रेषा आणि कविता…!

अंधारात भविष्य शोधताना
मी मेंदूला ठेवत असतो कोंडून
मनगटातील बळ विसरून 
दाखवत फिरतो हाताच्या रेषा 
वाळूचे कण रगडण्याचे सोडून 
दिसरात जपतो दगडाचे नाव 
घाम गाळायच्या ऐवजी 
देत असतो ग्रह-ताऱ्यांना दूषणं 
तरीही,
निघाला नाही कुठलाच प्रश्न निकाली…!

सीमेवर शत्रू उभे ठाकले असताना 
राजा शांतपणे करत होता यज्ञ 
शत्रू महालाजवळ आले असतानाही 
राजा करत राहिला मंत्रांचा जाप 
पराभवाची फिकीर सोडून 
तो देत राहिला जांभई 
शेवटी बंदिस्त झाल्यावर, 
“छाटण्यात यावे माझे हात” 
अशी याचना करत राहिला…!

उघड्या डोळ्यांनी
मी नाकारू शकत नाही सत्य म्हणून
ते दाखवत असतात भीती 
माझी लायकी ठरवून 
ते घट्ट ठेवतात पाय बांधून 
देत राहतात धडे मानसिक गुलामीचे 
सांगू लागतात नशीब हाताच्या आरशात 
अवघं विश्वच बांधून ठेवतात आडव्या उभ्या रेषेत 
काळाच्या पुढचं सांगून मिचकवतात डोळे 
त्यांचं पोट भरल्यावर 
मी मात्र पहात राहतो काळ्याशार आभाळात…!

तक्षशिला
तू जळून गेल्यावर
थोतांड माजलंय इथल्या मातीत
आता तुला राखेतून फिनिक्स व्हावचं लागेल…!

जि. वाशिम
7875173828

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.