ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य

एकेकाळी मी पण ज्योतिषी होतो. पत्रिका वगैरे बघायचो, लोकांना मार्गदर्शन करायचो. एका ज्योतिषी असण्यापासून ते ज्योतिषाचा टीकाकार होणे या बदलाचे श्रेय माझ्या ज्योतिषशास्त्राच्या Empirical परीक्षणाच्या (Empirical testing) प्रयोगांना द्यावे लागेल. मी जसेजसे हे प्रयोग करत गेलो तसेतसे ज्योतिषविद्येविषयीचे माझे मत बदलत गेले आणि आज मी दहा वर्षांच्या संशोधनानंतर, अनेक प्रयोगांच्या आधारे आणि हजारो पत्रिकांच्या विश्लेषणानंतर असं विश्वासाने म्हणू शकतो की ज्योतिष हे विज्ञान नाही आणि शास्त्र म्हणून ते अथवा त्याची तत्त्वेही वैध नाहीत.

जेव्हा ज्योतिषविद्येची सत्यासत्यता तपासून बघण्याचा विषय येतो तेव्हा Double Blind परीक्षा हा सर्वात सोपा पर्याय असतो. आणि जेव्हा Double Blind परीक्षेचा विषय येतो, तेव्हा डॉ. नारळीकरांनी २००८ मध्ये केलेल्या प्रयोगाचा उल्लेख न करता पुढे जाणे शक्य होत नाही. त्यांनी मतिमंद मुलांच्या पत्रिका आणि हुशार मुलांच्या पत्रिका क्रमांकित (coding) करून एकमेकींत मिसळल्या आणि ज्योतिष्यांना दिल्या व सोबत आव्हान केले की, जर मानवी आयुष्याच्या ठळक गोष्टी पत्रिकेत प्रतिबिंबित होत असतात असे ज्योतिषशास्त्र म्हणते तर त्या आधारे कुठल्या पत्रिका मतिमंद मुलांच्या आहेत हे ओळखून दाखवा. अशा प्रकारचे विश्लेषण ‘आहे किंवा नाही’ अशा स्वरूपाचे असते. त्यामुळे ‘छापा-काटा’ केला तरी उत्तर ५०% बरोबर येणार; म्हणून या विश्लेषणाचा निकष ७०% बरोबर येण्याचा असावा असा ठेवला. या परीक्षेचे निष्कर्ष तेच आले जे जगभर अशा परीक्षांचे येतात. कुठल्याही ज्योतिष्याला ७०% पेक्षा जास्त यश मिळाले नाही आणि सरासरी यशस्विता ५०% पेक्षा कमीच होती. सर्वसामान्य माणसाने अश्या परीक्षांच्या निकालावरून स्वत:साठी बोध घेणे जरुरी आहे. विचार करा, जर ही परीक्षा पास करता येण्यासारखी ज्योतिषशास्त्रात काही क्षमता असती तर त्यांनी अश्या कित्येक परीक्षा स्वतः किंवा स्वयंसेवी संस्थांकडून आयोजित करून त्यात यशस्वी होऊन दाखवले असते. हे इतके परिणामकारक प्रात्यक्षिक झाले असते की आपण सर्वांनी त्यांच्या घराबाहेर रांग लावली असती. त्यांना जाहिरात करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळाली नसती. अहो, आज प्रसिद्धी कोणाला नको आहे? तरीही ते अश्या परीक्षांचे नाव घेत नसतील तर त्याचे कारण आणि अर्थ उघड आहे. आपल्याकडे double blind परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्था नाहीत हे आपले आणखी एक दुर्दैव आहे. या विषयात काम करणाऱ्या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेणे ही खरोखर काळाची गरज आहे.

Double blind परीक्षेनंतर मी कशाला प्राधान्य देईन तर ते म्हणजे Empirical परीक्षणाला. मा‍झ्या मते ही परीक्षणपद्धती ‘दूध का दूध, पानी का पानी’ करायला समर्थ आहे. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास होणे जरुरी असते. त्यामुळे आपण त्याचा आग्रह धरला पाहिजे.

