फलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता

फलज्योतिषाविरुद्धचे नव्याने शोधले गेले आहेत असे फारसे युक्तिवाद माझ्या माहितीत नाहीत. भारतात अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी, विद्वानांनी फलज्योतिषाविरुद्धचे बहुतेक युक्तिवाद एकोणिसाव्या शतकापासूनच मांडलेले आहेत. आणि तरीही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास घटल्याचे जाणवत नाही. ही अंधश्रद्धा केवळ भारतातच रुजली आहे असे नाही, जगभरातच यशस्वी अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही एक महत्त्वाची अंधश्रद्धा आहे.

राजकीय प्रतलावरही या विषयात आपल्याला फारसे डावे-उजवे करता येत नाही. फलज्योतिषाला पाठिंबा देणे हे भाजपच्या एकूण विचारधारेशी सुसंगत तरी आहे. परंतु, वाजपेयी सरकारने २००१ साली विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे (UGC) सुरू केलेले फलज्योतिष अभ्यासक्रम २००४ ते २०१४ या काळातील UPA सरकारनेही बंद केले नाहीत. काँग्रेसचे आणि कम्युनिस्टांचे अनेक नेते उघडपणे ज्योतिष्यांकडे जात आणि जातात. ज्यांच्या नावाच्या मुक्त विद्यापीठात सुरू केलेल्या अभ्यासक्रमामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे, त्या खुद्द इंदिरा गांधीही वृद्धापकाळी असल्या अंधश्रद्धा बाळगत होत्या.

या विशेषांकाच्या इतर लेखांत फलज्योतिषाविरुद्धचे सर्व युक्तिवाद सविस्तरपणे मांडलेले असतीलच. तरीही, द्विरूक्तीचा धोका पत्करून महत्त्वाचे काही मुद्दे नोंदवतो:

