विक्रम आणि वेताळ – भाग ६

Image by OpenClipart-Vectors from Pixabay

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, गेल्या खेपेत तू आपल्या आयुष्यातील दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधताना आपल्या स्वभावामुळे येणाऱ्या अडचणींविषयी बोललास.
त्यातील पहिली: वैचारिक आणि शारीरिक शक्ती खर्च करण्याची आपली अनिच्छा; आणि त्यातून येणारी सोयीस्कर अनुकरणप्रियता.
दुसरी: अनुक्रमाने घडलेल्या कोणत्याही दोन यादृच्छिक (random) घटनांत काल्पनिक/अतार्किक कार्यकारण संबंध जोडण्याची आपली सवय.
तिसरी: आपल्या विचारात असणारी तर्कदोषाची शक्यता.
चवथी: बुवाबाजीतून, बाबावाक्य प्रमाण मानण्याच्या आपल्या सवयीमुळे, आपली फसवणूक होण्याची शक्यता.
परंतु, एवढ्या अडचणी असूनही प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतोच ना?”

“खरंय रे, पण हे चार सोडून आणखीनही बरेच अडथळे असतात आपल्याला योग्य विचार करता येण्यात… आपले षड्रिपु, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हेदेखील आपल्या विवेकबुद्धीस बाधित करत असतात. तसेच निष्ठा, गर्व आणि अभिमानही आपल्याला योग्य विचार करण्यापासून विचलित करतात.”

“षड्रिपु तर समजलं राजन्, सगळ्या चुकीच्या गोष्टी, असत्याचरण, त्यांच्यामुळेच होतं. अभिमान, अहंकार आणि गर्व हे तर ज्ञानोपासनेतील सर्वात मोठे अडथळे आहेत. ह्यांचे आणि ज्ञानाचे प्रमाण नेहमी व्यस्तच असते. ह्यांच्या बाधेमुळे आपल्याला अवास्तव गोष्टी खऱ्या वाटू लागतात. परंतु निष्ठा हा तर गुण आहे. त्याने तर्क आणि सत्यनिष्ठा कशी आणि कधी बाधित होईल?”

“अरे, जेव्हा आपण सत्यनिष्ठेपेक्षा इतर निष्ठांना जास्त महत्त्व देतो तेव्हा…! म्हणजे बघ, बादशाहाला त्याचा पोपट मेला हे वास्तव/सत्य कसं आणि कोण सांगणार? ज्योतिष्याच्या मुलाचं काय झालं तेही आपण गेल्या खेपेत बघितलं; तेव्हा राजनिष्ठेहून सत्यनिष्ठेला जास्त महत्त्व देणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. शेकडो वर्षात एखादा रामशास्त्रीच ते करू जाणे. एरवी स्वामिनिष्ठेसमोर पहिला बळी सत्यनिष्ठेचाच जातो.
आणखीन एक गंमत बघ, राम हा आपला सत्याचरणाचा आदर्श आहे. बिभीषणाने बंधुनिष्ठा/स्वामिनिष्ठा बाजूला ठेवून सत्याची बाजू घेतली किंवा सत्यनिष्ठा जपली, परंतु आपण त्याला ‘घर का भेदी’ किंवा देशद्रोही समजतो. आणि ह्याउलट कर्णाने सत्यनिष्ठेपेक्षा, मित्रनिष्ठा/स्वामिनिष्ठा जपली, तो मात्र आपल्या दृष्टीने ‘हीरो’ आहे.
तर मुद्दा असा की, ह्या सगळ्यांद्वारे सत्यनिष्ठेला आणि तर्कबुद्धीला बाधा येऊ न देता आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे.
पण, आता आपण येथे वेगळ्या विषयात प्रवेश करणार आहोत. मला आपल्या आयुष्यातील दुःख निवारण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग ठाऊक नाही. तो आपणां दोघांना मिळूनच शोधायचा आहे, परंतु तो सापडेल ह्याची शाश्वती नाही. तो शोधून काढण्यासाठी मजजवळ लहानपणी गुरुकुलात शिकलेले थोडे ज्ञान आणि माझ्याठायी असलेली थोडी तर्कबुद्धी, अशी तुटपुंजी शिदोरी आहे. पुढचा मार्ग अतिशय बिकट आहे. एकेक पाऊल अतिशय काळजीपूर्वक टाकावे लागणार आहे. म्हणून, आपली कुठे कुठे चूक होऊ शकते ह्याची जरा उजळणी करून घेतली.
एक मात्र तुला सांगायचं राहूनच गेलं. लहानपणी गुरुजींनी बाकी सहाध्यायांसोबत आम्हांला जे शिकवलं त्याव्यतिरिक्त, मी राजकुमार असल्यामुळे मला राजशकट चालवण्यासाठी आवश्यक असलेलं वेगळं शिक्षणही दिलं. त्यात, सत्य काय आणि असत्य काय हे ओळखण्यासाठी तर्कबुद्धीचा वापर कसा करावा, अपुऱ्या आणि अनिश्चित माहितीतून बिनचूक आणि निश्चित निष्कर्ष कसे काढावेत, नीतीअनीती, न्यायअन्याय, शस्त्रविद्या, अश्या बऱ्याच गोष्टी होत्या. परंतु शस्त्रविद्या वगळता बाकी विषय ते प्रत्यक्ष शिकवत नसत.”

