इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग १

“To the historian, the activities whose history he is studying are not spectacles to be watched, but experiences to be lived through in his own mind; they are objective, or known to him, only because they are also subjective, or activities of his own.” – R.G.Collingwood

(The Idea of History)

इतिहास हा शब्द आपण अनेक भिन्न अर्थांनी वापरतो; पण त्यांपैकी इतिहासाचे दोन अन्वयार्थ विशेष महत्त्वपावले आहेत. इतिहासाचा संबंध काळाशी, विशेषतः भूतकाळाशी असतो आणि गतकाळात घडलेल्या विविध घटना – विवक्षित अवकाश व कालात घडलेल्या – असतात. ह्या घटनांना काही एक क्रम असतो, त्याअर्थी त्या क्रमिक घटना असतात. मानव हा इतिहासाचा केंद्रबिंदू असतो आणि मानवाशी संबंधित घटनांनाच इतिहासात प्रधान स्थान असल्यामुळे भूतकाळातील मानवी जीवन व समाजजीवन यांच्याशी संबंधित घटनांचीच दखल इतिहासकार घेत असतो. ह्या अर्थाने इतिहास स्वत: घडतो, घडत आलेला असतो आणि घटनांच्या स्वरूपात उलगडत जातो. दुसऱ्या अर्थाने, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे संगतवार कथन किंवा निवेदन म्हणजे इतिहास होय. ह्या अर्थाने, इतिहास सांगितला जातो किंवा लिहिला जातो. इतिहासाच्या याच दोन अन्वयार्थांमुळे ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ दोन भिन्न दिशांनी साकार झाले आहे. इतिहासकार इतिहासलेखन कसे करतो? अथवा इतिहासलेखन करणे कसे शक्य होते? हा इतिहासातील एक प्रधान प्रश्न आहे. याच प्रश्नांतून पुढे अनेक उपप्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. हे प्रश्न प्रामुख्याने ‘ऐतिहासिक घटना’ (Historical events), ‘ऐतिहासिक परिकल्पन’ (Historical imagination), ‘ऐतिहासिक पुरावा’ (Historical evidence), ‘ऐतिहासिक ज्ञान’ (Historical knowledge) इ. विषयक असतात.

ज्याला कशाला म्हणून ‘ऐतिहासिक घटना अथवा घडामोडी’ असे म्हणता येईल, त्यांचे आणि त्यांतील स्थित्यंतराचे, परिवर्तनाचे जे ‘ज्ञान’ असते, ते ज्ञान इतिहासकार कसे मिळवीत असतो? ह्या ज्ञानाचे स्वरूप काय असते? इतिहासलेखन करीत असताना इतिहासकार ह्या ज्ञानाचे उपयोजन कशाप्रकारे करत असतो?

हे ज्ञान मिळविण्याची रीत (method) कोणती असते? नैसर्गिक शास्त्रांमध्ये वैज्ञानिक हा नैसर्गिक घटनांचे, निसर्गाचे ज्ञान प्राप्त करीत असतो आणि हे ज्ञान मिळविण्याची जशी विवक्षित वैज्ञानिक रीत ( Scientific method) अथवा रीती असतात; अगदी त्याप्रमाणेच इतिहासकार ऐतिहासिक घटनांचे जे ज्ञान प्राप्त करीत असतो, त्याचे स्वरूप हे वैज्ञानिक निसर्गाचे जे ज्ञान प्राप्त करीत असतो त्याच्या तुलनेत कोणत्या प्रकारे भिन्न असते की दोन्हींचे स्वरूप एकच असते? ऐतिहासिक घटनांचे ज्ञान मिळविण्याच्या ज्या रीती इतिहासकार अवलंबित असतो, त्या वैज्ञानिक रीतींहून कशा भिन्न असतात? त्या भिन्न असल्या पाहिजेत का?

निसर्गात घडणाऱ्या विविध घटनांचे स्पष्टीकरण, त्यांची घडण आणि त्यामागील कार्यकारणभावाचा उलगडा ह्यांचे विवरण करण्याचा प्रयत्न आपण विज्ञानात करीत असतो. इतिहासात ऐतिहासिक घटनेत काय घडले, ते का आणि कसे घडले, ह्याचे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न इतिहासकार करीत असतो. तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, विज्ञानात वैज्ञानिक स्पष्टीकरणाचे जे स्वरूप व रीत असते, तिचे अनुकरण करत ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण करणे शक्य होईल का? तसे करणे कितपत योग्य ठरेल? की इतिहासकाराची ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण करण्याची रीती आणि अर्थ हे शास्त्रीय स्पष्टीकरणातील रीती व अर्थाहून मुळातच भिन्न असतात? जेव्हा आपण इतिहासाविषयी या प्रकारचे तत्त्वज्ञात्मक (Philosophical) प्रश्न विचारू लागतो, तेव्हा त्यांचा समावेश इतिहाससंशोधनाच्या ‘इतिहासाचे रीतिशास्त्र’ (Methodology of History) अंतर्गत होतो.

