ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ

ज्योतिष : शास्त्र की थोतांड?
“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे हे निश्चितच आशादायी आहे.

IGNOU सोबत आणखी ७-८ विद्यापीठे आहेत (जसे की बनारस हिंदू विद्यापीठ, कालिदास संस्कृत विद्यापीठ इत्यादी) जिथे हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. पण तो कलाशाखेत! हे म्हणजे अप्रत्यक्षरित्या ज्योतिष हे विज्ञान नाही असं मान्य केल्यासारखं आहे. विज्ञानशाखेतील तर्क, अनुमान आणि अन्य वैज्ञानिक कसोट्या यांपासून सुटका मिळावी हाच हेतू यामागे असू शकतो. पण कोणत्याही विद्यापीठात किंवा कोणत्याही अभ्यासक्रमात ज्योतिष विषय शिकवला तरी त्यातील भोंगळपणा, कालबाह्य कल्पना या मानवी जीवनास हितकारक आहेत असं म्हणता येणार नाही. थोडक्यात, एखादा विषय विद्यापीठात शिकवला जातो या एकमेव निकषावर त्या विषयाचं मूल्य ठरत नसते.

ज्योतिषासारखे अनेक अवैज्ञानिक-अतार्किक विषय धर्माचा आधार घेऊन समाजात पसरवले जातात. त्यामुळे त्यांची चिकित्सा कठीण बनते. खरं म्हटले तर धर्माचा आणि ज्योतिषाचा संबंध नाही. दुसरी आणि अधिक गंभीर समस्या म्हणजे फलज्योतिष हे समाजकारण, राजकारण, वैद्यकीय क्षेत्र, मानसशास्त्र अशा महत्त्वाच्या विषयांत आपली पाळेमुळे घट्ट करत आहे. समजा, एखाद्याला स्किझोफ्रेनिया (Schizophrenia, छिन्नमानस आजार) झाला आहे आणि त्याचे निदान ‘मंगळाची किंवा शनीची बाधा झाली’ म्हणून करण्यात आले तर त्यामुळे होणारी सामाजिक हानी अधिक असेल. फलज्योतिषाची मानसिक आरोग्यक्षेत्रात होणारी लुडबुड, हा गंभीर मुद्दा आहे.

चिकित्सा करताना अनेक वेळेस “तुम्ही आमच्याच धर्माची-संस्कृतीची चिकित्सा का करता” हा लंगडा युक्तिवाद भले-भले करताना दिसतात. 

या ठिकाणी एक गोष्ट आठवते. फ्रांसिस बेकन या इंग्लिश तत्त्वज्ञाची ही गोष्ट आहे. विषय असतो “घोड्याला दात किती?” ३-४ दिवस प्रदीर्घ चर्चा होते. अनेक धर्मग्रंथ संदर्भ म्हणून घेतले जातात. खूप काळ वितंडवाद होतो. दरम्यान हे सर्व पाहणारा एक सर्वात तरुण पाद्री म्हणतो, “शेजारी घोड्याचा तबेला आहे. तिथे प्रत्यक्ष जाऊन आणि तिथल्या घोड्याचें तोंड उघडून आपण दात मोजूया का?” सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. कारण धर्मग्रंथात प्रत्यक्ष जाऊन दात मोजण्याची तरतूद नसतें. इथे तरुण पाद्रीनें धर्मग्रंथाना धक्का दिलेला असतो. मुद्दा एवढाच आहे, अज्ञान सर्वत्र होते. ग्रीक/चिनी/अरेबिक सर्व संस्कृतीत असा भोंगळपणा होता. त्यामुळे आमच्याच धर्माची-संस्कृतीची चिकित्सा का करता? हा प्रश्न गैरलागू आहे. पृथ्वी सपाट आहे असा मानणारा वर्ग आहे. कुराणमध्ये आणि हादीसमध्ये ‘कयामत का दिन’शी निगडित तद्दन कपोलकल्पित भविष्यवाणी आहे. अनेक चर्चेससुद्धा असे निरर्थक अभ्यासक्रम चालवतात. चिनी लोकांची नवीन वर्षेसुद्धा वेगवेगळ्या प्राण्यांची अशी येत असतात. अज्ञान सर्वत्र होते, सर्वत्र आहे. अज्ञानी असणे यात काही वैगुण्य नाही; पण कालप्रवाहात सज्ञानी न होणे हे अविकसित मानवाचे लक्षण आहे. अज्ञान बाळगण्याचा अधिकार जगातील सर्व नागरिकांना आहे, पण शासकीय खर्चानी अज्ञान जोपासू नये. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेनुसार “वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे.”