  1. ‘भारतीय संस्कृती, परंपरा, ज्ञान यांचे जतन, संवर्धन करण्याचा एक भाग म्हणून हे अभ्यासक्रम योजले आहेत’ असा बचाव अभ्यासक्रमाचे समर्थक मांडतात. परंतु, फलज्योतिष ही संकल्पना मुळची भारतीय नाही. राशिचक्र, कुंडली, इत्यादी संकल्पना ग्रीक आणि रोमन ज्योतिषाने प्रेरित आहेत. इसवीसनापूर्वी त्या भारतात नव्हत्या. फलज्योतिष हे मूलतः नियतीवादी (fatalist) असल्यामुळेच भास्कराचार्यांसारखे मोठे तज्ज्ञसुद्धा जावयाचा मृत्यू थांबवू शकले नाहीत अशी कथा बनू शकली असावी. भविष्यात काय घडणार आहे याची माहिती मिळूनही त्यावर काही उपाय सापडत नसेल, ते टाळता येत नसेल, तर तशी माहिती जाणून घेण्यात गरजू जातकांना रस नसेल. त्यामुळे नुसते ‘अपरिहार्य’ प्रकारचे भविष्य वर्तवण्याचा व्यवसाय भारतात निर्माण होणे अवघड होते. त्यानंतरच्या काळातील ज्योतिष्यांनी मात्र ग्रहांची शांत करणे, कुंडलीतील दोष काढणे, मांगलिक व्यक्तीचे झाडाशी लग्न लावणे, असले उपाय शोधून काढले. बलाढ्य ग्रहांच्या, दैवाच्याआणि देवाच्या इच्छेला मुरड घालण्याचा दावा करणारे स्वतःला भास्कराचार्यांहून अधिक शहाणे समजत असतील.
  2. फलज्योतिषाच्या दाव्यांची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी असे अभ्यासक्रम आवश्यकच आहेत असाही एक युक्तिवाद अभ्यासक्रमाच्या समर्थकांनी मांडलेला आहे.
    • हे अभ्यासक्रम ज्योतिर्विज्ञान या नावाने सुरू असले तरी ते कलाशाखेत आहेत, ते शिकून BA, MA या पदव्या मिळतात, BSc, MSc नव्हे. ते विज्ञानशाखेचे अभ्यासक्रम नसल्यामुळे, प्रयोग करून वैज्ञानिक निष्कर्ष काढणे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकणार नाहीत. सर्व विज्ञाने एकमेकांशी सुसंगत असतात, एकसंध पायावर, पॅराडाईमवर उभी असतात. ग्रहांचा मानवावरील भौतिक परिणाम न्यूटनच्या ‘व्यस्तवर्ग नियमा’ने ठरतो, तो गौण असतो आणि तो सर्वांवर समान होतो, तो जन्मवेळेनुसार किंवा जन्मस्थानानुसार बदलत नाही. फलज्योतिष ह्या प्रचलित वैज्ञानिक पॅराडाईमशीच विसंगत आहे. विज्ञानाला सध्या अज्ञात अशा कोणत्यातरी बलाच्या नियमानुसार ग्रहांचे हे परिणाम ठरत असतील तर त्यांची विज्ञानात दखल घेण्यासाठी सर्वच विज्ञानाचे पुनर्लेखन करावे लागेल. हे काम नुसत्या अभ्यासक्रमांना झेपणार नाही. 
    • प्रस्तुत अभ्यासक्रम संशोधनाभिमुख नसून व्यवसायाभिमुख आहे. जे सिद्धांत संशोधनाधीन असतात त्यांवरील तपासणीचा निष्कर्ष येईपर्यंत त्या सिद्धांतांवर आधारित उपाय व्यावसायिक पातळीवर सुरू करता येत नाहीत. एखाद्या औषधाची संशोधनाभिमुख शास्त्रज्ञांनी चाचणी केल्यावर जर ते औषध परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले तरच ते औषध बाजारात आणतात आणि व्यवसायाभिमुख डॉक्टर त्याचे प्रिस्क्रिप्शन लिहू शकतात, अन्यथा ते औषध विकलेच जात नाही. ‘या अभ्यासक्रमांमध्ये फलज्योतिषावर संशोधन करण्यात येईल आणि चाचण्यांत जर असे सिद्ध झाले की फलज्योतिषानुसार भविष्याचे भाकीत करता येत नाही, तर हे अभ्यासक्रम बंद करण्यात येतील’ अशी या अभ्यासक्रमांची रचना नाही. चाचण्यांचा निष्कर्ष प्रतिकूल आला तरी या अभ्यासक्रमांतून उत्तीर्ण स्नातक पदवीच्या प्रतिष्ठेवर फलज्योतिषाचा व्यवसाय करू शकतील.
    • फलज्योतिषानुसार केलेली भाकिते आजवर कधीही वैज्ञानिक चाचण्यांमध्ये सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीयपणे खरी ठरलेली नाहीत. भाकीत करण्याबद्दल मोठी बक्षिसे अनेक पुरोगामी व्यक्तींनी/संस्थांनी जाहीर केलेली असूनही, कोणीही ज्योतिषी व्यक्ती किंवा संस्था त्या आव्हानांना यशस्वीरित्या सामोरी गेलेली नाही. हे संशोधनास उत्सुक असण्याचे लक्षण नव्हे. अमुक बिल्डरने नीट घर बांधले नाही किंवा तमुक डॉक्टरने नीट उपचार केले नाहीत अशी तक्रार आपण कधीकधी ऐकतो. एखाद्या डॉक्टरचे रूग्ण बऱ्याच टक्केवारीत मरू लागले, एखाद्या कारखान्यातील माल सतत इतर कारखान्यांपेक्षा कमी गुणवत्तेचा निघू लागला, तर त्याची चौकशी करण्यात येते, तशा प्रकारची तपासणी लावण्याची तरतूद फलज्योतिषाबाबत नाही. अमुक ज्योतिष्याने पार चुकीचे भविष्य वर्तवले ही तक्रार क्वचितच पहायला/ऐकायला मिळते. बहुतेक जातक परिस्थितीपुढे पूर्णपणे हतबल असतील, ज्योतिष्यांना मनाने शरण गेलेले असतील, ज्योतिष्याने दिलेल्या सेवेची ते स्वतंत्र मनाने चिकित्सा करण्यास सक्षम नसतील. त्यामुळेच, “भविष्य चुकले तर फी दामदुप्पट परत करू” या प्रकारची वॉरंटी किंवा ग्राहकहक्क संरक्षणाची ग्वाही न देताही हा व्यवसाय सुरू आहे. शिवाय सदर अभ्यासक्रमांत संशोधन झाले आणि निष्कर्ष प्रतिकूल निघाले तरी जातकांची श्रद्धा घटेलच याची खात्री नाही.

