विक्रम आणि वेताळ – भाग ३

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.

“राजन्, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील षट्दर्शनांच्या प्रत्यक्षप्रमाण ह्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नाही, हे तू गेल्या खेपेत सिद्ध केलंस. परंतु फलज्योतिष हे भविष्याचा वेध घेतं, त्यामुळे आपण ते ‘अनुमान’ ह्या ज्ञानाच्या दुसऱ्या स्रोताच्या कसोटीवर तपासून बघायला नको का?”

“खरं सांगू का, ‘प्रत्यक्षप्रमाण’ ह्या भारतीय तत्त्वज्ञानातील दर्शनांच्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या कसोटीवर जी गोष्ट निव्वळ ‘भ्रम’ आहे हे सिद्ध झाले आहे, त्याविषयी आणखीन काही चर्चा करणे निरर्थक आहे. पण तरीही तुला जिज्ञासा वाटते आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करून बघतो.
आपल्याला सगळे मोठे लोक नेहमी सांगतात बघ, की वर्तमानात जगा, वर्तमानात जगा!
पण काय रे, हे वर्तमान म्हणजे नेमकं काय?”

“वा रे वा, आता तर ‘प्रेमापोटी’ उत्तरं द्यायची सोडून तू तर मलाच प्रश्न विचारू लागलास! पण इतकी साधी गोष्ट तुला आठवू नये, किंवा कळू नये?
अरे वर्तमान म्हणजे वर्तमानकाळ!
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असे तीन काळ आहेत ना?
त्यातील मधला. . ., वर्तमानकाळ!”

“शाब्बास!
आता सांग, हा वर्तमानकाळ नेमका किती वेळाचा असतो?
म्हणजे, भविष्यकाळ वर्तमानकाळामार्गे भूतकाळात परिवर्तित होण्यास किती वेळ लागतो?”

“अरे हे काय सुरू केलंस भलतंच? अनुमान आणि फलज्योतिषाविषयी बोलणार होतास ना?”

“हो रे, त्याचंच प्रास्ताविक करण्याचा प्रयत्न करतोय!
त्यासाठीच सांग! वर्तमानकाळ किती वेळ असतो?
तासभर, मिनीटभर, क्षणभर? की क्षणाचाही शतांश, सहस्रांश, लक्षांश?
कसं सांगणार तू नेमकं?
खरं तर सांगूच शकत नाहीस!
कारण वर्तमानकाळ असा काही नसतोच.
वर्तमानकाळ ही भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्यां दोन काळांमधील सतत/अव्याहतपणे पुढे सरकत राहणारी केवळ काल्पनिक छेदरेषा आहे.
फार तर, आपणां मानवांसाठी, आपण असं म्हणूया की वर्तमानकाळ हा persistence of vision एवढा, म्हणजे एकदशांश क्षणाचा असतो, कारण आपल्या दृष्टीस पडलेली गोष्ट तितका वेळ आपल्या दृष्टिपटलावर टिकून राहते.
तर सांगायचा मुद्दा असा की, थोरामोठ्यांनी आपल्याला कितीही ‘वर्तमानात जगण्यास’ सांगितलं तरीही आपल्याला ते शक्य नाही.
आपण एकतर गतस्मृतींमध्ये किंवा भविष्याच्या पूर्वानुमानातच जगत असतो.
आपल्याला गतस्मृतीत रममाण होऊन फारसा फायदा नसतो, भविष्याच्या पूर्वानुमानाच्या अचूकतेवर मात्र आपलं जीवनमरण अवलंबून असतं.”

“हो राजन्, हे मात्र खरं आहे. शत्रूच्या तलवारीच्या वाराचं आपलं पूर्वानुमान जर चुकलं, तर झालंच, जय रामजी की!”

“म्हणून तर आपण आपलं भविष्य जाणूनघेण्यासाठी इतके प्रयत्न करत असतो.
पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे.
आपल्याला ज्याविषयीचं पूर्वानुमान करायचं असेल, किंवा ज्याविषयीचं भविष्य जाणून घ्यायचं असेल, त्याच गोष्टीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, त्याच गोष्टीविषयी शक्य तेवढं ज्ञान आधी आपल्याला मिळवावं लागेल.
इतिहासाचा अभ्यास करून आपण जीवशास्त्राच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचे अनुमान करू शकत नाही.”