फलज्योतिषाची भलामण करणारे दुसरा युक्तिवाद असा करतात की ग्रहगोलांचा अभ्यास करायला आम्हाला विदा गोळा करायची आहे म्हणून हा विषय अभ्यासक्रमात असावा. इथे एक गफलत आहे. ती म्हणजे खगोलशास्त्र (astronomy) आणि फलज्योतिष (astrology) या दोन वेगवगेळ्या विषयांची. इंग्लिशमध्ये नामसाधर्म्य असल्याने ही गफलत सर्वसामान्य लोकांना पचनी पडते. खगोलशास्त्राची स्पष्ट व्याख्या आहे, “खगोलशास्त्र हे विज्ञान (science) आहे, जे पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील सर्व गोष्टींचा अभ्यास करते. जसे की ग्रह, तारे, लघुग्रह, आकाशगंगा; आणि त्या खगोलीय पिंडांचे गुणधर्म आणि संबंध. दुसरीकडे, फलज्योतिष हा विश्वास (belief) आहे जिथे ताऱ्यांच्या आणि ग्रहांच्या स्थितीचा पृथ्वीवरील मनुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो याचे ठोकताळे मांडले जातात. 

जर का ग्रहगोलांचा ‘अभ्यास’ करायचा असेल तर त्यास कुणाही विवेकी मानवाचा विरोध असण्याचे अजिबात कारण नाही. विदा गोळा करायचा असेल, तर भौतिकशास्त्राचे/खगोलशास्त्राचे अभ्यासक्रम घेणारी १०-१२ विद्यापीठे, IITs, आर्यभट्ट शोध संस्थान, IISC बंगलोर अश्या संस्था आहेत. अधिक स्पष्ट करायचं झालं तर, उदा. एखाद्याला MBBS ला प्रवेश मिळाला नाही, तर तो होमिओपॅथी करतो तसं. बुद्धी आणि प्रतिभा असेल त्यांनी वरील ठिकाणी ग्रहगोलांचा अभ्यास जरूर करावा. त्यासाठी फलज्योतिष शिकण्याची गरज नाही. 

पृथ्वीपासून सुमारे २२५ दशलक्ष किलोमीटर लांब असणाऱ्या मंगळग्रहाला फक्त एकच कामधंदा असतो का? उठसूट फक्त भारतीय लोकांची लग्ने मोडणे! शनी हा भारतीय लोकांना साडेसाती करण्यासाठी निर्माण झाला आहे का? हे सर्वच हास्यास्पद आहे.

यांचा तिसरा दावा असतो, तो म्हणजे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रातील पाण्याला भरती-ओहोटी येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचे समुद्रातील पाण्यावर जसें परिणाम होतात, तसें ते मानवावर सुद्धा होत असतात. कारण मानवी शरीरात ६०% पाणी असते. छद्मविज्ञान म्हणतात ते हेच! या संदर्भात न्यूटनचा युनिव्हर्सल गुरुत्वाकर्षणाचा नियम संदर्भ म्हणून घेतला पाहिजे. ज्याच्या आधारे ग्रह, उपग्रह, तारे यांचे एकमेकांवरील परिणाम जाणून घेता येतात. त्यासाठी फलज्योतिषाची अजिबात गरज नाही. 