फलज्योतिषामुळे लोकांचा तोटा होतो कारण, भविष्य काय असणार आहे त्याविषयी दिशाभूल झाली तर वास्तविक भवितव्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, खर्‍या भवितव्याची तजवीज करण्यासाठी लागणारी संसाधने भलतीकडे खर्च होतात. समस्येवर ‘काहीतरी उपाय योजल्याचे समाधान’ ही एक सुरक्षेची चुकीची भावना असते, त्याने अनाठायी निर्धास्तता येते.

कोणत्याही सामाजिक समस्येचे मूळ कारण सामाजिक-आर्थिक-तांत्रिक परिस्थितीत असते हे फलज्योतिषाबद्दलही खरे असू शकेल. आयुष्यातील अनिश्चितता वाढल्यामुळे लोकांना भविष्याविषयी अधिक चिंता असू शकेल. प्रयत्नवादी विचारसरणी चांगली असली तरी तिचा अतिरेक म्हणून, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच हे गृहीतक बळकट होते आहे. त्यामुळे, रास्त उपाय सापडला नाही तेव्हा दिसतील ते उपाय करून पाहण्याकडे कल होतो. सध्याच्या समाजात उन्नतीच्या संधी पुष्कळ असल्या तरी त्या फारशा नियमबद्ध, भरवशाच्या नाहीत. कोणाची प्रगती किती होईल त्याला फारसा नेम नाही. पूर्वीच्या स्थितीवादी विचारसरणीला आपण सोडले हे चांगलेच, पण त्याचा दुष्परिणाम असा की आकांक्षा आणि असूयाही अवाजवीपणे वाढल्या आहेत. धास्तावलेले मन आप्तमित्रांवर, त्यांच्या वॉट्सॲप, फेसबुक फॉर्वर्ड-शेअरवर अधिक विश्वास टाकते. धर्ममताने, समाजमताने किंवा राजसत्तेने सांगितलेले विचार नाकारून स्वतः विचार करणे हे एक आधुनिक मूल्य आहे. परंतु, त्याचा अतिरेक होऊन मनमानीने वागणे, तज्ज्ञांच्या मताचा विचार करण्यास नाकारणे, ही आधुनिकोत्तर मनोवृत्ती वाढली आहे. त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचे गांभीर्य मान्य करण्यास आणि त्यासाठी मुख्यत: मानवी कृती कारणीभूत असल्याचे मान्य करण्यास विरोध, लसीविषयीची भीती, इत्यादी अनेक विषयांमध्ये दिसतो तसाच तो फलज्योतिषाला मिळणार्‍या जनाधारातही दिसतो. ही सर्व परिस्थिती बदलत नाही तोवर फलज्योतिषाविषयी लोकांना वाटणारे आकर्षण संपणार नाही हेही शक्य आहे. तरीही, तात्पुरता परंतु तातडीचा उपाय म्हणून आपण फलज्योतिषाविरुद्ध थेट प्रचार करणेही आवश्यक आहेच.