“पण ‘शिक्षण दिलं’ असंही म्हणतोस आणि ‘शिकवत नसत’ असंही म्हणतोस… हा काय प्रकार आहे राजन्?”

“अरे, ते मला कोडी घालून त्यांची उत्तरे शोधायला सांगत. विचार करून उत्तर शोधणं मला भागच पडायचं कारण ते कधीच उत्तर सांगत नसत, वर म्हणत की ‘राजा हा सर्वातीत असतो, राज्यकारभार चालवण्यासाठी त्याला स्वतःलाच तर्कनिष्ठेने आणि सदसद्विवेकाने विचार करणे अत्यंत आवश्यक असते.’”

“म्हणजे, कोड्याचं उत्तर येत नसेल तर काही क्लू (clue), उत्तर ह्या अंकात इतरत्र कुठेतरी, किंवा तिथेच बारीक उलट्या अक्षरात वगैरे, असं काहीच नाही?”

“नाही. पण, कोड्याचं समाधानकारक उत्तर देऊ शकला नाहीस तर तुझ्या डोक्याची खांडोळी होईल वगैरे असल्या धमक्याही देत नसत…. कळलं का?”

“हो, हो, कळलं हो सगळं!”

“पण एखादे वेळी कोडं देऊन बरेच दिवस माझी काही प्रगती होत नाहीय असं जर दिसलं तर त्याच विषयाचं एखादं सोपं कोडं देत; आणि सोप्या कोड्याची उकल करण्याची पद्धत, कठीण कोडं सोडवण्यासाठी वापरायला सांगत.”

“हो, पण आता ते असो,… तर राजन्, दुःख निवारण्याचा मार्ग शोधण्यासाठी मुळात दुःख म्हणजे नेमकं काय हे आपण आधी नको का समजून घ्यायला?”

“अगदी बरोबर बोललास. तीच आता पुढची पायरी…! अर्थात, हे वाटतं तितकं अजिबात सोपं नाही, कारण, सुखदुःख हे पूर्णपणे व्यक्तिगत (subjective) असतं. ते तुलनात्मकही असतं. ज्या गोष्टींनी एकाला सुख होतं त्याच गोष्टींनी दुसऱ्याला दुःख होऊ शकतं.
त्यामुळे सुखदुःखाची नामावली/वर्गवारी होणे शक्य नाही आणि उपयोगाचीही नाही. आणखीन एक कठीण गोष्ट म्हणजे आपल्याला सुखदुःखाच्या व्यक्तिनिष्ठ/विशिष्ट (subjective, particular) अनुभवातून एक निरपवाद, सार्विक आणि वस्तुनिष्ठ (universal, objective) नियम शोधता येणे आणि तो नियम निश्चितार्थी विधानात मांडता येणे….. !
आता आपल्याला अनिश्चित आणि अपुऱ्या माहितीतून बिनचूक आणि निश्चित नियम शोधून त्याची तर्कनिष्ठ मांडणी करायची आहे. ह्यानिमित्ताने आज मला, लहानपणी गुरुजींनी घातलेल्या एका कोड्याची सारखी आठवण होतेय. सांगू का तुला?”