“पण राजन्, ही तर इतकी साधी गोष्ट आहे की एखादा पहिलीतला मुलगाही हे सांगेल.”

“हो रे, पण ही इतकी साधी गोष्ट नं समजणारे, आणि खगोलशास्त्राचा अभ्यासकरून वैयक्तिक जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणारे, काही कमी लोक नाहीत. अगदी IGNOU सारखी प्रख्यात विश्वविद्यालयंसुद्धा जर हे समजू शकत नाहीत तर सामान्यांचं काय?”

“हम्मम् ! खरं आहे!”

“पण असो, झालं एवढं प्रास्ताविक पुरे, गेल्या खेपेस आपण ऐन्द्रियानुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या प्रत्यक्षप्रमाण ह्या कसोटीवर फलज्योतिष कसे ज्ञान नसून निव्वळ भ्रम आहे ते बघितले.

परंतु प्रत्यक्ष ऐन्द्रियानुभव हा जरी सगळ्यात महत्त्वाचा ज्ञानस्रोत असला तरीही त्याला मर्यादा आहेत, प्रत्येक गोष्ट आपण प्रत्यक्ष अनुभवू शकत नाही. ज्या पदार्थाचे ज्ञान आपल्याला प्रत्यक्षप्रमाणाने होत नाही, पण त्या पदार्थाशी साहचर्यनियमाने संलग्न असणार्‍या दुसर्‍या एका पदार्थाच्या प्रत्यक्षाने होते, त्याला अनुमिती आणि त्या प्रक्रियेला अनुमान असे म्हणतात.

उदा., एखाद्या ठिकाणी धूर दिसला, तर त्या ठिकाणी अग्नी असणार असा आपण तर्क करतो; कारण पूर्वी केव्हातरी अग्नी आणि धूर यांचे साहचर्य आपण अनुभवलेले असते. या अनुभवाच्या किंवा स्मरणाच्या आधारे नंतरही जेव्हा धूर पाहिला जातो, तेव्हा त्या ठिकाणी अग्नी असला पाहिजे, असा विचार आपल्या मनात प्रकटतो. ह्या प्रक्रियेला अनुमानप्रक्रिया म्हणतात.

आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली असता पाऊस पडेल असे ज्ञान होणे, या आणि अशा प्रकारची होणारी ज्ञाननिश्चिती म्हणजेच अनुमिती किंवा अनुमान.

अशा प्रकारच्या ज्ञानप्रक्रियेत उपस्थित गोष्टीच्या आधारे अनुपस्थिताचे ज्ञान होते; कारण उपस्थित गोष्ट ही अनुपस्थित गोष्टीकरिता खुणेचे किंवा गमकाचे कार्य करते.

आपण केलेले असे अनुमान जेव्हा दुसऱ्याला समजावून सांगायचे असेल तेव्हा आपल्याला विधानांच्या साहाय्याने युक्तिवाद करावा लागतो. अनुमानाच्या संदर्भात असा युक्तिवाद;

if a=b and b=c then a=c,
जर fire = आग आणि आग = अग्नी तर fire = अग्नी
अशा प्रकारचा असतो.

आता आपण एक उदाहरण घेऊन हे समजून घेऊ.

१) पर्वतावर धूर आहे
२) जिथे धूर असतो तिथे आग असते,
म्हणून
३) पर्वतावर आग आहे.

इथे

१) पर्वत = धूर
२) धूर = आग
म्हणून
३) पर्वत = आग

येथे, पर्वतावर धूर दृष्टिगोचर असेल तरच, आणि धूर आणि आग ह्यात ‘निरपवाद’ किंवा ‘नियत साहचर्य’ (Universal Concomitance) प्रत्यक्षप्रमाणावरून (empirical data ने) सिद्ध झाले असेल तरच पर्वतावर आग आहे हे अनुमान वैध ठरेल.