वैज्ञानिक रीतिशास्त्राचे स्वरूपच असे असते की, त्या अंतर्गत विवक्षित वैज्ञानिक रीतीचे विश्लेषण केले जाते, तिची मूलभूत गृहीतके (Assumptions), आधार विधाने (Axioms) आणि अभ्युपगमांची (Hypothesis) तपासणी केली जाते, वैज्ञानिक पद्धतीचे स्वरूप, तिची व्यवच्छेदक लक्षणे, तिची व्याप्ती, विज्ञानाची उद्दिष्टे, निकष आणि अनिवार्य तसेच पर्याप्त अटींचे परिशीलन करण्यात येते. हे रीतिशास्त्र स्वतंत्रपणे ‘विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Science) म्हणून ओळखले जाते. समग्र विश्वाच्या रचनेबद्दल किंवा विश्वरूपाबद्दल पडताळून पाहता येण्याजोगी विधाने केवळ विज्ञानालाच करता येणे संभवनीय आहे; तत्त्वज्ञानाला हे शक्य नाही. याउलट, विज्ञानातील संकल्पनांचा, उदा; अवकाश, काल, अनिवार्यता, कार्यकारणत्व इ., तसेच सामान्य आणि विवक्षित वैज्ञानिक उपपत्तींचा, वैज्ञानिक रीतींचा तात्त्विक गाभा विज्ञान स्वत: उलगडून दाखवू शकत नाही, ही विज्ञानाची अटळ मर्यादा आहे, तेव्हा ते कार्य तत्त्वज्ञानाचे आहे. या अडचणीतून मार्ग काढत विज्ञान आणि तत्त्वज्ञानातील परस्परसंबंधाची उकल करणारी एक महत्त्वपूर्ण ज्ञानशाखा, असे ‘विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचे’ थोडक्यात वर्णन करता येईल.

आता, ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ हे इतिहाससंशोधनाच्या रीतिशास्त्राच्या आश्रयाने जर विकसित व्हावयाचे असेल, तर वैज्ञानिक रीतींचा जसा परामर्श ‘विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात’ घेणे अपेक्षित असते आणि घेतला जातो, अगदी त्याप्रमाणेच इतिहाससंशोधनाच्या रीतींचाही परामर्श घेणे क्रमप्राप्त ठरते. अशा स्वरूपाचा परामर्श घेण्याची तयारी जेव्हा तत्त्वज्ञ-इतिहासकार दाखवतो किंबहुना इतिहासाच्या दर्शनाचे स्वरूप आणि उद्दिष्ट जेव्हा असेच असते, तेव्हा त्याला ‘इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान’ (The Critical Philosophy of History) असे सार्थपणे म्हणता येईल. इतिहासाचे हे चिकित्सक तत्त्वज्ञान ज्ञानमीमांसेचेच (Epistemology) एक अंग असते. अगदी सुरुवातीलाच निर्देश केल्याप्रमाणे, इतिहासाचे जे दोन अन्वयार्थ लावण्यात येतात, त्यापैकी एक अन्वयार्थ हा असा आहे.

