ऑनलाईन शिक्षणाचं आभासी जग

२ वर्षे मुलांना ऑनलाईनच्या प्रवाहात आणतानाही धडपड झाली. आणि याच तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर झाला तेव्हाही ताशेरे ओढले गेले, मुळात कुठलाही नवीन येणारा बदल स्वत:ची नवी आव्हाने घेऊन येणारच. यावेळीही जेव्हा शिकताना अडचणी येतात, तेव्हा तिथूनच नन्नाचा पाढा वाचला जातो. करोनाकाळात शिक्षणाचं गणित बिघडले खरे, पण या परिस्थितीने बऱ्याच सुधारित नवनवीन कल्पना दिल्या हेही तितकेच खरे आहे.

खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अनुभवायला मिळाल्या. अप्रतिम काही तरी नवीन शिकलो आणि ते शिक्षक म्हणून मुलांपर्यंत पोहोचवताना, नव्याने शिकवताना असंख्य अडचणी येत असताना त्याची मजा काही औरच होती. आज जिथे गरज आहे तिथे या नवीन ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा वापर केला तर शिक्षक, विद्यार्थी यांना निश्चितच असंख्य गोष्टी शिकताही येतील, शिकवताही येतील.

जसे काही गोष्टींमध्ये फायदे आहेत, तिथे तोटेही येतातच. पण शिक्षणाच्या दृष्टीने आपण फायद्यांचा विचार करूया. मूल्यमापन ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे जिथे कागदांचा वापर कमी करू शकतो. आज मुले सफाईदारपणे उत्तरे टाईप करू शकतात. त्यांच्या काही कौशल्यांचा वापर आपण करू शकतो. काही कार्यक्रम आहेत तीदेखील मुले आज ऑडिओ, व्हिडिओ करून पाठवतात. तेथेही छान मूल्यमापन करता येते.

मुळात शिक्षकांनी हा बदल स्वीकारला आणि पालकांनी तो स्वीकारला तरच या ऑनलाईन शिक्षणपद्धतीला संधी मिळेल. मुद्दा असा आहे की ही पद्धती खरे तर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक या तीनही स्तरांवर पूर्णपणे न राबवता, काही प्रमाणात जिथे गरज आहे फक्त तेथेच वापरली गेली पाहिजे.

शालेय पातळीवर या आभासी जगाची गरज नाही. जेथे शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे, त्यांच्या कौशल्याच्या, विकासाच्या दृष्टिकोणातून हे आभासी जग अपुरे पडते. हे आभासी जग या वयोगटातील मुलांचा विकास करूच शकत नाही. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्टिकोनातून कौशल्यांचा विचार केला तर  ऑनलाईन शिक्षण त्यांना बाधक ठरते. सर्वच गोष्टी या माध्यमातून घेता येणे शक्य नाही.

आज आपण या दोन वर्षांत हा विकासच कुठे तरी थांबला, खुंटला आणि संपला असं म्हणूया. फक्त तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे शिक्षण नव्हे. आपण आपल्या बुद्धीचा, कौशल्यांचा, शारिरीक, मानसिक क्षमतांचा विचार नुसता बसून करूच शकत नाही. शिकवू शकतो, शिकूसुद्धा. परंतु संपूर्ण अंमलबजावणी शक्यच नाही. अभ्यासक्रमात तितकी लवचिकताही नाही.

एक विधान कानांवर आलं, “आजकाल मुले लिहिण्याचा कंटाळा करू लागली आहेत, लिहिणं विसरली आहेत.” जेव्हा आपण आपल्या बोटांचा वापरच थांबवला, तेथे अक्षर, लेखनकृती, वळणदार अक्षरे, रेषा मारणे ही सर्व कौशल्ये थांबली. मुलांची सफाईदारपणे बोटांनी लिहिण्याची क्षमता आज राहिलेली नाही. आज मुले टाईप करण्यासाठी एक अंगठा किंवा एक बोट वापरतात. या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या पुढच्या टप्प्यांत कदाचित तेही राहणार नाही.

या सर्व क्षमता विकसित करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे, समोरासमोर शिकवताना ती विकसित होऊ शकते. आभासी जग तुम्हाला तेही नकीच शिकवते, कारण शिक्षकच ती साधने तयार करतात. पण शाबासकीची थाप आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर देण्यात जो आनंद आहे, तो इमोजी किंवा चित्र दाखवून नक्कीच देता येत नाही.

आजची शिक्षणपद्धती नक्कीच बदलली पाहिजे. पुस्तकी ज्ञानाबरोबर वर्तमानकाळाशी जुळवून घेणारे ज्ञान तितकेच महत्त्वाचे ठरते. तो बदल हवा आहे. कौशल्याधिष्ठित आणि उपजीविकेची साधने निर्माण करणारे अद्ययावत ज्ञान मुलांना प्राथमिक पातळीपासून टप्प्याटप्प्यावर दिले पाहिजे. आणि त्यांना आवडेल त्या विषयात वर्गात बसण्याची मुभाही दिली पाहिजे. यासारखा आनंद नाही. थोडक्यात आनंददायी शिक्षण, मुलोद्योगी शिक्षण आज महत्त्वपूर्ण ठरते आहे. बदलत्या तंत्रज्ञानातही याच गोष्टींना नवीन प्रकारे विषयात आणणे ही काळाची गरज आहे.

आपली बहुसंख्य लोकसंख्या आज खेड्यापाड्यात आहे. या ऑनलाईन शिक्षणामुळे आपण ती मुख्य प्रवाहात नक्कीच आणू शकतो. जेथे वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत, तेथे मुले ऑनलाईन शिक्षणामुळे नवे ज्ञान लगेच आत्मसात करू शकतात. काही अंशी काही विषय आणि त्यांचे योग्य नियोजन केले तर ऑनलाईन शिक्षण हे मारक न ठरता उलट खूप जास्त प्रमाणात तारक करण्यासाठी शाळेतील नियमित वर्गातही ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे राबवता येऊ शकते.

आज शाळेतील पटसंख्येचा विचार करता ऑनलाईन प्रकार वर्गात आणून आणि वर्गाच्या दोन तुकड्या करुनही शिक्षक उत्तम प्रकारे शिकवू शकतात. हे तंत्रज्ञान नक्कीच शाप नसून वरदानच आहे. आणि त्यासाठी शिक्षकांनी अद्ययावत राहून त्याचे स्वागत करायला काहीच हरकत नाही. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कागदाची बचत, वेळेची बचत, नवीन कौशल्ये रूजवणूक करण्याची ही संधी आहे. जुन्याबरोबर नाविन्याचा मेळ घालायला काय हरकत आहे?

शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि पालक यांची भूमिका इथे महत्त्वाची आहे. संपूर्ण शिक्षण आभासी न राहता, काही अंशी शिक्षणातील काही विषयांसाठी, मूल्यमापनात हे आभासी जग वर्गात, शाळेत आणायला हरकत नाही.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विसर न पाडता या आभासी शिक्षणाचा विचार होणे गरजेचे आहे हेही तितकेच खरे. 

अभिप्राय 1

  • हो अगदी खरे ऑनलाइन शिक्षण मुळे खूप काही बदल झाले खूप नव्याने शिकायला मिळाले पण मॅडम मला असे वाटते की तंत्रज्ञान ला कुठेतरी मर्यादा येतात आणि त्यावर ही आपण मात केली तर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणमुळे काही अंशी आळशी होऊ लागली असे वाटते
    तुमचा लेख सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो त्यामुळे हा उत्तम लेख आहे असे मला वाटते

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.