मनोगत

‘आजचा सुधारक’चा एप्रिल अंक माध्यमस्वातंत्र्याविषयी असणार असे आवाहन केले तेव्हा ओघानेच आपल्याकडील लोकशाहीवर जे अनेक प्रश्न सतत उभे राहतात, ते पुढे येणार हे निश्चित झाले होते. सदर अंकासाठी अनेकांनी त्या विषयावर आपले साहित्य पाठवले. ते आपण ह्या अंकात समाविष्ट केले आहे.
या अंकात दोन चित्रकारांचेदेखील योगदान आहे. व्यंगचित्रे ही तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर नेमके भाष्य करणारी एक अद्भुत कला आहे. प्रभाकर पाचपुते ह्यांच्या व्यंगचित्रांतून दोन दशकांपूर्वीची सामाजिक स्थिती लक्षात येऊ शकेल. तर मिलिंद क्षीरसागर ह्यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे अचूक वर्णन आपल्या चित्रांमध्ये केले आहे.

आपला समाज हा गोष्टी आवडणारा समाज आहे आणि प्रत्येक गोष्टीतून काही बोध निघावा यासाठी आग्रहीदेखील आहे. सदर अंकातील बोधकथेतून, तसेच भग्न तळ्याच्या अनुभवातून प्रत्येक वाचक आपापला बोध शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे.

शेतकरी आंदोलनाचे वास्तव समाजमाध्यमांमधून किंवा वर्तमानपत्रे, टी.व्ही. ह्या माध्यमांतून अव्याहत आपल्यावर आदळत होते तो २-३ महिन्यांपूर्वीचा काळ आणि त्या सर्व माध्यमांमधून तो विषय पार हद्दपार झाला आहे हे आजचे वास्तव! हे असे होते ते निव्वळ राजकीय पक्षांच्या फायद्यासाठीच असते हे न समजण्याइतकी जनता आज खुळी राहिली नसली, तरी समर्थक आणि विरोधक दोन्ही पक्ष घडणाऱ्या घटनेच्या तव्यावर आपापली पोळी भाजून घेतातच. लोकशाही, भांडवलशाही, किसान आंदोलन यांवरील लेख त्यादृष्टीने डोळ्यांत अंजन घालणारे ठरतील.

कोविडोत्तर काळ नेमक्या कोणत्या संधी घेऊन येऊ शकतो यावरचे भाष्य आशादायी चित्र तर उभे करतेच, सोबतीने नवी आव्हानेही मांडते.

समाजमाध्यमांची ताकद ओळखून त्यांना आपल्या कह्यात ठेवू पाहणारे पक्षनेते ह्याच समाजमाध्यमांचा वापर करून जनतेच्या विचारप्रक्रियेला त्यांना हव्या त्या दिशेला वळवण्याची ताकद बाळगतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर सतत होत असलेल्या हल्ल्याविषयीचे काही लेख; तसेच काही कविता ह्यावर प्रकाश टाकतात.

‘आजचा सुधारक’मध्ये प्रकाशित होणाऱ्या साहित्यातील प्रत्येक मुद्द्याशी आम्ही सहमत असूच असे नाही. परंतु त्या निमित्ताने वेगवेगळे विचारही समोर येत राहावेत हाच हेतू.

अभिप्राय 2

  • आजचा सुधारक एप्रिल २०२१ हा अंक प्रकाशित होऊन अडीच महिने उलटून गेले आहेत.
    या अंकातील मनोगत, विविध लेख आणि यातील बहुतेक लेखांवर आलेल्या प्रतिक्रीया वा प्रतिसादांचा विचार करताना माझ्या मनात आलेले विचार असे:

    (१) लोकशाही या विषयावर आणि त्या विषयाशी निगडित अशा विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनी विविध मते व्यक्त केली आहेत. परंतु मला यातील काही प्रतिक्रियांमध्ये एक बाब जाणवली ती अशी की त्या एकतर्फी आहेत. म्हणजे संवादाचा अभाव दिसतो. याचे एक कारण असे दिसते की सध्याच्या भाजप सरकारशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही ही विचारसरणी. लोकशाही मजबूत करण्यासाठी संवाद आवश्यक असतो.
    (२) लोकशाही समाजवाद, भांडवलशाही आणि आपल्या सरकरची अर्थ धोरणे याबद्दल मतैक्य अपेक्षित नाही. परंतु आपल्या देशातील गरिबीचा प्रश्न तो मुळात कशामुळे निर्माण झाला आहे याचा विचार नको का करायला?
    या संदर्भात पुढील मुद्दे पण लक्षात घेणे जरुरीचे आहे:
    • अल्प भूधारकांचे, छोट्या शेतकऱ्यांचे आणि भूमिहीन मजुरांचे सध्याचे प्रश्न कोणते आहेत? ते कशामुळे निर्माण झाले आहेत? ते फक्त गेल्या सात वर्षातील आहेत की बरेच जुने आहेत?
    मजबूत लोकशाही आणि गरिबीचे उच्चाटन यांचे जवळचे नाते आहे. आजवरचा आपला अनुभव पाहता राजकीय पक्ष गरीबांसाठी काही करतील का?
    (28.05.21)

  • प्रिय नरेंद्र ह्यांना
    सस्नेह.

    आपल्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यानंतर कदाचित मूळ लेखकाचा आणि तुमचा संवाद पुढे जात असेलही. हा संवाद सुधारकच्या संस्थळावरून किंवा कमीत कमी वैयक्तिक ई-मेल वरून चालू राहावा हा आमचा प्रयत्न असतो.

    बरेचदा सुरुवातीचे काही दिवस प्रतिक्रियांच्या अपेक्षेत मूळ लेखक संस्थळावर नियमित भेट देतात. काही दिवसांनंतर संस्थळाची रिडरशीप कमी कमी होत जाते. अशावेळी उशीरा येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी मी समन्वयक ह्या नात्याने लेखकांस कळवत असते.

    गेले २ महिने (एप्रिल आणि मे) नागपुरकरांसाठी अतिशय खडतर गेले असून मी व्यक्तिगतरीत्या व परिचितांचा मोठा व्याप असल्याने त्या भूमिकेतूनही कोरोनाचा सामना करीत होते. त्यामुळे मन आणि विचार दोन्ही कोरोनानेच व्यापले होते. सुधारकमधील लेखांवर ह्या दरम्यान येणाऱ्या प्रतिक्रियांना म्हणूनच योग्यवेळेत प्रतिसाद देता आला नाही.

    आज सुधारकच्या आगामी अंकाविषयीचे आवाहन पाठवते आहे. सोबतच आपल्या प्रतिक्रियादेखील संबंधित लेखकांपर्यंत पोहोचतील. झालेला विलंब आपण समजून घ्याल ही अपेक्षा.

    इतर काही विषयांसोबतच आपण मनोगतावरील प्रतिसादात उल्लेख केल्याप्रमाणे मजबूत लोकशाही आणि गरिबीचे उच्चाटन यांमथील जवळचे नाते लक्षात घेऊन विषमता आणि सत्तेच्या केंद्रीकरणामुळे अपरिहार्यपणे लादले जाणारे ध्रुवीकरण याबद्दलचे लेख आगामी अंकासाठी मागवीत आहोत.

    आपला सहभाग अपेक्षित आहे.

    धन्यवाद
    – प्राजक्ता अतुल
    ०९३७२२०४६४१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.