आजची युगनिष्ठा

‘ऐहिक निष्ठा ही आजची युगनिष्ठा आहे.’, असे आज ढोबळमानाने म्हणता येईल. ढोबळमानाने याकरिता कारण, मानवाच्या एकमूलकतेचे गृहितक हे आता मानवशास्त्राने टाकून दिले आहे. त्यामुळे, मानवी समाजाची आणि म्हणून सर्व व्यक्तींची (individuals) मूल्यनिष्ठा सर्वत्र एकसारखीच आहे, असे मानण्यातील तर्कदोष उघड आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ती तशी कधी होती का? असे विचारल्यास, त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागते. उलट, ती किती वैविध्यपूर्ण आणि समृद्ध होती, याला बरेचसे अनुकूल पुरावे मिळू शकतील. भारतीय सामाजिक-धार्मिक परंपरेचा परिपोष हा जसा आत्मवाद, ईश्वरवाद, अद्वैतवाद यांतून झाला, तसाच तो अनात्मवाद, निरिश्वरवाद, द्वैतवाद, संशयवाद आणि अज्ञेयवादातूनही झालेला आढळून येईल. हे प्रवाह भारतीय समाजात विकसित झाले, ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे; परंतु हे काही ‘विभक्त’ (Isolated) स्वरूपात विकसित झालेले प्रवाह नाहीत. त्यांत ‘संवाद’ होता, असे आढळून येईल. संवादाची दिशा ही प्रसंगी कदाचित परस्परांस अनुकूल-प्रतिकूल चिकित्सेची असली, तरीही विविध सामाजिक गटांतील ‘संवादाला’ अतिशय महत्त्व असते, हे येथे अधोरेखित करायचे आहे. आजच्या आपल्या सामाजिक जीवनाचा विचार केला असता, आपल्याला काय दिसेल? तर :

“एक वर्ग ‘स्वान्त सुखाय:’ जगतो आहे, तो आपल्याच ‘काव्यविनोदशास्त्रात’ मग्न आहे; तर दुसरा वर्ग आपल्याच विवंचनेत, दु:खात अडकला आहे.”

हे का घडलं, याला अनेक तर्क प्रस्तुत करता येतील; परंतु या पेचाचे एक स्पष्टीकरण मी असे करीन की ‘सामाजिक सुसंवादाच्या अभावामुळे’ हे सर्व घडत आहे. मी फक्त निव्वळ भाषिक-संवादाविषयी म्हणतच नाही; तर एकूण सामाजिक व्यवहारांच्या (Social practices) सुसंवादाकडे येथे लक्ष वेधायचे आहे. हा सुसंवादही ‘हक्क-कर्तव्याच्या पेचामुळे’ अधिकच कठीण होऊन बसला आहे. हेअसे का झाले, याचा आपल्याला ‘युगनिष्ठांच्या’ संदर्भात विचार करायचा आहे.

प्रत्येक युगाची काही मुल्ये असतात. या युगमूल्यांच्या पायांवरच त्या त्या काळातील युगनिष्ठेची घडण होते. वैयक्तिक पातळीवर ही युगमूल्ये ‘व्यक्तिनिष्ठ नीतीचे’ रूप धारण करतात. नैतिक विचारांसंदर्भात एक भूमिका घेता येते, ती अशी :

कोणत्याही कालखंडात जो तात्त्विक (Philosophical) स्वरूपाचा नैतिक विचार होतो त्याला एक मूर्त व विशिष्ट असा संदर्भ असतो. प्रस्थापित सामाजिक संस्था, त्यांत भागीदार असलेल्या व्यक्तींच्या हितसंबंधांची त्यांनी लावलेली व्यवस्था, म्हणजे त्यांचे मान्य करण्यात आलेले हक्क, कर्तव्ये, सामाजिक स्थान ह्यांनी जसा हा संदर्भ घडवलेला असतो तसाच माणसाची प्रकृती ,मानवी जीवनाची अंतिम साध्ये, माणसाचे कल्याण ह्याविषयींच्या संकल्पनांनीही तो सिद्ध झालेला असतो. नैतिक विचारांचे कार्य दुहेरी असते. प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेत अंतर्भूत असलेले नैतिक आदर्श स्पष्ट करणे व त्यांचे समर्थन करणे, त्यांच्या पार्श्वभूमीवर व्यक्तींची कर्तव्ये स्पष्ट करणे, नैतिक आचारामुळे व्यक्तीचे जीवन सफल कसे होते हे दाखवून देणे, नीतीने वागण्याचे तिला आवाहन करणे, हे एक प्रकारचे कार्य आणि प्रस्थापित आदर्शांचा निषेध करून त्यांच्या जागी वेगळ्या आदर्शांची स्थापना करणे, त्यांच्या अनुरोधाने ‘कर्तव्ये’, ‘हक्क’, ‘सद्गुण’, ‘योग्य कृत्य’ आदि नैतिक संकल्पनांना नवीन आशय देणे, हे दुसऱ्या प्रकारचे कार्य.