F = G x m1 x m2 /r2 (F = force, G = gravitational constant). गुरुत्वाकर्षणाच्या या नियमानुसार m1 आणि m2 वस्तुमाने असलेल्या दोन कणांमधील बल या दोन वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती असते, त्या दोहोंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते . गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने हे स्पष्ट होते की, दोन कण एकमेकांकडे एकाच बलाने आकर्षित होतात. त्यामुळे क्रिया आणि प्रतिक्रिया समान असतात. मानवाचे वस्तुमान (m1) आणि मंगळाचे किंवा शनीचे वस्तुमान (m2 ) असे गृहीत धरल्यास एक सूक्ष्मातीत-अतिसूक्ष्म-नगण्य असा परिणाम होत असतो. पण त्याहून अधिक परिणाम पृथ्वीचा किंवा शेजारी असलेल्या वस्तूंचा वा व्यक्तींचा होत असतो. त्यामुळे दूरवरील ग्रहांमुळे होणारे अतिसूक्ष्म परिणाम मानवी जीवनात, त्याच्या स्वभावात बदल घडवत असतात ही एक अतार्किक अशी कल्पना आहे. मुळातच विज्ञान विकसित होऊन ४००-५०० वर्षे झाली आहेत. विज्ञान हे अचूकतेकडे विकसित होत असते. एखाद्या दगडातील नको असलेला भाग हातोड्याने काढून टाकत एक सुंदर शिल्प बनते असा तो प्रवास असतो. “जुनं आहे, पुराणकथेत आहे, एखाद्या पुरातन संस्कृतीत आहे, बहुसंख्य विश्वास ठेवतात” म्हणून ते विज्ञान आहे असं म्हणता येत नाही. विज्ञानाला सज्जड पुराव्यांची जोड असते. 

या फलज्योतिषाचा नेमका उपयोग काय?
देशाच्या जडणघडणीत फलज्योतिषाचे योगदान काय? देशात ज्या ठळक घटना घडल्या, त्यावेळी फलज्योतिषाचा नेमका उपयोग काय झाला? स्वातंत्रसंग्राम, संविधान निर्मिती, चीन युद्ध, पाकिस्तान युद्ध, भोपाळ दुर्घटना, बाबरी मशीद आणि नंतर मुंबई दंगल, हरितक्रांती, दुग्धक्रांती, कोरोनासारखे आजार यावेळी फलज्योतिषानें नेमकी काय भूमिका बजावली?

राष्ट्राची प्राणहानी, वित्तहानी हे वाचवू शकले का? उत्तर : नाही. 

एक गम्मत म्हणून सांगतो. आपल्याकडे काही मंडळी व्यावहारिक असतात. पत्रिका पाहणे हे ‘न आवडलेल्या मुलाला/मुलीला नकार देण्याचे साधन’ म्हणून वापरतात असंसुद्धा पाहण्यात आलं आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. नवीन पिढी या उपक्रमांना फारसा प्रतिसाद देत नाही. प्रबोधन मात्र सातत्याने झालं पाहिजे. विज्ञानाचा फायदा सर्व मानवांना होतो. औषधविज्ञानाचा फायदा डॉक्टर आणि रोगी दोघांना होतो पण फलज्योतिषाच्या फायदा फक्त ज्योतिष्यांनाच होतो.

शेवटी, वसंत बापटांच्या कवितेतील काही ओळी उर्धृत करत आहे :

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

या संदर्भात एक छान वाक्य वाचनात आलं होतं, “आकाशातील ग्रह-तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग?” वेदात विज्ञान शोधत बसू नका, विज्ञानाचे निकष वेगळे असतात. म्हणून अभ्यासक्रमातील उद्देश, पत्रिकेत जे नमूद केलं आहे, ‘प्राचीन गौरवशाली ज्ञानाचा प्रसार’ हे उद्दिष्ट बाधित होत आहे.

गरिबी, धर्म, जातीपाती या तिसऱ्या जगातील अडचणींवर मात करायची असेल तर तर्क-विवेक जोपासला पाहिजे. फलज्योतिषासारख्या भ्रामक कल्पनांना जीवनात अजिबात स्थान असता कामा नये.

म्हणून फलज्योतिषाच्या विरोधातील प्रबोधन मोहीम ही ‘अज्ञान विरुद्ध विज्ञान’ अशा स्वरूपाची असावी. 

kumar.nage1@gmail.com

अभिप्राय 6

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.