आपल्या लग्नसंस्थेमध्ये आज ९०% ठिकाणी पत्रिका जुळवणे ही पहिली पायरी असते. इतका मोठा परिणाम आपण आपल्यावर, समाजावर होऊ देत असताना पत्रिका जुळविण्याच्या पद्धतीचे किंवा ज्योतिषविद्येचे परीक्षण झालेच पाहिजे असा आग्रह आपण कधीच धरला नाही, हा समाज म्हणून आपला एक मोठा निष्काळजीपणा आहे. अश्या परीक्षांना कृतिशीलपणे, स्वेच्छेने (voluntarily) सामोरे जाऊन स्वतःच आपले शास्त्र सिद्ध करून दाखवायची जबाबदारी खरेतर ज्योतिषवर्गाची आहे; पण त्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर पारदर्शी स्वरूपाचे असे काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. आज मी जेव्हा ज्योतिष समर्थनार्थ चालवलेल्या मासिकांमधून प्रसिद्ध होणाऱ्या लेखांचा किंवा संशोधनात्मक पुस्तकांचा अभ्यास करतो तेव्हा त्यात अनेक त्रुटी दिसून येतात. बहुतेक लेख हे ५० ते १०० पत्रिका घेऊन त्यांच्या आधारावर मांडलेला एक नमुना असतो. उदाहरणार्थ, ५० पत्रिका एकत्र करून कर्करोगाला कारणीभूत असणारे योग दिलेले असतात. त्या ५० पत्रिकांमध्ये काही योग वारंवार आढळत असतीलही, पण विदेच्या दृष्टीने मुळातच ५० हा फारच छोटा आकडा आहे आणि शिवाय त्यांना कर्करोगाशी जोडण्यासाठी, ज्यांना कर्करोग कधीही झालेला नाही अश्या पत्रिकांबरोबरही त्यांची तुलना झाली पाहिजे. जर दोन्ही पत्रिकांच्या संचात मोठा फरक आला तर आणि तरच ते योग सिद्ध झाले असे मांडले पाहिजे. किती रंजकता आहे या विषयात, विचार करा. मला तरी Empirical परीक्षण हे इतके महत्त्वाचे वाटते की सध्या माझा सर्व  वेळ मी या एकाच गोष्टीला वाहिला आहे. TVवर अलीकडेच ज्योतिषविद्येवर काही वादविवाद बघायला मिळाले. तेव्हा मला राहून राहून वाटत होते की हे लोक इकडच्या तिकडच्या विषयावर का वाद घालत आहेत? यांनी फक्त Empirical परीक्षणावर चर्चा केली पाहिजे, इतका हा विषय महत्त्वाचा आहे. 

ग्रहांचा आपल्या आयुष्यातल्या मोठमोठ्या घटनांना नियंत्रित करण्याइतपत परिणाम होतो का? होतो तर तो कसा? ज्योतिषशास्त्राची उत्पत्ती कुठे झाली? वगैरे गोष्टी बाजूला ठेवू जरा वेळ! या सर्व मुद्द्यांपेक्षा आजमितीला ज्योतिषविद्या double blind आणि Empirical परीक्षेत पास होते का ते पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच ज्योतिषविद्येच्या Empirical परीक्षणाविषयी एक छोटा संवाद मी आपल्याबरोबर या लेखाद्वारे साधणार आहे. जे वाचक आयुष्यात कधी ना कधी ज्योतिष वापरतात त्यांनी हे विशेष समजून घेतले पाहिजे की ज्या ज्योतिषविद्येवर विश्वास ठेवून तुम्ही तुमचे निर्णय घेणार आहात, तिची परीक्षेतील कामगिरी कशी आहे. ज्या नियमांना वापरून तुमचे भविष्य सांगितले जाते ते कितपत तपासले आहे, हे बघितलेच पाहिजे. कारण तुमचा विश्वास चुकीचा ठरला तर त्याची किंमत तुम्ही स्वतः मोजणार आहात.