“बापरे…! आता मात्र हे अती होतंय… गोष्टी तू सांगणार, चुटकुले तूच सांगणार आणि आता कोडंही?”

“ह्याची सुरुवात तू केली होतीस हे विसरू नकोस. माझ्या free will ची आण घालून आधी तूच मला गोष्ट सांगण्यास भाग पाडलंस.”

“बरं बाबा, सांग.”

“हं, तर त्यांनी घातलेलं कोडं असं होतं;
‘समजा तू युद्धात हरलास आणि जिंकणाऱ्या राजाने तुला कारागृहात टाकलं; अश्या कोठडीत जी पूर्णपणे बंदिस्त आहे, मात्र तिच्या दोन बाजूंना दरवाजे आहेत. हे दोन्हीं दरवाजे बंद असून त्यावर एक एक पहारेकरी आहे. ह्या दोघांचे एक वैशिष्ट्य आहे. एक नेहमी खोटे बोलतो तर दुसरा नेहमी खरे बोलतो. कोण खोटारडा आणि कोण खरा हे त्या एकमेकांना माहीत आहे.
कोठडीच्या एका बाजूच्या दरवाजातून तू दुसऱ्या एका कोठडीत शिरू शकशील. पण तिच्यात वाघ आहे. त्यामुळे वाघाच्या तोंडी जाशील. दुसऱ्या बाजूच्या दरवाजातून बाहेर पडलास तर मात्र तुझी सुटका होईल. सुटकेचा मार्ग कोणता हे दोन्ही पहारेकऱ्यांना माहीत आहे.
तुला कोणाही एका पहारेकऱ्याला एकच प्रश्न विचारण्याची मुभा आहे. परंतु खरे बोलणारा कोण आणि खोटे बोलणारा कोण हे तुला माहीत नाही. तर, सुटकेचा मार्ग अचूकपणे शोधून काढण्यासाठी कोणत्या पहारेकऱ्यास तू काय प्रश्न विचारशील?”

“मग राजन्?”

“मग? मग काहीच नाही.”

“नाही, नाही, म्हणजे तुला उत्तर सापडलं? काय उत्तर होतं?”

“हे बघ, ‘मला एक कोडं आठवतंय, ते मी तुला सांगू का?’ असं विचारलं होतं, त्याचं उत्तरही सांगीन असं मी कधी म्हंटलं? आणि हो, हा प्रश्न मला तू विचारलेला नाहीस, त्यामुळे त्याचं उत्तर देण्यास मी बांधील नाही. उलट, तूच थोडं डोकं खाजव, तुझं वय विचारात घेता, तुझ्यासाठी फार काही कठीण नाही ते कोडं. तू स्वतः उत्तरं शोधू लागलास तर फायदाच आहे आपला.
हो, आणि तू निश्चिंत अस, उत्तर सापडलं नाही तरी मी काही शकलं वगैरे करणार नाही तुझ्या डोक्याची. खरं तर उत्तर सापडल्याचं तू मला सांगूही नकोस.”

“राजन्, एक गोष्ट लक्षांत येतेय बघ माझ्या.”

“काय?”

“वैयक्तिक आहे, विचारू? खरं सांगशील?”

“मी नेहमीच खरं बोलतो हे तर माहीतच आहे तुला.”

“तू गणितात थोडा कच्चा होतास का लहानपणी?”

“आँ? हां, असेना का मी गणितात कच्चा, पण त्याचा इथे काय संबंध? आणि आत्ता तुझ्या डोक्यात गणित कुठून आलं?”

“Attitude रे attitude!”

“आता attitude काय? आणि कोणाची?”

“तुझीच attitude आणि कोणाची!”

“माझी?”

“मग काय, ज्याप्रकारे तू ते कोडं फेकलंस ना, ज्याचं उत्तर देण्यास तू बांधील नाही वगैरे म्हणालास. त्या तुझ्या attitude वरून माझ्या लगेच लक्षात आलं, की साहेबांचं गणित अंमळ कच्चं दिसतंय…!”

