विक्रम आणि वेताळ – भाग ७

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“हां, तर कुठे होतो आपण राजन्?” 

“तू त्या झाडाच्या फांदीवर उलटा लोम्बकळत होतास; मी तिकडून, काट्याकुटयांनी भरलेल्या पायवाटेने येऊन तुला फांदीवरून कसंबसं उतरवून खांद्यावर घेतलं आणि आता  स्मशानाच्या दिशेने निघालो आहे.” 

“तसं नाही रे बाबा, मी म्हणत होतो की गेल्या खेपेस, दुःख निवारण करण्याचा आणि भविष्यातील अनिश्चितता कमी करण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आपण कुठवर आलो होतो?”

“ओह्ह…. विसरला असशील तर बरंच आहे.”

“इतक्या सहजासहजी विसरत नाही मी राजन्, संभाषण सुरू करण्याची एक पद्धत म्हणून ‘कुठे होतो आपण’ असं म्हटलं मी…. पण ते असो

तर, मागच्या खेपेत मी तुला ‘दुःख निवारण्याचा मार्ग’ शोधण्यासाठी मुळात आपण ‘दुःख म्हणजे नेमकं काय?’ हे आधी नको का समजून घ्यायला?’ असा प्रश्न केला होता. आणि त्यावर तू म्हणाला होतास की, ‘ती आता पुढची पायरी’. 

पुढे तू असंही म्हणालास की ‘अर्थात, हे वाटतं तितकं अजिबात सोपं नाही, कारण, सुखदुःख हे जसं पूर्णपणे व्यक्तिगत (subjective) असतं, तसंच ते तुलनात्मकही असतं; ज्या गोष्टींनी एकाला सुख होतं त्याच गोष्टींनी दुसऱ्याला दुःखं होऊ शकतं. त्यामुळे सुखदुःखाची नामावली/वर्गवारी करता येणे शक्य नाही आणि आपल्या उपयोगाचेही नाही. सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे आपल्याला सुखदुःखाच्या व्यक्तिनिष्ठ/विशिष्ट (subjective), अनुभवातून एक निरपवाद, सार्विक आणि वस्तुनिष्ठ (universal, objective) नियम शोधून काढायला हवा आणि तो निश्चितार्थी विधानात मांडायला हवा.’ थोडक्यात सांगायचं तर, सुखदुःखाची व्याख्या करण्याचा तू प्रयत्न करणार होतास.”

“हो, अगदी बरोबर. पण कसं आहे ‘मला वाटतं म्हणून’ माझ्या मर्यादित अनुभवावरून मला ही व्याख्या करावयाची नाही. ती व्याख्या निरपवादपणे सर्वांना पटेल अशी समर्पक, निश्चितार्थी व्याख्या असायला हवी. प्रत्येकाला वेगवेगवेळ्या गोष्टीत सुख असले तरीही त्या व्याख्येत प्रत्येकाला अभिप्रेत असलेल्या व्यक्तिगत सुखाचे प्रतिबिंब दिसेल अशी ती सर्वसमावेशक असायला हवी. ह्यासाठी आपण एक वेगळी पद्धत अवलंबून बघूया.

लहानपणी गुरुकुलात आम्हांला गुरुजींनी विधानांचे दोन प्रकार शिकवले होते.

त्यातील पहिल्या प्रकारच्या विधानातून निघणारा निष्कर्ष हा नेहमीच अनिश्चित असतो आणि दुसऱ्यातून निघणारा नेहमीच निश्चित असतो.

पहिला, उद्गामी किंवा संश्लेशक (Inductive) आणि दुसरा, निगामी किंवा विश्लेषक (Deductive).

त्यासाठी त्यांनी उदाहरणेही दिली होती.

समजा, मी बघितलेले सगळे कावळे काळे होते, ‘म्हणून’, मी जर ‘सर्व कावळे काळे असतात’ असे विधान केले तर ते उद्गामी विधान होईल. ह्यात ‘सर्व कावळे’ म्हणजे पूर्वी होऊन गेलेले, आता जिवंत असलेले आणि पुढे जन्माला येतील ते सगळे कावळे अंतर्भूत आहेत. त्यामुळे अतिशय थोड्या आनुभविक (empirical) नमुन्यांवरून मी हे सार्विक (universal) विधान करतो आहे. परंतु हे विधान ‘सत्य’ आहे की नाही हे जर अनुभवजन्य ज्ञानावरून ठरवायचे असेल तर प्रत्येक नमुना तपासून बघितल्याशिवाय त्याची सत्यता पडताळून बघता येणार नाही. आणि भूतकाळ, वर्तमानकाळ तर जाऊच दे पण भविष्यातील प्रत्येक नमुना आपण कसा तपासणार? 