ज्योतिषविद्येच्या Empirical परीक्षणात आपण दोन एकमेकांच्या अगदी विरुद्धगुणधर्म असलेल्या लोकांच्या पत्रिकांचे संच तयार करतो आणि ज्योतिषविद्येचे नियम लावून त्यांची तुलना करतो. जर दोन संचांना ते नियम लागू पडण्यात लक्षणीय फरक दिसला आणि तो सातत्याने तसा दिसला तर आपण ज्योतिष हे शास्त्र आहे असे मानणार, नाहीतर नाही. यातले मुख्य मुद्दे असे – 

  • पत्रिकांचे दोन परस्परविरुद्ध संच करणे – हे या परीक्षणामधील सर्वात पहिले आणि सोपे पाऊल आहे. उदाहरणार्थ, अल्पायु विरुद्ध दीर्घायु असे दोन संच केले तर, ज्योतिषशास्त्राचे अल्पायुविषयीचे नियम आपल्याला निःसंदिग्धपणे तपासता येतील. कारण त्यात कुठलीही अस्पष्टता राहणार नाही. अल्पायु, दीर्घायु यांच्या ठळक व्याख्या करताना काळजी हीच घ्यायची आहे की ‘अल्पायुं’च्या आणि ‘दीर्घायुं’च्या व्याख्यांमध्ये सरमिसळ होण्याची तसूभरही शक्यता असणार नाही. तेव्हाच हे दोन अगदी वेगळे संच बनू शकतात. जसे की ३० वर्षांपेक्षा कमी आयुष्य म्हणजे अल्पायु आणि ७०पेक्षा जास्त म्हणजे दीर्घायु असे म्हटले तर दोन अगदी विरुद्ध गट तयार होतील आणि ते कधीही एकमेकांत मिसळणार नाहीत. माझ्या एका प्रयोगात (संदर्भ–१) मी कर्करोग झालेले विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले असे गट तयार केले. त्यात अधिक स्पष्टता आणण्यासाठी ६० वर्षांच्या आत कर्करोग निदान झालेले विरुद्ध ८० वर्षांपेक्षा जास्त जीवन जगलेले पण आयुष्यात कधीही कर्करोग न झालेले असे दोन गट केले. कारण ६० वर्षांच्या आतील माणसाच्या जीवनात, कुटुंबात कर्करोग संपूर्ण उलथापालथ करतो आणि त्यामुळे जर ज्योतिषशास्त्र खरे असेल तर ते पत्रिकेत प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, असा त्यामागे तर्क होता. उद्या अशी शंका कोणी काढायला नको की ७५व्या वर्षी झालेला कर्करोग पत्रिकेत दिसणार नाही कारण त्याचा त्या व्यक्तीच्या जीवनावर विशेष परिणाम नाही. या पार्श्वभूमीवर मुद्दामहून कर्करोगाच्या संचासाठी ६० वर्षे वयाची अट आणून स्पष्टता आणली. अश्या रीतीने जसा प्रयोग असेल त्याप्रमाणे तारतम्याचा वापर करावा लागतो. माझ्या अभ्यासाची अजून काही उदाहरणे म्हणजे मतिमंद विरुद्ध हुशार (संदर्भ–२), कधीही लग्न न झालेले विरुद्ध वेळीच (३० वर्षांपूर्वी) लग्न होऊन आयुष्यभर एकत्र राहिलेले (संदर्भ–३) इत्यादि. या सर्व प्रयोगात दोन्ही संचात प्रत्यक्षात विरुद्ध गुणधर्म असल्याने एका गुणधर्मासाठीचे असलेले ज्योतिषविद्येचे नियम खरे असतील तर दुसऱ्या संचाला लागू पडायला नकोत आणि ते तसे परीक्षणात लक्षणीय फरकाने दिसायला पाहिजे अशी ही परीक्षेची रचना आहे.
  • किती पत्रिका घेणे जरुरी आहे? – निष्कर्षांची अचूकता ही तुम्ही किती पत्रिका घेता यावरून ठरत असते आणि त्यासाठी अनेक calculators उपलब्ध आहेत. पण हे सोपे करून सांगायचे तर मी म्हणेन, साधारण प्रत्येक गटात कमीतकमी २५० ते ३०० पत्रिका असणे आवश्यक आहे. तुम्ही काय तपासता, हे पण महत्त्वाचे आहे. जसे की परवा TVवर एका ज्योतिष्याने असे प्रतिपादन केले की पहिल्या आणि सातव्या घरात राहू असेल तर घटस्फोट होणे नक्की. आता इथे तुम्ही या नियमाचे Empirical परीक्षण दोन प्रकारे करू शकता. 
    एक म्हणजे कुठलाच पूर्वग्रह अथवा निवड न ठेवता ज्या ज्या पत्रिकेत राहू केतू पहिल्या आणि सातव्या घरात आहेत त्या सगळ्या पत्रिका घ्या. (कुठलीही न वगळता – हे फार महत्त्वाचे आहे, जे बऱ्याच अभ्यासात दिसून येत नाही). यांपैकी किती जणांचे घटस्फोट झाले आणि किती जणांचे नाही ते बघा. घटस्फोट झालेले आणि न झालेले हे ७०:३० या प्रमाणात असतील तर, आपण हा नियम वैध आहे असे म्हणू शकतो.