म्हणजे,

१) धूर = पर्वत आणि
२) आग = धूर असेही असायला हवे, तरच
३) आग = पर्वत असे म्हणता येईल

परंतु, जिथे धूर आहे तिथे आग असते हे सामान्यतोद्रष्टा जरी खरे असले तरीही जिथे आग आहे तिथे धूर असेलच असे नाही. जसे, स्वयंपाकघरातील LPG च्या चुलीतील ज्योतीवर धूर दृष्टिगोचर होत नाही. त्यामुळे ह्या अनुमानात हेतुदोष आहे.

आपल्याला आता भारतीय तत्त्वज्ञानाच्या षट्दर्शनांतील अनुमानाच्या कसोटीवर फलज्योतिष टिकते का हे बघायचे आहे.

त्यासाठी आपण फलज्योतिषातील एखादे सुप्रसिद्ध प्रतिपादन निवडूया.

उदा. ‘ज्या स्त्रियांच्या कुंडलीत वैधव्ययोग असतो त्या स्त्रिया विधवा होतात.’

आता आपण हे प्रतिपादन मघासारखे तीन विधानांच्या युक्तिवादात बसवूया.

१) सावित्रीच्या कुंडलीत वैधव्ययोग आहे.
२) ज्या स्त्रियांच्या कुंडलीत वैधव्ययोग असतो त्या स्त्रिया विधवा होतात.
म्हणून
३) सावित्री विधवा होईल.

आता, ज्या स्त्रियांच्या कुंडलीत वैधव्ययोग असेल त्या सगळ्या स्त्रिया विधवा होतात, आणि ज्या स्त्रिया विधवा होतात त्या सगळ्या स्त्रियांच्या कुंडलीत वैधव्ययोग असतो, हे जर प्रत्यक्षप्रमाणाने सिद्ध झाले तरच, ‘सावित्री विधवा होईल’ हे अनुमान वैध ठरेल.

पण प्रत्यक्षात आपल्याला काय दिसते?

विधवा होण्यासाठी त्या स्त्रियांचे लग्न होणे ही पूर्वअट आहे. कारण लग्न झाल्याशिवाय स्त्रिया विधवा होऊ शकत नाहीत.

परंतु प्रत्यक्षात ज्या स्त्रियांच्या कुंडलीत वैधव्ययोग असेल त्या स्त्रियांचे लग्नच होत नाही, परिणामस्वरूप त्या कधीच विधवा होत नाहीत.

आणि, ह्याउलट, empirical data असे सांगतो की स्त्रियांचे सरासरी आयुर्मान पुरुषांच्या सरासरी आयुर्मानापेक्षा जास्त आहे. ह्याचा सरळ अर्थ असा की लग्न झालेल्या बहुतांश स्त्रिया ह्या त्यांच्या पतीहून जास्त जगतात.

म्हणजेच कुंडलीत वैधव्ययोग नसूनही बहुतांश स्त्रिया विधवा होतात.

त्यामुळे, ‘ज्या स्त्रियांच्या कुंडलीत वैधव्ययोग असतो त्या स्त्रिया विधवा होतात’ हे विधान अवैध ठरते.

आणि, भारतीयतत्त्वज्ञानाच्या ‘न्याय’दर्शनांतील ‘अनुमान’ ह्या ज्ञानस्रोताच्या ‘व्याप्ति’ ह्या कसोटीवर फलज्योतिषातील हे प्रतिपादन सपशेल खोटे आहे हे सिद्ध होते.

तुला ते संस्कृत सुभाषित ठाऊक असेलच . . .

. . .
प्रियं च नानृतम् ब्रूयात्,
एष धर्मः सनातन: ।

त्यामुळे फलज्योतिषाविषयी आपल्याला कितीही प्रेम असले, आणि ते विज्ञानच आहे हे पटवून सांगण्याची आपली कितीही इच्छा असली तरीही आपला सनातन धर्म असे असत्य प्रतिपादन करण्याची अनुमती आपल्याला देत नाही!

विक्रमादित्याच्या ह्या उत्तराने वेताळाचे तात्पुरते समाधान झाले, आणि राजाच्या मौनव्रताचा अश्या तऱ्हेने भंग केल्यावर वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लोम्बकळू लागला!

क्रमशः . . .

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.