सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे : उत्तरार्ध (ग्रंथसमीक्षा)

प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात श्री.रसेल ह्यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ ह्या ग्रंथाच्या सारांशाविषयी जे विवेचन केले होते, ते मुख्यतः मांडणीप्रधान असून, ग्रंथाची स्थूलमानाने रूपरेषा देणे, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. परंतु मांडणी म्हणजे चिकित्सा नव्हे. त्यामुळे, आता आपण खंडणप्रधान विवेचनाकडे वळूया, ज्यायोगे श्री. रसेलांची नेमकी भूमिका वाचकांसमोर येईल, अशी आशा आहे. परंतु जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो, तेव्हा तिला काही मर्यादा घालणे हितकारक ठरत असते. म्हणून या समीक्षेची मर्यादा हीच की यामध्ये आपण प्रस्तुत ग्रंथांतील ‘मालमत्ता’ (Property) या प्रकरणाचीच विशेषतः दखल घेणार आहोत.

मालमत्तेविषयीचे हे विवेचन म्हणजे मालमत्ता संस्थेच्या स्वरूपानुरूप व्यक्तिच्या जैविक प्रेरणांवर व मानसिक स्थितीवर होणाऱ्या परिणामांची मीमांसा होय. श्री. रसेल यांनी तत्कालीन भिन्न आर्थिक संघटना आणि त्याद्वारे निर्माण झालेली सामाजिक अरिष्टे व त्यांचे निर्मूलन करण्याचे जे संभाव्य उपाय आहेत, त्यांची विस्तृत चर्चा केली आहे. त्यांच्या एकूण अर्थमीमांसेचे सार त्यांनीच स्वत: दिले आहे, ते पुढीलप्रमाणे:

“उपभोक्ते, उत्पादक आणि भांडवलदार यांच्या भिन्न भिन्न हितसंबंधांमुळे वर्तमान परिस्थितीतील व्यवस्थेत अनेक दोष निर्माण झाले आहेत. या तिघा जणांपैकी कुणा एकाचेही समुदाय या रूपात सारखे हितसंबंध नाहीत. सहकारात (Co-operative) भांडवलदाराच्या आणि उपभोक्त्यांच्या हितात समन्वय साधला जातो, तर श्रमसंघवाद (Syndicalism) उत्पादक व भांडवलदार यांचे हीत जोपासतो. तिघांच्या हितांना सामावून घेणारे कोणीही नाही. उद्योगसंचालकांच्या हितांचे समुदायांच्या मित्रांशी काहीच तादात्म्य नाही. यामुळे यांपैकी कोणीही औद्योगिक कलह पूर्णपणे थांबवू शकत नाही; परंतु यापैकी कोणतीही व्यवस्था वर्तमान व्यवस्थेपेक्षा बरी असेल आणि या दोघांचे मिश्रण औद्योगिकीकरणातील बहुतांश समस्या सोडवू शकेल. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की राजकीय लोकशाहीच्या प्राप्तीसाठी स्त्री-पुरुषांनी कितीतरी संघर्ष केला, मात्र औद्योगिक क्षेत्रात लोकशाही आणण्यासाठी खूप कमी प्रयत्न झाले आहेत. मला विश्वास आहे की, औद्योगिक लोकशाहीच्या प्रस्थापनेतून अगणित फायदे मिळतील. त्यासाठी एकत्र सहकारी व्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल अथवा सरकारी प्रशासनिक हेतूंसाठी एखाद्या व्यापारास वा उद्योगास घटकरूपात मान्यता द्यावी लागेल आणि अशा स्वराज्याची (Home rule) निर्मिती करावी लागेल, ज्याचा विचार ‘श्रेणीसंघवाद’ करतो. सर्व ‘प्रशासन घटक’ हे भौगोलिक असावेत असं नाही. कधीकाळी संपर्कसाधनांच्या अभावी ती व्यवस्था अनिवार्य होती; पण आज ती आवश्यक नाही. अशा व्यवस्था जर आपण निर्माण केल्या, तर खूप लोकांना आपल्या कामाचा अभिमान व ‘श्रमप्रतिष्ठा’ वाटू लागेल आणि पुन्हा सृजनशील जैविक प्रेरणांना कृतीप्रवणतेचा मार्ग मोकळा होईल, जो सध्यापर्यंत मोजक्यांपुरताच मर्यादित होता. या व्यवस्थेची अपेक्षा आहे की जमिनीवरील खाजगी मालकी (Private ownership of land) नष्ट व्हावी आणि भांडवलदारांवर निर्बंध असावे; परंतु या व्यवस्थेत ‘वेतनाची समानता’ (Equality of wages) अपेक्षित नाही. ही व्यवस्था फक्त ऊर्जा वापराची व स्वकर्तुत्वाची एक रूपरेषा मात्र आहे. साम्यवादाप्रमाणे ती एखादी जड वा अंतिम व्यवस्था नाही. मला वाटते की, केवळ अशाच एखाद्या पद्धतीने, व्यक्तिंची मुक्तपणे वृद्धी घडून येईल, ज्यात व्यापक तांत्रिक संघटना औद्योगिकीकरणाने अपरिहार्य ठरविलेल्या आहेत.”

श्री. रसेल आणि डॉ. आंबेडकरांची अर्थमीमांसा
आपल्या ‘Mr. Russell and Reconstruction of society’ या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्री. रसेलांनी केलेल्या मालमत्तासंस्थेच्या मानसिक परिणामांची समीक्षा केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाच्या ज्या पैलूकडे व त्यांनी लिहिलेल्या ज्या ग्रंथांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते, तो पैलू म्हणजे त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञ व त्यांचे अर्थशास्त्रावरील लिखाण. उदाहरणार्थ:

  • The problem of rupees,
  • Small holdings in India and their remedies,
  • Russell and Reconstruction of society इ. हे होय. याउलट नेमके एक अर्थतज्ज्ञ म्हणून श्री. रसेलांच्या उपर्निदिष्ट भूमिकेविषयी डॉ. आंबेडकरांचे काय मत होते, याचाच तौलनिक विचार आपल्याला आता करावयाचा आहे.

या संदर्भात, डॉ. आंबेडकर लिहितात, “श्री. रसेलांनी औद्योगिक व्यवस्थेतील सर्वसामान्य दोष दाखवून दिले आहेत. त्यामध्ये, (१) औद्योगिक व्यवस्था विभक्त अशा नीतीला उत्तेजन देते, (२) औद्योगिक व्यवस्था श्रमिकांचे व्यक्तिमत्व खुंटवून त्यांना गुलाम बनविते, या दोषांचा समावेश आहे. श्री. रसेल औद्योगिक व्यवस्थेतून अशा अनिष्ट परिणामांना कमी करण्यासाठी वा त्यांचे निर्मूलन करण्यासाठी आर्थिक संस्थांच्या सामाजिक प्रभावाविषयी सतर्कतेने, व्यापक दृष्टिकोनातून आणि तत्त्वज्ञानात्मक खोलीने मांडणी करतात. संपत्तीच्या मानसिक परिणामांचे (Mental effects of property) जे विश्लेषण त्यांनी केले, कदाचित त्याविषयी सुद्धा असेच म्हणता यायला हवे होते; पण मालमत्तेच्या मानसिक परिणामांच्या चर्चेत बऱ्याच ठिकाणी त्यांची गैरसमजूत झाली असल्याचं निदर्शनास येतं. त्या गैरसमजुतीवर प्रकाश टाकणे अनिवार्य आहे.”