    दुसरी पद्धत म्हणजे घटस्फोट विरुद्ध घटस्फोट न झालेले अशा जोडप्यांच्या पत्रिका घ्या. त्यांपैकी घटस्फोटाचा योग किती पत्रिकांमध्ये आहे ते बघा. यांपैकी प्रत्येक पत्रिकेत राहू हा पहिल्या आणि सातव्या घरात असणार नाही; परंतु संचातल्या पत्रिकांपैकी २५० ते ३०० पत्रिका तरी राहू पहिल्या आणि सातव्या घरात असणाऱ्या मिळाल्या पाहिजेत. अगदी ढोबळ अंदाज बांधायचा तर यासाठी साधारण १५०० ते १८०० तरी पत्रिका मिळवायला हव्या. एवढ्या पत्रिका गोळा करणे हे निश्चितच अवघड आहे पण अशक्य नाही. मुख्य मुद्दा इथे हा आहे की जोवर तुम्ही हा प्रयोग अश्या रीतीने करत नाही तोवर तो नियम सिद्ध होत नाही. त्यामुळे असे परीक्षण केले नसेल तर तो नियम छाती ठोकून तरी सांगू नये. ज्योतिषविद्येच्या पुस्तकांमध्ये असे शेकडो नियम दिलेले आहेत की ज्यांच्या सिद्धतेसाठी ते नियम सांगणाऱ्यांनी हजारो पत्रिकांच्या आधारे आणि वर सांगितल्याप्रमाणे Empirical परीक्षण करूनच सांगायला हवे होते. पण मला त्यात फक्त नियम दिसतात, त्यामागचे प्रयोग कुठेच दिसत नाहीत. आणि या नियमांचाच वापर तुमचे भविष्य सांगायला होत असतो. तेव्हा परत एकदा विचार करा.
  • पत्रिका गोळा करण्याची पद्धत – Empirical परीक्षण ह्या विषयामध्ये संख्याशास्त्र येत असल्याने विदा गोळा करण्याची पद्धतही संख्याशास्त्राच्या नियमानुसारच केली पाहिजे. विदा हा एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडून किंवा उपलब्ध असलेल्या नि:पक्षपाती स्रोताकडून घेणे जरुरी आहे. इथे या संशोधनाची आणि संशोधकांच्या प्रामाणिकतेची खरी परीक्षा असते. विदेची गम्मत अशी आहे की ती जर आपण निवडून घेतली (selective) तर परीक्षणाचे निष्कर्ष अगदी उलटे येऊ शकतात. 
    पुराव्याशिवाय बोलणे योग्य होणार नाही; पण सर्वांना याची जाण असावी म्हणून सांगतो की ज्योतिष्यांचे अनेक तथाकथित संशोधनात्मक दावे हे एकतर अशा ‘निवडलेल्या’ विदेच्या आधारे किंवा कमी विदेच्या आधारे असू शकतात. हे सांगायचे कारण असे आहे की माझ्या सर्व प्रयोगांमधून मला एक बोध निश्चित मिळाला आहे आणि तो म्हणजे जसजशी आपण दोन्ही संचांमध्ये पत्रिकांची संख्या वाढवत नेतो तसतसे कुठलाही ग्रहयोग (configuration) हे एकुलता एक (unique) असा राहत नाही. उद्या तुम्ही अल्पायु विरुद्ध दीर्घायुचे प्रत्येकी दहा हजार पत्रिका असलेले संच केले आणि ज्योतिषविद्येच्या कुठल्याही मापदंडानुसार त्यांची तुलना केली तर मी खात्रीने सांगेन की दोन्ही संचात तुम्हाला १% सुद्धा फरक दिसणार नाही. ज्योतिषविद्येचा हा खरा चेहरा आहे जो जगापुढे आणणे हे फक्त Empirical परीक्षणाच्या मोठ्या प्रयोगातूनच साध्य होऊ शकते. 
    बऱ्याच ज्योतिष्यांची संशोधन करताना ही तक्रार असते की त्यांना शेकडो पत्रिका गोळा करणे शक्य नसते. त्यांना मी असा सल्ला देईन की त्यांनी Astrodatabank चा वापर जरूर करावा. या बँकेमध्ये हजारो लोकांची जन्मतारीख, जन्मवेळ, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे तपशील दिलेले आहेत. तपशिलाच्या अचूकतेला AA, A असे वर्गीकरण दिले आहे. त्यामुळे सर्वात अचूक विदा वापरून आपण संशोधन करू शकतो. माझ्या कॅन्सर झालेल्यांच्या विरुद्ध कॅन्सर न झालेल्यांच्या परीक्षणात (संदर्भ–१) मी Astrodatabank च्या AA रेटिंग असलेल्या विदेचाच वापर केला आहे. 
  • काय तपासणार? – ज्योतिषविद्येच्या Empirical परीक्षणातला हा भाग जरा अवघड (tricky) आहे; पण मी तुम्हाला संशोधकांतर्फे ग्वाही देतो की जर इच्छा असेल तर मार्ग निश्चित आहे. ज्योतिषविद्येच्या परीक्षणातले एक आव्हान म्हणजे भविष्य भाकीत करण्यासाठी असणाऱ्या नियमांमध्ये एकससूत्रता नाही किंवा त्याचे मानकीकरण (standardisation) पण नाही. जसे की वर दिलेल्या उदाहरणात पत्रिका अल्पायु व्यक्तीची आहे की दीर्घायु याचे नियम कुठेही एखाद्या सर्वमान्य अशा पुस्तकात किंवा ग्रंथात एखाद्या नि:संदिग्ध सूचीद्वारे दिलेले नाहीत की जे आपण तपासू शकतो. त्यातल्या त्यात सर्वमान्य असे काही नियम आहेत पण त्याचा वापर करून ज्योतिषाला अवैध ठरवले गेले तर कोणी आणखी दोन नियम घेऊन येतो आणि तुमचे परीक्षण अपूर्ण आहे असे म्हणतो. इतकी वर्षे ज्योतिषविद्या चालू आहे पण सर्व ज्योतिष्यांनी एकत्र येऊन अशा नियमांची सूची का प्रसिद्ध केली नाही? या प्रश्नाच्या उत्तरातच सर्व काही आले आहे. समाज म्हणून आपण दबाव आणून अशा नियमांची सूची प्रसिद्ध करायला