत अश्मयुगापाशी आणून सोडतो हे लोकांना समजावून देण्यासाठी आयुष्यभर झटत आहेत. 

खरंतर देव कशाला मानावं आणि देवत्व कशात आहे, इथपासून तर्कशुद्ध विचार व्हायला हवा. देव म्हणजे जर माणसाला संकटग्रस्त परिस्थितीतून सोडवणारी, जगण्यासाठी त्याला मदत करणारी शक्ती असेल तर त्याच्या अडीअडचणीत धावून येणारा माणूस त्याच्यासाठी देव असू शकतो. अन्नधान्य देणारी जमीन त्याच्यासाठी देव असू शकते. वारा, पाणी, सूर्य त्याच्यासाठी देव असू शकतात. माणसाला जगण्यासाठी मदत करणाऱ्या आणि चांगलं नीतीमान जगण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या सत्य, न्याय, नीती यांसारख्या सन्मूल्यात देवत्व आहे. समजा एखाद्यानं असा देव मानला तर त्यानं काही बिघडत नाही. पण माझा देव – तुझा देव ह्या भावनेला आणि त्यातून उद्भवणाऱ्या कलहाला मंदिर, मशीद, चर्च ह्यांसारख्या प्रार्थनास्थळातूनच सुरुवात होते हे लक्षात घेऊन अशी प्रार्थनास्थळं बंद व्हायला हवीत. सामान्यांच्या निरुपद्रवी वाटणाऱ्या श्रद्धाभावात या कलहाचं मूळ आहे म्हणूनच या श्रद्धाभावाचं विश्लेषणही व्हायला हवं.

दुसरीकडे कृष्ण, मोझेस, येशू, पैगंबर यांसारख्या धर्मसंस्थापकांना देव अथवा प्रेषित मानत त्यांचं माहात्म्य वाढवत देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली दहशत निर्माण करणारी प्रवृत्ती वेगानं वाढते आहे. 

अश्या प्रवृत्तीला कडवा विरोध करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वैचारिक, तर्काच्या कसोटीवर टिकेल अशी ठाम भूमिका घेऊन समाजाचं शिक्षण करण्याची आवश्यकता आहे. ‘देवाचं अस्तित्व मानण्यानं एखाद्याला दिलासा वाटत असेल तर त्यात देव न मानणाऱ्यांचं काय नुकसान होतं? देवाकडे करुणा भाकत असताना तो इतरांचं काही वाईट तर चिंतित नसतो! त्यानं त्याच्यापुरता त्याचा ईश्वर मानला म्हणून कोणती अंधश्रद्धेची कुर्‍हाड कोसळते?’ अशी भूमिका घेणाऱ्या माणसांना देवाच्या रुपाची चिकित्सा आज का आवश्यक झाली आहे हे म्हणूनच समजावून सांगितलं पाहिजे.

‘परमेश्वर आहे’ यावर विश्वास ठेवायला सारेच धर्म शिकवतात. ख्रिश्चन धर्मानुसार हे जग काही हजार वर्षांपूर्वी परमेश्वरानं केवळ सात दिवसांत निर्माण केलं. म्हणजे हे जग परमेश्वरानं निर्माण केलं हे स्वत:ला देवाचे प्रेषित म्हणवणाऱ्या माणसांनी ठरवलं. त्याच्या कथा त्यांनी रचल्या. त्याला महाशक्तिमान बनवलं. ‘परमेश्वर आहे’ हा विश्वास त्यांनीच ठोकून ठोकून निर्माण केला आणि उरलेल्या माणसांनी ‘परमेश्वर आहे’ ह्या विश्वासावर विश्वास ठेवला. ह्यातूनच देव हा साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे आणि तो संकटात माणसाच्या साह्याला धावून येतो ह्याकडे युगानुयुगं चालत आलेलं एक ‘सत्य’ म्हणून बघायची सवय लोकांना लागली. परमेश्वरावरील श्रद्धा हा म्हणूनच सवयीचा एक भाग ठरलेला आहे. 