“तुझं डोकं नक्कीच फिरलेलं दिसतंय! Attitudeचा आणि गणिताचा काय संबंध? मी त्या कोड्याचं उत्तर न दिल्याने तुझा झालेला राग सरळ सरळ दिसतोय…”

“अरे बाबा, तू जे कोडं सांगितलंस ना त्याचं उत्तर गणिताच्या एका साध्या, मूलभूत नियमात आहे. ते तुला माहीत नाही हे बघून हसूच आलं मला, पण दाबलं बळंबळंच..”

“काय म्हणतोस? कोणता नियम?”

“अरे, जेव्हा दोन अनिश्चित पदांपासून एक निश्चितार्थ काढायचा असतो तेव्हा एका पदाची किंमत दुसऱ्यात गोवायची असते. पण थांब, असं तुझ्या लक्षात येणार नाही कदाचित, त्यासाठी तुला गणितातील एक उदाहरण देतो बघ.
समजा,
पहिला पहारेकरी हा ‘x’ आहे आणि दुसरा ‘y’.
आता ह्यातील एक नेहमी खरं बोलतो म्हणून आपण त्याला ‘+’ ही खूण देऊ आणि दुसरा नेहमी खोटं बोलतो म्हणून त्याला ‘–’ ही खूण देऊ.
आपल्याला खरा कोण आणि खोटा कोण हे माहीत नाही, पण समजा ‘x’ खरा आणि ‘y’ खोटा.
म्हणून ‘+x’ आणि ‘–y’
परंतु ह्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर आपल्याला कोणतेच निश्चित उत्तर मिळत नाही. त्यामुळे आपल्याला त्यांना एकमेकांत असे गोवायला हवे की उत्तर निश्चितपणे खरे की खोटे ते कळायला हवे.
आता आपण जर त्यांचा गुणाकार केला तर काय होतं बघूया.
(+x) × (–y) = –xy
म्हणजे आपण जर ह्या दोघांना एकमेकांशी गुणलं तर येणारं उत्तर नक्कीच ‘–’ म्हणजे खोटं असणार आहे.
अशा प्रकारे आपण दोन अनिश्चित गोष्टी एकदुसऱ्यात गोवून निश्चित निष्कर्ष काढू शकतो.
तर, गणित म्हणजे गणित असतं, आपल्या तर्काचा अर्क असतं!
पण थांब, तुला त्याहून सोपं एक उदाहरण देतो.
मला सांग, आपल्याला आपला चेहरा बघता येतो का?”

“आता हा काय विचित्र प्रश्न तुझा? आपल्याला आपला चेहरा दिसत नाही पण तो बघण्यासाठी आपण आरसा वापरू शकतो, हे तर कोणी शेंबडं पोरही सांगेल तुला!”

“शाब्बास! पण काय रे हा आरसा तुला तुझ्या चेहऱ्याचं यथार्थ ज्ञान करवतो का?”

“अर्थातच, म्हणून तर आपण तो वाक्प्रचार वापरतो ना, ‘एखाद्याला आरसा दाखवणे’, म्हणजे तो कसा आहे ह्याचं यथार्थ ज्ञान त्याला करून देणे.”

“चुकतोयस तू, अरे, आरशात नीट बघशील तर कळेल की तुझा डावा हात तुझ्या आरशातल्या प्रतिमेचामात्र उजवा हात आहे. तू जर त्या प्रतिमेला यथार्थ समजलास तर सकाळी सकाळी केवढ्या संभ्रमात पडशील, आणि तेव्हा पडला नाहीस तर जेवतांना तर नक्कीच पडशील…हॅ.. हॅ…”

“शी: घाणेरडा!”

“तर सांगायचा मुद्दा असा की आपण आरशात बघतो ती आपली अगदी उलट (laterally reversed) प्रतिमा असते. म्हणजे असं समज की आरसा हा नेहमी खोटंच बोलणारा असतो. आपण त्याला ‘–x’ म्हणूया.
आता ह्याच, नेहमी खोटं बोलणाऱ्या आरशाकडून जर तुला खरं उत्तर हवं असेल तर तू काय करशील?”

“काय?”