लावली तर Empirical परीक्षणाचा एक मोठा अडसर दूर होईल. अशी सूची नसल्याने मग आम्ही सर्वमान्य नियमांना तर तपासलेच पण त्याचबरोबर काही नाविन्यपूर्ण तंत्रेही शोधून काढली जी जागेअभावी इथे देणे शक्य नाही. अभ्यासकांनी त्यासाठी लेखाखालील संदर्भ १ व संदर्भ २ बघावे. त्याविषयी थोडक्यात सांगायचे तर, ज्योतिषशास्त्र ज्या प्रमुख तत्त्वांवर उभे आहे अशा तत्त्वांचेच Empirical परीक्षण या अभ्यासात केले. जसे, ज्योतिषविद्या जर असे म्हणत असेल की, ‘नीच ग्रहाची पाप ग्रहाबरोबरची युती ही त्या ग्रहाच्या कारकत्वासंदर्भात अशुभ फळ देते’ तर ते तत्त्वच तपासून बघायचे. या आणि अशा अनेक प्रमुख तत्त्वांचे परीक्षण केले असता आमच्या Empirical परीक्षणात तरी ती अवैध (invalid) आढळली. ही तत्त्वे तपासणे म्हणजे ज्योतिषविद्या तपासण्यासारखेच नाही का? आणि हे लक्षात घ्या की या आणि अशा नियमांचा वापर करूनच तुमची पत्रिका बघितली जाते. तेव्हा त्या भाकितांची अचूकता किती असेल हे तुमचे तुम्हीच ठरवा. अजून एक नाविन्यपूर्ण परीक्षण म्हणजे आम्ही आमच्या प्रयोगात प्रत्येक ग्रहाच्या, स्थानाच्या आणि भावेशाच्या (भावेश – स्थानात जी राशी असते त्या राशीचा अधिपती असलेला ग्रह) ऋणतेची (Negativity) तुलना करून Empirical परीक्षण केले. भाकीत सांगताना या तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार होतो त्यामुळे त्यांच्या ऋणतेमध्ये मोठा फरक येणे अपेक्षित होते. परंतु त्यातही दोन्ही संचामध्ये फरक आढळला नाही. म्हणजे तिथेही ज्योतिषविद्या अवैध आहे असाच निष्कर्ष निघतो. आजघडीला सर्वमान्य नियमांची सूची जरी नसली, तरी Empirical परीक्षणात अशा अनेक परीक्षा आपण घेऊ शकतो ज्याने आपले उद्दिष्ट बऱ्याच अंशी साध्य होते. ह्याचे अधिक तपशील खालील संदर्भात आहेतच. मी या लेखाद्वारे ज्योतिष्यांना विनंती करेन की त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या नियमांची सूची आणि भाकीत करण्याची सर्वमान्य पद्धत (standard operating procedure ) याविषयीचे लिखाण करून ते प्रसिद्ध करावे.
  • संख्याशास्त्रीय निकष – वरील उदाहरणात (नीच ग्रहाची पाप ग्रहाशी युती झाल्यास ग्रहाचे कारकत्व बिघडते) प्रश्न असा आहे की नियम तपासताना दोन विरुद्ध संचांमध्ये किती फरक आला तर आपण हा नियम वैध आहे हे मान्य करणार? तो ८०:२० असायला हवा की ७०:३० असायला हवा की अजून काही? आमच्या परीक्षणात आम्ही हा निकष (नंतर टीका नको म्हणून) ज्योतिषशास्त्राला वैध ठरता येण्यासाठी जास्तीत जास्त फायदा देणारा असा ठेवला होता. पण माझ्या मते ७०:३० हे प्रमाण योग्य होईल. ज्योतिषविद्या हे संभाव्यतेचे शास्त्र आहे असे म्हणून सर्वसामान्यांचा गोधळ अजून वाढवला जातो. हे म्हणजे, भाकीत सांगितल्याप्रमाणे घडले नाही तर त्याचे समर्थन करता यावे म्हणून ही पळवाट आहे. Empirical परीक्षणात अशी संभाव्यता जर खरोखरच असेल तरी ती साहजिकच दोन संचांमधील फरकाच्या स्वरूपात दिसायला पाहिजे. त्यामुळे त्या युक्तिवादासाठी देखील Empirical परीक्षण हे एक प्रभावी तंत्र आहे. हा लेख सोपा ठेवण्याच्या दृष्टीने ह्या चर्चेला पुढे नेत नाही.
  • संगणकाचा वापर – हजारो पत्रिकांचे विश्लेषण करायचे असल्याने कॉम्प्युटरचा वापर करणे अनिवार्य आहे. माझ्या कॉम्प्युटरच्या प्रोग्रॅमचे web version तयार करून ते सर्व संशोधकांना (ज्योतिषी आणि टीकाकार, दोघांना) उपलब्ध करून द्यायला मला निश्चितच आवडेल. त्याचप्रमाणे भारतातल्या पत्रिकांची Astrodatabank ही तयार करायला आवडेल, जी या विषयावरच्या भावी संशोधनाला उपयोगी पडेल. अर्थातच त्यासाठी होणार खर्च आणि अशा कार्यासाठी लागणारा सहयोग (collaboration) याची व्यवस्था करावी लागेल.
  • तज्ज्ञांचा समावेश – Empirical परीक्षणाचे प्रयोग वैयक्तिक पातळीवर होण्यापेक्षा ते तज्ज्ञांच्या एखाद्या समितीच्या निरीक्षणाखाली केल्यास समाजाला ज्योतिष हे वैध शास्त्र आहे का नाही याचे खरे उत्तर मिळेल. आपापसातील वाद दूर ठेवून, एकत्र येऊन सांघिकरीत्या असे प्रयोग करण्याची ही वेळ आहे.

