विक्रम आणि वेताळ – भाग २

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, अरे गेल्या खेपेला तू माझ्यावर एकदम तलवारच उगारलीस, त्यामुळे मी माझं पूर्ण समाधान झालं असं म्हणून तर टाकलं, पण खरं सांगू? माझं अर्धवटच समाधान झालं होतं. त्याविषयीचे आणखीनही बरेच प्रश्न मला छळताहेत.

आता हेच बघ ना, IGNOU, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, आता फलज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं ऐकतोय. त्यांच्या मते ते एक विज्ञानाधारित शास्त्र आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाचं नेमकं भविष्य सांगणं शक्य आहे तर! आणि भविष्यात घडणार असलेल्या अवांछित गोष्टी टाळण्यासाठी मुहूर्त आणि इतर उपायसुद्धा त्यात ते शिकवणार!

पण मागच्या खेपेत आपण पाहिल्यानुसार, अचूक भविष्य वर्तवणे आणि त्यानुसार घडणारच असलेल्या गोष्टी घडू नयेत ह्यासाठी उपाय करणे, ह्या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी असल्यामुळे ह्यातील कोणतीही एकच गोष्ट संभवते!

परंतु जेव्हा एकविसाव्या शतकातील युनिव्हर्सिटी असा अभ्यासक्रम सुरू करते तेव्हा त्यांच्याही विचारात काही तथ्य असेल ना?

फलज्योतिष खरंच शास्त्रीय की अशास्त्रीय? ज्ञान, विज्ञान की अज्ञान? सगळा लोच्या झालाय डोक्यात. माझ्या ह्या प्रश्नांची नीट समाधानकारक उत्तरं लवकर दे बघू! अन्यथा परिणाम तुला ठाऊकच आहे! तुझ्या डोक्याची . . . !”

“काय? काय म्हणालास?”

“अरे काही नाही. डोक्यात लोच्या झालाय सगळा, तर, माझ्यावरच्या इतक्या वर्षांच्या प्रेमाखातर तू नीट समजावून सांग ना सगळं! प्लीज!”

“हं, आता ठीक आहे!

माझ्या लहानपणी मी जे काही गुरुकुलात शिकलो आणि माझ्याठायी असलेल्या थोड्या तर्कबुद्धीने मला जे काही समजते त्याच्या साहाय्याने तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करतो.

ती बरोबरच असतील असा माझा दावा नाही, पण मी करत असलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

लहानपणी गुरुजींनी आम्हाला भारतीय दर्शनांची जुजबी तोंडओळख करून दिली होती. त्यात ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचे स्रोत कोणते? ते कोणत्या कसोटीवर तपासून बघायचे? ह्यावर केलेली चर्चा थोडी आठवते.

आपल्याला ज्ञान वेगवेगळ्या मार्गांनी मिळते. ह्यात पहिला आणि सगळ्या दर्शनांत मान्य असलेला मार्ग म्हणजे प्रत्यक्ष, ऐंद्रियानुभवातून प्राप्त होणारे ज्ञान. त्यानंतर अनुमान, मग उपमान किंवा तुलना, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी.

आपल्याला पंचमहाभूते तर माहीत आहेतच. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश. आपल्या पंचेंद्रियांद्वारे, आपल्याला त्यांच्यविषयीचे ज्ञान प्राप्त होते.

आकाश – शब्द – श्रोत्र/कर्ण
वायु – स्पर्श – त्वचा
तेज – रूप – चक्षु/नेत्र
आप – रस – जिह्वा
पृथ्वी – गंध – नासिका
आणि ह्या पंचेंद्रियांतून मिळणाऱ्या संवेदनांचे संश्लेषण करणारे सहावे ज्ञानेंद्रिय म्हणजे बुद्धी.

पंचेंद्रियांपैकी त्वचा आणि रसना/जीभ ह्यांना, जोपर्यंत कोणतीही बाह्य वस्तू त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत नाही तोपर्यंत, ती जाणून घेता येत नाही. परंतु नाक, कान आणि डोळे ह्यांचं तसं नाही. आपल्या शरीरापासून दूर असलेल्या वस्तूंचीदेखील जाणीव आपल्याला ह्या तीन इंद्रियांद्वारे होते. आणि ह्या तीनही इंद्रियांची रचना जोडगोळ्यांत आहे. म्हणजे दोन नाकपुड्या, दोन कान आणि दोन डोळे.

आता गंमत बघ, आपल्याला आपल्या डाव्या डोळ्याने बघितले तर जे दृश्य दिसते त्यापेक्षा उजव्या डोळ्याने बघितले तर थोडे वेगळे दृश्य दिसते. परन्तु आपली बुद्धी, त्या दोन वेगवेगळ्या दृश्यांना एकत्र करून, दोन ‘द्विमितीय’ दृश्यांची सरमिसळ करून त्यातून एकच ‘त्रिमितीय’ दृश्य निर्माण करते. आणि असे केल्याने आपल्याला बाहेरच्या जगातील वस्तूंच्या आपल्यापासूनच्या अंतराचे (space) ज्ञान होते.

