विक्रम आणि वेताळ – भाग ५

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

“राजन्, गेल्या खेपेत, आपल्याला आपल्या कल्पनासाम्राज्यात वास्तवाची किंवा तर्कबुद्धीची बोच कशी नकोशी वाटते आणि सभोवतालचं वास्तव जितकं जास्त कटू/दुस्सह असेल तितकं आपल्याला आपल्या काल्पनिकविश्वाचं आकर्षण कसं जास्त असतं, हे जे तू सांगितलंस ते तर अगदी खरं आहे. करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात तर हा अनुभव नेहमीच येतो. आपल्याकडे बहुसंख्य लोकांना कोणते चित्रपट आवडतात ते बघ. ज्या चित्रपटात निव्वळ कल्पनारंजन असेल, वास्तवाला किंवा तर्काला थारा नसेल, असेच ‘दे मार’ चित्रपट लोकप्रिय होतात. पैसे खर्च करून कोण वास्तवदर्शी चित्रपट बघणार? बहुतेकांना तर त्यांच्या जीवनातील भयाण वास्तवापासून पळ काढायचा असतो. त्यामुळे जिथे तर्कबुद्धीला गुंडाळून ठेवता येईल असेच अतिरंजित चित्रपट विशेषतः पिटातल्या प्रेक्षकांना आवडतात. परंतु असं असलं तरीही फलज्योतिषाच्या लोकप्रियतेचं हे काही एकमेव कारण असेल असं वाटत नाही.”

“खरं आहे, फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची आणखीनही बरीच कारणं आहेत.”

“दुसरा एक प्रकार आहे ‘उगीच कशाला?’. हो, म्हणजे उगीच कशाला risk घ्या? असं वाटणाऱ्यांचा.

आता बघ, आपण भविष्यातील वेगवेगळ्या गोष्टींचे अनुमान सतत करत असतो. आणि त्या वेगवेगळ्या गोष्टींचे अनुमान खरे ठरण्याची संभाव्यता (probability) वेगवेगळी असते. म्हणजे उदाहरण घ्यायचे झाले तर, उद्या सूर्य उगवेल की नाही, ह्या अनुमानात सूर्य उगवण्याची संभावना इतकी जास्त आहे की आपण, उद्या सूर्य उगवणार, हे अनुमान न समजता गृहीतच समजतो. परंतु भविष्यात घडणार असलेल्या सगळ्याच गोष्टींची संभाव्यता इतकी जास्त नसते, मात्र त्यावर आपला जीवन मरणाचा प्रश्न अवलंबून असू शकतो. जिथे अनिश्चितता अतिशय जास्त असेल आणि त्यावर जर आपले सर्वस्व पणाला लागले असेल तर तिथे निर्णय घेणे अतिशय कठीण असते. अश्यावेळी आपल्याला फलज्योतिषाचा आधार घ्यावासा वाटतो. आपल्या निर्णयातील जोखीम फलज्योतिषाच्या सहाय्याने निर्णय घेतल्यास कमी होते, असा आपल्यातील बऱ्याच जणांचा समज असतो. त्यामुळे लग्न करतांना मुलगा मुलगी अगदी अनुरूप जरी असली तरीही कुंडली आणि मुहूर्त बघितल्याशिवाय लग्न करण्याची हिंमत बहुतेकांना होत नाही. प्रत्यक्षात जरी सगळं यथायोग्य असलं तरी ‘उगीच कशाला’ risk घ्यायची? बरं, ह्यांचा कुंडलीवरच पूर्ण विश्वास असतो असंही नाही. मुलगी प्रत्यक्ष न बघता, तिची फक्त कुंडली बघून एकही ‘माईचा लाल’ लग्नाला तयार व्हायचा नाही!

असे, ‘उगीच कशाला’, जसे असतात, तसेच ‘मरता क्या न करता?’ असेही असतात.”

“म्हणजे रे काय?”

“अरे, जोखीम कमी करण्याच्या इच्छेतून जसे लोक फलज्योतिषाच्या मागे लागतात तसेच इतर सगळे मार्ग बंद झाले आहेत असे वाटल्यामुळे, एक शेवटचा उपाय म्हणून फलज्योतिषाकडे वळणारेही आहेत. विशेषतः आपल्यावर एखादं अरिष्ट कोसळलं आणि त्यातून बाहेर पडण्याचे इतर सर्व उपाय करूनही यश येत नसेल तर नाइलाजास्तव लोक इकडे वळतात आणि आलेल्या संकटावर काही दैवी उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.