Empirical परीक्षण अवघड जरूर आहे पण अशक्य नाही. त्यात अडथळे आहेत पण ते तारतम्याने दूर होऊ शकतात. मी परत एकदा म्हणेन की जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा निश्चित असतो.

ज्योतिष खरे आहे की नाही हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नाने करोडो लोकांचे जीवन, त्यांनी घेतलेले छोटे-मोठे निर्णय, ते खर्च करत असलेले करोडो रुपये या सगळ्याला व्यापून टाकले आहे. असे असताना आपण कुठलेही परीक्षण न करणे, त्यासाठी कुठलेही पाऊल न उचलता त्याकडे मूढ होऊन फक्त बघत बसणे म्हणजे एक समाज म्हणून आपण निष्क्रियतेचे उदाहरणच घडवत आहोत. अलीकडेच TV वर झालेल्या चर्चेचा शेवट अशा संगनमताने झाला की यावर संशोधन म्हणजेच empirical परीक्षण व्हायला पाहिजे. Computerचा वापर सुरू होऊन ४० वर्षे झाली, internet देखील कित्येक दशके आपल्याकडे आहे आणि हे आपण आता २०२१ मध्ये ठरवतोय की संशोधन व्हायला पाहिजे? खरंतर ते केव्हाच व्हायला पाहिजे होते. यावरूनच ज्योतिष्यांना स्वतः यामध्ये किती रस आहे हे वेगळे सांगायला नको. 