तसेच घडून गेलेल्या घटनांचा आपल्या स्मृतीतील क्रम आणि पुढे घडू घातलेल्या घटनांचे अनुमान ह्याद्वारे आपल्याला काळाचे (time) ज्ञान होते. अर्थातच हे ज्ञान अनुभवपश्चात (a posteriori) होते.”

“पण मग राजन्, घडत असलेल्या घटनांतून आपल्याला हा ‘दिक्काल’ (space & time) विषयीचा नेमका अर्थ काढण्यासाठी काही प्रागनुभविक (a priori), किंवा अनुभवनिरपेक्ष ज्ञान असतं का?”

“हे बघ, भारतीय तत्त्वज्ञानात अनुभवातून प्राप्त होणाऱ्या प्रत्यक्षज्ञानाला सगळ्यात जास्त महत्त्व असलं तरीही ज्याचा प्रत्यक्षअनुभव आलेला नाही असं ज्ञान आपल्याला अनुमानाद्वारे प्राप्त करता येतं.

हे अनुभवनिरपेक्ष ‘ज्ञान’ हस्तगत करण्यासाठी आपल्या प्रत्येकाजवळ जे काही असेल (तर्क आणि कल्पनाशक्ती) त्याला आपण ‘ज्ञान’ न म्हणता ज्ञान प्राप्त करण्याची ‘क्षमता’ म्हणूया.

पण गंमत अशी की, ही जी क्षमता आपल्यात विकसित झालेली आहे, ती आपल्या सर्व पूर्वजांच्या अनुभवपश्चात ज्ञानाच्या ‘स्मृती’ आपल्यामध्ये वारशानी, गुणसूत्रांतून आल्यामुळे झालेली आहे. एक प्रकारचं आपापलं संचितच म्हणूया त्याला.

तर त्यामुळेच आपल्याला, आपल्या सभोवती घडत असलेल्या निरर्थक, निर्हेतुक घटनांचा अर्थ, शब्दार्थ, अन्वयार्थ, गर्भितार्थ आणि हेतूही शोधण्याची क्षमता आणि उर्मीही मिळत असावी!

परंतु येथे ‘ज्ञान’ म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला हवं. आणि, त्यासाठी त्याचा विरुद्धार्थही जाणून घ्यायला हवा.”

“अरे त्यात काय? ज्ञानाच्या विरुद्धार्थी तर अज्ञानच असणार ना?”

“नाही, आम्हां विद्यार्थ्यांनाही तेव्हा असंच वाटलं होतं. पण गुरुजींनी समजवलेलं आठवतं की ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. ज्ञानाचा अर्थ आणि विरुद्धार्थ समजवण्यासाठी त्यांनी दिलेलं उदाहरणही आठवतं.

ते म्हणाले होते, समजा दोन मित्र रस्त्याने जात असताना त्यांना जमिनीवर एक लांब नागमोडी वस्तू पडलेली दिसली, आणि एकाला ती बघून तो साप असावा असं वाटलं, तर दुसऱ्याला तीच वस्तू बघून तो दोरीच्या तुकडा असावा असं वाटलं. आता काहीतरी वस्तू रस्त्यात पडली असल्याचं दोघांनाही ‘ज्ञानच’ झालं.

पण मग अश्यावेळी काय करायचं? तर वस्तुस्थिती काय आहे हे प्रत्यक्षप्रमाणाने जाणून घ्यायचं. जर प्रत्यक्षात ती वस्तू साप असेल तर ज्याला तो साप वाटला त्याचे ज्ञान यथार्थज्ञान, आणि ज्याला तो दोरीचा तुकडा वाटला त्याचा मात्र तो भ्रम होता असं समजायचं. म्हणजेच जे ज्ञान वस्तुस्थितीशी सुसंगत असेल तेच यथार्थज्ञान आणि जे वस्तुस्थितीशी विसंगत असेल तो भ्रम.

आता बघ ना, माणसाने गेल्या शेपाचशे वर्षांत किती प्रगती केली आहे. ही सगळी प्रगती त्याने आपल्या पंचेंद्रियांच्या द्वारे, त्यांच्या कक्षा वाढवत नेऊन आणि आपल्या बुद्धिसामर्थ्याच्या बळावर केली आहे.

