ताजी भाजी (नागरी शेती)

२०२०चा शांततासाठीचा नोबेल पुरस्कार (Peace prize) वर्ल्ड फूड प्रोग्रॅम (World Food Programme) ह्या संस्थेला देण्यात आला आहे. जगभरातल्या उपासमारीवर मात करणाऱ्या व खाद्यसुरक्षेसाठी लढा देणाऱ्या ह्या संस्थेने सुमारे १० कोटी लोकांना मदत केली आहे. जगातील अनागोंदीवर इलाज करायचा असेल तर भुकेवर मात करणे जरुरी आहे, असे नोबेल पुरस्कार समितीचे ठाम मत आहे. दरवर्षी शेतापासून पोटापर्यंत पोचण्याच्या वाटेवर सुमारे १/३ जागतिक अन्नउत्पादन नष्ट होते. प्रगत देशांत तयार अन्नाची नासाडी जास्त होते व गरीब देशांत ताजा भाजीपाला सुरक्षित साठवण्याच्या अभावानेच अधिक नष्ट होतो. भुकमारीवर विजय मिळवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन, एकनिष्ठेने काही महत्त्वाच्या निवडी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अखेर ताज्या, खमंग भाजीचा वास व चवी कोणाला आवडत नाहीत?

आजवर अन्न हे केवळ शरीराचे पोषण करण्यासाठी व रोगांपासून बचाव व संरक्षण करण्यासाठी असते असे मानले जात होते. पण कुठल्यातरी हॉटेलमधून किंवा कोणाच्या तरी स्वयंपाकघरातून ताज्या भाजीचा सुगंध आला की भरल्यापोटीसुद्धा भूक चाळवते! अगदी एखाद्याचा चिडचिडा मूडसुद्धा स्वादिष्ट-खमंग जेवण दिसले की आनंदी होतो. नुसता गंधच नव्हे, कुठल्याही भाजीच्या गाडीवर, दुकानात, मंडईत ताज्या टवटवीत शेंगा किंवा लालबुंद टोमॅटो, हिरवागार पालक ह्यावर नजर जाताच मनी आगळीवेगळी प्रसन्नता वाटते. 

असा प्रतिसाद का होतो? ताज्या भाज्यांचे व आपल्या मानसिक स्थितीचे काय नाते असेल? अन्नाची चव, गंध आणि दृश्य ह्या भावनांचे आपल्या मेंदूत घडणार्‍या परस्परक्रियेशी काही नाते आहे का? ते कसे समजायचे? असे विचार माझ्या मनात बरेचदा येत होते. ही केवळ भावना आहे का? त्याला काही वैज्ञानिक सिद्धांतांचा पाठिंबा आहे का? सुदैवाने अनेक नामांकित शास्त्रज्ञांनी ह्याचा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विचार करण्यास सुरुवात केली आहे. 

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता आपण मेंदूतील सूक्ष्म रक्तप्रवाहामधील बदलांचे अचूकपणे निरीक्षण करू शकतो व त्या बदलांचे मोजमाप करू शकतो. ह्या तंत्रज्ञानास Functional Magnetic Resonance Imaging (FMRI) असे म्हटले जाते. ह्या FMRI मुळे ताज्या भाजीचे चित्रसुद्धा मेंदूतील रक्तप्रवाह बदलू शकतो असे आपल्याला स्पष्ट दिसून आले आहे. अमेरिकेतील कोलंबिया युनिवर्सिटी मेडिकल सेंटरचे न्यूरो सायंटिस्ट डॉ. जॉय हर्श (Dr. Joy Hirsch) ह्यांचे असे मत आहे की “आपल्या मेंदूतील वैशिष्ट्यपूर्ण सर्किट विविध खाद्यपदार्थांना प्रतिसाद देतात. प्रत्येक पदार्थाला वेगळा प्रतिसाद मिळतो व त्याप्रमाणे मेंदूतील अनेक ठिकाणे उत्तेजित झाल्याचे ह्या FMRI मध्ये दिसून येते”[1]. त्यांच्या ह्या अभ्यासातून असे समजून येते की अन्नातील ऊर्जा आणि मेंदूतील न्यूरॉन्स यांचे अधिक घनिष्ट नाते आहे. अशा न्युरोबायलॉजिकल प्रतिसादाचे नाते ताजी फुले, फळे, भाज्या यांच्यात अधिक असते. 