ज्योतिषविद्येच्या Empirical परीक्षणाविषयी लिहिताना डॉ. जेफ्री डीन यांचे नाव आणि काम नमूद केल्याशिवाय कुठलाच लेख पूर्ण होऊ शकत नाही इतके त्यांचे मोठे काम आहे. जगातल्या १००० Empirical परीक्षणांच्या निष्कर्षांना एकत्र करून ते एक पुस्तक प्रकाशित करत आहेत. मी केलेल्या परीक्षणाला त्यांच्या पुस्तकात घेण्यासाठी परवाच त्यांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा बोलणे झाले. त्यांच्या बोलण्यातून एक चिंता मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, पाश्चात्य ज्योतिषविद्येच्या १००० परीक्षणांसमोर वैदिक ज्योतिषविद्येची केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच परीक्षणे झाली आहेत यावरून या परीक्षणाला आपण आतापर्यंत किती कमी महत्त्व दिले आहे हे समजते. हा लेख वाचल्यावर प्रत्येकाकडून अशा परीक्षणाच्या मागणीसाठी किंवा ती परीक्षा प्रत्यक्षात होण्यासाठी एक तरी ठोस अशी कृती केली गेली तरी या लेखाचे उद्दिष्ट पूर्ण होईल यात शंका नाही.

संदर्भ –

ज्योतिषशास्त्र संशोधक, पुणे
संपर्क : astrobasedresearch@gmail.com

डॉ. नागेश राजोपाध्ये हे गेली २० वर्षे ज्योतिषविद्येचा अभ्यास करत आहेत. (सुरुवातीला एक ज्योतिषी म्हणून आणि नंतर एक टीकाकार म्हणून). त्यांनी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.

