हळूच

हळूच कशा एका रात्रीत आठेक वाजता एका दमात
चलनात असलेल्या नोटा अलगद फेकल्या जातात चलनाबाहेर
हळूच कशी आणली जातात मनमानी विधेयकं आणि कायदे
हळूच कसे दडपले जातात संप, आंदोलने आणि मोर्चे
हळूच कसे निर्मिले जातात कोंडवाडे, डीटेंशन सेंटर्स कोंडावया अल्पसंख्य

हळूच कसे बोलू लागतात पुढारी पाच वर्षानंतर मिठू मिठू
हळूच कशी उतरवली जाते गळ्यात मन की बात
हळूहळू प्रोपगंडे जगू लागतो आपण पोस्टट्रूथच्या काळात
मीडिया हाऊसेसही बनू लागतात प्रवक्ते व्यवस्थेचे हळूच

हळूच कसे विकून कोंबले जाते सारे काही 
देशाच्या मालकीचे चारदोन भांडवलदारांच्या घशात
हळूच मग देश टणाटण उड्या मारतो विकासाच्या हायवेवर
उपाशीपोटीउघडेनागडे देह पाहू लागतात हा देशाचा पराक्रम

हळूच कसे होतात हल्ले देशाच्या सीमेवर
हळूच छाती ठोकून कशा मारल्या जातात वीरतेच्या बाता 
हळूच मतपेटीतून हायजॅक केला जातो देश 
हळूच कसे परावर्तित केले जातात नागरिक मतदारांत
हळूच दर पाच वर्षांनी दाबतो आपण मतपेटीची बटणं
आणि हळूच मारले जातो आपण आपल्याच संमतीने

हळूच मारली जाते भूक, बुद्धी, निष्ठा, रोजगार
हळूहळू आपण काहीच बोलत नाही, विचार करत नाही
आपल्या भावभावनांना उरत नाही जागा आपल्याच मनात

हळुहळू देशभक्तीचं सॉफ्टवेर इंस्टॉल केलं जातं मन आणि मेंदूत
मग आपलं उपाशी, बेरोजगार राहणं, शांत संयमी राहणं, काहीही न बोलणं,
ठरत जातं देशभक्तीचं प्रमाण

सारं काही अगदी हळू हळू होतंय.
बघा, हळूहळू सगळं कसं शांत शांत चाललंय….

अभिप्राय 3

  • हृदयस्पर्शी शोकांतिका!

  • राजराहूल खंडागळे, आपण झापडं बांधली असावित. त्यामुळे आपणास सर्व नकारात्मकच दिसत असावे. नाहितर तुम्ही असही लिहिलं असतं………. हळूच कधी खेड्यापाड्यातील ग्रुहिणीच्या स्वयंपाक घरात गँस सिलेंडर जाऊन तिची धुरा पासून सुटका झाली. हळूच कधी खेड्यापाड्यात शौचालयं उपलब्ध होऊन, गरीब महिलांचं लज्जा रक्षण झालं। ज्या गोष्टिंचे तुम्ही वर्णन केले आहे, त्याने भ्रष्टाचाराला आळा बसला. पण आपण वर्णन केलेल्या गोष्टिंमुळे ज्यांच्या नाड्या आवळल्या गेल्या, त्यांच्या सुरात तुम्हीही सूर मिसळत आहात. असो, व्यक्ती तितक्या प्रक्रुती!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.