एकूण, श्री. रसेल संपत्तीच्या मानसिक परिणामांची सम्यक चिकित्सा करण्यात अपयशी ठरले आहेत, अशी डॉ. आंबेडकरांची भूमिका आहे. मालमत्ता ही मानवी जीवनाच्या प्रेरणांच्या ‘उत्पादन बाजू’ (Production side) आणि ‘उपभोगाची बाजू’ (Consumption side) यांवर परिणाम करत असते. तो मानसिक परिणाम कसा होत असतो, याविषयी आता आपल्याला विचार करायचा आहे.

उत्पादनाची बाजू (Production side)
डॉ. आंबेडकर लिहितात, “श्री. रसेल यांची पहिली गैरसमजूत, त्यांच्या ‘पैशावरील प्रेम’ (Love of money) या संदर्भातील विधानांमध्ये अंतर्भूत आहे.” श्री. रसेल यांच्या ‘पैशावरील प्रेम’ या संकल्पनेच्या गैरसमजाकडे वळण्याअगोदर, त्या संकल्पनेचा श्री. रसेलांना अभिप्रेत असा अर्थ कोणता, हे पाहणे अधिक श्रेयस्कर ठरेल. मालमत्तेवरील प्रकरणाचा प्रारंभच हा एका कथेच्या विवेचनापासून होतो.

वास्तववादी पंथातील निराशावादी कादंबरीकार श्री. गिसींग यांच्या ‘Eve’s Ransom’ या कथेचा उल्लेख करून, श्री. रसेल समाजात पैशाविषयी निर्माण झालेल्या फसव्या आदर्शाची सूचना देतात. या कथेत कथानायिका तिच्या गरीब प्रियकरास नाकारत, ज्याचे उत्पन्न अधिक आहे, अशा श्रीमंत माणसाशी विवाहबद्ध होते. शेवटी, तो गरीब प्रियकर तिला श्रीमंत माणसासोबत सुखी बघून, या निर्णयाप्रत येतो की नायिकेने घेतलेला निर्णय योग्यच असून, आपल्याला तर आपल्याच दारिद्र्याची ‘शिक्षा’ मिळाली आहे. असं मानून तो गप्प बसतो. श्री. रसेल म्हणतात, “येथे कथानायिकेचे ‘पैशावरील प्रेम’ दिसून येते.” महत्त्वाची गोष्ट तर ही की या कथेचा नायक ‘पैसा’ हा आहे. येथे, एक गोष्ट विचारांत घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे, श्री. रसेल ‘पैशाची निकड’ (Need of money) आणि ‘पैशावरील प्रेम’ (Love of money) यांत फरक करतात. त्यांच्या मते, ‘पैशावरील प्रेम’ हा वर्चस्वप्रेरणांचा (Possessive impulses) परिणाम होय. ते पुढे लिहितात, “पैशावरील प्रेम मानवी स्वभावात विकृती निर्माण करते. याचं कारण म्हणजे ‘यश काय आहे’ याविषयीच्या आपल्या चुकीच्या समजुती असतात आणि मग त्यातूनच अशा अविचारी धाडसी कृत्यांची खुशामत सुरू होते, जे मानवी कल्याणात (Welfare) तिळमात्रही भर घालत नाहीत. त्यामुळे चारित्र्य आणि हेतूंच्या ‘मृत एकतेला’ व बनावटीपणाला चालना मिळते आणि त्यामुळे जीवनातील खऱ्याखुऱ्या आनंदाचा ऱ्हास होतो, मानसिक ताणतणावांची निर्मिती होते, परिणामतः संपूर्ण समाजच हतबल, निराश, एकटा व भित्रा बनत जातो.”

श्री. रसेलांच्या ह्या भूमिकेचे ‘संपत्तीनिंदक’ नीतीवाद्यांच्या दृष्टीकोनाशी साधर्म्य आढळत असले, तरी श्री. रसेलांची भूमिका नेमकेपणाने ओळखली पाहिजे. श्री. रसेलांची भूमिका समजून घेण्याआधी, तत्त्वज्ञानाचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध आपण समजावून घेतला पाहिजे.

नेहमी समजलं जातं त्यापेक्षा कितीतरी अधिक घनिष्ठता ही आर्थिक जीवन (Economic Life) आणि तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोण यांत आहे. कार्ल मार्क्सच्या ‘इतिहासाच्या भौतिकवादी विश्लेषणा’तील (Materialistic Interpretation of History) अतिशयोक्तीचा काही भाग सोडला, तर त्यात आपल्याला अंशतः सत्य असल्याचे दिसेल. मार्क्सच्या मते, समाजरचनेचा मूळ पाया ही अर्थरचना असून, त्यावर तत्त्वज्ञानाची इमारत उभी असते. जेव्हा संपूर्ण जग ‘दु:खी अर्थव्यस्थे’च्या (Pain economy) कालखंडातून जात होते, जेथे, (१) अतिशय प्रचंड दारिद्र्याची अवस्था (Highest stage of poverty) व (२) अतिशय कमी उत्पादकता (Lowest level of productivity) होती, त्यावेळी नीतीवाद्यांनी दारिद्र्यावर उपदेश देणे स्वाभाविक होते आणि भौतिक वस्तुंचा (विशेषतः पैसा) त्याग करायला लावण्याचा सल्ला देणे साहजिकच होते. ज्या वस्तू आपण मिळवू शकत नाही, त्या वस्तू आपण मिळविण्यायोग्य नाहीत, असे ‘आंबट द्राक्षा’चे तत्त्वज्ञान (Sour grapes philosophy) निर्माण होणे स्वाभाविक आहे. ही अवस्था म्हणजे संसाधन दुर्मिळतेच्या (Scarcity of resources) स्थितीत, एखादी वस्तू आपल्याजवळ नसल्यास मानव ‘नाही रे’ (Have not) तत्त्वज्ञानाकडे कसा वळतो हे सुचविते. आजच्या नव-उदारमतवादी काळाची अवस्था अगदी उलट आहे. अती उपभोगाच्या आणि संसाधन विपुलतेच्या (Affluence of resources) अशा चंगळवादी युगात, ‘आनंददायी अर्थव्यस्था’ (Pleasure economy) असलेला समाज विचार करतो, की एखादी वस्तू स्वस्त आहे म्हणजे ती हलकीच असली पाहिजे. आणि अशाप्रकारे, नव-उदारमतवादी समाजातील माणूस ‘आहे रे’ (Haves) तत्त्वज्ञानाकडे वळतो. अशाप्रकारे, अर्थसंस्था मनोरचनेवर परिणाम करते. यशस्वी आणि अपयशी लोकांच्या मनोरचनेत जे अंतर असते, तेच किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील लोकांच्या जीवनविषयक दृष्टिकोनात असतं. त्यामुळे श्री. रसेलांद्वारे ‘पैशावरील प्रेम’ यावर केली गेलेली टिप्पणी तिच्या ऐतिहासिक मूल्याला कोणतेही तात्त्विक महत्त्व प्रदान करत नाही, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. उत्पादनाच्या बाजूने मनोरचनेची होणारी घडण बघितली तर लक्षात येईल की, श्री. रसेलांची ‘पैशावरील प्रेम’ याविषयीची टीका उथळ आहे. श्री. रसेल ‘पैशाचे प्रेम’ या संकल्पनेची छाननी त्यामागचा उद्देश न पाहताच करतात. पैशावरील प्रेम हे ‘नेहमी कशासाठीतरी’ असते आणि आणि ह्या ‘कशासाठीतरी’ मध्येच त्याचा उद्देश दडलेला असतो, कारण उपयोगाच्या दृष्टीने, पैशाला स्वत:चे साध्यमूल्य असे काही नसतेच. त्याला नेहमी साधनमूल्य असते. श्री. रसेलांचेच मित्र आणि जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. जे. एम. केन्स हे ‘पैशावरील प्रेम’ ह्या संकल्पनेऐवजी ‘पैशासाठीची मागणी’ (Demand for money) ही अर्थशास्त्रीय संकल्पना मांडतात. लोक पैशाला मागणी का करतात? या प्रश्नाचे उत्तर प्रा. केन्स देतात. प्रा. केन्स यांनी लोक तीन प्रमुख हेतुंकरिता पैशाला मागणी करतात, असे स्पष्ट केले आहे:

(१) व्यवहार हेतू (The Transaction Motive)
(२) दक्षता हेतू (The Precautionary Motive)
(३) सट्टेबाजीचा हेतू (The Speculative Motive)

या सर्व हेतुंमुळे व्यक्तीमध्ये ‘रोखतेची इच्छा’ निर्माण होते, असे प्रा. केन्स म्हणतात. यावरून आपल्याला असे म्हणता येईल, की श्री. गिसींगच्या ‘Eve’s Ransom’ ह्या कथेत ‘पैसा’ जरी नायक असला, तरी त्याला त्याचे नायकत्व त्याच्या वैशिष्ट्यांमुळे, त्याला बाळगण्यामागील (रोखतेमागील) उपर्निर्दिष्ट हेतुंमुळे अर्थातच त्याला असलेल्या साधनमूल्यामुळे प्राप्त झाले आहे.

ही गोष्ट ध्यानात ठेवली, तर मग माणसात ‘स्वभाव व हेतूंची मृत एकरूपता’ नसते, हे समजते. श्री. रसेलांची ‘पैशावरील प्रेम’ ही संकल्पना त्यामागच्या हेतूंच्या दृष्टीने तपासली असता उथळ वाटायला लागते. खरंतर, कोणत्याही सुदृढ व निरोगी मनाच्या माणसात ‘पैशावरील प्रेम’ यासारखी कोणतीही गोष्ट नसते, हे लक्षात घ्यायला हवे.

उपभोगाची बाजू (Consumption side)
उत्पादनाच्या बाजूने बघितले तर, श्री. रसेल यांचा प्रबंध डळमळतांना दिसतो. मात्र उपभोगाच्या बाजूने बघितले असता, तो अगदी कोसळूनच पडतो. डॉ. आंबेडकर लिहितात, “जर खरंच हे सिद्ध करायचे असेल की एखाद्या व्यक्तिची भूक शांत केल्याने व्यक्ती स्वत:लाच विकृत करून घेत असते, तर आपल्याला ह्या गोष्टीचे समर्थन जीवनाच्या उपभोगाच्या बाजूमध्ये मिळेल, उत्पादनाच्या बाजूने मिळणार नाही.”

डॉ. आंबेडकरांच्या या कथनाचा अर्थ काय आहे? तर, उत्पादनाच्या बाजूने आपण केवळ एवढे जाणू शकतो, की उत्पादनपद्धतीनुरूप मनोरचना कशी आकार घेईल? मात्र, जर एखाद्याला उत्पादित उपभोग्यवस्तूच्या उपयोगितांचा संबंध व्यक्तिच्या मनोरचनेशी व जैविक प्रेरणांशी जोडायचा असेल आणि त्यावरून हे सिद्ध करायचे असेल की, फक्त एकाच प्रकारच्या जैविक प्रेरणांची पूर्ती वा विशिष्ट अवयव किंवा अवयवसंस्था यांच्याच गरजांची पूर्ती होत असल्यास मानवात विकृती निर्माण झाल्यावाचून राहत नाही, तर आपल्याला विधानाचे समर्थन जीवनाच्या उपभोगाच्या बाजूमध्ये मिळेल. उपभोगाचे नियम (Laws of consumption) कुणास माहीत नाहीत? उपभोगांच्या नियमांच्या दृष्टीने बघितले असता, अशा एखाद्या विकृतीची शक्यता आहे काय? त्यासाठी आपणास उपभोगाच्या नियमांची तपासणी करावी लागेल:

उपभोगाचे सुप्रसिद्ध असे पाच नियम आहेत:

१. वैविध्य नियम (Law of variety)
२. अनुकरण नियम (Law of Imitation)
३. अर्थक्रम नियम (Law of Economic order)
४. सुसंवाद नियम (Law of Harmony)
५. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम (Law of Diminishing marginal Utility)

हे पाचही नियम, उपभोग सुखकारक कसा होईल, याच्या अटी स्पष्ट करतात. आता त्या अटी कोणत्या याची तपासणी करूया:
१. वैविध्य नियम (Law of variety): वैविध्य नियमानुसार, केवळ एकाच पदार्थाचा उपभोग घेण्यापेक्षा उपभोग्य पदार्थात वैविध्य निर्माण केले, तर समाधानाची पातळी उंचावण्याची शक्यता जास्त असते. उदा; भोजनात विविध चवींच्या पक्वांनांचा समावेश करणे.
२. अनुकरण नियम (Law of Imitation): आपल्याला आवडणाऱ्या किंवा आदर्श व्यक्तीचे किंवा निम्न दर्जाच्या लोकांनी उच्च दर्जाच्या लोकांच्या जीवनशैलीचे अनुकरण करणे. उदा; समाजातील उच्च उत्पन्नगटातील लोकांच्या जीवनशैलीचे अनुकरण मध्यमवर्गीय लोक करतात आणि मध्यमवर्गियांच्या जीवनशैलीचे अनुकरण कमी उत्पन्नगटातील लोक करत असतात.
३. अर्थक्रम नियम (Law of Economic order): अत्यावश्यक गरजा ते कमी आवश्यक गरजा अशी गरजांची क्रमवारी करून, महत्त्वाच्या अशा जीवनावश्यक गरजा अगोदर भागविल्यास समाधान वाढते, असे हा नियम सांगतो. (हा नियम मागणीची लवचिकता स्पष्ट करतो.) उदा; भूक लागली असता आपण सोने-चांदी खरेदी करत नाही, तर त्यासाठी आपण अन्नपदार्थांची मागणी करतो.
४. सुसंवाद नियम (Law of Harmony): आपण एखाद्या वस्तूचा उपभोग केवळ याकरिता घेत असतो, कारण ती वस्तू आपण अगोदर उपभोगासाठी घेतलेल्या वस्तूला पूरक (Complimentary) असते. उदा; लोक आपल्या वेशभूषेला अनुरूप अलंकार वा तत्सम वस्तूंचा वापर करतात.
५. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम (Law of Diminishing marginal Utility): वस्तूंपासून व सेवांपासून मिळणाऱ्या उपयोगितेनुसार आपण उपभोग घेतो. प्रा. आल्फ्रेड मार्शल आपल्या ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’ (१८९०) या ग्रंथात लिहितात, “इतर परिस्थिती कायम असताना, व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी उपयोगिता या अर्थाने असलेले समाधान क्रमशः घटत जाते.” अर्थात, तृप्तीबिंदूपर्यंत उपभोग घेणे समाधानकारक असते, त्यानंतर असमाधान होते. घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमामुळे, उपभोगावर कधी मर्यादा लावावी हे समजते.