आता या युगानुयुगं चालत आलेल्या सवयीकडे डोळसपणे बघितलं तर काय दिसतं? देव हा सर्वशक्तिमान आहे आणि तो संकटसमयी साह्याला धावून येणार आहे यावर श्रद्धा ठेवणाऱ्या माणसाला त्याच्या प्रत्येक संकटप्रसंगी, मग ते शारीरिक असो, आर्थिक असो, भावनिक असो, मदत जर होत असेलच तर ती करतो तो माणूसच. कोणाला तो डॉक्टरच्या रुपात भेटतो, कोणाला आईवडिलांच्या रुपात भेटतो, कोणाला शिक्षकाच्या रुपात भेटतो तर कोणाला मित्राच्या रुपात भेटतो. उदा. एखाद्या मुलाला अपघात झाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यापासून त्याच्यावर उपचार करणं, त्यासाठी पैसा उभा करणं, त्याच्यासाठी वेळ देणं हे सारं माणसंच करतात. परमेश्वर नाही. आणि माणसाची मदत अपुरी ठरण्याइतकी त्या शरीराची हानी झाली नसेल तर तो मुलगा वाचतो अन्यथा मरतो. या साऱ्या घटनाक्रमात मूर्तीतला परमेश्वर येतोच कुठं? हा प्रश्न संकटांनी, दु:खांनी गांजलेल्या लोकांच्या मनात येतही नाही. हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. 

भूकंपात पूर्ण गाव उध्वस्त होतं आणि एखादं तान्हं मूल वाचतं किंवा एखाद्या विमानाला अपघात होऊन सारे प्रवासी मृत्यूमुखी पडतात आणि उशीर झाल्यामुळे किंवा तिकीट हरवल्यामुळे ज्याचं विमान चुकतं तो वाचतो तेव्हाही त्याच्यावर ‘परमेश्वरी कृपा’च होती ह्या समजाला पुष्टी मिळते. प्रत्यक्षात तिकीट हरवणं, वेळेवर न पोहोचणं हा त्याचा वेंधळेपणा असतो किंवा भूकंपात पडझड होताना अंगावर मोठं छप्पर पडून त्याखाली तान्हं बाळ वाचणं हे त्याच्या चिमुकल्या देहामुळे शक्य झालेलं असतं. यात ‘परमेश्वरी इच्छा’ वगैरे काही नसते. आणि ‘परमेश्वरी इच्छा’ असते असं मानायचं झालं तर अशा प्रकारचा उत्पात घडवून इतर अनेक माणसांचा बळी घेण्यासारखी विकृत इच्छा परमेश्वर मनाशी कसा बाळगतो, तो आपल्या लेकरांचं वाईट का चिंतितो असे प्रश्न माणसाच्या मनाला पडायला हवे. 

धर्माच्या आधारानं अंधश्रद्धा जोपासल्या जातात आणि त्या अंधश्रद्धांच्या आधारे धर्मसत्ता आणि राजसत्ता प्राप्त झालेली माणसं दुबळ्यांवर जुलूम करतात. सत्तेची एकदा चटक लागली की मग नुसती आपल्या घरापुरती, आपल्या समाजापुरती सत्ता पुरेनाशी होते. सत्तेचा हा प्रदेश पुढे वाढवत नेला पाहिजे ही महत्वाकांक्षा जागी होते. मग राष्ट्रनिष्ठा वाढवणारं आणि दुसऱ्या धर्मांचा द्वेष करणारं शिक्षण देणाऱ्या मदरसे, चर्च, मंदिरं यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून धर्मनिष्ठेच्या नावाखाली पक्के धर्मांध निर्माण करणं हा कार्यक्रम बनतो…. एकही धर्म याला अपवाद नाही. धर्मनिष्ठेखाली दडलेला हा जो सत्ताभाव आहे, त्यात अशी जगभर दिसणाऱ्या हिंसेची मुळं सापडतात. 