नैतिक विचारांच्या ह्या दुहेरी कार्यातून युगनिष्ठांची घडण होते.

आता, जर आजच्या सामाजिक संस्थांचे आणि त्यांचे नियमन करणाऱ्या सत्तेचे विवरण द्यायचे झाले तर ते असे देता येईल:

भारतीय संविधान ही आधुनिक संस्कृतीची एक वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती, तिचा आदर्श आणि स्फूर्तिस्थान आहे. या आधुनिक संस्कृतीचा आशय स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वत्रयींत सामावलेले जे सारतत्त्व आहे, ते ‘न्याय’ कल्पनेत अधिष्ठित झालेले आहे. मानवी उत्कर्षाची पूर्वअट असलेली ‘व्यक्तीची प्रतिष्ठा’ आणि सामाजिक उत्कर्षाचा सुवर्णमार्ग असलेली ‘राष्ट्राची एकता आणि एकात्मता’ या महान साध्यांना मूर्तरूप देऊ शकणारी ‘बंधुता’ हाच ह्या संस्कृतीचा सर्वोच्च आदर्श व परमसाध्य आहे. ही ‘आधुनिक संस्कृती’ म्हणजे ‘लोकशाही संस्कृती’ (Democracy Culture) होय. भारतीय संविधान तिचा नियामक, नियंत्रक आणि मार्गदर्शक असा वैधानिक दस्तऐवज आणि वारसा आहे; परंतु हा काही ‘स्थैतिक'(Static) स्वरूपाचा वारसा नाही, तर हा एक समृद्ध आणि ‘गतिमान’ (Dynamic) म्हणूनच कालप्रवाहासह खळाळून वाहू शकेल असा, स्वत:चेच आंतरिक सामर्थ्य असलेला ‘नित्यनूतन’ असा वारसा आहे. परंतु ह्या वारश्याचे सारतत्त्व कशात सामावलेले आहे? त्याला एवढी मौलिकता जी प्राप्त झालेली दिसते, ती कशामुळे? या संविधानात असे काय आहे, ज्यामुळे त्या मौलिकतेला संविधानाचे टिकाकारही मान्य करतात? ह्याचे उत्तर आपणांस संविधानाने ‘मानवी प्रतिष्ठा व मानवी प्रगती’ या उदात्त मानवतावादी मूल्यांवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासात मिळू शकेल. पण, हा काही भाबडा विश्वास नाही; तर मानवी इतिहासातील तमोयुगांचा शेवट करणाऱ्या ‘विवेकातून’ मिळालेला हा विश्वास आहे; म्हणूनच तो डोळस व द्रष्टा आहे.

हे स्पष्टीकरण बरेचसे काव्यमय आहे. हे मान्य केले तरी, उपर्निदिष्ट नैतिक मूल्ये ही आधुनिक मूल्ये आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नवभारताची घडण ही ह्याच आधुनिक मूल्यांनी व्हावी, अशी घटनाकारांची अपेक्षा होती. ऐहिक निष्ठा ही युगनिष्ठा म्हणून मूर्त होण्यास आणि ऐहिकतेचा तात्त्विक पाया भक्कम करण्यासाठी, त्याला विकसित करण्यासाठी आधुनिक मूल्ये उपकारक ठरली, या मताशी बरेचजण सहमत होतील. आधुनिकतेच्या स्वरूपचिकित्सेशिवाय आजच्या युगनिष्ठेचे स्वरुप समजून घेता येणार नाही. एकाअर्थी, हे आधुनिकतेने निर्माण केलेल्या ‘संस्कृतीचे’ मूलरूप समजून घेणे होय. तेव्हा, ह्या आधुनिकतेचे सत्व कशात सामावलेले आहे? असे विचारता येईल. त्याचे उत्तर असे:

मानवी व्यक्तींची स्वयंभू प्रतिष्ठा, तिचे स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता हे खास करून आधुनिक संस्कृतीत उदयाला आलेले मूल्य आहे. प्राचीन ग्रीक किंवा भारतीय नैतिक विचारात ह्या मूल्याचा काही सुगावा लागू शकेल, काही प्रसादचिन्हे आढळू शकतील; पण त्याची स्पष्ट आणि स्थिर ओळख आधुनिक संस्कृतीतच झाली. आधुनिक नैतिक-सामाजिक विचारात ह्या मूल्याचे स्थान केवळ अंतिम नाही, तर मूलभूत आहे. ह्याचा अर्थ असा, की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि इतर मानवी साध्ये – उदा; ज्ञान, कला, सुखसोयी, इत्यादी – ह्यांच्यात संघर्ष आला तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे मूल्य अबाधित राहते; त्याच्याशी सुसंगत ठरेल अशा रीतीने इतर साध्यांची साधना करणे योग्य ठरते. मानवी समतेचे तत्त्व हे प्रत्येक मानवी व्यक्तीच्या व्यक्ती म्हणून असलेल्या प्रतिष्ठेवर आधारलेले आहे. न्यायाची आधुनिक संकल्पना समतेच्या तत्त्वावर आधारलेली आहे. सर्व व्यक्तींना सर्वतोपरी समान वागणूक मिळणे न्याय्य आहे, कोणत्याही बाबतीत दोन व्यक्तींना विषम वागणूक द्यायची असल्यास असे करण्याला योग्य आणि पर्याप्त असे कारण असले पाहिजे, नाही तर तो अन्याय आहे, हे न्यायाच्या आधुनिक संकल्पनेमागचे मुख्य सूत्र आहे. एका अर्थी, व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तीची स्वायत्तता, व्यक्तिप्रतिष्ठा आणि म्हणून व्यक्तिविकास ह्यांना खरेखुरे मुल्य असते. राष्ट्र, वर्ग, जात इत्यादी भिन्न स्वरूपाच्या सामाजिक संघटनांना, त्यांत सामावलेल्या व्यक्तिंच्या पलीकडे असणारे असे मूल्य नसते. म्हणून आधुनिकतेचे सत्व हे ‘व्यक्तिवादात’ (Individualism) सामावलेले आहे. आधुनिक विचारात हा व्यक्तिवाद अनेक अंगांनी अवतीर्ण झाला असला तरी व्यक्तिवादाची स्थूलमानाने दोन रूपे आहेत, असे दिसते: एक उपयोगितावादी (Utilitarian) आणि दुसरे कांटवादी (Kantian). ह्या दोन्हींतून अनुक्रमे जे.एस.मिल प्रणित उपयोगितावादी नीती आणि इमॅन्युअल कांट प्रणित विवेकाधिष्ठीत नीती पुढे आली. त्यांतूनच कधी अधिक प्रमाणात आधुनिक युगनिष्ठा साकार झाली.

परंतु याबरोबरच, आधुनिक काळात समूहवादी प्रेरणाही आढळते यात शंका नाही. वंश किंवा राष्ट्र, जमात, वर्ग यासारख्या समूहालाच खरेखुरे अस्तित्व असते. समूहाचा घटक, त्याची एक निर्माती म्हणून

ला अस्तित्व असते, हे सत्य ओळखून व्यक्तीने समाजाशी एकरूप झाले पाहिजे, समूहाच्या अस्तित्वात आपले वेगळे अस्तित्व विरघळून टाकले पाहिजे; समूहाचे सामर्थ्य, त्याचे वैभव ही मानवी जीवनाची खरी साध्ये असतात, ती साधण्यासाठी व्यक्तीने आत्मसमर्पण करण्यात तिच्या जीवनाची खरी सार्थकता असते, ही शिकवण हे समूहवादाचे (Collectivism) सार आहे. आधुनिक युरोपिय संस्कृतीत समूहवाद हे एक पाखंड आणि विकृती मानण्यात आली आहे. सामाजिक वास्तवाच्या घडणीत आणि विश्लेषणात वर्ग आणि वर्गहित यांना प्राधान्य देणारा मार्क्सवादही काही प्रमाणात समूहवादाकडे झुकतो यात शंका नाही. पण समग्र मार्क्सवादी उपपत्ती घेतली तर तिच्यात व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि तिची सामाजिकता ह्यांच्यात तोल साधण्याचाच प्रयत्न आहे. आणि मार्क्सवादाप्रमाणे साम्यवाद प्रस्थापित झाल्यानंतर जो ‘मुक्त मानवी समाज’ अस्तित्वात येणार आहे, त्याचे स्वरूप उत्स्फूर्तपणे आत्मदिग्दर्शन करणाऱ्या स्वायत्त व्यक्तींचा समुदाय असेच राहणार आहे. आधुनिक अभिजात व्यक्तिवाद आत्मसात करूनच मार्क्सवाद उभा राहिला आहे. मार्क्सची ‘आर्थिक-तात्त्विक हस्तलिखिते’ (Economic and philosophical manuscripts) वाचली तरी याचा खुलासा होऊ शकेल आणि हीच गोष्ट श्री.एरिक फ्रॉम ह्यांनी ‘मार्क्सची मानव संकल्पना’ (Marx’s concept of man) या ग्रंथात स्पष्ट केली आहे.

अशाप्रकारे, आधुनिक संस्कृतीत व्यक्तिवाद, समूहवाद आणि मार्क्सवाद यांसारखे प्रभावी प्रवाह निर्माण झालेले आहेत. ह्या आधुनिक प्रवाहांतूनच नवमूल्यांवर आधारित युगनिष्ठांची घडण आपल्या समाजात झाली आहे.

