‘आजचा सुधारक’चा एप्रिल अंक माध्यमस्वातंत्र्याविषयी असणार असे आवाहन केले तेव्हा ओघानेच आपल्याकडील लोकशाहीवर जे अनेक प्रश्न सतत उभे राहतात, ते पुढे येणार हे निश्चित झाले होते. सदर अंकासाठी अनेकांनी त्या विषयावर आपले साहित्य पाठवले. ते आपण ह्या अंकात समाविष्ट केले आहे.
या अंकात दोन चित्रकारांचेदेखील योगदान आहे. व्यंगचित्रे ही तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर नेमके भाष्य करणारी एक अद्भुत कला आहे. प्रभाकर पाचपुते ह्यांच्या व्यंगचित्रांतून दोन दशकांपूर्वीची सामाजिक स्थिती लक्षात येऊ शकेल. तर मिलिंद क्षीरसागर ह्यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे अचूक वर्णन आपल्या चित्रांमध्ये केले आहे.
आपला समाज हा गोष्टी आवडणारा समाज आहे आणि प्रत्येक गोष्टीतून काही बोध निघावा यासाठी आग्रहीदेखील आहे. सदर अंकातील बोधकथेतून, तसेच भग्न तळ्याच्या अनुभवातून प्रत्येक वाचक आपापला बोध शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे.
शेतकरी आंदोलनाचे वास्तव समाजमाध्यमांमधून किंवा वर्तमानपत्रे, टी.व्ही. ह्या माध्यमांतून अव्याहत आपल्यावर आदळत होते तो २-३ महिन्यांपूर्वीचा काळ आणि त्या सर्व माध्यमांमधून तो विषय पार हद्दपार झाला आहे हे आजचे वास्तव! हे असे होते ते निव्वळ राजकीय पक्षांच्या फायद्यासाठीच असते हे न समजण्याइतकी जनता आज खुळी राहिली नसली, तरी समर्थक आणि विरोधक दोन्ही पक्ष घडणाऱ्या घटनेच्या तव्यावर आपापली पोळी भाजून घेतातच. लोकशाही, भांडवलशाही, किसान आंदोलन यांवरील लेख त्यादृष्टीने डोळ्यांत अंजन घालणारे ठरतील.
कोविडोत्तर काळ नेमक्या कोणत्या संधी घेऊन येऊ शकतो यावरचे भाष्य आशादायी चित्र तर उभे करतेच, सोबतीने नवी आव्हानेही मांडते.
समाजमाध्यमांची ताकद ओळखून त्यांना आपल्या कह्यात ठेवू पाहणारे पक्षनेते ह्याच समाजमाध्यमांचा वापर करून जनतेच्या विचारप्रक्रियेला त्यांना हव्या त्या दिशेला वळवण्याची ताकद बाळगतात. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर सतत होत असलेल्या हल्ल्याविषयीचे काही लेख; तसेच काही कविता ह्यावर प्रकाश टाकतात.
‘आजचा सुधारक’मध्ये प्रकाशित होणाऱ्या साहित्यातील प्रत्येक मुद्द्याशी आम्ही सहमत असूच असे नाही. परंतु त्या निमित्ताने वेगवेगळे विचारही समोर येत राहावेत हाच हेतू.