श्री. बर्ट्रांड रसेल लिखित ‘The Principles Of Social Reconstruction’ ह्या अल्पाक्षररमणीय ग्रंथाचे प्रचलित अरिष्टामुळे मिळालेल्या फावल्या वेळात वाचन करण्याची संधी मिळाली. कोविड-१९ अरिष्टामुळे संपूर्ण जग अगदी ढवळून निघाले आहे…निघत आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा जागतिक समाजावर (Global society), राष्ट्रांवर, समाजव्यवस्थेवर तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर अल्पकालीन (Short-run) तसेच दीर्घकालीन (Long-run) होणाऱ्या प्रभावाचे स्वरूप कसे असेल आणि त्या प्रभावाची दिशा काय असेल, एकूणच, एकविसाव्या शतकातील आधुनिक मानवाचे भवितव्य काय आणि कसे असेल? यासंदर्भात जगात सर्वच स्तरांतून चर्चेला आणि आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे.
श्री. रसेल ह्यांनी ‘प्रिंसिपल्स’चे लिखाण पहिल्या जागतिक महायुद्धाच्या (१९१४-१९१८) पार्श्वभूमीवर केले होते. “वेळोवेळी अरिष्टांची निर्मिती का होते?” या प्रश्नाची व त्याच्या तत्त्वज्ञानात्मक व मानसशास्त्रीय मुळाची (Philosophical and psychological root) छाननी श्री. रसेल ह्यांनी आपल्या ग्रंथात केली आहे. अर्थातच, ह्या सामाजिक तत्त्वज्ञानावर त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथात संस्थात्मक अरिष्टांची कारणमीमांसा करण्याबरोबरच, अरिष्टांचे निरसन आणि त्याकरिता समाजाची निकोप रचना करण्यासाठी कोणती तत्त्वे आणि मूल्ये स्वीकारली पाहिजेत, यांचे मूलगामी विवेचन व मूलग्राही उकल आढळते.
या ग्रंथात एकूण ८ प्रकरणे आहेत, ती पुढीलप्रमाणे:
१) वृद्धीची मूलतत्त्वे (Principles of growth), २) राज्य, ३) युद्ध-एक संस्था (war as an institution), ४) मालमत्ता, ५) शिक्षण, ६) विवाह आणि लोकसंख्येचा प्रश्न, ७) धर्म आणि चर्च, ८) आपले कर्तव्य काय?
ग्रंथसार
‘सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे’ (The Principles Of Social Reconstruction) हा आदरणीय श्री. बर्ट्रांड रसेल ह्यांनी लिहिलेला युद्धविषयक ग्रंथ आहे. टीकात्मक साहित्य हे एक तर प्रचारकी थाटाचे किंवा प्रतिबंधात्मक स्वरूपाचे असते. श्री. रसेल लिखित ग्रंथ हा दुसऱ्या प्रकारात मोडतो. तरीही, त्याच प्रकारच्या इतर ग्रंथापासून तो वेगळा बघितला पाहिजे. काही देशांवर त्यांना जिंकणाऱ्या ‘निरंकुश शासकांनी’ अन्याय करून त्यांना पारतंत्र्यात ठेवणे, हे योग्य नाही आणि स्वाभाविकही नाही, असा युक्तिवाद काही युद्धविरोधी ग्रंथातून केला गेला. तर श्री. एंजल्स यांनी लिहिलेल्या ‘The great illusion’ सारख्या ग्रंथात गणिती विश्लेषण मांडून जेता युद्धापासून जेवढं मिळवितो, त्यापेक्षा तो अधिक गमावत असतो, असे तर्कयुक्त युक्तिवाद करून युद्ध टाळण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु श्री. रसेल ह्यांचे ह्या समस्येवरील निदान खूपच भिन्न आहे आणि ते त्यांच्या मानवी स्वभावविषयक तत्त्वज्ञानाशी निगडित आहे. श्री. रसेल यांचे निदान काय आहे? ते म्हणतात:
“केवळ विवेकाने युद्ध टळणार नाही, तर ज्या प्रेरणा युद्धासाठी प्रवृत्त करतात, त्यांच्याशी पूर्णतः विरोधी अशा उस्फूर्त जैविक प्रेरणांद्वारे व उत्कट भावनांनी बनलेल्या सकारात्मक जीवनांद्वारेच युद्धे टाळता येतील. खरी गरज ही जैविक प्रेरणांनी युक्त जीवनांमध्ये बदल घडवून आणण्याची आहे. केवळ विचारप्रधान जीवनांनी आमूलाग्र बदल होणे शक्य नाही.”