पण असो. ही आणि अशी आणखीन अनेक कारणे आहेत फलज्योतिषाच्या लोकप्रियतेची. आणि ही वेगवेगळी कारणे वेगवेगळ्याच लोकांच्या मनांत असतात असेही नाही, प्रत्येकाच्या मनांत ती सगळीच कमी जास्त प्रमाणात असू शकतात. परंतु ह्या सर्व कारणांच्या मुळाशी माणसाच्या दोन स्वाभाविक इच्छा आहेत. पहिली आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याची आणि दुसरी भविष्याच्या अनिश्चिततेतून येणारी असुरक्षितता घालवण्याची.”

“पण मग राजन्, आपापल्या आयुष्यातलं दुःख निवारण करण्याचा आणि अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग सापडला तर लोक ह्या भ्रामक फलज्योतिषाच्या विळख्यातून बाहेर पडतील, असं म्हणायचं आहे का तुला?”

“हो, नक्कीच, पण त्या मार्गाचा शोधघेण्यात अडचणीच्या ठरू शकणाऱ्या मानवी स्वभावाच्या आणखीन एकदोन वैशिष्ट्यांबद्दलचा विचार आपल्याला आधी करावा लागेल.”

“कोणती स्वभाववैशिष्ट्यं म्हणतोस?”

“त्यापैकी एक आहे अनुकरणप्रियता. आपण अनुकरण करतो कारण आपल्याला, ‘का? कशासाठी?’ वगैरे प्रश्नांवर विचार करण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवायची नसते. त्यासाठी मग साधा, सोपा शॉर्टकट् असतो, अनुकरण.

आता ह्यावरून एक चुटकुला आठवला, सांगू का तुला?”

“वाह्, वा, सांग की!”

“नाही, म्हणजे आपली इतकी गहन चर्चा चालू असतांना ‘उगीच कशाला’ असं वाटलं, म्हणून आपलं विचारून घेतलं.

तर, एका पाककलेच्या स्पर्धेत एक स्पर्धक दुधीभोपळा शिजवण्यापूर्वी त्याचा एक छोटासा तुकडा कापून नीट वेगळा ठेवते आणि मग तो भोपळा कुकरमध्ये शिजवते. हे बघून परीक्षकांना थोडं कुतूहल वाटतं आणि ते त्या स्त्रीला भोपळ्याचा तुकडा कापून वेगळा ठेवण्याचं कारण विचारतात.

ह्यावर ती स्त्री ‘काही नाही, ती माझी सवयच आहे’ असं म्हणते, पण आणखीन खोदून विचारल्यावर म्हणते की मी माझ्या आईला नेहमी असं करताना बघायचे म्हणून मलाही ही सवय लागली. संयोगाने तिची आईही तिथे स्पर्धा बघायला आलेली असते. परीक्षक आता आईकडे मोर्चा वळवतात आणि आईला हाच प्रश्न करतात. आई थोडी गोंधळते आणि म्हणते की, मीही माझ्या आईला नेहमी असं करतांना बघायचे म्हणून मला ही सवय लागली. आता परीक्षकांची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचते. स्पर्धकस्त्री च्या आईच्या आईचा फोन नंबर घेऊन त्यांना फोन लावला जातो आणि परीक्षक, आजींना तोच प्रश्न करतात, त्यावर आजी हसून उत्तरतात, इश्श्य, त्यात काय विचारायचं? मी दुधीभोपळ्याचा तुकडा कापून मग शिजवायचे कारण माझ्याकडचा कुकर लहान होता!

तर असे आपण असतो, ‘गतानुगतिक’. आपल्या वाडवडिलांकडून चालत आलेल्या प्रथा निमूटपणे पुढे चालवत राहणारे. ‘का? ? कशासाठी?’, असले काहीही प्रश्न नं विचारणारे.

आणि दुसरं स्वभाव वैशिष्ट्य आहे, अनुक्रमाने दोन घटना जर घडल्या तर त्यात संबंध जोडण्याचं. म्हणजे असं बघ की, लॉर्डस् वर मॅच चाललीय क्रिकेटची, भारत आणि इंग्लंडमध्ये, आणि टीव्हीवर ही मॅच बघत असतांना मला जांभई आली आणि लगेच इंग्लंडची एक विकेट पडली. तर मग मी काय करतो? जे तुम्हीही कराल तेच. इंग्लंडची पूर्ण टीम आऊट होईपर्यंत टीव्हीसमोर जांभया देत बसायचं अन् काय! आपल्याला आपला तर्क ओरडून सांगत असतो की आपल्या जांभईत आणि इंग्लंडच्या बॅट्समनची विकेट जाण्यात बादरायण संबंधही नाही, पण, ये दिल है कि मानता नहीं!

तर असा दोन घटनांमध्ये काहीही कार्यकारणसंबंध नसताना, आणि आपली तर्कबुद्धी आपल्याला तसे सांगत असतानासुद्धा, आपण काल्पनिकरीत्या तो संबंध जोडतो. तर कधी आपण असा संबंध असतांनासुद्धा नेमका कोणत्या दोन घटनांमध्ये तो आहे, त्याचे अनुमान करण्यात चुकतो. आता परत एक चुटकुला आठवला बुवा, सांगू का?”