आधुनिक संस्कृतीतील विचारव्यूह व्यक्तिवाद, समूहवाद आणि मार्क्सवाद एकूणच इहवादी चौकटीतच फिरतो. परंतु समाजातील सर्वच युगनिष्ठांची घडण आधुनिकतेतून झालेली आहे, अशी आजची वस्तुस्थिती नाही. उलट, कोणत्याही समाजावर त्याच्या ऐतिहासिक-पारंपरिक चारित्र्याचा खोल ठसा उमटलेला असल्याने, कालनिरपेक्ष अशी काही चिरंतन सांस्कृतिक मूल्ये असतात आणि काही नैतिक मूल्यांना पारंपरिक नीतिचा आश्रय असतो, अशी भूमिका पारंपरिक नीतीच्या तत्त्वज्ञानाची आहे. आज, ह्या पारंपरिक नीतीच्या पुनरूज्जीवनाचे, जीर्णोद्धाराचे प्रयत्न ‘आधुनिक’ समाजात होताना दिसतात.

ही पारंपरिक भारतीय नीती-विशेषत: हिंदू धार्मिक-सामाजिक नीती ज्या आशयावर उभी आहे तो थोडक्यात असा आहे:

“प्रत्येक व्यक्तीचा स्वधर्म असतो आणि तो दिलेला (Already stated) असतो. वर्णधर्म आणि साधारणधर्म यांचा मिळून तो बनलेला असतो. व्यक्तीच्या सामाजिक नात्यांना अनुसरून हा स्वधर्म अनेक रूपे धारण करतो. उदा; पतिधर्म आणि राजधर्म यांच्यात संघर्ष येऊ शकेल; किंवा संघर्ष आल्याचा भास होईल, तेव्हा विशिष्ट प्रसंगी स्वधर्माला अनुसरून आपले ‘कर्तव्य’ काय आहे हे ओळखणे कठीण असेल. कर्म काय आणि अकर्म काय ह्याविषयी शहाणे लोकही गोंधळात सापडतील. पण ‘कर्म काय आहे?’ ह्याचे उत्तर सापडणे कठीण असले तरी, त्यांचे वस्तुनिष्ठ असे उत्तर असते. आपले कर्तव्य काय आहे हे व्यक्तीने ठरवायचे नसते; तर प्रश्नाचे पूर्वनिश्चित उत्तर तिने शोधून काढायचे असते. ह्या उत्तराप्रमाणे वागण्याचे किंवा न वागण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असते. उत्तराला अनुसरून व्यक्तीने आचरण केले तर तिचे कल्याण होते. नाहीतर तिला पाप लागते, तिचे अकल्याण होते. एवढेच, कृतीपुरते स्वातंत्र्य व्यक्तीला असते; पण स्वधर्म काय आहे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य तिला नसते.”

गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनापुढे वर्णधर्म आणि साधारणधर्म यांत निर्माण झालेल्या पेचाची सोडवणूक करत, “क्षत्रिय वर्णधर्मास पुत्रधर्म, भातृधर्म, पौत्रधर्म इत्यादी साधारण धर्मांऐवजी अग्रक्रम दे आणि युद्धास सज्ज हो!” हा जो उपदेश दिला, तो पारंपरिक नीतीवर आधारलेला होता. श्रीरामाने शंबुकाचा केलेला शिरच्छेद किंवा एकलव्याला द्रोणाचार्यांनी गुरूदक्षिणा म्हणून मागितलेला अंगठा, हे त्या दोघांनी आपल्या वर्णधर्मांचे केलेले उल्लंघन म्हणून केलेला दंड होता. आणि त्या दंडामागचा आधार पारंपरिक नीती होती. आज या पारंपरिक नीतीचे कोणत्याही प्रकारचे समर्थन होऊ शकत नाही. व्यक्तीची स्वायत्तता, समता आणि स्वातंत्र्य आणि न्याय यांसारख्या आधुनिक मूल्यांच्या आधारे पारंपरिक नीतीची चिकित्सा केली असता, ती निव्वळ ‘अन्याय्य’ सिद्ध झाल्यावाचून राहणार नाही. परंतु, भारतीय समाजात न्यायाचा विचार सापेक्षपणे झालेला आहे, असे दिसते. वर्णधर्मानुरूप सामाजिक व्यवहार करणे ह्यातच न्याय सामावलेला असतो आणि त्याविरुद्ध केलेले वर्तन हे अन्याय्य होय, अशी पारंपरिक नीतीची शिकवण होती, परंतु आधुनिक नीतीच्या अंगाने बघितले, तर सर्व माणसे माणूस म्हणून समान असल्याने, विशेष‌ कारण नसताना, इतरांशी विषमतेने वागणे हा अन्याय आहे आणि म्हणून सर्वांशी समतेने व्यवहार करण्यातच न्याय सामावलेला आहे, असे आधुनिक नीती सांगते. भारतीय संविधानाने, आधुनिक नीतीचा पुरस्कार केला आहे, त्यामुळे आजचा न्यायविचार हा वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या प्रकाराचा आहे. परंतु, भारतीय न्यायविचार हा सापेक्षपणे होत असल्याने, त्याची निरपेक्ष व्याख्या करून त्याची निश्चिती करणे अवघड झाले आहे. न्याय म्हणजे काय? याचा विचार करण्याची ही जागा नव्हे; परंतु जेव्हा आपण आधुनिक व पारंपरिक नीतींच्या चष्म्यांतून बघू , तेव्हा एकाला जे न्याय्य दिसेल, ते दुसऱ्याला अन्याय्य दिसल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे, न्यायाविषयी आपल्याला गंभीर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण, आपल्या न्यायविचारांची संदिग्धता विचारात घेतली, तर त्यांची तुलना शांतीपर्वातील पुढील श्लोकाशी करता येईल:

भवत्यधर्मो धर्मो हि धर्माधर्मावुभावपि |
कारणाद्देशकालस्य देशकाल: स तादृश: ||
(शांती पर्व, ७६|३१)

अर्थ : स्थळकाळाच्या प्रभावानुरूप, जे धर्म्य आहे, जे न्याय्य आहे ते अधर्म्य, अन्याय्य बनेल आणि जे अधर्म्य, अन्याय्य आहे ते धर्मयुक्त, न्याय्य बनेल.

त्यामुळे, एकदा आपण ‘न्याय’ आणि ‘अन्याय’ या शब्दांच्या व्याख्या करून, त्या निश्चित केल्या म्हणजे सर्वकाही अगदी स्फटिकाप्रमाणे स्पष्ट होईल.

आता, आपल्यासमोर ‘आधुनिक’ आणि ‘पारंपरिक’ अशी नीतीची दोन प्रतिमाने आहेत. आता, आपले कर्तव्य काय? तर ह्या दोन्हींची कसून चौकशी (Inquiry ) करणे, हे होय. युगनिष्ठेच्या दृष्टीने विचार केला, तर आज भारतात ही दोन प्रतिमाने एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून उभी आहेत. कालानुरूप, त्यांत थोडाफार फरक दिसत असला, तरी मूळ गाभा मात्र तोच आहे. आधुनिक नीतीचा अधिक भर हा ‘मानवी हक्कांवर’ आहे, तर पारंपरिक नीती ‘कर्तव्यावर’ अधिक भर देते. हे दोन प्रवाह आज भारतात आहेत. यांपैकी, पहिला प्रवाह, ज्याची पाळेमुळे पश्चिमेच्या प्रबोधन चळवळीत रोवलेली आहेत आणि स्पेंसर, मिल, मार्क्स यांसारख्या आधुनिक ऋषींद्वारा भारतापर्यंत येऊन धडकलेला आहे आणि दुसरा प्रवाह, पारंपरिक भारतीय संस्कृतीचा आहे; पण पहिल्याप्रमाणेच या दुसऱ्या प्रवाहातशी साम्यभेद आहेतच. याचं ठळक उदाहरण म्हणजे बौद्ध नीतीचं देता येईल. बौद्ध नीतीची जवळीक हिंदू धार्मिक-पारंपरिक नीतीऐवजी आधुनिक नीतीशीच अधिक आहे. त्यामुळे आधुनिकता आणि बौद्ध परंपरा ह्यांचा मेळ घालणारा प्रवाहही भारतात आहे.

आपल्यापुढे आज जी नैतिक समस्या उभी झाली आहे, तिचा संबंध काहीसा ‘आधुनिक’ आणि ‘पारंपरिक’ नीतीमधील संवादाच्या अभावाशी आहे, असे म्हणावे लागेल. आणि ह्या दोन्हींत जो काही संवाद झाला असेल, तो म्हणजे दोन कर्णबधिरांचा एकमेकांत झालेला संवाद या स्वरूपाचा होता. आज आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या संवादाची अत्यंत गरज आहे. आपल्या इथे असा संवाद का होऊ शकला नाही, याला अनेक कारणे असू शकतील. आदरणीय प्रा.मे.पुं.रेगे यांनी ह्या कारणांचा ज्या नेमकेपणाने खुलासा केला आहे, तो मी त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे. ते म्हणतात,