पदार्थाच्या ताजेपणाची जाणीव होण्याचे कारण त्यांच्यातील volatile aromatic compounds (VOC) हे संयुग असते. जवळजवळ सर्व जीवनसत्त्वे हवेला, उष्णतेला आणि प्रकाशाला संवेदनशील असतात. पदार्थ अत्यल्प काळासाठी जरी उघडे राहिले, तर त्यांचे प्रभावत्व गमावून बसतात. विशेषतः Vitamin C आणि Folic Acid हे सर्वाधिक अस्थिर असून ते लवकर नष्ट होण्याची शक्यता असते. अनेक आहारतज्ज्ञ व डॉक्टर ह्यांच्या मते हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब अशा रोगांपासून सावध राहायचे असेल तर ताज्या फळभाज्यांचा आहार अत्यंत उपयुक्त आहे. हे ज्ञान खरं तर नवीन नाही. आपल्याला घरी आई-आजी नेहमीच ताज्या जेवणाचे महत्त्व सांगत आल्या आहेत. अर्थातच आपल्याला जर ह्या ताजेपणाचा आनंद उपभोगायचा असेल आणि आरोग्याला पोषक असे अन्न हवे असेल तर उत्पादक आणि ग्राहक यांमधील अंतर कमी करणे आवश्यक आहे. 

आपल्या कामाच्या आणि घराच्या नजीक ताज्या भाज्या उपलब्ध असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. The Food and Agriculture Organization (FAO) च्या मते उत्पादक आणि ग्राहक यांच्यात एका वेगळ्या प्रकारची भागीदारी विकसित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अन्नसुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे आपल्याला वेगळ्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. शहरीकरण हे सकारात्मक आहे की नकारात्मक यावर वादविवाद करता येऊ शकतो, पण त्यात अंतर्गत परस्परावलंबन नक्कीच आहे. 

McKinsey Global Institute[2] ने केलेल्या अभ्यासातून असे समजते की १९७१-२००८ सालापर्यंत भारतातील शहरांची लोकसंख्या सुमारे २०-२२ कोटींनी वाढली. आता यापुढे हीच वाढ त्याच्या अर्ध्या कालावधीतच होण्याची शक्यता आहे. शहरांकडे ओढा केवळ भारतातच दिसत आहे असे नाही. जगभर हे स्थलांतर दिसून येत आहे. World Economic Forum च्या अंदाजाप्रमाणे पुढच्या ३० वर्षांत जगातील सुमारे ७०% लोकसंख्या शहरात व उपनगरात राहणारी असेल. अशा वाढत्या शहरीकरणामुळे आपल्याला शेतीकडे एका पारंपरिक पद्धतीने न बघता, एका वेगळ्या मार्गाने बघावे लागेल. आर्थिक प्रगतीसाठी हे एक आव्हान आणि उत्कृष्ट अशी संधी आहे. 

सध्या कोविद-१९च्या साथीने समाजातील काही कमकुवत दुवे उघडकीस आले आहेत. उदाहरणार्थ, टाळेबंदीच्या काळात भाजीविक्रेत्यांच्या उत्त्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला व त्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्याची अडचण प्रकर्षाने जाणवली. अनेक वस्तूंची नासाडी झाली, सोबत आर्थिक परिस्थिती डगमगली. भविष्यकाळात नियोजन करताना आपल्याला अश्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक आहे. यासाठी जगातील इतर देशांनी वाढत्या शहरात राहणाऱ्या लोकांपर्यंत ताज्या भाज्या पोचवण्यासाठी कोणकोणत्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे? शेतापासून ग्राहकापर्यंतचे अंतर कसे कमी करता येईल? ह्याबद्दलची काही माहिती आता आपण बघू. 

