बोधकथा

आमचा वाद चालला होता.

विवेक म्हणाला, “बोधकथा पुस्तकात वाचायच्या असतात. थोर थोर लोक सांगतात आणि आपण भारावून जातो त्या बोधानं. पण त्यांचा बोध परलोकातला असतो. त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी काही संबंध नसतो.”

“दमछाक कशाला करून घ्यायची पण? आपल्या बापजाद्यांच्या बोधकथांच्याच वाटेवर चालावं ना…. धोपट मार्गा सोडू नको…” किरण म्हणाला.

“बोधकथा ‘धोपट मार्गा सोडू नको’ असं नाही सांगत किरण्या.. त्या कधीही थेट बोलत नाहीत. साधं “रस्ता ओलांड” असं वाक्य असलं बोधकथेत, तरी तो रस्तादेखील बोधकथेतलाच असतो. आपल्याला साधा डेक्कनवरचा रस्ता ओलांडायचा तरी मोठं दिव्य करावं लागतं. आता चितळ्यांकडून आंबाबर्फी आणायचीच असेल तर तेही करतो आपण.” 

विवेक खास पुण्यातली बोधकथा सांगत आहे हे लक्षात आलंच असेल तुमच्या!

“हे बोधकथाकार तुम्हांला त्यांच्या खास भाषेत गुंगवतात…. ते खरं नसतं.”

परिणीता हातातली कमला भसीन खाली ठेवत म्हणाली, “मलाही आवडत नाहीत बोधकथा, पण तरी आपण रोजच्या आयुष्यात झगडत असतो सतत, ते काय असतं? अप्राप्य नेहेमी हवंसं वाटतं, मिळणार नाही हे माहिती असलं तरी. सातवी खोली उघडू नकोस असं सांगूनही ती खोली आपण उघडतोच, ते काय असतं?”

“ते काय रस्ता ओलांडून चितळ्यांची बर्फी आणण्यासारखं नसतं.” 

परिणीता कमला भसीनकडे प्रेमाची नजर टाकते.

चर्चा फारच गहन होते आहे असं वाटून किरण परत एकदा म्हणाला, “हीच एक बोधकथा– धोपटमार्गा सोडू नको!”

किरणच्या आत्मखुशीला कंटाळून प्राची जांभई देते. 

“मला साधं मुलाला पाळणाघरात ठेवून काम करायचं झालं तरी ही बोधकथा सांगितली जाते किरण. “घरी बैस” हा धोपटमार्ग कुणाचा?” परिणीता वैतागते.

“पण बसलीस घरी, तरी तू तुझ्या बोधकथा निर्माण करू शकतेसच ना!” विवेक म्हणतो.

“तुमच्या बोधकथांच्या गलबल्याच्या वर माझा आवाज काढायचा, तर माझा चॅनेल असावा लागेल स्वतःचा. तो परवडायचा तर काय केलं पाहिजे?” परिणीताची कमावलेली शांतता विवेकसमोर नेहेमीच पणाला लागते.

“अरेच्चा! तुझं घर आहे- तू सांग कथा!”

प्राची इतका वेळ नुसतीच ऐकत असते, ती हसायला लागते,

“असं बघ विवेक, घरात गुरुजी आले आहेत आणि जोरजोरात आरत्या चालल्या आहेत, भोवताली थाळ्या बडवत आहेत. आजोबांनी ‘मन की बात’चा व्हॉल्यूम वाढवला आहे. गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून गेली म्हणून लेकीला महाविद्यालयातून घरी पाठवलं आहे, ती थयथयाट करते आहे. राममंदिरासाठी वर्गणी गोळा करणारे बाहेर बसले आहेत, मंदिर माहात्म्य सांगत टी.व्ही. वरच्या चर्चा – असं म्हणत जे काय चालू आहे त्यातला एक शब्द समजत नाहीये. नवऱ्यानं त्याला अमेरिकेतल्या क्लायंटबरोबर बेडरूममध्ये बंद करून घेतलं आहे, ‘फकिंग वर्क फ्रॉम होम’. आजींनी लावलेल्या कुकरची शिट्टी का होत नाही असं बघेपर्यंत कुकर जळून फुटला आहे, त्या माझ्या लेकीला रागावताहेत या वयात कुकर लावता येत नाही साधा म्हणून. त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार आहे आणि तरी स्वयंपाकघरावर त्यांनाच ताबा हवा आहे. या सगळ्यात मी कोणती बोधकथा रचू म्हणशील?”

परिणीता प्राचीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, “तुझ्या लेकीने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून महाविद्यालयात जाणे हे संस्कृतीबाह्य नाही असे मान्य करून तिला घरी पाठवणाऱ्या प्राचार्यांना कायदेशीर नोटीस देऊन टी.व्ही.वर चालेलेल्या चर्चेचे ट्रान्सस्क्रिप्ट लिहून ती देशहितासाठीच आहे जरी ‘मन की बात’शी तिचा संबंध नाही, असे तुझ्या कथेतल्या आजी-आजोबांनी सिद्ध केल्यास, तू मंदिर माहात्म्याचा नवा अध्याय लिहून कुटुंब हेच मंदिर आहे असा बोध मंदिर माहात्म्यवाल्यांना दे.”

“सध्या आपण साधा बोध देऊ” तिच्या पॅंटमधून दिसणारा गुडघा हलवत प्राची म्हणते, “वस्त्रहरणाचा इतिहास आणि बलात्कारांचा वर्तमान असलेल्या आपल्या संस्कृतीत सर्व बायांनी गुडघ्यावर फाटलेल्या का होईना पण पॅन्ट्स घालून वावरावे. साडीला हात घालण्याइतके पॅन्टला हात घालणे सोपे नसते.”

दोघीही एकमेकींना टाळ्या देत खो खो हसतात.

त्याच बोधकथा बनतात……. 

प्रत्यक्ष आयुष्यातल्या… 

अभिप्राय 1

  • फारच सुंदर. खूप खूप बोध देणारी बोधकथा. प्रश्न हे बोध आता हमरस्ता झाल्येत त्याचे दैनंदिन अनुभवणे रस्ता क्रॉस करण्याइतकेदेखील कठीण राहिले नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.