“वैचारिक साहित्याची परंपरा आपल्याकडे निर्माण झालीच नाही असं नाही…. वैचारिक परंपरा, विष्णुबुवा ब्रम्हचारी, लोकहितवादी, ज्योतिबा फुले, रानडे, आगरकर, टिळक यांनी निर्माण केली होती. हे सर्व विचारवंत, त्या काळात महाराष्ट्रापुढचे जे प्रश्न होते, सामाजिक, काही प्रमाणात आर्थिक, राजकीय, त्यांच्याविषयी आपलं चिंतन-लेखन समाजाला जागृत करण्यासाठी करीत…. आपण पहा, टिळकानंतर असं नाव आपण घेऊ शकत नाही. आंबेडकरांचं घेता येईल पण आंबेडकर हे त्या परंपरेतीलच आहेत…. आता त्यांना कोणी घडवलं होतं? तर, नवीन जे एक पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, ज्या तत्त्वज्ञानाने आधुनिक स्वरूपाच्या समाजाची पायाभरणी केली, अनुभववाद, वैज्ञानिक विचारपद्धती यांचा, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ह्या प्रबोधनाच्या मूल्यांचा यथायोग्य आविष्कार कोणत्या प्रकारच्या जीवनात होईल ह्याचा विचार, हे सर्व जे चिंतन होतं त्याच्या पार्श्वभूमीवर ते बऱ्याच प्रमाणात आत्मसात करून ही वैचारिक परंपरा महाराष्ट्रात विकसित झाली, हे आपल्याला माहीत आहे. पण पुढे गांधीवाद, मार्क्सवाद यांसारखे अत्यंत प्रभावी असे वैचारिक संप्रदाय विकसित झाले असूनही मराठीमध्ये त्यांचं प्रतिबिंब पडलं आहे असं आपल्याला दिसत नाही. हे असं का झालं असावं? याचं कारण मला वाटतं ते असं : ह्या प्रकारच्या विचाराला पायाभूत असं जे तत्त्वज्ञान होतं त्या तत्त्वज्ञानाची हेळसांड आपण केली. आता मी ज्यांची नावे घेतली ती फार मोठी नावे आहेत. पण आपण पहा, त्यांच्यापैकी ज्याला दार्शनिक म्हणता येईल, फिलॉसॉफिकल म्हणता येईल त्या पातळीवर लेखन, ते फार थोड्यांनी केलं आहे आणि फार तुटपुंजेपणे केलं आहे. अशा दार्शनिक पातळीवरचं लिखाण एक रानड्यांत आढळेल आणि टिळकांत आढळेल. आगरकरांनी सुधारणांचा प्रचार केला हे खरं आहे आणि त्यांचा प्रामाणिकपणा हा निखळ होता, पारदर्शक होता. त्याचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर आणि वाचकांवर पडला ह्यांत शंका नाही. पण ह्या नवीन तत्त्वज्ञानाचा जो सैद्धान्तिक पाया होता त्याचं व्यवस्थित विवरण त्यांनी केलं नाही. ही हेळसांड आपण केली आणि त्यामुळे हा विचार सकस राहिला नाही, असं मला वाटतं.”

प्रा.रेगे ह्यांनी ज्या नवीन तत्त्वज्ञानाचा उल्लेख केला, ते आधुनिकतेचेच तत्त्वज्ञान होय. महाराष्ट्रात, किंबहुना संपूर्ण भारतात जे प्रबोधन पर्व झालं, त्याची प्रेरणा म्हणून आधुनिकतेकडे पाहता येईल. ह्यातूनच, ऐहिक निष्ठा ही एक युगनिष्ठा म्हणून आपल्या समोर आली. बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा,अनुभववाद हे या ‘ऐहिक निष्ठेचे’ अर्थातच ‘इहवादाचे’ मुख्य घटक होत.या ऐहिक निष्ठेचाच एक आविष्कार म्हणजे श्री.एम.एन.रॉय यांचा ‘नवमानववाद’ (New Humanism) होय. इहवादाचे हे तत्त्वज्ञान आजच्या महाराष्ट्रातील पुरोगामी, अमूलाग्र परिवर्तनवादी चळवळीचे, मग ती म.फुले, शाहू, आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणारी असो, मार्क्सवाद-समाजवाद यांना शीरोधार्य मानणारी असो किंवा ती आगरकरांना अनुसरणारी असो, यांचे अधिष्ठानस्वरूप तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे, त्यांची गांभीर्यपूर्वक अशी चिकित्सा– अनुकूल व प्रतिकूल–करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. ते तसे आपण केले नाही, तर आजच्या समकालीन प्रश्नांची सोडवणूक करणे आपल्यासाठी कठीण होऊन बसेल. आता प्रश्न असा की, त्यासाठी आपण काय करायला हवे? ह्याचे उत्तर देताना प्रा.रेगे म्हणतात:

“मिल आणि स्पेन्सर या आधुनिक ऋषींच्या द्वारा जे ब्रिटिश तत्त्वज्ञान महाराष्ट्रात आलं, त्याची पाळंमुळं कुठे जातात, त्याची गृहिकृत्यं काय आहेत, आक्षेप घेतले असता ती कितपत टिकून राहतात, ह्या सर्वांचा सुव्यवस्थित विचार आणि त्याची मांडणी आपल्याकडे झाली पाहिजे, हे एक. ह्याच पाश्चात्त्य वैचारिक परंपरेचा दुसरा जो महत्त्वाचा असा प्रवाह होता, इम्यॅन्युअल कांट आणि त्याचे नंतरचे अनुयायी, ज्यांनी व्यक्तीची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, स्वायत्तता, समानता, आणि न्याय या संकल्पनांना एक वेगळा आशय देऊन त्यांची सुव्यवस्थित अशी मांडणी केली, जिचा पुढे विकास आपल्याला हेगेल आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानांतून आढळतो– मी हे केवळ ॲकेडेमिक तत्त्वज्ञान म्हणतच नाही. प्रत्यक्ष सामाजिक व्यवहाराला जाऊन भिडणारं, सामाजिक प्रश्न ओळखणारं– त्यांची मांडणी करून, त्यांची उत्तरं शोधणारं असं हे तत्त्वज्ञान मी म्हणतो — हा दुसरा प्रवाहही महाराष्ट्रात पूर्णपणे झाकोळला गेल्यासारखाच आहे. त्यासंबंधीही काही लिखाण झालेलं नाही.