उपभोगाच्या या नियमांनुसार महत्तम समाधान कसे मिळविता येईल, याच्या अटी कळतात, मात्र हे नियम विकृती संदर्भात काही स्पष्टीकरण देतात का? हे आपल्याला शोधायचे आहे. उपभोगाच्या ह्या पाच नियमांपैकी वैविध्य नियम, अनुकरण नियम आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम यांमध्ये आपणास या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल अशी आशा आहे.

‘घटत्या सीमान्त उपयोगितेचा नियम’ हा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी परवलीचा शब्द असल्यासारखा आहे. या उपभोग नियमाविषयी डॉ. आंबेडकर लिहितात, “एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की, उपभोगाचे नियम (Laws of consumption) हे मूल्यांच्या उपयोगिता सिद्धांताच्या (Value theory of utility) आर्थिक विधानांवरून काढलेली सर्वसामान्य निगमने (Deductions) आहेत. ह्या सिद्धान्ताची प्रस्थापना कुर्नोट, गॅसेन, वालरस, कार्ल मेंगर आणि स्टॅन्ले जेव्हॅन्स या सीमांतवाद्यांनी (Marginalists) सनातनवादी अर्थशास्त्राच्या (Classical Economics) सिद्धांतांना विरोध म्हणून केलेली आहे. सीमान्तवाद्यांच्या मतानुसार, “उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तुतील अंतर्भूत गुण नव्हे अथवा परिस्थिती नव्हे, मानवाची गरज भागविण्याची वस्तुंची क्षमता म्हणजे उपयोगिता होय.” उपयोगितेविषयी परस्परविरोधी दृष्टिकोन अर्थशास्त्रात आढळतात. त्यापैकी काहीजण उपयोगितेला ‘वस्तुनिष्ठ’ मानतात, तर काहींच्या मते उपयोगिता ‘व्यक्तिनिष्ठ’ संकल्पना आहे. उपयोगिता वस्तुनिष्ठ की व्यक्तीनिष्ठ हे पाहण्याची ही जागा नव्हे, कारण तो एका स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. तात्पुरते आपण उपयोगितेचा उपभोगाच्या जैविक प्रेरणांशी असलेला संबंध विचारात घेऊया. उपयोगितेचा उपभोगाच्या जैविक प्रेरणांशी काय संबंध आहे? त्यासंबंधाचे स्वरूप काय आहे?

डॉ. आंबेडकर लिहितात, “एखाद्या वस्तुपासून उपयोगिता मिळवू इच्छिणाऱ्या इंद्रियांतील बदलणाऱ्या अवस्थेनुसार उपयोगितापण बदलत राहते. भोजन आपल्या सर्वाधिक प्रिय गोष्टींपैकी एक आहे. तोसुद्धा आपल्या आवडी-निवडीचा विषय असू शकतो. आपण उपाशी असू तर अन्नसेवन करण्यात रूची निर्माण होईल आणि गरजेपेक्षा जास्त पोट भरलेलं असेल तर त्या अन्नाविषयी तिटकारा उत्पन्न होईल. त्यामुळे, जसजशी उपभोगातून तृप्ती वाढत जाईल, तसतशी उपयोगिता घटत जाईल किंवा असंही म्हणता येईल की, समाधानाची ही विशिष्ट अवयवाची अथवा अवयवसंस्थेची ‘सुखदायक कृती’ असल्यामुळे, अवयव वा अवयवसंस्थेचे त्यांचे समाधान करणाऱ्या वस्तुशी असलेला सहसंबंध दर्शविणारा वक्र (Curve) हा, अवयवांच्या अवस्थेनुरूप, व्यस्तक्रमाने (Inversely) स्थानांतरित होईल.”

जर श्री. रसेल मानसशास्त्रीय विश्लेषणातील सहसंबंधाच्या काळजीपूर्वक तपासणीतून गेले असते, तर त्यांनी निश्चितपणे त्या प्रश्नांतील गैरसमजूती टाळल्या असत्या. आता, हे मानसशास्त्रीय विश्लेषण म्हणजे नेमके काय? अशी कोणती कारणे आहेत की ज्यामुळे एखाद्या वस्तूची उपयोगिता ही शून्य (U=0) आणि नकारात्मक म्हणजेच ऋणही (U<0) होऊ शकते? हे सर्व वास्तवात घडतं, त्यामुळे: एकतर,

(१) समाधानाच्या प्रक्रियेत एका विशिष्ट बिंदूला (अर्थशास्त्रीय संज्ञेत याला ‘तृप्तीबिंदू’ म्हणतात.) त्याच्याशी संलग्न इंद्रिय, त्या वस्तूची उपयोगिता महत्तम झाल्यामुळे, अधिक उपभोग घेणे थांबवतात. किंवा मग दुसरी शक्यता अशी आहे की,
(२) केवळ एकाच प्रकारच्या इंद्रियाचे अतिरिक्त समाधान होत असेल, तर त्याविरोधात समाधान न झालेले दुर्लक्षित इंद्रिय एकत्रित बंड पुकारतात, कारण त्यांना दुसऱ्या प्रकारच्या समाधानाची आवश्यकता असते. अर्थातच, उरलेले क्षुब्ध इंद्रिये तृप्त झालेल्या इंद्रियाविरोधात उभे ठाकतात, म्हणजे ते विकृती निर्माण करतात.