त्यामुळे अशा मर्यादित अनुभवावर बेतलेली सार्विक (universal) उद्गामी विधाने नेहमीच अनिश्चित असतात. 

ती फक्त संभाव्य (probable) असू शकतात आणि त्यांची खरे ठरण्याच्या संभाव्यतेची टक्केवारी (probability) आपण किती नमुने तपासून बघितले ह्यावर अवलंबून असते.”

“अरे मग इतका द्राविडीप्राणायाम करून सांगण्यापेक्षा साध्या सरळ मराठीत सांग ना, की उद्गामी विधाने म्युच्युअल फंडांच्या disclaimer सारखी असतात!”

“म्हणजे रे काय?”

“अरे ते वाक्य असतं ना त्यांचं . . , Past performance is no guarantee for future results!”

“हम्, अगदी बरोबर… आणि दुसरा प्रकार असतो निगामी किंवा विश्लेषक (deductive) विधाने. 

आता ‘सर्व कावळे काळे असतात’ ह्या वाक्यातील विधेय म्हणजे ‘काळे’ हे आपण कावळ्याच्या संकल्पनेचाच भाग आहे असे जर म्हणणार असू, म्हणजेच जे पक्षी आपण कावळे म्हणून ओळखतो ते जर ‘काळे’ असले तरच कावळे आणि ‘काळे’ नसले तर ते कावळे नाहीत, असे जर म्हणणार असू तर ‘सर्व कावळे काळे असतात’ हे विधान निगामी पद्धतीचे होईल आणि निश्चितार्थाने सार्वकालिक सत्य किंवा वैध ठरेल.”

“हां, म्हणजे कावळेपणाची आणि काळेपणाची ह्या दोन्ही व्याख्या एकमेकांत गुंतवून टाकायच्या, आपल्या गेल्याखेपेतील गणिताप्रमाणे.”

“हो, पण इथे कावळेपणाची आणि काळेपणाची ह्या दोन्हीं व्याख्या सत्य आहेत. त्यामुळे त्यांचं समीकरण आपण (+x) × (+y) = +xy असं मांडू शकतो. आता त्याच्या उत्तराची, xy ची खूण ‘+’ येत असल्यामुळे ते उत्तर सार्वकालिक सत्य किंवा वैधच असणार.

परंतु, आपण ‘सर्व कावळे काळे असतात’ ह्या उदाहरणात काळेपण जसं कावळ्याच्या संकल्पनेतच जोडलं, तसं सुखदुःखाच्या बाबतीत मात्र करणं शक्य नाही. कारण काळेपण हे सार्विक आहे. म्हणजे तुम्ही त्याला black म्हणा की कृष्ण म्हणा, की काळा म्हणा, आपल्यासमोर तोच एक रंग येणार. परंतु सुखदुःखे ही तशी सार्विक नाहीत. ती पूर्णपणे व्यक्तिगत आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांची व्यक्तिकेंद्रितता दुर्लक्षित करता येणार नाही. हा खूपच अवघड प्रश्न वाटतोय.

आता असं पहा, मी बघितलेल्या सर्व व्यक्ती सुखाच्या शोधात होत्या कारण त्यांना सुखाची आस लागली होती, ह्यावरून मी एक विधान करतो;

‘सर्वांना सुख हवेहवेसे असते’. 

अर्थात, हे विधान मी काही व्यक्तींवरून केले आहे, परंतु आपल्याला करावयाच्या असलेल्या सार्विक विधानांत सर्व व्यक्तींचा अंतर्भाव असल्याने, त्या थोड्या लोकांचीदेखील सुखाविषयीची संकल्पना सार्विक व्याख्येत अंतर्भूत असायला हवी. मला जर हे उद्गामी विधान आता निगामी पद्धतीने करायचे असेल तर हे ‘हवेहवेसेपण’ सुखाच्या व्याख्येतच गोवावे लागेल. म्हणजे जर ती गोष्ट ‘सर्वांना’ हवीहवीशी वाटत असेल तरच तिला सुख म्हणता येईल.

परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती, हे आपल्याला माहीत आहेच, काहींना मरणाचा विचार दुःखदायक वाटू शकतो, तर त्याच वेळी काहींना ‘मरण बरे’ वाटू शकते. कोणी एखादे मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर विंचू चावला तरी ‘थंड, सुखकारक वाटतेय’ असे म्हणू शकते; आणि काहींना, इतरांना अपशकुन व्हावा ह्यासाठी स्वतःचं नाक कापून घेण्यातही आनंद वाटू शकतो. 

बरं सुखदुःखाची जाणीव पूर्णपणे व्यक्तिगत असल्यामुळे कोणाला कशात सुख वाटावं हे केवळ ते स्वतःच ठरवू शकतात, आपण नाही. 

तेव्हा ह्या विधानात, ते निरपवादपणे सार्विक करण्यासाठी ‘सर्वांना’ हा शब्द वापरणे अयोग्य होईल.” 

“पण मग राजन्, कोणता शब्द तिथे योजावा म्हणतोस?”

” ‘सर्वांना’ ह्या शब्दाऐवजी ‘प्रत्येकाला’ हा शब्द योग्य वाटतो, कारण ‘प्रत्येक’ ह्या शब्दात एकएक व्यक्ती आणि एकूणएक/सर्व व्यक्ती हे दोन्हीही अर्थ सामावलेले आहेत.”

“Ok, Ok, . . . म्हणजे, each and every असं म्हणायचंय तुला, किंवा… ते काय लिहिलेलं असतं, बँकेच्या खात्यातून सही करून पैसे काढतेवेळी?

हां, jointly and severally!” 

“बरोब्बर, फक्त आपण एकच फरक करू, तो म्हणजे jointlyच, पण severally असं म्हणू.

त्यामुळे ‘प्रत्येकाला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात जे हवेहवेसे वाटते, ते त्याच्यासाठी सुख, आणि प्रत्येकाला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात जे नकोनकोसे वाटते, ते त्याच्यासाठी दुःख’. 

ह्यावरून सुखदुःख म्हणजे नेमकं काय ते आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येईल; काय म्हणतोस? जमलंयना आता?”

“राजन् तू राजा आहेस खरा पण धैर्याची मात्र थोडी कमतरता आहे तुझ्यात.”

“काय म्हणतोयस तू आणि कशावरून?”

“अरे, सुखदुःखाची व्याख्या दोन तीन परिच्छेदात करून खूश झालास. पण इतकं सोपं नाहीय ते. माझ्या आक्षेपांची उत्तरं द्यावी लागणार आहेत तुला.”

“बरं, बरं, देईन मी सगळी उत्तरं तुला. विचारून तर बघ.”

“तू जी सुखदुःखाची व्याख्या केलीस, ‘जे हवेहवेसे वाटते ते सुख आणि जे नकोनकोसे वाटते ते दुःख’ ही काही तितकीशी बरोबर वाटत नाही.” 

“वा रे, म्हणजे ‘नकोनकोसे वाटते ते सुख असते आणि हवेहवेसे वाटते ते दुःख, असं म्हणणं आहे का तुझं?”

“हे बघ, आपणां सर्वांना आपापल्या आयुष्यातील दुःख निवारण्याची इच्छा असते ह्याचाच अर्थ सुखाची इच्छा असते. परंतु आता ही काही उदाहरणं बघ. 

मी आळशी आहे, मला पांघरुणात गुरगुटून झोपण्यात अतिशय आनंद आहे, पण तरीही मी पहाटे उठून कितीही नकोनकोसा, त्रासदायक वाटला तरीही व्यायाम करतो.

अभ्यास करणं नकोनकोसं वाटलं तरीही अभ्यास करतो.

दारू पिणं कितीही हवंहवंसं वाटलं तरीही दारूपासून चार हात दूर राहतो. तर ह्या सगळ्याचा अर्थ मी सुखाच्या ऐवजी दुःखात राहू इच्छितो असा करायचा का?”

“हां, पॉईंट बरोबर आहे तुझा! 

पण असं बघ, ह्या तीनही उदाहरणांत तू तात्कालिक दुःख सहन करतो आहेस, आज ही दुःख जर तू सहन केलीस तरच तुला भविष्यात सुख मिळेल ह्या आशेने. 