देव, स्वर्ग, नरक ह्या कल्पना ज्या सर्व धर्मांत दिसतात त्याही समाजाला धाकात ठेवण्यासाठीच! प्रत्येक धर्मातले कडवे धर्मांध आपला देव हाच खरा आणि एकमेव देव असल्याचं आग्रहपूर्वक सांगत असतात. आपापल्या धर्मपोथ्यातून तश्या साक्षी काढतात. कारण त्यांना जगावर आपलं राज्य यायला हवं असतं. आपला देवच सर्वांनी शिरोधार्य मानला पाहिजे ह्या सक्तीला मग सुरुवात होते. आणि तसं सर्वांना वाटायला लावण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे दहशतवादाचा अवलंब! शहरंच्या शहरं बेचिराख करायची, माणसांचे जत्थ्येच्या जत्थ्ये कापून काढायचे, गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणायचे. माणसं मरणाच्या भीतीनं थरथर कापली पाहिजेत अशी दहशत त्यांच्या मनात निर्माण करायची आणि त्या दहशतीच्या सावटाखाली आपल्या धर्माचं राज्य आणायचं. हे काम करण्यासाठी धर्माचं रक्षण करण्याच्या कल्पनेनं भारलेले आपल्याच धर्मातले तरूण वापरायचे, त्यांना मरणोत्तर स्वर्गाचं आमिष दाखवायचं. त्यापलिकडच्या त्यांच्या सगळ्या भावना मारायच्या. त्यांचे यंत्रमानव बनवून टाकायचे. तरुणांची पिढीच्या पिढी अशी धर्मयुद्धाच्या नावाखाली गारद करून टाकायची. 

‘मरणोत्तर स्वर्ग हवा असेल तर अन्य धर्मियांचं समूळ उच्चाटन करा.’ असं सांगणारा देव जोपर्यंत विविध धर्मांनी शिरोधार्य मानला आहे तोपर्यंत हिंसा थांबणार नाही. कारण ही हिंसा साक्षात परमेश्वराच्या परवानगीनंच चालू आहे असं परमेश्वराशी जवळीक असलेल्या प्रेषितांनी धर्मवचनं पुढे करत लोकांना पटवून दिलेलं आहे. पुढे त्यांच्या चेल्यांनी देव हा अस्मितेचा प्रश्न बनवला आणि वातावरण बिघडायला सुरुवात झाली. देव हा लोकांच्या भावना दुखावण्याचा आणि भावना भडकवण्याचा विषय झाला आणि वातावरण नुसतं बिघडण्यासच नव्हे तर ते पेटण्यास सुरुवात झाली. प्रत्येकजण आपापल्या देवाचा झेंडा घेऊन लढाईच्या मैदानात उतरू लागले. असे वेगवेगळे झेंडे घेतलेल्यांनी आपापल्या टोळीची सत्ता टिकावी म्हणून आक्रमक बनायला सुरुवात केली. ही सत्ता पुढे साम्राज्याची स्वप्नं पाहू लागली आणि रक्तपाताला सुरुवात झाली. देवानं निर्माण कलेल्या ह्या जगात देवाच्याच नावानं रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. 