श्री. रसेल यांचे हे निदान इतके भिन्न असल्यामुळे, त्यांचे ‘सामाजिक-आर्थिक तत्त्वज्ञान’ सुद्धा खूप भिन्न आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, ते म्हणतात:
“युद्धापासून शिकावयाची महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मानवी कृतींमागची प्रेरकशक्ती (spring of human action) काय असते व नजीकच्या काळात ती काय रूप घेईल, याविषयी एक निश्चित दृष्टिकोण तयार करणे, ही होय. हा दृष्टिकोण जर सत्य असेल, तर तो राजकीय तत्त्वज्ञानाचा आधार ठरू शकेल. पारंपरिक उदारमतवादाच्या तत्त्वज्ञानाची अरिष्टांच्या काळात जी भूमिका होती, त्यापेक्षा हा दृष्टिकोण भक्कम पायावर धीटपणे उभा राहू शकेल.”
श्री. रसेल यांचे युद्धाच्या तत्त्वज्ञानाविषयीचे विचार समाजात निर्माण होणाऱ्या इतर प्रकारच्या अरिष्टांना लावता येतील, असेच आहेत. हे करत असतानाच त्यांची मानवी वर्तन आणि सामाजिक संस्था याविषयीची नेमकी भूमिका काय आहे, हे बघणे रास्त ठरेल. तसेही, प्रस्तुत ग्रंथ हा ‘सामाजिक पुनर्रचने’विषयी असल्यामुळे, सामाजिक पुनर्रचनेचा श्री. रसेल यांना अभिप्रेत असलेला अर्थही समजून घ्यावा लागेल; परंतु ‘सामाजिक पुनर्रचना’ समजून घेणेही तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपण ‘सामाजिक रचना’ म्हणजे काय, ते समजावून घेऊ. या संदर्भातच श्री. रसेल यांनी सामाजिक रचना, सामाजिक संस्था आणि व्यक्तींची मनोरचना यांचा संबंध कशाप्रकारे स्पष्ट केला आहे, ते बघूया.
सामाजिक संस्था आणि मनोरचना
श्री. रसेलवर लिहितांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, “जैविक प्रेरणेचा संस्थेशी असणारा संबंध नि:संशय सत्य आहे.” या विधानाचा अर्थ काय? प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणात रसेल म्हणतात, “माणसाच्या सर्व कृतींची दोन उगमस्थाने आहेत : जैविक प्रेरणा आणि इच्छा.” यापैकी जैविक प्रेरणेला ते अधिक प्राधान्य देतात. जैविक प्रेरणेने घडणारी माणसाची कृती ही इंद्रियजन्य स्वरूपाची असते. उदा., भूक लागली असता खाणे, तहान लागली असता पाणी पिणे. या कृती मूलत: संस्थांशी निगडित नसतात. मग जैविक प्रेरणेचा संस्थेशी संबंध कोणत्या प्रकारचा असतो? तर भूक लागली असतानाही काय खावे, किती खावे, कोणत्या वेळी खावे, कसे खावे, कोणासंगे खावे अशा तऱ्हेने जेव्हा वर्तणूक घडते, तेव्हा ती कृती संस्थेशी निगडीत असते. भूक लागली असतानाही माणूस अशा नियमांनी वर्तन करतो, तेव्हा ते वर्तन जीवशास्त्रीय प्रेरणेने होत नसते, तर सामाजिक संस्थेमुळे होत असते.
माणसाची कृती व वर्तणूक अशा सामाजिक संस्थांमार्फत नियंत्रित होत असते. एका व्यक्तीची कृती व वर्तन हे दुसऱ्या व्यक्तिच्या संदर्भातच घडत असते. दोन व्यक्तींची कृती व वर्तणूक यावरून त्यातील परस्परसंबंध ठरतात आणि परस्परसंबंधावरूनच त्यांतील हक्कांचे व कर्तव्यांचे स्वरूप ठरत असते. माणसाची कृती व वर्तन हे संस्थेमार्फत नियत होत असल्याने त्यांचे परस्परसंबंध हे संस्थाबद्ध असतात. असे संस्थाबद्ध झालेले माणसांचे परस्परसंबंध म्हणजे ‘समाजरचना’ होय. अर्थात, ते माणसामाणसातील संबंध असून, इथे माणूस व्यक्ती (individual) म्हणून नसतो, तर तो कोणत्या तरी गटाचा सभासद (member of group) म्हणून असतो.