त्यामुळे भविष्यातील सुखासाठी तू ही तात्कालिक दुःख स्वतःहून निवडली आहेस. म्हणजेच ही तात्कालिक दुःख सहन केली तरच तुझं कल्याण होईल, भलं होईल किंवा तुझं हित जोपासलं जाईल हे तू जाणतोस. ते हित किंवा कल्याण, लौकिक असू शकतं किंवा पारलौकिकही. स्वर्गसुख मिळण्याच्या आशेने लोक इहलोकात नरकयातना भोगायलाही आनंदाने तयार होऊ शकतात, त्यातच सुख आहे असं समजू शकतात. परंतु तू म्हणतोस ते बरोबर आहे. केवळ ‘हवंहवंसं वाटतं ते सुख’ ही व्याख्या अपुरी आहे. ज्या गोष्टी घडल्या तर किंवा केल्या तर आपलं कल्याण/भलं होईल असं आपण समजतो त्याही आपल्याला सुखकारक वाटतात.

त्यामुळे सुखाच्या व्याख्येत, ‘जे हवंहवंसं वाटतं ते’, ह्यासोबतच, ‘जे कल्याणकारक असतं ते’, हेही जोडावं लागेल.”

“राजन्, अरे पण ही देखील व्याख्या अपुरी आहे. आता मी एक विधान करतो बघ;

‘सर्व सुखी लोक आनंदी असतात’. कारण जर काही लोक सुखी असूनही ‘आनंदी’ नसतील, तर ‘काही सुखी लोक ‘दुःखी’ असतात’ असा त्याचा अर्थ होऊ शकेल, (कारण सुखी आणि आनंदी ह्या दोन्हींचा विरुद्धार्थी शब्द ‘दुःखी’ हाच आहे) आणि तो वदतोव्याघात (contradiction) होईल. .”

“हां, खरंय, म्हणजे आपल्याला सुखाच्या व्याख्येत, ‘जे आनंददायक असतं ते’ हेही गुंफावं लागेल. आता आपली सुखाची व्याख्या ‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात, जे हवंहवंसं, आनंददायक आणि कल्याणकारी वाटतं ते सुख’ अशी करावी लागेल. बरोबर ना?”

“नाही राजन्, माझं अजुनही पूर्ण ‘समाधान’ होत नाहीय.”

“आली हां तुझी hint माझ्या लक्षात!

म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की,भविष्यातील कल्याणासाठी वर्तमानात दुःख सहन करून नंतर जेव्हा प्रत्यक्षात आपलं भलं/कल्याण होतं तेव्हा आपल्याला आनंद होऊन आपल्या कष्टांचं चीज झाल्याचं, सार्थक, कृतार्थ झाल्याचं समाधान मिळतं. अशी ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला सुखकारक होते. ही प्रक्रिया जर पूर्ण झाली तर आपण केलेले कष्ट, भोगलेली दुःख, आपल्यावर आलेल्या आपत्ती, अडचणी ह्या सगळ्यांचं रूपांतर कालांतराने, सुखात होतं. भोगलेली दुःख जितकी जास्त तितकं त्यांवर मात करून आपलं ईप्सित साध्य केल्याचं सुख जास्त. अगदी तसं, जसं एखादं आंबट, तुरट फळ पिकल्यावर मधुर, गोड व्हावं.”

“हो राजन्, खरंय, जसं युद्धात शरीरास झालेल्या वेदनादायक, प्राणघातक जखमांचे व्रण पुढे अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने मिरवले जातात.”

“तर मग आता आपण सुखाची व्याख्या अशी करूया;

‘प्रत्येकाला आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात जे हवंहवंसं, आनंददायक, कल्याणकारी वाटतं आणि समाधान देतं ते सुख’ आणि अर्थातच ह्याच्याच विरुद्धार्थी दुःख.”

“राजन्, सर्वसमावेशक, सम्पूर्ण सुखदुःखाची व्याख्या तर थोडी जमलीय आता. परंतु तू म्हटल्याप्रमाणे व्यक्तिगत सुखं अगदी वेगवेगळी असू शकतात. तर मग त्यांची वेगळी सार्विक व्याख्या करता येऊ शकेल का?”

“हे बघ, सुखदुःख हे नेहमी तुलनात्मक असतं, तुला ते माकडीण आणि तिच्या पिल्लाचं उदाहरण माहीतच असेल. ती अडकली असलेल्या टाक्यातलं पाणी जेव्हा तिच्या नाकातोंडात जाऊ लागतं तेव्हा, तोपर्यंत पिलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी माकडीण, तिच्याच पिलाला पायाखाली घेऊन स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करू लागते.

म्हणजे, प्रत्येकजण त्याला व्यक्तिगत जे ‘परवडतं’ ते सुखदुःख निवडतो.