साधे डोळ्यांचे उदाहरण बघ, आपण आधी भिंगे बनवली, मग सूक्ष्मदर्शक यंत्रे आणि दुर्बिणी बनविल्या. आता तर ह्या यंत्रांची क्षमता आपण इतकी वाढवली आहे की अणुरेणूंपासून तर अनेक प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रह-ताऱ्यांपर्यंत आपण सगळं बघू शकतो! इन्फ्रारेड किरणांद्वारे अंधारात बघू शकतो, ‘क्ष’ किरणांद्वारे शरीराच्या आत डोकावू शकतो. विद्युतशक्ती, चुंबकीयशक्ती, गुरुत्वाकर्षणशक्ती ह्या शोधून आपण त्यांच्या मोजमापाची उपकरणेही बनवली. आज आपले ज्ञान वस्तुस्थितीशी इतके सुसंगत, इतके अचूक आहे की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर एखाद्या गोफणासारखा करून आपण आपले यान पृथ्वीपासून चार कोटी किलोमीटर दूर असलेल्या मंगळावर पाठवण्यात पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो.

ह्याउलट, फलज्योतिषाचे बघ. हजारो वर्षांपूर्वीच्या मर्यादित निरीक्षणशक्तीच्या जोरावर बेतलेल्या ज्योतिषशास्त्रावर आधारित ह्या तथाकथित फलज्योतिषशास्त्रात इतक्या वर्षांत, ते वस्तुस्थितीशी, काळाशी, सुसंगत करण्याचा कोणताच प्रयत्न झालेला नाही. ते अद्ययावत नाही, त्याचा अचूक पडताळा घेता येत नाही. त्यामुळे आपण फारतर त्याचा इतिहास म्हणून अभ्यास करू शकतो.

भारतीय तत्त्वज्ञानातील दर्शनांच्या यथार्थज्ञानाच्या व्याख्येप्रमाणे तर, वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्यामुळे, फलज्योतिषाची वर्गवारी भ्रामक कल्पनांमध्येच करावी लागेल.

त्यामुळे फलज्योतिष विज्ञान आहे असे म्हणणे हे असत्य प्रतिपादन होईल. तुला ते संस्कृत सुभाषित ठाऊकच असेल . . .

. . .

प्रियं च नानृतम् ब्रूयात्,
एष धर्मः सनातन:।

त्यामुळे फलज्योतिषाविषयी आपल्याला कितीही प्रेम असले, आणि ते विज्ञानच आहे हे पटवून सांगण्याची आपली कितीही इच्छा असली तरीही आपला सनातन धर्म असे असत्य प्रतिपादन करण्याची अनुमती आपल्याला देत नाही!”

विक्रमादित्याच्या ह्या उत्तराने वेताळाचे समाधान झाले. आणि अश्या तऱ्हेने राजाच्या मौनव्रताचा भंग झाल्यावर वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लोम्बकळू लागला!

क्रमशः . . .

अभिप्राय 3

 • खूप छान विवेचन आणि यथार्थ विवरण.

  माणसाला भविष्याबद्दल कायमच एक कुतूहल मिश्रित भय असते. त्या भावनेतूनच फलज्योतिषाला निदान करायला सांगून आपण आपल्या भविष्याबद्दल किंचित निश्चिंत आणि आश्र्वस्त असायचा प्रयत्न करतो.

  वर्तमान अथवा भविष्याचे भय हे आपण करीत असलेल्या कर्म फळांच्या अपेक्षा, यश यामुळेच असते.

  कुठलेच कर्म फळविरहित राहत नाही पण हे समजून उमजायला जीवन खर्च होते.

  गीते नुसार ज्ञान सर्वत्र आणि शाश्वत आहेच केवळ अज्ञानाचा अंधार दूर करायला हवा. त्यासाठी मी देह मन बुध्दी नसून आत्मा आहे याची जाणीव ठेवून कर्म केल्यास बुध्दी अग्र होऊन

  यतकरोशी यदाष्णासी याज्जुहोशी यादसी यत|

  यतपास्येसी कौंतेय तत कुरुष्व मदर्पणं||
  .
  या भावाने जीवन मार्ग जोपासणे शक्य होइल

  🙏

 • Very nicely written.
  Nicely blended tales we used to read in childhood with contemporary scientific approach.
  Good to read such nice marathi language after a long time

 • अतिशय सुसंगत विवेचन,… धन्यवाद!…मला खात्री आहे,की जसजसे विज्ञान प्रगत होत गेले,तसतश्या मानवी ज्ञानाच्या कक्षा ही रुंदावत गेल्या, हे आपण प्रतिपादन केले आहेच.
  प्रत्यक्ष ज्ञान आवश्यक आहेच,वाद नसावा,.पण इतर चार मार्ग ही भविष्यात विकसित होतील फलज्योतिष संबंधात,….असे प्रामाणिकपणे वाटते,..तशी आशा ठेवावयास हरकत नसावी….
  अर्थात तोपर्यंत मात्र फलज्योतिष हे शास्त्र नसेलच.आधुनिक गणित,स्टॅटिस्टिकल मेथड्स,…इ.या काही पूरक ठरतील,मात्र इतर शास्त्रांपेक्षा ते मागे पडले आहे हे ही खरे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.