येथे, अगोदरची शक्यता ‘घटत्या सीमांत उपयोगिता नियमांशी’ व नंतरची शक्यता ‘वैविध्य नियमाशी’ संबंधित आहे. या दोन्ही शक्यतांपैकी कोणती अधिक वास्तविक व सत्य आहे?
प्रा. गिडींग्जच्या मते, दुसरी शक्यता अधिक वास्तविक आहे. श्री. गिडींग्ज लिहितात, “जर एखाद्या विशिष्ट अवयवाची किंवा अवयवसंस्थांची आरडाओरड ज्या समाधानासाठी आहे, ती त्यांना उदारपणे मिळवून दिली तर, त्याचवेळी दुर्लक्षित-उपेक्षित अवयव हे निषेधाला सुरुवात करतात. त्यांचा निषेध इतका प्रभावी असतो की, ते आपली अतृप्त इच्छा तृप्त करवून घेतल्याशिवाय शांतच बसत नाहीत. आपल्या स्वभावाच्या दुर्लक्षित भागाची भूक आपल्या बोध जाणिवेची पकड घेते, आपले लक्ष विचलित करते आणि ज्या इंद्रियाला गरजेपेक्षा अधिक तृप्ती आपण देत आहोत, त्यावरून आपल्या मनाला स्वत:कडे वळवून घेतात.”

प्रा. गिडींग्ज यांची ही दोन पर्यायी विश्लेषणे शक्यतोवर अधिक अचूक आहेत. ह्या वर्तनवादी अभ्युपमासंदर्भात (Behavioural Hypothesis) संपूर्ण इंद्रियव्यवस्था या रूपात बोधघटक (Conscious Unit) म्हणून असते. ही गोष्ट ध्यानात ठेवली, तर असं म्हणता येईल की, प्रत्येक इंद्रियसंस्थेची गरज भिन्न भिन्न असते, एवढेच नाही, तर एकाच अवयवाचे अनेक तृप्तीप्रकार असणेही शक्य आहे. उदा, जीभ हा जरी एकच इंद्रिय असला, तरी त्यात भिन्न ‘रूचिकलिका’ (Test-buds) असतात, ज्यायोगे खारट, आंबट, तिखट, गोड इ.चवींचे ज्ञान होणे शक्य होते. म्हणून, जर एकाच अवयवास तृप्ती दिली जात असेल, तर वर सांगितल्याप्रमाणे, दुर्लक्षित अवयव त्याविरोधात ‘बंड’ करतात आणि अवयवांच्या अशा बंडखोर वृत्तीमुळे ‘उपभोगाचा वैविध्य नियम’ (Law of varieties in consumption) अर्थतज्ज्ञांनासुद्धा मान्य करावाच लागतो. अर्थातच, उपभोगातील बदल हा जैविक प्रेरणांतील मूलत: भिन्न गरजांतून निर्माण होतो. येथे चांगली गोष्ट ही आहे की, मानवी शरीर एकांगी विकासाच्या विरोधात आहे आणि निसर्गतः जर अनुकूल पर्यावरण मिळाले, तर त्याचा सर्वांगिण विकास होऊ शकेल. जर अवयवसंस्थांमध्ये विकृती वा बंड निर्माण होत असेल, तर अन्नातील विकृती ही ‘समाजाची चूक’ असेल, त्या माणसाची नाही.

जैविक प्रेरणांच्या परस्परभिन्न तृप्तीसंबंधातून वैविध्य नियम पुढे आला; मात्र जर यासंदर्भात व्यक्ती-व्यक्तीमधील जैविक प्रेरणांच्या पूर्तीमधील तफावत बघायची असेल तर आपणास ‘अनुकरण नियमाकडे’ (Law of Imitation) वळावे लागेल. तेव्हाच आपण श्री. रसेलांच्या ‘पैशावरील प्रेम’ या संकल्पनेची छाननी करू शकू.

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, श्री. जे. एस. ड्युसेनबेरी यांनी ‘सापेक्ष उत्पन्न परिकल्पना’ (Relative income hypothesis) मांडली आहे. श्री. ड्युसेनबेरींच्या मते, “लोकांची उच्च उपभोग पातळी गाठण्याची प्रवृत्ती असते व ते आपल्या शेजारच्या श्रीमंतांच्या उपभोग रचनेचे (Consumption pattern) अनुकरण करतात. यादृष्टीने, उपभोक्त्यांची पसंती ही परस्परावलंबी असते. सापेक्ष उत्पन्नातील फरक समाजाचा उपभोग खर्च ( Consumption expenditure) निश्चित करते. श्रीमंत व्यक्तीची सरासरी उपभोग प्रवृत्ती (Average propensity to consume-APC) कमी असते, कारण ते आपली उपभोग रचना कायम ठेवण्यासाठी आपल्या एकूण उत्पन्नातील फारच थोडा भाग खर्च करतात. याउलट, तुलनेने गरीब असलेल्या व्यक्तिंची सरासरी उपभोग प्रवृत्ती (APC) जास्त असते, कारण त्या व्यक्ती आपल्या शेजारच्या किंवा संबंधितांच्या उपभोगाचा दर्जा मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, जरी देशातील निरपेक्ष उत्पन्नाचा (Absolute Income) आकार वाढला, तरी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निरपेक्ष उत्पन्न पातळीला सरासरी उपभोग प्रवृत्ती (APC) स्थिर राहते.”

येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे जरी श्रीमंतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न गरीब करीत असले, तरी दोघांच्या ‘उपभोग रचनेत’ टोकाचा फरक असतो. श्रीमंतांची सीमान्त उपभोग प्रवृत्ती (Marginal propensity to consume-MPC) जरी घटतांना दिसत असली, तरी त्याचवेळी त्यांची ‘सीमांत बचत प्रवृत्ती’ (Marginal propensity to save-MPS) वाढताना दिसते. याउलट, गरिबांची ‘सीमांत बचत प्रवृत्ती’ (MPS) वाढत नाही किंवा ती शून्यच असते. श्रीमंत व गरिबांतील MPC आणि MPS यांतील फरकांचा तौलनिक अभ्यास केल्यास, आपण याच निष्कर्षावर येतो, की जरी गरिबांकडून श्रीमंतांचे अनुकरण होत असले, तरी दोघांच्या ‘उपभोग रचनेत’ टोकाचा फरक असतो. या फरकाचे प्रमुख कारण ‘समाजातील उत्पन्नाचे विषम वितरण’ हे होय. या निष्कर्षालाच, श्री. ड्युसेनबेरींनी ‘प्रदर्शन परिणाम’ (Demonstration Effects) असे म्हटले आहे.

श्री. ड्युसेनबेरींच्या उपर्युक्त विवेचनावरून आपणास हे कळते की मध्यमवर्गीय लोक श्रीमंतांचे आणि गरीब लोक श्रीमंत व मध्यमवर्गीय या दोघांच्या ‘उपभोग रचनेचे’ अनुकरण करत असतात; पण त्यांच्या अनुकरणाचे मूळ कशात आहे? या प्रश्नाचे उत्तर श्री. ड्युसेनबेरी यांच्याजवळ नाही. अनुकरणाचे मूळ स्वरूप जाणल्याशिवाय ‘पैशावरील प्रेम’ या संज्ञेतील त्रुटी आपल्यासमोर येणार नाहीत.