जैविक प्रेरणा मूलतः जीवशास्त्रीय कृती व वर्तणूक घडवीत असतात. या कृतींना एक सामाजिक पार्श्वभूमी असते. डॉ. आंबेडकर म्हणतात, “इंद्रियजन्य भुका शमविण्याकडे जैविक प्रेरणेचा कल असतो. अशा भुका शमविण्यासाठीच कृती घडत असतात; पण अशा भुका शमविल्या जाऊ शकत नसतील तर तो दोष इंद्रियांचा नसतो, तर समाजाचा असतो.”
नैतिक तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्राचे तथाकथित जनक ॲडम स्मिथ म्हणतात की, “उत्पादनप्रक्रियेचा अंतिम उद्देश हा उपभोग असतो.” स्मिथच्या विचारांतही उपर्निर्दिष्ट तथ्य व्यक्त झाले आहे; पण उपभोगासारख्या जैविक प्रेरणेवर सामाजिक नियमांच्या असलेल्या प्रभावाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मानवी वर्तनाला प्रभावित करणारा घटक म्हणून, सामाजिक नियमांऐवजी ‘अदृश्य हात’ (invisible hand) ही कल्पना त्यांनी मांडली. सत्य तर हेच आहे, की हा ‘अदृश्य हात’ दुसऱ्या कुणाचा नसून, समाजाचाच असतो आणि अदृश्य ‘सामाजिक नियमांद्वारे’ समाजातील माणसांच्या वर्तनाचे नियमन करीत असतो.
अशाप्रकारे, इंद्रियजन्य कृतींवर समाजरचनेचा प्रभाव (influence) असतो. निखळ इंद्रियजन्य कृतीला वा जैविक प्रेरणेला उद्देश नसतो. काही असेल तर तो इंद्रियजन्य भुका शमविणे एवढाच असतो. रसेल म्हणतात, “अशा जैविक प्रेरणा आंधळ्या असतात; परंतु जैविक प्रेरणेचा संस्थेशी संबंध येतो तेव्हा त्यांना सामाजिक उद्देश वा हेतू प्राप्त होतो. निसर्गावस्थेतील मानवाच्या जैविक प्रेरणेवर कुठलीही सामाजिक बंधने नव्हती; परंतु माणूस उत्तरोत्तर जसजसा ‘सामाजिक प्राणी’ बनत गेला, त्याच्या जैविक प्रेरणेवर बंधने लादली गेली आणि अशाप्रकारे बंदिस्त समाजरचनेच्या निर्मितीला प्रारंभ झाला. म्हणजेच, जैविक प्रेरणेला सामाजिक हेतू देऊन माणसाची वर्तणूक व कृती सामाजिक नियमांच्या अधीन झाली.
जैविक प्रेरणेवर बंधने घालून तिला सामाजिक हेतू प्राप्त करून दिल्यानंतर, हा हेतू साध्य करण्यासाठी व्यक्तीची वर्तणूक समाजनियमांच्या अनुषंगाने घडावी अशी अपेक्षा केली जाणे अपरिहार्य व म्हणूनच स्वाभाविक ठरते; परंतु जेव्हा तशी ‘सक्ती’ केली जाते, तेव्हा ती ‘सामाजिक कायद्यां’च्या स्वरूपात व्यक्त होते. सामाजिक व राजकीय कायदे याच अर्थाने व्यक्तींची वर्तणूक समाजाने निश्चित केलेल्या मार्गाने घडावी म्हणून केलेली ‘सक्ती’ असतात. एकदा का सामाजिक नियमानुसार वर्तनाची प्रथा, परंपरा दृढ झाली की त्यांतून श्रद्धा तयार होते. सामाजिक नियमांनुसार वर्तनाचे सातत्य हे मानसिक भूमिका तयार करते. सामाजिक संकेत, प्रतीके, निर्बंध, सामाजिक हक्क व कर्तव्य हे सर्व मानसिक भूमिकेची जडणघडण करतात. म्हणजेच, सामाजिक नियमानुसार माणसाची कृती ही श्रद्धायुक्त कृती बनते. आपण अशी कृती का करतो; यामागील कारण यामुळेच माणसाला देता येत नाही. तो एवढेच म्हणतो की, तशी कृती परंपरेने चालत आलेली आहे. म्हणजे परंपरेने चालत आलेली, सामाजिक वर्तनाने बनलेली त्याची मानसिक भूमिका त्याला तशी कृती करण्यास प्रवृत्त करीत असते वा त्याला तशी प्रेरणा देत असते. डॉ. आंबेडकरांनी यालाच ‘सामाजिक वर्तन’ म्हटले आहे.