इतिहासासंबंधी विचार करण्याची दुसरी आणखी एक दिशा आहे. अगदी वेगळ्या प्रकारचे प्रश्न येथे उपस्थित केले जातात. इतिहासाचा अर्थ काय? इतिहास कसा घडतो, घडत जातो? ऐतिहासिक घटना-प्रक्रियांचे मूळ स्वरूप नेमके कसे असते? ह्या प्रकारचे हे प्रश्न आहेत. इतिहासाकडे खंडश:, विभक्तपणे, पृथक स्वरूपात न पाहता, वरवर असंबद्ध, अतार्किक वाटणाऱ्या घटनांतही काही निश्चित, नियमित अशी तार्किक सुसंगती आणि नियम आहेत. इतिहासाचे आकलन हे एक सबंध अर्थपूर्ण असे विश्व व्यापणाऱ्या महत्त्वपूर्ण हेतुगर्भ परिकल्पनेच्या सुस्पष्ट रूपरेषा शोधून, इतिहासाच्या घडणीतील शिस्त, आकार आणि हेतू यांच्या नियमांच्या सहाय्याने धुंडाळत करता येणे शक्य आहे. हे नियम अनुल्लंघ्य, अपरिहार्य, सार्वत्रिक आणि म्हणून सर्वंकष स्वरूपाचे असल्याने या नियमांना अनुसरूनच ऐतिहासिक घटना घडत जातात; मात्र, हे नियम प्राप्त करून घ्यावयाचे असतील तर त्याकरिता इतिहासाकडे गंभीरपणे खोलवर पाहिले पाहिजे, त्याचे समग्र दर्शन आपण घेतले पाहिजे. जैव-पुरातत्त्ववेत्ता ज्याप्रमाणे मृत प्राण्यांच्या अवशेषांतून प्राप्त झालेल्या हाडांची सुसंगती लावून त्यापासून प्राण्याच्या समग्र शरीराच्या सांगाड्याची प्रतीकात्मक रेखाकृती साकारतो आणि तिच्याच सहाय्याने तो सांगाडा विवक्षित प्राण्याचा असलाच पाहिजे किंवा आहे असे खात्रीने निगमित (Deduce) करतो. अगदी त्याप्रमाणेच, इतिहासकाराने विखुरलेल्या ऐतिहासिक घटनांची तार्किक सुसंगती लावून त्यापासून इतिहासाच्या समग्र रूपाचे आकलन करून घेतले पाहिजे. तेव्हा कुठे समग्र इतिहासात काही एक सुसंगती आहे, अर्थपूर्णता आहे ह्याची प्रचीती इतिहासकाराला येऊ शकते. अशाप्रकारची भूमिका अनेक तत्त्ववेत्त्यांनी घेतली. निसर्गात घडणाऱ्या नैसर्गिक घटनांशी, विविध भौतिक प्रक्रियांशी तुलना करता ऐतिहासिक घटनाप्रकारांचे स्वरूप मूलत: भिन्न असते, त्यांचे स्वत:चे स्वायत्त नियम असतात आणि म्हणून इतिहासाची जी घडण होत जाते, ती त्याच विवक्षित नियमांना अनुसरून होत असते, तेव्हा इतिहासाच्या घडणीच्या त्या विवक्षित नियमांचे स्पष्टीकरण करणे, त्यांची सिद्धता देणे आणि इतिहासकाराला त्या नियमांचे ‘ज्ञान’ कसे शक्य होते? ह्या प्रश्नांचा उलगडा करणे हे इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचे कार्य असते. तेव्हा, अशाप्रकारे इतिहासातील अर्थगर्भ-गहन सुसंगती, तार्किक अनुरूपता, ऐतिहासिक प्रक्रियांचा अर्थ, ऐतिहासिक घटनांच्या घडणीविषयीचे विशिष्ट, सार्वत्रिक म्हणून सर्वंकष नियम प्रतिपादन करू पाहणाऱ्या या इतिहासदर्शनाला ‘इतिहासाचे परिकल्पक तत्त्वज्ञान’ (The Speculative Philosophy of History) असे म्हणता येईल. हा इतिहासाचा दुसरा अन्वयार्थ होय.

इतिहासाविषयीचे जे दोन अन्वयार्थ आपण येथवर थोडक्यात बघितले, ज्यांत इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान आणि इतिहासाचे परिकल्पक तत्त्वज्ञान समाविष्ट आहे–त्यांचा सविस्तर परिचय, त्यांतील मूलभूत प्रश्नांचे स्वरूप विस्ताराने स्पष्ट करण्याचा, निदान त्यांतील कित्येक प्रश्नांना स्पर्श करण्याचा आणि त्या प्रश्नांना जी संभाव्य उत्तरे देण्यात आली आहेत व देणे शक्य आहे, त्यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न, प्रस्तुत लेखाच्या पुढील भागात आपण करूया.

 (अपूर्ण)

एम.ए.प्रथम वर्ष : अर्थशास्त्र

अभिप्राय 3

  • धन्यवाद श्रीधर या प्रश्नांची सखोल मांडणी केल्याबाबत …. पुढच्या अंकाची आम्ही वाट पाहतोय…❤️❤️❤️

  • श्रीधर, खूप छान व अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली आहेस. तू माझा विद्यार्थी आहेस याचा मला अभिमान वाटतो.आयुष्यात तू तुझं ध्येय प्राप्त करशील अशी आशा आहे, त्याकरिता तुला शुभेच्छा.

  • आपण इतिहास या विषयाचा केलेला ऊहापोह मी पूर्वी कधीच वाचला नव्हता. उत्तरार्ध वाचायला आवडेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.