आपला जो भारतीय दर्शनांचा, शास्त्रांचा वैचारिक वारसा आहे, ज्याची परंपरा ब्रिटिश आल्यावर, ब्रिटिश अंमलामुळे कृत्रिमपणे खंडित झाली, ज्याचं माध्यम बऱ्याच प्रमाणात संस्कृत आणि काही प्रमाणात पाली, अर्धमागधी इत्यादी आपल्या अभिजात भाषा हे होतं, त्याच्यावरतर ही महाराष्ट्रीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती आधारलेली आहे….आपल्या संस्कृतीचं हे सबंध अंग आपण जवळजवळ दुर्लक्षित केलं आहे. असा एक काहीतरी छाप या परंपरेवर बसला आहे की ही ब्राम्हणी आणि म्हणून प्रतिगामी परंपरा आहे. परंतु श्री.आ.ह.साळुंखे यांच्यासारख्या विद्वानांनी हे दाखवून दिले आहे की ह्या सबंध भारतीय परंपरेचा फार मोठा अंश, घटक अब्राम्हणीआहे. डॉ.आंबेडकरांनीसुध्दा सर्व आधुनिक मूल्यांवर समाज आधारला पाहिजे हे मान्य करूनही अखेरीस, बौद्ध धम्माचा, ह्याच परंपरेतील एका धम्माचा आश्रय घेतला, ह्याचं मर्म आपण ओळखलं पाहिजे. ह्या संस्कृतीने आपल्याला घडवलेलं आहे आणि आपण ‘आपण’ म्हणून, ‘आपले’ म्हणून जगणार असू तर ह्या संस्कृतीला विसरून चालणार नाही. विश्वबंधुत्व हे मूल्य मोठं आहे. जिथे असेल तिथे प्रत्येकजण इतरांविषयी आस्था बाळगेल , बंधुभाव बाळगेल. हे खरं आहे. पण प्रत्येकजण म्हणजे कोण? प्रत्येकजण वेगळा असला पाहिजे. He is to count as one. मग आपण म्हणजे कोण? तर भारतीय! म्हणजे कोण? तर ह्या सांस्कृतिक वारशानं घडविलेले ते आपण. हा वारसा जे नाकारतात त्यांच्याही रोमारोमांत तो भिनलेला असतो. फक्त त्याची जाणीव नसते. तेव्हा ही जाणीव करून घेऊन, ह्या वारशाचं चिकित्सक परिक्षण करुन, त्यात काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे, हे ठरवून, ते तारतम्य बाळगून, त्याचा अभ्यास करीत राहणं म्हणजे आपल्या परंपरेवरची आपली पकड पुन्हा मजबूत करणं‌. (ह्या परंपरेत नंतरच्या काळात जे इस्लामी आणि ख्रिस्ती प्रवाह आले, त्यांनाही तिच्यात सामावून घेऊन जी भारतीय वैचारिक परंपरा निर्माण झाली, तिचा साकल्याने, एकत्रितपणे विचार करत, तिची चिकित्सा करावी लागेल.) ती जर आपण केली नाही तर आपण इतके विस्कळीत होऊ की सुट्या सुट्या व्यक्तींचा समुदाय, जो समाज होऊ शकत नाही, अशा तऱ्हेचे रूप ह्या महाराष्ट्राला आणि भारताला येऊ शकेल. आणि ती एक भयावह अशी परिस्थिती आहे.”

आज अशी भयावह स्थिती भारतात नाही काय? ती तशी का आहे, हिची वैचारिक कारणमीमांसा वर आलीच आहे. आज आपल्याला समाजात जो विस्कळीतपणा जाणवतो, त्याचे नेमके मर्म प्रा‌.रेग्यांनी सांगितले आहे. येथे, ‌प्रा.रेगे आपल्यासमोर एक कार्यक्रमपत्रिका ठेवतात. वैयक्तिक स्वार्थापलिकडे जाऊन सामाजिक उत्कर्षात ज्यांची आस्था, त्या सर्वांनी हा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. आता ह्या कार्यक्रमाची दिशा काय असू शकेल? असे विचारता येईल.