अशाप्रकारे, सामाजिक वर्तनाची व सामाजिक वर्तन ज्यापासून घडते त्या सामाजिक नियमांची संघटना म्हणजे संस्था होय. सामाजिक नियमांना एक हेतू असतो. तो केंद्रीभूत ठेवून, सामाजिक नियमांचे म्हणूनच सामाजिक संस्थांचे तदनुषंगाने विशिष्ट स्वरूप आकारास येते, हीच ‘सामाजिक रचना’ होय. ज्या प्रश्नांच्या शोधात आपण आहोत, त्यापैकी १) संस्था म्हणजे काय? २) ‘सामाजिक रचना’ म्हणजे काय? या दोन प्रश्नांची उत्तरे आपणास मिळाली आहेत. आता, ‘सामाजिक पुनर्रचना’ म्हणजे काय? आणि ‘सामाजिक पुनर्रचनेची आवश्यकता’ काय? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपणास घ्यायचा आहे. त्याकरिता, श्री. रसेलांची या प्रश्नांबाबत असलेली भूमिका कोणती? हे जाणून घ्यावे लागेल.
श्री. रसेल आणि समाजाची पुनर्रचना
श्री. रसेलांची भूमिका ही वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांप्रमाणे (Behavioural psychologist) आहे. मानवी कृतीमागची प्रेरक शक्ती काय आहे? या प्रश्नाचे वर्तनवाद्यांनी दिलेले उत्तर अगदीच भिन्न आहे; परंतु वर्तनवाद्यांनी या प्रश्नाचे दिलेले उत्तर बघण्याअगोदर, त्यांच्या अगोदरच्या मानसशास्त्रज्ञांनी याकडे कसे बघितले हे पाहणे थोडे मजेदार आहे:
- नियतीवाद्यांची भूमिका : “मानव हा परिस्थितीचे अपत्य आहे.”
- स्वेच्छातंत्रवाद्यांची भूमिका : “मानव हा परिस्थितीचा निर्माता आहे.”
नियतीवादी आणि स्वेच्छातंत्रवादी यांच्या उपर्युक्त विधानांत सत्याचा अंश असला तरी ती पूर्णतः सत्य नाहीत; त्यामुळे या दोन्ही टोकाच्या दृष्टिकोणांना वर्तनवाद्यांनी त्याज्य ठरविले आहे. आता, आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया. “मानवी कृतीसाठी बाह्य परिस्थिती कारणीभूत असते”, ह्या सिद्धांताला वर्तनवाद्यांनी नाकारले आहे. “जर बाह्य परिस्थिती मानवी कृती निर्धारित करीत असेल तर, त्यासाठी माणूस जन्मतःच मृत (Still-borned) जन्मतो, असे गृहीत धरावे लागेल, जे की एक जीवशास्त्रीय सत्य नाही.”, अशी वर्तनवाद्यांची भूमिका आहे. “मानवात कृतीच्या प्रेरकशक्ती असतात, माणूस हा कृती करण्याच्या निश्चित प्रेरणेसह जन्मास येत असतो. बाह्य परिस्थिती कृतींना प्रेरक नसते, ती फक्त पुनर्निर्देशनाचे (Redirection) कार्य करते. कृती करण्याच्या मानवातील ह्या अंत:स्फूर्त प्रेरणा जेव्हा कृतीप्रवण होतात, तेव्हा व्यवहारात प्रत्यक्ष मूर्तरूपात येतांना सामाजिक पर्यावरणात मूळ स्वभावापासून वक्रीभूत होतात. अर्थात, सामाजिक पर्यावरणानुरूप त्या स्वत:त अनुकूलन (Adaption) करून घेतात. ह्या उत्स्फूर्त कृतीप्रेरणा ज्या सामाजिक पर्यावरणात आकारास येतात, त्या सामाजिक परिस्थितीला प्रचंड महत्त्व आहे. हीच सामाजिक परिस्थिती – व्यापक अर्थाने – मानवावर शिक्षणाचे प्राथमिक संस्कार करते. श्री.जॉन ड्युईंनी म्हटलेच आहे, “माणूस विचार करतो ही जीवशास्त्रसिद्ध बाब आहे; पण तो जो काही विचार करतो, ही समाजशास्त्रसिद्ध बाब आहे.” त्यामुळे ह्या प्रक्रियेलाच ‘माणसाचे सामाजिकीकरण’ (Socialization of man) म्हणता येईल; परंतु सामाजिक पर्यावरणातील सर्वच परिवर्तने सारखीच मूल्यवान नसतात आणि मानवी विकृतीची निर्मितीही बऱ्याचदा त्यांतूनच होत असते. समाजसुधारकाचे हे कर्तव्य आहे की अशी सामाजिक परिस्थिती व सामाजिक संस्था (राज्य, अर्थव्यस्था, समाजव्यवस्था, धर्म व कुटुंबसंस्था, जाती व वर्गव्यवस्था इ.) ज्या ‘सामाजिकदृष्ट्या अनिष्ट’ (Socially Evil) प्रवृत्तींना आकार देतात, अशा संस्थांचे निर्मुलन करणे आणि ज्यामुळे ‘सामाजिकदृष्ट्या इष्ट’ (Socially Good) कृतीप्रेरणांना चालना मिळेल, अशा सामाजिक पर्यावरणाचा व संस्थांचा पर्याय समाजापुढे ठेवणे. सारांश, मानवातील उत्स्फूर्त जैविक प्रेरणांमध्ये अनुकूलन करून घेण्याची प्रचंड क्षमता आहे व या गोष्टीला प्रचंड ‘सामाजिक मूल्य’ (Social Value) आहे आणि म्हणूनच समाजसुधारणा शक्य आहे.