आपला जीव जाण्याची शक्यता दिसल्यावर माकडिणीला, पिलाला वाचवणे ‘परवडेनासे’ झाले, आणि म्हणून तिने पिलाला वाचवण्याचा प्रयत्न सोडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

तर व्यक्तिशः जे रुचेल, जे परवडेल, ते सुख ती व्यक्ती निवडते, किंवा त्याला अग्रक्रम (preference) देते. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीने निवडलेल्या किंवा अग्रक्रम/प्राधान्य दिलेल्या गोष्टीत त्या व्यक्तीला सुख आहे असं आपण म्हणू शकतो.

जसं, काही व्यक्ती आरोग्याचं आपलं हित दुर्लक्षून दारू पिण्याला अग्रक्रम देऊ शकतात. तर काही, इतरांसाठी सर्वस्व त्याग करण्याला अग्रक्रम देऊ शकतात. परंतु त्या प्रत्येक व्यक्तीने जो काही अग्रक्रम ‘स्वतः होऊन’ निवडला असेल त्यातच त्या व्यक्तीला सुख असते, अशी व्यक्तिगत सुखाची व्याख्या आपण करू शकतो.”

“शाबास राजन्, सुखदुःखाच्या सर्वसमावेशक आणि व्यक्तिगत, अश्या दोन व्याख्या तर तू बनवल्यास; त्या बरोबर आहेत किंवा नाहीत, किंवा त्यात आणखीन काय जोडायला हवे अथवा काय बदल करायला हवेत हे आता आपण वाचकांवर सोडू. 

राजन्, व्यक्तिगत सुखाची व्याख्या करतांना तू सुखदुःख कसं तुलनात्मक असतं ह्याविषयी बोललास. पण ती तुलना करण्यासाठी आता तुला सुखदुःख मोजण्याचा मापदंड तयार करावा लागेल. तो तू कसा तयार करशील असा माझा तुला पुढचा प्रश्न आहे.

त्यामुळे, पुढच्या खेपेस मला घ्यायला येशील तेव्हा त्याचा होमवर्क करून ये; अन् लक्षात ठेव, ‘होमवर्क’ म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ नाही! त्यामुळे तुला पुढच्या खेपेत मला घ्यायला यावंच लागणार आहे. हा, हा, हा!”

असं म्हणून वेताळ निघाला आणि पुन्हा झाडावर जाऊन उलटा लोम्बकळू लागला.

क्रमशः . . .

अभिप्राय 2

  • सुखाची आंतरवैयक्तिक तुलना आणि मोजमाप करण्याआधी, तसे करण्यात ज्या अडचणी येतात त्याची सोडवणूक करावी लागेल.
    सुखवादावर घेण्यात येणारे सर्वसामान्य आक्षेप असे सांगता येतील:
    १) मितीविषयक समस्या : सुख हेच स्वयमेवसाध्य (स्वार्थसाध्य) मानले, तर त्याचे संख्यात्मक मापन कसे करणार? सुख मोजण्यासाठी आपल्याजवळ सुखाचे कलनशास्त्र (pleasure calculus) आहे काय? सुखवाद प्रमाण मानून व्यवहारात त्याचे आचरण करावयाचे झाल्यास निरनिराळ्या सुखांची बेरीज करून तिच्यातून दु:खाची बेरीज वजा करावी लागेल. हे करणे जवळजवळ अशक्य आहे, कारण एक सुख दुसऱ्यापेक्षा किती कमी किंवा किती अधिक आहे, हे सांगता येणार नाही. तसेच सुख हा व्यक्तीचा खाजगी अनुभव असल्याने एकाच बाह्य पदार्थापासून निरनिराळ्या व्यक्तीस कमी-जास्त सुखाचा लाभ होईल आणि त्यामुळे त्याचे मापन कोणालाच करता येणार नाही.
    २) न्याय्य वितरण समस्या : सुखाची वाटणी कशी करावयाची हाही प्रश्न आहे. अशी परिस्थिती असेल की, सुख सर्वांना सारखे वाटायचे म्हटल्यास सुखाची एकंदर बेरीज कमी होईल; पण विषम वाटणी केल्यास त्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही काय?व्यक्तीस न्याय द्यावयाचा, असे नैतिक बंधन स्विकारल्यास सुखवाद सोडून द्यावा लागतो.
    ३) गुणात्मक श्रेणीची समस्या : “सुखाची मात्रा सारखीच असेल तर काव्यानंदातील आणि पोरखेळातील आनंद ह्यांत फरक करू नये.” अशी जेरेमी बेंथम ह्यांची भूमिका होती; परंतु सुखवादावरील उपर्युक्त आक्षेपांमुळे दोन सुखांमध्ये गुणात्मक भेद नसतो, ही बेंथम ह्यांची भूमिका जॉन स्ट्युअर्ट मिल यांनी नाकारली. असा गुणात्मक भेद असतो आणि गुणवत्तेच्या दृष्टीने उच्च प्रतीचे असलेले लहान सुख कनिष्ठ गुणवत्तेच्या मोठ्या सुखापेक्षा अधिक इष्ट असते, असे प्रतिपादन मिल ह्यांनी केले; परंतु सुखाचे असे उच्चनीच प्रकारभेद केल्याने सुखवादच सोडावा लागतो. एखादे सुख उच्च आहे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ त्याचे मूल्य सापेक्षतः अधिक असले पाहिजे. अर्थातच, सुखाचे मूल्य त्याच्या सुखत्वावर अवलंबून नसून, अन्य कशाने तरी ते ठरते, असे मानावे लागेल. तात्पर्य, सुख = मूल्य हे सुखवादाचे प्रमेय लटके पडते. “अधिकतम लोकांचे अधिकतम सुख” (Greatest happiness of the greatest numbers) ह्याला परमप्रातव्य म्हणण्यातही दोष आहे. सुख एकमेकांत मिसळता येत नाही. सर्वांच्या सुखांची गोळाबेरीज करता येणे कदाचित शक्य झालेच, तरीही ती बेरीज म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीचे सुख म्हणता येणार नाही.