ब्रिटन येथील Institute for Sustainable Food, युनिवर्सिटी ऑफ शेफील्ड (University of Sheffield) च्या संशोधकांनी एका शहरास फळे-भाजी पुरवठ्यासाठी किती जमीन लागेल याची मोजणी केली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार शहरात शेतीसाठी पुरेशी जमीन मिळणे शक्य आहे. परंतु शेती आणि शहरी जीवन यांना एकमेकांत मिसळून दोन्हीची वाढ सफलतेने करण्यासाठी सर्जनशीलतेची गरज आहे. सध्या तेथे शहरी वातावरणाचा पुनर्विकास करताना घरांच्या, शाळांचा व कार्यालयांच्या विविध इमारतींच्या गच्चीवर, भिंतींच्या आधाराने आणि जमिनीखालील जागांचा शेतीसाठी वापर सुरू करण्याची योजना चालू आहे. 

आशिया खंडातील सिंगापूरसारख्या प्रगत देशात ९०% अन्न आयात केले जाते. कोविद-१९च्या साथीमुळे अन्नपुरवठा यंत्रणेत आलेल्या अडचणी पटकन प्रकाशात आल्या. त्यामुळे तेथील शहरी शेतीचे प्रमाण वाढू लागले आहे. छतावरील शेती अधिक वेगाने लोकप्रिय होत आहे. तेथील सरकारकडून ताज्या भाजीपाल्याच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज पटकन ओळखली गेली. सिंगापूरच्या सरकारने विस्तृत रूपरेषा आखली व २०३०च्या आधी किमान ३०% फळभाज्या व मांस-मासे यांचा स्थानिक पुरवठा होईल असे महत्त्वाकांक्षी ध्येय मांडले आहे. 

क्युबासारख्या कमी प्रगत देशानेपण शहरी शेतीचे महत्त्व लवकर ओळखले. ह्या एक लाख चौ.कि.मी. क्षेत्राच्या देशात किमान ३ लाख शहरी शेत्या आहेत. तिथल्या सरकारने शहराच्या परिसरात असलेल्या जमिनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. एकच अट होती. त्या जमिनीवरचे शेतउत्पादन शहरातच विकले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि शहरी रहिवाश्यांना ताजी उत्कृष्ट भाजी उपलब्ध झाली. अश्या मोहिमेमुळे क्युबाचा ५०% ताज्या पालेभाज्यांचा पुरवठा हा शहरी शेतीकडून होतो.

अमेरिकेत १७३० सालापासून शहर-नियोजकांनी शहराच्या मध्यभागी १००-१२५ चौ. फुटाची जागा बाजारपेठेसाठी राखून ठेवली होती. त्यामुळे शेतकरी आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत सहजरित्या पोचवत होते. जसजसा देश प्रगत झाला, विशाल शेतजमिनींवर जास्त भार दिला गेला. काळानुसार लहान शेत्या वाचवणे कठीण होऊ लागले. आता हे चित्र पुन्हा बदलताना दिसू लागले आहे. नागरिकांना ताज्या भाजीपाल्याचे मूल्य, महत्त्व, त्यांचे वैशिष्ट्य, त्यांचा शारीरिक व मानसिक सकारात्मक फायदा समजला. 

U.S Department of Agriculture (USDA) ने लघु शेतकऱ्यांची नोंदणी करणे सुरू केले आहे. त्यामुळे ह्या शेत्या कुठे आहेत, त्यांच्या अडीअडचणी व प्रगती यांची रीतसर माहिती एकत्र करणे सुरू झाले. अशा शेतकऱ्यांना उत्पादन विक्री करण्यास वेगवेगळ्या शहरांमधील जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश केला. काही शाळांनी शनिवार-रविवारी आपली पटांगणे कमी दरात वापरण्यास परवानगी दिली. ह्यात शाळेला काही उत्पन्न होते गेले व आजूबाजूच्या नागरिकांची सोय झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुपरमार्केटच्या तुलनेत ह्या भाज्या सरासरी २०% स्वस्त पडत होत्या. सुपरमार्केमध्ये उपलब्ध असणाऱ्या टोमॅटो, सफरचंद, द्राक्षे, शेंगा अशा असंख्य फळभाज्या सुपरमार्केटमध्ये पोहचण्याआधी सुमारे २,५०० कि.मी.चा प्रवास करतात. त्यासाठी लागणारे इंधन, ट्रकचालकाचा पगार आणि भाजी ताजी राहण्यास लागणार मोठे रेफ्रिजरेटर्स हा खर्च त्यांच्या किमतीत जमा होत असे. शहरी शेतीस वाव दिल्याने शेतकरी खूष व ग्राहक खूष. हे पर्यावरणासदेखील अनुकूल ठरले. 

युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे शहरी शेती करण्यास येणारे अडथळे समजून घेण्यासाठीचा अभ्यास चालू आहे. शहरी शेतकर्‍यांसाठी अर्थपूर्ण धोरणे स्थापित करणे अधिक जरुरी आहे. ह्याशिवाय शहरात रिकाम्या आणि न वापरलेल्या सार्वजनिक जमिनीचे पट्टे कमी शुल्कावर अधिक कालावधीकरिता उपलब्ध करून देणे अधिक कार्यक्षम ठरण्याची शक्यता वाटते.

अखेर आपल्याला तीन गोष्टींचा लक्षपूर्वक विचार करणे जरुरी आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि ग्राहक यांच्यातील प्रवासाचे अंतर कमी करणे, शेतकरी-ग्राहक यांचा परस्पर फायदा होणे आणि सरकार-खाजगी भागीदारी उभारणे महत्त्वाचे आहे. भारतातपण अश्या काही मोहिमा सुरू झाल्या आहेत. अनु- मीना व पायल जवळकर यांनी सुरू केलेल्या ऍग्रोव्हेव कंपनीचा मूळ उद्देश शेतकरी ते गिऱ्हाईक अंतर भाज्यांचा ताजेपणा न घालवता पार करायचे[3]. ऍग्रोव्हेवने अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी एक ॲप तयार केले आहे. ते वापरून शेतकरी केव्हा आणि काय विक्रीस ठेवतो हे बघून ग्राहक आपल्या गरजा तेथे नोंदवतो. शिवाय ऍग्रोव्हेवने कॅशलेस ऑनलाईन व्यवहारासाठी प्रणाली तयार केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यास चेकने अथवा नेट-बॅकींगतर्फे पैशांचे व्यवहार करणे सोपे झाले आहे. शिवाय शेतकऱ्याला त्याच्या मालाची वाजवी दरापेक्षा अधिक किंमत मिळू लागली आहे. दिल्ली जवळच्या गुरुग्राम येथे सुरु झालेल्या ऍग्रोव्हेवने गेल्या तीन वर्षांत नामांकित हॉटेल्स, केटरर्स व कंपन्यांचे कॅन्टीस यांच्याशी व्यवसायाचे करार केले आहेत. 

इकडे महाराष्ट्रात २०१९ साली विकास झा, शरयू कुलकर्णी आणि गुणवंत नेहेते ह्या तिघांनी भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई येथील शिक्षण संपवून RuKart Technologies ची स्थापना केली[4]. कॉलेजात शिकलेले बाष्पीभवनक शीतकरण तत्त्व (principle of evaporative cooling) चा प्रयोग करून त्यांनी हे ‘सब्जी कूलर’ तयार केले. (खालील चित्र पहा)

भारतात सुमारे ६-९% फळे-भाज्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याआधीच नष्ट होतात. RuKart Technologies ने महाराष्ट्र आणि ओडिशा जिल्ह्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आणि गावोगावी एकके स्थापन करण्याचे आव्हान हाती घेतले. या भागांतील शेतकर्‍यांना दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. स्थानिक मंडईमध्ये त्यांचे उत्पादन एका दिवसात न संपल्याने उत्पादन वाया जाते व कमाई कमी होते. आता ‘सब्जी कूलर’च्या सहाय्याने त्यांचे उत्पादन ते सात दिवसपर्यंत साठवून ठेवू शकतात आणि त्यातून अधिक पैसे कमावू शकतात. आजपर्यंत सुंदरगढ, ओडिशात व विदर्भात अनेक ‘सब्जी कूलर्स’ची स्थापना करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदादेखील घेतला आहे.