तरीही अशा मनुष्यनिर्मित देवाला भेटण्याची आस लोक बाळगून असतात. देव आपला रक्षणकर्ता आहे असं मानणाऱ्या माणसांना किमान हा प्रश्न तरी पडायला हवा होता की, तो जर आहे तर मोठी आस ठेवून त्याच्या भेटीसाठी तीर्थस्थळी जाणाऱ्या भक्तांवरच मृत्यूचं संकट ओढवणारे प्रसंग वारंवार का घडताना दिसतात? आयुष्यात एकदा तरी हजयात्रा केल्याचं पुण्य मिळावं म्हणून मुस्लिम भाविक मक्केला जातात. मक्केला हजयात्रेसाठी जाणाऱ्या हजारो मुस्लिमांचे आतापर्यंत चेंगराचेंगरीत, आगी लागून अथवा बंडखोरांनी घडवून आणलेल्या हिंसक दंगलीत मृत्यू झाले आहेत. केवळ हजयात्रेला जाणाऱ्या मुस्लिम भाविकांच्याच वाट्याला असे मृत्यू येतात असं नाही तर देवदर्शनासाठी म्हणून तीर्थस्थळी गेलेल्या हिंदू यात्रेकरूंनासुद्धा असाच चेंगराचेंगरीत मृत्यू आलेला आहे. दर तीन वर्षांनी भरणाऱ्या हिंदू धर्मातील कुंभमेळ्यातही अशा चेंगराचेंगरीच्या घटना घडलेल्या आहेत आणि आजही घडताहेत. 

‘देव आहे’ या श्रद्धेनं त्याच्या दर्शनाला जाणाऱ्या आणि तिथं जाऊन मृत्युमुखी पडणाऱ्या या भाविकांच्या करुण कहाण्या वाचताना प्रश्न पडतो की कोणत्या देवाला भेटायला ही माणसं हजारो मैलांचा प्रवास करतात आणि गर्दीत, चेंगराचेंगरीत मरून जातात? देव असेलच तर आपल्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा होणारा मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघतो कसा? घडोघडी त्यांच्यावर कोसळणाऱ्या संकटातून ‘देव अस्तित्वातच नाही’ हे जे उत्तर त्यांना मिळत असतं, त्या उत्तरानं माणसं शहाणे कसे होत नाहीत? 

माणसाला येणाऱ्या मृत्यूचा, त्याच्यावर कोसळणाऱ्या संकटांचा आणि देवाचा काहीही संबंध नाही. तो कोणत्याही संकटापासून माणसाला वाचवू शकत नाही. म्हणूनच आपलं आयुष्य देवाच्या कृपेमुळे आहे असं मानणाऱ्या लोकांनी देव आणि माणसाचं जगणं यांचा संबंध एकदा तपासून बघितलाच पाहिजे. आणि सत्य हाती लागल्यानंतर त्या कल्पनेवर आंधळेपणानं विसंबणं सोडून दिलं पाहिजे. ज्या मूर्तीरुपातल्या परमेश्वराचं किंवा धर्मग्रंथांनी रंगवलेल्या परमेश्वराचं अस्तित्व मानण्यानं फक्त नुकसानच आहे त्या देवविषयक श्रद्धेला तर्कशुद्धतेच्या पातळीवर तपासून पाहण्यात मानव्यधर्माचं रक्षण आहे हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे. 

धर्मशास्त्रातली वचनं आणि देवाज्ञा म्हणजे शेवटी माणसानंच बनवलेली विधिनिषेधांची नियमावली! ती काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे की जी पुसताच येणार नाही. आणि जर ती काळ्या दगडावरची रेष असेल तर असा दगडच नाकारण्याची तयारी ठेवायला हवी. 

अभिप्राय 1

  • लेखका शी सहमत. पण मानवी मन आणि त्याच्या गरजा म्हणजे एक सिक्यूरिटी चा विश्वास तो देव नावाच्या द्वारे मिलतो व संकटात असताना त्याला दिलासा मिळतो तो काल्पनिक का असेना पण दिलासा मिळतो हे एक सत्य आहे.प्रकृति ही संघर्ष ह्या नियम वर काम करते.हिंसे ला नुसते धर्म ला जिम्मेदार धरने १०० परसेंट ठीक नाही.जेंव्हा धर्म नव्हता तेव्हा ही हिन्स्सा होतीच.नुसते कारने बदलतील पण प्रकृति चा नियम म्हणजे संघर्ष चालु राहिल.
    Yes, you can manipulate the law of struggle for the good of humanity to some extent only.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.