“सांग आता काय!”

“एकदा शेरलॉक होम्स आणि वॉटसन गावाबाहेर कॅम्पिंगला जातात. एका ठिकाणी तंबू ठोकून दोघेही रात्री झोपी जातात. मध्यरात्री अचानक शेरलॉक होम्स वॉटसनला उठवतो आणि आकाशातले ग्रह तारे दाखवून वॉटसनला म्हणतो, “हे जे आकाशात ग्रहतारे दिसताहेत त्यावरून तू काय निष्कर्ष काढतोस? वॉटसन बराच विचार करून म्हणतो, आकाशात मृग नक्षत्र दिसतंय म्हणजे पाऊस येण्याची शक्यता वाटते आहे मला, तुलाही हेच म्हणायचंय ना?”
“वा राव, आकाश इतकं निरभ्र असताना, केवळ आकाशात मृग नक्षत्र दिसतंय म्हणून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्याइतकंही माझं डोकं फिरलेलं नाही!”
“हं, अच्छा अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं का, की तो जो तिकडे क्षितिजाच्या थोडं वर ध्रूवतारा दिसतोय तिकडे उत्तर, आणि त्याच्याकडे तोंड करून उभं राहिल्यावर आपल्या उजव्याबाजूला असेल ती पूर्व आणि . . .”
“चुकलंय पूर्ण तुझं उत्तर, आणि दिशा कळूनही दिङ्मूढ झालायस तू!”

“अरे पण मग तुला म्हणायचंय तरी काय? तू असा कोणता निष्कर्ष काढलास हे ग्रहतारे बघून?”
“अरे बाबा, अगदी साधी गोष्ट आहे, आपल्याला आकाशात हे ग्रहतारे दिसताहेत ह्याचा सरळ, सोपा अर्थ असा आहे की आपला तंबू कोणीतरी चोरून नेला आहे!”

तर सांगायचा मुद्दा असा की कधी कधी आपली परिस्थिती ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी असते, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या अगदी निकट/आपल्याजवळच असतं परंतु आपल्याला दिसत मात्र नाही! आणि हो, आपला मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपल्याला मधेच एखादा ‘चकवा’ भेटण्याचीही शक्यता असते बरं का!”

“आता हे काय नवीनच?”

“सांगतो, पण त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया.
तुला तर माहीत आहेच की न्यूटनच्या आधी सगळे लोक वस्तू खाली पडणार हे गृहीतच धरत होते. पण ‘वस्तू खाली का पडतात?’ ह्याविषयी मात्र कोणीच विचार केला नाही. न्यूटननी तो विचार केला आणि आपल्याला सोप्या शब्दांत समजावून सांगितलं, आणि सगळ्यांना समजलं.
पण हे असं सगळं सहजपणे समजलं तर मग माझ्यासारख्यांचं पोट कसं भरणार?

आज आपल्या सुदैवाने न्यूटन इहलोकात नसल्यामुळे मग मी तुला हे सगळं परत समजावून सांगतो बघ.
तू मला सांग की न्यूटनच्या डोक्यावर सफरचंदच का पडलं? कवठ किंवा नारळ का पडला नाही!“

“हा काय प्रश्न झाला का? मला काय माहीत?“

“अरे बाबा, त्याच्या मागे दैवी संकेत आहे. आणि तो मला स्पष्ट दिसतो आहे.

बरं मला सांग तू old testament वाचलं आहेस का?”

“नाही, पण का बरं?”

“अरेरे! पण असो, तर त्यात जे फळ खाल्लं ‘ईव्ह आणि आदम’नी ते कोणतं होतं?”

“सफरचंद?”

“हां, बरोब्बर. पण त्याला कशाचं फळ म्हणतात ते माहीत आहे का?”

“नाही!”

“अरे, ते ज्ञानाचं फळ होतं, ‘Fruit of Knowledge’. आणि म्हणून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचं ज्ञान होण्यामागे सफरचंदच डोक्यावर पडण्याची दैवी योजना होती.

मी सर्वज्ञानी असल्यामुळे हे सगळे ईश्वरी संकेत मला कळतात. तुम्हाला काहीही प्रश्न पडत असतील तर माझ्याकडे या! तर अश्याप्रकारे आपल्या समस्यांतून आपली सोडवणूक करणारे काही ‘मार्गदर्शक चकवे’ही आपल्याला आपला मार्गशोधताना भेटत असतात.

पण असो, तुझं अजून समाधान झालेले नाही, आणि तुझे प्रश्नही संपलेले नाहीत परंतु माझ्या मौनव्रताचा मात्र भंग झालेला असल्यामुळे तू आता मुकाट जाऊन झाडावर लोम्बकळू लाग कसा!”

क्रमशः . . .

अभिप्राय 6

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.