लोकांच्या फलज्योतिषाविषयीच्या धारणा चुकीच्या आहेत असे जर आपण लोकांना आक्रमक पद्धतीने सांगितले तर ते आपल्याशी संवाद तोडतील आणि चुकीच्या धारणांना अधिकच कवटाळून ठेवतील असे सुचवण्यासाठी प्रा. जयंत नारळीकर यांनी इसापनीतीतील सूर्य आणि वारा यांच्यातील स्पर्धेचे रूपक वापरले आहे. मूळ वाक्यः “आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळून धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का?”

परंतु, प्रा. नारळीकर यांनी सुचविलेले सौम्यत्वाचे धोरणच गेली कित्येक दशके पुरोगामित्वाची मुख्य धारा म्हणून प्रस्थापित आहे. नम्र अर्ज-विनंत्या करूनच आपल्या लोकांनी विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या फलज्योतिष अभ्यासक्रमाला न्यायालयात आव्हान दिले होते; परंतु तो अभ्यासक्रम बंद करण्याची विनंती २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कुणा मान्यवर पुरोगाम्याने फलज्योतिषाविरुद्ध युक्तिवाद करताना जातकांना वेड्यात काढल्याचे किंवा ज्योतिष्यांविषयीचे अपशब्द वापरल्याचे मला ज्ञात नाही. तरीही, फलज्योतिषाविरुद्धच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत नाही. आपल्या लोकांनी लेख लिहिले, ज्योतिष्यांना चर्चेची आवाहने केली, तपासणीची आव्हानेही दिली. जे मार्ग वापरून गेल्या वीस वर्षांत आपण UGCचे अभ्यासक्रम बंद पाडू शकलो नाही तेच मार्ग IGNOUच्या अभ्यासक्रमावर प्रतिक्रिया म्हणून वापरायचे आहेत का? प्रचलित मार्गांनी प्रबोधन होत असल्याचा, यश मिळत असल्याचा आपला मापदंड काय आहे? वृत्तपत्रांमधील, टीव्हीवरील ज्योतिषावरील कार्यक्रम वीस वर्षांत कमी झाले का? जनप्रबोधन झाल्याच्या काय खुणा आहेत?

सरकारने कुठेतरी एक अभ्यासक्रम सुरू केला की आपण सर्व शक्ती त्याला विरोध करण्याच्या प्रयत्नांत घालवतो. त्यात यश मिळेलच असे नाही. आणि यश मिळाले तरी आपण केवळ गमावलेली जमीन परत मिळवलेली असेल. हे धोरण प्रतिक्रियाशील (रीअ‍ॅक्टिव), बचावात्मक वाटते. विस्तारवादी, पुढाकारात्मक (प्रोअ‍ॅक्टिव) वाटत नाही. त्यामुळे, विरोध करण्याच्या पद्धतींविषयी पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने मला काही मार्ग सुचतात. खगोलशास्त्राविषयीच्या धड्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम ठरविणारी समिती फलज्योतिषातील खगोलज्ञानाच्या तोकडेपणाविषयी लिहून ठेवू शकते. विविध साहित्यिकांनी फलज्योतिषाविरुद्ध कथा, कविता लिहिलेल्या आहेत, भाषाविषयाच्या अभ्यासक्रमांत तशा कलाकृतींचा समावेश करता येईल. विज्ञानात नियतवाद (डिटर्मिनिजम), नियतीवाद (फेटॅलिजम) इत्यादी विषयांची चर्चा असते तेथे, फलज्योतिषातील नियतवादाची आणि नियतीवादाची माहिती शिकवता येईल. तर्कशास्त्रात तर्कदोषांची (फॅलसी) उदाहरणे देताना फलज्योतिषाच्या समर्थनार्थ वापरल्या जाणार्‍या तर्कदुष्ट युक्तिवादांची उदाहरणे देता येतील. फलज्योतिषाचे विविध प्रकार कसे जगभर निर्माण झाले आणि एकमेकांत मिसळले ते इतिहासात आणि विज्ञानाच्या इतिहासात शिकवता येईल. कोणत्याही वैज्ञानिक दाव्याची तपासणी संख्याशास्त्राने कशी केली जाते ते शिकवताना फलज्योतिषाचे उदाहरण वापरता येईल.