श्री. रसेलांचीही अशीच भूमिका आहे:
“मानवी जैविक प्रेरणा ह्या जन्मजात पूर्वनिश्चित अशा नसतात. विशिष्ट मर्यादांमध्ये, उत्स्फूर्त जैविक प्रेरणांवर मानवाच्या सभोवतालची परिस्थिती आणि त्याचा जीवन जगण्याचा मार्ग ह्यांचा अतिशय गंभीर परिणाम होत असतो. उत्स्फूर्त जैविक प्रेरणांतील बदलाच्या दिशेचा व स्वरूपाचा (Direction and nature of change) अभ्यास झाला पाहिजे आणि मानवाच्या उत्स्फूर्त जैविक प्रेरणांचा संबंध राजकीय, सामाजिक व आर्थिक इ. संस्थांद्वारे केल्या जाणाऱ्या चांगल्या अथवा वाईट निर्णयाशी जोडला पाहिजे.”
प्रस्तुत ग्रंथात श्री. रसेल यांनी एकूण ६ वैविध्यपूर्ण प्रकरणांमधून राज्यसंस्था, युद्ध, संपत्ती, शिक्षण, विवाह आणि धर्म ह्या संस्थांद्वारे मानवी स्वभावात व उत्स्फूर्त जैविक प्रेरणांमध्ये झालेल्या परिवर्तनाचा आढावा घेतला आहे. श्री. रसेल केवळ बहुश्रुतच नाहीत, तर विविध विषयांतील तज्ज्ञ शोभावे, असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे ह्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या प्रकरणांतून ग्रंथाचा सारांश काढणे हे एक अवघडच काम आहे. त्यामुळे, येथे श्री. रसेलांच्या ‘संपूर्ण सामाजिक तत्त्वज्ञाना’चे सार देण्यात आले आहे, असे विधान मला करता येणार नाही. यामुळे, वाचकांना अशी सूचना करावीशी वाटते की त्यांनी मुळातून श्री. रसेलांच्या ह्या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा.
श्री. रसेल आणि वृद्धीची मूलतत्त्वे
आता, प्रस्तुत ग्रंथात श्री. रसेल यांनी त्यांचे युद्धाचे तत्त्वज्ञान आणि त्याच्या वृद्धीशी असलेल्या संबंधाचा कशाप्रकारे उलगडा केला आहे, हे बघूया. आतापर्यंत आपण बघितले की, श्री. रसेल मानवातील उत्स्फूर्त जैविक प्रेरणांचा संबंध सामाजिक-आर्थिक संस्थांशी जोडून, त्या संस्थांद्वारे जैविक प्रेरणांच्या पुनर्निर्देशनाचे कार्य कसे पार पडते यांचे विश्लेषण करतात. त्याहीपुढे जाऊन श्री. रसेल जैविक प्रेरणांच्या स्वरूप-प्रकारांविषयी चर्चा करताना म्हणतात:
“जाणीवपूर्वक उद्देश वा इच्छाशक्ती यांद्वारे मानवी जीवनाला वळण लावण्यापेक्षा उत्स्फूर्त जैविक प्रेरणांमध्ये परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. बहुतांश जैविक प्रेरणांचे दोन भागांमध्ये विभाजन करता येईल:
१) वर्चस्वप्रेरणा (Possessive impulses)
२) सर्जनशील प्रेरणा (Creative impulses)
वर्चस्वप्रेरणा ह्या ज्यांचे विभाजन करावे लागणार नाही, अशा गोष्टींवर मालकी प्रस्थापित करण्याशी संबंधित आहेत; तर सर्जनशील प्रेरणा ज्यावर कुणाचीही ‘खाजगी मालकी’ (Private Property) नाही अशा ज्ञान, कला, सदिच्छा यांसारख्या मौल्यवान गोष्टींच्या निर्मितीशी संबंधित असतात. मला वाटते की, चांगले जीवन ते होय की जे सर्जनशील प्रेरणांवर उभे असते आणि वर्चस्वाच्या प्रेमाने (Love of possession) प्रेरित जीवन हे अतिशय वाईट जीवन होय.”