अनुकरणाची प्रवृत्ती मानवी मनात खोलवर रूजलेली आहे. यासंदर्भात वाल्टर बॅगहॉट म्हणतो, “अनुकरणप्रवृत्ती ऐच्छिक किंवा जाणीवपूर्वक असते, असे आपण मुळीच समजता कामा नये. याउलट तिची बैठक मुख्यतः मानवी मनाच्या अत्यंत सूप्त भागात असते व या सूप्त मनातील भावनांची जाणीव प्रत्यक्ष कार्य होईपर्यंत प्रकट मनाला होत नाही. इतकेच नव्हे, तर आधी जाणीव होण्याच्या दृष्टीने या भावना इतक्या गूढ असतात की कार्य होत असतानासुद्धा त्या जाणवत नाहीत. आपल्या स्वभावातील अनुकरणप्रियतेचा मुख्य आधार म्हणजे आपल्या श्रद्धा होत. काही गोष्टींबद्दल आपल्या मनात अनुकूल पूर्वग्रह व काहींबद्दल प्रतिकूल पूर्वग्रह असतात. यांची कारणे आपल्या स्वभावाच्या गूढ भागात असतात. परंतु श्रद्धाजन्य अनुकरण वृत्तीबद्दल शंकाच असू शकत नाही.”

अनुकरणप्रवृत्तीचे मूळ आपल्या श्रद्धांमध्येच कसे असते, ही गोष्ट बॅगहॉटने अचूकपणे दाखवून दिली आहे; पण बॅगहॉट हा श्रद्धेला मनातील कुठलीतरी ‘गूढ’ अशी जागा देताना दिसतो. हे गूढ काय आहे? या गूढावरील आवरण बॅगहॉट काढत नाही. परंतु आपण पुन्हा एकदा हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करूया. ‘पुन्हा एकदा’ म्हणण्याचे कारण हे की असा प्रयत्न आपण प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात ‘सामाजिकसंस्था आणि मनोरचना’ यांतील संबंधाचा विचार करत असतांनासुद्धा केला होता. तेव्हा आपल्याला हे उत्तर मिळाले की, आपल्या श्रद्धांचा आधार समाजरचनेचे स्वरूप, सामाजिक नियम-कायदे आणि त्यांनुसार ठरणारे माणसामाणसातील संबंध हे असतात. आता, अनुकरणप्रवृत्ती संदर्भात या गोष्टीचा पुनर्विचार करूया.

गॅब्रेल ट्रेड या फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने ‘अनुकरण प्रवृत्ती’ हा विषय शास्त्रीय अभ्यासासाठी निवडला होता. ट्रेडने ‘अनुकरणाचे तीन नियम’ (Three laws of Imitation) प्रतिपादन केले आहेत. त्यांपैकी एक म्हणजे, “अनुकरणाचा प्रवाह श्रेष्ठ दर्जाच्या लोकांपासून कमी दर्जाच्या लोकांकडे वाहतो.” किंवा ट्रेडचेच शब्द उद्धृत करून सांगता येईल. ट्रेड म्हणतो, “संधी दिली तर अमीर उमराव लोक त्यांच्या नेत्यांचे, त्यांच्या राजांचे किंवा शासनकर्त्यांचे सर्वकाळी व सर्वस्थळी अनुकरण करीत असतात. त्याचप्रमाणे, सामान्य लोकही संधी मिळताच त्यांच्या अमीर उमरावांचे अनुकरण करीत असतात.”

ट्रेडचा दुसरा नियम असा की, “अनुकरणवृत्तीचा विस्तार किंवा घनता (Density) अंतराच्या प्रमाणात (In proportion of Distance) कमी-अधिक असते. तो म्हणतो, “अत्यंत जवळच्या संबंधितांच्या सर्वात चांगल्या वस्तूचे जास्तीत जास्त अनुकरण होत असते. वस्तुत: आदर्श व्यक्तीच्या आचरणाचा प्रभाव अंतराच्या व तिच्या श्रेष्ठत्वाच्या प्रमाणात प्रत्यक्षरित्या होत असतो. याचा अर्थ ‘सामाजिक संबंधांच्या’ अर्थाने घ्यावयाचा आहे. तथापि, जर त्या व्यक्तिशी अनेक प्रकारचे व रोजचे संबंध येत असतील व आपली अनुकरणवृत्ती तृप्त करण्याची सर्व प्रकारची संधी आपणास उपलब्ध असेल तर या दृष्टीने ती व्यक्ती प्रत्यक्ष परिचित नसली किंवा फार दूर अंतरावर असली तरी ती ‘जवळच’ आहे, असे म्हणावे लागते. सामाजिकदृष्ट्या उच्चत्व लाभलेल्या लोकांनी घालून दिलेल्या प्रथांचा व जीवनपद्धतींचा प्रसार क्रमशः कसा झाला याचे स्पष्टीकरण या कमीत कमी अंतराच्या अनुकरणाच्या नियमाने होते.”

ट्रेडच्या अनुकरण नियमात ‘अंतर’ या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या अंतरामुळे अनुकरणनियमच स्पष्ट होतो असे नसून, समाजरचनेनुसार लोकांचा पैशाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात असलेला ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ हा भेद स्पष्ट होतो. पण हा केवळ वर्गीय भेद नाही. कारण, हा भेद केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक व मानसशास्त्रीय सुद्धा असतो. बॅगहॉटला जे ‘गूढ’ वाटले त्यावरील आवरण आपण काढून टाकले आहे आणि त्यामुळे एकाचवेळी ह्या मानसशास्त्रीय विश्लेषणावरून श्री. रसेलांच्या नजरेतून निसटलेल्या एका महत्त्वाच्या बाबीवरही प्रकाश पडला आहे. परंतु आपल्याला आणखी एका प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यायचा आहे!

संपत्तीचे वितरण (Distribution of Wealth)
श्री. रसेलांचा दुसरा आक्षेप असा की, “अरिष्टांना चालना देणारे वर्चस्वप्रेरणांचे (Possessive impulses) साकाररूप म्हणजे मालमत्ता होय.” श्री.रसेलांचे हे विधान समर्थनीय आहे काय? डॉ. आंबेडकर लिहितात, “एखादा श्री. रसेलांच्या या मताशी सहमत होईलही, मात्र फ्रेडरिक नित्शेला मालमत्तेचे मानसिक परिणाम हे श्री. रसेलांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कळाले आहेत, असं वाटते.”

डॉ. आंबेडकरांच्या कथनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण थ्युसिडाईडसने सांगितलेली कथा विचारात घेऊया:

“आपल्या पिकाची कापणी करून झाल्यानंतर एक शेतकरी धान्याच्या राशीजवळ बाजार आणि त्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याविषयी अतिशय सखोल चिंतन करत बसतो. तेवढ्यात तेथे एक डाकू येतो. शेतकऱ्याचे स्वप्न भंग होते. हा अचानक जागा झालेला शेतकरी, प्रतिकाराचा साधा शब्दही न उच्चारता आपल्या धान्याची राशी चोरात वाटायला तयार होतो आणि संपूर्ण राशीपैकी केवळ अर्धाच भाग आपल्यापासून गेला व आपला जीवही वाचला, यासाठी ईश्र्वराचे आभार मानतो.”