    सुखावादातील हे दोष मुख्यत: सुख ही एक अमूर्त गोष्ट मानून झालेल्या चर्चेमुळे उद्भवले आहेत. दैनंदिन जीवनात आपण जेव्हा सुखाविषयी बोलतो, तेव्हा अगदी भिन्न अर्थांनी आपण ‘सुख’ ही संज्ञा वापरत असतो. विशेषत: आपण सुख निर्माण करणाऱ्या किंवा ‘सुखनिर्मात्या वस्तूंविषयी’ बोलत असतो. म्हणजे ज्याविषयी आपली तृष्णा असते, ती गोष्ट म्हणजेच त्या सुखकारक ‘वस्तू’ होत, त्यामुळे ती वस्तू आणि त्या वस्तूंपासून प्राप्त होणारे सुख या फरक करता येण्याजोग्या (Distinguishable) गोष्टी असल्या, तरी त्या अलग करता येण्याजोग्या (Separable) गोष्टी नाहीत. एखादी वस्तू आणि तिची लक्षणे या अलग करण्याजोग्या गोष्टी नसतात, त्यात फक्त फरक करता येतो. त्यामुळे वस्तू वा साध्याचा कोणताही संदर्भ न देता, केवळ लक्षणांविषयीच बोलणे, विवेकीपणाचे नाही. त्यामुळे सुखाची अमूर्त कल्पना निरर्थक ठरते. अशा कारणांमुळे, श्री.जी.ई. मूरसारख्या तत्त्ववेत्यानेही अमूर्त सुखाची कल्पना अस्विकारार्ह म्हणूनच त्याज्य ठरविली.
    कृपया,यावर नक्की विचार व्हावा.

  • या पोस्ट वरून एक गोष्ट लक्षात आली की आपली विचारसरणी ही आपल्या भूतकाळातील अनुभवावर, निव्वळ वर्तमानात किंवा भविष्यातील घटणाऱ्या गोष्टींच्या वेध घेणाऱ्या बुद्धिमत्तेवर, आणि परिसरातील आपल्यावर लादलेल्या विचारांवर निर्धारित असते। म्हणायला हरकत नाही की आम्ही थोडेफार विहिरीतील बेडका सारखे असतो। आमचे विचार त्या विहिरी पुरतेच मर्यादित असू शकतात। विचारसरणी हत्तीचे चार अंधळ्यानी केलेल्या एका आंधल्यासारखी असू शकते।
    भरत मला तुझी ही पोस्ट आवडली। तत्वज्ञान हा विषय तस कठीण पण भरत तुझा या विषयातील व्यासंग छान आहे। लेखनशैली खूप छान। भरत च्या लिखाणातून नेहमीच वैचारिक परिभाषा मांडण्याचा प्रयत्न असतो। हे थोडं कठीण काम आहे,, पण तुझा प्रयत्न प्रशंसनीय आहे।

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.