श्री. रसेलांनी राज्य, युद्ध आणि संपत्ती (property) ह्या संस्था वर्चस्वप्रेरणेची मूर्तरूपे मानली आहेत, तर शिक्षण, विवाह आणि धर्म ह्या सामाजिक संस्था अधिकाधिक सर्जनशील प्रेरणांवर अधिष्ठित असाव्यात, अशी आशा ते करतात. एकूणच, “सर्जनशील प्रेरणांची मुक्ती हेच राजकारणात आणि अर्थशास्त्रात सुधारणांचे मूलतत्त्व असायला हवे.” (Liberation of creativity ought to be the principle of reform both in Politics and in Economics.) अशी श्री. रसेलांची भूमिका आहे.
मानवातील मुळच्या उपजत जैविक प्रेरणांना योग्य दिशा व वळण देणे आवश्यक आहे. सर्वच मोठ्या अरिष्टांची निर्मिती ही सामान्य मानवी स्वभावातून होत असते. त्यामुळे मानवातील उत्स्फूर्त जैविक प्रेरणा आणि सामाजिक पुनर्रचना यांचा जवळचा संबंध आहे. मानवात उपजतच जैविक प्रेरणा असल्याने, मानव सक्रिय असणे साहजिकच आहे; पण त्याच्या सक्रियतेची वा कृतीप्रवणतेची दिशा योग्य की अयोग्य यांचाही विचार व्हायला पाहिजे. आपल्या सामाजिक संस्थांतील विविध कार्ये करणारी माणसे, ते करत असलेली कामे, स्वयंस्फूर्तीने करतात की नाईलाजाने त्यांना ती करावी लागतात की त्यांच्यावर ती लादली जातात, यावर संस्थांचे विधायक अथवा विघातक स्वरूप ठरत असते. यामुळे, उत्स्फूर्त जैविक प्रेरणांना योग्य दिशेने चालना मिळेल अशा कृतीतूनच खरी वृद्धी शक्य आहे. आता, युद्ध हा सुद्धा वृद्धीला चालना देणारा एक घटक आहे; परंतु मोठ्या प्रमाणात नरसंहार होत असल्याने युद्ध निरर्थक ठरते. पण, ज्या राष्ट्रांतील सर्वच प्रेरणा नष्ट झालेल्या आहेत, ते राष्ट्रही एका अर्थी मृतच झाले आहे. कृतीप्रवणतेचा अभाव हे मृत्यूचे दुसरे नाव आहे आणि मृत्यूतून नवीन काही निर्माण होणं कसं काय शक्य आहे?
माणसांत निसर्गतः वृद्धीची प्रेरणा असते, अगदी रोपट्यांप्रमाणे! सामाजिक संस्थांनी माणसावर लादलेली बंधने कमी केली आणि स्वैराचारावर योग्य तो अंकुश ठेवण्यात आला, तर माणसाचा नैसर्गिक व सामुहिक ऐक्याच्या दृष्टीने विकास होईल. माणसाच्या नैसर्गिक वृद्धीसाठी (natural growth): (१) वैचारिक प्रगती आणि ज्ञानात वृद्धी होणे अनिवार्य आहे. (२) भौतिक जगावरील (material world) माणसाच्या अधिपत्यामुळे भौतिक वृद्धी झाली आहे; परंतु या वृद्धीची ‘गुणवत्ता’सुद्धा तपासली पाहिजे.