अभिप्राय 1

  • डाँ. नागेश राजोपाध्ये यांनी मांडलेले मुद्दे नक्कीच योग्य म्हणावे लागतील. पण अनेक लोकांना ज्योतिषांनी वर्तवलेल्या भाकितांची प्रचिती आलेली आहे. या संदर्भात मी माझे अनुभव कथन करत आहे. ही घटना १९४५/४६ सालची आहे जेंव्हा मी चार एक वर्षांचा होतो. माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे माझ्या आईची मैत्रिण तिच्या यजमानांसह समाचाराला आली होती. तिच्या यजमानांना ज्योतीषशास्त्र अवगत होते. माझ्या आईकडे पाहून त्यांनी सांगितले होते की, माझ्या मोठ्या भावाला बाराव्यावर्षी गंडांतर असून त्याचा म्रुत्यू होणार आहे. माझ्या आईने यावर उपाय विचारला असता त्यांनी श्रीशंखराची उपासना करण्याचा सल्ला दिला व मोठ्या भावाकडून शिवलीलांम्रुताचा अकरावा अध्याय दर सोमवारी वाचून घेण्यास सांगितले. ते सर्व माझ्या आईने भक्तिभावाने केले व भावाकडून करवून घेतले. पुढे काही वर्षांनी तो प्रसंग घडला एप्रिल महिना होता. त्या काळात आमच्या पाली-सुधागडमध्ये पाणी टंचाई असे. शनिवारचा दिवस असल्यामुळे सकिळची शाळा करून भाऊ घरी आला होता. आई कपडे धुण्यासाठी नदीवर निघाली होती. तेंव्हा भाऊ हट्टाने तिच्या बरोबर नदीवर गेला. उन्हाळ्यामुळे नदीत पाणी कमी होते. आईने भावाला उतरु नको म्हणून सांगूनही आईची नजर चुकवून तो नदीत उतरला व बुडू लागला. सकाळची अकराची वेळ असल्यामुळे नदीवर दुसरे कोणी नव्हते. भावाचा आवाजाने आईचे लक्ष गेले व ती पाण्यात उतरली व तीही गटांगळ्या खाऊ लागली. इतक्यात दोन तरुण आले व त्यांनी भावाला नदीतून बाहेर काढताच आई सुध्दा स्वतःहून बाहेर आली. काळ आला होता, पण श्रीशंकराच्या क्रुपेने अनिष्ठ टळले. हा सल्ला आईच्या मैत्रिणीच्या नवय्राने फक्त आईकडे पाहून उत्स्फूर्तपणे दिला होता व त्यांनी सांगितलेल्या उपायाने गंडांतर टळले. ही माझ्या आयुष्यात मी सात,आठ वर्षांचा असताना घडली व मला ते नीट आठवत आहे. हे भाकित त्यांनी फक्त आईकडे पाहून केले होते. कदाचित कपाळ पाहूनही भविष्य वर्तवणारे ज्योतीषी असतात, त्यातलाच हा प्रकिर असावा. पण त्या वरून ज्योतिष शास्त्राची प्रचिती येऊ शकते. दुसरी घठना १९७६ सालची असून ती उघड करण्यासारखी नसूनही ज्योतीष शास्त्राच्या पुष्ट्यर्थ सांगतो. त्यावेळी मी दोन मुलिंचा बाप होतो व संतती निरोधक साधनांचा उपयोग करत होतो. माझे सहकारी गोखले अचानक म्हणाले होते, रमेश तुला या वर्षी मुलगा होणार आहे. मी त्यांना निक्षून सांगितले होते, गोखले मुलगाच काय पण या वर्षी मला अपत्यच होणार नाही. पण गोखले म्हणाले होते, तूं काहीही म्हण, पण तुला मुलगा होणार आणि तोही याच वर्षी. आणि खरोखरच काही गडबड झाली व त्याच वर्षी आँक्टोबर महिन्यात मला मुलगा झाला. या वरून ज्योतीष शास्त्राची प्रचिती यावी. ही दोन्ही भाकितं त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सांगितली होती व खरी ठरली होती. ज्योतीष शास्त्र आहे पण पोटार्थी कुडमुड्या ज्योताषांमुळे ते शास्त्र बदनाम झाले आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.