मी एक उदाहरण देतो: आमच्या गावात एक शाळा आहे. दोन वर्षांपासून ती बंद आहे. गावात साधे एक ग्रंथालयसुद्धा नाही. आता, गावात ह्या शाळेत जाणारी मुलं अगदी सामान्य कुटुंबातील. हे लोक वर्षाच्या तीनही ऋतूंत राबतात. हाताला काम नसेल, तर पोटाला अन्नपाणी मिळणार नाही. पावसाळ्यांत दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात आणि इतर काळात ऊसतोडणी, सोयाबीन काढणी ह्यासाठी आपल्या लेकरांबाळासहित संपूर्ण बिऱ्हाडासह परगावी जातात. मग लेकरांनी शाळेत जाण्याचा प्रश्न तेथेच निकालात निघतो. त्यापैकी बरेचजण कामाच्या शोधात पुण्या-मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेतात. तिथे ते कुठे राहतात? तर त्यांची पालं असतात. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरापासून खाली मनपा स्टेशनपर्यंत पैदल चालत गेल्यास रस्त्याच्या उजव्या कडेला तुम्हाला ती दिसतील. हे लोक कोण आहेत? ते पुण्यात आहेत; परंतु ते आहेत याचं भान पुणेकरांना आहे असं मला वाटत नाही. रात्री दारू पिऊन आनंदात धिंगामस्ती करत असतात. सर्व तऱ्हेचे आवाज त्या दिशेने ऐकू येतात. तेवढीच त्यांच्या अस्तित्वाची एक निशाणी पुणेकरांसाठी आहे, एरवी नाही. ते लोक असले तरी अदृश्य असल्यासारखेच आहेत. असे हे आमचे, आमच्यातलेच लोक आणि त्यांना जर आपण असं वागवत असू तर हा आमचा एक समाज आहे असं म्हणून घ्यायचा अधिकार तरी आपल्याला आहे काय? ते वास्तव नाही असा याचा अर्थ आहे. आमच्यातले जे समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आहेत ते ह्या माणसांचा अभ्यास करणार नाहीत. तर युरोप-अमेरिकेत ज्या प्रकारची टूम समाजशास्त्रात, अर्थशास्त्रात निघाली असेल त्या प्रकारचं काम इथे भारतीय संदर्भात करणार. कारण आमचे डोळे विदेशात जे यश, मान्यता मिळेल तिकडे लागले आहेत.

‘माणूस हा सुखाची गोळाबेरीज करणारं एक यंत्र आहे.’ असं युरोपातील एजवर्थसारख्या एखाद्या अर्थतज्ज्ञाने म्हणायचं आणि आम्ही इथे त्याचा कित्ता गिरवायचा. तो इंग्रज माणूस त्याच्या भाषेत काय सांगतोय याचा अनुवाद आपण येथे मराठी माणसांसाठी करत राहू, परंतु हा मराठी माणूस त्या अनुवादित शब्दाद्वारे काय सांगू पाहतोय, कुणासाठी सांगू पाहतोय याचा विचार आपण कधी करणार? आपण आपल्या समाजाकडे आपला चेहरा वळवला पाहिजे. आणि हे निरिक्षण करण्यासाठी आपल्याला माणसांच्या अंत:करणात जागा मिळवावी लागते. ह्या सर्व विचारांचं फलित म्हणजे ह्या माणसांच्या जगण्याच्या पद्धतीत सुधारणा होणं. ती सुधारणा म्हणजे अधिक चांगल्या रीतीनं जगता येण ह्या स्वरूपाची असणं, अधिक भौतिक समृद्धी आली की नाही हा प्रश्नच नाही. असं वळण आपल्या विचारवंतांना पडल्याशिवाय इथे, खरा, जोमदार सामाजिक विचार विकसित होईल, हे अशक्य आहे. तोपर्यंत आपण काय करू? जे जसं आहे, ते तसं कायम ठेवू, की जी जी बौद्धिक फॅशन पश्चिमेत येईल, तिचा केवळ अनुवाद आपण मराठीत करत राहू? पण त्यात आपली माणसं कुठेच असणार नाहीत. आपली दु:ख, आपले लोक, आपली संस्कृती कुठेच असणार नाही. आपण भारतात असूनही, आपल्यात भारत असणार नाही. ही कृत्रिम आणि आपल्याला घातक अशी अवस्था आहे. हिच्यातून आपण अजून बाहेर पडू शकलेलो नाही. आणि आपण बाहेर पडू शकू ते केवळ आपल्या लोकांच्या सहाय्यानेच. तेव्हा आपल्याला आपलं खरं सत्व लाभेल आणि विचारांना एक सामाजिक बैठक असेल, काही खरं चैतन्य असेल. तेव्हा खऱ्या अर्थाने, आपण भारतात असू आणि भारतही आपल्यात असेल.

एम.ए.(प्रथमवर्ष: अर्थशास्त्र)

संदर्भ:
१) रेगे,मे.पुं,” पाश्चात्त्य नीतीशास्त्राचा इतिहास.”
२) रेगे,मे.पुं, ” हिंदू धार्मिक परंपरा आणि परिवर्तन.”
३) संवादिनी,१९९५

 

अभिप्राय 1

  • लेखातून वैचारिक राष्ट्रवादास चालना मिळते
    ज्याची वर्तमानकाळात अतिशय गरज आहे.अगदी थोड्या शब्दात परंतु भारतीय लेखकांच्या बौद्धिकतेला, आपलेपणाच्या-परकेपणाच्या भावनिकतेच्या कल्पनांना खुणावणारा लेख.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.