अश्या सर्व गोष्टी जमेस धरल्या तर लक्षात येते की टाळेबंदी असो किंवा नसो, शहरास, राज्यास किंवा पूर्ण देशास अन्नस्वातंत्र्य हवे असेल तर आपल्याला शहरी शेतीस वाव दिलाच पाहिजे. काही नवीन धोरणे मांडली पाहिजेत ज्यातून रोजगारवाढ होईल, आर्थिक स्थैर्य वाढेल आणि पर्यावरणास कमीत कमी हानी होईल. उदाहरणार्थ, पुणे शहरात मंडई व बाजारपेठ ह्या दोन ठिकाणी स्वस्त व ताजी भाजी व फळे मिळतात. मात्र सर्वसाधारण घरी जी भाजी येते ती रस्त्याच्या कोपऱ्यावर ठेला लावलेल्या विक्रेत्याकडूनच! त्याला, ऊन असो की पाऊस, रोज तेथे उभे राहावे लागते आणि त्यामुळे वाहतुकीस रस्ता कमी पडतो. त्याऐवजी जर सर्व शाळांनी एकत्र येऊन शाळा सुटल्यावर त्यांच्या जागा भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यात अनेक फायदे आहेत. पहिला, लघु-मंडई तयार होतील. दुसरा, नागरिकांना योग्य दरात व दर्जेदार गोष्टी मिळू शकतील. त्याहून उत्कृष्ट उपाय म्हणजे शाळा-कॉलेजातून लहान वयातच व्यावहारिक शिक्षणाचे थेट धडे व अनुभव देण्यास काही पाऊले उचलता येतील का? नवीन व्यवसाय सुरू करता येतील ज्यांमुळे शहराची प्रगती व स्वावलंबन वाढू लागेल.

अशा अनेक उपक्रमांत शहरी तंत्रज्ञान व शेतकऱ्यांचे कृषी ज्ञान समजून घेऊन नवीन व्यवसाय सुरू करता येतील. जास्तीत जास्त रोजगार वाढवता येईल. व्यवसाय भागीदारीमध्ये सरकारचे कसे व कुठे समर्थन मिळू शकेल ह्यावर पुढील प्रगती अवलंबून राहील. 

अशा नवीन उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी लागणारी अर्थसामग्री, कायदेशीर मदत व इतर रसदीची गरज कशी भागवता येईल? लागणारी जागा, सुरक्षा आणि मनुष्यबळ कसे तयार करता येईल? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवणे व त्यानुसार पुढची पाऊले टाकण्याचे समाजाने ठरवले तर सामाजिक व आर्थिक स्वास्थ्य नक्कीच सुधारेल. तसेच घरोघरी ताज्या भाज्या सहजरित्या उपलब्ध होऊ लागतील.

संदर्भ:
[1] Rational Or Emotional? Your Brain On Food
[2] India’s urban awakening: Building inclusive cities, sustaining economic growth
[3] http://agrowaves.in
[4] IIT Grad’s Innovation Helps Farmers in Lockdown Earn 30% More!

अभिप्राय 2

  • Atishay navinyapurn mahiti! Shaharat anek lok ‘window gardadhya methiening’ karatat. Pan fakt fulzadansathi. Navin imaratit ‘flower beds’ asatat. Tyancha upayog mothe galvnised ptryanche tre karun tyat methi,palak,kothimbir, asha palebhajya karane shakya ahe. Mi svatha ha prayog ha lekh vachanya purvi suru kele aahe. Sadhya methi perali aahe. Chhan ugavali aahe.

    • आपण माझा लेख वाचल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. फुलं बरोबर रोज लागणारी भाजी, कोथिंबीर इ.लावल्यास सौन्दर्य व उपयोग दोन्ही होईल. आपला अभिप्राय अगदी बरोबर आहे. All my best wishes for your enterprise

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.