“अरे, एक दुसरा आरसा त्या आरशासमोर ठेवायचा…! अश्या प्रकारे की माझी ‘पहिल्या आरशातली प्रतिमा’ मला त्या ‘दुसऱ्या आरशातून’ पाहता येईल. आता, माझा उजवा हात ह्या दुसऱ्या आरशातील माझ्या प्रतिमेचाही उजवाच हात असेल. म्हणजे हा ‘दुसरा’ आरसा मला माझं वैध, सत्य, यथार्थ ज्ञान करून देईल.
म्हणजेच (–x) × (–y) = + xy
अर्थात, दोन खोट्या गोष्टींना एकमेकांत गुंफलं तर उत्तर खरं येणार.
आता ह्याच पद्धतीचा उपयोग आपण त्या कोड्यात करूया.
म्हणजे कोणाही एका पहारेकऱ्यास असा प्रश्न विचारायचा की ‘मी जर समोरच्या पहारेकऱ्यास सुटकेचा मार्ग विचारला तर तो कोणत्या दाराकडे बोट दाखवेल?’
आपल्याला आधीच माहीत आहे की खऱ्या आणि खोट्याचा गुणाकार हा नेहमीच खोटा येणार आहे.
त्यामुळे तो पाहरेकरी ज्या दाराकडे बोट दाखवेल त्याच्या विरुद्धदिशेच्या दारातून बाहेर पडायचं.”

“वाह्, मान गये!”

“मग? हमें ऐसा वैसा मत समझो राजन्!
हा, हा, हा!
आणि विसरू नकोस, ह्या सगळ्याचा उपयोग तुला ‘सुखदुःख’ म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी करायचा आहे.
समजलं का?
वेताळ आहे म्हटलं मी, वेताळ!
गोष्टिवेल्हाळ, आग्यावेताळ!”

असे म्हणून वेताळ निघाला आणि झाडाच्या फांदीवर जाऊन उलटा लोम्बकळू लागला.

क्रमशः . . .

अभिप्राय 3

 • सगळेच षड्रिपू ना फक्तच शत्रू मानावे का?विषयाची व्याप्ती मोठी आहे. प्रमार्थसाधकासाठी असतील ,पण प्रापंचिक,संसारिक माणसाला थोड्याबहु प्रमाणात मोह ,क्रोध त्यागून चालायचं नाही.
  Impractical आहेस किंवा “ह्या ग्रहावरील नाहीस का ?” विचारणा होते . परिवारात राहून पूर्ण मुक्त होणे अवघड .
  पण, तो अध्यात्माची कास धरून आणि संयमाने *संतुलित* राहू शकतो.
  ह्या षड्रिपूंनी *पीडित* मात्र समाजासाठी पण घातक ठरतो.माझ्या मते

 • छान ,,👍बाकी लेख खूप अभ्यासपूर्वक लिहिला आहेस.

 • खरे आणि खोट्याचे उत्तम विश्लेषण. उत्कृष्ट.

  जीवनात भोग भोगणे हा जीवनकर्माचा एक भाग आहे. तथापि आत्मस्थ राहून भोग भोगण्याची प्रवृत्ती प्रयत्न साध्य आहे. भोग भोगल्याची स्मृती माणसाला जीवनात अधिक अस्वस्थ करीत असते. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज बाराव्या अध्यायात म्हणतात त्यानुसार…..

  अथवा हे चित्त, मन बुध्दी सहित |
  माझ्या हाती, अचुंबित, न शकसी देवो||

  तरी गा ऐसी करी, याया आठा प्रहरा माझारी|
  मोटके निमिष भरी, देतू जाय||

  मग जेखा निमिख, देखील माझे सुख|
  तेतुके आरोचक, विषयी येईल||

  पूनवेहूनी जैसे, शशी बिंब दिसेंदिसे|
  हरपत अवसे, नाही ची होय||

  तैसे भोगा आतूनी निगता, चित्त मजमजी रिंगता|
  हळु हळु पंडुसुता, मीचि होइल ||

  म्हणून अभ्यासासी काही, होणे दुष्कर नाही|
  या लागे माझ्या ठायी, अभ्यासे मिळ||

  दिवसातल्या आठ प्रहरांपैकी एक निमिष म्हणजे क्षण जरी संपूर्ण एकाग्रतेने स्वतः साठी दिला तर आपल्या जीवनाचे ईप्सित गाठणे कठीण होऊ नये.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.