एक-दोन अभ्यासक्रमांतून सरकार काही हजारच ज्योतिषी निर्माण करू शकेल, पण शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत फलज्योतिषाविषयी प्रतिकूल विचार शिकवून करोडो भावी जातक-ग्राहक कमी करता येतील. आमच्या पाठ्यपुस्तकांत मुद्दामहून फलज्योतिषाविषयी प्रतिकूल प्रचार असल्याचे स्मरत नाही. सरकारी आणि खासगी पाठ्यपुस्तक निर्मात्यांनी फलज्योतिषाविषयी काही ओळी घुसडाव्या यासाठी विनंत्या करणे आपल्याला नक्कीच शक्य आहे. सारेच प्रयत्न यशस्वी होतील असे नाही. आपण सर्वांनी मिळून जर आपापल्या परिचयाच्या एकूण शंभर पाठ्यपुस्तक निर्मात्यांना विनंती केली तर कदाचित दहा प्रकाशक प्रत्येकी एखाद्या धड्यात पाचसहा ओळी घालतील. पण त्या ओळींपैकी काही टक्के ज्ञान जरी मुलांच्या डोक्यात शिरले तरी ते यश दीर्घकाल टिकेल. (आणि जोडफायदाम्हणून, मैत्री, व्यवसाय आणि वैचारिक बांधिलकी यांची कसरत प्रकाशक कशी सांभाळतात ते पहाणे मनोरंजक ठरेल).

Yelp, Zomato, इत्यादी वेबसाईटवर लोक रेस्टॉरंटचा अनुभव नोंदवू शकतात. त्याच धर्तीवर ज्योतिष्यांचे किती दावे खरे ठरतात याची जातकांकरवी नोंद ठेवण्यासाठी किंवा निवडणुकांच्या किंवा खेळांच्या सामन्यांआधी ज्योतिष्यांनी जाहीर केलेल्या भाकितांची यादी बनवून सांख्यिकीय तपासणी करण्यासाठी वेबसाईट बनवण्याचाही विचार व्हावा.

भाकीत खोटे ठरले तर फी दामदुपटीने परत मिळण्याच्या ग्वाहीचा आग्रह जातकांनी धरावा, ‘ग्राहकहक्क संरक्षण कायद्या’त ज्योतिष्यांचा व्यवसाय आणला जावा,फलज्योतिष हे विज्ञान नसल्यामुळेच सरकारने ते अभ्यासक्रम कलाशाखा म्हणून सुरू केले आहेत, इत्यादी आक्रमक मुद्द्यांवर प्रचार करूनही आपण या विषयाची चर्चा लोकांमध्ये सुरू ठेवू शकू.

यूजीसीच्या किंवा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांविरुद्ध निषेध करणे, जनप्रबोधन, अर्ज, खटले करणे हे मार्ग बंद करावेत असे मी सुचवत नाही. परंतु, ते प्रयत्न सुरू ठेवून आपण इतर मार्ग शोधणेही उपयुक्त ठरू शकेल.

अभिप्राय 1

  • ग्राहकहक्क संरक्षण कायद्या’त ज्योतिष्यांचा व्यवसाय आणला जावा,>>>>> आमचे मित्र ज्योतिषी नंदकिशोर जकातदार हेच म्हणतात. त्यांना माहित आहे यात भरपूर पळवाटा असणार. असो
    इथे मला चित्रमय जगत या जानेवारी 1921 सालच्या अंकाची आठवण झाली
    फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य
    फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य’ या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात,” ………एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा.”
    सत्यान्वेषी या टोपणनावाने लिहिणारे प्राध्यापक व समीक्षक न.र.फाटक होते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.