माणसामाणसातील चांगल्या संबंधांचे दोन मार्ग आहेत:
(१) जैविक प्रेरणेच्या आवडी (Instinctive Liking)
(२) समान उद्देश (Common Purpose)
माणसाने जैविक प्रेरणांच्या आवडींच्या पायावर समान उद्दिष्टांची इमारत उभी करायला हवी. जैविक प्रेरणांच्या आवडीने न बनलेल्या सामाजिक-मानवी संबंधात कटुता निर्माण होण्याची हमखास शक्यता असते. त्यामुळे, कृतीप्रवण होतांना तिची दिशा, जैविक प्रेरणांच्या आवडी व समान उद्देश या अटी पूर्ण होतात की नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सारांश, कृतीप्रवणता ही वृद्धीची चावी आहे.(Action leads to growth.)
शांती आणि युद्ध
श्री. रसेल ह्यांची भूमिका शांततावाद्याची आहे. पण शांती म्हणजेच मृत्यू नव्हे काय? तर अशा मृत्यूतुल्य शांततेला काय अर्थ आहे? कृतीप्रवणतेचे समर्थन करणाऱ्या श्री. रसेल यांनी शांततावादी भूमिका घेणे बऱ्याच जणांना विरोधाभासी वाटेल. बऱ्याच जणांकडून श्री. रसेलांच्या तत्त्वज्ञानाचा ‘पळपुटेपणाचे तत्त्वज्ञान’ असा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता आहे. परंतु, येथे आपण ‘सक्रिय शांततावादी’ आणि ‘निष्क्रिय शांततावादी’ यांत फरक केला पाहिजे. श्री. रसेल यांना निष्क्रिय शांततावादी म्हणता येत नाही, ते स्वत: सक्रिय शांततावादी होते. आपल्या ह्याच सक्रिय शांततावादी भूमिकेमुळे त्यांना बऱ्याचदा प्रस्थापित सत्तेचा रोष ओढवून घ्यावा लागला. “पहिले महायुद्ध पूर्णपणे अनावश्यक होते, राजकारणी लोकांच्या आंधळेपणामुळे आणि बेदरकारपणामुळे लोकांवर निष्कारण ओढवलेले एक संकट होते.” या भूमिकेतून त्यांनी युद्धाला प्रखर विरोध केला. ब्रिटनचे दोस्तराष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या सैन्याची नालस्ती केली ह्या आरोपावरून सहा महिने त्यांना तुरूंगावासाची शिक्षा झाली. तुरूंगात त्यांनी ‘गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय’ (Introduction to mathematical philosophy) हा महान ग्रंथ लिहिला. दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्रांचा प्रसार होवू नये, असलेली अण्वस्त्रे नष्ट व्हावीत आणि विशेषत: तिसऱ्या महायुद्धाचा उद्भव होऊ नये ह्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यासंदर्भात, श्री. अल्बर्ट आईन्स्टाईन समवेत सादर केलेला ‘रसेल-आईन्स्टाईन शांतिप्रस्ताव’ प्रसिद्ध आहे. १९६१ मध्ये वयाच्या ८१व्या वर्षी, लोकांना सविनय कायदेभंग (Civil disobedience) करायला प्रवृत्त करण्याच्या आरोपावरून त्यांना सात दिवसांची कैद झाली; पण प्रस्थापित सत्तेशी त्यांचा झगडा चालूच राहिला. श्री. रसेल हे सक्रिय शांततावादी होते. निष्क्रिय शांततावादी युद्ध हे नेहमीच अनावश्यक असते, अशी भूमिका घेतात. बऱ्याचदा वृद्धीसाठी सौम्य स्वरूपाच्या युद्धाची आवश्यकता असते; पण मोठ्या प्रमाणावर नरसंहार होत असेल तर ते युद्ध अनावश्यक असते. तरीही ज्यांच्या उत्स्फूर्त जैविक प्रेरणांचा मृत्यू झाला आहे, अशा निष्क्रिय शांततावाद्यांपेक्षा युद्धात लढून मरणे उत्तम आहे, अशी रसेलांची सक्रिय शांततावादी भूमिका आहे. श्री. रसेल फक्त यासाठी युद्धविरोध करतात, कारण युद्धात मानवी ऊर्जेचा विध्वंसकपणे वापर होतो.