ही गोष्ट मिथ्य असो वा तथ्य, मात्र त्यात ‘सत्याचं सार’ आहे. त्याकडे नेहमीच आपलं दुर्लक्ष होतं. काळाच्या घडणीत एकेकाळच्या जंगली मानवी स्वभावाला ‘लोभाने’ किती माणसाळले आहे, यांचे मापन करणे शक्य नाही. नित्शेला याची पूर्ण जाणीव होती, त्यामुळे त्याने आपल्या ‘पुरुषोत्तमाला’ (Superman) संपत्तीचा लोभ न बाळगण्याची शिकवण दिली. उलट, व्यापारी करारात एखादेवेळी तोटा जरी होण्याची शक्यता असली, तरी लाभ न मिळण्याच्या वा तोटा होण्याच्या ‘भितीवर’ त्याने विजय मिळविला पाहिजे, अशी शिकवण नित्शे आपल्या पुरुषोत्तमास देतो.

यावरून असे म्हणता येईल की: “खरी समस्या ही मालमत्तेची नाही, तर मालमत्तेच्या असमान वितरणाची आहे.” (The real problem is not of property, but unequal distribution of property.)

ज्यांची संपत्तीवर मालकी नाही असे ‘नाही रे’ वर्गातील लोक, ज्यांची संपत्तीवर मालकी आहे, अशा ‘आहे रे’ वर्गातील लोकांपेक्षा संपत्तीच्या प्राप्तीसाठी दुष्कृत्य आणि विध्वंस करण्याकडे अधिक कल असलेले असतात. आधुनिक काळातील ‘औद्योगिक कलह’ (Industrial Disputes) हे याच गोष्टीचे आणखी एक स्पष्टीकरण होय. त्यामुळे, संप पुकारला असता श्रमिक हे भांडवलदारांच्या तुलनेत अधिक हिंसेचा वापर करतात. ते असं का करतात, ही गोष्ट केवळ वरील टिकेद्वाराच लक्षात येऊ शकते. अशाप्रकारे, मालमत्तेची संस्था ही ‘आक्रमक वर्तनाला’ चालना देणारी ठरू शकते. त्यामुळे मालमत्तासंस्थेत जे दोष असतील, त्यांचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावेच लागतात. यावर उपाय म्हणून मालमत्तेत असलेल्या ‘भरपाईचे गुण’ (Compensation effects) यांकडे बघता येईल. मालमत्तेचे हे परिणाम मालमत्तासंस्थेच्या विधायक पुनर्रचनेचे दिशादर्शन करतात. श्री. रसेलांनी मालमत्तेच्या या विध्वंसक रूपाकडे याप्रकारे दुर्लक्ष केले आहे; परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मालमत्तासंस्था हा एक आर्थिक घटक आहे आणि मोठी अरिष्टे घडवून आणण्यात केवळ आर्थिक घटकच कारणीभूत असतात असे नाही. सामाजिक पुनर्रचना करताना हेही लक्षात घेतले पाहिजे की, आर्थिक गरजाच सर्व काही असतात, ही राजकारणातील एक चुकीची समजूत आहे. खरंतर, मानवाला केवळ भौतिक सुधारणा आनंदी बनवू शकणार नाहीत, त्यासाठी त्याला अधिकाधिक स्वातंत्र्याची, योग्य मार्गदर्शनाची, सृजनशीलतेची, जीवनानंदाच्या संधीची, सामूहिक व सहभागी जीवनाची गरज आहे. आपले विस्तारणारे मनोविश्व आणि त्याचाच परिणाम म्हणून आपले वाढलेले ज्ञान, तसेच भौतिक जगावरील आपल्या अधिपत्याचा चांगला परिणाम घडवून आणण्यासाठी मानसिक आनंदाची सोय होईल, अशा रितीने ‘समाजाची पुनर्रचना’ करण्याची नितांत गरज आहे.

जैविक प्रेरणा आणि अर्थशास्त्र
जैविक प्रेरणा आणि अर्थशास्त्र यांत काही संबंध आहे काय? बऱ्याच जणांना हा एक विचित्र प्रश्न वाटेल आणि त्याचे उत्तर निःसंशयपणे ‘नकारार्थी’ आहे,असे अर्थशास्त्रातील अभियांत्रिकी दृष्टीकोनाचा प्रभाव असलेल्यांचे उत्तर असेल; परंतु मला तसे वाटत नाही. उलट, जैविक प्रेरणांच्या दृष्टीने अर्थशास्त्राचे अध्ययन केल्यास ते हितकर होईल, असे मी समजतो; परंतु श्री. रसेल जैविक प्रेरणांकडे जसे बघतात तसाच माझाही दृष्टिकोण आहे, असे मी म्हणत नाही. त्यामुळे या समीक्षेच्या शेवटी, श्री. रसेलांचा प्रस्तुत ग्रंथ ज्या पायाभूत विचारांवर उभा आहे, त्याची एकदा तपासणी केली पाहिजे. श्री. रसेल लिहितात, “माणसाच्या सर्व कृतींची दोन उगमस्थाने आहेत – जैविक प्रेरणा आणि इच्छा. मानवातील जैविक प्रेरणांची विभागणी सृजनशील प्रेरणा आणि वर्चस्वप्रेरणा यांत करता येईल. आपल्या काही कृती, ज्या इतरवेळी अस्तित्वात नसत्या, अशा गोष्टींच्या निर्मितीसाठी घडतात आणि इतर कृती, जे आधीपासूनच अस्तित्वात आहे, त्यावर स्वत:ची खाजगी मालकी प्रस्थापित करण्यासाठी घडत असतात. पहिल्या प्रकारची कृती ही सृजनशील प्रेरणेमुळे, तर नंतरची वर्चस्वप्रेरणेमुळे घडत असते. चांगले जीवन ते होय, ज्यामध्ये सृजनशील प्रेरणेचा मोठा सहभाग असतो आणि वर्चस्वप्रेरणेचा अतिशय कमी सहभाग असतो.”

डॉ. आंबेडकरांनी यासंदर्भात दोन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ते असे: “जैविक प्रेरणांचे अश्याप्रकारे विभाजन करणे शक्य आहे काय? मूलतः जैविक प्रेरणा अशी काही गोष्ट असते का?”

डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांची उत्तरे देणे वा त्यावर चर्चा करणे हे सदर ग्रंथपरीक्षणाच्या व्याप्तीकक्षेबाहेरचे काम आहे. तरीही हे मौलिक प्रश्न आहेत, याकडे दुर्लक्ष करता यावयाचे नाही. कारण, जैविक प्रेरणेचे – सृजनशील प्रेरणा आणि वर्चस्वप्रेरणा असे विभाजन केल्यामुळे श्री. रसेल अडचणीत सापडू शकतात. प्रत्येकच जैविक प्रेरणा, जर तिला कुठलाही प्रतिबंध नसेल, तर ती सृजनशील कृतीलाच चालना देईल. त्या कृतीद्वारे उत्पादित पदार्थ योग्य असेल की नसेल हा संपूर्णपणे जैविक प्रेरणांच्या व सहजवृत्तींच्या कृतीपेक्षा वेगळा असा मुद्दा आहे. उत्पादित पदार्थाचे योग्य-अयोग्यत्व हे तर पूर्णपणे त्या वस्तूच्या ‘उत्पादन पद्धतीवर’ (Method of production) अवलंबून असेल, मग ते व्यक्तिद्वारे होवो अथवा समाजाद्वारे. ते तर उत्पादित वस्तूंच्या ‘उपभोगाच्या स्वरूपावर’ (Nature of Use) अवलंबून असेल, मग ते व्यक्तिद्वारे होवो अथवा समाजाद्वारे! ज्या वस्तूंचे उत्पादन सामूहिक प्रयत्नांतून केले जाते, त्या वस्तूच्या उपभोगावर कोणी ‘एक व्यक्ती’ (Individual) आपले वर्चस्व गाजवू शकत नाही. पहिल्या स्थितीसंदर्भात, आदिवासींच्या सामूहिक शिकारीचे उदाहरण घेता येईल. सर्वांनी मिळून केलेल्या शिकारीवर कुणी ‘एक व्यक्ती’ अधिकार गाजवू शकत नाही. या अलिखित उत्पादन-उपभोग नियमामुळे आदिवासी टोळ्यांत ‘सामूहिक ऐक्य’ टिकून राहिले. दुसऱ्या स्थितीसंदर्भात कुटुंबाचे उदाहरण देणे उत्तम ठरेल. निर्भय होऊन म्हणता येईल की, टेबलावर खाण्यासाठी वाढलेली गोष्ट असो वा घराच्या साजसजावटीच्या वस्तू असो, त्यांवर घरातील कोणताही एक सदस्य ‘खाजगी’ उपभोगासाठी हक्क सांगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणांवर वा स्मारकावर कुणा एका व्यक्तीची ‘मक्तेदारी’ असते काय? घरांतील वस्तू घरातल्या सर्वांच्या असतात, त्यांचा उपभोग घेतांना त्यावर एकाचेच वर्चस्व असू शकत नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. परंतु घरातील व्यक्तिंनी वापरावयाच्या ‘कपड्यांविषयी’ असेच म्हणता येईल का? तर नाही! नि:संशयपणे त्यावर एका व्यक्तीचीच ‘मक्तेदारी’ असते. कारण, ते कपडे एका ‘व्यक्तीचे'(individual) असतात. व्यक्ती आणि समाज यांतील हक्कांचे आणि कर्तव्यांचे न्यायोचित विभाजन या सूक्ष्म फरकाकडे डोळेझाक करून करताच येणार नाही आणि तसे झाल्यास समाजात अपरिहार्यपणे ‘हक्कांचा आणि कर्तव्यांचा पेच’ उद्भवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, हा केवळ वस्तूच्या उत्पादनाचा व उपभोगाचा प्रश्न आहे, ज्याद्वारे उत्पादन-उपभोग प्रक्रिया अर्थात विनिमय होतो, त्या जैविक प्रेरणांचा नाही. त्यामुळे, सृजनशील प्रेरणा आणि वर्चस्वप्रेरणा यांचा स्तर हा भिन्न भिन्न आहे. एकात वाढ केल्याने दुसऱ्यात घट होईलच अशी खात्री देता येत नाही. अर्थात, विधायक सृजनशील प्रेरणांना संधी दिल्याने, विघातक वर्चस्वप्रेरणांचे निर्मूलन होईलच, अशी शाश्वती देता येत नाही. त्यासाठी दोन्ही पातळ्यांवर स्वतंत्र प्रयत्नांचीच गरज असते. आनंदी असलेला माणूस हा जसा ‘दु:खी माणूस’ नसतो, असे आपण समजतो, तसे येथे समजून चालणार नाही. कारण, या जैविक प्रेरणांत कार्यकारणाचा फलनात्मक व रेषीय संबंध (Functional and linear relationship of causation) दिसून येत नाही. श्री. रसेल जैविक प्रेरणांमध्ये फलनात्मक व रेषीय संबंध कल्पून या ग्रंथाचा पाया रचतात; पण तो पूर्णपणे भक्कम नाही, हे आपल्याला कळाले आहे. कारण, कार्यकारणभावात सहसंबंध अभिप्रेत असला, तरी सहसंबंध म्हणजे कार्यकारणभाव नव्हे.

त्यामुळे, श्री. रसेलांनी जैविक प्रेरणांविषयी जे विवेचन केले आहे, त्यात बऱ्याच अडचणी आहेत. तरीही, जैविक प्रेरणांचा संस्थेशी असलेला संबंध हा नि:संशयपणे सत्य आहे. त्यामुळे तो संबंध कसा आहे, हे दाखवून देण्याची नितांत गरज आहे, तेव्हाच ‘जैविक प्रेरणा आणि अर्थशास्त्र’ यांतील संबंध यथार्थपणे मांडता येईल. यासाठी अर्थशास्त्रात नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची गरज आहे.

इथे आपण श्री. रसेलांच्या ग्रंथाचे परीक्षण थांबवत आहोत. प्रस्तुत ग्रंथात त्या ‘मूलतत्त्वां’चा समावेश आहे, ज्यांच्या आधारे समाजाच्या भावी पुनर्रचनेची पायाभरणी करता येईल. सामाजिक जीवनाच्या मानसिक पायावर भर देण्याचे संपूर्ण श्रेय श्री. रसेलांना दिले पाहिजे. सामाजिक पुनर्रचना ही माणसामाणसातील संबंध कसे आहेत, ह्या गोष्टीच्या योग्य आकलनावर अवलंबून असते; परंतु ही समस्या अजूनही बऱ्याच समाजशास्त्रज्ञांच्या लक्षात आलेली नाही. श्री. रसेल जैविक प्रेरणांचा संस्थांशी संबंध जोडतात आणि या संबंधांची सत्यता निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे ह्या ग्रंथाचे मुळातूनच वाचन केले पाहिजे. हा ग्रंथ केवळ तज्ज्ञांच्याच उपयोगाचा नाही, तर समाजसुधारकांना, धोरणकर्त्यांना व सर्वसामान्य माणसालासुद्धा दीपस्तंभाप्रमाणे योग्य मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य यात आहे. यामध्ये मालमत्तेबरोबरच राज्य, विवाह, धर्म व शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक संस्थांच्या व्यक्तीवरील मानसिक परिणामांची अन्वेषणा श्री. रसेलांना केली आहे. श्री. रसेलकृत ही अन्वेषणा प्रचलित कोविड-१९ अरिष्टानंतरच्या सामाजिक पुनर्रचनेकरीता सहायक ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हे विवेचन करताना, श्री. रसेल आणि त्यांचे वाचक, या दोघांप्रती असलेले आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, अशी माझी समजूत आहे. ती कितपत योग्य आहे, हे विवेकशील वाचकांनी ठरवायचे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.