तथागत बुद्धांना यासंदर्भात विचारले असता, त्यांचे याविषयी काय मत असते? निश्चितच बुद्धाने निष्क्रिय शांततावादी भूमिका घेतली नसती. तर मग त्यांनी केलेल्या, “युद्ध हा चुकीचा मार्ग आहे.” या विधानाचा अर्थ काय आहे? फ्रेडरिक नित्शे युद्धाला ‘पुरूषोत्तमाचे (Superman) भूषण’ मानतो. युद्ध हे नेहमीच चांगल्या कारणासाठी होते. मानवी समाजाला युद्धाचा विसर पडला तर त्याचा उत्कर्ष होणार नाही, अशी नित्शेची भूमिका आहे; परंतु नित्शेची आणि बुद्धाची भूमिका एकच आहे, असे समजता कामा नये! नित्शे वर्चस्वप्रेरणेने प्रेरित पुरूषोत्तमाने जगावर राज्य करावे, यासाठी युद्धाचे समर्थन करतो. बुद्ध मात्र सर्जनशील प्रेरणांच्या बाजूने आहेत. त्यांनी अत्यंत आवश्यक असल्यास किंवा ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या अर्थानेच युद्धाच्या सौम्यरूपाचे समर्थन केले असते; नित्शेपुरस्कृत युद्धाला विरोध, असाच बुद्धाच्या उपर्युक्त वचनांचा अर्थ आहे. बुद्धाने घेतलेली मध्यममार्गी भूमिका आणि श्री. रसेल यांची भूमिका यांत साम्य नाही काय? आपल्या ‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास’ या ग्रंथात नित्शेच्या तत्त्वज्ञानाचे विवेचन करतांना, श्री. रसेल ह्यांनी एके ठिकाणी बुद्ध आणि नित्शे यांतील काल्पनिक संवाद रचला आहे. त्यात ते दोघांच्या भूमिका मांडतात; पण शेवटी नित्शेची भूमिका त्याज्य ठरवून बुद्धाचीच भूमिका योग्य ठरवितात. याचा अर्थ हाच की, बुद्ध आणि श्री. रसेल या दोघांची भूमिका एकच आहे.
आदरणीय श्री. जॉन ड्युई यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, असे म्हणता येईल की:
“श्री. रसेल हे फक्त ‘विध्वंसकता’ ह्या रूपात असलेल्या बळाच्या विरोधी आहेत आणि त्यांचा सर्व खटाटोप हा ‘ऊर्जा’ ह्या रूपात असलेल्या बळाच्या बाजूने आहे. मुद्द्याची गोष्ट म्हणजे साध्य हे जर साधनांना योग्य ठरवू शकत नसेल, तर दुसरे असे काय आहे जे साधनांना योग्य ठरविते? केवळ साध्य हेच साधनांना योग्य ठरवू शकते. (End Justify the means.); पण मौल्यवान साध्य साधतांना त्यापासून निष्पन्न होणारी तितकीच महत्त्वाची इतर साध्ये गमावता कामा नये. म्हणून, रसेलांचा युद्धास विरोध आहे. आदर्शवादी संप्रदायातील काही विचारवंत बळाची निष्कारण निंदा करत असतात; परंतु सत्य तर हेच आहे की, बळ हे जरी कायमस्वरूपी टिकणारे साधन नसले, तरी बळाच्या वापराविना कोणतेही आदर्श (Ideal) वास्तवात येणे कदापि शक्य नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट साध्य करताना बळाचा वापर आपण करायला हवा; मात्र आपण बळ हे ऊर्जा म्हणून सर्जनशीलपणे वापरायला हवे, हिंसा या रूपात विध्वंसकपणे वापरू नये. (The point is that to achieve anything we must use force; only we must use it constructively as energy and not destructively as violence.)”
आता आपण ग्रंथसाराच्या शेवटास पोहचलो आहोत. प्रस्तुत ग्रंथात प्रतिबिंबित झालेल्या श्री. रसेलांच्या सामाजिक तत्त्वज्ञानाच्या रूपरेषेचे विवरण देण्याचा प्रयत्न मी येथे केला. सारांश, जेव्हा केव्हा एखादी गंभीर ‘सामाजिक पुनर्रचना’ करायची असेल, तेव्हा सर्वसामान्य स्त्री-पुरूषांच्या नेमक्या मूलभूत गरजा काय आहेत? ह्याकडे अधिक लक्ष पुरवायला हवे आणि माणसामाणसातील संबंधांचे स्वरूप कसे आहे? याचा विशेष अभ्यास केला पाहिजे. अनेक समाजशास्त्रज्ञांनी ज्याकडे दुर्लक्ष केले, अशा सामाजिक समस्यांवर नवा प्रकाश टाकला पाहिजे, कारण समजोन्नतीची नूतन साधने आज उपलब्ध आहेत आणि श्री. रसेलांच्या ह्या अभिजात ग्रंथाने त्यात मौलिक भर घातली आहे.